२) भारतीय विचार – मोक्ष आणि ज्ञान
(२) भारतीय विचार – मोक्ष आणि ज्ञान – (१) (६४८)
भारतीय दर्शनांचा मूळ प्रश्न ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ म्हणजे मोक्ष हा आहे. हा मोक्ष मनुष्याला जिवंतपणी कसा मिळू शकतो, त्यासाठी मनुष्याने स्वत:त योग्यता कशी निर्माण करावी याबद्दलची सगळी चर्चा म्हणजे भारतीय विचार! ‘आत्यंतिक दु:ख निवृत्ती व शाश्वत सुख निर्मिती’ म्हणजे मोक्ष आणि त्याची जाणीव मनात स्थिर होणे यालाच ज्ञान म्हणतात. अद्वैतमतानुसार या चराचर सृष्टीच्या मुळाशी असेलेलं चैतन्य म्हणजेच मी आहे याची अनुभूती निर्माण होऊन मन पूर्णत्वात स्थिर होते. या पूर्णत्वाच्या मनस्थितीमुळे मनुष्य व्यवहारी जगाकडे अधिक सजगतेने वावरतो, अधिक वस्तुनिष्ठपणे व्यवहार करतो आणि शारीरिक अथवा मानसिक दु:खांची परिस्थिती आली तरी धीराने जीवन कंठतो. उत्तरोत्तर अशा मनुष्याची बुद्धी आणि मन पूर्णत्वात अधिक अधिक दृढ होत जाते आणि यालाच मोक्ष म्हणतात. हा मोक्ष म्हणजेच ज्ञान.
वेदांत या चर्चेचा अंतिम चरण आहे आणि आपण ज्याला बुद्धिवाद म्हणतो, ज्यावर आपला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोण आधारित आहे त्या बुद्धिवादावर वेदांत पूर्णपणे कसा खरा उतरतो हे पाहू. वैज्ञानिक प्रयोग करून निर्माण होणाऱ्या ज्ञानाला मान्यता मिळायसाठी ‘प्रमाण’ (प्रुफ) निर्माण असावे लागते. असे प्रमाण मिळवण्यासाठी लागणाऱ्या कसोट्या म्हणजे -
१) जे कोणी प्रयोग करू इच्छितात त्यांना प्रयोगाचे प्रमेय, सिद्धता आणि साध्य स्पष्टपणे माहीत असणे, व
२) प्रयोगाच्या सिद्धता पद्धतीनुसार कोणीही प्रयोग केला तरी त्याचा निकाल एकसारखाच येणे.
भारतीय दर्शन शास्त्रांमध्ये प्रमाणांचा अतिशय बारकाईने विचार केला आहे. किंबहुना, भारतीय दर्शने जर केवळ faith किंवा belief असतील तर, प्रमाण निर्मितीची गरजच उरत नाही. पण भारतीय दर्शनांमध्ये वेदांताचा दावा – मोक्ष right now, right here (जीवनमुक्ती) – हा आहे त्यामुळे मानवी बुद्धीत प्रमाण निर्मिती करणे हा वेदांताचा प्रमुख विषय आहे. वैज्ञानिक प्रयोगातून निर्माण होणारे प्रमाण आणि वेदांतिक प्रमाण यांत महत्त्वाचा फरक एकच – वेदांतात प्रमाणाचा विषय, प्रमाण निर्माण करणारा आणि साध्य ही तिन्ही एकच आहेत – ते म्हणजे वेदांताचा अभ्यास करून प्रमाण निर्माण करू पाहणारा मनुष्य हा स्वत:च स्वत:चा सच्चिदानंद आत्मा समजून घेतो. त्यामुळे हा प्रवास वैयक्तिक म्हणूनच सुरू होतो परंतु अद्वैताची जाणीव निर्माण झाल्यावर प्रमेय, सिद्धता आणि साध्य ही एकाच आहेत ही लक्षात येते. वैयक्तिक अनुभूती असल्यामुळे बऱ्याचदा वैयक्तिक अनुभव यासदराखाली पारलौकिक (occult) अनुभव यात घुसडले जातात आणि वेदांताला अवैज्ञानिक व गूढ (mystic) प्रकार म्हणून हेटाळले जाते. अर्थात यांत नुकसान जे परंपरेपासून तुटलेले सर्व सामान्य लोक असतात, त्यांचेच होते. भारतीय दर्शने सहा प्रकारची प्रमाणे मान्य करतात – प्रत्यक्ष (पाच ज्ञानेंद्रियांनी निर्माण होणारे ज्ञान), अनुमान (Inference), उपमान (Comparison), अर्थापत्ती (Postulation), अनुपलब्धी (Non-apprehension) आणि शब्द (Verbal testimony). यातील शब्द प्रमाण सोडले तर बाकीची प्रमाणे मानवी बुद्धी नेहमी स्वतंत्रपणे निर्माण करू शकते. यातूनच चार्वाक, जैन, बौद्ध, न्याय, वैषेशिक, सांख्य, योग (पतंजली) आणि मीमांसा या दर्शनांचा विकास झाला. ही सर्व दर्शने द्वैत-मत म्हणजे ‘एकच ब्रह्म-ईश्वर विश्वाच्या मुळाशी आहे’ ही नाकारणारी आहेत. अद्वैत हे एकमेव दर्शन असे आहे ज्यात सर्वव्यापी अशा निर्गुण ब्रह्माची आणि सगुण ईश्वराची मांडणी केली आहे. उपनिषदांत पुन:पुन्हा ज्याचे विवरण केले आहे त्यालाच अद्वैत दर्शन म्हणतात. शब्द प्रमाण ज्याला revelations म्हणजेच वेदांतिक ज्ञान म्हणतात ते उपनिषद लिहिणाऱ्या ऋषींना स्फुरले. खालील तक्ता ज्ञान मिळवण्याच्या म्हणजे प्रमाण कसे निर्माण होते याचे विवेचन करतो.
- चार्वाक - फक्त ‘प्रत्यक्ष’ प्रमाण
- बुद्ध आणि जैन - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही)
- वैशेषिक आणि सांख्य-योग - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही)
- न्याय - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही), उपमा (आंशिक), अर्थापत्ती (आंशिक), अनुपलब्धी(आंशिक)
- मीमांसा - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द (वेद मान्य पण ईश्वर नाही), उपमा, अर्थापत्ती,
- अद्वैत - प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमा, अर्थापत्ती, अनुपलब्धी
वाचने
1925
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
धन्यवाद. तुमचे धागे वाचतो
In reply to धन्यवाद. तुमचे धागे वाचतो by Trump
+१
वाचतेय.....
दर्शन शास्त्रात गती नाही...
अद्वैत तत्वज्ञान