व्यसन
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
व्यसन
माझ्याकडे एक ४८ वर्षाच्या बाई आल्या होत्या. त्यांचा डावा हात दुखत होता. त्यासाठी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या खांद्याची सोनोग्राफी करायला सांगितली होती.
सोनोग्राफी करण्याच्या अगोदर त्यांच्या आजाराची माहिती असावी म्हणून आणि मध्यम वयीन, डावा हात दुखतो आहे म्हणून मी त्यांना विचारले कि त्यांच्या हृदयाची तपासणी झाली आहे का? त्यावर त्यांनी आपली फाईल दाखवली.
त्यात इ सी जी , स्ट्रेस टेस्ट आणि इको कार्डिओग्राफी चे अहवाल होते ते सर्व व्यवस्थित होते म्हणजेच या बाईंना हृदयाचा काहीही आजार नव्हता.
यानंतर मी त्यांना विचारले कि हृदय तर व्यवस्थित आहे
तुम्हाला मानेचे स्पॉनडायलोसिस पण असू शकते. त्यावर त्यांनी एक दुसरी फाईल दाखवली त्यात मानेचा एक्स रे आणि एम आर आय होता त्यामध्ये सुद्धा काही विशेष दिसत नव्हते.
मी सोनोग्राफी केली तर डावा आणि उजवा( तुलनात्मक तपासणी साठी) दोन्ही खांदे व्यवस्थित होते.
आता मी त्यांना कोणत्या स्थितीत आहेत दुखतो आहे ते आणि तेंव्हा नक्की कुठे दुखतो आहे हे विचारले आणि त्या स्नायूंची तपासणी केली.
यानंतर मी त्यांना शांतपणे विचारले कि आपण बराच वेळ मोबाईल हातात घेऊन पाहत असता का?
त्यावर त्यांचे यजमान म्हणाले कि डॉक्टर ती दिवसात सात ते आठ तास मोबाईल घेऊन युट्युबवर विडिओ पाहत असते. पोळ्या लाटताना सुद्धा डावा खांदा वर करून आणि मान वाकडी करून ती मोबाईलवर बोलत असते. तुम्ही तिला काही तरी सांगा. हात दुखतो म्हणून तपासण्यांवर माझे आतापर्यंत २५ हजार रुपये खर्च झाले आहेत.
मी त्यांना म्हणालो कि ४८ वर्षाच्या बाईंना मी सांगावे असा मला काय अधिकार आहे. ज्याचे त्याने समजून घेणे आवश्यक आहे. मी त्यानं फारतर मोबाईल स्टॅण्डवर ठेवून व्हिडीओ पहा असा अनाहूत सल्ला देऊ शकतो. आणि मी त्यांना संगणकावर रुपये ९९ पासून मोबाईल स्टॅण्ड उपलब्ध आहेत असे सुचवले.
https://www.amazon.in/Portronics-POR-122-MODESK-Universal-Mobile/dp/B07N...
काही दिवसानंतर हीच भ्रमणध्वनीच्या व्यसनाची कथा मी एका स्त्री रुग्णाच्या बरोबर आलेल्या त्यांच्या यजमानांना ( हे माझ्या परिचयाचे आहेत) सांगत होतो तर त्यानी हसत हसत मला सांगितले कि डॉक्टर हे तर काहीच नाही. मला पण डावा खांदा आणि डोकं यात मोबाईल ठेवून संभाषण करण्याची सवय होती. यास्तव मी माझे नातेवाईक डॉक्टर सामंत अस्थिरोगतज्ज्ञ ( नाव बदललेले आहे) यांच्या कडे गेलो असता त्यांनी फिजिओ थेरपी घेण्यास सांगितले. मला ते पटलं नाही. आता ते जवळचे नातेवाईक असल्याने मी काही केले नाही पण ते सहा महिन्यांसाठी परदेशी गेले तेंव्हा मी मुलुंडच्या फोर्टिस मध्ये जाऊन कार्डिओलॉजिस्ट कडे सर्व तपासण्या करून घेतल्या. त्यानंतर न्यूरॉलॉजिस्टना दाखवून आलो. यानंतर मानेचा एम आर आय झाला आणि हे सर्व बाड घेऊन मी तेथील अस्थिरोगतज्ज्ञ याना दाखवायला गेलो तर त्यांनी मला फिजिओ थेरपी घेण्यासच सांगितले. आता फिजिओ थेरपी घेऊन मला आराम पडला.
या सर्व प्रकरणात माझे ७५ हजार रुपये खर्च झाले असे त्यांनी मला हसत हसत सांगितले.
मी काय बोलणार? हतबुद्ध होऊन फक्त त्यांच्याकडे पाहत राहिलो.
अशीच २-३ वर्षांपूर्वीची गोष्ट. एक ३५ वर्षाचे गृहस्थ पोट बिघडले म्हणून सोनोग्राफी साठी आले होते. त्यांची सोनोग्राफी करताना आणि जुने अहवाल पाहून मला लक्षात आले कि यांचे वारंवार पोट बिघडते आहे. यावर मी त्यांना विचारले कि तुम्ही जे खाता आहात किंवा जे पाणी पिता आहात त्यामुळे हा आजार तुम्हाला होत असावा असा माझा कयास आहे. तुमच्या पोटात असा गंभीर काही प्रश्न नाही.
त्यावर त्यांनी सांगितले डॉक्टर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मी साकी नाका येथल्या औद्योगिक वसाहतीत नोकरी करतात तेथील कॅन्टीन मधले अन्न फारसे चांगले नाही.
यावर मी त्यांना म्हणालो मग घरून डबा घेऊन जा. घरचे चांगले अन्न घेतले तर हा तुमचा प्रश्न निकालात निघेल.
यावर त्यांनी तोंड वाकडे केले. मी प्रश्नार्थक चेहरा केला तेंव्हा त्यांनी खालच्या आवाजात मला सांगितले कि डॉक्टर माझी बायको सकाळी ११ पर्यंत उठतच नाही.
मी त्यांना विचारले कि त्या नोकरी करतात का? यावर ते म्हणाले कि नाही ती रात्री २ पर्यंत व्हॉट्स ऍप वर असते आणि सकाळी ११-१२ पर्यंत झोपलेली असते. यावर आमची बरीच बोलाचाली झाली आहे पण ती ऐकतच नाही.
मी काय बोलणार? मी एवढेच म्हणालो, मुलुंड मध्ये बरीच चांगली पोळी भाजी केंद्रे आहेत. त्यातील एखाद्या चांगल्या केंद्रावरून पोळी भाजी डब्यात घेऊन जात जा.
याशिवाय मी तर अधिक काय सल्ला देऊ शकलो असतो?
प्रतिक्रिया
एकंदरीत मोबाईल हा अनेक
कळतंय पण वळत नाही!
काही वर्षांपूर्वी कुटुंबासोबत
वरील सर्वांशी सहमत.
व्यसनच म्हणायचं, आणखीन काय?
इतका कुणीही इतका व्यस्त नाही.
व्यसन आता संक्रमित रोगात...
दररोज....
मानवजातीवर आलेले सर्वात मोठे सावट आहे हे.
व्यसनच ते.