हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा परिसर :भाग १: सुरुवात

Primary tabs

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
30 Nov 2022 - 10:52 pm

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणारी आमच्या कौटुंबिक हिवाळी गटाची सहल काही वैयक्तिक कारणांमुळे या वेळी लवकर घेण्यात यावी का अशी विचारणा केली होती त्यास सर्वांकडून होकार मिळाला. कॅलेंडर बघितले. दिवाळी ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यात होती. सुट्यांमध्ये पर्यटन स्थळांना गर्दी असते त्यामुळे यापूर्वीच सहल घ्यायचे ठरून ऑक्टोबरचा पहिला व दुसरा आठवडा सहलीसाठी निश्चित झाला. बघता बघता सहलीसाठी सोळा जणांची नोंदणीही झाली.

साधारण नऊ मुक्काम व रेल्वे प्रवासासहित बारा दिवसांची सहल करण्याचे ठरले. सहलीचा साधारण कालावधी ठरल्यानंतर सहलीस कुठे जायचे याचा विचार सुरु झाला. पट्टडक्कल-ऐहोले-बदामी-हंपी-गोकर्ण अशी सहल कधीपासून खुणावते आहे पण ऑक्टोबरमध्ये कदाचित उष्णेतेचा त्रास जाणवेल म्हणून उत्तरेकडील राज्यात सहल घ्यावी असा विचार सुरु होऊन हिमाचल प्रदेशावर स्थिरावला. हिमाचलची शिमला-कुल्लू-मनाली अशी सहल आधी केली असल्याने त्याचा विचार सोडला व कांगडा व चंबा जिल्ह्यातील धर्मशाळा, पालमपूर, डलहौसी भागात सहलीस जाण्याचे ठरले.
साधारण भटकंतीचा प्रदेश दर्शविण्याकरिता कच्चा नकाशा

उत्तर-पश्चिमी हिमालयाच्या धौलाधर (धवल धार)पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला हा प्रदेश. वर्षातील जवळपास बाराही महिने या पर्वतशृंखलेतील शिखरे हिमाच्छादित असतात. , खोरी, प्राचीन मंदिरे, मठ, सरोवर ऐतिहासिक भव्य किल्ला असेलेला हा नितांत सुंदर प्रदेश तसेच हिंदू, मुघल, बौद्ध असा विविध धर्म आणि संस्कृती लाभलेला प्रदेश.

हिमाचल प्रदेश पर्यटनासाठी काळ हा बाराही महिने अनुकूल आहे. मार्च ते मध्य जुलै महिन्यात येथे आल्हाददायक वातावरण असते. अनेक प्रकारचे ट्रेकही याच काळात केले जातात. मध्य जुलै ते सप्टेंबर हा पावसाळी काळही काही पर्यटकांना आकर्षित करतो.
मध्य सप्टेंबरला पाऊस थांबतो व येथपासून नोव्हेंबरचा काळ हा पर्यटनासाठी खूपच आल्हाददायक व साहसी उपक्रमांसाठी पर्वणी . या काळात संध्यकाळ/रात्र मात्र अतिशय थंड असते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे थंडीने गोठवणारे महिने. बर्फाच्छादित शुभ्र पर्वतरांगा व हिमवृष्टी अनुभवायची असेल तर हा काळ उत्तम.

हिमाचल प्रदेश विषयी काही संक्षिप्त सामान्य माहिती
राज्य स्थापना : २५ जानेवारी १९७१
एकूण जिल्हे : १२
प्रशासकीय भाषा : हिंदी
इतर मुख्य भाषा : पहाडी
राजधानी : शिमला (उन्हाळी), धर्मशाळा (हिवाळी)

राज्य प्राणी, राज्य पक्षी, राज्य फुल
(सहलीत एके ठिकाणी हिमाचल प्रदेश पर्यटन मंडळातर्फे लावलेल्या पाटीचा टिपलेला फोटो )

काही भौगोलिक माहिती
सीमा : उत्तरेला जम्मू आणि काश्मीर, पश्चिमेला पंजाब, आग्नेयेला उत्तराखंड व दक्षिणेला हरियाणा ही राज्ये आहेत.
क्षेत्रफळ : ५५,६७३ चौ.किमी
समुद्र सपाटीपासून उंची : सुधारणे ३५० मीटर ते ७००० मीटर
व्यवसाय: शेती,पर्यटन हे मुख्य व्यवसाय
मुख्य शेती उत्पादने : गहू, बटाटे, तांदूळ, आले. फळे :सफरचंद
प्रमुख औद्योगिक व्यवसाय: फळ प्रक्रिया उद्योग
प्रमुख नद्या :चिनाब,रावी,सतलज,बियास,यमुना

नेहमीप्रमाणे सहलीचे ठिकाण ठरल्यानंतर सर्व तयारी म्हणजे सहलीचा साधारण आराखडा तयार करणे , जाण्या येण्यासाठी सोईस्कर रेल्वे गाड्या शोधणे व त्यानुसार सहलीसाठी निघण्याचा व परतण्याचा दिवस निश्चित करणे, रेल्वेतून उतरल्यापासून परतीच्या रेल्वे स्थानकावर येईपर्यंत संपूर्ण सहलीसाठी खाजगी वाहन निश्चित करणे, हॉटेल्स शोधून निश्चित करणे इ. कामे सुरु झाली. खर्चाचा साधारण अंदाज सांगितल्यावर आपापल्या सोईनुसार सगळ्यांनी पैसेही जमा करायला सुरुवात केली.

रेल्वेने जायचे झाल्यास धर्मशाळेसाठी पंजाबमधील पठाणकोट हे सोईस्कर रेल्वे स्टेशन.जळगांवहून येणार पर्यटक जास्त असल्याने मुंबईला येऊन पश्चिम रेल्वेने पठाणकोटला जाण्यापेक्षा मुंबई-नाशिककरांनी भुसावळला यावे व सर्वांनी एकत्रितपणे पुढचा प्रवास सुरु करावा असे ठरले. त्यानुसार पठाणकोटला सकाळी पोहोचवणारी पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेस सोईस्कर ठरणार होती. गाडीला जळगाव थांबा असला तरी भुसावळहून आरक्षण कोटा जास्त असल्याने सर्व तिकिटे एकाच डब्यात मिळण्याची शक्यता जास्त होती व झालेही तसेच. काहींना अटारी-वाघा सीमा बघण्याची खूप इच्छा होती त्यामुळे परतीच्या प्रवासात पठाणकोटला न येता अमृतसरला जाण्याचे ठरले. आमची परतीची काही तिकिटे पश्चिम रेल्वेच्या गोल्डन टेम्पल गाडीची तर काही भुसावळला जाणाऱ्या गाडीची काढली.

सहलीसाठी हॉटेल्सचा शोध घेणेही सुरु होते. धर्मशाळा परिसरात मॅक्लीऑडगंज भागसु, नड्डी इ. ठिकाणी पर्यटक जास्तकरून भेट देतात. त्यामुळे याच भागात हॉटेल शोध सुरु केला. बाजारपट्यात अगदी हजार-बाराशे रुपयांपासून रूम दिसतात पण ग्रुपच्या हिशोबाने एकाच हॉटेलमध्ये सहा-सात रूम उपलभद्ध असणारे बऱ्यापैकी हॉटेल मिळत नव्हते. सहलीच्या सर्व ठिकाणी HPTDC चे हॉटेल मिळण्याची शक्यता नव्हती.त्यामुळे यावेळी राहण्यासाठी आम्ही आमच्या बजेटमध्ये बसणारे थोडे वेगवेगळे पर्याय निवडले. रोजच्या रोज सामानाची बांधाबांध करावी लागू नये याकरिता सहलीच्या प्रत्येक भागात एकेका ठिकाणी दोन दोन मुक्काम करायचे ठरले.
सोळा जणांच्या ग्रुपकरीता आम्ही १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी शोधत होतो. पण मॅक्लीऑडगंज वगैरे काही परिसरात रस्ते अरुंद असल्याकारणाने मोठ्या गाडयांना मज्जाव आहे. तेथील दलालाच्या सांगण्यानुसार आम्ही एक १२ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर व एक इनोव्हा क्रिस्ता अशा दोन गाड्या संपूर्ण सहल कालावधीसाठी निश्चित केल्या.

सहलीचा दिवस जवळ येऊ लागला आणि अचानक काही जणांनी त्यांच्या अथवा घरातील व्यक्तींच्या स्वास्थ्य वषयक तक्रारींमुळे माघार घेण्यास सुरुवात केली. बघता बघता सहलीतील सदस्यांची संख्या निम्म्यावर आली. रेल्वे, हॉटेल्स, खाजगी गाड्या सर्वांसाठी आगाऊ रक्कम देऊन झाली होती. अशा परिस्थितीत काही आरक्षणे रद्द केल्यास आर्थिक फटका बसणार होता. दोन पर्याय होते. सहल रद्द केलेल्या लोकांकडून हा खर्च वसूल करणे किंवा उरलेल्या लोकांवर अधिकचा भार टाकणे. दोन्हीही गोष्टी मनाला पटत नव्हत्या. याच कारणाने तिसरा पर्याय बदली पर्यटक मिळवण्याच्या दृष्टीने मित्र-परिवारात चौकशी सुरु केली. मिपावर सुद्धा हाक देण्याचा विचार मनात घोळत होता. पण ओळखीतच सहलीस तयार असणारी दोन दाम्पत्य मिळाली. बारा जण जमले. भटकंतीसाठी दोन गाड्या ठरवल्याचा निर्णय पथ्थ्यावर पडला होता. छोटी गाडी रद्द करण्याची दलालाला विनंती केली ती मान्य झाली. आता एकच १२ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर असणार होती. खर्च बराच कमी झाला. हॉटेलच्या रूम बुक करतांना एकेक-दोन दोन रूम कमीच ठरवल्या होत्या. तोही खर्च आटोक्यात आला. आता प्रश्न होता नवीन सदस्यांसाठी पठाणकोट जाण्यासाठी रेल्वे तिकिटांचा. मुंबई, पुणे, भुसावळ कुठूनही कुठल्याच गाडीची आणि कुठल्याच दर्जाची तिकिटे शिल्लक नव्हती. शेवटी सहल रद्द केलेल्यांच्या तिकिटावरच नवीन लोकांना घेऊन जायचे ठरवले. जरूर पडल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची तयारीही ठेवली. नको असलेली तिकिटे रद्द केली.

अखेर सहलीचा दिवस उजाडला. मुंबईकरांनी दुपारीच सेवाग्राम एक्सप्रेस गाडीने भुसावळला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठले.

गाडी वेळेवर सुटली. कसाऱ्याचा हिरवाईने नटलेला निसर्गसुंदर घाट पार झाला.

हळूहळू नाशिक-मनमाड मागे टाकत पाचोरा या आमच्या मूळ गावच्या रेल्वे स्थानकावर पोहचली. येथे फलाटावर भाचा स्वागताला हजर होता. सोबत आमच्या सहल प्रवासात उपयोगी पडावी म्हणून गोणीभर मधुर,रसाळ घरच्या शेतातील मोसंबीही आणली होती.

थोडंसं बोलणं होतं न होतं तेव्हड्यात गाडी सुटली आणि थोड्या अवधीतच भुसावळला पोहचली. याच फलाटावर पुढच्या प्रवासासाठी पुण्याहून येणारी जम्मूतावी गाडी पकडायची होती. त्यामुळे सामान घेऊन जिने चढ-उतर करायचा त्रास वाचणार होता. गाडीला उशीर झाला तर पुढची गाडी चुकू नये याकरता थोडी लवकरच पोहोचणारी गाडी पकडली होती पण येथपर्यंत गाडी वेळेत आल्यानेआता पुढच्या प्रवासासाठी तब्ब्ल चार तास वाट बघावी लागणार होती. प्रतिक्षालयात सामान ठेऊन एकाला नजर ठेवायला बसवले व आम्ही असेच इकडे तिकडे भटकायला बाहेर पडलो. थोड्याच वेळात इतर जळगांवकर मंडळी सुद्धा येऊन पोहचली. चार मुंबईकर सहल रद्द केलेल्या जळगावकरांच्या तिकिटावर प्रवास करणार होते त्यांना प्रवासापुरती मूळ तिकीटवाल्यांची आधार कार्ड दिली.
प्रतिक्षा संपली. पठाणकोटला जाणारी गाडी अगदी वेळेवर भुसावळला आली.

रात्रीचे दोन वाजले होते. आमच्या बर्थवर लोक डाराडूर झोपलेले होते. त्यांना उठवून आम्ही स्थिरावेपर्यंत थोडा वेळ गेला. तेव्हढयात तिकीट तपासनीस आला. बारा जणांची मिळून तीन वेगवेगळी तिकिटे होती. त्याला तपासावी वाटली अशी कोणतीही तीन नावे त्याने घेतली. प्रत्येकाचे ओळखपत्र पहिले, त्यावरील फोटो पाहिला व सर्वजण आल्याची नोंद करून निघून गेला. वास्तविक ज्यांची ओळखपत्रे बघितल्या गेली त्यातील एक प्रवासी डमी होता. घाई गर्दीत त्याच्याकडून थोडीशी चूक झाली होती जी आमच्यासाठी फायदेशीर ठरली होती. आम्ही सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतरही संपूर्ण प्रवासात ३-४ वेळा तिकीट तपासनीस (TTE) आले परंतु ते फक्त नवीन स्थानकांहून चढलेल्या प्रवाशांची तिकिटे तपासण्यापुरतेच.
AC डब्यात करोना काळात बंद केलेली पांघरून सेवा सुरु झाल्याचे माहित होते पण मुंबईहून निघाल्यानंतर आम्हाला रेल्वेकडून निरोप मिळाला की झेलम गाडीला ही सुविधा नाही. त्यामुळे जळगावकरांना आमच्यासाठी अंथरून-पांघरून आणायला सांगितले त्याचा चांगला उपयोग झाला. दुसरा दिवस व रात्र संपूर्ण रेल्वे प्रवास होता. प्रवासासाठी घरूनच जेवण बांधून आणले होते त्यामुळे बाहेरून काही जास्त विकत घ्यावे लागले नाही.
तिखट, गोड पुरी, तिळाची,शेंगदाण्याची चटणी,गुळ, साजूक तूप, कैरी, कांदा, लोणचे, पापड असे जास्त दिवस टिकाऊ पदार्थ

नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी, गाण्याच्या भेंड्या व पुरुष मंडळींनी रमीचा डाव टाकून वेळ घालवण्यास सुरुवात केली.
संपूर्ण प्रवासात वेळेवर धावणारी गाडी अखेरच्या स्थानकाआधी थोडी रखडली. येथे फलाटावर बरेच स्थानिक लोक जमलेले दिसत होते. चौकशी केली असता कळले की कोणीतरी लष्करी अधिकारी निवृत्त होऊन गावी परत आला होता त्याच्या स्वागत-सत्काराला सर्व जमले होते. निवृत्त अधिकाऱ्याला त्यांचा एक फोटो घेऊ का असे विचारला असता आमच्या ग्रुपच्या माणसांनाही त्यांच्या सोबत उभे करून नंतर फोटो घ्या असे त्यांनी सुचवले.

यानंतर थोडी गंमतच झाली. अधिकाऱ्याबरोबरचे लोक पुढे निघून गेले होते. आम्ही कोणाबरोबर फोटो काढला त्यांचे नाव तरी माहित असावे म्हणून त्यांनाच विचारले त्याबरोबर ते मिश्किल हसले. अर्थात नाव समजलेच 'चरणजित सिंगजी'.

अखेर थोड्या वेळाने गाडी हलली आणि पठाणकोट स्टेशनला उतरायची तयारी सुरु झाली

क्रमश:

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

30 Nov 2022 - 11:07 pm | गोरगावलेकर

साहित्य संपादकांना विनंती कि लेख भटकंती विभागात हलवावा

कंजूस's picture

1 Dec 2022 - 5:10 am | कंजूस

तुमच्या आयोजकांचे कौतुक आहे. खटाटोप करून सहल यशस्वी करतात. एकाच वयाचे बदली प्रवासी मिळणे अवघडच. तेही जमवले.
पुढील भाग वाचायला उत्सुक.
-------------

अवांतर-
हिमालयीन भागांतील काश्मिर,लेह लडाख, हिमाचल,उत्तराखंड, बंगालातील दार्जिलिंग वगैरे भागांत जायचे नाही हे वाचन करून आणि विडिओ पाहून अगोदरच ठरवले आहे. यामध्ये डीडी भारती, डीडी इंडिया चानेलच्या डॉक्युमेंटरीज आहेत. दुसरे एक कारण म्हणजे घाट रस्त्याने बराच प्रवास करावा लागणे.

श्वेता२४'s picture

1 Dec 2022 - 8:09 am | श्वेता२४

भविष्यात या भागात पर्यटन करण्यासाठी जायचं आहे. त्यामुळे तुमचे हे लेख मार्गदर्शक ठरतील. फोटो खूपच सुंदर आलेत. पुढील भाग प्रतीक्षेत.

प्रचेतस's picture

1 Dec 2022 - 9:00 am | प्रचेतस

एकदम भारी सुरुवात. आपले नियोजन नेहमीच खूप विचारपूर्वक केलेले असते आणि त्याचा प्रवासात फायदाच होतो. झेलमने दोन वेळा प्रवास झाला असल्याने ती नेहमीच उशिराच चालते असा अनुभव आहे.

गाडी वेळेवर सुटली. कसाऱ्याचा हिरवाईने नटलेला निसर्गसुंदर घाट पार झाला.

ह्याच्या खालील फोटोत जो समोरचा सुळकेवाला डोंगर आहे तो माहुली किल्ला. डाव्या कोपर्‍यातला एकूटवाणा वजीर सुळका अगदी स्पष्ट आलाय.

शेवटी सहल रद्द केलेल्यांच्या तिकिटावरच नवीन लोकांना घेऊन जायचे ठरवले.

हल्लीच हा नियम बदललाय असे मध्यंतरी कुठेतरी वाचण्यात आले होते. थोडीशी फी भरुन नवीन नावांवर तिकिट ट्रान्सफर करता येते असे काही त्यात होते. नेहमी रेल्वेने लांबचा प्रवास करणारे याबाबत काही सांगू शकतील.

पूर्वी फक्त रक्ताच्या नात्यातील लोकांच्या नावावरच तिकीट बदलून घेता येत होते असे स्मरते. सध्याचा नियम माहित नाही.
आणि हे करण्यासाठी बहुतेक तिकीट खिडकीवरच जावे लागते. ऑनलाईन होत नसावे

सुबोध खरे's picture

1 Dec 2022 - 7:13 pm | सुबोध खरे

https://www.irctchelp.in/change-name-change-boarding-station-train-ticke...

या दुव्यावर हि माहिती आहे

आणि यात एक पळवाट अशी आहे कि लग्नाचे वर्हाड जात असेल तर त्यात एकाचे तिकीट दुसऱ्याच्या नावावर करणे शक्य आहे. अन्यथा हे फक्त जवळच्या नातेवाइकातच करता येते.

गोरगावलेकर's picture

1 Dec 2022 - 10:01 am | गोरगावलेकर

धागा भटकंती विभागात हलविल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार

कंजूस's picture

1 Dec 2022 - 10:15 am | कंजूस

नियम पूर्वीही होते पण ते वेगळ्या संदर्भात होते. म्हणजे शाळेचा ग्रुप न्यायचा झाल्यास वगैरे सहभागी बदलता येतात.

दुसरा एक पर्याय म्हणजे तीन/चार चे छोटे कौटुंबिक गट. प्रत्येकाने ठरल्या तारखांना आपापल्या ठिकाणाहून तिकिटे त्याच गाडीची काढायची. काही कारणाने तो गट येणार नसेल तर ते तिकडूनही त्यांचे तिकिट रद्द करू शकतात. मुख्य आयोजकांना वेगळी खटपट करावी लागत नाही. शिवाय खिडक्यांच्या जागा लोअर बर्थ अधिक मिळतात. एकाच दिवशी बुकिंग निरनिराळ्या ठिकाणाहून केल्यावर साधारणपणे जवळचेच डबे असतात.

मग मुक्कामी पोहोचल्यावर किती जण आहेत त्या संख्येच्या प्रमाणे तिथे वाहनं भाड्याने घ्यायची.
थोडासा स्वतंत्रपणा आणि सोय दोन्हीही साध्य होते.
कुठे ऑटो करायची झाल्यास अथवा रुम घ्यायची झाल्यास तीन/सहा सभासद योग्य पडतात.

हॉटेल्सही जो तो आपल्या सोयीने घेतो.

गोरगावलेकर's picture

1 Dec 2022 - 10:40 am | गोरगावलेकर

हिमालयीन भागांतील काश्मिर,लेह लडाख, हिमाचल,उत्तराखंड, बंगालातील दार्जिलिंग वगैरे भागांत जायचे नाही हे वाचन करून आणि विडिओ पाहून अगोदरच ठरवले आहे.

असे का बरे? दुर्गम भागात नाही पण सहज सोपी ठिकाणे जरूर करता येतील. .खर्चाच्या दृष्टीने म्हटले तर ग्रुपने गेल्यास सहज शक्य आहे.
(आजवरच्या लेखांवरून आपणांस एकट्याने फिरणे जास्त आवडत असावे असा एक अंदाज)

काही कारणाने तो गट येणार नसेल तर ते तिकडूनही त्यांचे तिकिट रद्द करू शकतात.

तिकीट रद्द करणे सहज शक्य पण त्यांच्या जागी बदली लोक घेता येत नसावे. नाहीतर दलालांची चांदी

कंजूस's picture

1 Dec 2022 - 11:18 am | कंजूस

एकट्याने फिरणे जास्त आवडते. हो. पण विडिओ पाहिल्यावर कळले की फारसे काही नाही. ब्रिटीशांनी ही ठिकाणे डेवलप केली त्यांच्या कर्मचाऱ्यांना थंड हवेत सुटी घालविण्यासाठी. पण नंतर '७० -'८० दशकांत गाववाल्यांनी बांधकामांचे नियमन काढायला लावले व बेसुमार इमारती आल्या. चंबा,डलहौसी, सातताल(उत्तराखंड),वैष्णोदेवी (जम्मू) इथल्या अगोदरच्या फिल्म्स पाहिल्यावर आश्चर्य वाटतं. हॉटेलांतलं सांडपाणी उतारामुळे तलावांतच जातं.
जाऊ.दे.
_________________
तर तुम्ही जे वाहन ठरवता त्याची क्षमता भरण्यासाठी.
पण कमीच लोक आले तर? म्हणजे कुणीही अचानक गळतात. आणि आपल्याला उगाचच संख्या भरावी लागते.

खुपचं सुंदर!फोटोही अप्रतिम! महाराष्ट्रात बर्फ नाही तेव्हा बर्फासाठी हिमाचल,हिमालयाला जायलाच पाहिजे.तुमच्या सहलीत बर्फाची वाट पाहते :)

आम्ही गेलो तो काळ बर्फवृष्टीचा नाहीच. आणि दुर्गम शिखरांवर चढाई शक्य नाही.
असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आणि हो तू माझ्यापेक्षा लहान (वयाने) आहेस म्हणून अरे तुरे बरंका. राग मानू नकोस

ओह,भुरभुरणारा बर्फ नाहीतर.
हम्म ताई, नक्कीच भक्ती म्हणू शकता.

कर्नलतपस्वी's picture

1 Dec 2022 - 5:52 pm | कर्नलतपस्वी

कुटुंबीयां बरोबर भटकंती नेहमीच अविस्मरणीय असते.

झेलम माझी लाडकी ट्रेन आहे. पंचवीस वर्ष कदाचित जास्तच या गाडीतून प्रवास केला.

१९७९ मधे पठाणकोट स्टेशन बघितले. इथून पुढे झेलम खुपच हळू जाते. साधारण पाऊणतास इथे गाडी थांबते. त्यावेळेस स्टेशन वरूनच धौलाधार रांगा दिसत.

उकडलेले अंडे ,पुडी सब्जी, ब्रेड आमलेट असा ब्रेकफास्ट सकाळी सकाळीच मिळतो. ही गाडी आम्हां सैनिका साठीच बनलेली आहे.

बाकी, योल कॅम्प, धर्मशाळा,डग्शाय,बकलौ, मॅकलोडगंज ,डलहौजी व इतर काही ब्रिटिशांची आवडती ठिकाणे. नयनरम्य. आता मात्र सिमेंट ची जंगले वाढू लागली आहेत.
भटकंती छानच झाली असणार. तुमचे लिखाण सुद्धा ओघवते असते त्यामुळे बरीच नवीन माहीती मिळेल.

पुढील भाग लवकर येऊ द्यात.

वाचतोय, पुढे वाचण्यास उत्सुक.

गोरगावलेकर's picture

4 Dec 2022 - 10:43 am | गोरगावलेकर

श्वेता२४ : प्रतिसादाबद्दल धन्यवाद

प्रचेतस: ह्याच्या खालील फोटोत जो समोरचा सुळकेवाला डोंगर आहे तो माहुली किल्ला.
अगदी बरोबर. शहापूरच्या आधी घेतलेला फोटो आहे.

सुबोध खरे:दुव्याबद्दल धन्यवाद. सर्व शंका निरसन झाले. आमच्या नवीन पर्यटकांना त्यांच्या नावावर तिकीटे बदलून मिळणारच नव्हती हे निश्चित.

कर्नलतपस्वी: आता मात्र सिमेंट ची जंगले वाढू लागली आहेत.
सिमेंटची जंगले सगळीकडेच वाढताहेत. हा भाग तरी कसा सुटणार, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर हा परिसर अजूनही तितकाच नयनरम्य आहे हे जाणवते.

अनिंद्य:येतोय पुढचा भाग लवकरच.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2022 - 4:36 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर सुरुवात !
काहीजणांनी रद्द केल्यामुळे नियोजनातील त्रेधातिरपीट वाचण्याजोगी आहे.

सरवच प्रचि छान, विशेषत सुर्यप्रकाश आणी ढगवाले प्रचि आवडले.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

Nitin Palkar's picture

8 Dec 2022 - 6:45 pm | Nitin Palkar

सुरेख वर्णन.

गोरगावलेकर's picture

9 Dec 2022 - 12:01 pm | गोरगावलेकर

चौथा कोनाडा, Nitin Palkar यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Dec 2022 - 2:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

अजुन एक भटकंतीविषयक लेखमाला सुरु झाली याचा आनंद, तुम्ही फिरा आणि आम्हाला घरबसल्या हिमाचल फिरायचा आनंद द्या. हा भाग मस्तच. आता पुढचा वाचतो.