मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिद्धेश्वर,लक्ष्मीनारायण मंदिर -मांडवगण

Bhakti · · भटकंती
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मांडवगण हे नदीच्या प्रवाहात वेढलेले गाव आहे.मांडव्य ऋषींची तपोभूमी आणि समाधी स्थान असल्याने गावाचे नाव मांडवगण आहे. गाव सिद्धेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध मंदिरात प्रवेशद्वारातून आत येताच जुने प्रचंड मोठे वड-कडूनिंबाचे वृक्ष ही तपोभूमी असल्याची ग्वाही देतात. त्यासमोरच उंचच उंच जुन्या विटांच्या बांधकामात बांधलेली दिपमाळ आहे.अतिशय भव्य असे मंदिर आधुनिक रंगसंगतीत सजवले आहे. विविध कळस आकर्षक आहेत.मंदिराच्या बाहेरच एक ओढा वाहतो तसेच दोन बारव पाण्याची गरज पुरवतात.पुढे 'गढीआई' -लक्ष्मीनारायण मंदिर अशा नावाने ओळखले जाणारे मंदिर पाहायला गेलो. यादव कालीन हेमाडपंथी बांधकाम असलेले मंदिर पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली आहे. अतिशय सुबक बांधकाम असलेले मंदिर अर्धवट बांधलेले आहे.मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुबक कोरीवकाम डोळ्यांचे पारणे फेडते.यामधील दगडाचे तोरण, दोन्ही दारांवर व्याल इतर शिल्प माळा सुरेख वाटतात.आतील सभामंडपात भारयक्ष यांनी पेललेले अनेक खांब आणि विविध आकारांचे छत आहेत. गर्भगृहात देवीची मुर्ती आणि सर्वात जुनी विष्णु लक्ष्मीची ५-६ फूट उंच मूर्ती जरी भग्न अवस्थेत असली तरी मूर्तीचे सौंदर्य लपत नाही.मूर्ती भवती वराह , नृसिंह हे विष्णूचे अवतार,गदा हे आयुध सहज ओळखता येते.परकीय आक्रमणामुळे अतोनात नुकसान पाहून मनाला हळहळ वाटते. त्यानंतर मंदिराच्या बाहेरील बाजूंचे पद्धतशीर ,योग्य प्रमाणात चढवलेले खांब पाहिले.पुनश्च पुरातन स्थापत्यशास्त्राचा अभिमान वाटतो. एक अलौकिक वारसा नितांत सुंदर अनुभवल्याचा आनंद घेत परत निघालो.मन भरल्यामुळे आजुबाजुची साधीच फुले,तूरीची झाडे, दुतर्फा झाडी आणखिनच सुंदर भासू लागली. -भक्ती फोटो युट्यूबवर स्लाईड शोमध्ये केलेत,त्याची लिंक. लक्ष्मीनारायण/गढीआई

वाचन 5122 प्रतिक्रिया 0