द ब्यूटिफुल गेम

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
28 Nov 2022 - 5:31 pm

समुद्रमंथन - पाश्चिमात्य व्हर्जन

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट बरं का! हे यूरोपियन्स, आफ्रिकन्स आणि दक्षिण अमेरिकन लोकं होते ना - त्यांनी आपली पुराणं वाचली आणि त्यांना किडा आला समुद्रमंथन करण्याचा. म्हणाले आपण अ‍ॅटलान्टिक महासागर ढवळून काढू. झालं! लोकं लागली कामाला. अँडीज कि आल्प्सचा एक पर्वत घेतला, अ‍ॅझटेकांच्या केत्झालकोआत देवाची रस्सी केली आणि लागले की समुद्र घुसळायला. आता पाश्चिमात्यच समुद्र तो! त्यातून पहिली आली ती हिरे माणकं नेली आफ्रिकन्सनी. मग आली वाईन - ती फ्रेंच लोकं घेऊन गेली. मग आलं सांंबा नृत्य - ते नेलं ब्राझिलियन्सनी. मग आली व्हिस्की - ती स्कॉटिश लोकांनी नुसती नेली नाही तर तिचं "स्कॉच" असं बारसं केलं. बियर नेली आयरिश लोकांनी. मग एक कोणीशी सुंदर अप्सरा आली - ती व्हेनेझुएला ला गेली म्हणतात ;-). मेक्सिकोला तॉर्तिया मिळाला. अमेरिकेला पैसा, डच लोकांना ट्यूलिप्स असं सगळ्यांना काय काय मिळत गेलं. पण तरी सगळ्यांना भुरळ पाडेल असं काही बाहेर आलं नव्हतं.

आणि मग कित्येक दिवसांच्या अविश्रांत मेहनतीनंतर विजांचा कडकडाट झाला... वादळ सुटलं ....अ‍ॅटलांटिक ढवळून निघाला ...त्यानं रौद्र रूप घेतलं.. प्रलयाची स्थिती निर्माण झाली आणि अ‍ॅटलांटिकच्या उदरातून एक दिव्य, तेजस्वी गोलक बाहेर आला - तो म्हणजे फुटबॉल!

मग नेहेमीप्रमाणे "जे चांगलं ते आमचं" म्हणणार्‍या ब्रिटिशांनी त्याच्यावर क्लेम केला खरा... पण त्या एका फुटबॉलसाठी चालू झालेली भांडणं आजतागायत चालू आहेत. आपल्याकडे अमृताचे थेंब पडले तिथे कुंभमेळा होतो ना... तसं त्यांच्याकडे त्या पुरातन भांडणांचं प्रतीक म्हणून जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी दर चार वर्षांनी एक महाकुंभ भरतो. त्याला अर्वाचीन जगात "विश्वचषक फुटबॉल स्पर्धा" म्हणतात. नाही म्हणायला जगभरातले इतर देशही फुटबॉल खेळतात, पण त्या रत्नावर पहिला हक्क युरोपियन्स आणि दक्षिण अमेरिकन्सचा हे कोणीही मान्य करेल.

जगातली सर्वांत मोठी आणि महत्वाची संघटना म्हणजे united nations organization चे १९३ सदस्य देश आहेत पण Fédération Internationale de Football Association म्हणजे फिफाचे २११ सदस्य देश आहेत. म्हणजे जगात किमान अठरा देश असे आहेत की ज्यांना जगानी आपलं अस्तित्व मान्य करण्यापेक्षा सुद्धा आपल्याला फुटबॉल खेळू देणं महत्वाचं वाटतं! आणि का वाटू नये? हजारो प्रेक्षकांच्या सुरेल साथीत २२ कसलेल्या खेळाडूंनी रंगवलेला फुटबॉलच्या सामन्याला poetry in motion याइतकी यथार्थ उपमा शोधून सापडणार नाही. कुठलीही कलाकृती हे आधी एक "काव्य" असतं असं म्हणतात. पुढे ते काव्य - व्यक्त करण्याचं जे काही माध्यम असेल त्यात विरघळून कवितेचं, चित्राचं, शिल्पाचं, संगीताचं, नृत्याचं, साहित्याचं, नाट्याचं किंवा खेळाचं रूप घेऊन समूर्त होतं.

त्याअर्थी फुटबॉल एक काव्य आहे. प्रत्येक संघ आपापल्या पद्धतीने ते काव्य मांडत असतो. ब्रिटिश लोकं खेळतात तेव्हा फुटबॉलची एखादी मुक्तछंदातली कविता होते. ती बेहोष - बेभान करत नाही पण समाधान देऊन जाते. खळखळून हसवत नाही पण ओठांवर स्मितहास्य देऊन जाते. जर्मन्सच्या बुद्धिमत्तेला त्यांचं फुटबॉल सुद्धा आव्हान देतं आणि तयार करतात त्यांच्या लौकिकाला साजेसं ताकदवान आणि कार्यक्षम इंजिन. इटालियन्स रंगात आले की मायकेलँजेलोचं एखादं अप्रतीम शिल्प घडवतात. अत्यंत बाधेसूद आणि देखणं! आफ्रिकन देश कहोन आणि झेंबेच्या तालावर ग्वारा-ग्वारा किंवा झुलूचं प्रात्यक्षिक देऊन मन जिंकतात तर फ्रेंच लोकांचं फुटबॉल सुद्धा त्यांच्या ओपेरा सारखं रोमॅन्टिक असतं. स्पॅनिश लोकं म्हणजे त्यांच्या "बुलफाईट" वाल्या मॅटॅडोरच्या थाटात प्रतिस्पर्धी बैलाला सामोरे जातात. छोटे पासेस देत खेळण्याची "टिकी-टाका" पद्धत असो वा पारंपारिक फुटबॉल - स्पॅनिश अर्माडा म्हणजे एकाच वेळी चपळ आणि graceful ! ब्राझिलियन्स फुटबॉलच्या मैदानावर सांबा चा घायाळ करणारा परफॉर्मन्स देऊन जातात. फुटबॉलचं ग्लॅमर, मदहोश करणारं सौंदर्य, oomph factor, सेक्स अपील वगैरे जे काही असेल तर ते ब्राझील आहे. ब्राझील म्हणजे फुटबॉलची मेरेलिन मन्रो, मधुबाला आणि माधुरी दिक्षितही. हिरॉइनशिवाय बॉलिवूडचा मसाला चित्रपट आणि ब्राझीलशिवाय फुटबॉल वर्ल्डकप - ह्या दोन संकल्पना अस्तित्वातच नाहीत. एखादा फुटबॉलचा तिरस्कार करणारा विश्वामित्र असेल तर त्याचा तपोभंग करण्यासाठी ब्राझिलियन फुटबॉलची मेनका हा बेष्ट उपाय.

फुटबॉल हे साक्षात संगीत आहे. सध्या कतारमध्ये फुटबॉलचा वर्ल्डकप नाही तर एक महफिल सुरू आहे. आलाप - जोड झाले आहेत. वाद्यं पर्फेक्ट सुरात लागली आहेत, गवय्यांचे आवाज तापलेले आहेत. व्हियोलावर फ्रान्स आहे, सौदी रबाब आहे, स्पॅनिश व्हायोलिन्सचा ताफा आहे, इराणनी सितारीचा टणत्कार केला आहे. पोर्तुगल आणि मेक्सिकोच्या हाती गिटार्स आहेत. इंग्लंड, बेल्जियम, पोलंडचा ब्रास सेक्शन सरसावून बसला आहे. घाना, सेनेगल, कॅमेरून वगैरे मंडळी side rhythms ला आहेत. ड्रम्सवर साक्षात ब्राझील आहे आणि कोरसला आहेत जगभरातले कोट्यवधी फुटबॉलप्रेमी. महफिल में रंग जमने लगा है जनाब! गोलकीपरनी long ball मारल्यावर किंवा चेंडू गोलपोस्टला वा क्रॉसबारला लागल्यावर होणारा "धप" चा आवाज आणि ड्रम्सचा बेस ह्यात फरक काय? एखाद्या डिफेन्डरचं अचानक सुसाट वेगात प्रतिस्पर्धी संघाच्या गोलवर मुसंडी मारणं आणि एखाद्या कसलेल्या गायिकेनी एका विजेसारख्या तानेत मध्यमापासून तारस्वरातला षड्ज गाठणं सारखंच! एखाद्या संघानी बचाव आणि मधल्या फळीत व्यवस्थित "बिल्ड-अप" करून एखाद्या आक्रमक "सेट-पीस" नी गोल करणं म्हणजे तबलावादकानी अप्रतीम लयकारी दाखवीत एखादी अवघड बंदिश, क्लिष्ट तिहाई घेत पर्फेक्ट समेवर संपवण्याइतकंच उत्कंठावर्धक!

१८ डिसेंबरपर्यंत चालणारी ही महफिल चुकवून चालणार नाही! ह्यात आपला सूर नसला म्हणून काय झालं? अश्या स्वर्गीय मैफिलीचा आनंद नाही घेता आला तर आयुष्य काय कामाचं? स्टेडियममधल्या हजारो, आणि जगभरातल्या कोट्यवधी प्रेक्षकांची सरगम आपल्यासाठीच आहे की!

© जे.पी.मॉर्गन

क्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

28 Nov 2022 - 6:59 pm | कर्नलतपस्वी

माॅर्गन भौ, काय भारी फिफा मंथन केलयं.
सुर, सुरा,सुदंरी ,साहित्य,पुरब और पच्छीम
आणी खेळ याची मस्त सांगड.

असं वाटलं सेटंर प्लेयर एकटाच प्रतीपक्षा कडून बाॅल घेऊन सगळ्यांना डाॅज करत गोल करतोयं.

प्रेक्षकांप्रमाणे वाचकही दे मारा म्हणत उभा राहायला बाध्य होतोयं.

मस्त.

व्वा क्या बात है... मैफिल तर सुरीली चालूच आहे.. पण तुमचं वर्णन म्हणजे बस चौधवी का चांद

मुक्त विहारि's picture

28 Nov 2022 - 10:47 pm | मुक्त विहारि

यतार्थ वर्णन....

सध्या काही कारणांमुळे दूरदर्शन नावाच्या खोक्या पासून दूर आहे.

त्यामुळे, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकत नाही...

Bhakti's picture

29 Nov 2022 - 12:44 pm | Bhakti

फुटबॉलची रूपक कथाच!

मोहन's picture

29 Nov 2022 - 1:43 pm | मोहन

फारच सुंदर रुपक कथा !

कपिलमुनी's picture

29 Nov 2022 - 2:28 pm | कपिलमुनी

लेले संझगिरि टाइप लेख !

समयोचित

श्वेता व्यास's picture

29 Nov 2022 - 2:46 pm | श्वेता व्यास

वाह, फुटबॉल कथा आवडली.

राघव's picture

29 Nov 2022 - 4:42 pm | राघव

किती सुंदर! अप्रतीम कल्पनाविलास आणि उपमा अविष्कार!
मागल्या काही आठवड्यांत मिपावर लॉगईन केले नव्हते.
पण तुमच्या लेखनाची कमाल आहे मॉर्गन शेठ, प्रतिसाद दिल्यावाचून राहवेना!

खूप खूप आवडले लेखन! लिहिते रहा! _/\_

बादवे, या मैफिलीत अर्जेंटीनाचा उल्लेख राहून गेलासा वाटतोय.. ! ;-)

श्रीगुरुजी's picture

29 Nov 2022 - 5:10 pm | श्रीगुरुजी

सुंदर लिहिलौय.

नचिकेत जवखेडकर's picture

30 Nov 2022 - 7:41 am | नचिकेत जवखेडकर

क्या बात है ! मस्तच लेखनशैली ...