तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.

कंजूस's picture
कंजूस in जनातलं, मनातलं
19 Oct 2022 - 8:37 pm

तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.

यामध्ये वेल्लोर, कांचिपूरम आणि महाबलीपूरम (मामल्लापूरम )या स्थळांना सप्टेंबरच्या (२०२२)शेवटच्या आठवड्यात भेट दिली होती. तिरुपतीची सहल याबरोबरच केली. तमिळनाडू भागात पावसाळा ऑक्टोबर ते डिसेंबर असतो. तर तिरुपतीला मॉन्सूनसह या महिन्यांतही पाऊस पडतो. चार पाच ठिकाणं घेण्याचा उद्देश असा की एखादं ठिकाण पावसामुळे रद्द झालं तरी इतर पाहून ऐंशी टक्के पर्यटन व्हावं. सर्व ठिकाणी देवळंच आहेत आणि शिल्पांची गर्दी. वेल्लोरचा किल्ला हे एक धार्मिक नसलेलं ठिकाण, परंतू या किल्ल्यातही एक सुंदर देऊळ आहे. ही धार्मिक ठिकाणं ऐतिहासिक कशी हा प्रश्न पडतो पण तिथे असलेले शिलालेख आणि काही शिल्पं इतिहासाची नोंद करतात.

तमिळनाडू राज्यात पाच प्रकारची पर्यटन स्थळे आहेत. १) धार्मिक - देवळे. भरपूर आहेत आणि सर्व देवळे पुजेत आहेत. काहींना वारसास्थळे म्हणता येईल.
२) हिल स्टेशन्स . उटकमंडलम, कोडाईकनाल, येराकूड, वेलापराई वगैरे.
३)वने आणि निसर्ग. - मुदुमलाई, वेदांतंगल वगैरे.
४)भौगोलिक - कन्याकुमारी दक्षिण टोक, रामेश्वरम् सेतू वगैरे.बंदरं
५) ऐतिहासिक - किल्ले,बंदरं वगैरे. वेल्लोर, चेन्नई,पुमपुहार बंदर.

जावे कसे / सहल आराखडा

चेन्नई ते महाबलीपूरम ६०किमी.

चेन्नई ते कांचिपूरम ७५किमी.

चेन्नई ते वेल्लोर १४०किमी.

कांचिपूरम ते महाबलीपूरम ७०किमी.

कांचिपूरम ते वेल्लोर ७०किमी.

कांचिपूरम ते तिरुपती (आंध्रप्रदेश ) १२० किमी

राहावे कुठे?
सर्व बजेटची हॉटेल्स आणि लॉजही आहेतच. कांचिमध्ये राहिल्याने देवळे बघणे आणि वेल्लोर,महाबलीपूरम पाहून येणे सोपे झाले. या भागांत रस्ते चांगले मोठे होते आणि ट्राफिक नव्हते.

ही अंतरे पाहिल्यावर असा विचार येईल की फ्लाइटने चेन्नई गाठावे, तिथे राहावे आणि रोज एका ठिकाणी जाऊन परत चेन्नई हॉटेलवर यावे. पण यात महाबलीपूरम ठीक आहे. कांचिपूरम शक्य नाही कारण तिथली देवळे अकरा ते साडेचार बंद ठेवतात. त्यामुळे कांचिपूरमला तीन दिवस राहाणे सोयीचे पडते. इथे जवळपास एक हजार देवळे आहेत. त्यातली पाच अगदी मुख्य. कांचि रेल्वे स्टेशन ते बस स्टेशन एवढ्या परिसरातच आहेत.
तमिळ भाषेत 'कोईल' म्हणजे राजवाडा. पण आता देऊळ या अर्थी रूढ झालेला शब्द.

पहिला दिवस -
१.कामाक्षी अम्मन कोईल. - भाविकांचे आवडते. कांचिचे मुख्य देऊळ.
२.एकांबरेश्वरार -अति भव्य गोपूर, ३५०० (?)वर्षे जुने आंब्याचे झाड आहे. मोठ्या खांबांचा प्रदक्षिणा मार्ग.
#.कांचीकामकोटी पीठम.- आद्य शंकराचार्यांनी स्थापलेला मठ. ही इमारत आताच बांधलेली वाटते. जुन्या मठाभोवती बाधकाम वाढवत नेले असावे.
३. उलगराज पेरूमल कोईल ( वामनावताराचे देऊळ) .
ही चारही कोईल जवळ जवळ आहेत.

दुसरा दिवस
कांचिपूरम ते चेंगलपट (चेंगलपट्टू), चेंगलपट ते महाबलीपूरम. सत्तर किमी.या प्रवासात वाटेत तिरुक्कुळकुंद्रन'ची टेकडी आणि गाव येते. (इथेच प्रसिद्ध पक्षीतीर्थ आहे. तिथे थांबलो नाही.)
सकाळी महाबलीपूरम जाऊन पाहून चार वाजता परत येताना कांचिपूरममध्ये असलेले
Mahabalipuram

((मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Mahabalipuram
https://youtu.be/9CsZkXgcPZE ))

४) 'वरदराज पेरूमल कोईल' चार ते सहा पाहाणे. - पुजेत असलेले महा विष्णू मंदिर. इथे पुष्करणीत असलेल्या सभामंडपात शिल्पे आहेत. अखंड कोरीव चार दगडी साखळ्या आहेत. मंदिराच्या आत फोटोग्राफी करता येत नाही. मार्गात अंधार आणि गिचमिड आहे परंतू खूप भित्तीचित्रे आहेत. तसेच एक सोन्याचे पाणी दिलेली दीड फुटी पाल आहे त्याचे दोन रुपये तिकिट घेतात. विष्णू आणि पाल यांचा पौराणिक संबंध काय हे माहीत नाही. परंतू बऱ्याच विष्णू देवळांच्या भिंतींवर पाली कोरलेल्या सापडतात. हंपीतल्या उत्कीर्ण विष्णू मंदिरावरही पाल आहे. भाषेच्या अडचणीमुळे पुजाऱ्यांना विचारता आले नाही.
कांचितील देवळे.

(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Temples
https://youtu.be/q0EzIZr-nY4 ))

तिसरा दिवस
सकाळी वेल्लोर आणि परत चारला आल्यावर कैलासनाथार कोईल. हे आणि वैकुंठ पेरूमल कोईल ही सर्वात जुनी देवळे आहेत.
कैलासनाथार कोईल. - आठव्या शतकातील द्रविड शैलीतील छोटेसे मंदिर. जे भव्यतेत नाही ते इथे शिल्पकलेत साधले आहे. वालुकाश्म दगडातली शिल्पे झिजू लागली आहेत. ठसठशीत मोठी ५८ शिल्पे. मूर्तींवर भाव आहेत. एकूण तीन भाषांत शिलालेख आहेत.जुनी तमिळ,जुनी उडिया आणि संस्कृत. ऐतिहासिक वारसाच.
दिवसभर पाहता येते. वेल्लोर रस्त्यावर 'काशिभिष्वर कोईल' (काशी विश्वेश्वर कोईल) आहे तिथून दोन किमी आत कैलासनाथार कोईल आहे.
वेल्लोर आणि जलकंठेश्वर

(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Vellore fort and Jalkantheshwar koil.
https://youtu.be/HcvFglGMlHY ))

Photo slideshow, Kailasnathar koil.

(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Kailasnathar koil.
https://youtu.be/8aAFUti_eco ))

वैकुंठ पेरूमल कोईल - हेसुद्धा आठव्या शतकातील आहे पण वेळेअभावी पाहायचे राहिले.

चौथ्या दिवशी
कांचिपूरम ते तिरुपती. तिथे दोन दिवस राहून घरी परत.याचा दुसरा वेगळा लेख लिहिला आहे.

सप्तपुरींतील एक कांचिपूरम म्हणजे खूप जुने शहर. धार्मिक आहेच पण रेशमी वस्त्रे उद्योगही जुनाच आहे. तो पाहिला नाही परंतू कांचिपूरम पद्धतीच्या(कृत्रिम रेशमाच्या) साड्या हजार - दोन हजारांत मिळतात त्या सहा घेतल्या. खऱ्या रेशमाची साडी पंचवीस हजारांपुढे सुरू होते. कांचिमध्ये भाषेची अडचण येते.तमिळच बोलतात. साडी दुकानदार मात्र हिंदीत बोलतात. थोडी तात्पुरती तमिळ शिकलो ती बोललो. (Learn Tamil through English, by Agurchand Babu channel.)

खादाडी -
एका ओळीत सांगायचं तर रसम, सांबारम, भातम. इटली, वडै, डोसै.

इतर टिप्पणी -
तमिळनाडूत गेलो नव्हतो. (म्हणजे तसं उटी आणि कन्याकुमारी झालं होतं) पण ,मदुरै,रामेश्वरम् करण्याचा विचार होता. ते खूप दूर आहे. अगोदर जवळचे पाहू आणि ठरवू म्हणून ही सहल काढली. त्यावरून देवळांची कल्पना आली. मदुरै,रामेश्वरम् जाण्याची गरज नाही हे ठरले. चेन्नई तर शहरच आहे ते बादच केले. देवळे आणि शिल्पे आवडत नसतील त्यांनी ही सहल करू नये.

फोटो - लेखामध्ये अडिचशे फोटो देणे शक्य नाही म्हणून फोटो स्लाईड शो करून यूट्यूबवर देण्याचा नवीन प्रयत्न केला आहे. शिल्पांची थोडी कल्पना येईल हा हेतू. शिल्पांचे फोटो असल्याने पोर्ट्रेट आस्पेक्ट ३:४ मध्ये काढले आहेत. मोबाईलवर बरे दिसतात. प्रयोग आहेत. सुधारणा करू. सवडीने पाहा आणि अभिप्राय द्या. फोटोंना क्रमांक दिले आहेत त्या संदर्भाने विचारणे सोपे जाईल. जीमेल स्टोरेज १५जीबी फ्री असले तरी अडिचशे फोटोंनी बाराशे एमबी अडवले असते आणि लेखात दहा पंधरा फोटो देऊन चालणार नाही म्हणून स्लाईडशो. विडिओ काढले आहेत पण ते जोडण्याचे सॉफ्टवेअर मोबाईलला नसते. असो.
______________________
भटकंती सदरात लेख लिहिता येत नसल्याने इथे देत आहे.

कलाप्रकटनविचारआस्वाद

प्रतिक्रिया

कंजूस's picture

20 Oct 2022 - 3:53 am | कंजूस

१)
Mahabalipuram

२)
कांचितील देवळे.

३)
वेल्लोर आणि जलकंठेश्वर

४)
Photo slideshow, Kailasnathar koil.

कुमार१'s picture

20 Oct 2022 - 8:33 am | कुमार१

छान वर्णन व फोटो

सुबोध खरे's picture

20 Oct 2022 - 9:59 am | सुबोध खरे

अरे वा

माझा तामिळनाडूचा हाच भाग पाहायचा राहिला आहे.

अर्थात माझा बेत नेहमी एका मध्यवर्ती ठिकाणी विमानाने जायचे आणि तेथून टॅक्सी करून सर्वत्र जायचे असाच असतो. अर्थात चेन्नाई आणि वेल्लोर येथे माझे डॉकटर वर्गमित्र मोठ्या पदांवर कार्यरत असल्याने तेथे राहण्याची सोय सहज होईल.

पण काय पाहायचे याची एक उत्कृष्ट झलक आणि व्यावहारिक सल्ला आपल्या लेखांतून नेहमीच मिळते.

याबद्दल धन्यवाद.

सुबोध खरे's picture

20 Oct 2022 - 9:59 am | सुबोध खरे

अरे वा

माझा तामिळनाडूचा हाच भाग पाहायचा राहिला आहे.

अर्थात माझा बेत नेहमी एका मध्यवर्ती ठिकाणी विमानाने जायचे आणि तेथून टॅक्सी करून सर्वत्र जायचे असाच असतो. अर्थात चेन्नाई आणि वेल्लोर येथे माझे डॉकटर वर्गमित्र मोठ्या पदांवर कार्यरत असल्याने तेथे राहण्याची सोय सहज होईल.

पण काय पाहायचे याची एक उत्कृष्ट झलक आणि व्यावहारिक सल्ला आपल्या लेखांतून नेहमीच मिळते.

याबद्दल धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

20 Oct 2022 - 10:14 am | कर्नलतपस्वी

कंजूस भौ,मस्त वर्णन आहे. मी हा सर्व भाग स्वतःच्या गाडीने सवडीनुसार पाहीला आहे. मस्तच भटकंती आहे.
भाषेची अडचण आहे पण सैन्यातील बरेच मित्र आहेत त्यांची खुपच मदत झाली. चेन्नई चा समुद्र किनाराही सुदंर आहे.

मदुराई, रामेश्वर,कन्याकुमारी जरूर बघा.
रामेश्वर मंदिर आणी कन्याकुमारीला आसेलेला त्रिवेणी सागर संगम अदभुत आहे.
रामेश्वर मंदिरातील शिल्पकाम तर खुपच आवडले.
हा प्रवास होईल म्हणून आगोदरच शुभेच्छा.

चौथा कोनाडा's picture

22 Oct 2022 - 6:30 pm | चौथा कोनाडा

+१
मदुराई - रामेश्वर - कन्याकुमारी हा दक्षिण तामिळनाडूचा भाग एका ट्रिप मध्ये हाणता येईल ... आणखी वेळ हाताशी असेल तंजावूर बसू शकते !

कर्नलतपस्वी's picture

20 Oct 2022 - 10:15 am | कर्नलतपस्वी

कंजूस भौ,मस्त वर्णन आहे. मी हा सर्व भाग स्वतःच्या गाडीने सवडीनुसार पाहीला आहे. मस्तच भटकंती आहे.
भाषेची अडचण आहे पण सैन्यातील बरेच मित्र आहेत त्यांची खुपच मदत झाली. चेन्नई चा समुद्र किनाराही सुदंर आहे.

मदुराई, रामेश्वर,कन्याकुमारी जरूर बघा.
रामेश्वर मंदिर आणी कन्याकुमारीला आसेलेला त्रिवेणी सागर संगम अदभुत आहे.
रामेश्वर मंदिरातील शिल्पकाम तर खुपच आवडले.
हा प्रवास होईल म्हणून आगोदरच शुभेच्छा.

अनिंद्य's picture

20 Oct 2022 - 11:18 am | अनिंद्य

सुंदर भटकंती झालेली दिसते. फोटो भरपूर आणि हे स्लाईड शो ची आयडिया छान.

चेन्नै 'शहर' आहे म्हणून काय बघायचे असे करू नका प्लीज, १-२ दिवस राहून अनुभव घेण्यासारखे आहे.

मला सत्वर चिदंबरम-करैकुडी वगैरे भाग बघायचाय.

कंजूस's picture

20 Oct 2022 - 12:43 pm | कंजूस

माझ्या तमिळनाडूत पाहण्याच्या यादीत दोन ठिकाणं होती. १)महाबली पूर्ण आणि २)तंजावूर

चिदंबरम,कुंभकोणम,तंजावूर,त्रिचि हे एका रांगेत पन्नास पन्नास किमी अंतराने आहेत. एक रेल्वे कल्याणहून थेट चिदंबरमला जाते. शंकराची नटराज मूर्ती इथलीच. मग तंजावूरचा राजवाडा,मराठी हस्तलिखीत संग्रहालय आणि बृहदीश्वर मंदिर आणि त्याचा ऐंशी टनांचा कळस. हे आश्चर्य पाहायचे आहे.
खरं म्हणजे भारतातल्या पर्यटनाची सुरूवात गोव्याला पासून नाही तर झाशी,इंदुर आणि तंजावूरपासून करायला हवी. भोसले वंशजांनी वेळोवेळी भरपूर मदत सरकारला दिली आहे. एक मोठा पाचू आणि जमिन तिरुपती बालाजीला अर्पण केली आहे.

कालुगुमलाई - वेरूळची प्रतिकृती, समकालीन.
सितनवासल - जुनी जैन लेणी
दोन्ही मदुरैपासून जवळ उत्तरेला.
जिंजिं - छोटासा ऐतिहासिक किल्ला. त्रिचिजवळ.
येराकूड - तिकडचे माथेरान.
सूचिंद्रम -वाजणारे दगडी खांब, कन्याकुमारीजवळ १३ किमी. हे केरळ ट्रिप मध्ये बऱ्याच लोकांनी पाहिलेले असतात.
आणि
पद्मनाभपूरम पॅलेस - हा केरळच्या राजाचा पण आता तमिळनाडूत आहे. कन्याकुमारी पासून तीस किमी तिरुवनंतपुरम रस्त्यावर 'तकलाई' गाव लागते तिथून दोन किमी आत. हा पॅलेस केरळ टुअरवाले सोयिस्करपणे गाळतात. तिथली काळी फरशी भारतात एकमेव आहे. खाजगी महालात असल्याने वाच्यता आणि प्रसिद्धी नाही.

कर्नलतपस्वी's picture

20 Oct 2022 - 2:50 pm | कर्नलतपस्वी

पद्मनाभ पुरम् वर्मन राजांची साम्राज्याची राजधानी. राजवाडा संपुर्ण लाकडी आहे. फणसाच्या लाकडी मोठ्या तुळया व खांबावर बनलेला आहे.

अन्नछत्रासाठी एकत्र दोन हजार लोक बसतील एवढा मोठा हाॅल आहे.

लाकडी तुळ्या व खांब

भोजन कक्ष

कंजूस's picture

28 Oct 2022 - 12:55 pm | कंजूस

भोजन कक्ष फोटोत दिसणारी फरशी ( कोबा) म्हणजे
शिंपल्यांची भाजलेली भुकटी (म्हणजे एक प्रकारचा चुनाच) ,अंड्याचा बलक आणि नारळाच्या करट्यांचा कोळसा हे तीन्ही एकत्र मळून घोटून बनवलेली आहे.

कर्नलतपस्वी's picture

28 Oct 2022 - 10:12 pm | कर्नलतपस्वी

हे फोटो आहेत माझ्याकडे.

वर्मन राजे उंचीला छोटे आसल्याने आतले दरवाजे चौकटी पण छोट्याच आहेत.

चौथा कोनाडा's picture

29 Oct 2022 - 8:17 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तफोटो संदर्भ... गोरगावलेकर

कंजूस, कर्नल साहेब.. छान माहिती

प्रचेतस's picture

22 Oct 2022 - 12:16 pm | प्रचेतस

हा लेखही आवडला, व्हिडीओतले फोटोदेखील खूप छान. दक्षिण भारत अतिशय शिल्पसमृद्ध आहे.

Bhakti's picture

23 Oct 2022 - 11:22 am | Bhakti

मस्त!

गोरगावलेकर's picture

25 Oct 2022 - 3:29 pm | गोरगावलेकर

माहिती व व्हिडिओद्वारे दिलेले फोटो छानच. भटकंतीसाठी अतिशय उपयुक्त माहिती

श्वेता२४'s picture

25 Oct 2022 - 3:48 pm | श्वेता२४

नेटकी मांडणी व फोटो यामुळे तुमचे भटकंतीचे लेख नेहमी मार्गदर्शक असतात. आता ही सहल पण प्लान करुन ठेवणार.

तिसरा दिवस - वेल्लोर फोर्ट आणि कैलासनाथार कोईल कांची या फिरतीमध्ये आणखी एक देऊळ पाहण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणजे श्रीपूरम ( वेल्लोरपासून नऊ किमी. )येथील श्री लक्ष्मी नारायणी गोल्डन टेंपल पाहणे. फोर्ट पाहिल्यावर तिथे पोहोचलो एक वाजता. पण देऊळ उघडणार होते दोन वाजता आणि त्यानंतर सर्वदर्शनास दोन तास लागतील असे कळले. (विशेष दर्शन तिकिट रु शंभरला मिळत होते. ते घेतले नाही.)
गर्दी जमू लागली होती. रांगेसाठी तीन पिंजरेवजा हॉल आहेत. त्यातून सोडणार. शिवाय व्यवस्थित मास्क अत्यावश्यक. तोंडाला रुमाल/टॉवेल/ओढणी बांधलेली अमान्य अशी पाटीही होती. 'गोल्डन टेंपल वेल्लोर ' शोधल्यास खूप माहिती मिळेल. पंधराशे किलो सोने वापरून हे देऊळ २००७ मध्ये शंभर एकर जागेवर श्री नारायणी पीठम या ट्रस्टने बाधले आहे. तिकडचा जवळपासचा बराचसा भाग या पीठाच्या मालकीचा आहे. वेळ मिळाल्यास पाहायला जावे. इथे थांबलो असतो तर केलासनाथार पाहायचे राहिले असते.

चौथा कोनाडा's picture

28 Oct 2022 - 1:38 pm | चौथा कोनाडा


'गोल्डन टेंपल वेल्लोर


तीन वर्षांपुर्वी पाहण्याच्या योग आला होता ...
अप्रतिम आहे .... संध्याकाळी सोन्याच्या मंदिराचं सोनेरी प्रतिबिंब पाण्यात पडते .. ते दृष्य डोळ्यांचे पारणे फेडते.

जुने नारायणी मंदिर (गावात आहे) देखिल रमणिय आहे, प्रसन्न वाटले तिथे !

कर्नलतपस्वी's picture

27 Oct 2022 - 9:51 am | कर्नलतपस्वी

मुलगी व्हि आय टी मधे एम टेक करता जाणार होती म्हणून वेल्लूर स्टेशन शोधत होतो सापडेना म्हणून एक तामीळ हवलदारास विचारले तो म्हणाला सर काटपाडी जंक्शनचे तिकीट काढा तेव्हा कळाले.

वेल्लूर किल्ल्या समोरच महाराजांनी बांधलेला साजिरा गोजीरा किल्ला आहे. मराठ्यांनी हा किल्ला महाराजांच्या दक्षिण मोहिमेत जीवाला होता.
रेल्वेत ,ओपट, ओपट,स्विट्ट पोळी ओपट" , ओरडत एकजण टोपली घेऊन आमच्या जवळ आला. त्यात छोट्या छोट्या गोल दामट्या व तूप ठेवले होते,
घेतल्यानंतर कळले की अरे ही तर आपली पुरणपोळी.

openstreetmap.org
( विकी नकाशा साईट ) उपयोगी पडते. यामध्ये रेल्वे लाईनी अगदी ठळक दाखवलेल्या असतात. शिवाय स्टेशनला उतरल्यावर नक्की कोणत्या बाजूला बाहेर पडायचे हे सुद्धा ठरवायला सोपे जाते.

स्टेशन मिळाल्यावर
१)
totaltraininfo.com
अथवा
२)
https://www.prokerala.com/travel/indian-railway/
या साइटस वर त्या स्टेशनला कधी/ कोणत्या/ किती गाड्या येतात (पॅसेंजर धरून)हे कळते. इतर रेल्वे साइटवर हे शोधण्याची सोय नसते. तिथे from +to दोन्ही फील्डस भरावी लागतात. आणि ते आपल्याला माहिती नसते.

कर्नलतपस्वी's picture

27 Oct 2022 - 11:55 am | कर्नलतपस्वी

धन्यवाद.

पण कंजूस भौ त्या गोष्टीला बारा तेरा वर्ष झाली.

आता दुसरी जागा,शहर, स्टेशन शोधायला हे सोपे पडेल म्हणून दिलंय.

चौथा कोनाडा's picture

27 Oct 2022 - 5:32 pm | चौथा कोनाडा

हा लेख देखिल भारी ... अर्थातच आवडला !
सुंदर तपशिल दिले आहेत ... सर्वांना उपयोगी !

मी फक्त टीटीडीसी तर्फे चेन्नई दर्शन (अर्धा दिवस सहल) मध्ये शासकिय संग्रहालय (१५०-२०० वर्षे जुने) स्नेक पार्क, वल्लुवर कोट्टम, मरीना बीच, एमजीआर स्मारक इ ठिकाणे पाहिली होती ... एकट्यानेच महाबलीपुरमची आख्या दिवसाची सहल केली होती तो अनुभव अविस्मरणीय होता ! कांचीपुरम दर्शन थोडक्यात हुकले !
आता लेखात दिलेली ठिकाणे पहायचा योग कधी येतो कोण जाणे !

फोटो-व्हिडीओचे विशेष कौतुक करावे लागेल, झकास आहेत !

मुक्त विहारि's picture

27 Oct 2022 - 6:53 pm | मुक्त विहारि

वाखूसा

लेख आवडला, ट्रॅव्हल टीप्स तर फारच उपयुक्त!
स्लाईड शो वीकेण्डला निवांत बघेन.