किल्ले जीवधन

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
4 Jul 2022 - 5:33 pm

२५ -२६ सप्टेंबर २०२१

ही भटकंती तशी मागील वर्षी केली आहे, पुन्हा पावसाला सुरुवात झालीय, अपेक्षा आहे कि आवडेल

जीवधन !!! ऐन घाटमाथ्यावरचा उभ्या बेलाग कडय़ावरील दुर्ग. सहय़ाद्रीचा भेदक भूगोल, सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन नाणेघाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भारलेला आहे. पुणे जिल्हय़ातील जुन्नरपासून २७ किलोमीटरवर, प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी आणि घाटघर गावाच्या परिसरात असलेला हा पूर्वाभिमुख किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. !

Jivdhan

२५ -२६ सप्टेंबरच्या वीकएंडला आम्ही हा ट्रेक केला. मित्र परिवारात काही जणांना शनिवारी सकाळी पितृपक्षातील जबाबदाऱ्या पार पाडायच्या असल्याने सुरुवातीला पहिल्या दिवशी नाणेघाट उतरणे व दुसऱ्या दिवशी जीवधन चढणे असा मुळ प्लॅन बदलून शनिवारी घाटघर मुक्कामी पोहोचून दुसऱ्या दिवशी लौकर जीवधन चढणे असा ऑप्शन फायनल झाला.

शनिवारी दुपारी पुण्यातून निघून, आम्ही चाकण, राजगुरूनगर, मंचर नारायणगाव मार्गे जुन्नर मध्ये प्रवेश केला. इथं थोडावेळ थांबून समोरचं नजरेस पडणाऱ्या शिवजन्मस्थान "किल्ले शिवनेरी"चं रस्त्यावरूनच दर्शन घेतलं. शिवनेरी डाव्या हाताला ठेवत सरळ जाणारा घाटघर रस्ता पकडला. पुढे १२ किलोमीटरवर वाटेत चावंडचा किल्ला लागला. किल्ल्याच टोक धुक्यात असल्याने अंदाज बांधू शकलो नाही पण जसजसे जवळ पोहोचलो तसं लक्षात आलं हाच "चावंड".

Parisar

चावंडपासून साधारण ७ किलोमीटरवर जीवधनचं पायथ्याचे गाव घाटघर आहे पण चावंड ओलांडताच वातावरणाने एकदम कात टाकली. दाट धुकं दाटून आलं , पुढचा सगळा रस्ता धुरकट झाला, त्यामुळं गाड्यांचा वेग एकदम कमी झाला, सुदैवाने संपूर्ण रस्ता डांबरी व जवळपास निर्मनुष्य होता त्यामुळे हळू हळू पुढं सरकूनही साधारण पाऊण तासात आम्ही नाणेघाटाच्या पार्किंगला पोहोचलो. इथं पोहोचताच आतापर्यंत भुरभुर होत असलेला पाऊस जोरात कोसळू लागला, दाट धुक्यामुळे दृष्यमानता अजिबात नव्हती, रस्ता, मैदान, दरी काहीच समजत नव्हतं, सगळीकडं सारखंच दिसत होतं. गाडीतच बसून राहिलो.

Rasta

मुक्कामासाठी आमचं रोहिदास अढारी या घाटघरकराशी आधीच बोलणं झालं होत पण त्याचं घर माहीत नसल्याने आहे तिथंच थांबून त्यांनाच आम्हाला न्यायला बोलावून घेतलं. JIO वगळता सर्व नेटवर्क गायब झाली होती, अढारींकडे JIO असल्यामुळे संपर्क झाला व धो-धो बरसणाऱ्या पावसात ते आम्हाला न्यायला आले. त्यांच्यामागे गच्च अंधारात गाड्या हाकीत आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. साधंसच घर, पुढे व उजव्या हाताला मोठी पडवी असलेलं, मुक्कामाची जी खोली त्यांनी आम्हाला दाखवली ती त्यांच्या घराला जोडलेलीच होती, केवळ एका दाराचा आडोसा, इथं एक अडचण अशी होती की अढारींच्या घरात आम्हाला एक तान्हं बाळ दिसलं व आमच्या अगदी रात्री उशिरापर्यंत चालू शकणाऱ्या गप्पांमुळे त्या बाळाची गैरसोय होऊ शकली असती म्हणून तिथला मुक्कामाचा बेत रद्द करून त्यांना रात्रीच्या जेवणाची ऑर्डर देऊन तिथून पुढे 200 फुटांवर अढारींच्याच थोरल्या भावाच्या इथं सुभाष अढारींकडे मुक्काम करायचं नक्की केलं. दुसऱ्या दिवशी जीवधनसाठी गाईड बघायचं काम ही रोहिदास अढारींकडे सोपवलं. चारीबाजूने दाट धुक्याने वेढलेल्या घराच्या मोकळ्या पडवीत रात्रीच्या जेवणाचा आनंद घेऊन झोपायला गेलो.

Ohol

सकाळी लवकर उठून तयार झालो. घाटघर अजूनही धुक्याने वेढलेले होते. नाश्त्यासाठी पुन्हा रोहिदासच्या घरी गेलो, सकाळी सकाळी गरमा-गरम पोहे आणि चहा म्हणजे सुखच. तिथं आमचे आजचे गाईड फाटे मामा पहाटेपासूनच येऊन थांबले होते. आम्ही घातलेल्या शॉर्टस पाहिल्यावर त्यांनी सर्वांनी फुल पॅन्टस घालाव्या असं सुचवलं, आमच्या का ? चं जे उत्तर त्यांनी दिलं ते ऐकल्यावर सगळ्यांनी अजिबात का-कु न करता गुपचुप फुल पॅन्टस चढवल्या ( कारण नंतर पुढं येईलचं)

एव्हाना मुंबई-पुण्याकडील हौशी हायकर्सच्या झुंडी धडकू लागल्या होत्या, गर्दी टाळण्यासाठी घाई करणं गरजेचं होतं. सुभाष आढारीचं घर हेच ट्रेकचा स्टार्ट पॉईंट होता, त्यांनाच दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही जीवधनकडे मार्गस्थ झालो.

Pathar

सुरुवातीला लागणारा पठारी भाग हळूहळू चढाईचा होत जातो. जसजसे वर जात होतो तसतसे धुक्याचा थर दाट होत होता. उजव्या हाताला रिव्हर्स वॉटरफॉलची दरी होती, ती येताना पाहू असं फाटे मामा म्हणाल्याने तिकडं न वळता त्यांच्यामागे चालू लागलो. पठार संपता संपता ही वाट दाट जंगलात शिरली आणि चढण सुरू झाली. काहीचं वेळात आम्ही वानरलिंगी सुळक्याच्या पायथ्याला होतो आणि तिथूनच कड्याला चिकटून जाणाऱ्या नाळेतून खडकात खोदलेल्या पायऱ्यांवरून किल्ल्याकडे जाणारा मार्ग दिसत होता. सततच्या पावसाने प्रचंड निसरडा झालेला खडक, एका बाजूला खोल दरी, मध्ये वरून वाहत येणारं पाणी यातून वाट काढत हा टप्पा कड्याला चिकटून खूप काळजीपूर्वक चढावा लागतो.

Chadhai

त्यानंतर येतो तो सर्वात अवघड असलेला टप्पा, दरीकडे तोंड करून खोदलेल्या पायऱ्या तुटल्यामुळे राहिलेल्या नुसत्याच निसरड्या खडकाच्या खोबणीत हात घालत, मजबुतीन पाय रोवत एकाग्रतेने हा टप्पा चढून जावा लागतो. या ठिकाणी बहुतेक हायकर्स घाबरून चढायला वेळ घेत असल्याने गर्दी झाली होती, अशा वेळेसचं तुमच्या गाईडचा कस लागतो, फाटे मामांनी पुढे होत इतरांना मदत करत आम्हाला गर्दीतून पुढं चाल दिली, गर्दी मागे टाकत आम्ही झपाझप पुढे झालो. जवळपास पूर्णपणे खडकात खोदलेल्या पायऱ्यांचा हा मार्ग... हा पायऱ्यांचा मार्ग एक-दोन ठिकाणी तुटला आहे. या तुटलेल्या भागात उभ्या कातळातील टप्पे आडवे येतात. या वेळी त्यामध्ये असलेल्या खोबण्यांचा आधार घेतच वर सरकावे लागते. प्रस्तरारोहण म्हणावं अशी परिस्थिती होती पण कोणीतरी एक भला मोठा रोप आधीच लावून ठेवल्यामुळे त्याच्या आधाराने आम्ही हा मार्ग अगदी झटपट चढून गेलो.

Chadai1

इथून पुढेही, पायऱ्या तुटुन अवघड झालेल्या एका प्रस्तरारोहणसदृश्य जागी, कायमस्वरूपी लावून ठेवलेल्या दहा-एक फुटांच्या रोपच्या आधाराने वर चढून आलं की समोर येतो ऐन खडकात खोदून काढलेला कल्याण दरवाजा! हडसर किल्ल्याची आठवण करून देणारा. खडकातचं खोदलेल्या पायऱ्या, त्यावर त्याच कातळात कोरलेला दरवाजा, त्याच्या कमानीवर कोरलेल्या चंद्र-सूर्याच्या प्रतिमा, बाजूचे बुरूज अशी सारीं ऐन ताशीव कडय़ावर कोरलेली सातवाहनकालीन शिल्पकला. हा मार्ग ब्रिटिशांनी १८१८ ला सुरुंग लावून उद्ध्वस्त केला होता. हा दरवाजा मोठमोठय़ा शिळांनी झाकून गेला होता. काही वर्षांपुर्वीचं वनखात्याने तो मोकळा केल्याने त्याचे आता दर्शन होते आहे.

dagad

गडात प्रवेश करताच फोफावलेल्या गवतातून अनेक उद्ध्वस्त अवशेष माना वर काढतात. मध्यभागी बालेकिल्ल्याची टेकडी आणि तिच्या भोवताली पडझड झालेल्या वास्तूंचा परिसर !!!

vanar1

हे पाहात पश्चिमेकडे येत असतानाच वाट अचानक संपते आणि त्या तुटलेल्या धारेवर काळजात धस्स करणारी खोल दरी समोर खाली कोसळते तर तिला तितक्याच ताकदीने वर उसळलेला वानरलिंगीचा सुळका आव्हान देत उभा राहतो. दोनएक हजार फुटांचा हा कडा आणि त्याच्या एका अंगावर विसावलेला हा तीन-चारशे फुटांचा सुळका! त्याच्या पहिल्या दर्शनानेच काळजात धडकी भरते. कड्याच्या टोकापर्यंत जायची हिम्मत होत नाही, जमिनीला समांतर होतचं त्याचं दर्शन घ्यावं लागतं.

vanar2

वानरलिंगीच्या रौद्रदर्शनानंतर आम्ही बालेकिल्ला चढून वर आलो. जीवधनचा बालेकिल्ला म्हणजे एक छोटीशी टेकडी आहे. या टेकडीवर एका उंच जोत्यावर गडदेवता जीवाबाईचे वृंदावन आहे. जिवाबाई ह्या जिजाबाईंच्या भगिनी होत्या व त्या याच किल्ल्यावर मोगलांकरवी मारल्या गेल्या असं गावकरी सांगतात. ऐतिहासिक संदर्भ नसले तरी स्थानिकांच्या श्रद्धेचा मान ठेवून उगाच याबाबत जास्तीची चर्चा न करणे उत्तम !!

jivabai

याशिवाय नुसती पिंड शिल्लक असलेलं एक शिवमंदिरही इथे आहे. गडाच्या उत्तर माचीत पाण्याचे एक तळे दिसतं. याच्या अलीकडेच काही स्मारके आणि अन्य अवशेष दिसतात. या भागातील तटबंदीही अद्याप शाबूत दिसते.

balekilla

पुन्हा बालेकिल्ला थोडा उतरून जुन्नर दरवाजाची वाट जिथे येऊन मिळते तिथे असलेल्या किल्ल्यातल्या सर्वात सुस्थितीतील व सुंदर बांधकामापाशी म्हणजे धान्य कोठीकडे आम्ही गेलो. एखादे लेणे वाटावे अशी ही वास्तू! दर्शनी भागात बांधकाम तर पाठीमागे खोदकाम! मंडपवजा प्रवेशद्वार, त्यावर संपन्नतेचे प्रतीक असलेले गजान्तलक्ष्मीचे शिल्प! दोन्ही बाजूने जलधारा सोडणारे हत्ती, तर मध्यभागी लक्ष्मीदेवता! आतमध्ये सर्वत्र अंधाराचे साम्राज्य, तेव्हा टॉर्च घेऊनच प्रवेश करावा लागतो. एकामागे एक अशी तीन टप्प्यांतील वास्तू! यातील मधल्या भागास डाव्या-उजव्या हातास आणखी एकेक दालन! या साऱ्यांच्या मिळून पाच खोल्या तयार झालेल्या आहेत. भिंतीत कमानीच्या खिडक्या आहेत, तळाशी बसण्यासाठी ओटे आहेत. शेवटचं दालन हे पूर्णपणे बालेकिल्ल्याच्या पोटात आहे व त्या टेकडीचा संपूर्ण भार त्याच्यावर आहे हे जाणवूनचं अंगावर काटा येतो. गावकरी सांगतात की १८१८ मध्ये झालेल्या शेवटच्या युद्धावेळी या कोठीत मोठय़ा प्रमाणात धान्यसाठा करून ठेवलेला होता. हा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला किंवा त्याला हेतूत: आग लावली गेली पण त्याची राख अजूनही तिथं आहे आणि आत खरोखरचं राख आहेही पण ती खरंच १८१८ ची आहे का ते खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. पण ती, गडावर राहताना वा इथे आसरा घ्यायची वेळ पडल्यावर ट्रेकिंग ग्रुप्स सुरक्षिततेसाठी पेटवत असलेल्या शेकोटीची राख असण्याची शक्यता जास्त आहे.

या कोठीच्या पाठीमागे एकात एक गुंफलेली पाण्याची पाच टाकी दिसतात. वरतून पाण्याची एक छोटी धार थेट एका ठिकाणी टाक्यात पडत होती. पाऊस ऐन भरात असताना बऱ्यापैकी धबधबा इथं तयार होत असावा. या टाक्यांपाशी गडफेरी आटोपून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

फ़ुल पॅन्टस घालायचं कारण

Furse

फुरसे जातीचे हे साप गडावर विपुल प्रमाणात आहेत आणि उष्णता मिळवण्यासाठी बहुतेकवेळा दगडावर आरामात बसलेले आढळतात.
साधारण पाच ते सात साप आम्ही स्वतःच्या पाहिले. एक तर धान्य कोठीच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या जागेत निवांत बसलेला होता व पर्यटकांच्या गर्दीचा वा आवाजाचा ढिम्म परिमाण त्याच्यावर नव्हता. पावसाळ्यात ऊन दुर्मिळ, थंड रक्ताच्या सापाला ऊन म्हणजे अमृतचं, सप्टेंबर महिन्यात थोडं ऊन - थोडा पाऊस असं वातावरण गडावर असतं, ऊन पडताच हे साप उष्णता मिळवण्यासाठी लपण्याच्या जागेतून बाहेर येतात व दगड व दगडी बांधकामे यावर बसणे पसंत करतात व विपुल प्रमाणात दृष्टीस पडतात. थंड वातावरणात अगदी मलूल होऊन पडलेले असतात पण थोड्याशा उन्हाने धोकादायक म्हणावे इतके चपळ होऊ शकतात. पावसाळा व पावसाळा संपतानाच्या वेळी ट्रेक करताना या दृष्टीने सजग असणे गरजेचे आहे.

खाली उतरताना, आधीच्या दरीच्या तोंडावर असलेल्या टप्प्यापाशी प्रचंड गर्दी झाली होती, ज्या ग्रुपने रोप लावला होता ते त्यांच्याआधी कुणालाही जायची परवानगी देत नव्हते, तो टप्पा उतरण्याची संधी मिळण्यासाठी साधारण दीड तास वाट पाहावी लागली. निसरडी घसरण, पुढे धुक्याने भरलेली दरी, पाय सटकला तर थेट यमलोक असा तो टप्पा अक्षरक्ष: लोळत पण सुरक्षित पार करून सुटकेचा निःश्वास टाकला. मोठी मुर्दुमकी गाजवल्याचा फील आला, या सर्वात आमचे गाईड फाटेमामांची मोलाची मदत झाली.

vanar3

एकदा हा टप्पा पार केल्यावर बाकीच्या मित्रांना आणि फाटे मामांना मागे सोडून मी सुसाट सुटलो, दुपारचे एक वाजले होते व आभाळ बऱ्यापैकी स्वच्छ झालं होतं. अगदी दहाच मिनिटांत मी जंगल पार करून पठारावर पोचलो. पुढे जाऊन एका ओढ्याच्या पाण्यात चिखलाने माखलेले कपडे, बूट साफ करत बसलो. अर्धाएक तास तिथं वेळ घालवूनही मागची मंडळी आली नाहीत म्हणून मग तसाच आमचा पुढचा ठरलेला पॉईंट, रिव्हर्स वॉटर फॉलकडे एकटाच गेलो. बाकीची मंडळी तिथे भेटतील याची खात्री होती.

scene1

रिव्हर्स वॉटरफॉल कडे बऱ्यापैकी गर्दी होती. इथली बहुतेक मंडळी पर्यटक होती, जीवधनच्या वाटेला न लागता पायथ्यापाशीच वेगवेगळ्या पोझेस मध्ये फोटो काढण्यात ते मश्गुल होते त्यांच्यात मी एकटाच सापडलो आणि त्यांचा फोटोग्राफर झालो. बराच वेळ टीवल्याबावल्या करत वेळ घालवल्यावरही आमची दोस्त मंडळी काही आली नव्हती, फोन कुठलेचं लागत नव्हते आणि काही वेळात अचानक पुर्ण अंधारून आलं, अगदी पंधरावीस फुटांवरचं ही दिसेनासं झालं. जोरदार पावसाची चिन्ह दिसू लागली.

मग मात्र मी मित्र इकडं येतील याची आशा सोडून परतीचा मार्ग धुंडाळू लागलो, ह्याला त्याला विचारून पायवाटांनी फिरू लागलो व चकवा लागल्यासारखा पहिल्या जागीच परत पोचू लागलो. आजूबाजूला अनेक ग्रुप मजा करत होते, हसत खिदळत होते पण माझी मात्र पाचावर धारण बसली होती, फिरून फिरून एकाच जागी येत होतो, सगळे रस्ते एकसारखे भासू लागले होते. फाटे मामांना मागे सोडून आल्याचा पश्चाताप होऊ लागला होता, त्यातच तुफान पाऊस सुरू झाला, आता अगदी पाच दहा फुटांवरचं ही काही दिसेना, मग मात्र अक्षरशः फाटली.

Jivdhan3

सुदैवाने एक दोन ग्रुप आसपास होते, त्यांच्याशी बोललो, पावसामुळे त्यांनी ही लवकर परतायचा निर्णय घेतला होता. पाऊस एवढा जोरात होता की त्यांच्याबरोबरची लहान मुलं घाबरून रडू लागली होती व तिथं छोटासा आडोसाही कुठंच नव्हता. सोबत मिळाल्याने थोडा जीवात जीव आला. पाहिलं तर त्या तुफानी पावसाला घाबरून त्या भागात असलेले सगळे ग्रुप एकत्र येऊन परतीच्या वाटेला लागले होते. तुफानी पावसाने नखशिखांत भिजलो होतो, मोबाईल तसाच खिशात होता, एक दोनदा वाट चुकत पुन्हा वाटेवर येत हळूहळू चालत एकदाचे सर्व सुभाष अढारींच्या घरापाशी पोचलो.

इथं पाहतो तर माझे सगळे बोंबलभिके दोस्त आधीच येऊन जेवणावर मस्त आडवा हात मारून श्रमपरिहार करीत पहुडले होते व मी यांची वाट पाहत तिथं दऱ्याखोऱ्यात पावसात भिजत राहिलो होतो.

scene2

पोटात कावळे कोकलत होते, झटपट कपडे बदलून मी ही जेवायला पळालो, सुभाष आढारींनी त्यांच्या आतल्या खोलीत एकट्याला बसवून गरमागरम जेवण वाढलं. पाऊस अजूनही निरंतर पडतचं होता. झटपट जेवण संपवून बॅगा बांधल्या, दोन दिवसांच्या पाहुणचाराबद्दल आभार मानून दोन्ही आढारी बंधूंचा निरोप घेतला व परतीची वाट धरली. मध्ये एक दोन स्टॉप घेत आरामात जुन्नर-नारायणगाव- मंचर - चाकण मार्गे साधारण ८ वाजता घर गाठलं.

सातवाहनकाळापासून जागता, राबता असणारा जीवधन हा तसा अवघड श्रेणीतला किल्ला, सर्वसाधारण पर्यटक सहसा याच्या वाटेला जात नाहीत. हा परिसर शहाजीराजांशी संबंधीत अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. जवळच्या जुन्नरला जोडलं असलं तरी तसा आजही दुर्गम म्हणावा असा हा भाग. या भागातील अवघ्या दोन दिवसांची ही भटकंती ही खूप काही देऊन गेली.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

4 Jul 2022 - 6:10 pm | तुषार काळभोर

बंडाशेठ, फोटो दिसेनात!

चक्कर_बंडा's picture

4 Jul 2022 - 10:12 pm | चक्कर_बंडा

आता पहा...

छान आहे लेख.

मी घाटघरच्या वाटेने पा वसात वर चढलो होतो. सोबत सुनटुन्याचा ग्रुपवाला हितेश होता. त्याच्या भरवशावर चढणे उतरणे झाले. दोरबीर कै नाही. कोठार लगेच समोर आलं. पण त्यात गळत होतं आणि पाणी भरलेलं. राहाण्याचा विचार सोडला आणि खाली आलो. पण आठवणीने थरकाप होतो. घसरड्या ८० डिग्रीच्या पायऱ्या आहेत. पाणी वाहात होतंच.

चक्कर_बंडा's picture

4 Jul 2022 - 10:19 pm | चक्कर_बंडा

आम्ही गेलो त्यावेळी कोठार पूर्ण कोरडे होते, ८० डिग्रीच्या घसरड्या पायऱ्या या बाजूने ही आहेत. पावसाळ्यात हा किल्ला, तो ही पडत्या पावसात, अनुभवी लोकांचंच काम आहे

Bhakti's picture

4 Jul 2022 - 8:25 pm | Bhakti

जबरदस्त!

चक्कर_बंडा's picture

4 Jul 2022 - 10:27 pm | चक्कर_बंडा

धन्यवाद.....

कर्नलतपस्वी's picture

4 Jul 2022 - 9:45 pm | कर्नलतपस्वी

मागच्याच ट्रेक प्रमाणे भारी वर्णन आहे. फुरश्याला माहीती आहे का त्याचा फोटो मिपावर आलाय.मस्त.
धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

4 Jul 2022 - 9:46 pm | कर्नलतपस्वी

मागच्याच ट्रेक प्रमाणे भारी वर्णन आहे. फुरश्याला माहीती आहे का त्याचा फोटो मिपावर आलाय.मस्त.
धन्यवाद

चक्कर_बंडा's picture

4 Jul 2022 - 10:26 pm | चक्कर_बंडा

या फुरशाचा फोटो ज्याठिकाणी घेतला, तिथेच, त्याच्या अस्तित्वाची कल्पना नसलेले डोंबिवलीचे ३ तरुण त्याच्यापासून २ फुटांवर बसून एकमेकांचे फोटोसेशन करीत होते, तिथून आम्ही जाताना, आमचे गाईड फाटे मामा सहज सांगत होते कि या ठिकाणी फुरसे कायम दिसतात अन त्याच वेळी त्यांची नजर या फुरशावर गेली व त्यांनी त्या तीन तरुणांना सावध केले. हा फोटो त्यातीलच एका तरुणा कडून साभार, आमची काही जवळ जाऊन फोटो काढायची हिंमत झाली नाही.

कर्नलतपस्वी's picture

4 Jul 2022 - 9:46 pm | कर्नलतपस्वी

मागच्याच ट्रेक प्रमाणे भारी वर्णन आहे. फुरश्याला माहीती आहे का त्याचा फोटो मिपावर आलाय.मस्त.
धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

4 Jul 2022 - 9:46 pm | कर्नलतपस्वी

मागच्याच ट्रेक प्रमाणे भारी वर्णन आहे. फुरश्याला माहीती आहे का त्याचा फोटो मिपावर आलाय.मस्त.
धन्यवाद

१/३/५ माणसांसाठी?
गावात आता बांधीव शौचालये आली का?

चक्कर_बंडा's picture

5 Jul 2022 - 6:49 pm | चक्कर_बंडा

साधारण ५०० रुपये वा प्रत्येकी १०० छोट्या गटासाठी, मोठ्या गटासाठी कमी होते, एकुणात, तुमच्या सॉफ्ट स्किल वर सुद्धा ते अवलंबून आहे.

इतर वेळी ठीक आहे पण पावसाळ्यात स्थानिक वाटाड्या असणे निव्वळ रस्ता दाखवायलाचं नाही तर सुरक्षिततेसाठी सुद्धा गरजेचं आहे.

कंजूस's picture

7 Jul 2022 - 9:11 am | कंजूस

आतापर्यंत मी एकट्यासाठी तीनदा गाईड केला आहे.
भीमाशंकर (पहिला ट्रेक) २०००साली. दुपारी चार ते रात्री आठ. जाताजाताच वाटेत चमकणारी बुरशी पाहायची होती. ज्येष्ठ अमावस्येला अधिक असते.गाईड १०० रु. दुसरे दिवशी दोनला खाली आलो.
पेब (२००८) रु १००. एक खडक चढावा लागतो. दुपारी दोन ते संध्याकाळी सहा.
उतेकरवाडी ते नागेश्वर. (१००रु) दुपारी तीन ते रात्री नऊ.

प्रचेतस's picture

5 Jul 2022 - 7:21 am | प्रचेतस

मस्त लिहिलंय.
कल्याण दरवाजाची वाट घाटघर वाटेपेक्षा तुलनेने सोपी आहे. एकच रॉकपॅच आहे आणि एक्स्पोज नसल्याने दोरीच्या आधाराशिवाय मित्रांच्या हाताचा आणि खांद्यांचा आधार घेऊन सहज पार करता येतो. घाटघर बाजूच्या वाटेला मात्र काही ठिकाणी एक्स्पोजर आहे, तुटलेल्या पायऱ्या, खोदलेल्या खोबण्या आणि बोटे अडकवण्यासाठी असलेली छिद्रे परफेक्ट ग्रिप देतात, हल्ली तिथं मात्र आधारासाठी लोखंडी शिडीवजा रेलिंग लावून त्याची मजाच घालवून टाकलेली आहे.

चक्कर_बंडा's picture

5 Jul 2022 - 6:53 pm | चक्कर_बंडा

खरं आहे, जुन्नर दरवाजाची वाट, कल्याण दरवाजाच्या तुलनेत अवघड आहे, तुम्ही उल्लेख केलेल्या लोखंडी शिड्या हलताहेत असं त्या वाटेने आलेल्या लोकांकडून कळलं, कल्याण दरवाजाची वाट ही तसं पाहायला गेलं तर पावसाळ्यातच धोकादायक आहे, इतर वेळी ठीक म्हणावी अशीच....

नचिकेत जवखेडकर's picture

7 Jul 2022 - 8:40 am | नचिकेत जवखेडकर

मस्त! २००६ साली केलेल्या जीवधन नाणेघाट ट्रेकची आठवण झाली. आम्ही थंडीत गेलो होतो.

चौथा कोनाडा's picture

7 Jul 2022 - 10:48 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी !
मजा आली, ट्रेक भटकंती वाचताना आणि प्रचि अनुभवताना !

पाषाणभेद's picture

8 Jul 2022 - 10:43 am | पाषाणभेद

किल्ले चढणे, प्रस्तररोहण, गिर्यारोहण आदींसाठी प्रत्येक वेळी अंग झाकले जातील असे कपडे (बर्म्यूडा नव्हे) वापरणे जास्त हितकारी, सुरक्षित नाही का?
तसेही बर्म्यूडा, थ्री फोर्थ अगदीच चांगले दिसत नाही. कारणांसाठी चर्चा आधीच झालेली असू शकते.

चौकस२१२'s picture

11 Jul 2022 - 9:39 am | चौकस२१२

विशेष म्हणजे जीन ( घालायची प्यायची नव्हे ) वापरून नये .. कारण ओली झाल्यास जड होणार ! वाळन्यास वेळ लागणार
अंगरखा म्हणून वरती पातळ कापडाचे २-३ थर होतील असे कपडे घालावेत.. सोयी प्रमाणे थर कमी जास्त करता येतात
किंवा उन्हाळा असले तर जाळीचे आणि हवेशीर राहण्यासाठी झडप असलेले अंगरखे ( जंगलात फोटो ग्राफी/ मासेमारी करणारे वापरतात तसे ) वापरावे
अर्थात हे कोणत्या प्रदेशात आणि कोणतया वातवरणात तुम्ही भटकंती करताय त्यावर अवलंबून आहे म्हणा

पाषाणभेद's picture

8 Jul 2022 - 10:46 am | पाषाणभेद

किल्ले चढणे, प्रस्तररोहण, गिर्यारोहण आदींसाठी प्रत्येक वेळी अंग झाकले जातील असे कपडे (बर्म्यूडा नव्हे) वापरणे जास्त हितकारी, सुरक्षित नाही का?
तसेही बर्म्यूडा, थ्री फोर्थ अगदीच चांगले दिसत नाही. कारणांसाठी चर्चा आधीच झालेली असू शकते.

अजून फोटोज् हवेत.महत्वाचे तर उदा.---- चांगले बांधकाम असलेल्या व लेणेच वाटणारे गजान्तलक्ष्मी सारखे महत्वाचे उल्लेख असलेले फोटो हवेतच त्याविना हे भटकंती वर्णन अपुरे वाटत आहे .

गोरगावलेकर's picture

28 Jul 2022 - 11:21 am | गोरगावलेकर

असले अवघड ट्रेक स्वत:ला जवळजवळ अशक्यच असल्याने आपल्या वृत्तांत व फोटोंमुळे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखे वाटले.

Nitin Palkar's picture

28 Jul 2022 - 8:59 pm | Nitin Palkar

तुमच्या बरोबर ट्रेक केल्याचा अनुभव आला...