पुर्वग्रह-आनंदाला ग्रहण

सागरसाथी's picture
सागरसाथी in जनातलं, मनातलं
1 Mar 2022 - 2:55 pm

मने,माणसाचे मन मोठे विचित्र आहे. माणूस एकटा दिसला तरी त्याचे मन कधीही एकटे नसते. त्याचा मी पणा,अहंकार, गर्व,पुर्वग्रह कायम त्याच्या सोबत असतात‌. माणूस एकटा असो वा समूहात या गोष्टी कधीही त्याची साथ सोडत नाहीत.
जॉर्ज शेल्लर यांनी म्हटले आहे, "माणसाला आपला अहंकार,मी पणा कधीही सोडून टाकता येत नाही, तो समोरच्याला लक्षात येईल एवढा स्पष्ट दिसत असतो".
क्लिफ्टन वेब हा अमेरिकन नट स्वत:बद्दल सांगताना म्हटतो," मी जिथे जिथे जातो तिथे मी पण सोबत असतो त्यामुळे सगळी मजा निघून जाते.
शांताबाई शेळके म्हणतात," आपण कुठेही जातो तिथे आपण आपले पुर्वग्रह,आपले कलुषित मन सोबत घेवून जातो आणि मग सगळी गंमत निघून जाते."
संगीताच्या कार्यक्रमाला जातो आणि त्या गायकाच्या व्यसनीपणा आठवत राहतो, नाटकाला जातो नटाची लफडी आठवत बसतो आणि मुळ गाण्याच्या कार्यक्रमाची किंवा नाटकाची मजा अनुभवायची राहूनच जाते."
काय म्हणालीस," हे सर्व आज का सांगतोयस ?"
तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं आणि हे सर्व वाचलेले आठवत गेले.
खुप वर्षांपुर्वी, अंजली किर्तने याचे " मनस्विनी प्रवासिनी - ब्रिटीश पर्व हे पुस्तक वाचले होते, तेव्हापासून यांच्या बाकीच्या लिखाणाबद्दल उत्सुकता होती.
मने, आनंदी गोपाळ सिनेमाच्या काळात यांचे नाव पुन्हा पुन्हा वाचनात येत होते. दुर्गा भागवत या एक आवडत्या लेखिका, त्यांच्यावरती अ़ंजली किर्तने यांनी एक लघुपट बनवला हे सुद्धा वाचले होते.
मने, याच अंजली किर्तने यांनी लिहीलेले या लघुपट निर्मीतीची कथा,निर्मितीतले अनुभव सांगणारे एक पुस्तक वाचनात आले आणि हा लघुपट बघण्याची उत्सुकता निर्माण झाली.
मने, असं म्हणतात, सुर्याला सर्व काही ठाऊक असते! ते खरं का खोटं माहीत नाही पण गुगलला सर्व काही ठाऊक असते या विश्वासापोटी गुगलबाबाला शरण गेलो.
मने, तो लघुपट नाही पण त्याबद्दल लिहीलेले खुप काही वाचायला मिळाले, उत्सुकता आणखीनच वाढली आणि.....
आणि.... मने, हा "आणि" नेहमी असा मध्येमध्ये का येतो ? तर एका ठिकाणी त्या लघुपटाबद्दल आणि अंजली किर्तने यांच्याबद्दल अगदी वाईट टिका केलेली वाचायला मिळाली, अगदी ट्रोलर्सची भाषा वापरलेली दिसली आणि सगळा उत्साह मावळून गेला, मन एका क्षणात दुषित झाले.
मने, नेहमी असेच का होते, सगळ्या चांगल्या गोष्टींना कस्पटासमान दुर लोटून वाईट गोष्टींना आपण कुरवाळत का बसतो ?
आपल्या अनुभवातून नाही तर ऐकीव मतांवरुन आपण पुर्वग्रह बनवून मिळणाऱ्या आनंदाला आपण आपल्या हाताने ग्रहण का लावतो ?
मने, हे सगळे जाणवू शकले कारण वरती लिहीलेले विचार कधीकाळी शांता शेळके, व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकातून वाचनात आले होते.
मने, म्हणूनच मला वाटतं वाचन कधीही निरर्थक नसते ते काहीतरी देवून जातेच, कधी आनंद, कधी अनुभव तर कधी नवी दृष्टी जी आपल्याला वेळीच सावध करते," बाबारे, सांभाळ, पुर्वग्रहांपासून दूर राहीलास तर अपुर्व आनंदावर हक्क सांगू शकशील".

धोरणकलावाङ्मयमुक्तकसमाजविचार

प्रतिक्रिया

कोण's picture

1 Mar 2022 - 3:24 pm | कोण

प्रत्येक वाक्यात "मने" का वापरत आहात?

सागरसाथी's picture

1 Mar 2022 - 4:37 pm | सागरसाथी

मनेला उद्देशून लिहीले आहे म्हणून,जयवंत दळवींची बने, माझी मनी,मने

चौथा कोनाडा's picture

1 Mar 2022 - 4:58 pm | चौथा कोनाडा

एका ठिकाणी त्या लघुपटाबद्दल आणि अंजली किर्तने यांच्याबद्दल अगदी वाईट टिका केलेली वाचायला मिळाली, अगदी ट्रोलर्सची भाषा वापरलेली दिसली आणि सगळा उत्साह मावळून गेला, मन एका क्षणात दुषित झाले.

मने, हे काही दिवसांनी विसरून जाशील, ही टीका पुसट होत जाईल, तेव्हा पुन्हा बघ तो लघूपट अन कसा वाटला ते सांग मने !

सागरसाथी's picture

1 Mar 2022 - 8:37 pm | सागरसाथी
सागरसाथी's picture

1 Mar 2022 - 8:37 pm | सागरसाथी