पटवर्धन अण्णा
पटवर्धन सरांकडे आम्ही इंग्लिश विषयासाठी क्लासला जायचो. युनायटेड इंग्लिश स्कूल अर्थात आमच्याच शाळेतून खूप पूर्वी सर रिटायर्ड झालेले होते. शाळेत होते म्हणून सर नाहीतर त्यांना अण्णा म्हटलेलंच आवडायचं. बरीच मुलं त्यांना सर म्हणायच्या ऐवजी अण्णाच म्हणत. सर घरीच इंग्रजीचे क्लास घ्यायचे. फक्त 9 वी आणि 10 वी ची मुलं. सकाळी 7.30 ते 8.30 10 वीची बॅच, 8.30 ते 9.30 9 वीची बॅच आणि शेवटी 9.30 ते 10.30 परत एक दहावीची बॅच. एवढ्या तीनच बॅच दिवसभरात असायच्या. त्यांच्या घरातल्या त्या छोट्याश्या पडवीत हा क्लास चालायचा.एक वेळी जास्तीत जास्त 15 ते 17 मुलं माऊ शकतील एवढीच खोली होती ती. खूपच दाटीवाटीने सगळी मुलं तिथे बसायची. त्यामुळे सरांकडे क्लाससाठी आधीपासून नंबर लावायला लागायचा. जेव्हा इतर कलासेसची फी महिन्याला 100 किंवा 150 होती तिथे अण्णांच्या क्लास चि फी फक्त 40 रुपये होती.
अण्णांच्या घरासमोर छोटंसं अंगण होत. तिथे सगळ्यांच्या सायकली पार्क केलेल्या असायच्या. क्लास भरताना आणि सुटताना काय व्हायचा तो थोडाफार मुलांचा आवाज व्हायचा.एरवी या घरात 15/20 मुलांचा क्लास चालू आहे याचा पत्ता लागणार नाही इतका pindrop silence असायचा. एरवी वर्गात कितीही धुमाकूळ घालणारी मुलं असली तरी इथे सगळीच शांत असायची. अण्णा कधी ओरडलेले आठवतच नाहीत. किंबहुना या माणसाला ओरडता येत असेल का अशी शंका यावी इतके ते शांत होते.कमालीचा संयम होता त्यांच्याकडे. एखादा हुशार आणि दुसरा ढ म्हणून कोणालाही वेगळी खास वागणूक नव्हती त्यांच्याकडे. सगळी मुलं शिकायला आली आहेत आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करणार यावर त्यांचा कटाक्ष होता.
अण्णाकडे जायचं म्हणजे तयारी करून जावं लागायचं. उद्या काय शिकवणार हे आधीच माहीत असायचं. त्यामुळे आदल्या दिवशी तो धडा वाचून त्यातले अडलेले शब्द डिक्शनरीतून शोधून वहीत टिपून ठेवावे लागत. सर कुणालाही विचारायचे. सरांनी कधी आयतं काही दिल नाही.डिक्शनरी बघायची सवय लागायला हवी म्हणून हे बंधन. वाचताना सर मग शब्दाचा अर्थ विचारायचे. तो सांगितला की मागचा पुढचा शब्द बघितला का? त्याच्या पाठी,पुढे कोणता शब्द होता?, naun, pronaun, verb इत्यादी कोणते प्रकार हे त्या त्या अनुषंगाने समजवायचे. केवळ गरजेपुरता एकच शब्द बघितला हे त्यांना पटत नसे. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी या सगळ्याची गरज पटवून द्यायचे. 10 वी आहे म्हणून उगाच बाऊ करायचे नाहीत. नेहमीची वार्षिक परीक्षा जशी अभ्यास करून देऊ तशीच ही पण. हे सगळे असूनही त्यांचा एकही तास कधीही रटाळ झालेला मला आठवत नाही. कायम हसतमुख. कोणतीही शंका विचारा, चुटकीसरशी सोडवणार. आपण जो विषय शिकवतो तो आधी आपण समजून घेऊन मग मुलांना शिकवला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असायचं.जर आपल्यालाच समजाला नसेल तर मुलांना काय समजावणार?अस त्यांचं मत होत. टवाळ मुलांना देखील ते कधी ओरडले नाहीत. पण हळूच कानपिचक्या मात्र देत. ज्याला बोललं जाई त्याला बरोबर कळे. आणि मग गडबड बंद होई नि अभ्यास पूर्ववत चालू होई.
शिक्षण संपल्यावर सगळी मुलं अपल्यापल्या क्षेत्रात कामाला लागली. अण्णांनी पण वयानुसार थकल्यावर क्लास बंद केले. कधी कोणी परत चिपळूणला आले तर क्वचित सरांना भेटत. मी चिपळूणलाच असल्याने बऱ्याच वेळा सरांची भेट होई. कधी आसपास च्या घरी गेले असेन तर आवर्जून सरांना भेटून येत असे. वयानुसार थोडं विस्मरण सुरू झालं होतं. त्यामुळे गेल्यावर जरी मला ओळखल असलं तरी आता कुठे असतेस काय करतेस हे प्रश्न अगदी न चुकता विचारात.माझ्याच बॅचच्या इतर मुलांचीही चौकशी मग होत असे. अण्णा बरीच वर्षे त्याच घरात राहत होते. क्लास चालू असताना संक्रांत असेल तर तिळगुळ किंवा आणखी काही असेल तर त्यानुरूप छोटा खाऊ अण्णा सगळ्यांना द्यायचे. आतादेखील जायचे तर श्रीखंडाची गोळी, लिम्लेटची गोळी हातावर टेकवायचे. आता आम्ही तेव्हढे लहान नाही राहिलो अस हसून म्हणाले की मग म्हणायचे, 'तुझ्यासाठी नाहीच दिली. घरी गेलीस की लेकाला दे माझ्याकडून खाऊ म्हणून.'
खूप प्रेमळ होते अण्णा. मध्यंतरी पुरानंतर एकदाच भेटले त्यांना.पण त्यावेळी खूप थकल्याचे वाटले. आता काहीच दिवसांपूर्वी अण्णा गेल्याच कळलं आणि मन भरून आलं. शेवटची भेट नाही होऊ शकली याच खूप वाईट वाटलं. आम्हाला इंग्रजी शिकवणारे, शांत आणि संयमी असणारे, आपल्या विद्यार्थ्यांवर मुलांसारखं प्रेम करणारे अण्णा कायमच आमच्या समरणात राहतील.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पटवर्धन सरांचे सुंदर
1970ते 1972
मस्त लेख, चित्रदर्शी वर्णन
छान
छान व्यक्तीचित्रण
धन्यवाद!
खूप सुंदर पण थोडक्यात आटपलात