New Edge Entrepreneurs !
चार समवयस्क, समविचारी मित्र खूप दिवसांनी भेटले की काही टिपिकल गोष्टी घडतात. मित्र पिणारे किंवा न पिणारे दोन्ही असू शकतात. किंवा त्यातले दोघे पिणारे आणि बाकीचे नुसता चखना संपवणारे पण असू शकतात. सगळे नोकरीवाले असले की नोकरीत दहा-पंधरा वर्षे घासून झालेली असते. EMI आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना नाकी नऊ आलेले असतात.दुनियाभराचे टेक्निकल स्किल्स आणि करियर ऍस्पिरेशन्स बाजूला ठेवून आपण केवळ आणि केवळ सर्व्हायवलसाठी खर्डेघाशी करतोय ह्याची जाणिव सगळयांना झालेली असते.
या पार्श्वभूमीवर अधूनमधून मित्रांची भेट ही फार अनिवार्य असते. मित्र भेटतात. शिव्यांची देवाणघेवाण होते. आणि ग्लास भरले जातात.
पहिला पेग :
"खूप टेन्शन आहे यार ऑफिसमध्ये. त्यात बॉस तर इतका च्यु** आहे की काय बोलावं...!
यानंतर बॉस, प्रोजेक्ट आणि संपूर्ण भांडवलशाही यावर एक परिसंवाद होतो. ज्यात अनेक आया-बहिणींना उचक्या लागतात.
दुसरा पेग :
"कंटाळा आला बे नोकरीचा. तेच रुटीन सालं. बीपी-शुगरचा त्रास सुरू झालाय मला ह्या फालतू शेड्युलमुळे"
यानंतर वर्क लाईफ बॅलन्स, तब्येत, आलं-लसणाचा काढा, लेमन टी, मॉर्निंग वॉक,आयुर्वेद, योगासने ह्यावर एक परिसंवाद होतो. आणि तिकडे इंट्युशनमुळे रामदेवबाबांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात.
तिसरा आणि निर्णायक पेग :
"काहीतरी स्वतःचा बिझनेस सुरू करायला पाहिजे लेका. या नोकरीत काही अर्थ नाही तुले सांगतो..."
बस्स!! हाच तो क्षण....
आता तिकडे अंबानी-अदानी देव पाण्यात ठेवून बसतील ह्या लेव्हलच्या बिझनेस आयडिया डिस्कस होतात..
--एखादा स्टार्ट -अप सुरू करून स्वतःच प्रॉडक्ट लॉन्च करायला पाहिजे.
-- कन्सलटन्सी सुरू करावी म्हणतो. इतका अनुभव आहे आपल्याजवळ.
-- डिपार्टमेंटल स्टोअर टाकू एखादं. बम्म मार्जिन असते रिटेलमध्ये. मी तर जागापण बघून ठेवलीये.
--अबे त्यापेक्षा दहा देशी गायी विकत घेऊ. एक डेअरी चालू करू. मस्त दूध-तूप वगैरे. आपला पनीरचा ब्रँड आणू मार्केटमध्ये. खूप डिमांड आहे म्हणते.
-- अबे डिमांड तर काजूची पण खूप आहे. हा चकना पाय बरं डिशमध्ये. प्रत्येक बारमध्ये लागतो काजू. काजूची मशिन घेऊ मस्त. जागापण कमी लागते.
-- एवढ्या छोट्या गोष्टीत काही मजा नाही. आपला ब्रँड सुरू करायचा कपड्याचा किंवा ज्वेलरीचा. दोन वर्षात आयपीओ आला पाहिजे मार्केटमध्ये असं टार्गेट ठेवायचं. तरच काही होऊ शकते.
ह्यानंतर एकेका आयडीयावर चर्चा सुरू होते. साधारण गुंतवणूक लक्षात आल्यावर आपलं सेविंग अकाउंट, इएमआय, मुलांची फी वगैरे आकडे डोळ्यासमोर नाचू लागतात. मग एवढं काही आपल्याच्याने शक्य नाही हे लक्षात आल्यावर चर्चेचा रोख बदलतो.
"अबे त्यापेक्षा दोन-दोन लाख रुपये सगळ्यांनी द्या. मी शेयरमध्ये टाकतो. आपला एक मित्र मस्त टिप्स देतो. वर्षभरात पन्नास टक्के तर कुठेच नाही गेले!"
लगोलग आपण घेतलेले penny shares, त्याची आज झालेली माती. सुझलॉन अन येस बँकेत झालेला लाल चिखल अन त्याचे आंगभर उडालेले शिंतोडे सगळ्यांना आठवतात. आणि त्या मित्राच्या प्रोपोझलवर कुणी उत्तरच देत नाही.
ह्यानंतर एक मिलियन डॉलर आयडिया समोर येते.
"एक सांगू का, एखादं ऍप बनवू अन त्यावर प्रॉडक्ट ठेवायचे विकायला. च्यामारी गोमूत्रपण अमेझॉनवरून मागवते ना लोकं आजकाल"
"हो..हे एकदम सही आयडिया आहे. त्या OYO वाल्याने काय केलं सालं. काही नाही एक ऍप बनवलं फक्त. आज पाय बरं...!"
आता ह्यातल्या, "काही नाही एक ऍप बनवलं फक्त" या वाक्यावरच होऊ घातलेला बिझनेस संपलेला असतो.
कारण बिझनेस सुरू करायला काय लागते?? तर 'काही नाही' ह्यावर सगळ्यांच एकमत झालेलं असतं.
"बरं..आज आपण सगळे पिऊन आहोत. आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू अन बोलू ह्यावर. तोपर्यंत मी आपला चौघांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप बनवतो. बाकी कोणाला नको ऍड करायला"
New Edge Entrepreneurs नावाचा एक व्हॉट्सऍप ग्रुप बनतो. ज्यावर तीन महिने एकही मेसेज येत नाही.तीन महिन्यांनी पहिला मेसेज येतो.
"आज बसायचं का?"
आणि त्यावर वायूवेगाने तीन अंगठे येतात !!
समाप्त
-- चिनार
वाचने
7620
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी बरोबर
उत्स्फूर्त वाटलं लिखाण.
भारी !
स्वानुभव आहे.... अगदी तंतोतंत
अगदी असेच होते
मस्त लिखाण ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Siva Jag Mein... :- Tadapमस्त
शंका
In reply to मस्त by मित्रहो
they always remain on Edge of
In reply to शंका by मित्रहो
हा .... हा .... हा .....
😃
अगदी असंच होतं ! मस्त खुसखुषीत ! +१गंभीर नसलेले पण बसायला तयार लेखन झकास.
START UP
छान लिहिलंय.
धमाल लिहीले आहे!
हा हा हा. अगदी वास्तवदर्शी.
कधी अगम्य कल्पना तर कधी
उत्तम लेख!
अनलेस यु डू समथिंग! तस्मात , ओशोची कमांडमेंट फॉल्लो करा - फ्लोट , डोन्ट स्विम ! आणि जर काही करायचंच आहे तर बोलायचं कशाला ?वा! मजेशीर लिहिलंयत!
जबरदस्त
झक्कास!
झकास
हेहे मस्त
मस्तच... मजा आली वाचायला....
खुमासदार!