दोन किस्से
दोन किस्से
१) परवा शनिवारी माझ्याकडे एक २७ वर्षाची गरोदर मुलगी सोनोग्राफीसाठी आली होती. तिला (अंगावर जात होते) रक्तस्त्राव होत होता. सोनोग्राफी केली त्यावेळेस गर्भ ९ आठवड्याचा असायला हवा होता, तो केवळ ६ च आठवड्याचा होता आणि जन्मजात विकलांग( MALFORMED) होता. अर्थात हृदयाचे ठोके चालू नव्हतेच. त्यामुळेच रक्तस्त्राव होत होता. म्हणजेच नैसर्गिक रित्या गर्भपात होणार होता.
मी त्या रडत असलेल्या मुलीला समजावत होतो कि हि एक निसर्गाची करणी आहे. तुम्ही सडका आंबा झाडाला चिकटवू शकत नाही. हा गर्भ व्यंग असलेला असल्यामुळे एका विशिष्ट वाढीनंतर वाढीला असमर्थ असल्याने हृदयावर ताण पडतो आणि हृदय काम करेनासे होते आणि गर्भपात होतो. यासाठी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे परत जा. ते आपले गर्भाशय साफ करून घेतील.
अशा मुलींची मनस्थिती नाजूक असते. आपण वजन उचलले किंवा अननस पपई मटण असे काही "उष्ण" खाल्ल्यामुळे असे झाले असेल असा त्या स्वतःला "दोष" देत असतात.
मी त्यांना समजावतो कि लग्न अगोदर गरोदर झालेल्या अनेक मुली आमच्या कडे येत असतात. डॉक्टरांकडे जायच्या अगोदर पपई मटण वगैरे खाऊन त्या गर्भपात करून घेण्याचं प्रयत्न करतात परंतु असा गर्भपात होत नाही म्हणून शेवटी नाईलाजाने त्या डॉक्टरांकडे येतात इ इ.
हे सर्व समजावत असताना तिची सासू मला एकदम विचारती झाली कि "डॉक्टर, हा मुलगा होता कि मुलगी?"
मी अवाकही झालो आणि मला संतापही आला.
मी त्या सासूला थोड्या चढ़या सुरात म्हणालो कि हे असलं तुम्ही माझ्याकडे विचारायचं नाही आणि सध्या तुमच्या सुनेची मानसिक स्थिती काय आहे ते लक्षात घ्या.
त्या सासूला तिचा मुलगा (मुलीचा नवरा) म्हणाला मम्मी तू जरा गप्प बस. आणि ते आपले रिपोर्ट घेऊन गेले.
माझी पत्नी तेथेच होती. तिने मला विचारले कि ज्या गर्भाचे लिंग तयारही झालेले नाही आणि गर्भपात होणाऱ्या( मृत) गर्भाचे लिंग जाणून घेण्याचा हा काय अट्टाहास?
मी तिला थंडपणे म्हणालो कि "मुलगी असती तर हि सासू तिला समजावणार होती कि जाऊ दे गेली तर काय झालं? मुलगीच होती, बरं झालं".
माझी पत्नी हतबुद्धच झाली.
२) एक ५० वर्षाच्या सुस्थितीतील एक बाई माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून डाव्या दंडात दुखतंय म्हणून आल्या होत्या. त्यांच्या डॉक्टरांनी तिला शिरेत गुठळी झाली आहे का हे तपासण्यासाठी डॉपलर सोनोग्राफी करण्यासाठी पाठवलं होतं.
मी त्यांना काय होतंय ते विचारलं तेंव्हा त्या म्हणाल्या कि डॉक्टर मी मागच्या वर्षी एप्रिल मध्ये (एप्रिल २०२१) कोव्हिडची लस घेतली, तेंव्हा पासून माझ्या दंडात दुखत आहे. मी विचारलं दंडात इंजेक्शन नंतर किती दिवसांनी दुखायला लागलं? त्यावर त्या म्हणाल्या कि ऑक्टोबर २१ पासून दुखायला लागलं.
मी त्यांना म्हणालो कि हि गोष्ट असाधारण( UNUSUAL)आहे कारण इंजेक्शन घेतल्यावर पाच सहा महिन्यांनी तेथे दुखायचं काहीच कारण नाही.
त्यांची फाईल पाहायला घेतली तेंव्हा असे लक्षात आले कि डावा हात दुखतो आहे म्हणून त्यांनी हृदयाची तपासणी करून घेतली होती त्यात इ सी जि, इको कार्डिओग्राफी छातीचा आणि दंडाचा एक्स रे इ सर्व तपासणी झालेली होती. ज्यात काहीच नव्हतं. फ्रोझन शोल्डर म्हणून ३ आठवडे फिजियोथेरपी सुद्धा झाली होती त्यानंतर आयुर्वेदिक औषधोपचार सुद्धा झालेला होता.
डॉपलर सोनोग्राफी मध्ये काहीच नव्हतं. दंड जेथे दुखत होता( जिथे इंजेक्शन देतात) तो डेल्टोईड स्नायू सुद्धा व्यवस्थित होता खांद्याच्या सांध्याच्या स्नायू मध्ये सुद्धा काही नव्हते. सांधे सुद्धा व्यवस्थित होते.
यानंतर मी त्यांना हात थोडासा पुढे उचलून वर करायला सांगितला. बरोबर त्याच वेळेस त्यांना दंडाच्या स्नायूमध्ये दुखत असे. मी सोनोग्राफी करून स्नायू मध्ये अशा उचललेल्या अवस्थेत काही नाही हे पाहून घेतले
आणि त्यांना विचारले कि तुम्ही आपला मोबाईल किती वेळ वापरता आहात? त्यावर त्यांचे यजमान म्हणाले कि अहो तिचा मोबाईल सतत हातात असतो, किती तास ते विचारू नका. का हो काय कारण?
मी त्यांना म्हणालो कि त्यांचा हात दुखतो आहे तो सतत डाव्या हातात मोबाईल धरून वर उचलल्यामुळे स्नायूवर ताण पडतो आहे. मोबाईल वर उचलण्याच्या स्थितीत कायम हात राहिल्यामुळे तो स्नायू थकतो( MUSCLE FATIGUE) आहे.
त्यावर त्यांचे यजमान म्हणाले कि आमची मुले स्थिरस्थावर झालेली आहेत, मुलांची लग्ने झाली आहेत आणि ते वेगळे राहतात आणि मी गेली दोन वर्षे घरून काम करतो आहे त्यामुळे ती भरपूर वेळ मोबाईलवर असते आणि कायम त्यावर व्हिडीओ पाहणे चालू असते. अगदी स्वयंपाकघरात काम करत असतानासुद्धा.
तिला तुम्ही "मोबाईलचा वेळ" कमी करायला सांगा.
मी त्यांना म्हणालो कि मोबाईल वर किती वेळ घालवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तेंव्हा त्याबद्दल त्यांना सांगायचा मला तसा अधिकार नाही.
मी एकच सांगू शकतो कि तुम्ही मोबाईलचा स्टॅन्ड घेऊन या जो १००-२०० रुपयात मिळेल. आणि हातात धरून ठेवण्यापेक्षा स्टॅण्डवर ठेवून वापरा.
तुम्ही हॅन्ड्स फ्री इअर फोन वापरू शकता. त्यावर यजमान म्हणाले कि अहो तिला व्हर्टिगोचा त्रास सुरु झाला म्हणून कान नाक घसा च्या डॉक्टरांनी इअरफोन वापरू नका सान्गितलंय.
आता मला समजलं कि तिला डावा खांदा का दुखतोय? तुम्ही तिला मोबाईल कमी वापर म्हणून सांगा.
मी त्यांना परत सांगितलं कि हा अधिकार मला नाही.
मी त्यांना म्हणालो कि माझ्याकडे डावा खांदा आणि मान दुखतो म्हणून काही मध्य वयीन महिला सोनोग्राफी साठी आल्या होत्या. त्या काम करताना तेंव्हा डावा खांदा वर करून मोबाईल कान आणि खांदा यात धरून तासन तास मोबाईलवर मैत्रिणीशी गप्पा मारतात असे आढळले. जसे वय वाढते तसे मानेला स्पाँडायलॉसिस चा त्रास सुरु होतो आणि अशी मान वाकडी धरून ठेवली कि मानदुखी चालू होते.
त्यावर यजमान म्हणाले अहो हि सुद्धा पोळ्या करताना डाव्या कानाला मोबाईल लावून अर्धा पाऊण तास मान वाकडी करून बोलत राहते.
एवढा सगळं होऊनही त्या बाई काही मी मोबाईल "कमी वापरेन" असं म्हणत नव्हत्या.
मी काय बोलणार?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
पाहिला किस्सा मन्न खिन्न
पहिला प्रसंग अतिशय हृदयद्रावक
ता.क. अशी काहीशी मांडणी डॉ.
तुमची प्रसंग समोर मांडण्याची
:(
पहिला किस्सा जशासा तसा
सोनोग्राफी....
फ्रोझन शोल्डर
दोन्ही किस्से जबरदस्त.
पहिला किस्सा खरोखर चीड आणणारा
अहो हि सुद्धा पोळ्या करताना
असा त्रास
पहिला किस्सा
दोन्ही किस्से उद्बोधक आहेत.
असतात एक अक नमुने
मोबाईल वापराचा अतिरेक
त्याही पुढे जाऊन
हा टोकाचा विचार आहे आणि
+१
सुरीच्या वापराचे उदाहरण आवडले ....
मुद्दामहून तटस्थपणे लिहून
अफलातुन अनुभव !
Is humanity really worth
> मानवजातीला सिलेक्टिव्ह
आणि चुकीच्या सिलेक्शन मुळे
बकवास विचार
कालच एके ठिकाणी वाचलं की
स्वतः डॉक्टर नी
आपल्या विचारांत अत्यंत
> मी त्यांना परत सांगितलं कि
दोन्ही किस्से आवडले....
रोचक अनुभव !
दुसरा किस्सा
दोन्ही किस्से खतरनाक आहेत
मुलींची वाढीव मागणी लाभदायी नाही
धन्यवाद
> लग्नाच्या बाजारात मुलीचीच
खरी भीती तर ही आहे
गरज नाही. काही दशके आधी
तो महान व्यक्ती कोण आहे
बाजार, कौशल्ये व मोबदला
व्वा !!!
वैद्यकीय पेशात शिक्षण जितकं
पुणेरी व्हा
मोबाईल ऍडीक्शन हे मानसिक
आणि आजकाल, लहानग्यांचे लाडि़क
माझ्याकडे आजकाल असे अनेक लोक
कोणी काळजी करण्याचं कारण नाही
एक वेगळी गोष्ट