Skip to main content

महाराष्ट्रीय सण आणि होत असलेली भेसळ ( ? )

लेखक बापूसाहेब यांनी मंगळवार, 19/10/2021 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज कोजागिरी पौर्णिमा. लहानपणापासून मी पहात आलोय की आजच्या दिवशी मातीच्या किँवा इतर कोणत्याही भांड्यात दूध तापवून ते उकळवले जाते, आकाशातील पूर्ण चंद्र दिसत असतो. त्याची प्रतिबिंब दुधात पडेल अश्या ठिकाणी ते उकळवून नंतर घरातील सर्व जण ते दुध पितात.. परंतु आजकाल अश्या पद्धतीने सण साजरा न करता आमच्या इथे दांड्या खेळल्या जातायत. सर्व अरेंजमेंट मारवाडी फॅमिली ( संख्या फक्त २) आहे त्यांनी केलेली आहे... गाणी पण बहुतांश मारवाडी आहेत. नाचणारे ९८ टक्के मराठी आहेत. अर्थातच असं करायला विरोध नाही पण हे करताना आपण आपले सण साजरा करण्याची पद्धत विसरत चाललोय का ?? दसऱ्याच्या दिवशी घरी सोने ( अपट्याची पाने ) द्यायला लहान मुले आले होती ( मराठी ७-८ आणि ईतर भाषिक १-२ ). परंतु सर्व जण " हॅप्पी दसरा " असं म्हणतं होती. सोन घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणण्याची पद्धत कुठे गेली ते समजेना. मकर संक्रातीच्या दिवशी पण " तिळगूळ घ्या गोड बोला " मागे पडून हॅपी मकर संक्रांती आणि पतंगबजी वाढत चाललीय. आम्हीं लहान असताना नवरात्रीत दांडिया खळण्यासाठी जायचो तेव्हा सर्व मराठी आणि हिंदी गाणी वाजवली जायची. कृष्णाचे गवळणी, गणपतीची गाणी , अंबेमातेची आणि इतर हिंदी गाणी वाजायची ( हे नाम रे .. सबसे बडा तेरा नाम हे गाणे तोंडपाठ होते. ) पण आमच्या गल्लीत मारवाडी , गुजराती गाणी वाजत होती... आणि विशेष म्हणजे त्यावर नाचणारे ९० टक्के मराठी होते. त्यामुळें मराठी लोकांना मराठी गाणी वाजवायला "लाज " वाटते का असा विचार मनात येऊन गेला. नवरात्रीत जे काही दांडिया कार्यक्रम होतात तेथे मराठी लोक साड्याऐवजी किंवा मराठी पेहरावा ऐवजी गुजराती ड्रेस का घालतात ? हीच गोष्ट लग्नात देखील.. मराठी मुलं आणि मुली विदेशी किंवा इतर धर्मीय पेहराव का करतात. उदा. मुली साडी सोडुन वेडिंग ड्रेस ( ख्रिश्चन लोकामध्ये घातला जातो तसा) किंवा घागरा घालतात.. याउलट कोणत्याही ख्रिश्चन मुलीने किंवा गुजराथी मुलीने लग्नात नऊवारी साडी घातलेली मी आजवर पहिली नाही.. पूर्वी हत्ती नक्षत्रात भोंडला/ हतका /हादगा हा खेळ / सण साजरा केला जायचा. पण बहुतेक आता नामशेष झाला. मी गेल्या ५-६ वर्षात कोणत्याही मुला मुलींनी हा प्रकार साजरा केल्याचे पाहिलेले नाही. ही पद्धत नष्ट झाली का ?? एलामा पैलामा.. आज कोन वार बाई आज कोन वार.. अशी अनेक गाणी आजही मला पाठ आहेत. पण आजकाल बहुतांश मराठी मुलांना किंवा मुलींना हे महिती आहे?? आणि ईथे ( महाराष्ट्रात) आल्यावर इथले पाहून किती मारवाडी गुजराथी लोकांनां ही गाणी महिती आहेत?? आमच्या वेळी रंगपंचमी आणि होळी हे दोन वेगवेगळे सण होते. आजही कोणतेही कॅलेंडर उघडुन पहा दोन्ही सण वेगवेगळे दाखवलेले आहेत. होळीच्या दिवशी आम्ही होळी पेटवायचो. पुरण पोळी खायचो. आणि रंगपंचमीला रंग खेळायचो. पण आता रंगपंचमी हा सण राहिलेला नाही... आणि होळीच्या दिवशी होळी कोणी पेटवत नाही ( पर्यावरण ह्या विषयावर ईथे चर्चा नको ). याउलट होळीच्या दिवशी रंग खेळले जातात.. आणि "हॅपी होली " च्या मेसेज ने इनबॉक्स फुल होतो. ज्या पद्धतीने आपण मारवाडी , गुजराती इ लोकांना सामावून घेउन त्यांच्या कलाने आपले सण साजरे करतोय त्या पद्धतीने ते लोक आपले सण साजरे करताना दिसत नाहीत. मी आजवर कोणी इतर भाषिक व्यक्तिने किंवा फॅमिली ने गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा केला असं पाहिलेले नाही. किंवा हद्ग्याची गाणी म्हणत फेर धरलेले आठवत नाही. पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत... दिवाळीच्या सणाच्या वेळी पण पारंपरिक फराळ नामशेष होऊन सोनपापडी, बिस्किटे, चॉकलेट इ प्रकार वाढत चाललीय आहेत. कोणी इतर भाषिक इथे येऊन इथल्या लोकांप्रमाणे चकल्या, लाडू, करांजिर करताना दिसत नाहीत. पण इथले लोक त्यांचं पाहून सोनपापडी कडे वळले. तर.. चर्चेचा मुद्दा हा की आपण आपले सण साजरे करायची पद्धत बदलत चाललोय का. ? ईतर भाषिक लोकं यांनी इथे आल्यावर इथल्या संस्कृतीत मिक्स होण्याऐवजी अल्पसंख्य असुन सुध्दा संस्कृतीक आक्रमण करत आहेत का?? की आपण होऊन आपल्या पद्धती सोडुन या नव्या पद्धती आत्मसात करत आहोत. ? आणि जर करत आसु तर का करतोय? याचे दूरगामी परिणाम काय होतील?? मी जे काही वर लिहिलय ते माझा गैरसमज आहे का ?? इतर मिपाकर या बाबतीत काय विचार करतात ?? टीप - हा धागा राजकीय हेतूने किंवा इतर भाषिक लोकांच्या द्वेष करण्यासाठी काढलेला नसुन आपल्या सण आणि परंपरा यामध्ये भेसळ होतेय की नाहीं या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी काढला आहे. मी माझी मते मांडली आहेत.. ती बरोबरच आहेत असं माझं म्हणणं नाही. मी कदाचित चुकीचा असू शकेल. धाग्याला मोदी ,.bjp , मनसे इ राजकीय संघटना कडे नेऊ नये.

वाचने 40367
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

एक निरीक्षण - ज्या मराठी सणांचे व्यवस्थित ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग झाले आहे ते गणेशोत्सव आणि दहीहंडी सारखे सण अमराठी लोकही प्रचंड उत्साहात साजरे करू लागले आहेत. गेली काही वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव दिल्ली, गुजरात आणि राजस्थानात गल्लोगल्ली जोरात होतो आहे आणि दरवर्षी आधीपेक्षा अधिक थाटामाटात. तसेच तथाकथित 'नवसाला पावणाऱ्या' म्हणजे ब्रॅण्डिंग व्यवस्थित झालेल्या गणपतीं मंडळांना भेट देणाऱ्या लोकांमध्ये अमराठी लोकांची संख्या प्रचंड आहे.

सण भेसळ वगैरे cosmopolitan प्रकार आहे.पण करायचं म्हटलं की सण पारंपारिकच करणारेही आहेतच.ओळखीच्या काही उच्चपदस्थ स्त्रीया सणाला एक पेला पुरण घालतातच.वेळाचा अभाव आणि जलद झालेले युग मराठी सणांचे रूप बदलत आहेत.आपले सणही बाकीच्यांना आनंदाने शिकवावे.

लेख वाचकानां आकृष्ट आणी सहभागी करून घेण्यात यशस्वी झाला आहे. सणांचे स्वरूप खुपच बदलले आहे. पुरोगामी प्रतीगामी कोण बरोबर कोण चुक, बाजारीकरण वैगरे मत माडंणी व्यवस्थीत केली आहे. नौकरी निमीत्ताने संपूर्ण देशात फिरताना लक्षात आले की महाराष्ट्र बाहेरील प्रदेशातील मराठी कुटुंब आपले सणवार व्यवस्थित पार पाडतात. बारमेड, शिलाँगं सारख्या दुरप्रदेशात मराठी मंडळे महाराष्ट्रातून येणार्‍या मंडळीचे यथासांग आदरातिथ्य करतात. लखनऊ, अजमेर, जयपुर, जबलपूर,, दिल्ली जोधपुर अशा अनेक शहरांमध्ये मराठी लोकांसाठी रहाण्याची खाण्याची अतिशय कमी दरात सुरेख सोय आहे. अमेरीकेतील बऱ्याच ठिकाणी मराठी माणूस संघटीत आहे व आपली अस्मीता जपण्यासाठी प्रयत्नशील आहे. मल्लखांब, ढोल लेझीम पथक, हळदीकुंकू गोष्टी उत्साहाने साजरा करतात.

In reply to by कर्नलतपस्वी

अमेरीकेतील बऱ्याच ठिकाणी मराठी माणूस संघटीत आहे व आपली अस्मीता जपण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहमत परंतु भारताबाहेरील मराठी मंदलात एक गोष्ट जाणवते कधी कधी १० पैकी ४-६ सुद्धा गाण्यावरील.. नाच ..हिन्दि ! का? जणू काही मराठीतील गाणी नामशेह्स झाली आहेत ..

In reply to by चौकस२१२

अनेक मराठी वाहिन्यांच्या कार्यक्रमात हिंदी गीतांवर समुहनृत्य करतात. सारेगमप वगैरे कार्यक्रमात स्पर्धक अनेकदा हिंदी गीते गातात.

In reply to by mangya69

मुद्दा तुमच्या लक्षात येत नाहीये बहुतेक ... जरूर जगातील गोष्टी आत्मसात करावयात, पण ते करतांना आपले जे आहे त्याबद्दल एक प्रकारची तुच्छतेचि भावना दाखवली जाते त्याबद्दल चाललंय ... साध उदाहरण घ्या. अजूनही अशी समजूत दिसते कि "कोफी पिणे म्हणजे उच्चभ्रू" आणि चहा पिणे म्हणजे गावंढळ " इंग्रजीत "डाऊन मार्केट " माझा एक ओलखीचा आहे त्याला विविध देशातील चहा आवडतो तो काही चहा येथील क्वारंटाईन नियमनमुळे आयात करता येत नाहीत म्हणून तो कानडा मार्गे आयात करतो ,,, ५-१० हजार रुपये किलो च्या भावाने !

In reply to by शानबा५१२

मी २०२० मध्ये सुरतला गेलो होतो. नंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी, सापूतारा ई ठिकाणी फिरलो. तिथे गुजराती थाळीचे जेवण फारसे मिळत नाही असे दिसले. सुरतच्या प्रसिद्ध बॉम्बे मार्केटमध्ये 'जय महाराष्ट्र' अशा पाट्या लावलेली व दुकानांची संक्षिप्त जाहिरात मराठीत असलेली अनेक दुकाने दिसली. बहुतेक दुकानदार आमच्याशी आनंदाने मराठीतही बोलत होते. या सगळ्यात भाषेच्या प्रेमापेक्षा ग्राहकच्या भावनेला हात घालून व्यापार वाढवणे हाच उद्देश असतो. बाकी वडापाव , मिसळपाव हे अतिशय लोकप्रिय पदार्थ आहेत. त्यांची लोकप्रियता महाराष्ट्रात कधी कमी होईल असे वाटत नाही कदाचित महाराष्ट्राबाहेरही ती वाढत असेल (मला फारसे माहीत नाही). काही दिवसांपुर्वी प्रियांका चोप्राच्या अमेरिकेतील उपहारगृहात वडापाव विकला जातो अशी बातमी वाचली.

In reply to by तर्कवादी

मला तर दल लेकच्या काठी एक स्थानिक व्यापारी मराठी बोलताना आढळला. गुजराथी लोकांची बस आल्यावर गुजराथी देखील बोलत असणार. एका दक्षिण भारतीय मित्राचे कुटुंब गेल्या दोन पिढ्या पुण्यात राहतात. पत्नी पण महाराष्ट्रीयन. मुलांना तर मल्याळी येतच नाही. याच्या मुळ गावी गेल्यावर इतरांना बोलताना बघून येथेच्छ हसतात. गेली कित्येक पिढ्या महाराष्ट्रात राहिलेली मारवाडी कुटुंब तर फक्त त्यांच्या चेहरेपट्टी मुळे मराठी नाही हे लक्षात येतं. या जमातीला तर आपली भाषा आणि परंपरा जिवंत राहील का असल्या उठाठेवी सुचत नाही. एवढंच काय परंतु साहित्य आणि कला क्षेत्रात आपला दबदबा नाही असले फालतू प्रश्न पडत नाहीत.

In reply to by सर टोबी

मला आमच्या कंपनीत छान मराठी बोलणारे अनेक दाक्षिणात्य भेटलेत. गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे लोक मराठी शिकतात व बोलतातही असे दिसते. बहुतांशी हिंदी भाषिक लोकांना मात्र मराठी भाषा शिकायची इच्छा नसते. मराठी म्हणजे डाउन मार्केट वगैरे गोष्टी या प्रामुख्याने सधन हिंदी भाषिक लोकांनी पसरवलेले समज आहेत असेच मला वाटते.

In reply to by तर्कवादी

बाकी गैर मराठी जे मुंबई मध्ये राहतात ते मराठी समजतात आणि कित्येक बोलतात पण. अगदी तमिळ,केरळ वाले पण मराठी बोलतात. गुजराती ,मारवाडी हा समाज तर जिथे जाईल तेथील भाषा आत्मसात करतात. अपवाद फक्त देशातील मागास राज्यातील हिंदी भाषिक कोणतीच भाषा शिकत नाहीत .हिंदी ला विरोध असण्याचे हे पण एक मुख्य कारण आहे. ह्या मागास राज्यातील लोक दुसऱ्या राज्य राहतील पण तेथील समाजात कधीच एक जीव होतं नाहीत.

In reply to by Rajesh188

गैरसमज आहे मुंबईत अनेक वर्षे राहणारे भय्ये व्यवस्थित मराठी बोलतात. माझ्या संपर्कात येणारे असे असंख्य भय्ये आहेत. मुळात भय्या लोकांची आवकच इतकी जास्त आहे की तुमच्या संपर्कात येणारे बहुतेक भय्ये उदा. भाजीवाले, मासे विकणारे, दूध वाले किंवा इस्त्री करणारे असे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात जे गेल्या काही वर्षातच इथे आलेले आहेत त्यामुळे त्यांना तेवढे चांगले मराठी येत नाही. जे इथे राहून वरच्या श्रेणीत आले आहेत ते सर्व मराठी बोलू शकतात. घरी गणपती आणतात आणि दही हंडीतही भाग घेतात. पण दुर्दैवाने आपले मराठी लोकच त्यांच्याशी आवर्जून मराठी बोलत नाहीत. बाकी मारवाडी आणि गुजराती मराठी वस्तीत धंदा करत असतील तर मराठी व्यवस्थित शिकून घेतात. तेच जर पश्चिम उपनगराच्या पश्चिम भागात राहत असतात तेंव्हा मात्र मराठी शिकत नाहीत कारण तेथे असलेले मराठी बांधव सुद्धा मराठीत बोलणे डाऊन मार्केट समजतात. चेन्नईला गेलात तर बरीच दागिन्यांची दुकाने मारवाडी लोकांची आहेत ते अस्खलीत तामिळ बोलतात. तेथे असलेली हार वेअर ची दुकाने शुद्धबीओहरी समाजाची आहेत ते सुद्धा अस्खलीत तामिळ बोलतात. शेवटी धंदा महत्त्वाचा. अस्मिता वगैरे भरल्या पोटाचे चोचले आहेत.

हे 100% सत्य आहे स्वतःच्या भाषेचा,स्वतःच्या खाण्याच्या सवयीचा,स्वतःच्या परंपरेचा . किती लोक टिफीन मध्ये ज्वारी ची भाकरी घेवून जातात जी ज्वारीची भाकरी मराठी माणसाच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. एकदा मी आणि माझा मुस्लिम (आणि परप्रांतीय सुद्धा) मित्र cuffparade वरून शेअर टॅक्सी टॅक्सी नी सीएसटी ला जात होतो.आम्ही दोघे आणि दुसरे pure मराठी दोघे टॅक्सी मध्ये होतो. तो परप्रांतीय आणि मुस्लिम असून सुद्धा आम्ही पूर्ण मराठी मध्ये संवाद साधत होतो आणि ते दोन pure मराठी आपसात हिंदी मध्ये बोलत होतो. शेवटी मीच त्यांना टोकल मराठी असून हिंदू मध्ये बोलत आहात लाज वाटते काय स्वतःच्या भाषेची.

In reply to by Rajesh188

जी ज्वारीची भाकरी मराठी माणसाच्या आहारातील महत्वाचा भाग आहे.
असं काही नाहीये. महाराष्ट्रातदेखील विविध ठिकाणचा पारंपारिक आहार भिन्न आहे. सरसकटीकरण करु नये. कोकणात ज्वारीची भाकरी किती खातात ते बघा. तसेच भाकरी डब्यात नेण्यास तितकीशी सोयीस्कर नसते हा मुद्दाही आहे.

मीच त्यांना टोकल वा!! टोका टोका, अगदी काट्याची टक्कर झाली तरी चालेल पण अशा लोकांना टोकलच पाहिजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

असे एक वाक्य कानावरून गेले आहे. ते उद्गगार आजतागायत डोक्यात बसले आहे. हे वाक्य मराठी आहे का इंग्रजी हे मला आजतागायत लक्षात आले नाही.

In reply to by वामन देशमुख

मदरटंग मधुन जितके चांगले एक्स्प्रेस होता येते तितके ऑदर लँग्वेजेस मधुन जमत नाही . . यु नो... मराठी इज द बेस्ट.....

In reply to by सुक्या

पु. लं. चं पूर्वरंग मधील वाक्य... देशी लोक सहा महिन्यांसाठी साहेबाच्या देशात जातात आणि आल्यानन्तर मराठी वर्ड रिमेम्बर करायला त्यांना डीफिकल्ट जातं ☺️

In reply to by बबन ताम्बे

अगदी अगदी. मी एकदा माझ्या मुलीला खाली घेऊन गेलो होतो सायकल चालवायला तेव्हा कोणीतरी एक भेटले खाली. आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. त्यांच्याकडची लहान मुलगी माझ्या मुलीची सायकल ढकलायला लागली तेव्हा तिची आई तिला म्हणाली, ए असं नको करू.ते बेबी फॉल होईल ना सायकलवरून. चल आपण त्या गार्डन मध्ये जाऊन प्ले करू ! :D

In reply to by नचिकेत जवखेडकर

तरी खरा आहे.पुरुषानं पेक्षा स्त्रिया ना मॉडर्न वागण्याची भारी हौस असते.(मॉडर्न चे त्यांचे विचार पण दिव्य असतात.टीव्ही,सिनेमे सांगतात ते मॉडर्न) अगदी खेड्यातील मुलगी लग्न होवून अमेरिका,मुंबई मध्ये आली की सहा महिन्यात नाकात बोलायला सुरुवात करते .कपडे पण लगेच बदलून जातात.खेड्यातील पुरुषाने पूर्ण आयुष्य अमेरिका,मुंबई मध्ये काढले तरी तो बोलणार गावठी भाषा च भला कोणत्या कंपनीत सीईओ असला तरी.

ठराव पारीत होणे मसुदा/ठराव मंजूर होणे संकेत मिळणे. लक्षणं दिसणे पाणी फेरणे. पाणी पडणे आजच्या तारखेला. आज घडीला उजवीकडील शब्द प्रयोग माहिती असल्यास आपण वृद्ध आहात हे ओळखून वागावे.

स्थानिक भाषा न शिकण्याचे कारण म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रांतात हिंदी बोलली जाते आणि हिंदी भाषिक नसऱ्यांना देखिल ती समजते हे असावे. त्यात स्वतःला वरचढ समजणे असा उद्देश नसावा. माझ्या हिंदी मित्रांची मुलं जी महाराष्ट्रातच लहानची मोठी होत आहेत ती तर व्यवस्थित हेल काढून मराठी बोलतात.

In reply to by सर टोबी

मराठी हिंदी लिपी एक असल्याने आपण शाळेत दुसरी तिसरी भाषा हिंदी ( किंवा संस्कृत) घेतो , म्हणून हिंदी आपल्याला चटकन येते, शाळेत पाचवीला हिंदी सुरू होण्यापूर्वीच आपल्याला हिंदी येते. साऊथवाले , बंगाली इ इ ना देवनागरी लिपीच नवीन असल्याने हिंदी आणि मराठी तितक्याच दूर वाटतात

In reply to by mangya69

बोलण्यासाठी लिपी लागत नाही.एकदा व्यक्ती परकीय भाषा बोलत असेल म्हणून त्याला ती लिहिता ,वाचता येते असे काही नाही. ज्या प्रदेशात राहतो तेथील भाषा शिकण्याची इच्छा असणे महत्वाचे आहे.आणि हिंदी भाषिक लोकात ती नाही. त्यांची सर्वात मोठी गैर समजूत आहे हिंदी राष्ट्र भाषा आहे आणि बाकी भाषिक लोकांचं कर्तव्यच आहेत त्यांनी ती शिकावी. काही दिवस पूर्वीच तमिळ nadu मध्ये. त्या वरून मोठा गोंधळ झाला होता. आणि मराठी लोकांनी पण हिंदी राष्ट्र भाषा आहे हे खूळ डोक्यात ठेवले आहे.

In reply to by Rajesh188

कॉलेज , करियर , इंटरव्ह्यू इथे इंग्रजी चालते , रादर इंग्रजीच चालते मग बोलले कुणी हिंदीत आपल्याशी तर लगेच आपण फुत्कार का काढायचा म्हणे ?

In reply to by mangya69

राजेशाचा राग हिंदीवर नसुन हिंदी भाषिकांवर असावा. पुढच्या खेपेस त्याचा आवडीचा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर आला तर तो "हिंदी बोलण्यात गैर काय ?" असे येथेच विचारेल.

In reply to by mangya69

मग बोलले कुणी हिंदीत आपल्याशी तर लगेच आपण फुत्कार का काढायचा म्हणे ? मंग्या हा कसला तर्क आहे ? भारतात ४ विविध भाषिक लोक एकत्र गप्पा मारत असतील तर त्यातील २ मराठी लोक्कानी मराठी बोलवे असे कोणी म्हणत नाहीये ( ते शिष्टचाराला धरून होणार नाही ) परंतु २ मराठी माणसांनी खाजगीत एकमेकात कारण नसताना इतर भाषेत बोलण्याचे कारण काय? स्थानिक भाषा हि शिकली पाहिजे यात शंका नाही , प्रयत्न करणे तरी महत्वाचे आहे ४० वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी ना बोलणारे लोक आहेत .. लाज वाटत नाही त्यांना .. ! आणि मराठी माणसाला देवनागरी मुले हिंदी जवळची वाटते हे जरी नैसर्गिक असले तरी मराठी चे खच्चीकरण करून हिदि स्वीकारणे हा मूर्खपणा आहे

In reply to by mangya69

मग बोलले कुणी हिंदीत आपल्याशी तर लगेच आपण फुत्कार का काढायचा म्हणे ? मंग्या हा कसला तर्क आहे ? भारतात ४ विविध भाषिक लोक एकत्र गप्पा मारत असतील तर त्यातील २ मराठी लोक्कानी मराठी बोलवे असे कोणी म्हणत नाहीये ( ते शिष्टचाराला धरून होणार नाही ) परंतु २ मराठी माणसांनी खाजगीत एकमेकात कारण नसताना इतर भाषेत बोलण्याचे कारण काय? स्थानिक भाषा हि शिकली पाहिजे यात शंका नाही , प्रयत्न करणे तरी महत्वाचे आहे ४० वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी ना बोलणारे लोक आहेत .. लाज वाटत नाही त्यांना .. ! आणि मराठी माणसाला देवनागरी मुले हिंदी जवळची वाटते हे जरी नैसर्गिक असले तरी मराठी चे खच्चीकरण करून हिदि स्वीकारणे हा मूर्खपणा आहे

In reply to by चौकस२१२

मला 3 भाषा येतात , त्यालाही 3 येतात , आता त्यांनी कोणत्या भाषेत बोलायचे हे ते ठरवतील. शाळा मराठी मीडियमची असूनही इंग्रजी शाळेत 6 तास मुले शिकतात , तेंव्हा मराठीचे खच्चीकरण होत नाही का ?

In reply to by mangya69

भारतीय सर्व भाषा जरी बोलता येत असतील तरी समोरच्याला आणि आपल्याला इंग्रजी बोलता येत असेल तर प्रदेश कोणताही असो कोणाच्याच अस्मिता दुखावल्या जात नाहीत, परंतु त्या प्रदेशातील भाषेऐवजी अन्य भारतीय भाषेत बोलले तर लगेच अस्मिता जागृत होते.

मुळात परशुराम , शिवाजी महाराज , 1 मे , 15 ऑगस्ट , 26 जानेवारी इ सोडले तर उर्वरित सणामागे घटनांचा आणि महाराष्ट्राचा काडीमात्र संबंध नव्हता, मग त्यातील परंपरा आपल्या खऱ्या की यूपीबिहारवाल्यांच्या खऱ्या ?

तसाच मंग्या ६९ ची थाप आहे. १) बेंदुर. २) विविध गावातील यात्रा. ३) वट पौर्णिमा. ४) विजया दशमी हा महाराष्ट्र मध्ये जसा साजरा होतो त्याच आणि यूपी,बिहार चा काहीच संबंध नाही ५) दिवाळी महाराष्ट्रात जशी साजरी होती त्याच्याशी यूपी ,बिहार चा काडी चा संबंध नाही १५aug आणि २६ जानेवारी हे सण नाहीत. ६) आषाढी वारी महाराष्ट्र च आहे.यूपी बिहार चा काडी चा संबंध नाही. सार्वजनिक गणेश ustav ह्याचें उगम स्थान च महाराष्ट्र आहे. यूपी,बिहार आणि महाराष्ट्र ह्यांची संस्कृती कुठेच एक नाही . तसे त्यांचे ustav पण एक नाहीत. फक्त राम नवमी ,गोकुळ अष्टमी हे त्यांचेच सण आहेत महाराष्ट्र नी उगाचच स्वीकारले आहेत.

In reply to by mangya69

त्यांचे उगम मक्का मदिना किंवा त्याच्या आजू बाजू च्या प्रदेशात आहे .रिती परंपरा पण त्याच प्रदेशात उगम पावल्या आहेत.तरी भारतीय मुस्लिम ते सर्व पळतात ना. सर्वांची पद्धत एकसारखी असते का? प्रदेश नुसार काहीतर फरक होत गेलाच असेल. तसेच हिंदू धर्माचे आहे. भारतीय मुस्लिम लोकांना भारताचा अभिमान असतो को दुसऱ्या मुस्लिम देशांचा.? तसेच आहे महाराष्ट्र तील सन ,रीतिरिवाज ह्यांचा बाकी राज्याशी संबंध असला तरी आम्हाला मराठी पद्धतीचा अभिमान आहे.

आजचा एक किस्सा. एका मुस्लिम भागात काहीतरी घ्यायला थांबलो होतो. तर तिकडे एक मुस्लिम बाई कोळंबी विकत होती. तिच्याशी एक बुरखावाली बाई उर्दू मिश्रित हिंदीत बोलत होती. मी नेहमीप्रमाणे मराठीत तिला विचारलं कशी दिली कोळंबी. मग ती विकणारी बाई माझ्याशी मराठीत बोलायला लागली. तिचं मराठी ऐकून ती बुरखा वाली बाई पण तिच्याशी मराठीत बोलू लागली. ते पण अगदी चांगलं मराठी. माझ्यामुळे त्यांना शोध लागला एकमेकींना चांगलं मराठी येतं ते.

आजकाल सगळे लोक धान्य निवडलेलेच आणतात , पीठ तयार विकत आणतात. घरात चाळण मिळणे मुश्किल आहे. खिसणी किंवा गाळणे वापरावे लागेल

आता ही मराठी नटी पहिला करवाँ चौथ साजरा करणार म्हणे ! अश्या परप्रांतीयांशी लग्न करणार्‍या मराठी नट्या म्हणजे वेगळेच प्रकरण आहे ! सोमि त्यांच्या बारिकसारीक गोष्टींना प्रसिद्धी देत त्या-त्या संस्कृतीचा उदोउदो करतात !

In reply to by चौथा कोनाडा

आता परप्रांतियाशी लग्न केलंय तर त्या त्या प्रथा पण पाळणार. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही. आणि उलटंही होत असेलच ना. कुणी सांगावं तिचा नवरा गुढी उभारेल. पुर्वी एकदा एका मराठी मित्राच्या घरी त्याची एक मैत्रीण भेटली, ती बर्‍यापैकी छान मराठी बोलत होती पण तरी नंतर म्हणाली की "मी मराठी अजून शिकतच आहे त्यामुळे फारसं चांगलं येत नाही" मग माझ्या मित्राने सांगितलं की तिचं एका मराठी सहकर्‍यासोबत प्रेम जुळलं आणि त्या मुलाच्या आईने लग्नाला अनुमती देताना अट घातली की तिला मराठी शिकावं लागेल आणि त्यामुळे ती मराठी शिकली. प्रेमाखातर हे सगळं चालायचंच...

गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे लोक मराठी शिकतात व बोलतातही असे दिसते. बहुतांशी हिंदी भाषिक लोकांना मात्र मराठी भाषा शिकायची इच्छा नसते.
त्या त्रिभाषासूत्राला काडी लावायला हवी पहिले, म्हणजे मराठी, गुजराती, बंगाली, तामिळी, तेलगू लोकांनी इंग्रजी, मातृभाषा अन हिंदी अश्या तीन भाषा शिकायच्या शाळेत अन हिंदी गायपट्टा निवासी मात्र इंग्रजी अन हिंदीच शिकणार ! हे व्यस्त प्रकरण वाटते, कुठल्याही बिगरहिंदीभाषिक राज्यात रोजगाराच्या निमित्ताने जाणे असेल तर ती भाषा ह्या भय्या लोकांनी शिकायला हवीच, पर्यटक, यात्रेकरू वगैरेंना त्यासाठी ताणून धरण्यात अर्थ नाही. हिंदी लोक अवास्तव रिजिड असतात "ऐसे थोडे ही होता हैं यार" म्हणत जिथं तिथं स्वतःच्या परंपरा चालीरीती सगळं घुसडणार हे अन वरतून लोकांना अकला शिकवणार गावभरच्या. म्हणजे ह्यांना पोसून वरतून ह्यांचे ऐकून घ्या.

In reply to by जेम्स वांड

तिसरी भाषा का हवी हे कळायचे असेल तर हिंदी भाषिकांना तमिळनाडूत आणि तमिळ भाषिकांना उत्तरेत जो त्रास होतो त्याबद्दल विचार करावा. आपल्याला देशाची भाषा इंग्लिश व्हावी असे वाटले तरी ते शक्य नाही. समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही. आणि त्यांना एकमेकांशी बोलायचे (उदाहरणार्थ सैन्यात किंवा कामधंदे, नोकरी इत्यादी वेळी) तर एक कॉमन भाषा आवश्यक आहे. मग ती हिंदी ऐवजी दुसरी कुठली केली (उदाहरणार्थ संस्कृत अथवा उर्दू) तरी चालेल, पण एक भाषा हवी. तुम्ही फक्त महाराष्ट्राबद्दल बोलताय. भारताची बरीच लोकसंख्या दुसऱ्या राज्यात तात्पुरत्या प्रकारे रहाते. तिच्या कामकाजासाठी अशी तिसरी कॉमन भाषा आवश्यक आहे कारण लोकल भाषा शिकणे हे जर तुम्ही बऱ्याच वर्षांसाठी रहात असाल तरच शक्य होते. शिवाय राज्यांनी एकमेकांशी बोलायचे तर एक कॉमन भाषा हवी. ती इंग्लिश हवी असा हट्ट तुम्ही धरत असाल तर एका मोठ्या लोकसंख्येला सिव्हिल सर्व्हिसेस मधून वगळावे लागेल.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

मग ती हिंदी ऐवजी दुसरी कुठली केली (उदाहरणार्थ संस्कृत अथवा उर्दू) तरी चालेल, पण एक भाषा हवी
तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे की,समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही (ते लॉजिक योग्य आहे का अयोग्य त्यावर पुढे) तेच लॉजिक संस्कृत अथवा उर्दू, किंवा कोण्त्याही इतर भाषेसाठी पण तितकेच लागू आहे. उलट इंग्लिशच्या बाबत मात्र ते तितकेसे सार्थ ठरत नाही. अमेरिकेपाठोपाठ जगात इंग्लिश बोलणारे लोक भारतात सगळ्यात जास्त आहे. द्विभाषा, त्रिभाषा सुत्रामुळे इंग्लिश सगळीकडे पोचली आहे. वाढत्या शैक्षणिकरणामुळे आणखीन प्रसार होतोय. सरकारात, व्यवसायात, सामान्यांच्या दैनंदिन जीवनात इंग्लिशचा सढळहस्ते वापर होतो. इंग्लिश शिकण्यासाठी, तिचा वापर वाढण्यासाठी भरपुर साधने सहज उपलब्ध आहेत. जगात आपली इंग्लिश प्रोफेशिएन्सी पण चांगली आहे. मग इतक्या जमेच्या बाजू असताना, इंग्लिश का नको?

In reply to by अनन्त अवधुत

संगणकाची भाषा हि अजून तरी ( आणि येत्या काळात पण तशीच असण्याची शक्यता आहे) इंग्रजीच आहे. तेंव्हा इंग्रजी नको चा दुराग्रह आपल्याला खड्ड्यात टाकेल यात शंका नाही. इंग्रजीच्या बरोबर आपली मातृभाषा कशी वाढवता येईल याचा विचार करावा. मी तर उलट म्हणेन कि जेथे जाल तेथील स्थानिक भाषा नक्कीच शिकून घ्या. त्याचा खूप फायदा होतो. जिथे तिथे अगतिक व्हायला होणार नाही. उदा आपण जर आखातात नोकरीसाठी जाणार असाल तर अरबी भाषा जरुर शिकून घ्या.

In reply to by अनन्त अवधुत

तुमचे मुद्दे बरोबर आहेत. पण दिलेल्या लिंकवरील विदा विश्वासार्ह वाटत नाही. खासकरुन चीन , जापानमधली इंग्लिश प्रोफिशियन्सीचे आकडे खूप जास्त लिहिले आहेत (५१% च्या आसपास). माझ्या मते तरी या दोन्ही देशांतील खूप कमी लोकांना इंग्लिश भाषा येते.

In reply to by तर्कवादी

तसेच सिंगापूरची टक्केवारी (६३%) ही कमी वाटते. सिंगापूरमध्ये इंग्लिश हीच मुख्य भाषा आहे

In reply to by तर्कवादी

तुमचे मुद्दे बरोबर आहेत.
धन्यवाद!
पण दिलेल्या लिंकवरील विदा विश्वासार्ह वाटत नाही
मी दिलेला दुवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आहे. विदा पण त्यांचाच आहे. इंग्लिश ही प्राथमिक भाषा नसलेल्या देशांबद्दल ती माहिती आहे. तुम्हाला तो विदा विश्वासार्ह वाटत नसेल तर ठीक आहे, काही जबरदस्ती नाही. तुमच्याकडे अयोग्य वाटणार्‍या माहितीबद्दल ( उदा. चीन, जपान, सिंगापूरची टक्केवारी) विरोधी विदा असेल तर शेअर करा.

In reply to by अनन्त अवधुत

तुमच्याकडे अयोग्य वाटणार्‍या माहितीबद्दल ( उदा. चीन, जपान, सिंगापूरची टक्केवारी) विरोधी विदा असेल तर शेअर करा.
विदा मी शोधला नाही पण गेली अनेक वर्षे मी जपानकरिताचे प्रोजेक्ट मॅनेज करत होतो. माझ्या टीममधले अनेकजण कमी अधिक काळ जपानमध्ये राहून आलेत त्यांच्या अनुभवानुसार मोठ्या वाहनकंपनीत काम करणार्‍या सुशिक्षित नोकरदारांनाही इंग्लिश फारशी येत नाही. माझ्या सहकार्‍यांना बँक व इतर ठिकाणी जपानी भाषा येत नसल्याने त्यांना अनेक अडचणी येतात. माझाही मिटींग्जमध्ये असाच अनुभव . क्लायंटकडील खूप कमी लोकांना इंग्लिश येते. त्यातही अनेकांचे इंग्लिश तोडके मोडके काम चलाऊ असते. अनेकजण तर इंग्लिशमधून इमेल पाठवताना नक्कीच बेधडकपणे गुगल ट्रान्सलेटर वापरत असावेत असे जाणवते यामुळेच ५०% जपान्यांना इंग्लिश येते यावर विश्वास बसत नाही... तर याउलट सिंगापूरबद्दल मी वाचले आहे (आता सगळा तपशील आठवत नाही) की तिथल्या एका अध्यक्षाने - जो खूप काळ तिथला अध्यक्ष होता आणि सिंगापूरच्या प्रगतीचा जनक मानला जातो त्याने विविधभाषी असलेल्या या देशात इंग्लिश हीच प्रमुख व्यवहाराची भाषा असावी म्हणून खूप आग्रह धरला, कायदे केलेत त्यामुळेच तिथे फक्त ६३% लोकांना इंग्लिश येत असेल हे फारसे पटत नाही.

In reply to by तर्कवादी

यामुळेच ५०% जपान्यांना इंग्लिश येते यावर विश्वास बसत नाही...
तो विदा किती टक्के जनतेला इंग्लिश येते असा नसून इंग्लिश बोलणार्‍या जनतेची प्रोफेशिएन्सी किती आहे त्याचा आहे. थोडी शोधाशोध केली असता त्यांची परिक्षा घेण्याची पद्धत वगैरे तपशिल मिळाले.

In reply to by अनन्त अवधुत

तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे की,समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही (ते लॉजिक योग्य आहे का अयोग्य त्यावर पुढे) तेच लॉजिक संस्कृत अथवा उर्दू, किंवा कोण्त्याही इतर भाषेसाठी पण तितकेच लागू आहे.
जेव्हा दोन भिन्नभाषी व्यक्ती एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करतात, तेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपले एकमेकांना समजत नाही तेव्हा त्या एक कॉमन भाषा शोधायचा प्रयत्न करतात. सध्या इंग्रजी आणि हिंदी हे दोन ऑप्शन आहेत. इंग्लिश शहरामध्ये बहुतांशी प्रमाणात चालते, पण जर तुम्हाला ओरिसा मध्ये रिक्षा पकडायची असेल किंवा पंजाब मध्ये सामान्य दुकानात सामान खरेदी करायचे असेल तर तुम्ही कोणती भाषा वापराल? मी हेच सांगतोय की हिंदी वगळता दुसरी कुठलीच भाषा (भारतीय वा अभारतीय) त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही आणि कदाचित उतरणार ही नाही. उतरणार असेल तर तुम्ही अशी भाषा सांगा. इंग्लिश जेमतेम 10% भारतीयांना (त्यातही बहुतांशी जणांना अतिशय जुजबी स्वरूपात) येत असेल. थोडक्यात सांगायचे तर अशा भाषेचा शोध घेताना आपल्याकडे हिंदी शिवाय दुसरा पर्याय नाही.
उलट इंग्लिशच्या बाबत मात्र ते तितकेसे सार्थ ठरत नाही. अमेरिकेपाठोपाठ जगात इंग्लिश बोलणारे लोक भारतात सगळ्यात जास्त आहे. द्विभाषा, त्रिभाषा सुत्रामुळे इंग्लिश सगळीकडे पोचली आहे. वाढत्या शैक्षणिकरणामुळे आणखीन प्रसार होतोय.
लोक जास्त आहेत हे खरे, पण त्याचे कारण लोकसंख्या जास्त आहे. पण जेव्हा आपण % मध्ये बोलतो तेव्हा त्यात फरक पडतो. शिवाय आपण इंग्लिश ही ज्ञानभाषा म्हणून मान्य केलीच आहे, पण याचा अर्थ ती सामान्य व्यवहाराची भाषा होईलच असे नव्हे. उलट हिंदी चा प्रसार हा त्या मानाने समाजाच्या फार खालच्या थरात फार झपाट्याने होतो आहे. जगात आपली इंग्लिश प्रोफेशिएन्सी पण चांगली आहे.
मग इतक्या जमेच्या बाजू असताना, इंग्लिश का नको?
इंग्लिश नको असे कुणीच म्हटलेले नाही. पण तुम्ही theoretical मुद्दे मांडताय आणि मी प्रॅक्टिकल. ता.क. "हिंदी नको" चे मुद्दे काय आहेत? 1. एक भाषा जास्त शिकावी लागते - ही वाईट गोष्ट आहे का? तसंही आपण हिंदी चित्रपट पाहतोच. त्यावर का आक्षेप नाही मग? आणि असं अर्ग्युमेंट करणारे किती जण तो हिंदी भाषेत आहे म्हणून तो पहात नाहीत? 2. हिंदी भाषी aggressive आहेत? मराठी भाषिकांची इमेज बाकी भारतात काय आहे याची कल्पना आहे का? आपण खरोखरच तसे आहोत का? आणि जर ते aggressive असतील तर मराठी लोकांना काउंटर aggressive व्हायला कुणी अडवलंय? की भाषा बदलली की अचानक लोकांचा स्वभाव बदलतो?

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

माझ्या मते इथे कुणाचा विरोध हिंदीला नसावा. मी मराठी असलो तरी इतर राज्यात खासकरुन उतरकडील राज्ये, गुजरात, गोवा ई ठिकाणी गेल्यावर हिंदीत बोलायला माझी काहीच ना नाही. पण महाराष्ट्रात मला पदोपदी हिंदी बोलावं लागत असेल कारण काही आडमुठे हिंदी भाषिक व्यावसायिक मराठी शिकण्यास उत्सुक नाहीत म्हणून तर त्याबद्दल अशा हिंदी भाषकांना माझा विरोध आहे. बाकी तामिळनाडूत अगदी चेन्नई या राजधानीच्या शहरातही हिंदी व्यवहाराची भाषा म्हणून बर्‍यापैकी निरुपयोगी ठरते ही गोष्ट वेगळी. या निमित्ताने मला माझ्या पहिल्या नोकरीतील (स्थळ - पिंपरी, पुणे) पहिल्या मॅनेजरची आठवण झाली. साठी जवळ आलेले हे तामिळ गृहस्थ होते. कंपनीत अधिकारी वर्गात औपचारिक भाषा जरी इंग्लिश असली तरी अनेकदा अनौपचारिक संभाषण मराठी , हिंदीत होत असते. पण या मॅनेजरचा हिंदीला पुर्ण विरोध. कुणी चुकून जरी एखादं वाक्य त्यांच्याशी हिंदीत बोलला तर ते त्यांच्या नेहमीच्या फटकळपणाने ऐकवायचे " you speak in English or Tamil or you can speak in Marathi. I understand only English & Tamil. But I will learn Marathi for you". त्यांना मराठी कितपत यायचं माहित नाही पण छोटी छोटी आणि ठराविक मराठी वाक्य ते अनेकदा बोलायचे.

In reply to by तर्कवादी

काही आडमुठे हिंदी भाषिक व्यावसायिक मराठी शिकण्यास उत्सुक नाहीत पुण्या मुंबईतील भरपूर मराठी लोकं व्यवसायिकांबरोबर हिंदीतच बोलत असतात. मारवाडी लोकांना थोडी का असेना मराठी येतच असते परंतु आपले मराठी ग्राहक मात्र बऱ्याचदा हिंदीतच बोलत असतात. आर्थिक कारणासाठी का असेना हिंदी व्यावसायिक मराठी नक्कीच शिकतील पण त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर बोलताना मराठीत किमान सुरवात तरी केली पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

आर्थिक कारणासाठी का असेना हिंदी व्यावसायिक मराठी नक्कीच शिकतील पण त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर बोलताना मराठीत किमान सुरवात तरी केली पाहिजे.
पुर्ण सहमत. मी दुकानांत, उपहारगृहात आवर्जुन मराठीच बोलतो.. समोरचा हिंदीत बोलत असेल तरी मी मराठीतच बोलतो.. अगदीच त्याला अजिबातच कळत नसेल तरच मग हिंदी. ..नुकताच कुणी स्थलांतरित होवून आला असेल तर त्याच्याकरिता सहकार्याची भावना असावी. पण अनेकदा समोरचा दुकानदार हा काही पहिल्या पिढीतला स्थलांतरित नसतो .. तो इथेच जन्मला, वाढलेला असतो पण तरी त्याला मराठी येत असूनही बोलण्याची इच्छा नाही हे अगदी स्पष्टपणे जाणवते. अशा वेळी तर मी अजिबात हिंदी बोलत नाही. आपण समोरच्याला हिंदीकरिता कम्फर्ट झोन निर्माण करुन दिला तर तो मराठी का शिकेल ? मला वाटतं तामिळींचा हिंदीला विरोधा याकरिताही असावा. जर ते हिंदी बोलू लागलेत तर समोरचा व्यावसायिक आणि कदाचित त्याच्या पुढच्या पिढ्याही तामिळ शिकणार नाही अशी कदाचित त्यांना भिती वाटत असेल

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

एक भाषा जास्त शिकावी लागते - ही वाईट गोष्ट आहे का?
विरोध शिकावी लागते ह्याला आहे. का त्या ओरिया, पंजाबी, गुजराती, मराठी, कानडी, बंगाली, केरळी, तमिळ, पूर्वोत्तरातल्या माणसाने हिंदी शिकावी? आयुष्यात कोणितरी अहिंदी भाषक भेटेल आणि आपण त्यांच्यासोबत बोलु शकू म्हणून? हिंदी हि अहिंदी भाषकांची ज्ञानभाषा नाही. ती त्यांची दैनंदिन व्यवहाराची पण भाषा नाही. भारतीय अहिंदी भाषकांना पोटापाण्यासाठी (व्यावसायिक कारणासाठी म्हणा हवे तर) इंग्लिश जवळची वाटते, नेमक्या त्याच कारणासाठी हिंदी भाषकांना पण इंग्लिशच जवळची वाटते. मग तसे असताना, हिंदी शिकायची जबरदस्ती का म्हणून?
मी हेच सांगतोय की हिंदी वगळता दुसरी कुठलीच भाषा (भारतीय वा अभारतीय) त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही आणि कदाचित उतरणार ही नाही. उतरणार असेल तर तुम्ही अशी भाषा सांगा.
त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही कारण आपल्याकडे असलेली बहुसंख्य हिंदी जनता, हिंदी, मराठी, डोगरी, आणि इतर अनेक भाषांनी स्वीकारलेली समान देवनागरी लिपी आणि महत्वाचे म्हणजे केंद्र व बहुसंख्य असलेल्या हिंदी राज्यांचा इंग्लिशेतर अहिंदी भाषांविषयी उदासीन दृष्टिकोण. उदा. ही मध्यप्रदेशातल्या इंदुर स्टेशनची पाटीIndore station ही तिकडच्याच राणी कमलापती स्टेशनची पाटी Kamalapatee Station हे झारखंडची राजधानी रांचीचे स्टेशन Raanchi आता ही अहिंदी भाषक राज्यातली स्थानके पहा: साईनगर, महाराष्ट्र Sainagar बोईसर, महाराष्ट्र Boisar कुट्टीपुरम् , केरळ Kuttipuram चंदीगड, पंजाबChandigarh बाघा जतीन, बंगाल Bengal धारवाड, कर्नाटक Dharvaad चेन्नई, तामिळनाडु Chennai Central सगळ्या पाट्यांवर इंग्लिश नावे आहेत. अहिंदी राज्यात हिंदी भाषेत पण नावे आहेत. हिंदी भाषिक राज्यांकडे तसे नाही. हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहिले कि झाले. उ.प्र., बिहार हे अपवाद. उ.प्र., बिहार मध्ये हिंदी आणि उर्दू ह्या राज्यभाषा आहेत त्यामुळे बर्‍याच ठिकाणी हिंदी, इंग्लिश सोबत उर्दू पण पाटीवर दिसते. पाटीवर आहे, पण शाळेत उर्दू तृतीय भाषा म्हणून शिकवल्या जाते का याबाबत कल्पना नाही. बरे हे फक्त रेल्वेचे नाही, बँक, पोस्ट ह्या इतर केंद्र सरकारी आस्थापनांचे पण तसेच. ह्या बळजबरीला विरोध आहे. मला वाटते इंग्लिश हि सुद्धा लवकरच सर्वमान्यतेवर उतरेल. नाहीतरी बोलण्यात इंग्लिश शब्द असतातच, नंतर वाक्य येतील. आवड असेल त्याने हिंदी भाषा शिकावी. ती पण तमिळ, मराठी प्रमाणे एक समृद्ध भाषा आहे. पण हिंदीच शिकले पाहिजे, असे नको. त्यामुळे तिसरी भाषा शिकावी का? हो भारतात बोलताना तिसरी भाषा आवश्यक आहे का? कदाचित हो. ती तिसरी भाषा हिंदीच असावी का? नाही.
2. हिंदी भाषी aggressive आहेत? मराठी भाषिकांची इमेज बाकी भारतात काय आहे याची कल्पना आहे का? आपण खरोखरच तसे आहोत का? आणि जर ते aggressive असतील तर मराठी लोकांना काउंटर aggressive व्हायला कुणी अडवलंय? की भाषा बदलली की अचानक लोकांचा स्वभाव बदलतो?
पास. भाषेवरून लोकांचा, अथवा लोकांवरून भाषेचा राग करण्याचे काही कारण नाही.