श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (५)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
16 Sep 2021 - 11:41 am

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१
आधिचे भागः
भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४

सिध्दार्थला बळी राजाच्या बोलण्याचा मतितार्थ कळला आणि हातातील पेटी सावरत एकदाही मागे वळून न पाहाता तो पुढे निघाला.

ओढ्याच्या बाजूने चालताना नकळत सिध्दार्थ सतत पेटीवरील श्लोकाकडे बघत होता. 'कदाचित श्लोक बदलेल आणि पुढील चिरंजीवी आपल्याला या काही मिनिटांच्या प्रवासात भेटेल'; असं त्याला सतत वाटत होतं. पण तसं काही न होता सिध्दार्थ मचाणपर्यंत पोहोचला. मधली बॅरिकेट्स पार करत त्याने परत एकदा मचाणच्या आवारात प्रवेश केला आणि रेस्टॉरंटच्या दिशेने चालायला लागला. समोरूनच हॉटेलचा मॅनेजर येत होता; तो स्वतः पुढे आला आणि त्याने सिध्दार्थला शेक हॅन्ड केलं आणि म्हणाला; "नमस्कार सर, आपली गाडी तयार आहे आणि इथे पार्किंगमध्ये येऊन उभी आहे. गाडीच्या सर्विसिंगचे जे काही पैसे झाले आहेत ते मचाणकडून भरले गेलेले आहेत. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत सर."

सिध्दार्थने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाला; "अरे तुमच्या चुकीने गाडी बंद पडली नव्हती. त्यामुळे तुम्ही त्यासाठी तसदी घेणं योग्य नाही."

पण सिध्दार्थला पुढे बोलू न देता मॅनेजर म्हणाला; "सर, प्लीज! आपल्यासारखे आमचे मोठे कस्टमर इथून जाताना जर काही प्रोब्लेममध्ये आले तर आमचं कर्तव्य बनतं मदत करणं. सर, आपण परत मागे येऊन आम्हाला सांगितलं असतं तर आपल्याला जो त्रास झाला तो झाला नसता. आत्तासुद्धा आपण या आड रस्त्याने चालत आलात; त्याबद्दल देखील आम्ही दिलगीर आहोत."

सिध्दार्थ हसला आणि म्हणाला; "अहो मॅनेजर साहेब; इतक्या फॉरमॅलिटीज ठेवू नका. मला काहीही त्रास झालेला नाही.बस् आत्ता मात्र मस्त भूक लागली आहे. जेवण मिळणार असेल तर ते द्या; म्हणजे मी निघायला मोकळा. या गाडीमुळे माझा कामाचा बराच वेळ वाया गेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला मुंबईला पोहोचणे आवश्यक आहे."

सिध्दार्थचं बोलणं ऐकून मॅनेजरचा जीव भांड्यात पडला. सिध्दार्थने जर काही तक्रार केली तर त्याची नोकरी थेट गेलीच असती याची त्याला कल्पना होती. तो स्वतः सिध्दार्थला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला आणि जेवणाची ऑर्डर दिली. सिध्दार्थ स्थिरस्थावर झाला आहे याची खात्री करून तो मागे वळणार होता इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि परत सिध्दार्थकडे येऊन तो म्हणाला; "सर, आपण एकदा आपल्या घरी आणि मॅडम कृष्णा यांना फोन केलात तर बरं होईल. दोन्ही ठिकाणाहून मला अनेक कॉल्स आले आहेत."

मॅनेजरचं बोलणं ऐकून सिध्दार्थला एकदम लक्षात आलं की त्याने सकाळपासून घरी किंवा कृष्णाला कॉन्टॅक्ट करण्याचा एकदाही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे मॅनेजरला 'मी बोलतो घरी;' असं म्हणून त्याने मोबाईल हातात घेतला. मात्र हॉटेलच्या आत रेंज नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. इतक्यात हॉटेल स्टाफपैकी एकाने लँडलाईन फोन आणून दिला आणि सिद्धर्थने अगोदर घरी फोन लावला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे गोपाळने फोन उचलला. सिध्दार्थने आईसाठी निरोप ठेवला की तो ठीक आहे थोड्याच वेळात घरी येतो आहे. त्यानंतर त्याने कृष्णाला फोन लावला.

"प्लीज न रागावता दोन मिनिटं माझं एक. विषय खूप गहन आहे कृष्णा. तुझ्याशी बोलणं आवश्यक आहे. मी आत्ता मचाणमध्ये जेवतो आहे. इथून बाहेर पडलो की रेंजमध्ये येताच तुला फोन करतो. किमान प्रवासात आपण बोलू. कारण घरी पोहोचून फ्रेश होऊन मला ऑफिसमध्ये जाणं भाग आहे. गेल्या दोन दिवसात मी एका वेगळ्या जगात जगतो आहे; मात्र त्यामुळे मी माझ्या जवाबदरीपासून लांब जातो आहे; हे मला जाणवलं आहे. त्यात आज बाबा माझी वाट बघणार होते; ऑफिस अवर्स नंतर. त्यांना भेटून कामं उरकायची आहेत. मी जे सांगेन त्याचा तू विचार करून ठेव आणि मग रात्री आपण परत बोलू; फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून."

***

सिध्दार्थ गाडी घराच्या खाली पार्क करत असताना फायनली त्याने कृष्णाला बाय म्हंटलं. "रात्री प्रत्यक्ष भेटूच सिध्दार्थ. बाय" असं म्हणून कृष्णाने फोन ठेवला; आणि लिफ्टने वर जाताना सिध्दार्थच्या मनात ऑफिसमधले विचार यायला लागले.

***

'हे अचानक येणारे अनुभव सिध्दार्थच्याच आयुष्यात का असावेत?' कृष्णा विचार करत होती. तिला सिध्दार्थचा स्वभाव माहीत होता. तो अत्यंत भावुक असूनही प्रॅक्टिकल निर्णय घेताना स्थिर मनाचा होता. पुरुषी ईगो नव्हता त्याला. श्रीमंत घरातला.... अत्यंत लाडात वाढलेला होता तरीही डोक्यात हवा गेलेला नव्हता. अत्यंत एक्सप्रेसिव्ह सिध्दार्थ प्रेमळ, समजूतदार होता. अनेकदा तर कृष्णाने त्याला म्हंटलं होतं की तू सतत receiving end ला का राहातोस सिध्दार्थ? त्यावरचं त्याचं उत्तर ऐकून ती एकदमच शांत झाली होती.

तो म्हणाला होता; "Sweetheart, receiving end is a huge term. But if you really want to say so; let me tell you something... when we are at receiving end that means opposite person is either angry on us or is frustrated. Not on us or because of us... but still there is not a conversation; but explosion of feelings. अशा प्रत्येक वेळी मी स्वतःला विचारतो... समोरची व्यक्ती जो राग व्यक्त करते आहे तो माझ्यामुळे आहे का? माझी यात काही चूक आहे का? जर उत्तर 'नाही' आलं तर मग मी केवळ कान उघडे ठेवतो; मन नाही. पण जर माझी चूक असेल तर ऐकून घेऊन परत असं होणार नाही असा प्रयत्न करण्याचं वचन देतो; स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला. यामुळे relationship hurt होत नाही; आणि solution मिळतं. अर्थात मी इतका समजूतदार कायम नसतोच. राग येणं, चुका होणं आणि कधी कधी या चुका कोणालाही कळू नयेत असं वाटणं; कधी त्या लपवण्याचा प्रयत्न करणं हे सगळं मी देखी करतोच. पण in larger aspect emotional expression some times is releasing negativity from mind and heart; असं मला वाटतं.... म्हणून as you said... I am at receiving end at times.

तो असं बोलायला लागला की त्याचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. त्याचं हे असं समजूतदार असणं कदाचित त्याला हे अनुभव देतं आहे का?' कृष्णा स्वतःचाच तंद्रीत होती.

'बिभीषण, कृपाचार्य आणि बळी राजा.... तीन चिरंजीव भेटले सिध्दार्थला. म्हणजे अजून चार बाकी आहेत. सिध्दार्थचं आयुष्य वेगळं वळण घेणार आहे; असं तर नाही न? पण जे तिघे भेटले त्यांनी त्यांच्या मनातील व्यथा सांगताना; किंवा आजच्या काळातील अत्यंत चुकीच्या परिस्थितीबद्दलचं त्यांचं मत सांगताना कुठेही सर्वसंगपरित्याग करून साधुत्व स्वीकारून निघून जाऊन तपश्चर्या करावी असं म्हंटलेलं नाही. मात्र कालौघात सामाजिक मानसिकतेत झालेले बदल आणि त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा irrelevance emphasis केला आहे. पण असं कसं होऊ शकतं?' कृष्णाच्या मनातल्या विचारांचं आवर्तन थांबत नव्हतं. सिध्दार्थला भेटून त्याच्याशी बोलल्याशिवाय मन स्वस्थ होणार नाही हे तिच्या लक्षात आलं आणि हातातली कामं झटपट उरकून साधारण नऊच्या सुमारास ती सिध्दार्थच्या घरी पोहोचली.

"बरं झालं तू आलीस ते." तिला बघताच सिध्दार्थची आई वैदेही म्हणाली आणि तिचा हात धरून तिला सोफ्याच्या दिशेने घेऊन गेली.

"तो नुकताच आला आहे; फ्रेश होतो आहे. तुला घेऊन बाहेर जाण्याच्या विचार होता त्याचा. पण मीच नको म्हंटलं. कृष्णा, तो एका जगावेगळ्या अनुभवातून जातो आहे; याची त्याने मला कल्पना दिली आहे. दुपारी घरी आला आणि ऑफिसमध्ये जायला निघाला तेवढ्या वेळात मला घरी बोलावून घेऊन बोलला आहे तो. म्हणूनच मी त्याला म्हंटलं की कुठेही बाहेर जाऊ नकोस. त्याचं मन स्थिर नाही सध्या... अशावेळी उगाच ड्राईव्ह करणं योग्य नाही. तुम्ही दोघे गच्चीवर जाऊन बसा... मी जेवण तिथेच पाठवते. थोडं मोकळं वाटेल आणि नीट बोलता देखील येईल. पण माझं एक सजेशन आहे... जमलं तर दोघे कुठेतरी बाहेर जा काही दिवस. मी त्याला देखील हे म्हंटलं आहे. हे बघ... जर खरंच सिध्दार्थ chosen one असेल; for whatever reason... best known to those unknown.... तर सिध्दार्थ कुठेही गेला तरी हे जे वर्तुळ सुरू झालं आहे ते पूर्ण होणारच. मग तसंच असेल तर किमान रोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून लांब असलं तर विचार करायला आणि घडणाऱ्या गोष्टींचं analysis करायला नीट वेळ तर मिळेल. काय वाटतं तुला?" वैदेही बोलायची थांबली. कृष्णाला त्यांचं बोलणं पटलं. बोलते त्याच्याशी. तिने स्मित करत उत्तर दिलं. तेवढ्यात सिध्दार्थ बाहेर आला आणि दोघांनी एकमेकांकडे हसून बघितलं.

"चल, जाऊया ना गच्चीवर." तो म्हणाला; आणि तिघेही मोकळेपणी हसले.

***

"कृष्णा; why me? या प्रश्नाचा विचार करणं मी सोडून दिलं आहे. गच्चीत येताच सिध्दार्थ म्हणाला. सध्या तरी येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मोकळ्या मनाने सामोरं जायचं असं ठरवलं आहे. आई म्हणाली ते पटलं मला. हे जे अनुभव येत आहेत त्यामध्ये मला चॉईस नाही आहे. मग त्रास करून न घेता..... as you always say; I will be at receiving end; till I get to know why me?" गच्चीत येताच सिध्दार्थ म्हणाला.

त्याच्याकडे हसून बघत कृष्णा म्हणाली; "You are right."

"अग, तुला पटलं आहे तर इतका गहन विचार करत असल्यासारखा चेहेरा का केला आहेस?" सिध्दार्थने हसत हसत तिला विचारलं. त्यावर मिश्कीलपणे हसत कृष्णा म्हणाली; "माझ्या मॉमला काय कारण देऊ याचा विचार करते आहे. तसं मला कोकण बघायचं आहे; आणि आपण दोघे जायचा विचार करतो अहोत असं मी मध्ये एकदा सहज आणि उगीच तिला म्हंटलं होतं. तेच कारण सांगून खरंच आपण कोकणात जायचं का? तसंही अशा अनेक कथा ऐकल्या आहेत की लोकांना परशुराम कोकणात भेटतात." असं म्हणून कृष्णा खळखळून हसली. तिच्या हसण्याला साथ देत सिध्दार्थ देखील मनापासून हसला.

"मस्त कल्पना आहे कृष्णा. आई कितीही म्हणाली तरी मला विमानाने कुठेही प्रवास करायचा नाही आहे. स्वतः ड्राईव्ह करून जाण्यात एक वेगळी मजा आहे. तू तुझ्या आईशी बोलून बुकिंग करशील का? मला बाबांना थोडं पटवायला लागेल. हे गेले दोन दिवस मी ऑफिसमध्ये अजिबात लक्ष घातलेलं नाही. त्यांना ते पटत नाहीय; पण अजून तरी ते रागावलेले नाहीत. आज संध्याकाळी आमची मोठी आणि detailed मीटिंग झाली आहे. मी मुद्दाम स्वतःकडे मोठं काम घेतलं नव्हतं. पण तरीही अचानक काही दिवसांसाठी मी ऑफिसमध्ये नाही हे त्यांना पटणार नाही. तशी त्यांना मी असण्याची सवय झाली आहे हे एक कारण आणि अलीकडे त्यांना झेपत देखील नाहीय एकट्याने. पण तुझं नाव घेतलं तर ते नाही म्हणायचे नाहीत. परवा निघू आपण... सकाळी सहा चालेल न तुला?" सिध्दार्थने जवळ जवळ सगळं ठरवूनच टाकलं हे लक्षात येऊन कृष्णा हसली. प्रॅक्टिकल निर्णय घेताना स्थिर मनाचा आहे तो. तिच्या मनात दुपारचा विचार परत एकदा येऊन गेला.

तेवढ्यात जेवण आलं आणि मग मात्र अगदीच वेगळ्या विषयांवर बोलत दोघेही जेवले.

***

सिध्दार्थने छान 80s ची गाणी लावली होती. दोघेही गुणगुणत गाणी एन्जॉय करत होते. सगळी बुकिंग्ज कृष्णाने केली असल्याने ती सिध्दार्थला रस्ता सांगत होती. एका लहानशा गावातला होम स्टे तिने राहाण्यासाठी निवडला होता. साधारण एकच्या सुमाराला दोघे पोहोचले. सिध्दार्थ तर एकदम खुश झाला तो होम स्टे बघून. खरंच खूप सुंदर कल्पना होती. संपूर्ण मातीचं घर. खाली एक हॉल आणि स्वयंपाकघर आणि लाकडी जिन्याने वर गेलं की मोठी बेडरूम. लाकडी पलंग. सौर ऊर्जेचे दिवे आणि झरोके... कंदील.... जवळच होम स्टेचे मालक राहात होते. त्यांच्याकडे रोजचा ठरलेला मेन्यू असायचा. त्याव्यतिरिक्त काही हवं असेल तर सांगायचं होतं. कृष्णाने आजूबाजूला बघण्यासारख्या ज्या जागा होत्या त्यांची देखील लिस्ट बनवून ठेवली होती. जेवून थोडा आराम करून दोघेही संध्याकाळी जवळच्याच समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.

दोघे हातात हात घालून ओल्या वाळूतून चालत होते... आपापल्या विचारांमध्ये हरवून.

"काय वाटतं तुला? आता कोण भेटेल?" सिध्दार्थने अचानक कृष्णाला प्रश्न केला... आणि त्याचवेळी कृष्णाने त्याला विचारलं; "सिध्दार्थ, असं म्हणतात की परशुरामांनी कोकणाची निर्मिती केली. म्हणजे नक्की काय रे? तुला माहीत आहे का?"

"मला माहीत आहे!" मागून एक आवाज आला आणि दोघांनी मागे वळून बघितलं.

एक अत्यंत हँडसम व्यक्ती मागे उभी होती. कुर्ता पायजमा घातलेली. चेहरा काहीसा राकट, कातीव दाढी, हसरे हृदयाचा ठाव घेणारे डोळे....

"कोण तुम्ही दोघे? नवीन लग्न झालेलं जोडपं दिसता! आमचं कोकण बघायला आलात वाटतं. खरी आवड दिसते आहे तुम्हाला निसर्गाची. नाहीतर या आडगावी सहसा असं कोणी फिरायला येत नाही." असं म्हणून ती व्यक्ती स्वतःशीच खो-खो हसली. कृष्णाला थोडा राग आला. पण ती काही बोलली नाही. सिध्दार्थ देखील शांत होता.

दोघे काही बोलत नाहीत हे पाहून ती व्यक्ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली; "तुम्हाला डिस्टर्ब करतो आहे का मी? या बाजूच्या किनाऱ्यावर कधीतरी येत असतो; तसा शांत आहे आणि फार कोणी नसतं म्हणून. सूर्यास्त बघत होतो आणि तुम्ही दोघे दिसलात; आश्चर्य वाटलं म्हणून तुमच्या दिशेने आलो... नेमकं या मुलीचं शेवटचं वाक्य कानावर पडलं आणि बोलण्याचा मोह आवरू शकलो नाही. पण ठीक आहे! निघतो मी. सॉरी."

त्यांचं बोलणं ऐकून कृष्णाचं मन एकदम बदललं आणि ती म्हणाली; "असं काही नाही. आम्ही दोघे एकटेच होतो इथे आलो तेव्हा; त्यामुळे अचानक तुमचा आवाज ऐकून गोंधळलो. पण आम्हाला दोघांना समजून घ्यायला आवडेल; परशुरामांनी का निर्माण केली ही भूमी."

"वा! तुमच्या वयातल्या मुलांना देखील जुन्या काळातल्या कथा आवडतात हे ऐकून बरं वाटलं. चला वाळून बसूया का? उभं राहून किती वेळ गप्पा मारणार आपण?" असं म्हणून ती व्यक्ती कोरड्या वाळूच्या दिशेने चालू लागली. सिध्दार्थ आणि कृष्णा देखीलं त्यांच्या मागे चालत जाऊन काही अंतर राखत कोरड्या वाळूत बसले.

"तर..... परशुरामांनी कोकण भूमी का निर्माण केली? परशुरामांनी एकवीस वेळा संपूर्ण पृथ्वी क्षत्रियहीन केल्यानंतर त्यांना काही काळ एकांतवास हवा होता. तपश्चर्या करून मन:शांती मिळवायची होती. त्यासाठी ते एखादं शांत ठिकाण शोधत शोधत या भागात आले. विपुल निसर्गाने नटलेला हा संपूर्ण समुद्र किनारा, या नारळी-पोफळीच्या बागा, रानमेव्याने भरपूर झाडं आणि निर्मनुष्य परिसर बघून ते समाधान पावले आणि इथेच काही काळ राहून तपश्चर्या करावी असं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे रोज सकाळी उठून प्रातर्विधी उरकून ते एका गुहेमध्ये तप करण्यासाठी बसत असत. असाच बराच कालखंड गेला... किती दिवस, वर्षं, युगं ते कोणालाही सांगता येणार नाही... पण कधीतरी अचानक त्यांच्या या दिनक्रमात एक बाधा आली. तप करण्यासाठी गुहेच्या दिशेने जाणाऱ्या परशुरामांच्या समोर काही मानव येऊन उभे राहिले आणि म्हणाले: 'देवन, आम्ही या परिसरामध्ये नवीन आहोत. आमच्या सोबत स्त्रिया आणि लहान मुले देखी आहेत. हा परिसर निसर्गाने भरपूर आहे; पण तरीही आम्ही भुकेले आणि तहानलेले आहोत. राहण्यासाठी कुठेही जागा नाही. कारण समुद्र कधी रुद्रावतार धारण करेल आणि आम्हाला ओढून नेईल सांगता येत नाही. आम्ही कायम भितीच्या छायेत वावरतो आहोत. आपणास आम्ही रोज एकच दिनक्रम पाळताना बघतो आहोत. त्यामुळे आमच्या मनात एक आशा जागृत झाली आहे... आम्ही जर इथे राहायचा विचार केला तर आपण आम्हाला मदत कराल असा आम्हाला विश्वास वाटतो आहे.'

त्या लोकांचं गाऱ्हाणं ऐकून परशुरामांचं हळवं मन पांघळलं. 'उद्या सकाळी तुम्ही या... तुमचं इप्सित पूर्ण होईल'... ते म्हणाले. ते मानव नमस्कार करून तिथून निघून गेले. परशुरामांनी रोजच्याप्रमाणे त्यांची साधना पूर्ण केली आणि सूर्यास्त समयी सागरासमीप येऊन उभे राहिले. त्यांच्या हातात त्याचं लाडकं आयुध परशु होतं. डाव्या हातात ते तोलत त्यांनी सागराकडे एक दृष्टिक्षेप टाकला. परशुरामांनी त्याचं परशु उचललं आणि त्यांच्या समोर साक्षात समुद्रदेवता येऊन उभ्या राहिल्या.

'आमचा काहीही दोष नसताना आपण आमचा संहार का करता आहात देवन?' त्यांनी हात जोडत परशुरामांना प्रश्न केला.

'तुमचा संहार करण्याचा माझा काहीच मानस नाही. परंतु इथे काही मानव आहेत; ते गुण्यागोविंदाने जवळील भूमीवर राहू इच्छितात. परंतु सागराला येणारी भरती आणि अंतरी उठणारी वादळं यामुळे त्यांचं जीवन सतत नष्ट पावतं आहे. त्यामुळे ते माझ्याकडे मदतीसाठी आले.'

हे ऐकताच समुद्रदेवता म्हणाले; 'महात्मन आपण परशूने वार करण्यापेक्षा आपला परशु सागरामध्ये फेकावात. तो जिथे जाऊन थांबेल तिथवर आम्ही मागे हटू. त्यानंतर मानवाने सागरकिनारी वस्ती करावी आणि आम्ही आमच्या मर्यादेत सुखी राहू.'

परशुरामांनी ते मान्य केलं आणि परशु सागरामध्ये लांबवर फेकला. तो जिथे जाऊन थांबला तिथवर सागर मागे हटला... अशाप्रकारे कोकणाची निर्मिती करून परशुराम मागे फिरले आणि विध्य पर्वतावर जाऊन तपश्चर्येत मग्न झाले."

ती व्यक्ती बोलायची थांबली. सिध्दार्थ आणि कृष्णा मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या गंभीर आवाजातली परशुरामांची कहाणी ऐकत होते. दोघेही एकदम भानावर आले.

"तर अशी आहे ही कहाणी. मला माहीत आहे तुमच्या सारख्या तरुणांना असल्या कहाण्यांमध्ये विश्वास नसेल. पण माझं असं एक लॉजिक सांगतो.... कदाचित ते लोक परशुरामांना भेटायला गेले आणि त्यांना संकडं घातलं; त्यावेळी सुर्यदशा आणि चांद्रदशा अशी असेल की ज्यामुळे समुद्राला ओहोटी लागून तो खूप आत खेचला जाणार असेल आणि मग त्याची सीमा त्याअनुषंगाने बदलून काही योजने मागे हटणार असेल. ज्याचा अभ्यास परशुरामांनी केला असेल. आपल्या अभ्यासानुसार सागर मागे हटतो आहे का हे बघण्यासाठी स्वतः परशुराम उभे राहिले असतील. त्यावेळी ओहोटीच्या वेळी सागरातील जीवांचे हाल झाले असतील.... पशु-पक्षी-जलचर हे देखील एका वेगळ्या दशेमध्ये संवाद साधतात; ती दशा परशुरामांना अवगत असेल आणि ओहोटीच्या वेळी त्या जीवांना परशुरामांनी मदत केली असेल. हे तिथे असलेल्या लोकांनी बघितलं असेल. पुढे हेच सत्य आपभ्रंशीत होऊन परशुरामांनी सागराला मागे जायला लावून कोकण प्रदेश निर्माण केला अशी कथा प्रचलित झाली असेल..... काय बरं म्हणतात या प्रकाराला.... हा! grapevine! नाही नाही.... कानगोष्टीचा खेळ. पहिली व्यक्ती कानात जे सांगते आणि शेवटची व्यक्ती जे मोठ्याने बोलते त्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. मला तर वाटतं या जुन्या गोष्टींचं काहीसं असंच असावं. बरं! आता तुम्हाला निघायला हवं. गप्पांमध्ये बराच उशीर झाला आहे."

त्यांनी असं म्हणताच सिध्दार्थचं लक्ष मोबाईलकडे गेलं. तसा फार उशीर नव्हता. पण इथे रस्त्यावरचे विजेचे दिवे नसल्याने खूपच अंधार वाटायला लागला होता. अनोळखी प्रदेश आणि सोबत कृष्णा असल्याने सिध्दार्थ कपडे झटकत उठला. त्याला उठलेलं बघून कृष्णा देखील उठली.

"तुम्ही सांगितलेली कथा आणि त्यावरचा तुमचा अंदाज... दोन्ही आवडलं. धन्यवाद सर. पण खरंच आता आम्ही निघालेलं बरं. उशीर फार नाही झालेला पण हा भाग ओळखीचा नाही आणि आम्ही दोघेही आज दिवसभराचा प्रवास करून आलो आहोत; त्यामुळे वेळेत झोपू. नमस्कार!" असं म्हणून सिध्दार्थने हात जोडले. ते गृहस्थ अजूनही तिथेच बसून होते. त्यांनी फक्त हात जोडले.

सिध्दार्थ आणि कृष्णा राहात्या जागी आले. दोघे जेवायला बसले आणि कृष्णा सिध्दार्थला म्हणाली; "कोण असतील कोण जाणे; पण छान माहिती दिली त्यांनी. आपल्याला माहीतच नाहीत काही गोष्टी हे खरं. बरं! ते राहू दे. सिध्दार्थ उद्या आपण कुठे जायचं आहे ते मी ठरवून ठेवलं आहे. तुझी हरकत नसेल तर थोडं आरामात निघू आणि उद्या गाडी नाही ह काढायची; इथला लोकल टांगा बुक केला आहे मी. त्यातूनच फिरुया उद्या." सिध्दार्थने हसून 'बरं' म्हणून मान डोलावली. जेवण आतपलं आणि दोघेही दमले असल्याने लगेच झोपायला गेले.

सिध्दार्थला लगेच झोप लागली. दिवसभराची दगदग आणि नकळत त्याच्या डोक्यात चाललेले विचार! खूप दमला होता तो. पण कृष्णाला काही केल्या झोप येत नव्हती. ती उठून जवळच्या खिडकीमध्ये जाऊन उभी राहिली... इतकं सुंदर चांदणं तिने कधीच बघितलं नव्हतं. संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला होता चंदेरी उजेडात. मंद वाहणारा वारा आणि झाडांमधून येणारी शीळ... अगदी प्रसन्न वातावरण होतं. कृष्णाला उर्मी दाटून आली की सिध्दार्थला उठवावं आणि थोडं फिरून यावं. पण मग तो दमला असेल या विचाराने तिने त्याला हाक नाही मारली. आपल्या हालचालीमुळे तो जागा होऊ नये म्हणून कृष्णा हळूच खाली उतरून आली. त्यांचं सामान समोरच एका सोफ्यावर होतं. तिथे बहुतेक एखादा दिवा विझवायचा राहून गेला होता बहुतेक. कृष्णा त्यादिशेने गेली आणि समोरचं दृष्य बघून एकदम स्थब्द झाली...... पेटीमधून हिरव्या रंगाचा प्रकाश परावर्तित होत होता.

तसंच मागे फिरावं आणि सिध्दार्थला उठवावं अशी उर्मी दाटून आली कृष्णाच्या मनात. पण समोरच्या दृष्यतली उत्सुकता जास्त मोठी ठरली आणि तिने पुढे होऊन लाकडी पेटी हातात घेतली.

कृष्णाने श्लोक वाचला:

नि:क्षत्रिय अवनि भवेत् परशुराम कारणे!
मंजुषा भवन्तम् विद्यति करणेन परशुराम भवत् मेलनं करोति!

तिच्या मनात श्लोक वाचतानाच अर्थ उमटतं होता:

नि:क्षत्रिय पृथ्वी झाली परशुरामांच्यामुळे! मंजुषा तुला मिळाली कारण (तेच) परशुराम तुला भेटणार!!!

कृष्णाने परत एकदा अर्थ मनात घोळवला. मंजुषा तुला मिळाली..... 'तुला!' 'ती मी आहे?'

कृष्णाच्या मनात परत एकदा सिध्दार्थला उठवावं असं आलं... पण मग कोणत्याशा अनामिक उर्मिने तिने ती पेटी हातात घेतली... मोबाईल सोबत असल्याची खात्री केली आणि दार उघडून कृष्णा बाहेर पडली.

समुद्राच्या गार वाऱ्याने तिच्या अंगावर शहारा आला... 'आपण एकटीने इथे येऊन चूक तर नाही ना केली? असं तर नाही की तो निरोप सिध्दार्थसाठी होता आणि आपण आगाऊपणा करून......'

"नाही मुली! स्वतःला दुय्यम स्थान देऊ नकोस. तू सिध्दार्थहून कोणत्याही बाबतीत कमी नाहीस... फक्त तूच का... समस्त स्त्रीजात पुरुषांच्या बरोबरीने सर्वत्र असते. तरीही समाजमन अजूनही स्त्रीला दुर्बल मानतं हे आपलं दुर्दैव आहे."

कृष्णाने मागे वळून बघितलं... पण त्यागोदरच तिने आवाज ओळखला होता.

"सर, तुम्ही!?"

"तुझ्या या तुम्ही मध्ये दोन अर्थ दडलेले आहेत. त्या दोन्हीचं उत्तर हो आहे पोरी. मी! तुम्हाला संध्याकाळी भेटलेला.... मी! परशुराम!!!"

"पण....."

"या रुपात!? तुमच्या बोलीभाषेप्रमाणे बोलणारा!? हेच ना?"

"कृष्णा.... खूप सुंदर नाव ठेवलं आहे तुझ्या आई-वडिलांनी तुझं! अगदी तुला शोभेलसं. तू सावळी आहेस म्हणून नाही; तर विचारी आहेस त्या सर्वेश्वराप्रमाणे... म्हणून! माझ्या या रूपाचा फार विचार करू नकोस. कृष्णा, मी एकटाच असा आहे जो सत्य, त्रेता, द्वापार आणि कली युगामध्ये सहज प्रवास करू शकलो आहे. बाळा, स्वीकाराह्यता हा माझा स्वभावधर्म आहे. त्यामुळेच मी प्रत्येक युगात तग धरू शकलो. माझा जन्म सत्ययुगात झाला. जन्माने ब्राम्हण आणि धर्माने क्षत्रिय झालो. वडिलांची इच्छा पूर्ण करताना हा विचार मनात होताच की आशीर्वाद घेताना परत एकदा मातेची आणि बंधूंची मागणी करायची. जमदग्नी पुत्र आहे मी. एका अतिज्ञानी महान ऋषींचा पुत्र. योग्य निर्णयशक्ती उपजत आहे माझ्यात."

"आणि तरीही तुम्ही एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रियहीन केलीत. देवा...."

"मुली मी तुला तुमच्या कल्पनेतल्या देवासारखा दिसतो का?" कृष्णाला थांबवत परशुराम म्हणाले.

"म्हणजे?" कृष्णा गोंधळली.

"अग, तुमच्या आजच्या कल्पनेत राजा रविवर्माने चितारलेली देवता-ऋषी-मुनी संकल्पना आहे न. मी तुला तसा दिसतो आहे का?"

"नाही महात्मन." काहीसं हसू येऊन कृष्णा म्हणाली.

"मग माझ्याशी बोलताना देवा... महात्मन... असं संबोधण्यापेक्षा सर म्हण मला. तुला सोपं जाईल बोलायला. उगाच दडपण घेऊन बोललीस तर मनातील सर्व शंकांचं निरसन होणार नाही." मंद हसत परशुराम म्हणाले.

"बरं! तर.... सर.... खुदकन हसत कृष्णा म्हणाली; तुम्ही एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रियहीन कशी केलीत? मुळात पहिल्या वेळीच जर पृथ्वी क्षत्रियहीन झाली होती तर मग पुढच्या वीस वेळा नक्की काय केलंत?"

"बघ! केवळ देवा... या उपाधी ऐवजी सर म्हणता क्षणी तुझ्या प्रश्नात मोकळेपणा आला." परशुराम देखील मोकळेपणी हसत म्हणाले.

"बस! किती वेळ उभं राहणार आहोत आपण." असं म्हणत स्वतः गार आणि तरीही उबदार वाळूमध्ये ते बसले.

"बेटा, नि:क्षेत्रीय पृथ्वी म्हणजे काय ते समजून घे. म्हणजे मग एकदा की एकवीस वेळा की... अजून किती वेळा... ते तुलाच लक्षात येईल. पहिल्या वेळी मी पृथ्वी नि:क्षेत्रीय का केली ते माहीत आहे का तुला? त्यासाठी मूलतः क्षत्रिय म्हणजे कोण ते तुला समजून घ्यावे लागेल. या कली युगातील जातीय क्षत्रियता हा विचार नाही खऱ्या क्षत्रियतेमध्ये. ज्याचे कर्म आहे गरीब-दिन-दुबळ्यांचे संरक्षण करणे तोच जर मदमस्त होऊन या दिनांना त्रास देऊ लागला तर? ज्या ज्या वेळी अशा प्रकारे स्वकर्तव्य जो विसरला आणि दिन-दुबळ्यांना केवळ स्वतःच्या शक्तीमुळे त्रास द्यायला लागला अशा क्षत्रियला मी नेस्तनाबूत केलं आहे. पहिल्या वेळी देखील केवळ तोच जो दुष्टपणे वागला आणि शक्तीचा गैरवापर करायला लागला त्याचा सांहर केला आणि एकविसाव्या वेळी देखील तेच केलं. पण मग माझ्या लक्षात आलं की मी परशुराम असं कितीही वेळा करत राहिलो तरी परत परत अशा मानसिकतेचे मानव निर्माण होणार आहेत. त्यामुळे मग मात्र मी थांबलो. मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर?" परशुराम बोलायचे थांबले. चांदण्यामध्ये त्यांच्या चेहेऱ्यावरील मंद स्मित कृष्णाला दिसत होते.

"सर.... सिध्दार्थ का? म्हणजे... आम्ही का?" कृष्णाने मनात असलेला पुढचा प्रश्न विचारला.

"बेटा याचं योग्य उत्तर तुला माझ्याकडून मिळणं अवघड आहे. पण उत्तर मात्र नक्की मिळेल; याची खात्री बाळग. आता काही माझ्या बाजूने. राजा बिभीषण, कुलगुरू कृपाचार्य आणि राजा बळी यांनी त्यांच्या भेटीमध्ये आजच्या काळामध्ये त्यांचं असणं निरर्थक असल्याचं सांगितलं असेल याची मला कल्पना आहे. मात्र मी थोडं वेगळं काही सांगणार आहे. म्हणूनच मी आज संध्याकाळी भेटून नक्की कोणाशी बोलायचं त्याचा अंदाज घेतला. कृष्णा, सिध्दार्थ नक्कीच विचारी आहे; पण तितकाच भावनाप्रधान आहे. अनेकदा त्याचे निर्णय हे भावनेच्या भरात घेतलेले असतात. याचं अगदी ताज उदाहरण म्हणजे... पहिल्या दिवशी पेटीका मिळाली आणि श्लोक वाचता क्षणी दुसरा कुठलाही विचार न करता तो त्या मुलाला शोधायला धावला. भावनिकता हेच त्याचं कारण आहे. मात्र त्यामानाने तू जास्त विवेकी विचारांची आहेस; त्यामुळे सिध्दार्थची सोबत कधीही सोडू नकोस.

आता फक्त शेवटचे काहीतरी. मी का भेटतो आहे तुम्हाला! बेटा, ज्याप्रमाणे मला एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रियहीन केल्यानंतर उपरती झाली की याहून जास्त मी काही करू शकत नाही... तद्ववतच या कालामध्ये वावरताना मला एक गोष्ट लक्षात आली आहे; अत्यंत दुःखाने सांगावं लागतं आहे; की कली युगाचा अंत अगदी काही शतकांवर आला आहे. कदाचित तोच कालांत असेल; आणि त्याचाच अर्थ चिरंजीवित्वाचा अंत असेल. पण ज्याप्रमाणे चिरंजीवी असल्याने मृत्यू नाही... परंतु शरीर ह्रास आहे. अर्थात तो तुमच्या शंभर वर्षांच्या आयुष्यात जसा होतो तसाच आमच्या आयुष्यात काही हजार शतकांमध्ये होतो आहे. त्याप्रमाणे तत्वह्रास हा कली युगातील मानवाला मिळालेला शाप आहे. यातून अगदीच काही मोजके वेगळे आहेत. त्यातील तुम्ही दोघे! बस् माझ्याकडून इतकंच! मुली, एकूणच सर्वस्वाचा अंत नक्की आहे... मात्र मानवजातीला काहीतरी देणं लागतात तुमच्यासारखे. त्याची जाणीव लवकर व्हावी तुम्हाला हीच त्या परमपित्याकडे मागणी करतो... आणि तुझी रजा घेतो."

असं म्हणून परशुराम उठले आणि चालू पडले. त्यांना हाक मारावी किंवा थांबवावं असं कृष्णाला वाटलं नाही. त्यांना जाताना ती बघत राहिली.

काहीसं पुढे जाऊन ते थांबले... परशुराम मागे वळले नाहीत तरीही त्यांचा स्पष्ट आणि घनगंभीर आवाज "कृष्णाच्या मनात गुंजला... तू कमी नाहीस बेटा! You both are equal. निसर्गाचा balance आहात तुम्ही दोघे. येतो मी!"

परशुराम पुढे पुढे चालत होते.. ते गेले त्यादिशेने काही वेळ कृष्णा बघत बसली आणि मग तिची नजर सागराकडे वळली. तिच्याही नकळत ती तिथेच आडवी झाली आणि तिला झोप लागली.

क्रमशः

श्रीगणेश लेखमाला २०२१

प्रतिक्रिया

पौराणिक काळातील व्यक्तिमत्वे + आधुनिक काळातील पात्रे + भटकंती
भारीच fusion आहे 😊
छान चालू आहे लेखमाला... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

तुषार काळभोर's picture

16 Sep 2021 - 5:48 pm | तुषार काळभोर

++१

गॉडजिला's picture

16 Sep 2021 - 5:05 pm | गॉडजिला

निसर्गाचा balance आहात तुम्ही दोघे. येतो मी!

ओके.

पण मग माझ्या लक्षात आलं की मी परशुराम असं कितीही वेळा करत राहिलो तरी परत परत अशा मानसिकतेचे मानव निर्माण होणार आहेत. त्यामुळे मग मात्र मी थांबलो.
वाह… स्वतः स्थिर होणे खरेच महत्वाचे… बाह्य जगच स्थिर होत नाहीच.

रंगीला रतन's picture

16 Sep 2021 - 8:10 pm | रंगीला रतन

वाचतोय.
पुभाप्र.

प्रचेतस's picture

17 Sep 2021 - 6:59 am | प्रचेतस

वाचत आहेच, हाही भाग छान.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2021 - 8:13 am | ज्ञानोबाचे पैजार

मॉडर्न परशुराम आवडला,

येउ दे पुढचा भाग,

पैजारबुवा,

कॉमी's picture

17 Sep 2021 - 8:43 am | कॉमी

वाचतोय. पुभाप्र.