अभियांत्रिकीचे दिवस-५.. बड्डे..!

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
25 Aug 2021 - 9:15 pm

उदाहरणार्थ जुन्या कुठल्याही हिंदी मूव्हीमधला एखादा फ्लॅशबॅक दाखवण्याचा सीन.
अंधाऱ्या खोलीत एक चाळिशीतला माणूस मफलर वगैरे गुंडाळून गंभीर चेहऱ्यानं एकटाच बसलेला असतो.
बाहेर वीजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस..
खिडकीतून अचानक सुसाट वारा येतो.. त्यामुळे भिंतीवरची फ्रेम वाकडी-तिकडी होत फुटतेय
आणि त्याचवेळी अचानक कडाडलेल्या वीजेचा प्रकाश खिडकीतून डायरेक्ट त्या माणसाच्या चेहऱ्यावर..!!

कॅमेरा आधी फ्रेमवर आणि नंतर त्या माणसाच्या चेहऱ्यावर जाऊन झूम होतोय..
माणसाला कायतरी आठवतंय बहुतेक..
कारण तो माणूस, सगळ्या गावाला ऐकू जातील, अशा पद्धतीनं उसासे टाकायला लागलाय..
मग असाच कधीतरी ह्या ओव्हर ॲक्टिंगमुळे फ्रस्ट्रेट झालेला डायरेक्टर, ताबडतोब त्या माणसाच्या आणि प्रेक्षकांच्या मानगुटीला धरून फ्लॅशबॅकमध्ये नेऊन सोडतोय..

तसंच काहीसं इथं..
इसवी सन २००७ -०८..

कुठलंही होस्टेल म्हटलं की एक गोष्ट असते, ती म्हणजे सर्वांना एकत्र जमायला एखादं ठिकाण वगैरे... तिथंही होतं.. तो अड्डा फार प्राचीन काळापासून "DP" या नावानं ओळखला जायचा..
रात्री उशीरापर्यंत चालू असणारी तिथली एक टपरी..!
"स्वतःचा प्रकाश, स्वतःच शोध" या तत्वाला अनुसरून त्या टपरीवर अंधूक प्रकाशात पेटवल्या गेलेल्या आयुष्यातल्या पहिल्या सिग्रेटची लालबुंद ठिणगी..!
कितीतरी जणांच्या आयुष्यात त्या टपरीपासून ते आजपर्यंत हजारो छोट्या-मोठ्या गोल्डफ्लेकी घसा खरवडून धूर धूर होत गेल्या असणार, पण एका झटक्यात फुफुसं अज्जाद वर उचलणाऱ्या त्या पहिल्या सिग्रेटची चव..!! काय सांगावी.!! कशी सांगावी..!!

तर दिवसभरात सुस्ताडलेली, रिकामटेकडी, होस्टेलची सगळी जनता संध्याकाळी हवा खायला आणि सोडायला डीपीवर गोळा व्हायची.
आणि आल्या आल्या ताबडतोब एकमेकांच्या, अजूनही शिल्लक राहिलेल्या उखाळ्या-पाखाळ्या काढायला सुरुवात करायची.

बौद्धिक किंवा मानसिक थकवा वगैरे काही सवालच नव्हता तेव्हा कुणाच्याच बाबतीत..!! शिवाय होस्टेलवर दिवसभर लोळून आणि 'चॅलेंज' सारख्या बैठ्या गेम्स खेळून शारीरिक थकवा तरी कुठून येणार..!

काहीतरी निमित्त काढून, कुणालातरी फशी पाडून येनकेनप्रकारे पिण्याचा काही जुगाड होतोय का, याची व्याकूळपणे वाट पाहायला लावणाऱ्या संध्याकाळी डीपीवर हरहमेश रेंगाळत असायच्या..!
आणि नाहीच काही जुळणी झाली तर दुनियेला दोष देत देत, मेसच्या दिशेने पाय खुरडत चालायला लावणारे निराश रस्तेही DP पासूनच सुरू व्हायचे..!

DP च्या जवळच 'शाही गार्डन' म्हणून एक गार्डन रेस्टॉरंटसारखा प्रकार..!

असंच एकदा मी फर्स्ट इयरला असताना, कोवळा असताना, मेसमध्ये एका रात्री सिनिअर्सनी फर्मान काढलं की "जेवून लगेच शाही गार्डनला या".

फॉर्मल शर्ट-पॅण्ट, इन शर्ट वगैरे करून, एका छत्रीत दोघं भिजत, शोधत-विचारत, कावरा-बावरा होऊन तिथं गेल्यावर पाहिलं, तर मेसची महत्त्वाची वगैरे मीटिंग चाललेली.

मेस-मिटींगच्या नावाखाली तिथं एकत्र जमण्याचे काही तातडीचे अजेंडे असायचे.
उदाहरणार्थ मेसच्या हमखास गंडलेल्या हिशोबांचे दोष एकमेकांवर किंवा पास-आऊट झालेल्या अज्ञात सिनीअरवर ढकलणे,
शिवाय मेससाठी मंडईत जाऊन बाजार आणणं तसेच सबमिशनची हमाली कामं एखाद्या जुनिअरच्या गळ्यात मारणे..

ही अर्जंट कामं ताबडतोब उरकून मग आंबटशौकीन सीनीअर्स तिथंच 'इंट्रो'चे आणि 'इंजिनीयरींग प्रतिज्ञेचे' एक-दोन राऊंड ज्युनिअर्सकडून पार पाडून घ्यायचे..

प्रतिज्ञेचा ड्राफ्ट अश्लील आणि ती सर्वांपुढे सादर करताना करावे लागणारे हावभाव त्याहूनही अश्लील..!
म्हणजे प्रतिज्ञेची सुरुवात साधारण अशी...
"मैं ***** हूं... इसलिए मैं प्रतिग्या करता हूं की अगले चार साल तक मैं अपने सिनीअर्स के खडे **** छत्रछाया के नीचे, ***** करता रहूंगा..!" वगैरे वगैरे..

सिनीअर्सचा त्या दिवशीचा मनोरंजनाचा कोटा पूर्ण झाला की मग सर्वांना वन बाय टू च्या हिशोबानं कॉफी मिळायची...पण तिची चव नक्की कशी आहे, हे समाजायच्या आतच ती खलास होऊन जायची..

याशिवाय फर्स्ट इयरला असताना 'शाही गार्डन' मध्ये बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायची पद्धत होती.
पण हे सुरुवातीचे बर्थडे साजूक तुपातले, निरागस, संस्कारक्षम वगैरे असायचे.
म्हणजे सगळे जण पाच-पाच रुपये 'काँट्री' वगैरे काढायचे आणि केक घेऊन 'शाही गार्डन'ला जमा व्हायचे.

मग "ज्याचं वय आपोआपच एका वर्षानं वाढलेलं असायचं" तो लाजत मुरकत केक कापायचा.
मग सगळे जण इज्जतीत एकाच वेळी टाळ्या वगैरे वाजवायचे.
त्यानंतर लगेचच समाजसेवेची आवड असलेला एक जण केकचे पीस करून सगळ्यांना वाटायचा.

मग सगळेजण "ज्याचं वय आपोआपच एका वर्षानं वाढलेलं असायचं" त्याला शुभेच्छा देऊन, त्याची माफक चेष्टा मस्करी करून वातावरण उत्सवी वगैरे करण्याचा आपापल्या पद्धतीनं प्रयत्न वगैरे करायचे...!

आणि मग शेवटी होस्टेलला जाऊन "आज लय मजा आली" अशी स्वतःचीच समजूत काढत झोपायचे..!

पण जसजसे दिवस पुढं सरकायला लागले तसतसे आमच्यावरचे संस्कारांचे एकेक पापुद्रे कृष्णेच्या पुलाखालून वाहून जायला लागले..
आणि मग एकेकाचं अस्सल रूप ढुश्या देऊन देऊन बाहेर पडायला लागलं.
मग बर्थडे सेलिब्रेशनमध्ये, एक्साइटमेन्टची जी आदिम आणि मूलभूत चाह असते, ती जोर पकडू लागली...!

आणि या प्रकारात आदिमानवांच्या टोळीला तोडीस तोड असा एक हिंस्र रानटीपणा येत गेला..
घोळका-पद्धतीनं शिकार करण्याचं तंत्र विकसित करण्याचं श्रेय निर्विवादपणे आमच्या ह्या पोरांकडेच जातं...!

तर त्याची एक नियोजनपूर्वक डिझाईन केलेली मेथडॉलॉजी असायची.

उदाहरणार्थ..

१. "ज्याचं वय आपोआपच एका वर्षानं वाढलेलं असायचं", तो रात्री १२ वाजता जिथं कुठं असेल त्याचा शोध घेऊन, तिथं दबा धरून धाड घातली जायची.

त्याच्या शरणागत विनंती-अर्जांकडे निष्ठुरपणे दुर्लक्ष करून त्याला सर्वांच्यामध्ये घोळक्यात घेतलं जायचं.
आणि त्याच्या देहरूपी अस्तित्वाचा जो कुठला भाग डोळ्यांपुढे येईल त्याच्यावर हेलिकॉप्टर स्टाईलने हाता-पायांचा धुंवाधार वापर व्हायचा..

ह्या धुमश्चक्रीचा आवाज ऐकून आसपासच्या गुहांमधले समाधिस्त आदिमानवही सुपरफास्ट वेगानं घटनास्थळी दाखल व्हायचे..
आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आव आणत स्वत:ही बेसुमार हात धुवून घ्यायचे..

बड्डे बम्प्सच्या ह्या प्रकाराला त्या वेळच्या आदिमानवांमध्ये
''अगायाया ! लई वाईट तुडवलाss!''
"बेक्कार धुतला त्येलाss !"
असं लाडानं म्हणायची पद्धत होती.

२. मग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच निगोसिएशनचे राऊंड चालू व्हायचे.
मुद्दा तोच- "कुठं बसायचं संध्याकाळी ?"

मग 'रिलॅक्स'सारख्या चांगल्या बारपासून निगोशिएशनची सुरुवात करत करत शेवटी संध्याकाळपर्यंत सगळेजण आपापल्या औकातीवर यायचे..
आणि 'जिव्हाळा'सारखी आपापलं पार्सल आणून मनसोक्त 'बसून' मग जेवू देणारी परवडेबल ठिकाणं गाठली जायची.

३. हळू हळू चढत जाणाऱ्या मैफिलींमध्ये कधीतरी एक तरल भावनिक अवस्था सामुदायिकरीत्या यायची...
आणि मध्यरात्रीनंतर सगळेजण 'एकमेकांची लाल करण्याच्या' मूडमध्ये अलगद प्रवेश करायचे..

"तू पण चांगला. मी पण चांगला. आपण सगळेच चांगले." अशी तत्वज्ञान्यांना अभिप्रेत असलेली वैश्विक बंधुभावाची भावना तिथं ओतप्रोत होऊन सांडायला-लवंडायला लागायची.

आणि "ज्याचं वय आपोआपच एका वर्षानं वाढलेलं असायचं" त्याला त्या क्षणीतरी बिलाचं काही वाटायचं नाही.

कारण आठव्या किंवा नवव्या स्वर्गात तरंगणारं त्याचं मन पैसा, हेवेदावे वगैरे क्षुद्र गोष्टींच्या फार फार पलीकडे गेलेलं असायचं..‌. पार पाघळून मायाळू मायाळू झालेलं असायचं ते....!!

मग हळूहळू मध्यरात्रीनंतर कधीतरी सगळ्यांची तरंगणारी, डुलणारी हेलिकॉप्टर्स खुष्कीच्या मार्गानं होस्टेलच्या 'चायनागेट'वरून उड्या मारून चाचपडत कुठल्यातरी रूममध्ये लँड व्हायची...

मुक्तकविडंबनविनोदप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

25 Aug 2021 - 10:39 pm | गुल्लू दादा

हाही भाग आवडला.

टवाळ कार्टा's picture

25 Aug 2021 - 10:57 pm | टवाळ कार्टा

ख्या ख्या ख्या

टवाळ कार्टा's picture

25 Aug 2021 - 10:58 pm | टवाळ कार्टा

भारी सुरु आहे...मिपाच्या परंपरेला धरून अर्धवट सोडू नको

सुबोध खरे's picture

26 Aug 2021 - 11:51 am | सुबोध खरे

झकास

गॉडजिला's picture

26 Aug 2021 - 10:47 pm | गॉडजिला

शेवट तर कहर :)

पाटील साहेब तुम्ही मिपावर ९ वर्ष आहात आणि पहिला लेख लिहायला ८ वर्ष घेतलीत हा आम्हा वाचकांवर अन्याव हाये.
तुमचे सगळे लेख मस्त खुशखुशीत असतात.
अजून खूप लिहा.
अजू न एक असं की तुम्ही हा लेख इथं लिहून कोरावर चिटकवलाय की तिकडून इकडे.
कोरावर तुम्ही चैतन्य म्हूणन लिहता काय?
तसं नसेल तर त्याला समज द्या की तो पुन्हा चोरणार नाही.

पाटिल's picture

11 Dec 2021 - 10:10 pm | पाटिल

सुरसंगम, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद :-)
लिहिता येईल हा शोध लॉकडाऊन मध्ये लागला. :-))
चाललंय थोडं फार जमेल तसं.
आणि होय मराठी कोरा वर त्या नावाने मीच आहे.
मायबोली वर ही आहे.

सुजित जाधव's picture

26 Aug 2022 - 9:41 am | सुजित जाधव

आमच्या कॉलेज मध्ये केक कापायच्या आधी गर्लफ्रेंड/क्रशच्या नावाने उखाणा घ्यायची परंपरा होती. आणि बड्डे बॉय बिचारा दिवसभर उठता बसता मार खायचा. प्रत्येकी १०-१० रुपये काँट्री काढून आणलेला केक कापताना जी पुढे चार-पाच टाळकी उभी असायची तीच खाऊन फस्त करायची.

मुक्त विहारि's picture

26 Aug 2022 - 9:02 pm | मुक्त विहारि

शेवटचे वाक्य आवडले ...