Skip to main content

कुंदापूरा चिकन घी रोस्ट

लेखक केडी यांनी शुक्रवार, 04/06/2021 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
img1 ह्या रेसिपी चा ईजाद ५० वर्षांपूर्वी, कुंदापूरा मधल्या शेट्टी लंच होम मध्ये झाला असे म्हणतात). कुंदपुरा मंगळूर पासून साधारण ९० किमी वर आहे म्हणून बहुदा ह्याला मंगलोरी घी रोस्ट पण म्हणत असावे. ह्यात खरी मज्जा आहेत ती अर्थात तुपाची आणि त्या लाल रंगाची. दिसायला एकदम जाळ पण चवीला मात्र अतिशय सुंदर! साहित्य चिकन मॅरीनेट ५०० ग्राम चिकन तुकडे करून ४ चमचे घट्ट दही १ चमचा लिंबाचा रस १/२ चमचा लाल तिखट (काश्मिरी) १/२ चमचा हळद १/२ चमचा मीठ १०/१२ ब्याडगी लाल सुक्या मिरच्या २ चमचे धने १ चमचा जिरे १ चमचा बडीशेप १०-१२ काळीमिरी ४-५ लवंग १०-१२ लसूण पाकळ्या १ छोट्या लिंबाच्या आकाराची चिंच १/४ वाटी तूप (घरचं असेल तर उत्तम) १५-२० कढीपत्त्याची पानं चवीनुसार मीठ कृती चिकनला तिखट, हळद, दही, मीठ लावून किमान १ तास मुरत ठेवावे. मंद आचेवर तव्यावर आधी लाल मिरच्या, आणि मग इतर खडे मसाले जळणार नाहीत असे २/३ मिनिटे भाजून/शेकवून घ्यावे. मिरच्या आणि खडे मसाले, लसूण आणि चिंचे सोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे, लागेल तसे पाणी वापरून. पॅन मध्ये तूप गरम करून, त्यात चिकन १०/१२ मिनिटे (५०% शिजेल इतपत) परतून घ्यावे. चिकन चे तुकडे बाजूला काढून त्याच तुपात आता वाटलेला मसाला घालून तो परतून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटत आलं की पॅन मध्ये चिकनचे तुकडे घालून पुन्हा परतून घ्यायचा आहे, चिकन शिजेपर्यंत. (लागलं तर थोडंस पाणी घालावं, पण ह्याला रस्सा नसतो त्यामुळे खूप पाणी नको). चवीनुसार मीठ घालून, मग एक चमचा तुप गरम करून त्यात कढीपत्त्याची पानं घालून ती फोडणी/पानं वरून घालावी.. गरम पोळी किंवा भातासोबत मस्त लागतं. IMG2

वाचने 15460
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

पाकृ आणि सादरीकरण नेहमीप्रमाणे आवडलं. वाचून आणि पाहून तोंपासु. आमच्या घरी केवळ शुद्ध शाकाहारी पदार्थ बनतात, म्हणून मिपावरचा "ही पाकृ अंडं घालून कशी करायची?" हा ऑल टाइम हिट प्रश्नही विचारण्याची सोय नाही. पनीर, बटाटे वगैरे घालून एकदा ट्राइ करीन. बाकी, अशात मिपावर पाकृचे धागे कमी झालेत का?

In reply to by वामन देशमुख

धन्यवाद! पनीर घालून छान लागेल किंवा मिक्स व्हेज म्हणजे बटाटे, घेवडा, गाजर, मश्रुम, फ्लॉवर घालून पण मस्तं लागेल

In reply to by केडी

मिरच्या आणि खडे मसाले, लसूण आणि चिंचे सोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे, लागेल तसे पाणी वापरून.
हे स्पष्ट करुन सांगाल का? म्हणजे, चिंच कोरडीच घालायची की चिंच पाण्यात भिजवून कोळ काढून पाणी घालायचं?

In reply to by वामन देशमुख

चिंचेचा कोळ नाही चिंच घालायची आहे..पाणी घालून बारीक करताना ती छान एकजीव होईल

पाकृ आणि सादरीकरण क्लास! पण, आता हे बघून दुपारच्या जेवणातली कोबी कशी ढकलायची पोटात? सं - दी - प

एक दोन वेळा बाहेर खाल्ले आहे आणि खूप आवडले होते. रेसिपि मस्तच दिली आहे, करायला हवी :-) ब्याडगी मिरची मस्ट असणार इथे, कलर साठी!

पाहुनी चिकनच्या पाककृती, मणानी पनीर घालू किती? त्यावाचूनी चवीची ,,निश्चिती कैशी येईल बा!? ;)

छान पाककृती दिसती आहे ,, पण एक विचारू का , याला "रोस्ट" असे का नाव दिलाय ? रोस्ट / भाजणे हा प्रकार फारसा भारतात वापरताना दिसत नाही कारण ओव्हन जरी उपलब्ध असले किंवा एअर फ्र्यार पण सहज उपलब्ध आहेत आज काल तरी फार कोणी घेत नसावेत असे दिसते पूर्वी दोन खोलगट तवे एकवार एक ठेवून वरचं तावयवर निखारे ठेवले जायचे आणि असा त्याचाच ओव्हन बनवला जायचा ! असो कदाचित वेगवेगळ्या देशात एकाच प्रक्रियेला वेगवेगळे शब्द वापरयाची प्रथा असेल तसे असेल कदाचित! उदाहरण म्हणजे अमेरिकेत ज्याला ग्रिल म्हणतात त्याला ऑस्ट्रेलीया / न्यु झीलंड मध्ये बार्बेक्यू म्हणतात ओव्हन च्या पाककृती नेहमी करीत असतो पण मिपावर त्या टाकाव्या कि नाही कळात नाही कारण त्यात कोणाला फारसा रस दिसला नाही या आधी