टीप : विषय धार्मिक आहे आणि लेखन विनोदी. ज्यांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे त्यांनी वाचू नये.
अळंबी ज्या पद्धतीने उगवतात त्या प्रमाणे आमच्या गावांत संत, धार्मिक टोळ्या निर्माण होत. कुठल्या तरी दूर गावाचा "स्वामी" आमच्या गावांत अचानक लोकप्रिय होत असे. आणि शेवटी ह्या सर्वाना कारणीभूत म्हणजे सदाशिव भट. ह्यांची जात बहुतेक कुठल्यातरी प्रकारची ब्राह्मण असली तरी तसे ते भटपण करणारे भट नव्हते. आडनावाचा भट. पण देव सोडून संत आणि जंत ह्यांच्या मागे लागणारा हा माणूस. गावांत ग्रामदेवता आणि आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात क्वचितच दृष्टीस पडणाऱ्या ह्या भटाने गावकर्यांना अनेक संत, बाबा महाराजांचा नाद लावला. माझ्या आठवणी प्रमाणे "गणी गण गणात बोते" नावाचा गुरु मंत्र देणाऱ्या नरेंद्र महाराज ह्यांना त्यांनीच सर्वप्रथम गावांत आणले (म्हणजे प्रत्यक्ष नाही हो, गावकर्यांना त्यांची ओळख करून दिली). सर्वप्रथम हा मंत्र मी ऐकला तेंव्हा मला तो विनोद वाटला. मग शाळेंतील काही वात्रट पोरांनी त्यातील काही शब्दांची थोडी मोडतोड करून अश्लाघ्य शी गीते बनवली आणि त्या साठी शिक्षकांकडून ना भूतो न भविष्यती असा मार सुद्धा खाल्ला.
नरेंद्र महाराज ह्यांचे वैशिष्ट्य असे कि काही कारणास्तव ह्यांचे जितके भक्त तितकेच हेटाळणी करणारे. त्यामुळे सगळीकडे ह्यांचीच चर्चा व्हायची आणि लोक अक्षरशः हमरीतुमरीवर यायचे. अश्या प्रकारचा भावनिक पगडा आणखीन कुठल्याच संतांचा मी पहिला नाही. पण सदाशिव भट मग नरेंद्र महाराजांनी कसे चमत्कार केले ह्याची गाथा सर्वत्र सांगत मिशनरी पद्धतीने फिरायचे. खिशाला त्यांचा "बॅज" लावत असत (तुम्हाला हे ठाऊक नसेल तर गुगल करून पहा). मग त्यांची पुस्तके वगैरे विकायचे.
ह्यांना सर्वांची वर्में ठाऊक. कुणाला मूल होत नाही तर कुणाचे लग्न होत नाही, कुणाचा नवरा दुसरीला घेऊन बसलाय तर कुणाची मूळव्याध जाता जात नाही. मग ह्या सर्वाना हे ह्यांची भक्ती केलीस तर मुक्ती मिळेल म्हणून पासा फेकत. मग तो लागला कि स्वतःहून बस टेम्पो वगैरे करून नाणीजला वारी करत. पण कुणाचेही लग्न झाले नाही, मुलंही झाले नाही आणि मूळव्याध झालेली व्यक्ती मेली आणि नाणीज वाल्या बाबांचे प्रस्थ गावांत हळू हळू कमी झाले.
पण सदाशिव भाऊंचा उत्साह मात्र जराही कमी झाला नाही. त्याकाळी गोव्यांतील फोन्डा येथील सनातन संस्था बराच जोम घेत होती. ह्यांचे एक वर्तमान पत्र असायचे "सनातन प्रभात" ह्याला वात्रट मुले "सुन्याचें (कुत्रा) तोंड" म्हणायची. हा एक गजब प्रकार होता. ह्यांनी अध्यात्माचे पूर्णपणे गेमिफिकेशन केले होते. तर म्हणे रात्री चंद्र पाहिल्याने मनाची चंचलता ०.००००१% ने वाढते. इतर अंधश्रद्धाळू सारखे आम्ही अंध नाही आहोत, तर आम्ही वैज्ञानिक पद्धतीने अध्यात्माकडे पाहतो म्हणूनच तर आम्ही अश्या प्रकारे आकडेवारी देतो असा ह्यांचा दावा. मग म्हणे प्रत्येकाची "अध्यात्मिक पातळी" असते, ह्यांत लेव्हल ० ते लेव्हल ५ वगैरे असतात. मग आपण संत पदाला पोचता. आणि संतांच्या मध्ये सुद्धा लेव्हल, जसे कॅटेगरी १ स्टॉर्म वगैरे असतात तसे संत सुद्धा वेग वेगळ्या पातळीचे असतात. ह्याचा मोटो म्हणजे "सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा विनाश" असे काही तरी होती. मग सज्जन कोण आणि दुर्जन कोण ह्यांची उदाहरणे ते द्यायचे. २००१ साली भ्रष्टचाराविरुद्ध युद्ध पुकारून २०२० पर्यंत तो पूर्णपणे खतम करून सज्जांचे सात्विक राज्य ते आणणार होते. आता वर्ष २०२१ असल्याने ह्या मंडळींना सिंहावलोकन करून प्रोजेक्ट कुठपर्यंत आला आहे ह्याचा विचार करण्याची गरज आहे.
सनातनचे वर्तमान पत्र घरांत कुणालाच आवडायचे नाही पण मी हट्ट करून मागवत असे. भयंकर विनोदी वाटायचे मला. कारण प्रत्येक बातमीवर संपादकांची बोल्ड मध्ये टिप्पणी असायची. एक गोष्टीला मात्र मानलेच पाहिजे. प्रत्येक राजकारणी आणि प्रत्येक व्यक्तीवर टीका करायला हि मंडळी घाबरत नसे. इतर वर्तमानपत्रांत शब्दकोडी असत पण ह्यांच्या वर्तमानपत्रांत "सूक्ष्म शक्तीची परीक्षा" असे. तर दोन फोटो द्यायचे. एका बाजूला लालू यादव आणि दुसऱ्या बाजूला संत नरेंद्र महाराज. मग तुम्ही दोन्ही चित्रांकडे ध्यान करून पाहायचे. तर तुमची अध्यात्मिक लायकी असेल तर म्हणे लालूंच्या चित्रातून तुम्हाला "रज" लहरी जाणवतील तर नरेंद्र महाराजांच्या चित्रांतून सात्विक लहिरी. आणि काहीच जाणवत नसेल तर मग तुमची अध्यात्मिक लायकी नाही, जास्त नामस्मरण करा. मी स्वतःला दुर्जन समजत असल्याने मी काही पोस्टकार्डे ह्यांना लिहून उगाचच खोटे "सूक्ष्मातील अनुभव" पाठवले. ह्यांनी ते छापले सुद्धा. कदाचित संपादक पत्रे निवडताना आपला सूक्ष्माचा चष्मा घरी विसरले असावेत.
इतरांच्या वर्तमानपत्रांत देश विदेशाच्या बातम्या तर ह्यांच्या वर्तमानपत्रांत साक्षांत पाताळ आणि देवलोकांतील बातम्या असत. नारद मुनींनी कुणाला दृष्टांत दिला, कुणाच्या तरी घरावर राक्षसाने हल्ला केला असल्या बातम्या. तर इंग्लंड मधील एका साधिकेने "अनुभूती" पाठवली होती कि तिचं घरावर राक्षसांनी सूक्ष्म स्वरूपांत हल्ला केला तर तिने देवीचा धावा केला. तर म्हणे देवी वाघावर बसून अवतरित झाली आणि तिने राक्षसांचा संहार केला. इतकेच नव्हे तर वाघाला दाराच्या बाहेर बांधून देवी आंत सुद्धा आली आणि आशीर्वाद दिला. साधिकेने देवीला चहा सुद्धा विचारला पण ती अंतर्धान पावली. आता इंग्लंड आणि चहा ह्यांचे विनोद अनेक असतील पण हि म्हणजे हद्द झाली. \ हा सर्व प्रकार कमी होता म्हणून कि काय मग ह्यांनी एअर गन चालवणे, तथाकथिक कराटे वगैरे सुरु केले आणि वर अत्यंत घाणेरडी दिसणारे "ब्लाऊज" टाईप रक्षा जॅकेट सुद्धा विकू लागले. ह्या नंतर गणपती लक्ष्मी ह्यांची "खरी" चित्रे विकणे सुरु झाले. इतर चित्रे म्हणे राजसिक असतात पण ह्यांची देवांची चित्रे सात्विक. आमच्या घरी ह्या सर्व प्रकाराला एक मोठा विनोद म्हणून पाहत असू. सदाशिव भाऊ ह्यांचे खंबीर "साधक" झाले. रामनाथी कि कुठे तरी आश्रम वगैरे मध्ये जाऊन राहिले.
काही कालावधीत सनातन सुद्धा तितके लोकप्रिय राहिले नाही. प्रत्येक मंदिरांत होणारे "सत्संग" बंद पडले. तरीसुद्धा माझ्या पाहण्यात लोकांचा अध्यात्माकडे कल वाढला. गावांत इस्कॉन वगैरे नव्हते त्यामुळे नामजप तितका लोकप्रिय नव्हता पण सनातन मुळे नामस्मरण खूपच वाढले.
ह्या सर्व पार्शवभूमीवर सदाशिव भाऊंनी एक नवीन महिला संतांचे सत्संग सुरु केले. सदर संतांचे नाव मी घेत नाही. ते महत्वाचे सुद्धा नाही. सदाशिव भाऊ ह्यांनी तिला गांवात लोकप्रिय केले. तिचे पती सुद्धा संत होते आणि त्यांच्या नंतर त्या संत बनल्या. त्याची एक बायोग्राफी ह्यांनी आम्हाला वाचायला दिली त्यांत ह्या स्त्री संतांचे चित्र होते जमिनीवर पाटावर बसून स्टीलच्या पेल्यांतून देशी दारू पिताना आणि खाली मथळा होता "संतांचे विषयपान सुद्धा प्रमाणात असते". तर मला हि संत जाम आवडली.
हीचा सत्संग म्हणजे दर मंगळवारी कि काय काही स्त्रिया देवळांत जमून हिचा पाठ करीत, भजन वगैरे म्हणत. त्या २-३ तासांत देऊळ जवळ जवळ बंद व्हायचे. पुरुष मंडळींना मज्जाव होता असे नाही पण परंपरेने पुरुष ह्यांत सहभाग घेत नसत. भजन झाले कि "सत्संग" घ्यायला "सज्जन" म्हणून एक व्यक्ती यायचा. ह्याला मी पाहिले आहे. दूरच्या गावांत हा शिक्षक होता पण काही कारणाने ह्याला नोकरीवरून काढला. हा वैफल्यग्रस्त होऊन फिरत फिरत आधी सनातन आणि नंतर ह्या महिला संतांच्या नादि लागला. समानशीले मित्रता न्यायाने ह्याची मैत्री सदाशिव भाऊं शी झाली. सज्जन साधारण २६-२७ वर्षांचा असावा तर सदाशिव भाऊ किमान ५५. ह्यांची मैत्री चांगलीच प्रसिद्ध होती. दोघेही जण प्रत्येक दूरच्या गावी मंदिरांत, कुठल्या बाबा महाराजांच्या पायी डोके टेकवायला जायची. दोघांची अध्यात्मातील रुची इतकी ipl टीम ने कोहली रोहित शर्माला भाड्याने घ्यावे ह्या पद्धतीने सर्व अध्यात्मिक संघटना, धार्मिक संघटना ह्यांना भाड्याने घेत. सज्जन आज सनातन तर्फे सत्संग तर दुसऱ्या दिवशी आणखीन कुठल्या सद्गुरूंचे कीर्तन घेत असे. ह्याचे सदाशिव भाऊंच्या घरी येणे जाणे नेहमीचेच, मग जवळच्या मंदिरांत मंगळवारी संध्याकाळी महिलांचे भजन झाले कि सज्जन चा सत्संग. पुरुष मंडळी कलटी मारत पण भजनात अडकलेल्या महिलांना काढता पाय घेणे मुश्किल जायचे. मग सज्जन सदाशिवभाऊंच्या घरी जेवण करूनच आपली वेस्पा घेऊन घरी जात असे.
किती वेळा नामस्मरण केल्याने पातळी ०.०००२% नी वाढू शकते. किंवा निव्वळ डोळ्यांनी पाहून वस्तू हलविण्याचे कसब पहिल्या लेव्हल चे संत करू शकतात कि दुसऱ्या लेव्हल चे ? ह्या विषयांवर ह्यांची चर्चा. काही मंडळी मनोरंजन म्हणून ऐकत तर काही ह्यांना वेड्यांत काढत. आणि एक दिवस असा उजाडला कि सदाशिव भाऊंचे अध्यात्माचे भूत खाड्कन उतरले. उतरले म्हणजे काय ? तर भाऊंनी सांभाळून ठेवलेले कसले कसले बिल्ले, कवचे, पुस्तके, पत्रके बाहेर फेकून मारली. पुन्हा तोंडाने सनातन, किंवा महिला संतांचे नाव आले नाही.
चतुर वाचकांनी ताडलेच असेल. सदाशिव भाऊंची एकुलती एक कन्या, कुमारी भक्ती हिच्याशी सज्जन ने सूत जुळवले होते, जातीच्या फरकाने सदाशिव भाऊ लग्न करून देणार नव्हते आणि सज्जनला नोकरी वगैरे काहीच नव्हती. पण सज्जन ने एक दिवस प्लॅनिंग करून भक्ती बरोबर पलायन केले ते कायमचेच. भक्ती जाताना घरांतील बऱ्याच मौल्यवान वस्तू सुद्धा घेऊन गेली.
काही वर्षांनी मग हे जोडपे आपल्या बालकाला घेऊन परत आलेच. सज्जनला नागपूर मध्ये नोकरी मिळाली होती आणि भक्ती सुद्धा संसारांत रमून गेली होती. आता सज्जन सुद्धा प्रमाणात विषयपान करू लागला होता. सदाशिव भाऊंनी आध्यात्माचा नाद सोडला आणि आपल्या नातवाचा नाद धरला. चंद्राला पाहून मनाची चंचलता ०.००१% ने वाढते कि नाही देवास ठाऊक पण सदाशिव भाऊंना नातवाचे तोंड पाहून शेकडो पटीने आनंद झाला. त्यांनी तसेच इतर गावकर्यांनी जोडप्याला माफ करून आपलेसे केले.
पण आज अनेक वर्षांनी सुद्धा आमच्या गावांत कुणी माणूस व्यवहार ज्ञान सोडून अध्यात्माच्या मागे लागला तर सदाशिव भाऊंचे उदाहरण देऊन अश्या व्यक्तीचे पाय जमिनीवर आणले जातात.
वाचने
20559
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिले आहे....
> कुकुचकू म्हणजे .... कुठे
In reply to छान लिहिले आहे.... by मुक्त विहारि
वेळीच सांगीतले ते उत्तम
In reply to > कुकुचकू म्हणजे .... कुठे by साहना
वरील प्रतिसाद विनोदी आहे
In reply to छान लिहिले आहे.... by मुक्त विहारि
हा हा ...
आज काल असच आहे
तुम्ही गुरू व्हा
In reply to आज काल असच आहे by सत्य धर्म
छानच लिखाण
तो गण गण, हा गणी गण. केवढा
In reply to छानच लिखाण by सविता००१
चार शिष्य गोळा केले की,
In reply to तो गण गण, हा गणी गण. केवढा by प्राची अश्विनी
हाहा
In reply to तो गण गण, हा गणी गण. केवढा by प्राची अश्विनी
लेख वाचून हसू पण आले आणि त्या मनःशक्ती वाल्या स्वामी विज्ञानानंद
देवाला मध्यस्ताची गरज नसते
In reply to लेख वाचून हसू पण आले आणि त्या मनःशक्ती वाल्या स्वामी विज्ञानानंद by टर्मीनेटर
_/\_
In reply to देवाला मध्यस्ताची गरज नसते by मुक्त विहारि
_/\_
In reply to लेख वाचून हसू पण आले आणि त्या मनःशक्ती वाल्या स्वामी विज्ञानानंद by टर्मीनेटर
सहमत
In reply to लेख वाचून हसू पण आले आणि त्या मनःशक्ती वाल्या स्वामी विज्ञानानंद by टर्मीनेटर
मनशक्तीच्या स्वामींविषयी अजुन माहिती मिळेल काय?
In reply to लेख वाचून हसू पण आले आणि त्या मनःशक्ती वाल्या स्वामी विज्ञानानंद by टर्मीनेटर
इथे थोडी माहिती सापडली, एक
In reply to मनशक्तीच्या स्वामींविषयी अजुन माहिती मिळेल काय? by परिंदा
नक्की वर्ष आणि बाकी तपशील आता आठवत नाहीत
In reply to मनशक्तीच्या स्वामींविषयी अजुन माहिती मिळेल काय? by परिंदा
मनशक्तीच्या गर्भसंस्काराची
In reply to नक्की वर्ष आणि बाकी तपशील आता आठवत नाहीत by टर्मीनेटर
शोले मधला एक वादविवाद आठवला ....
In reply to मनशक्तीच्या गर्भसंस्काराची by परिंदा
क्लास!!
नम्ये हो रेंगे क्यो बद्दल...
"नम्ये हो रेंगे क्यो" आणि "पप्र"
In reply to नम्ये हो रेंगे क्यो बद्दल... by चित्रगुप्त
खुसखुशीत लेख
मस्त लेख
"जे लोक जे आपल्या लॉजिक मधे
In reply to मस्त लेख by ज्ञानोबाचे पैजार
ज्ञा.पै.,
In reply to मस्त लेख by ज्ञानोबाचे पैजार
हाहा, मस्त लेख.
अन्न आणि फेकाफेक
> नरेंद्र महाराजांनी खाल्लं
In reply to अन्न आणि फेकाफेक by गामा पैलवान
बिल्ला रक्षण करतो हे सिद्ध करता येऊ शकत नाही....
In reply to > नरेंद्र महाराजांनी खाल्लं by साहना
रामदेव बाबा
In reply to बिल्ला रक्षण करतो हे सिद्ध करता येऊ शकत नाही.... by मुक्त विहारि
ते एक वेगळे प्रकरण आहे ...
In reply to रामदेव बाबा by साहना
लस आणि खरी ? हाहाहा !
In reply to > नरेंद्र महाराजांनी खाल्लं by साहना
मान्य नाही.
In reply to लस आणि खरी ? हाहाहा ! by गामा पैलवान
उदाहरण हवंय
In reply to मान्य नाही. by साहना
हो.
In reply to उदाहरण हवंय by गामा पैलवान
कृपया दुवा द्यावा
In reply to हो. by साहना
> शरीरातल्या रोगप्रतिकारक
In reply to कृपया दुवा द्यावा by गामा पैलवान
साहना,
ह्याचा अर्थ आपल्या समाजाला
In reply to साहना, by गामा पैलवान
गामाजी, लस घेतल्याने रोगाची
In reply to साहना, by गामा पैलवान
लस व तिचे फायदे / तोटे
In reply to गामाजी, लस घेतल्याने रोगाची by पिनाक
लस घेतल्याने रोगा पासून बाधा
In reply to साहना, by गामा पैलवान
आरामखुर्चीतला सराव
In reply to लस घेतल्याने रोगा पासून बाधा by गवि
लस म्हणजे, पायलट प्लांट असतो...
साहना ताई एक विनंती
+१
In reply to साहना ताई एक विनंती by रंगीला रतन
अप्रतिम लेखमाला खुप छान