एप्रिलचा शेवटचा आठवडा. अचानक ठरलेल्या तळ कोंकण सहलीसाठी आम्ही दोघे व सोबत स्नेही मंडळीपैकी एक जोडपे असे चौघेजण रेल्वेने पनवेलहून रात्री दोन वाजता सावंतवाडीकरिता निघालो. कोंकण रेल्वेचा प्रवास पूर्वी केला असला तरी तो सर्व रात्रीचाच होता. यावेळी मात्र रत्नागिरीपासून उजाडले होते. वाटेत नदी-नाले ओलांडण्याकरिता बांधलेले पूल, हिरवेगार डोंगर, बोगदे बघत व कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्टेशन मागे टाकत सकाळी साडे अकराच्या सुमारास सावंतवाडी रोड स्टेशनला पोहचलो.
शहर स्टेशनपासून थोडेसे दूर आहे. १५-२० मिनिटात हॉटेलवर पोहचलो. ताजेतवाने होऊन जेवणही आटोपले. आमच्या स्नेह्यांचे एक परिचित येथे आम्हाला भेटण्यासाठी आले होते. त्यांच्याशी चर्चा करून आजचा अर्धा दिवस व अजून पुढचे दोन दिवस कशी भटकंती करायची याचा आराखडा ठरवला. त्यांच्याच ओळखीने भाड्याने गाडीही ठरवली.
भटकंतीची सुरुवात रेडीच्या गणेश दर्शनाने केली. सावंतवाडीहुन निघून सुमारे तासाभरात (३२किमी) आपण येथे पोहचतो. रेडी हे वेंगुर्ले तालुक्यातील गाव असून येथील मूर्ती उत्खननात सापडली आहे. सहा फूट उंचीची ही मूर्ती द्विभुज असून जांभ्या दगडात साकारली आहे.
येथून जवळच म्हणजे अवघ्या सहा किमीवर असणाऱ्या तेरेखोल (Tiracol) किल्ल्याला पोहचलो. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असले तरी हा किल्ला गोवा सरकारच्या ताब्यात आहे. हा अगदी छोटासा किल्ला असून सुस्थितीत आहे. सध्या किल्ल्याचे रूपांतर एका हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. किल्ल्याला सुबक बांधीव तटबंदी व एक बुरुज आहे, आतमध्ये एक चर्चही आहे. तटबंदीला लागूनच समुद्र असल्याने हॉटेलमधे बसल्या जागेवरून किनारपट्टी व सागराचे रूप न्याहाळता येते. किल्ल्यात प्रवेश निःशुल्क आहे मात्र काही पेय अथवा खाद्य पदार्थ मागविल्यास हेरिटेज हॉटेलला साजेसच बील येते.
फेसाळती कॉफी आणि फेसाळता समुद्र. आहाहा !
येथून शिरोडा येथील बीचवर पोहचलो. किनाऱ्यावर सुरूचे बन आहे. तेथेच गाडी लावली व समुद्रकिनारी आलो. लांबच लांब तांबूस सोनेरी वाळूचा किनारा असून येथे घोड्यांची किंवा उंट स्वारी करता येते. समुद्राला छान भरती आलेली होती. आज अजून एका ठिकाणाला भेट द्यायची असल्याने भिजायचे टाळले.
समुद्र,सोनेरी वाळू आणि मागे सुरूचे बन
पुढे वेंगुर्ले तालुक्यातीलच अरावली येथील 'श्री देव वेतोबा ' मंदिरास भेट दिली.
अरावली गावाचा संरक्षक म्हणून वेतोबाची उपासना केली जाते. मूर्ती पंच धातूंपासून बनविलेली असून उंची नऊ फूट, एका हातात तलवार व एका हातात अग्निपात्र आहे. देवाला केळी, साखर, पेढे, लाडू याचा नैवद्य दाखवला जातो. देवाला नव्या चामड्याच्या चपला अर्पण करायची पद्धत आहे. वेतोबा गावचे रक्षक असून त्यासाठी ते चप्पल घालून रात्री संपूर्ण गावात फेऱ्या मारतात असा समज आहे.
अंधार पडायच्या सुमारास सावंतवाडीला परत आलो. येथील भालेकर यांच्या खाणावळीबद्दल मासे खाणाऱ्या लोकांकडून खूप कौतुक ऐकले होते. मी सोडून इतर तिघांनाही मासे आवडत असल्याने आज रात्रीचे जेवण तेथेच केले. जेवण चांगले व दरही वाजवी असले तरी दाटीवाटीने बसलेले लोक, माशांचा उग्र वास इ. मुळे ही जागा मला स्वतःला तरी इतकी काही आवडली नाही. रात्र झाली होती आणि थोडा थकवाही आलेला होता त्यामुळे आता जास्त कुठेही न फिरता हॉटेलवर जाऊन निद्राधीन झालो.
आज भटकंतीचा दुसरा दिवस
सकाळी आठपर्यंत सर्व आवरून हॉटेल सोडले. भटकंतीसाठी काल ठरवलेली गाडी हजर होतीच. चहा,नाश्त्यासाठी एखाद्या चांगल्या ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. त्याप्रमाणे चालकाने अगदी जवळच असलेल्या "साधले मेस" येथे गाडी थांबवली. खानावळीत पादत्राणे काढून प्रवेश करावा अशी पाटी बघून गंमत वाटली. हॉटेल नुकतेच उघडले होते. आतमध्येही दरपत्रक व वेगवेगळ्या पाट्या लागल्या होत्या. चौघांनी वेगवेळ्या चार पदार्थांची ऑर्डर दिली. स्वयंपाकगृहात मालक मंडळीपैकीच दोघी जणी (बहुतेक जावा-जावा) कामाला लागल्या . थोड्याच वेळात गरमागरम नाश्ता टेबलवर आला. आणि काय सांगू सर्वच पदार्थ अगदी चविष्ट होते. स्वच्छता, टापटीप एकदम भारी.
त्यांच्याकडे वरच्या मजल्यावर राहण्यासाठी रूम देखील आहेत. त्याही आम्हाला दाखविल्या पण आज सावंतवाडीला परत येणार नव्हतो म्हणून पुढच्यावेळी बघू असे म्हणून तेथून निघालो.
सहल फक्त कोकणची असली तरी गोव्याच्या अगदी सीमेवर आलो आहोत तर गोव्याच्या एखाद्या बिचला भोज्जा करून येऊ असे ठरवले. रस्ता छान होता. आजूबाजूने काजूची झाडेही दिसत होती.
साधारण तासाभरात तेरेखोल नदीवरील पूल पार करून गोव्याच्या हद्दीत शिरलो आणि हरमळ (अरंबोल) समुद्र किनारी पोहचलो. जास्त गर्दी नव्हती. किनाऱ्यावर शिरलो त्याच्या उजव्या बाजूला उंच दगडी सुळके आणि त्यावर धडकणाऱ्या लाटा दिसत होत्या. तेथपर्यंत फेरफटका मारून येऊ म्हणून किनाऱ्याने चालत निघालो.
वाळूचा किल्ला बांधत असणाऱ्या दोन गोड चिमुरड्या
बीच संपला पण सुळक्याकडे जायची वाट सापडली नाही. विचारणा केल्यावर कळले कि पुढे दुतर्फ़ा दुकानाची रांग आहे त्यामधील चिंचोळ्या वाटेने चालत जायचे. त्या वाटेने निघालो. बीचवर घालायसाठीचे खूप छान छान रंगीबेरंगी पोशाख दिसत होते. मलाही मोह झाला. घासाघीस करून दिडशे रुपयाला एक ड्रेस विकत घेतला व 'जसा देश तसा वेष' या उक्तीला अनुसरून लगेच परिधानही करून घेतला. सुळक्यांपर्यंत पोहचून त्यांच्यावर चढाईचाही आनंद लुटला.
दुकानांची रांग वळण घेऊन अजूनही पुढे जात होती. त्या वाटेनं अजून थोडे पुढे गेलो तर काय अजून एक शांत, स्वच्छ बीच नजरेस पडला. येथे बहुतेक विदेशी पर्यटक दिसत होते. किनाऱ्याच्या एका बाजूला बाजूला गोड्या पाण्याचे सरोवर व हिरवागार डोंगर आहे. बिचचे नाव पालीअम (Paliyem) / Kalacha Beach असल्याचे समजले. हा बीच लपलेला असल्याने याला हिडन बीच/सिक्रेट बीच असेही म्हटले जाते. येथपर्यंत पोहचायला थोडी पायपीट करावी लागते त्यामुळे बरेचशे पर्यटक इकडे फिरकत नाहीत.
या बिचला किनाऱ्याने जांभ्या दगडाचे खडक आहेत. त्यावर पाण्यात पाय सोडून बसायला खूप मस्त वाटते
आपल्याला गरज नाही तरी एक अनुभव म्हणून किंवा गंमत म्हणून सूर्यस्नान घेतले
का कुणास ठाऊक पण या हिडन बिचला माझे फोटो काढत असताना नवऱ्याचं क्लिक करण्याचं टायमिंग मात्र चुकत होतं!
याच बीचला आम्हीही समुद्रात डुंबण्याचा मनमुराद आनंद घेतला. गाडीकडे परत येताना दुकानांच्या रांगेतील एका हॉटेलात जेवण केले. स्वस्त आणि चवही मस्त. दुपार टळून गेली होती. तीन-साडेतीन तासात जीवाचं गोवा करून परत निघालो महाराष्ट्राच्या हद्दीतील वेंगुर्ल्याकडे.
क्रमश:
तळ कोंकण २०१८ : भाग 2
वाचने
17052
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम!
एक_वात्रट
In reply to उत्तम! by एक_वात्रट
व्वा, भारी वर्णन !
मस्त प्रवास वर्णन. दोन्ही
कोकण आणि तळकोकण आहेच भारी,
सुरेख वर्णन अणि फोटो.
आवडले हे आवर्जून
मस्त
खुपच छान माहिती दिली आहे.
मस्त भटकंती
अभिप्रायाबद्दल
झकास.
धन्यवाद कंजूस.
खूप छान. त्या तेरेखेल
सुंदर लेख आणि फोटो!
या वाक्याने लेखाचा एंटरटेनमेंट क्वोशंट वाढला.
वर्णन आणि फोटू लैच आवडले
धन्यवाद अनिंद्य, अथांग आकाश, ज्ञानोबाचे पैजार
तळ कोंकण २०१८ : भाग १
सुंदर!
दोन्ही मंदिरे आणि समुद्रकिनारे मस्त
लेख आवडला
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
छान लिहिलंय. आम्ही पण पंधरा