मी आणि माझा न्यूनगंड - 2
हो मला माझ्या न्यूनगंडाचा अभिमान आहे!!
चक्रावलात? चक्रावण्यासारखेच आहे. मोठाच विरोधाभास आहे ना? पण विश्वाच्या पसाऱ्यात मी इतका क्षुद्र आहे की मला न्यूनगंड आलाच पाहिजे.
जगात जे शून्य आहे तेच जरी माझ्यात असले, तरी मेंदूच्या रासायनिक अभिक्रिया आणि त्यातून उठणारे हार्मोन चे कल्लोळ यातून अजूनतरी मी मुक्त नाही..
साक्षीभाव श्रेष्ठ की आनंद श्रेष्ठ हे अजूनही मला कळले नाही. काहीवेळा वाटते की साक्षीभाव आला की आनंद आपोआप येईल , तर कधी वाटते साक्षीभाव हे आनंदाचेच बाय प्रॉडक्ट आहे.
शेवटी मी म्हणजे कोण?
हा देह? नाही नाही
मग या देहातील अस्तित्व?
अस्तित्व म्हणजे काय?
ज्यामुळे देहाला देहत्व येते.. अस्तित्व गेले की उरते ते प्रेत. पण मग माझ्या इच्छा आकांक्षा या माझ्या देहाशी निगडित आहेत की अस्तित्वाशी? मग देह संपला की माझ्या वासनांचे काय होते? त्या पण देहाबरोबर जळतात का?
जळत असतील तर मग अस्तित्वाचे काय प्रयोजन?
मग असे काही आहे का जे देह आणि अस्तित्व यांच्यामध्ये आहे? असे काही आहे का जे देहाशी अस्तित्वाला जोडून ठेवते?
मग मी म्हणजे कोण? देह, अस्तित्व की हा दुवा? माझा देह संपल्यानंतर देखील हा दुवा अस्तित्वात राहणार का?व्हायरस च्या receptor सारखा? जोडणारी पेशी मिळाली की पुन्हा छापखाना सुरू?
मग यातून सुटणार कसे? आणि असे किती receptor असतील?
हे व्हायरस किंवा receptor निकामी केले तर? मला जाणवणारे माझे अस्तित्व मुळात त्या receptor मुळेच आहे, नाही का?
ते receptor गेले तर मग मी पुन्हा अनंत अविनाशी होणार!! पण मग त्यात मजा काय आहे?
मी अनंत अविनाशी असण्यात काय आनंद आहे? ते तर मी आहेच..
शरीर म्हणून माझा आनंद हा मी अविनाशी असण्याच्या जाणिवेमुळे आहे.. एकाच वेळी आपण देहात आहोत आणि अविनाशी पण आहोत या जाणिवेत आहे.. मुळात आनंद ही संकल्पनाच एकप्रकारे शारीर आहे, नाही का? ती देखील एक भावनाच आहे.
म्हणजे आनंद हवा असेल तर शरीर हवे. पण सत्याची जाणीव पण हवी..
तुका म्हणे गर्भवासी
सुखे घालावे आम्हांसी.
गुण गाईन आवडी
हेचि माझी सर्व जोडी.
आम्ही छोटे असण्यातच आमचा आनंद सामावलेला आहे, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.
सगळेच कसे एकत्र मिळणार? पुन्हा न्यूनगंड!!
पण आपण सगळे एकाच रस्त्यावरचे प्रवासी.. कोणाचा मुक्काम आधी येतो तर कोणाचा नंतर.
तो माझ्या आधी पोचला तर? मला भीती वाटते? पण मला का भीटी वाटावी? त्याने वाटचाल कधी सुरू केली मला कुठे माहितेय?
त्याचा पाय घसरला तर? मी त्याला ओळखतो, त्याचा पाय घसरू नये..
अरे पाय घसरत आहे हे ठरवणारा तू कोण? अस्तिव, जे अमर आहे ते ठरवेल ना..
पण मी त्याला ओळखतो..
तू कोणाला ओळखतोस? त्या देहाला, की त्या अस्तित्वाला? देहाला ओळखत असलास, तर जे मुळातच भासमान आहे त्याच्या अधःपतनाची तुला कसली भीती? जर अस्तित्वाबद्दल बोलत असशील तर अस्तित्व मुळात अपरिवर्तनीय आहे.. त्याचे कसले आलेय अधःपतन?
गरगरायला झालंय!
ठेविले अनंते तैसेचि राहावे
चित्ती असू द्यावे समाधान.
न्यूनगंड अच्छे होते है.. आपल्याला काही कळत नाही ही ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी असते.. आपण आताशी पहिली पायरी चढतोय.. पुढच्या पायऱ्या यथावकाश येतीलच..
प्रत्येक वेळी हीच पहिली पायरी आहे याची जाणीव असेल तर आनंद काही फार दूर नाही!
काय म्हणता?
(समाप्त.. काही भाग मिपावरच्या काही चर्चांसाठी प्रतिक्रियात्मक म्हणून आलाय, पण तो आता काढून टाकावसा वाटत नाहीये)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जगायला काहीतरी गंड लागतातच
खरे आहे तुम्ही म्हणताय ते.
न्यूनगंड ह्या शब्दाचा अर्थ
सर्वज्ञानी गेले
हा हा हा
हो ना.. आता ही पोस्ट
रगरतंय? मेलोय वाचताना असे
मज पामराला हेच वाटत!
तर कधी वाटते साक्षीभाव हे
असे का बरे वाटते तुम्हाला?