कोमेजलेला सोनचाफा
सोनचाफा आवडतो मला; विशेषतः त्याचा सुगंध. सगळ्यांनाच आवडत असणार. बर्याच वर्षांपूर्वी दादर स्टेशन बाहेर पहिल्यांदा बघितला आणि घेण्याआधी वास घेऊन बघत होतो तर फुलवाल्या आजी म्हणाल्या, "बाळा, वास घेऊ नये. देवाला वाहतात फुलं!"
आज थंडी वाढली आहे तशी, संध्याकाळी बाहेर जाताना अंधार पडल्यावर गाडीच्या काचा बंद करून हीटर मोड वर चालू होता एसी. एका सिग्नलला गाडी थांबली आणि बहुतांशी रस्त्यावर राहणारी माणसं काहीबाही विकायला घेऊन आली.
कुठेतरी वाचलेले आठवते की अशा लोकांना पैसे देऊन उत्तेजन देऊ नका. पळवून नेलेली मुलं घेऊन भीक मागतात. किंवा विनाकारण काही वस्तू गळ्यात मारतात वगैरे.
मलाच अलीकडे शिवाजी पार्कच्या बाहेर अनुभव आला. दोन्ही मुलींना सोबत घेऊन डोनटचा बॉक्स हातात घेऊन चाललो होतो, तर फूटपाथवर एक कुटुंब होत त्यातला ७-८ वर्षाचा मुलगा आणि छोटी मुलगी तो खाऊ जणू आपल्या हक्काचा आहे अशा अविर्भावात उड्या मारून ते हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत होते. मुली घाबरल्या. हटकल्यावर १० रूपये द्याच म्हणू लागला.
त्यामुळे अशा मुलांबाबत वाईट वाटत असलं तरी काही सांगता येत नाही.
तर सिग्नलवर सोनचाफ्याच्या फुलांचा गजरा घेऊन एक लहान मुलगी दिसली. फुलं थोडी कोमेजलेल्या सारखी वाटत होती. निदान त्या मुलीला मदत म्हणून घ्यावी अशी इच्छा झाली होती पण covid मुळे घेता आली नाहीत याच वाईट वाटल. आपला पांढरपेशी विचार; हात sanitize नसेल त्यांचा वगैरे.
आश्चर्य म्हणजे, त्या मुलीने उगाच काचेवर टकटक न करता बाजूला फूटपाथ वर गेली आणि माझे लक्ष गेले की तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे.
जेमतेम 12-13 वर्षाची असेल.
अशा गोष्टींकडे आपण जरा शंकेनेच बघतो की मुद्दाम लहान मुलांना पुढे करतात किंवा व्यंग्य आहे अस भासवतात, त्यामुळे नीट बघितले आणि दिसले की हातात काचेच्या बांगड्या, पायात जोडवी. त्यामुळे निश्चित लग्न झालेले होते.
एवढ्या लहान वयात लग्न... उडालोच मी. कुठे आहे आपला बालविवाह प्रतिबंधक कायदा!
कट्ट्यावर बसून तिच्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठ्या मुलासोबत बोलत बसली. माझी नजरानजर झाली आणि तिचे डोळे बघून सुन्न झालो. कारण त्या निष्पाप मुलीच्या डोळ्यात ना कुठले स्वप्न, ना कुठली चिंता. निर्विकार वाटली आणि ती नजर कुठेतरी ओरखडा उठवून गेली. वाटले, गजरा घ्या म्हणून मागे लागली असती आणि आपण आपल्या परिघात राहून लांब जा म्हणून हटकले असते तर एवढे विचार आलेच नसते. किती पळवाटा काढतो ना आपण.
परत येताना दुसर्या सिग्नलला तिच्यापेक्षा एखाद्या वर्षाने मोठ्या असणार्या मुलीने गळ्यात झोळी बांधली होती आणि तान्हे बाळ होते.
खरच सोनचाफा कोमेजून गेला होता!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वास्तवदर्शी लेख आवडला.
छान लिहिले आहे.
वा !
खूप छान.
सिग्नल किंवा मॅकडोनाल्ड जवळचा अनुभव सार्वत्रिक आहे
धन्यवाद!
हीटर
छान लिहिलंय...
त्रासदायक
धन्यवाद!
सुन्न करणारा लेख. बाकी आपल्या