
थप्पड सिनेमा पाहून तसे बरेच दिवस झाले होते, पण तरीही तो मनात रेंगाळत राहिला होता. चित्रपटाचं कथानक किंवा साैंदर्यस्थळं सांगण्याचा माझा हेतू नाही. पण मूळ हेतू समजण्यासाठीच मध्यवर्ती कल्पना सांगायची झाली, तर चित्रपटाची नायिका अमृता हिला तिचा नवरा (त्याला नायक म्हणू की खलनायक? या विचाराने जरा गोंधळात पडले, मग हा शब्द अधिक चपखल बसला.) एका पार्टीमध्ये सर्वांसमक्ष एक थप्पड मारतो आणि तिथून सिनेमा सुरू होतो.
चित्रपट पाहिल्यापासून मेंदूच्या cerebral cortexमध्ये प्रचंड उलथापालथ. लिहावंसं वाटत होतं, पण सगळे विचार वेगवेगळ्या प्रतलावरचे. शेवटी स्वतःहोऊन लेकीसमोर गेले. तिने ओळखण्याची वाट न पाहता शरणागती पत्करली. तिला म्हटलं, "एका विषयावर लिहावंसं वाटतंय.. but all thoughts are so random.." तिने आयपॅडमधून डोकं काढत म्हटलं, "So what? Stars too are random. You don't need to bring them closer. Just draw an imaginary line between them to make them form a constellation." मी अगदी सद्गदित होऊन, कार्य सिद्धीस जाण्यासाठी तिचा आशीर्वाद घ्यावा का, या विचारात असतानाच मला अंगठा दाखवून ती पुन्हा आयपॅडमध्ये बघत ध्यानस्थ झाली.
...तर सिनेमातील ही थप्पड दिसली. अशा थपडा निमूटपणे सहन करणाऱ्या किंवा मारली एखादी थप्पड तर काय मोठंसं? असं म्हणत मानसिक गुलामगिरी स्वीकारणाऱ्यादेखील अनेक स्त्रिया आहेत. पण मी पाहिलेल्या किंवा खाल्लेल्या परंतु न दिसलेल्या थपडा मला आठवताहेत..
प्रसंग तसा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा, पण माझ्या पायाखालची जमीन सरकल्याचा.
मी पाचवी/सहावीत असेन, शाळेत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली होती. अगदी प्रमुख पाहुण्यांकडून बक्षीस घेऊन स्टेजवरून खाली उतरले, तरी यादी संपत नव्हती. मग समोर बसलेल्या सर्व पालकांमधून वाट काढत आईकडे गेले. सगळे काैतुकाने माझ्याकडे आणि तिच्याकडे बघत असल्यासारखं उगाच वाटत होतं. आईकडे सर्व प्रशस्तिपत्रकं, बक्षिसं सोपवली आणि जायला निघणार, तोच बाजूला बसलेल्या काकींचे शब्द कानावर पडले.. "बघा वहिनी, ..आणि तुम्हाला मुलगी नको होती..." आईला मी नको होते? मी नको असणं हे आईचं मत होतं की बाबांनी तिच्यावर नकळत लादलेलं त्यांचं मत होतं की त्यांची दहशत होती, हे कळण्याचं ते वय नव्हतं. पण थप्पड मात्र सणसणीत पडली होती.
त्याच दरम्यान कधीतरी आज्जीला बाबा सांगत असताना ऐकल्याचं आठवतंय.. कशावरून ते नीटसं आठवत नाही, पण त्यांचं वाक्य आठवतंय. "काय करणार! तुमच्या मुलीने तिन्ही मुलीच दिल्या ना.." आईने का असं केलं? द्यायला हवा होता एक मुलगा, असं वाटून गेलं होतं तेव्हा. नंतर नववीत असताना गुणसूत्रांची कमाल कळली. स्त्रियांमध्ये XX असतात आणि पुरुषांमध्ये XY, त्यामुळे मुलगा किंवा मुलगी होणं हे स्त्रीवर अवलंबून नसून पुरुषावर अवलंबून असतं, हे कळल्यावर कधी एकदा घरी येऊन आईला सांगते असं झालं होतं. तिला त्यातलं सायन्स किती कळलं होतं माहीत नाही, पण आपण निर्दोष आहोत हा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तरीही ताईचं लग्न जमवताना तिच्या आईला तिन्ही मुलीच आहेत तर तिलाही मुलीच होतील या कारणावरूनही एक-दोन स्थळांकडून नकार आलाच आणि एकाच थपडेत मायलेकींना दोघींना गारद केलं गेलं.
पुढे मी फर्स्ट क्लासमध्ये M.Sc. उत्तीर्ण झाले. वय वर्ष साधारण २२-२३. रिझल्ट घेऊन घरी आल्यावर बाबांनी विचारलं, "आता पुढे काय विचार आहे?" मी म्हणाले, "काॅलेजमध्ये शिकवण्यासाठी निदान बी.एड. तरी करावंच लागेल. एक वर्ष आणखी."
यानंतर एक मोठा पाॅज... "हम्म, मुलगा असता तर एव्हाना एखादा टेंपो /ट्रक काहीतरी घेऊन दिला असता. ट्रान्सपोर्टसारख्या एखाद्या बिझनेसमध्ये मार्गाला लागला असता कधीच." मला काही कळेचना. माझ्यापेक्षा कुवतीने सुमार असता तरी चाललं असतं, पण अजूनही मुलगा हवा होता ही खंत होतीच? माझं वाढणारं वय आणि शिक्षण, नोकरी, लग्न असा जमाखर्चाचा ताळमेळ जुळला नसेल बहुतेक आणि मला आणखी एक थप्पड बसली.
आतापर्यंत अशा प्रसंगांमुळे थोडी बंडखोरी रुजू पाहत होती, त्यात आजूबाजूच्या परिस्थितीने चांगलाच गैरसमज करून दिला की Cooking is a gender based skill, मग मुद्दाम त्याकडे पाठ फिरवली. यथावकाश लग्नघटिका समीप आली. पण लग्न करायचं म्हणजे उत्तम स्वयंपाक करता येणं हा मुलींसाठी eligibility criterion. त्यात पुन्हा पारंपरिक पद्धतीने लग्न जमवण्याची वेळ. मग अगदी जेवण बनवता येतं का? असं विचारलं तर 'हो सांग' असेही सल्ले मिळाले. पण ठरवलं होतं, 'जो भी कहूँगी, सच कहूँगी। सच के सिवा कुछ नही कहूँगी।' ...आणि नशीब फिरलं. म्हणतात ना, Opposite poles attract! तसंच झालं. समोरून I love cooking येताच भरून पावले. बाकी सगळं तर जुळून आलं होतंच. एव्हाना Cooking is an essential skill for everyone, irrespective of gender हे कळल होतं. निदान पूर्वग्रहदूषित तरी मी आता नव्हते. त्यास पोषक वातावरणही सासरी मिळालं.
असं असलं तरी आपल्या आजूबाजूला जे घडताना आपण पाहत असतो, त्यानुसारच आपण घडत असतो याचा प्रत्यय आलाच.
एका नातेवाइकाकडे धावती भेट द्यायला गेलो होतो. त्या काकांकडे अनुभवाची मोठी शिदोरी. त्यात त्यांना लाभलेला पु.ल.देशपांडे, जयवंत दळवी यांसारख्या साहित्यिकांचा सहवास. माझ्या आवडीच्या गोष्टी. त्यामुळे दिवाणखान्यात गप्पांना रंग चढला नसता तर नवल. इतक्यात नवऱ्याने चोरट्या नेत्रकटाक्षाने स्वयंपाकघराच्या दिशेने खूण केली आणि तिकडे जाऊन बस असं सुचवलं. जणू माझी चुकलेली जागाच दाखवून दिली... आणि मला आणखी एक थप्पड बसली.
पण या वेळी फरक हा होता की मी हे मोकळेपणाने बोलू शकले, कारण समोरच्याच्या समजून घेण्याच्या कुवतीवर माझा विश्वास होता. त्यामुळे नंतर असा प्रसंग कधीच आला नाही.
असं ऐकलं होतं की मुलींना बऱ्याचदा त्यांच्या बाबांसारखाच नवरा हवा असतो. मला नव्हतं पटलं कधी ते... पण लेक मात्र एकदा म्हणाली, "आई, मला नवरा शोधून देशील ना, तो बाबासारखा दे."

Stars too are random. You don
जिव्हाळ्याचा विषय ......
In reply to जिव्हाळ्याचा विषय ...... by सुधीर कांदळकर
चांगला लेख आणि काही अनुभव
सुरेख लेखन
अस्वस्थ करणारे कटु अनुभव .
दिपालीजी अगदी माझ्या मनातलं
खरं आहे
असे प्रकार प्रत्यक्ष पाहिले/अनुभवले नसले
आईला मी नको होते? >> टचकन
"बघा वहिनी, ..आणि तुम्हाला मुलगी नको होती..."
प्रभावी, तरल लेखन !
अजूनही बर्याच ठिकाणी ही मानसिकता दिसते
प्रांजळ, प्रामाणिक अनुभवकथन
मस्त
सर्व प्रथम सगळ्या वाचकांचे
थोडंसं लेखाबद्दल....
खरंतर कोणतीही घटना ही स्वतंत्र नसते, तिच्या मागच्या पुढच्या, आजुबाजूच्या संदर्भाने ती असते. आपल्या समाजव्यवस्थेमुळे मुली लग्न होऊन सासरी जाणार त्यामुळे आर्थिक सपोर्ट आपल्याला मिळणार नाही, असं वाटलं असेल माझ्या बाबांना कदाचित आणि प्रत्येक व्यक्तीत गुणदोष असतातच. मीही अपवाद नाहीच, एका दोषामुळे ती व्यक्ती वाईट होत नाही. बाबांच्या इतर अनेक गोष्टी आहेत की for which i m proud of him. असं नाही की he didn't love us. He too gave freedom to us,पण परिस्थितीमुळे असे विचार झाले असतील. माझा हेतू माझं आत्मचरित्र लिहायचा किंवा बाबांचं व्यक्तिचित्रण करायचा नाही. त्यामुळे लेखातील आशयाच्या अनुषंगाने जे योग्य वाटलं तेवढ्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे व्यक्तीबद्दल judgemental न होता परिस्थितीबद्दल होणं अपेक्षित होतं. इथल्या चोखंदळ वाचकांनी माझा अपेक्षाभंग केला नाही. हाच लेख मी नंतर फेसबुकवरही शेयर केलेला. तिथे काही जणी व्यक्त झाल्या. काही कदाचित आता आठवूनही बघत असतील कारण या गोष्टी इतक्या अंगवळणी पडल्या असतात की एकतर जाणीवेच्या पलीकडे असतात किंवा विस्मृतीत तरी गेलेल्या असतात. प्रत्येकाचा time zone वेगळा असतो, त्यामुळे त्यानुसार त्या त्या वेळी त्याचे आकलन होईल किंवा एखाद्या व्यक्तीला होणारही नाही, पण असो, बीज पेरल्यानंतर त्याचे रुजणे हे जमीनीच्या सुपीकतेवर अवलंबून असते, शुष्क जमिनीत किंवा दलदलीत दोन्हीकडे ते सहसा कठीणच ! खरंतर 'मुलगा काय किंवा मुलगी काय आम्हाला दोन्ही सारखंच' असं म्हणणं यातही कुठेतरी नाइलाजास्तव समाधान मानून घेतल्यासारखं वाटतं. मुलगा आणि मुलगी समान नाहीतच, निसर्गाने शरीरभेद केला आहेच, पण तो भेद superior inferior मध्ये व्यवस्थेने convert केला आणि त्या दृष्टीने कामांमध्येपण तसेच दोन गट पडले. मुली शिकल्या, कमावत्या झाल्या, पुरुषांची कामे करु लागल्या पण उलट चित्र आजही अभावानेच दिसते. त्यामुळे खूप मोठी जवाबदारी खरतर मुलांना(boys) वाढवणार्या पालकांवर आहे. आपण बघत असलेल्या प्रसंगातून आणि आपल्याला येणाऱ्या अनुभवातून आपण घडत असतोच,पण त्यापेक्षा त्या घटनांचं perception आपण आपल्यावर कसं करुन घेतो त्यातून आपण अधिकतर घडत असतो.In reply to सर्व प्रथम सगळ्या वाचकांचे by मी-दिपाली
+१
In reply to सर्व प्रथम सगळ्या वाचकांचे by मी-दिपाली
सुंदर प्रतिसाद, मी-दिपालीजी !
छान
दिपाली झणझणीत अंजन घालणारा लेख वाटला
मुलगा आणि मुलगी समान नाहीतच, निसर्गाने शरीरभेद केला आहेच, पण तो भेद superior inferior मध्ये व्यवस्थेने convert केला आणि त्या दृष्टीने कामांमध्येपण तसेच दोन गट पडले. मुली शिकल्या, कमावत्या झाल्या, पुरुषांची कामे करु लागल्या पण उलट चित्र आजही अभावानेच दिसते. त्यामुळे खूप मोठी जवाबदारी खरतर मुलांना(boys) वाढवणार्या पालकांवर आहे.हे मला शंभर टक्के पटलंय. माझ्या आजोबांनी सत्तरीच्या कालखंडात माझ्या आईसहीत दोन्ही मावशांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावून नोकरी करायला लावून स्वावलंबी बनवलं होतं,. आमच्या घरात मी व माझी बहीण दोघीही स्वतंत्र वातावरणात वाढलो कधीही भेदभाव वाट्याला आलाच नाही. पण बाहेर मात्र हा भेदभाव प्रकर्षांने जाणवायचा व चीड यायची. उदा. बाहेर कुणीही विचारलं की तुम्हाला भाऊ? यावर 'नाही . आम्ही दोघी बहीणीच' असे उत्तर दिले की हमखास अरेरे! असा प्रतिसाद असायचा. आईने मोठी झाल्यावर एक मजेशीर आठवण सांगितली होती. मी दुसरी मुलगी जन्माला आले. घरात कुणालाच वाईट वाटायचे कारण नव्हते. हॉस्पिटलमध्ये असणारे सर्वजण माझे कोडकौतुक करण्यात दंग होते. तेवढ्यात दुसर्या वॉर्डातील बाळंतीणीचे नातेवाईक काय झालं ते पाहायला आले. आजीने मुलगी असं सांगताच मला न पाहताच ती स्त्री हुं असा तुसडा स्वर काढून निघून गेली. विशेष म्हणजे असं तीन चार जणांनी केलं. आई व आजीची हसून हसून पुरेवाट झाली. असा तत्कालीन समाज असतानाही ज्या पद्धतीने आम्हाला घरात वाढवलं गेलं त्याबद्दल मी ऋणी आहे. सुदैवाने सासरी देखील माझा नवरा व दीराला सासूबाईंनी अतीशय चांगले वळण लावले आहे. दोघेही घरकामात जबाबदारीने मदत करतात. प्रत्येक गोष्टीत बरोबरीने सहभागी केले जाते व मत विचारात घेतले जाते. त्यामुळे आम्हा दोघांनाही ही आमची जबाबदारी वाटते की मुलाला बाकीच्या गोष्टी शिकवताना घरकाम व त्यानुषंगाने येणारी जबाबदारी ही शिकवलीच पाहीजे. तो आता लहान असला तरी बरीच छोटी छोटी कामे त्याला जाणीवपूर्वक करायला लावतो. तुमचे अनुभव वाचून काळजात चर्र झालं अगदी.खरंतर कोणतीही घटना ही स्वतंत्र नसते, तिच्या मागच्या पुढच्या, आजुबाजूच्या संदर्भाने ती असते. आपल्या समाजव्यवस्थेमुळे मुली लग्न होऊन सासरी जाणार त्यामुळे आर्थिक सपोर्ट आपल्याला मिळणार नाही, असं वाटलं असेल माझ्या बाबांना कदाचितहेही पटतं कारण कोणतेही पालक वाईट नसतात पण एकंदरीतच सामाजिक परिस्थितीत आलेले अनुभव त्यांना तसा विचार करायला भाग पाडत असवेत . असो . यावर खूप लिहीण्यासारखं आहे. पण तुम्ही नेमकं मर्मावर बोट ठेवणारं लिखाण केलंय एवढं नक्की.In reply to दिपाली झणझणीत अंजन घालणारा लेख वाटला by श्वेता२४
छान लिहिलंय.माझा अनुभव सांगते
हं.
'मुलगा काय किंवा मुलगी काय