मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीगणेश लेखमाला २०२०- स्नानांतर

अनिंद्य · · लेखमाला
1 प्रसंग अगदी काल घडलाय असा डोळ्यासमोर आहे... "बाबू, ई नदिलोनि पवित्र जलालधु स्नानम चेसरा... जलालो मुनीगी रा.." नदीकाठावरच्या आणि पलीकडे गुडघाभर पाण्यात उभ्या आईच्या मातुल कुटुंबातील नातेवाईक मंडळींनी कृष्णेच्या 'पवित्र' पाण्यात मी स्नान करावे, असा एकच धोषा लावला होता. स्नानाला कधीही एका पायावर तयार असणारा मी ठामपणे 'नाही' म्हणत असल्याचे दुर्लभ दृश्य बघून आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू एकाच वेळी झळकत होते. अखेर बळेबळेच मला त्या गढूळ पाण्यात ओढण्यात आले आणि कृष्णा नदीतीरी दर बारा वर्षांनी भरणाऱ्या 'कृष्णापुष्करम' उर्फ 'दक्षिण कुंभ' मेळाव्यात आमचे घोडे न्हाले! 'न आवडलेले' असे आयुष्यातील ते दुर्मीळ स्नान. अन्यथा आंघोळ करणे हे माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंददायक काम होते आणि आहे. https://live.staticflickr.com/65535/50234869068_c813f078fb_c.jpg Bath is to body what laughter is to soul असे कोणीतरी म्हटलेच आहे, नसेल म्हटले तर मी म्हणतो. जन्माला आल्यावर सर्वप्रथम नर्सबाई काय करतात, तर नवजात बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करतात. त्याशिवाय खुद्द आईबाबांना तरी दाखवतात का ते बाळ? जन्मल्याबरोबर जे काम आपल्याला चिकटते ते आवडते काम असेल, तर मग त्याचा मन प्रफुल्लित करणारा सोहळा होतो. त्याचे सर्व टप्पे फार आनंददायक होतात आणि हे स्नानसोहळे स्मृतींमध्ये अलगद जाऊन बसतात. आज पाच दशके भूतलावर काढल्यानंतर कुणी आयुष्याच्या सर्वात आनंदी प्रसंगांबद्दल विचारले, तर मला माझा स्नानप्रवास आठवतो. सकाळी शाळेत जाण्याआधी गारेगार पाण्याने केलेले सचैल स्नान, कडाक्याच्या हिवाळ्यात ऊन-ऊन पाण्याने अंग शेकणारे स्नान, सुट्टीच्या दिवशी आईने खसाखसा घासूनपुसून लख्ख करीत घातलेली आंघोळ, बाबांसोबत जलतरण तलावात केलेले स्नान, सणासुदीचे - प्रसंगविशेष स्नान, आजोळी स्वच्छ नदीपात्रात डुंबत केलेले स्नान... एक ना हजारो आनंदक्षण स्नानाशी जोडले गेले आहेत. घरी आईचा दिवस सर्वात आधी सुरू होई. तिच्या माहेरी फार धार्मिक वातावरण होते, स्नान केल्याशिवाय ती काही खात-पीत नसे. आम्ही भावंडे अर्धवट झोपेत असताना आईचे स्नान आटोपत असे. हळू आवाजात तिचे गायत्री मंत्राचे पठण ऐकू येत असे. मग चहा-दूध तयार झाले की मला पूर्ण जाग येई. शाळा सकाळची, त्यामुळे आवरून आंघोळ करूनच शाळेत जायचे, असा नियम होता. शेजारीपाजारी सर्व मुलांमध्ये आंघोळ करून वेळेत तयार होण्यात माझा नंबर नेहेमी वर असे. घरी हिरव्या रंगाचा 'हमाम' साबण आम्हा भावंडांचा सामायिक होता. हो, तेव्हा प्रत्येकाला वेगळ्या साबणाची चंगळ नव्हती. त्यामुळे कोरडा साबण मिळावा म्हणून मीच पहिला नंबर लावत असे. ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेला शुद्ध हिंदुस्तानी 'लोकल' हमाम साबण आजही ३०० कोटी रुपयाचा ब्रँड आहे! आतासारखे 'आयुर्वेदिक', 'नैसर्गिक', ‘इको-फ्रेंडली’ साबणाचे काही खास कौतुक नव्हते. त्या वेळेपासून (१९३१) नीम, तुळस, अ‍ॅलोवेरा अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर हे हमामचे वैशिट्य टिकून आहे हे खास. आधी टाटा आणि आता हिंदुस्थान युनिलिव्हर बनवतात. आजही महिन्याला काही कोटी हमाम साबण विकले जातात भारतात. हिवाळ्यात गरम पाण्यासाठी स्टोव्हवर वेगळा हंडा तापत ठेवलेला असे, त्यातले हवे तेवढे गरम पाणी काढून तेवढेच गार पाणी त्या हंड्यात परत उकळण्यासाठी ठेवले जाई. जुन्या आठवणीत हमखास असणारा पाणी तापवण्याचा बंब मात्र आमच्या घरी कधीच वापरात नव्हता. नळाला पाणी ठरावीक वेळी असल्याने आणि शाळेसाठी उशीर होणे लाजिरवाणे समजले जात असल्याने टाइम वॉज ऑलवेज अ‍ॅट प्रीमियम... त्यामुळे आंघोळीची खरी मजा रविवारी असे. त्या दिवशी भरपूर पाणी आणि साबण वापरून मनसोक्त आंघोळ करायला कोणाची ना नसे. फक्त त्याआधी 'केस धुणे' हा गंभीर अत्याचार होत असे. केसांसाठी वेगळ्या 'शिकेकाई' साबणाचा प्रवेश आमच्या घरी झाला नव्हता. तेव्हा रोजच्याच साबणाने किंवा कधी तर सर्फसारख्या पावडरींनी आमचे 'मळके, घाण, चिपचिप' केस 'स्वच्छ' केले जात. साबणाचे पाणी हमखास डोळ्यात जात असल्याने हे मला फार त्रासदायक वाटत असे. एकदा हे झाले की हवा तेवढा वेळ पाण्यात खेळायला परवानगी असे. आम्ही भावंडे एकमेकांवर पाणी उडवून, एकमेकांना ढकलून, दंगामस्ती करत रविवारची सकाळ सार्थकी लावत असू. कधीकधी बाबाही आमच्या कंपूत सामील होत आणि आमच्या जलपंचमीला उधाण येत असे. https://live.staticflickr.com/65535/50235734722_ed4ce690e3_b.jpg उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या मूळ गावी आणि आजोळी विभागून जात असू. दोन्ही ठिकाणची स्नानवैशिष्ट्ये वेगवेगळी होती. आमच्या गावी पाण्याचे दुर्भिक्षच. घरात विहीर नव्हती. गावातल्या दोन विहिरींनाच काय ते पाणी आणि उन्हाळा म्हणजे तिथेही पाणी कमी. आमचा घरगडी लच्छू विहिरीतून हंडे भरून आम्ही घरचे, गडीमाणसे, जनावरे सर्वांसाठीच पाणी आणीत असे. पाणी जपून वापरावे लागे, आंघोळीसाठी काटकसर करावी लागे. तरी त्या घरी स्नान आवडायचे, कारण विहिरीचे थंडगार पाणी आणि 'लाइफबॉय' साबण. गुलाबी रंगाचा, चौकोनी. बाबांच्या लहानपणापासून तोच एकमेव साबण गावात विक्रीला असे. लाइफबॉय आता सुमारे शंभर वर्षे भारतात विकला जात आहे, अगदी मागच्या एका वर्षातच २००० कोटी रुपयांचे लाइफबॉय साबण विकले गेले भारतात! म्हणजे आजही वट असलेला हा खरा सुपरब्रॅंड! पुढे 'लाइफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ' या जिंगलचे मराठी भाषांतर 'लाइफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी' असे करून खिदळणे अनेक वर्षे चालले.

तिकडे आजोळी वेगळीच तर्‍हा. दररोज पहाटे साधारण ५च्या सुमारास ... नंदिनी नलिनी सीता मालती च महापगा विष्णुपदाब्जसंभूता गंगा त्रिपथगामिनी भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी द्वादशैतानि नामानी यत्र यत्र जलाशये स्नानोद्यत: स्मरेनित्यं तत्र तत्र वसाम्यहं……. https://live.staticflickr.com/65535/50234872728_38d24c7f7b_b.jpg सर्व जण साखरझोपेत असताना बाहेर आजोबांचे मोठ्या आवाजात स्तोत्रपाठांसह स्नान सुरू असायचे. आता थोड्याच वेळात दिवस उगवणार आणि आपल्याला बिछाना सोडावा लागणार, हे दुष्ट सत्य हळूहळू मनाला स्पर्श करू लागे. बाहेर पेटवलेल्या बंबाच्या धुराचा, गरम पाण्याचा, मैसूर चंदन साबणाचा, अग्निहोत्रात टाकलेल्या अर्धवट पेटलेल्या गोवऱ्यांचा, पूजेसाठी आणवलेल्या ताज्या फुलांचा एक मिश्र दैवी सुवास पसरत असे. त्यांच्याकडे एक जादुई कुलूपबंद कपाट होते - फक्त साबणांचे! त्यात वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक साबण हारीने रचलेले असत. लांबचा प्रवास करून जबलपूरला आजोळघरी पोहोचल्यावर ते कपाट उघडून आम्हा भावंडांना प्रत्येकी एकप्रमाणे हवा तो साबण घेता येई, फक्त मैसूर संदल वगळता. मैसूरवर आजोबांचा एकाधिकार होता आणि तो अन्य कोणालाही वापरायला मिळत नसे. त्याचा राग येई. पुढे अनेक वर्षांनी बंगळुरूला कर्नाटक स्टेट सोप फॅक्टरीत एका कामासाठी गेलो, तेव्हा तेथे मैसूर संदल साबण आणि त्याचे अनेक नवनवीन प्रकार सुंदर वेष्टनात विकायला होते. आजही पूर्वीसारखेच चंदनाचे शुद्ध तेल वापरतात त्यात. मी अधाशासारखे विकत घेतले, स्वतः भरपूर वापरले आणि घरी-दारी-मित्रांना भेट म्हणून दिले. 'छोटा बच्चा' असलो, तरी मला नाही म्हणतात म्हणजे काय? ते एक सोडले तर भेडाघाट, ग्वारीघाट अशा नर्मदेच्या वेगवेगळ्या घाटांवर स्वच्छ गार पाण्यात तासनतास केलेले स्नान ही आजोळची सर्वोत्तम आठवण. https://live.staticflickr.com/65535/50235525396_9280fa7145_b.jpg सौंदर्यतारकांचा म्हणून नावाजलेला 'लक्स' साबण फार प्रसिद्ध होता. मध्यमवयीन-मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष आधी फारसा वापरत नसत. शेजारपाजारच्या कॉलेजकुमारी-कुमार मात्र तो साबण खास वापरत. त्यांचा हेवा वाटत असे. मी साधारण १० वर्षांचा होतो, तेव्हा केसांसाठी वेगळा साबण दिसू लागला. श्रीमंत नातेवाईक स्त्रिया 'केशनिहार' साबण वापरत. गोदरेज आणि विप्रो ब्रँडचे 'शिकेकाई' साबण आले आणि मग केशनिहारचे कौतुक संपले. शिकेकाई साबण पुरुष मंडळी मात्र वापरत नसत, आम्हा मुलांनासुद्धा केसांसाठी शिकेकाई साबण वापरणे फार 'गर्ली' वाटत असल्यामुळे आम्ही रोजचाच साबण केसांना फासत असू. मग काही वर्षांनी 'सनसनाती नींबू की ताजगी' देणारा लिरिल, 'सुपर फ्रेश' सिंथॉल आणि नीम की गुणवत्ता लिये 'मार्गो' असे अनेक ब्रँड बाजारात दिसू लागले. टीव्ही रंगीत झाला आणि जाहिरातीत दिसणारी बिकिनीतली सचैल लिरिल कन्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली. पुढेही अनेक वर्षे लक्सचे 'फिल्मी सितारों का सौंदर्य साबुन' हे स्थान आणि लोकप्रियता कायम राहिली. ९०नंतर विप्रोच्या संतूर साबणाने लक्सच्या इंद्रासनाला बऱ्यापैकी झटके दिले. 'आप की त्वचा से आप की उमर का पता ही नही चलता' हे फार गाजलेले कॅम्पेन. पण तो 'गर्ली' आहे हे माझे मत काही बदलले नाही. आम्हा पुरुष मंडळींसाठी विशेष वेगळे साबण फारसे नव्हते. लाइफबॉय, सिंथॉल आणि ओके याच साबणांना 'पुरुषांसाठी' म्हणून मान्यता होती. पुढे सुपरस्टार शाहरुख खानने 'लक्स'साठी टबबाथ घेत हे बदलण्याचा एक प्रयत्न केला. त्यामुळे लक्स फक्त बायका वापरतात हा समज थोडा कमी झाला. फेब्रुवारी १९८२ ह्या महिन्यात माझ्या स्नानप्रेमासाठी एक नवे युग अवतरले. आम्ही स्वतःच्या मोठ्या घरात राहायला गेलो. ह्या घरात वेगळे मोठे भिंतभर टाइल्सची सुखद रंगसंगती असलेले कोरे करकरीत स्नानघर होते. पूर्ण बंद होणारा दरवाजा, उत्तम सूर्यप्रकाश आणि मुख्य म्हणजे डोक्यावर भरपूर जलधारांचा 'शॉवर' होता! आजवर स्नान म्हणजे बादलीत किंवा घंगाळात असलेले पाणी अंगावर घ्यायचे असे स्वरूप बदलून जलौघाचे रेशमी तुषार अंगावर झेलत सचैल स्नान करायचे, असा सुखवर्धक बदल झाला. माझे आंघोळीचे तास वाढले. आमचे शहर उन्हाळ्यात प्रचंड तापत असे, पाणीटंचाई मात्र नव्हती. त्यामुळे दिवसातून दोनदा स्नानाचे सुख लुटले जाई. पुढे काही वर्षांनी पाणी तापवायला गीझर आला, गरम पाण्याचा हिवाळी स्नानसोहळा जास्तच लांबल्यामुळे पूर्ण स्नानघरात वाफेचे धुके पसरत असे. त्यातून बाहेर पडताना आपण ढगातून बाहेर पडून जमिनीवर पाय ठेवत आहोत असा फील येत असे. १९८०पासूनच शाम्पूच्या बाटल्या आमच्या शहरातल्या दुकानांत दिसू लागल्या होत्या. हे महागडे प्रकरण आपल्यासाठी नाही असे सर्वच मध्यमवर्गीय लोक समजत, त्यामुळे ते काही आमच्या घरी आणले गेले नाही. शाम्पू प्रकरणात खरी क्रांती 'चिक - CK' नामक शाम्पूच्या सॅशे पॅकने घडवली. १ रुपया अशी माफक किंमत, तीव्र सुगंध, भरपूर फेस असे सर्व काही त्यात होते. बहुतेक १९८३ साल असावे. हे झाले आणि मग मात्र वेगवेगळ्या सर्वच ब्रॅण्ड्सचे शाम्पू असे सॅशेमध्ये मिळू लागले, जास्त आवाक्यात आले. २-५ वर्षांतच ते स्नानाचा अविभाज्य भाग बनले. आज तर देशातील एकूण शाम्पूविक्रीपैकी ७५% विक्री फक्त 'सॅशे पॅक'ची असते. माझ्या स्नानसोहळ्यातही शाम्पूचे कौतुक वाढतेच राहिले. साधारण १० वर्षांनी त्याचा धाकटा भाऊ 'कंडिशनर' बाजारात आला. कंडिशनरचा जन्म मात्र पुरुषांच्या गरजेपोटी झाला आहे, 'ब्रिलियंटाइन' ह्या दाढी-मिश्या चमकदार करणाऱ्या उत्पादनाचे दुसरे रूप म्हणजे कंडिशनर. काही ब्रॅंड्सनी आधी शाम्पूसोबत कंडिशनर मोफत वाटले आणि पुढे त्याची सवय कधी लागली ते समजलेच नाही. * * * १९९४पासून नोकरीधंद्याला सुरुवात झाली, शहर बदलले. सर्व साबण, शाम्पू स्वतःच्या आवडीचे घेता येऊ लागले. याच वेळी लिक्विड सोपचे पेव फुटले. एकापेक्षा एक सरस सुगंध असलेले हे द्रवरूपी नावीन्य, त्याचा फेसच फेस आणि त्यासाठी वेगळे 'लूफा' असा जामानिमा. एकदम राजेशाही. मुंबईतील अनेक छोट्या घरात राहिलो. इथे जागा कमी आणि बाथरूम तर मी जेमतेम उभा राहून ओला होऊ शकेन एवढीच जागा असलेले. बाहेर घाम आणि प्रदूषण भरपूर, त्यामुळे दिवसातून दोनदा स्नान हा शिरस्ता कायम राहिला, तरी स्नानसुखात व्यत्यय मात्र आला. तोवर खास पुरुषांसाठी म्हणून साबण आणि स्नानप्रावरणे भारतीय बाजारात दिसू लागली होती, त्यांचा लाभ घेण्याएवढी ऐपत आली होती. 'एक्स्ट्राव्हॅगंटली मेल' अशी खास टॅग लाइन असलेला 'आरामस्क' साबण दिल्लीच्या दिवान वाधवा ग्रूपने आणला. तो आम्हा तरुण मुलांमध्ये फारच लोकप्रिय झाला. वेगळा, थोडा तीव्र सुवास आणि वेगळाच आकार, साबणाच्या वडीवर एक डौलदार A अक्षर कोरलेली पट्टी असे ते आकर्षक प्रॉडक्ट होते. नीश की काय म्हणतात तसे. तो अनेक वर्षे मी वापरला. पुढे क्रेझ ओसरली आणि तो ब्रँड विस्मृतीत गेला. एका मराठी मुलीने ब्रँड रिव्हायव्हल शीर्षकाखाली ह्या साबणावर शोधप्रबंध सादर केला, इतकी त्याची लोकप्रियता. जुन्या गाण्यांचे जसे रिमेक बाजारात येते, तसे काही खास ब्रॅंड्सचे व्हायला पाहिजे. दिवाळीचा सण आणि 'मोती' साबणाने स्नान हे अद्वैत तर वर्षानुवर्षे उपभोगतोच आहे. तो सुवास आणि दिवाळी एकमेकांना पर्यायवाची जणू. https://live.staticflickr.com/65535/50235523361_946ca1fa88_k.jpg https://live.staticflickr.com/65535/50235738567_43dcf0fca7_h.jpg पितृत्व लाभले, तेव्हा स्नानप्रेमामुळेच नवजात बाळाला आंघोळ घालायची जबाबदारी सहज स्वीकारली आणि पार पाडली. जसजसे वय वाढत गेले, तसतसे साबण आणि आइसक्रीमच्या जाहिराती सारख्याच होत गेल्या - मलाई, बदाम, फळांचे रस दोहोंत असल्याचे कानीकपाळी सांगण्यात येऊ लागले. साबणातून 'नैसर्गिक' सुगंध हळूहळू कमी होत गेला आणि साबण 'दिसायला' सुंदर होऊ लागले. आता 'खादी'सारखी दर्जेदार (आणि महाग) उत्पादने सोडली, तर 'खरे' सुवास दुष्प्राप्य झाले आहेत. पुढे कामानिमित्त देशभर-जगभर प्रवास करता आला. आलिशान-गेलिशान सर्वच प्रकारच्या गेस्ट हाउस, लॉज, तारांकित-बिनतारांकित अशा हॉटेलातून राहण्याचे प्रसंग वाढले. जणू एक नवीन स्नान-दालन पुढ्यात आले. तेव्हा आणि आताही रूमचा ताबा मिळाला की सर्वात आधी तेथील बाथरूमचे निरीक्षण-परीक्षण करणे आणि तिथले शॉवर-तोट्या उघडबंद करण्याचे विशेष तंत्र समजून घेणे हे प्रचंड आवडीचे काम आहे. त्यामुळे नंतर होणारी फजिती होत नाही हा मोठा फायदा. त्यातही प्रचंड वैविध्य असते हे कळले. उंची हॉटेलातून स्नानागारांच्या रचनेवर भरपूर मेहनत घेतलेली दिसून येई, स्वच्छतेचा, सौंदर्याचा आणि स्नानानुभव समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या वातावरण निर्मितीवर भर दिलेला असतो. स्नानाचा आनंद शतगुणित होत गेला. वेगवेगळ्या शहरात मुक्कामात बाथ टब, बाथ सॉल्ट, बाथ बॉम्ब्स आणि बबल बाथ यासारखे नखरेल प्रकारही पुरेपूर अनुभवले. Wash away your troubles with some bobbles हे ध्येयवाक्य ठेवून स्टीम बाथ, सौना बाथ, व्हिटॅमिन फिल्टर लावलेले शॉवर, पाठीच्या कण्याला सुखद मसाज देणारे प्रेशर शॉवर, जाकुझी असे शरीराचे चोचले करण्यात मागे राहिलो नाही. अत्याधुनिक स्नानगृहांमुळे काहीदा फजितीही झाली. जपानी हॉटेल्समधली स्पेस कॅप्सुलसारखी अरुंद स्नानगृहे आणि माझे सहाफुटी धूड हे व्यस्त प्रमाण सहन न झाल्यामुळे त्यात असलेल्या असंख्य तोट्या-बटणे-रिमोट-अलार्म यांनी वात आणला होता. स्वीडन आणि जपान दोन्हीकडे पारंपरिक बाथहाउसचा अनुभव घ्यायला म्हणून गेलो असता तिथल्या 'दिगंबर ओन्ली' अटीमुळे काही क्षण अवघडलो होतोच.
https://live.staticflickr.com/65535/50235528501_8045d58087_h.jpg     https://live.staticflickr.com/65535/50235741807_7ba2fd9a2a_h.jpg
सिंगापूरच्या मरीना बे सँडच्या सर्वोच्च मजल्यावर माझ्या छोट्या पिल्लाला सोबत घेऊन खिदळत केलेलं जाकुझी स्नान, गोव्यात थोड्या अप्रसिद्ध शांत समुद्रकिनाऱ्यावरचे रात्रीच्या चांदण्यातले स्नान, भोपाळला ३०० वर्षे जुन्या कादिमी हम्माम मध्ये केलेला नवाबी गुसल, धबधब्याखाली केलेली तुषारस्नाने, मे महिन्याच्या प्रचंड उकाड्यात पटियाला-अमृतसर मार्गावरील अनोळखी गावातल्या एक निर्जन ट्यूबवेलवर मनसोक्त केलेले स्नान, कडाक्याच्या थंडीत मित्रांच्या पैजेखातर तिस्ता नदीच्या उथळ पात्रात केलेले, ब्रह्मपुत्रेच्या घनगंभीर पाण्याकाठी घाबरत केलेले, सोरटी सोमनाथला समुद्राच्या प्रचंड खारट पाण्यात केलेले, उज्जयिनीत क्षिप्रा 'नदी' म्हटल्या जाणाऱ्या ओघळात जेमतेम पाय बुडवून केलेले, पुष्करच्या ब्रह्मसरोवरात भल्यापहाटे केलेले, मालदीवच्या रिसॉर्टमध्ये खाली काचेतून समुद्र आणि वर मोकळे आकाश दिसणाऱ्या राजेशाही स्नानागारात केलेले.. अशा एक ना अनेक स्नानस्मृती माझ्या मनाला आजही भिजवून काढतात. Life is a long bath, the more you stay, the more wrinkled you get हे पुरेपूर पटलंय. स्नानमाहात्म्यात एक अध्याय टॉवेलचाही आहे. सुती पांढरा पंचा, मग थोडे बरके कोइम्बतूरच्या 'मोती' ब्रँडचे जाडसर टॉवेल, मग सुखसंवर्धक टर्किश टॉवेल, मग खास बांबूच्या/केळीच्या तंतूंपासून बनवलेले अतिमुलायम टॉवेल्स, जुन्या सिनेमातील व्हिलन मंडळी वापरीत तसले स्टायलिश बाथरोब असे सर्व चोचले पुरवायला मिळाले. तो प्रवासही आनंददायक ठरलाय. सर्वच स्नानप्रवास आनंदी झाला असेही नाही. प्रयाग-वाराणसीला भेटी घडल्या, पण गंगास्नानाचे आलेले योग बरेचदा पाण्याच्या अस्वच्छतेमुळे नाकारले आहेत - डोक्यावर पाण्याचे शिंतोडे घेऊन प्रतीक-स्नान किंवा फार तर कटिस्नान करून वेळ मारून नेली आहे. गंगेच्या कुशीत स्वच्छ नितळ पाण्यात स्नान करायला मिळाले, तोही प्रसंग अगदी कालच घडल्यासारखा वाटतो. ….. कुरु कृपया भवसागरपारम् ...... तीर्थपुरोहित जुळे भाऊ पंडित सुदीक्षित सुभिक्षित मंत्रपठण करीत आहेत. त्यांच्या कानात हिऱ्यांच्या कुड्या चमचमत आहेत. मावळतीचा सूर्य, नोव्हेंबर महिन्याची कडाक्याची थंडी आणि गंगेच्या स्वच्छ बर्फगार पाण्याचा तीव्र प्रवाह, त्यात भिजत उभा मी. मनाची भावविभोर अवस्था. त्यांचा आवाज टिपेला पोहोचतो ... तव चेन्मातः स्रोतःस्नातः पुनरपि जठरे सोऽपि न जातः नरकनिवारिणि जाह्नवि गंगे कलुषविनाशिनि महिमोत्तुङ्गे ….. सुदीक्षित मृदू आवाजात म्हणतात, "अनिंद्यजी, माताजी को अंतिम प्रणाम कीजिये, अस्थियों को अब गंगार्पण कीजिये..." आणि त्या एका क्षणातच आईचा हात नेहमीसाठी सुटल्याचे आलेले भान... हरिद्वारचे एकमेव गंगास्नानही कधीच न विसरता येण्यासारखे. 2

वाचने 89314 वाचनखूण प्रतिक्रिया 86

हेमंतकुमार Wed, 08/26/2020 - 10:15
सुंदर हो, साबणपुराण व अंघोळीच्या गमतीजमती ! भलत्याच आवडल्या. मला डोक्यावरून पडणारा शावर मनापासून कधीच आवडला नाही. आजही बादलीतून हाताने पाणी घेऊन अंघोळ करायला मनापासून आवडते. बऱ्याच वर्षांपूर्वी अनिल अवचटांनी जाहीर मुलाखतीत सांगितले होते, की ते चाळीस वर्षे अंगाला कुठलाही साबण न लावता अंघोळ करीत आहेत आणि त्यामुळे कुठलाही तोटा झालेला नाही. मला ते वाक्य पुरेपूर पटले आणि गेली वीस वर्षं मी सुद्धा अंघोळ निव्वळ पाण्यानेच करतो. गेल्या सहा महिन्यात हात धुवायला मात्र भरपूर साबण करोनाचरणी समर्पित होत आहे ! ............................... जाता जाता ... ‘अंघोळ’ हा मूळ शब्द (अंग + होळणें =धुणे) कालौघात आंघोळ व अंघूळ हे दोन्ही अपभ्रंश रूढ झाले.

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य गुरुवार, 08/27/2020 - 10:41
@ कुमार१, आभार ! तुमचा प्रतिसाद नेहेमी उत्स्फूर्त असतो आणि आनंद देऊन जातो. समहाऊ घरी आम्ही सगळेच 'अंघूळ करतो' असे म्हणतो :-)

प्रचेतस Wed, 08/26/2020 - 10:39
लेख भयंकर आवडला. साबण प्रवास आणि स्नानमहात्म्याच्या आठवणी रोचक. म्हैसूर सॅंडल माझ्याही आवडीचा. दिवाळीला म्हैसूर सॅंडलनेच आंघोळ करायची परंपरा आमच्या घरात :) खूप छान.

चौथा कोनाडा Wed, 08/26/2020 - 11:56
व्वा, खुपच सुंदर लेख ! (स्नान करुन वाचलाय त्यामुळे आणखी प्रसन्न वाटतंय. जस्ट गंमत) यातले सर्वच साबण लहानपणापासून वापरत आलोय (नेहमी ब्रॅण्ड बदलायलाआवडतं) म्हैसूर सॅण्डल तर विशेष प्यारा, फक्त सणासुदीला वापरायला आवडतो. माझ्या आवडीची तीनच कॉस्मॅटिक्स, आंघोळीचा साबण, फेस पावडर आणी केसांचे तेल, त्यात साबणाचा पहिला नंबर ! लेख वाचताना म्हैसूर सॅण्डल चा सुंदर वास जाणवत होता ! अनिंद्य जी _/\_ या सुंदर नॉस्टॅल्जिक लेखासाठी !

In reply to by चौथा कोनाडा

अनिंद्य गुरुवार, 08/27/2020 - 18:44
@ चौथा कोनाडा, तुम्हीपण मैसूरप्रेमी ! वाहव्वा. तुम्हाला लेख आवडला आणि तुम्ही नॉस्टॅल्जिया अनुभवल्याचा आनंद झाला.

चौकटराजा Wed, 08/26/2020 - 12:21
अगदीच आगळा वेगळा विषय व सविस्तर लेखन त्यामुळे वाचायला मजा आली. अंगणातील गडग्यामागे टाकलेल्या जात्याच्या एक तुकड्यावर बसून केलेली ओपन एअर अंघोळ, लग्न झाल्यावर पहिल्याच दिवाळीला बायाकोने तेल लावून घातलेली अंघोळ ते आता सोलर मधून येणारे शॉवर एक काचेच्या बन्द पार्टीशन मधे होणारी साम्प्रतची अंघोळ असा माझा प्रवासाही या निमिताने आठवला .

In reply to by अनिंद्य

Nitin Palkar Sat, 08/29/2020 - 19:55
गडगा म्हणजे एकावर एक दगड रचून बांधलेली कुंपण भिंत. अनेकदा ही ओबडधोबड असते किंवा ताशीव दगडांची सुबकही असते ....

विनिता००२ Wed, 08/26/2020 - 15:14
वेगवेगळे सुगंधी साबण हा माझा वीकपॉईट :) म्हैसुर सॅन्डल खूप आवडतो. बाथरुममधे त्याचा सुगंध मस्त दरवळत असतो. सद्या पतंजलीचे रोझ क्लिंझर आणि लेमन क्लिंझर आवडते! मस्त लेख!

In reply to by विनिता००२

अनिंद्य Fri, 08/28/2020 - 21:29
@ विनिता००२, ....वेगवेगळे सुगंधी साबण हा माझा वीकपॉईट .... द्या टाळी :-) लेखात लिहिल्याप्रमाणे 'खरे' सुगंध आता दुर्मिळ होत आहेत. जवळपास सर्व प्रसिद्ध साबण उत्पादक सिंथेटिक सुगंध विकणाऱ्या कंपन्यांकडून हवा तो सुगंध बनवून घेतात. मुंबईतील मुलुंडला असलेली केळकर अँड कंपनी असे सुगंध बनवून देण्यात अग्रस्थानी आहे. पतंजलीच्या उत्पादनांबद्दल अजून खात्री वाटत नसल्यामुळे वापरत नाही पण वर चित्रात असलेले रोझ हनी आणि लाईम फ्रेश हे दोन्ही नैसर्गिक आणि सौम्य असल्यामुळे आवडते साबण आहेत. प्रतिसादाबद्दल आभार.

सिरुसेरि Wed, 08/26/2020 - 16:19
छान लेखन . कृष्णा , कावेरी , घटप्रभा , मलप्रभा अशा अनेक नद्या आठवल्या . सुरुवातीला हलक्या फुलक्या तेलगु वाक्याने बालपणीची आठवण सांगणारा लेख शेवटाला मात्र गंभीर करतो . +१

In reply to by सिरुसेरि

अनिंद्य गुरुवार, 08/27/2020 - 11:35
@ सिरुसेरि, .... हलक्या फुलक्या तेलगु वाक्याने बालपणीची आठवण ...... आईचे जन्मगाव आंध्रात विजयवाडा. कोंचम कोंचम तेलुगू येते मला. प्रतिसादाबद्दल आभार.

In reply to by गणेशा

गणेशा Wed, 08/26/2020 - 23:48
पुन्हा वाचला.. आधी अर्धा लेख कामामुळे थोडा फास्ट वाचला होता म्हणुन पुर्ण पुन्हा वाचला... लेख उत्तम आहे.. अंघोळीकडे अश्या नजरेने ही आठवण म्हणुन पाहता येते हे तुमच्या मुळे लक्षात आले. मस्त लेख.. -- यामुळे मला दोन आठवणी आठवल्या.. एक मी पार लहान होतो, म्हणजे 4-5 वर्षाचा असेल अंदाजे, गावाकडे नारळाच्या झाडाखाली, आई अंघोळ घालायची.. तेंव्हा साबणाचा सारा फेस केसांभोवती करण्यासाठी आम्ही मला आज ससा कर ना आई, असे बोलायचो. दूसरी आत्याच्या गावची, लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आत्याकडे जायचो आधी, शेतातली वस्ती, आणि सगळ्यांच्या शेतात विहिरीचे मोटरने - पाईपने पाणी आणलेले. त्या पाण्यात केलेली अंघोळ लाजवाब.. त्यात हि एक मोठ्या सिमेंटने पाईप सारखे आकार करून वरून पाटात पाणी सोडले होते, तेथे तो मोठा धबधबाच जणू आमच्या साठी, तेथे अंघोळ करणे वा.. बाकि आत्याचा मी खुप लाडका होतो.. तिच्या शेवटपर्यंत.. तिची आठवण आलीच.. --- लिहीत रहा.. वाचत आहे...

In reply to by गणेशा

अनिंद्य Fri, 08/28/2020 - 10:03
..... मला आज ससा कर ना आई .... फार क्यूट असते ना लहान मुलांचे जग ? गणेशा, तुमच्या नॉस्टॅल्जिक आठवणी इथे शेयर केल्या, खूप आवडले. आभार.

तुषार काळभोर Wed, 08/26/2020 - 18:08
तुम्हाला जेवढ्या मनापासून आंघोळ आवडते, मला तेव्ह्ढाच कंटाळा आहे. आणि तो पुढच्या पिढीत उतरला आहे! आमच्याकडे ऐंशीच्या आधी ओके असायचा (जे मला वाटतं लाईफबॉयचं पूर्व-रूप असावंं). ऐंशीच्या आसपास आम्च्या घरात लक्स आला तो अजून तसाच आहे. दिवाळी मात्र मोतीशिवाय पूर्ण होत नाही. शेवट मात्र एकदम काळजाला हात घालणारा.. अवांतर - काहि दिवसांपूर्वी एक माहिती अशी वाचली की साबणाची गुणवत्ता टीएफएम (टोटल फॅटी मॅटर) च्या प्रमाणावर असते. मैसूर सँडल हा त्याबाबतीत सर्वोत्तम साबण आहे. क्लोजली फॉलोड बाय सिन्थॉल आणि गोदरेज नंबर १. ७५% पेक्षा अधिक म्हणजे ग्रेड १. (आता डेटॉल सुद्धा जहिरातीत दाखवतं की त्यांचा साबण ७५-७६% टीएफएम असलेला आहे.)

In reply to by तुषार काळभोर

अनिंद्य Fri, 08/28/2020 - 21:36
@ पैलवान, होय, दिवाळी आणि मोती साबण हे समीकरण ठरलेले ! सुंदर प्रतिसादाबद्दल आणि टी एफ एम ग्रेडिंग च्या अधिक माहितीबद्दल आभार. _/\_

चामुंडराय गुरुवार, 08/27/2020 - 01:24
मस्त अनिंद्य, खूप छान लिहिलंय. पूर्वी दिवाळीचा आणि मोती साबणाचा अगदी घनिष्ट संबंध होता. दिवाळीत घरोघरी उटण्याचा बरोबरीने मोती साबण आणला जायचा. किंबहुना मोती साबणाविना दिवाळी म्हणजे फराळाविना दिवाळी असेच समीकरण होते. अर्थात त्याला कारण ही तसेच होते. पूर्वी सामान्यजनांसाठी लाईफबॉय हा एकमेव साबण असावा. कदाचित थोड्याफार उच्चभ्रून्कडे हमाम साबण येत असावा. त्यामुळे दिवाळीसाठी मोती साबणाची आवर्जून खरेदी केली जायची. आणि बहुधा मोती साबण केवळ दिवाळीच्या वेळीच बाजारात उपलब्ध असे. इतर वेळी तो पाहिल्याचे आठवत नाही. आता कदाचित बरीच सुधारणा झाली असेल परंतु त्या काळी लाईफबॉय हे एक अजब प्रकरण होते. एकतर त्याचा आकार खूप मोठा होता. चिमुकल्या हातात तो नीट मावायचा देखील नाही. हे कमी म्हणून की काय, तो दगडासारखा कठीण असायचा. त्याचा फेस तर व्हायचा नाहीच पण लवकर संपायचा देखील नाही. त्यात भर म्हणजे त्याला चक्क रॉकेल सारखा वास यायचा. तेव्हा साबण सुगंधी असला पाहिजे अशी गरज नसावी. लाईफबॉय वापल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील अशी त्यांची जाहिरात असे. "लाईफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास करी" अशी त्यांची स्लोगन होती. परंतु त्याला रॉकेलचा वास असल्याने काही वात्रट मुले "लाईफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी" असे म्हणत. सध्या इतके पर्याय, इतक्या असंख्य प्रकारचे साबण, बॉडी वॉश, फेस वॉश, शाम्पू, कंडिशनर आणि काय काय गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत त्या मुळे नवीन पिढीला मोती साबणाचे काही अप्रूप असेल असे वाटत नाही आणि कोणी आवर्जून खास दिवाळीसाठी मोती साबण आणत असतील की नाही शंकाच आहे. तसेच गुणवत्तेच्या निकषावर इतर साबणांच्या तुलनेत मोती साबण फार उजवा आहे असेही नाही. काही काळानंतर दिवाळीत मोती साबण वापरलेल्या जुन्या पिढीच्या केवळ स्मरण रंजनातच तो शिल्लक उरेल.

In reply to by चामुंडराय

अनिंद्य Sat, 08/29/2020 - 11:26
@ चामुंडराय, ..... काही काळानंतर दिवाळीत मोती साबण वापरलेल्या जुन्या पिढीच्या केवळ स्मरण रंजनातच तो शिल्लक उरेल..... असे नका म्हणू हो :-) आता पर्याय खूप आहेत हे खरेच पण काही गोष्टी आपण करतो आणि आपल्याला आवडतात त्यामागे आपल्या 'आनंदी स्मृती' हे एक मोठे कारण आहे. प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

In reply to by चामुंडराय

Nitin Palkar Sat, 08/29/2020 - 20:10
'त्याचा फेस तर व्हायचा नाहीच'.... जड पाण्यात साबणाचा फेस होत नाही असे शास्त्राच्या(विज्ञानाच्या) पुस्तकात वाचले होते. त्या मुळे फेस होत नाही हा लाइफ बॉयचा दोष नसावा. तसेच 'त्यात भर म्हणजे त्याला चक्क रॉकेल सारखा वास यायचा'. हे देखील पटायला कठीण वाटतंय. अनेक घरांमध्ये न्हाणीघराच्या(बऱ्याच ठिकाणी मोरीच्या) बाजूला रॉकेलचा डबा ठेवण्याची जागा असे... ... माझ्या बालपणी लाइफबॉय हा जनसामान्यांचा अंघोळीचा आवडता साबण होता.

In reply to by अनिंद्य

सुबोध खरे गुरुवार, 09/03/2020 - 12:43
बाकी सगळे साबण 75 ग्रॅम चे असत तर लाईफ बॉय हा 150 ग्रॅम चा होता म्हणून लवकर संपत नसे. पण त्याचा TFM 60% होता त्यामुळे फेस येण्यासाठी थोडा जास्त घासावा लागत असे. लाइफ बॉय मध्ये फिनॉल किंवा कार्बोलीक ऍसिड हा जंतुनाशक पदार्थ 1% असे त्यामुळे त्याला विशेष असा वास होता (काही लोकांना तो रॉकेल सारखा भासतो). RW coefficient 1. यानंतर डेटॉल ने आपला साबण काढला ज्याची जंतुनाशक क्षमता तिप्पट होती (RW coeeficient3 ). अर्थात साबणात असलेल्या जंतूनाशकाचा प्रत्यक्ष स्वच्छ करण्याच्या क्षमतेचा काहीही संबंध नाही हे नंतर सिद्ध झाले.

In reply to by सुबोध खरे

चामुंडराय Sat, 09/05/2020 - 06:51
त्यामुळे त्याला विशेष असा वास होता (काही लोकांना तो रॉकेल सारखा भासतो) >>>> बरोबर, खरे तर त्याला रॉकेल सदृश्य वास यायचा असे म्हणणे उचित ठरेल. अवांतर: "सदृश्य" हा शब्द वासाच्या संदर्भात बरोबर आहे का?

In reply to by Nitin Palkar

चामुंडराय Sat, 09/05/2020 - 06:46
'त्याचा फेस तर व्हायचा नाहीच'.... जड पाण्यात साबणाचा फेस होत नाही >>>> होय बरोबर. तेथील पाणी क्षारयुक्त होते हे खरे परंतु हे समजायचे ते वय नव्हते त्यामुळे फेस व्हायचा नाही हेच आठवते.

चित्रगुप्त गुरुवार, 08/27/2020 - 01:40
लय म्हणजे लयच भारी लिवलंय राव. शेवट एकदम सुन्न करून गेला. हे सगळे वाचून वेगेवेगळ्या ठिकाणी केलेली स्नाने आठवली तसेच अनेक चित्रकारांनी रंगवलेली स्नानमग्न स्त्रियांची चित्रे, रोमन बाथ, राजा गोपिचंदाची आंघोळ असे बरेच काही आठवले. याबद्दल चित्रे हुडकून आणखी एक प्रतिसाद द्यावा म्हणतो. अतिशय सुंदर लेखाबद्दल आनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

अनिंद्य Fri, 08/28/2020 - 09:53
@ चित्रगुप्त, खूप खूप आभार. ..... स्नानमग्न स्त्रियांची चित्रे, रोमन बाथ, राजा गोपिचंदाची आंघोळ असे बरेच काही आठवले. याबद्दल चित्रे हुडकून आणखी एक प्रतिसाद.... हे खरे कलावंतांचे लक्षण _/\_ जरूर करा. वाट पाहतो आहे. भतृहरी आणि त्याचा भाचा (?) गोपीचंद चित्रमाला बडोद्याला बघितली बहुतेक. २-३ स्त्रिया राजाला आंघोळ घालीत आहेत आणि एक स्त्री गवाक्षातून पाहत आहे असे काहीसे आहे का ते चित्र ?

सुमो गुरुवार, 08/27/2020 - 06:09
लिहिलंय तुम्ही अनिंद्य. शेवट मात्र चटका लाऊन गेला. जियो !

In reply to by सुमो

अनिंद्य Sat, 08/29/2020 - 11:37
@ सुमो थँक्यू ! तुमच्याप्रमाणे वर टर्मिनेटर, नूतन, पैलवान, सिरुसेरी, चित्रगुप्त यांनीही लेखाचा शेवट थोडा जड झाला असे लिहिलेय. शेवटी भूपाळी तिथे भैरवी ....

टर्मीनेटर गुरुवार, 08/27/2020 - 14:22
@ अनिंद्य :- काल रात्री लेख वाचला होता आणी वाचत असतानाच मनात त्यावर द्यायचा प्रतिसाद आकार घेत होता. पण शेवट वाचल्यावर मात्र मन:स्थीती अगदीच बदलुन गेल्याने काल नं देता आलेला प्रतिसाद आज देतोय. *** सर्वप्रथम ह्या छान लेखासाठी खुप खुप आभार! लेखात उल्लेखीलेले स्नानाचे सर्वच प्रकार मलाही फार आवडतात विशेषत: टबबाथ. त्याची आवड एवढी की इतरवेळी प्रवासात हाॅटेल्समध्ये वा रीसाॅर्ट्स मध्येच अनुभवायला मिळणारे हे स्नानसुख आपल्याला हवे तेव्हा उपभोगता यावे म्हणुन बाथटबची सोय (आई-वडीलांच्या मते “नसती थेरं”) उपलब्ध असलेला स्टुडीओ अपार्टमेंट घेतला! बाकी अंघोळ आणी ती करण्याचे विवीध प्रकार आवडत असले तरी तिर्थक्षेत्री असलेल्या कुंडांमध्ये मात्र कधीच स्नान करण्याची हिंमत झाली नाही. आरोग्याच्या, स्वच्छतेच्या द्रृष्टीने विचार करता ह्या बाबतीत माझ्या श्रद्धेवर माझी बुद्धी नेहमीच वरचढ ठरली आहे. असो, जे स्नानाचे तेच साबणांचे! वर उल्लेखीलेले जवळपास सर्व साबणही त्यांच्या गुण-दोषांसकट वापरले आहेत. चंदन, चंदन तेल आणी चंदनाच्या कृत्रिम सुगंधाची ॲलर्जी असल्याने म्हैसुर सॅंडल, मोती (सॅंडल) संतुर हे साबण आवडुनही वापरता येत नसल्याची खंत आहे. हे साबण आणी का कोणास ठाऊक पण कुठल्हयाही सुगंधाचा लक्स वापरला की हमखास सर्दी होते मला! हे झाले बाजारात मिळणा-या साबणांचे. नामचीन हाॅटेल्स मध्ये पाहुण्याना जे एक्स्लुसीव्ह सोप्स हाॅटेलच्या ब्रॅंडींगने दिले जातात त्यापैकी मला सर्वात आवडलेला साबण म्हणजे ‘The Fern’ ह्या श्रुंखलेतील हाॅटेल्स मध्ये दिला जाणारा ‘जिंजर सोप’. दुर्दैवाने दोनेक वर्षांपूर्वी जयपुर मधील ‘द फर्न रेसीडेंसी’ मध्ये देण्यात आलेला जिंजर सोप हा फारच सौम्य वासाचा होता. त्याबाबत व्यवस्थापनाकडे चौकशी केली असतां समजले की वेळोवेळी पाहुण्यांनी केलेल्या सुचनांवरून व्यवस्थापनाने उत्पादकाकडुन असा बदल करून घेतला आहे. ह्या सगळ्याची परिणीती म्हणजे मी मला आवडलेल्या, अंघोळीनंतर किमान चार-पाच तास अंगावर रेंगाळणारा आल्याचा हवाहवासा वाटणारा सुगंध देणा-या एका दर्जेदार साबणाला कायमचा मुकलो आहे :( लिहीण्यासारखे खुप काही आहे पण विस्तारभयाने इथे आटोपते घेतो :) धन्यवाद आणी पुढील लेखनास शुभेच्छा!

In reply to by टर्मीनेटर

अनिंद्य Sat, 08/29/2020 - 18:55
@ टर्मीनेटर, तुमच्यासारखी 'नसती थेरं' मी पण केली, पण दैव बघा - घरातल्या बाथटबमध्ये मी मावत नाही :-) उंची हॉटेल्सचे 'इन हाऊस' साबण ...... ते एक वेगळेच सुगंधविश्व आहे खरे, ते साबण आणि सुगंध बाहेर मिळत नाहीत. मी तर कधी कधी सरळ 'आवडला आहे, अजून द्या' असे सांगून मागून घेतो :-) सुंदर प्रतिसादाबद्दल आभार आणि शेवटच्या प्रसंगामुळे दिल दुखाने के लिये माफी.

गोंधळी गुरुवार, 08/27/2020 - 16:07
अगदी फ्रेश वाट्ल. आम्ही कित्येक वर्ष जास्त फेस येणारा चंद्रिका नावाचा साबण वापरत आहोत.

Nitin Palkar गुरुवार, 08/27/2020 - 20:21
स्नान हा थोडा तरी साहित्यिक शब्द पण अंघोळ या तीन अक्षरी शब्दांत जी सर्व साधारणपणे उरकून टाकली जाते त्यावर एखाद्या कवितेसारखा सुंदर लेख. मिपावरील अनेक महानुभावांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आपण काही लिहावं असं ही वाटेना पण एवढ्या सुंदर लेखाला दोन ओळींची तरी दाद दिली नाही तर तो करंटेपणा ठरेल असे वाटल्याने केवळ हे औद्धत्य करतोय. दोन वैयक्तिक आठवणी देण्याचाही मोह टाळता येत नाहीय. लहानपणी उन्हाळ्याच्या दिवसात अंघोळीसाठी वडलांबरोबर विहिरीवर जात असू. वडील घागरीच्या घागरी विहिरीतून काढून डोक्यावर ओतत असत, त्यावेळी, 'बाबा अजून, अजून' असं केलेला हट्ट आणि न कंटाळता तो पुरवणारे बाबा. आणि आठ एक वर्षांचा असताना पहिल्यांदा मुंबईला मामाकडे आलो असताना अंघोळ केल्यावर मामाला म्हटलं होतं, 'तुमच्याकडच्या पाण्याला कसलातरी वास येतोय', 'अरे क्लोरीनचा आहे तो' असं मामाने त्यावेळी सांगितलेललं. खूप छान, खूप आवडलेला लेख. पुलेशु. _/\_

In reply to by Nitin Palkar

अनिंद्य Mon, 08/31/2020 - 11:01
@ Nitin Palkar, औद्धत्य कसले त्यात. स्नानाचा धागा आहे आणि आपण सगळे आठवणीत डुंबतो आहोत :-) तुमचा प्रतिसाद मी मुद्दाम काहीजणांना दाखवला. विहिरीच्या, नदीच्या आणि शहरातील नळाच्या पाण्याला वेगवेगळा वास असतो हे मान्य नसलेल्या लोकांना :-) 'बाबा, अजून अजून' ... रम्य आठवणी. प्रतिसादाबद्दल अनेक आभार.