श्रीगणेश लेखमाला २०२० - माळवा परिसर : काही आठवणी, काही चित्रे

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in लेखमाला
28 Aug 2020 - 6:43 am

1
माझा जन्म आणि पहिली २६ वर्षे इंदुरात गेली. हा प्रांत इतिहासात ‘माळवा’ या नावाने ओळखला जातो. मल्हारराव होळकर (१६९४ - १७६६) हे माळवा सुभ्याचे पहिले मराठी अधिपती. त्यांची सून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (१७२५ - १७९५) यांची स्मृती आजही माळवावासीयांनी जपलेली आहे.

.
इ.स. १७८०मधील माळवा प्रांताचा नकाशा.

मराठी विश्वकोशातील माळव्याबद्दल माहिती खालील दुव्यावर वाचता येईल -
https://vishwakosh.marathi.gov.in/29045/

त्या काळी इंदूरच्या भोवतालचा परिसर अतिशय रम्य होता. सर्वत्र झाडे, लहान-मोठी खेडी, त्यातली मातीची कौलारू घरे आणि त्यांचे मोठमोठे चित्रविचित्र आकाराचे प्रशस्त ओटे (माळवी भाषेत ‘ओटलो’), बैलगाड्यांच्या खोल चाकोऱ्या पडलेले कच्चे रस्ते, खळखळणारे ओढे, त्यावरले लाकडी वा दगडी पूल, चिंचेची, वडा-पिंपळाची मोठमोठी झाडे... असा. मी तिथे खूप रमायचो. कुठेही बसून निसर्गचित्रे काढावीत. मला अगदी लहानपणापासून परिचित आणि प्रिय असलेले राळामंडळ आणि देवगुराडिया हे डोंगरही जवळच होते. थोडेसे दूर गेले की सिमरोल, पाताळपाणी, गिदिया खो (खो म्हणजे खोल दरी), हत्यारा खो असे गर्द झाडीने वेढलेले धबधबे, नर्मदाकाठी महेश्वर, ओंकारेश्वराचे घाट, तिथली मंदिरे, गढ्या, किल्ले..... अशा त्या माळव्यात व्यतीत झालेले बालपण आणि तारुण्य यांच्या असंख्य रम्य स्मृती मनात घर करून आहेत.

मशारनिल्हे ‘हत्यारा खो’मध्ये होळकरांच्याही आधीपासून या प्रांताचे अधिपती असलेल्या संपूर्ण ‘मंडलोई’ परिवाराला विषप्रयोगाने मारून या दरीत टाकून दिले होते. त्यापैकी एक गर्भारशी सून जिवंत असलेली तिथल्या आदिवासींना सापडली. तिला नीट बंदोबस्तात तिच्या माहेरी राजस्थानात नेऊन पोहोचवण्यात आले. जन्माला आलेल्या मुलाने कालांतराने इंदूरला येऊन गादीवर बसलेल्या शत्रूचा नि:पात करून परत आपले घराणे स्थापित केले. त्यांचे वंशज आजही ‘जमीनदार’ या नावाने जुन्या इंदुरातील त्यांच्या जुन्या गढीत राहत आहेत. त्यांच्याच मालकीच्या असलेल्या एका चाळीत माझे बालपण गेले. मात्र ही चाळ चांगल्या मोठ्या हमरस्त्यावर असून खाली दुकान आणि वर दोन मजली घरे असलेली प्रशस्त अशी होती. तिथे आमचे औषधाचे दुकान होते. (मात्र आम्ही कुणीही त्यातले एकही औषध कधी घेतले नाही. वडिलांचा भर साधी, नैसर्गिक रहाणी आणि घरगुती इलाज यांवर असायचा.)

नववीत असताना वडिलांबरोबर एकदा सायकलने दूरवर फिरताना एक जुनाट पूल दिसला. पूल तुटलेला असल्याने ओढ्याच्या वेगवान पाण्यातून कशातरी सायकली ओढत तो पार केला. भोवताली सर्वत्र हिरवळ, झाडी. पावसाळ्याचे दिवस. अगदी भारून टाकणारे वातावरण होते. बरोबर कागद, रंग नेले होते. मग तिथल्ल्या (खास इंदौरी उच्चार) चिखलात त्यातल्या त्यात जरा कोरडी जागा बघून त्या जुन्या पुलाचे चित्र काढायला बसलो. पुलाच्या तुटक्या विटा वगैरे अगदी तपशिलात जाऊन रंगवल्या होत्या. हे माझे प्रत्यक्ष जागेवर बसून काढलेले पहिले-वहिले निसर्गचित्र. तेव्हा अगदी धन्य धन्य वाटले होते. (हे चित्र घरी अजून माझ्याकडे आहे, पण आत्ता त्याचा फोटो उपलब्ध नाही.)
या निसर्गचित्रातला तो पूल आज पन्नासहून अधिक वर्षे झाली, तरी माझ्या मनात घट्ट रुतून आहे. काल्पनिक चित्रे रंगवताना अनेकदा चित्रात कळत नकळत तो अवतरतो. उदाहरणार्थ, माझी अलीकडील ही चित्रे -
चित्र क्र. १ व २
.     .

पुढे दहावीनंतर चित्रकला शिकायला सुरुवात केल्यावर रेखाटनासाठी दूरदूरपर्यंत सायकलने भटकू लागलो, तेव्हा या प्रदेशाची खरी ओळख होऊ लागली. माळव्यातली खेडी आणि खेडवळ लोक, त्यांची वेषभूषा, बोलीभाषा, पारंपरिक लोकसंगीत.. सगळेच मोहक.

ऐका : ‘मालवा की लोकधुने’ : कुमार गंधर्व
https://www.youtube.com/watch?v=oMxsjX0gZf0

या खेडेगावांची असंख्य चित्रे त्या काळात मी रेखाटली. बरीचशी रंगचित्रे प्रत्यक्ष तिथे बसून रंगवली. (सर्वप्रथम १९७६मध्ये आणि नंतरही मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत त्या खास माळवी चित्रांची प्रदर्शनेही भरवली.)

माळवी खेडेगावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष समोर बसून केलेल्या सुरुवातीच्या रेखाटनांपैकी काही चित्रे -
चित्र क्र. ३-६
.     .

.     .

चित्र क्र. ७
.
पंथापिपलाई गाव
१९७५च्या सुमारास एकदा इंदौरहून उज्जैनला जाताना लांबवर ‘पंथापिपलाई‘ नावाचे एक गाव दिसले. तिथूनच पटकन त्याचे एक रेखाटन केले. अनेक वर्षांनंतर त्यावरून वरील तैलचित्र रंगवले.

जुन्या रेखाटनांवरून नंतरच्या काळात केलेली आणखी काही चित्रे

चित्र क्र. ८ व ९
.     .

पुढे १९७७ सालापासून दिल्लीत वास्तव्यासाठी आल्यावर माळव्याच्या आठवणींनी झुरत राहायचो. मग कल्पनेने माळव्याच्या गावांची चित्रे काढणे सुरू झाले, तीही खूप काढली. त्यानंतर मध्यंतरी बराच काळ व्यतीत झाला, त्यात ‘हुबेहूब’पासून अमूर्त चित्रांपर्यंतचे अनेक निरनिराळे प्रयोग करत राहिलो, परंतु माळव्याचा विसर कधीच पडला नाही.

नंतरच्या काळातील विविध प्रकारे केलेली काही चित्रे :

चित्र क्र. १०
.

चित्र क्र. ११ व १२
.     .

चित्र क्र. १३
.

चित्र क्र. १४ व १५
.     .

चित्र क्र. १६ व १७
.     .

चित्र क्र. १८
.

अहिल्याबाईंची स्मृती जपणारा नर्मदेकाठचा परिसर, तिथली मंदिरे, किल्ले, खडक, तसेच तिकडल्या घाटांवर विविध उद्योगात रमलेले लोक वगैरेंचा प्रभावही माझ्या कलेवर दीर्घ काळापासून आहे, त्यापैकी काही कल्पनाचित्रे :

चित्र क्र. १९
.

चित्र क्र. २० व २१
.     .

चित्र क्र. २२
.

चित्र क्र. २३
.

चित्र क्र. २४
.

चित्र क्र. २५
.
तर अशी ही आठवणींची आणि चित्रकलेची यात्रा.

अवांतर - मल्हारराव होळकरांवरील एक जुने पुस्तक :
.     .

2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

28 Aug 2020 - 9:59 am | चौकटराजा

... एक जुने गीत आठवले - मनोरथा चाल त्या नगरीला भू लोकीच्या अमरावतीला ....
मन पाखरू पाखरू होऊन उडू लागले ते एकदम माळवा परिसरात भटकू लागले. चित्रमयता अनुभवीत मागो मागे गेले तुमच्या बरोबर ! दोनेक वर्षांपूर्वी इंदूर ,मांडू,,उजैन, महेश्वर परिसरात जाणे झाले त्यात पाहायला मिळाल्या त्या काही प्रतिमा चित्रात आल्या आहेत. डोळे तृप्त झाले हे सर्व ऐश्वर्य पाहून !

@ चौरा, तुमच्या इंदूर ,मांडू,,उजैन, महेश्वर परिसरातील भटकंतीबद्दल सचित्र लेख अवश्य लिहावा ही विनंती (आधीच लिहिलेला असेल तर दुवा द्यावा)

डोळे तृप्त झाले हे सर्व ऐश्वर्य पाहून !

खूप खूप आभार. हल्ली काही वर्षांपासून प्रदर्शने भरवणे वगैरे बंद आहे, त्यामुळे दर्दी रसिकांकडून अशी दाद आता फक्त मिपावरच मिळू शकते.

प्रशांत's picture

28 Aug 2020 - 10:47 am | प्रशांत

चित्र १ लंबर...

संजय क्षीरसागर's picture

28 Aug 2020 - 11:09 am | संजय क्षीरसागर

पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आणि तितकीच रम्य चित्रं !

जिओ !

चित्रगुप्त's picture

28 Aug 2020 - 6:04 pm | चित्रगुप्त

@ प्रशांत, संक्षी.. चित्रे आवडल्याचे वाचून हुरूप आला. अनेक आभार.

कंजूस's picture

28 Aug 2020 - 11:43 am | कंजूस

फार आवडली चित्रं. हुबेहुबपासून ( क्याम्रा ती देतोच)दूर जाणारी चित्रंही आवडतात. कारण कल्पनेने त्यात काही भरता येते.
तुम्ही काढलेली चित्रे चित्रकलेत( paintings) कोणत्या प्रकारात गणली जातात?

मदनबाण'चा एक लेखही आठवला - http://misalpav.com/node/29731
काळभैरव उज्जैन. उज्जैन उभारण्यात शिंदे सरकारचा मोठा वाटा आहे. नंतर त्यांनी ग्वाल्हेर ला नेली राजधानी.

@कंजूसराव,
तुमच्या "तुम्ही काढलेली चित्रे चित्रकलेत( paintings) कोणत्या प्रकारात गणली जातात?" या प्रश्नाचे उत्तर फार अवघड आहे, हा विषय एकाद्या लेखाचाच विषय होऊ शकतो.
युरोपीय कलेत क्लासिसिझम, निओ-क्लासिसिझम, रोम्यांटिसिझम, इम्प्रेशनिझम, पोस्ट इम्प्रेशनिझम, मॉडर्निझम, पोस्ट-पोस्ट मॉडर्निझम, फाविझम, क्यूबिझम, अमुकझम - तमूकझम ... असा झमझमाट बराच गाजला, त्यामागे (माझ्यामते) कलेपेक्षाही कला-विक्रेते, मोठमोठे कला संग्राहक आणि त्यांना अनुकूल असणारे (वा केले गेलेले) कला समिक्षक, यांचाच मोठा हात असावा. तसेच इकडले - तिकडले वाचून वर्तमानपात्रात लेख वगैरे पाडणार्‍यांसाठी, मेरठ वा तत्सम युनिव्हर्सिट्यातून कलेत पीयचडी करून कलाध्यापकीच्या नोकर्‍या मिळवणारांसाठी हे इझम वगैरे प्रकरण उपयोगी ठरते. खरा कलावंत (म्हणजे ज्याला न्य बाह्य गोष्टींपेक्षा कलेतील वेगवेगळ्या शक्यतांचा शोध घेण्यात रमून जाणे आवडते) त्याला त्या त्या वेळी जे सुचेल, रुचेल, भावेल, जमेल, करावेसे वाटेल, त्यात रमलेला असतो. त्यावर मग समिक्षक वगैरे इझम वगैरेंचा डोलारा उभारत असतात.
या लेखात दिलेल्या चित्रांखेरीज अन्य प्रकारेही वेळोवेळी मी वर लिहील्याप्रमाणे 'सुचेल, रुचेल, भावेल, जमेल, करावेसे वाटेल' ते करत आलो. ही कोणती स्टाईल म्हणायची बुवा? किंवा "चला आता आपण एक पोस्ट-पोस्ट मॉडर्न चित्र बनवूया" असले मला कधी सुचलेच नाही.
एकप्रकारे असेही म्हणता येइल, की हल्ली (म्हणजे अनेक वर्षांपासून) बरेच कलावंत आपापल्या मगदुराप्रमाणे काहीतरी वेगळे ('हटके' हा त्यांचा आवडता शब्द) करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे त्या प्रत्येकाच्या कलेला अमूक एका साच्यात वा 'इझम' मधे बसवणे शक्य नाही. अर्थात एकाद्या कलावंताला कुणी गॉडफादर लाभला, तर खास त्याच्यासाठी असा डोलारा उभा केला जाऊ शकतो.... वगैरे.

कंजूस's picture

29 Aug 2020 - 9:16 pm | कंजूस

सविस्तर उत्तर आवडले आणि पटलेही.

या इंदुर , माहेश्वर, ओंकारेश्वर, मांडु , उज्जैन, परिसराची धावती भेट केली आहे आणि आवडला आहे. चित्रांमुळे तो एक वेगळ्याच प्रकारे समोर आला. ( त्यावेळचे फोटो साध्या फिल्म क्याम्र्याने काढले होते.)

फक्त एक जाणवले ते म्हणजे हे राज्य कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाकडे असायला हवे होते.

महासंग्राम's picture

28 Aug 2020 - 12:38 pm | महासंग्राम

चित्र तर एकदमच खास

मस्तच चित्र .. अप्रतिम..

कानडाऊ योगेशु's picture

28 Aug 2020 - 12:56 pm | कानडाऊ योगेशु

सुरेख लेख. गतकाळाच्या आठवणी व्याकुळ करणार्या असतात.
मी ही सध्या उज्जैन मध्ये राहतो आहे आणि हा परिसर अनुभवतो आहे.

अरे वा. उज्जैनमधे रहात आहात, तर तिकडे काही वेगळेपणा जाणवतो आहे किंवा कसे, काय आवडते आहे, काय नाही किंवा जे काही तुमचे अनुभव असतील त्याबद्दल एकादा लेख अवश्य लिहावा, ही विनंती.

@कानडाऊ योगेशु, वेधशाळा कशी आहे ते लिहा. आमची हुकली होती.

टर्मीनेटर's picture

28 Aug 2020 - 1:21 pm | टर्मीनेटर

सचित्र लेख आवडला!
क्र. ८ चे चित्र विशेष आवडले.

@ महासंग्राम, भक्ति, टर्मीनेटर, सिरुसेरी, चौथा कोनाडा, अजित गुंजल, स्मिताके, बबन तांबे, मिपाप्रेमि योगेश, सर्वांना चित्रे आवडल्याचे वाचून खूप चांगले वाटले, आणि लेखनासाठी नवा हुरूप आला. अनेक आभार.

MipaPremiYogesh's picture

28 Aug 2020 - 2:42 pm | MipaPremiYogesh

काय कमाल चित्रे आहेत. खूपच सुंदर. माझ्या विशलिस्ट मध्ये आहे इंदोर बघू कधी जाणे होते. अजून आठवणी लिहा.

सुधीर कांदळकर's picture

28 Aug 2020 - 4:58 pm | सुधीर कांदळकर

इंदौर, मांडू, भोपाल, जबलपूर दौर्‍याची आखणी करतांना वाचले होते ते आठवले. रानी रूपमतीच्या कथेसह. राजा भोजाच्या वैभवशाली कबरीखाली दबलेल्या वास्तू पाहायच्या होत्या. अखेर तो नियोजित दौरा बारगळलाच. कुमारांची माळवा लोकगीते ऐकलेली आहेत.

मला चित्रकला कळत नसतांना त्याबद्दल मी लिहिणे धाडसाचेच, चुकलो मूर्खपणाचेच ठरेल. तरीही चित्रे पाहतांना मनात काय विचार आले ते लिहितो.

बहुतेक चित्रे स्वप्नसृष्टीतली, बरीचशी गूढरम्य वाटली. १५, २१ आणि २३ आवडली. कधी गडद रंगावर फिक्या रंगातल्या बाह्यरेषा तर कधी फिक्या रंगावर गडद बाह्यरेषा. मस्त. चित्र २५ मध्ये पाण्यातले प्रतिबिंब खास वाटले. मुंबईत कधीकधी जहांगीर आर्ट गॅलरीत जात होतो तेव्हाच्या सुखद आठवणी मनात दाटल्या. पण तेव्हा कुणीतरी चित्रकलेतले जाणकार बरोबर असे. कधी कोणी अनोळखी रसिक चित्रांचा अर्थ समजावून सांगे. तर कधी एक दर्दी दुसर्‍याला सांगतांना मी सभ्यता बाजूला ठेवून मुद्दाम ऐकत असे. बरेचदा त्या आगाऊपणाचे कौतुकही होई.

अनेक अनेक धन्यवाद.

@ सुधीर कांदळकर साहेब,

बहुतेक चित्रे स्वप्नसृष्टीतली, बरीचशी गूढरम्य वाटली

लहानपणापासूनच मला गूढरम्यतेचे फार आकर्षण आहे. 'अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा (विष्णुशास्त्री आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर ) जीएंचे, खलिल जिब्रान (की गिब्रान ?) यांचे साहित्य, काही पाश्चात्य चित्रकारांची धूसर, गूढरम्य चित्रे, Gustave Doré याची छापाचित्रे या सर्वांतून ही हौस भागवता आली. मला बरेचदा स्वप्ने पण तसलीच पडतात. आपली स्वतःची चित्रे पण गूढ, स्वप्नसृष्टीतील वाटावी, अशी कुठेतरी खोल इच्छा पण असणारच. तुम्ही हे नेमके पकडलेत.
काही वर्षांपूर्वी पॅरिसला जुन्या वस्तुंच्या बाजारात १९५७ सालचे कुणा फ्रेंच चित्रकाराचे असेच गूढतेचे वलय असलेले चित्र विकायला असलेले बघून मी अगदी खिळून गेलो होतो. किंमत विचारायची हिंमत होत नव्हती. दोनचार चकरा मारून पुन्हा पुन्हा पाय तिकडेच वळत होते, शेवटी हिय्या करून विचारले, तेंव्हा पन्नास युरो किंमत सांगितली गेली. इतर लोक घासाघीस करत असलेले बघून मी तीस युरो म्हटले, तर त्याने ते मान्य केले. अतिशय आनंद झाला. अख्या जन्मात मी विकत घेतलेले हे एकमेव चित्र. (खरेतर त्या जुन्या फ्रेमचीच किंमत त्यापेक्षा जास्त असेल)
खालील प्रतिमेत वरती ते फ्रेंच चित्रकाराचे गूढरम्य चित्र, आणि खाली माझे बटबटीत चित्र.
.

.... चित्र २५ मध्ये पाण्यातले प्रतिबिंब खास वाटले....

रंगलेपनासाठी गेली काही वर्षे अनेक निरनिराळे प्रयोग करताना बरेचदा अभावितपणे चित्रात एकादा विशिष्ट काही प्रभाव निर्माण होतो, त्याला थोडीशी कल्पनेची जोड देऊन जरा स्पष्ट केले, की काही आगळेच निर्माण होते. हे पाण्यातले प्रतिबिंब असेच जमून आलेले आहे.
रसग्रहण आणि प्रोत्साहनासाठी अनेक आभार.

सिरुसेरि's picture

28 Aug 2020 - 5:06 pm | सिरुसेरि

सुरेख चित्र कथन .

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2020 - 5:19 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त सुंदर पेन्टिंग्ज !
लेख आवडला !
क्र. २२ चे चित्र खुप आवडले.

तुषार काळभोर's picture

28 Aug 2020 - 6:05 pm | तुषार काळभोर

लेख संपूच नये असं वाटत होतं!!

अनिंद्य's picture

28 Aug 2020 - 6:30 pm | अनिंद्य

@ चित्रगुप्त,

स्मृतीरंगांची ऐश्वर्यशाली उधळण आहे हा लेख.

तुम्हीच दिलेल्या लिंक मध्ये कुमारजी म्हारी देराणी-जेठाणी गात गात रसग्रहणाला पोषक वातावरण निर्माण करीत होते लेख वाचतांना... एक सो एक चित्रे आणि तुमचे त्याबद्दलचे अनुभव.

माळवा म्हणजे साधी सोपी माणसं, त्यांची मीठी जुबान आणि हातचं राखून न ठेवता केलेलं मनमोकळं आतिथ्य ....

चित्र २१ तुमची हरकत नसेल तर स्क्रीनसेव्हर म्हणून सतत दिसते ठेवायचे आहे.

@ अनिंद्य "तुमची हरकत नसेल तर स्क्रीनसेव्हर म्हणून सतत दिसते ठेवायचे आहे"..... असे तुम्ही लिहीले आहे, खरेतर जालावर येणारे कोणतेही चित्र स्क्रीनसेव्हर म्हणुन ठेवायला कुणाचीच काही हरकत असायचा प्रश्नच उद्भवत नाही, तरीपण आपण मला एवढा मोठेपणा देत आहात, हे खूपच कौतुकास्पद वाटले. अगदी अवश्य ठेवा.
याशिवाय माझ्या कोणत्याही लेखातले कोणतेही चित्र याप्रकारे कधीही 'दिसते' ठेवावेसे वाटले, तर तसे अवश्य करा.

प्रचेतस's picture

28 Aug 2020 - 7:54 pm | प्रचेतस

व्वा..! काय सुरेख लेख आहे. त्याला चित्रांचीही अत्यंत समर्पक जोड. खूप आवडलं लेखन. लिहीत राहा का, तुमच्या पोतडीतून अजूनही अशा उत्तमोत्तम लेखांची आणि चित्रांची मेजवानी मिळो.

अवांतर: माळव्याचे प्राचीन नाव आकरावन्ती. या देशाचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग क्षत्रप रुद्रदामन ह्याच्या जुनागड येथील लेखात उल्लेखलेले आहेत. पूर्व आकरावन्तीची
राजधानी आकर आणि पश्चिम आकरावन्तीची अवंती अर्थात उज्जैन.
वाशिष्ठीपुत्र पुळुवामीच्या नाशिक शिलालेखात गौतमीपुत्राने आकरावन्ती अर्थात माळवा जिंकल्याचा उल्लेख आहे.

@ प्रचेतसः तुमचे इतिहासप्रेम आणि सखोल अभ्यासाला कोटि कोटि प्रणिपात.
अनेक वर्षांपूर्वी "आणि क्षिप्रा वहात राहिली" हे पुस्तक वाचनात आले होते. लेखात उल्लेखिलेल्या इंदौरच्या मंडलोई ऊर्फ जमीनदार वंशातल्या 'निरंजन जमीनदार' यांनी ते लिहिलेले असून त्यात होळकर आणि शिंदे यांच्यातील वैमनस्याचे, त्यांच्या आपापसातील लढाया, हल्ले वगैरेंचे तपशीलवार वर्णन होते. सदर निरंजन जमीनदार त्याकाळी माळव्यातले विख्यात इतिहास संशोधक म्हणून ख्यात होते. त्यांच्या दफ्तरात अजूनही अनेक ऐतिहासिक कागदपत्रे नक्कीच असतील. हवेतर त्यांचा संपर्क क्र. मिळवून देऊ शकतो.
लेख आणि चित्रे आवडल्याचे वाचून समाधान वाटले.

चित्रगुप्त's picture

29 Apr 2021 - 1:27 pm | चित्रगुप्त

'आणि क्षिप्रा वाहत राहिली' साठी फोन नं. मिळाला आहे. आज उद्यात त्यांना विचारतो पुस्तकाबद्दल.

प्रचेतस's picture

29 Apr 2021 - 1:32 pm | प्रचेतस

भारी.
पुस्तक मिळाले तर हवेच आहे.

Ajit Gunjal's picture

28 Aug 2020 - 8:27 pm | Ajit Gunjal

Latest Information

जुनी माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. खूप प्राचीन जुने फोटो जे कधीही सहजासहजी पाहायला मिळत नाही. जुन्या गोष्टीना उजाळा
Latest Marathi News

सिरुसेरि's picture

28 Aug 2020 - 9:19 pm | सिरुसेरि

छान माहिती . रामुभैयाजी दाते , कुमार गंधर्व , अशा अनेक थोर व्यक्ती इंदौर , माळवा , देवास प्रांतातील आहेत त्यामुळे या स्थानांबद्दल खुप आदर आहे .
पु. ल. देशपांडे यांच्या "तुझे आहे तुजपाशी" मधील काकाजी , सतीशभैया , शाम हि पात्रे काल्पनीक असली तरी अस्सल इंदौरी वाटतात .
पु.ल. यांच्याच "गुण गाईन आवडी" मधे धार प्रांतातील एका तपस्वी मुर्तीकाराची सुरेख माहिती दिली आहे .
" शाम - ए- अवध , शब - ए - मालवा " हि म्हण प्रसिद्ध आहे .

बबन ताम्बे's picture

28 Aug 2020 - 9:24 pm | बबन ताम्बे

शब्द आणि कुंचल्यातून माळव्याचे अप्रतिम चित्र साकारलेय.
अत्यंत ओघवती लेखनशैली आणि जोडीला अप्रतिम पेंटिंग्ज.
भान हरपुन गेले.
धन्यवाद चित्रगुप्तजी !

स्मिताके's picture

28 Aug 2020 - 11:25 pm | स्मिताके

लेख आणि चित्रे अप्रतिम.

अतिशय सुंदर चित्र काका!
स्वप्नलोकाचा भास होतो चित्र पाहताना. आधीच आवडता प्रांत त्यात ही सुंदर चित्र. निव्वळ मेजवानी!

अप्रतिम.. निव्वळ अप्रतिम.

चित्र काढणाऱ्या लोकांचा मला हेवा आणि आदर आहे.
मला चित्रकला आवडायची पण ती आवड समृद्ध कधीच झाली नाही..

तुमच्या आठवणी चित्रांच्या रूपाने पाहताना खुप छान वाटले.

पंथापिपलाई गाव, आणि सकाळचे चित्र क्रमांक 8 ही चित्रे मला खुपच आवडली..

चौकटराजा's picture

29 Aug 2020 - 2:48 pm | चौकटराजा

मला या चित्रकार मन्डळीचा हेवा वेगळ्याच कारणासाठी वाटतो. यान्च्या परसात अशी झाडे आहेत की काय ज्याचे साल काढले की क्यान्व्हास होतो अन फूल वा पान पिळले की रंग मिळतो. आली चित्राची लहर की जा परसात. सांगायचे असे की आज एका चित्रकार मित्राचा फोन आला होता. मी अजून " आहे" की नाही यासाठी बहुदा अन्दाजाने केलेला. ( होय असे फोन मला येत असतात ... नाही आपलं बरे आहे ना असे विचारायला फोन केला वगैरे ). तो मित्र म्हणत होता आता कॅन्व्हास व रंग ( कॅम्लिन दर्जाचे नव्हेत ) इतके महाग झालेत की चित्र करून विकले तर भान्डवल तरी वसूल होईल का अशी शन्का आहे म्हणून पेन्टिन्ग बन्द !

गणेशा's picture

29 Aug 2020 - 4:20 pm | गणेशा

:-)

पेंटिंग बंद केले तरी मनात उमटणारे रंग नक्कीच शांत बसु द्यायचे नाहीत. असे वाटते.
कुठल्याही निर्मितीचा आनंद हा त्या पुर्ण कलाकृतीचा किंवा ती कलाकृती डोळ्यांनी पाहण्यापेक्षा जास्त असतो, त्यात चित्रकला म्हणजे मला आपल्याच मनाचे विचार, त्याचे फटकारे, त्याचेच रंग भासतात, त्यामुळे चित्रनिर्मिती हि खुप आनंददायी गोष्ट आहे.

घराला कलर करण्या अगोदर, माझ्या एका ओळखीच्या (भारतीव्यद्यापीठ मध्ये चित्रकला शिक्षक होते ) त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन लागले होते ) त्यातील तीन पेंटिंग मी आणले..

चित्र विकत घेण्या पेक्षा मी मला कुठले चित्र का आवडले हे सांगत होतो, आणि ते, ते कुठे आणि कसे काढले सांगत होते.. मस्त मज्जा..

अन्या बुद्धे's picture

29 Aug 2020 - 4:44 pm | अन्या बुद्धे

चित्र 7
पंथापिपलाई गाव खूप आवडले..

Ajit Gunjal's picture

14 Sep 2020 - 8:35 pm | Ajit Gunjal

historical

Nice historical images,
collected some of the most interesting images of all time
Shrirampur News

मनस्विता's picture

28 Feb 2021 - 11:42 am | मनस्विता

तुमचा लेख आणि तुमच्या चित्रांमधून झालेले माळवा परिसराचे दर्शन खूप विलोभनीय आहे.

त्या परिसरातील जिवंतपणा तुमच्या चित्रांमध्ये उतरलाय. तुम्ही रेखाटलेली कल्पनाचित्रे पण खूप आवडली.

चित्रगुप्त's picture

6 Feb 2023 - 2:42 am | चित्रगुप्त

आज पुन्हा एकदा जुनी रेखाचित्रे बघताना माळव्याची आठवण जागी झाली आणि हा लेख उपसून पुन्हा वाचला.