खूप वर्ष झाली असतील, राजमाचीचा पहिला ट्रेक कधी केला ते आता नेमकं आठवत नाही. किंबहुना पहिल्यांदाच राजमाचीच्या त्या नितांतसुंदर वाटेवर जाऊनही तेव्हा माचीला न जाता सरळ पुढे गेलो होतो ते म्हणजे ढाकच्या बहिरीला.
पिंपरीहून रात्री ९:२५ च्या लोकलने आम्ही ५/६ जण निघालो होतो ते तासाभरात लोणावळ्यात पोहोचलो. पुढच्या राजमाचीच्या कित्येक सफरींना हीच ९:२५ ची लोकल आमची सहसोबती होणार होती हे तेव्हा माहीत असणं शक्यच नव्हतं. मग पुढे लोणावळा स्टेशनवर चहा पिणे वगैरे सोपस्कार उरकून आम्ही पुढे चालू लागत असू. एसटी स्टॅण्डच्या पुढे आल्यावर जुना मुंबई-पुणे महामार्ग लागत असे. भारत पेट्रोलियमचा पंप हा तिथला लॅण्डमार्क. त्या पंपाच्या इथूनच वाट तुंगार्लीला जाई. तुंगार्ली गाव संपता संपता द्रुतगती महामार्गाच्या खालून तो रस्ता जाई तो समोरच्या एका पहाडावर. त्याच्या पायथ्याची बंगल्यांची रांगच आहे. त्या पहाडाचा तीव्र चढ चढला की तुंगार्ली धरण आलंच. तुंगार्ली धरणाची भिंत त्या अंधारात भयप्रद वाटे. डाव्या बाजूला दाट झाडी आणि त्यातूनच खालच्या दरीत लोणावळ्यातल्या दिव्यांचा प्रकाश झिरपत असे. राजमाचीच्या असंख्य सहली केल्या पण रात्री तुंगार्ली धरण्याच्या भिंतीवरुन फक्त एकदाच गेल्याचं आठवतंय मला. धरणाची भिंत, रात्रीच्या अंधारात चमकणारं काळंशार पाणी मोठं गूढ वातावरण निर्माण करत असे. तसंही धरणाच्या भिंतीवरुन जाणे म्हणजे मुख्य रस्ता सोडून उजवीकडचा एक लहानसा चढ चढून भिंतीवर येणे असे.
सध्याची वाट आणि समोर दिसणारे माचीवरील श्रीवर्धन, मनरंजन
धरणाच्या ४/५ फर्लांगावर पांगळोलीची ठाकरवाडी. रात्री इथून जातांना खूप भिती वाटे ती इथल्या कुत्र्यांची. दिवसा शामळू भासणारी कुत्री रात्री विलक्षण शूर होतात आणि सर्व बाजूंनी गलका करुन अंगावर येऊ बघतात. इथून जाताना हाती काठी असणे अगदी जरुरीचे असे. पांगळोलीची आदिवासी वाडी अगदी लहानशी आहे, ती संपल्यासंपल्याच तिथूनच ती सुप्रसिद्ध घळ सुरु होई. घळीच्या सुरुवातीलाच ते राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन दिसत. तीव्र उताराची ती झाडीभरली घळ उतरणे एकदम मौजेचे असे. मधूनच एखादा वन्यप्राणी बाजूंच्या झुडपांतून खसफसत जाई. ती घळ संपल्यावर मात्र एकाएकी सपाटीची वाट येई. पांगळोलीच्याच डाव्या बाजूच्या डोंगरावर एक टॉवर होता, आजही आहे. त्यावर लाल दिवा चमकत असे. हा टॉवर बहुधा विमानांसाठी दिशादर्शक असावा. हा टॉवर लोणावळ्याच्या परिसरात कुठूनही दिसतो. अगदी भाजे लेणीवरुन, लोहगड, विसापूर किल्ल्यांवरुन, ड्युक्स नोज वरुन, वाघदरीच्या इथून, कुठूनही. आणि जेव्हा जेव्हा तो टॉवर बघतो तेव्हा तेव्हा राजमाचीच्या आठवणी दाटूत येतातच. तो टॉवर आणि भारत पेट्रोलियमचा पंप पाहिल्यावर कट्टर भटक्यांना राजमाचीचीच आठवण होईल ह्याला कुणाचेही दुमत नसावे.
राजमाचीला जाताना वाट चुकायची शक्यता अत्यंत नगण्य. तुम्ही एकदा त्या द्रुतगती महामार्गाच्या खालून जाऊन तुंगार्ली धरण्याच्या वाटेला लागलात तर एकतर राजमाचीला पोहोचाल नाहीतर थेट ढाकच्या बहिरीला भिडाल. घळीत जरी असंख्य फाटे असले तरी मुख्य पायवाट सोडायची नाही, ती थेट खालच्या सपाटीलाच आणून सोडते. सपाटीला लागते ती कुणे गावारुन येणारी वाट. ही वाट म्हणजे माचीला जाणारी गाडीवाट. डावीकडे पाचेक किलोमीटरवर कुणे गाव तर सरळ जाणारी वाट राजमाचीला जाई. लगेचच डाव्या बाजूला सह्याद्रीची खोल दरी होई तर उजव्या बाजूला खड्या कातळाची लांबच लांब भिंत. त्या वाटेच्या सुरुवातीलाच एक कठडा होता. तिथं आम्ही सर्वजण एक छोटा थांबा घेऊन थोडक्या गप्पा मारत असू. इथून पुढे बरीचशी वाटचाल सपाटीवरुनच होई. डाव्या बाजूची दरी अधिकच खोल खोल होत विस्तारत जाई तर उजवीकडची कातळभिंती दूर दूर जात असे. मधूनच दरीपल्याडच्या डोंगरातून रेल्वे जाताना दिसे. रात्रीच्या गडद अंधारात ते दृश्य मोठे विलक्षण भासे. काही वेळा रेल्वे बोगद्यांतून प्रवास करत असता तिचे इंजिन व सुरुवातीचे काही डबे दृश्यमान असत, मधला भाग बोगद्यामुळे झाकोळून जाई तर मागचे काही डबे उठून दिसत. अशा वेळी एकामागोमाग दोन रेल्वे जात असल्याचा भास होईल. मधूनच त्या डोंगरावरल्या काळोख्या आभाळात एखादं विमान लुकलुकत जाताना दिसे. त्या सर्व अंधार्या पार्श्वभूमीवर समोरच दिसणारे, अगदी जवळ भासणारे ते दोन्ही बालेकिल्ले अगदी मनोरम भासत.
त्या वाटेवरुनच पुढे गेल्यावर उजव्या बाजूस झाडीत एक अगदी लहानशी आदिवासी वस्ती आहे, ती म्हणजे फणसराई. तशी ती एकदम आतल्या बाजूला झाडीत, त्यामुळे त्या राईत कधी जाणं झालं नाही. इथं क्वचित कुत्र्यांचे भुंकण्याचे आवाज यायचे. इथूनच पावसाळ्यात डोंगरावरुन येणारे पाणी कातळधार धबधब्याला मिळते. ह्या धबधब्यापाशी जाणे मोठे कठीण, जाऊही नये. मात्र ह्याचे अतिशय सुंदर दृश्य राजमाची किल्ल्यावरुन दिसते. राजमाचीच्या ह्या नितांतसुंदर रस्त्याने चालत जात असताना दूरवर भेकरांचे भुंकणे तर रातव्यांची किचकिच कायम सोबतीला असे. ह्या कातळधारच्या पुढे आतापर्यंत समोरील बाजूस दिसणारे बालेकिल्ले आता अगदी डाव्या बाजूला शेजारीच आलेले दिसत. पुढे एक फाटा येई. राजमाचीला जाताना हा फाटा चुकवून चालणारच नाही, सरळ रस्ता वळवंडच्या वाडीला जाऊ पुढे ढाकला जातो तर डावीकडचा रस्ता हा माचीला जातो.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी पहिल्यांदा ह्या वाटेवरुन गेलो तो ढाकला. अर्थात रस्ता चुकला नसून ढाकच करायचा होता. लोणावळा ढाक हे बरेच लांब अंतर आहे, जवळपास तीस-पस्तीस किमी. मध्ये वळवंडला शाळेत मुक्काम करुन परत पुढे ढाकची १२/१३ किमीची वाटचाल. हल्ली बहुतांश जण ढाकला जांभिवली कोंडेश्वर मार्गे जातात पण ज्यांना सह्याद्रीचे अस्सल रूप आणि असंख्य विभ्रम पाहायचे असतील ह्या लोणावळा-तुंगार्ली-फणसराई-वळवंड मार्गाशिवाय पर्याय नाही. ढाकला गेलो तो एकदाच पण नंतर कित्येकदा माचीला आलो ते ह्याच वाटेवरुन. फक्त सरळ न जाता फाट्यावरुन डावीकडे घुसत गेलो.
आता हे शेजारी दिसणारे बालेकिल्ले चक्क आपल्या पाठीमागे दिसू लागत. त्यांच्या दरम्यान खोल दरी असल्याने तसेच पुढे चालत राहूनच दरीच्या वरच्या बाजूने जाऊन वळसा मारुनच माचीला पोहोचता येते. राजमाचीला अगदी अमावास्येच्याही अंधारात जाताना बॅटरी लागते ती फक्त २/३ ठिकाणी. तुंगार्लीच्या भिंतीजवळून जाताना, पांगळोलीच्या पुढच्या घळीत, आणि ह्या फाट्याच्या पुढे. इथूनच पुढे अगदी दाट जंगल आहे. इथल्या गडद अंधारात अगदी काहीही दिसत नाही. इथे जाताना विजेरीचा प्रकाश अगदी आवश्यकच. इथेच बॅटरीच्या प्रकाशात चालताना आम्हाला एका वेलीवरुन लटकणारा हरणटोळ अगदी समोरच दिसला होता. इथलं जंगल अगदी सुंदर आहे. चहूबाजूंना गच्च दाट झाडी. इथूनच काहीसं पुढं गेल्यावर एक ओढा आहे. तो ओढा लागला की राजमाची आता टप्प्यात आलाच अशी भावना होई. हा ओढा पावसाळ्यात ओलांडणे खूपच कठीण होई. पाण्याचा वेगवान प्रवाह इथून वाहात जाऊन पुढे काही अंतरावर असलेल्या एका खोल दरीत उडी घेई. हा ओढा ओलांडताच एक तीव्र चढ सुरु होई. हाच तो माचीवर जाताना लागणारा शेवटचा चढ. मधूनच दाट झाडीतनं तर कधी उघड्यावरुन जाणारा हा शेवटचा चढ दमछाक करणारा असे. जवळपास अर्ध्या तासाची ही तीव्र चढण पार केली की राजमाची अगदी टप्प्यात येई. अगदी शेजारीच उजवीकडे श्रीवर्धनचा काळाकभिन्न उत्ताल कडा दिसे तर डावीकडे खोल गेलेल्या दरीचे दर्शन होई. पुढे काहि क्षणातच एक वेस लागत असे. आजमितीस तिथं भग्न भिंती तितक्या शिल्लक आहेत. वेशीजवळच एका झाडाखाली एक पार बांधला होता तिथेच एक हनुमानाची मूर्ती असे. तिथं क्षणभर बसून वेशीतून आत प्रवेश करावा. मात्र तरीही तिथून उधेवाडीला पोहोचायला वीसेक मिनिटांची सुखद चाल असे.
श्रीवर्धनचा उत्ताल कडा उधेवाडी
उधेवाडीच्या अगदी सुरुवातीसच असणारं रामचं खोपट आमची निवार्याची हक्काची जागा. पहाटे साडेतीन-चारच्या आसपास आम्ही तिथं पोहोचत असू. गावात शिरुन कुणाची झोपमोड करण्यापेक्षा रामच्या खोपटात पसरणं आम्हाला सोयीचं होई. राम सकाळी तिथं माल लावायला येई. त्याला रामराम करुन तिथंच चहा घेऊन त्याला आम्ही पोहे करायला सांगत असू. मस्त गरमागरम पोहे खाऊन परत चहा भरुन मग आम्ही किल्ला हिंडायला निघत असू. माचीला आतापर्यंत किमान १५ वेळा तरी नक्कीच जाणं झालंय, पण मनरंजनवर गेलो तो फक्त एकदाच. दरवेळी जाणे झालेय ते श्रीवर्धनलाच.
श्रीवर्धन उंचीने अधिक, मनरंजन थोटका. उधेवाडीच्या बाजूला मनरंजनच्या पोटात पाण्याची काही प्राचीन खोदीव टाकी आहेत. टाक्यांच्या रचनेवरुन ती सातवाहनकालीन असावीत. दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा अतिशय प्राचीन दुर्ग. ह्याच्याच पोटात महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक अशी कोंडाणे लेणी दडलेली आहेत. खुद्द श्रीवर्धनवरही काही अत्यंत प्राचीन लेणी आहेत. साहजिकच हा दुर्ग किमान दोनेक हजार वर्ष जुना असावा. दुर्गांच्या संरक्षणाखाली लेणी खोदल्यात आल्या की लेणींच्या संरक्षणासाठी दुर्गनिर्मिती करण्यात आली हा तसा विवादाचाच मुद्दा आहे.
श्रीवर्धनावरील लेणी मनरंजनाच्या पोटातील लेणी
मनरंजन आणि श्रीवर्धनाच्या बेचक्यात भैरवनाथाचे राऊळ आहे. ज्यांनी कुणी ते पाहिलं असेल त्यांना ती किती मनोरम जागा आहे ह्याची कल्पना असेलच. गच्च झाडीत असलेले हे मंदिर विलक्षण रम्य आहे. रावळात काही शिवकालीन मूर्ती असून दगडी ठाणवई आहे आणि बाहेर दगडी घोडा, वीरगळ, स्तंभ, काही तोफा आणि दिपमाळ आहेत. मंदिराच्या पुढ्यातूनच श्रीवर्धनला जायचा मार्ग आहे. अगदी १५ मिनिटातंच पायवाटेने आपला गडावर प्रवेश होतो. तशी गडावर पाण्याची टाकी असंख्य आहेत पण पिण्याजोगी अशी दोन आहेत, एक वरच्या झेंडाकाठीच्या बुरुजालगत तर दुसरे तिथून उजवीकडच्या दरीच्या बाजूने उतरल्यावर भिंतीलगत लागते. गावकरी पाणी पितात ते मनरंजनच्या टाक्यांचे.
भैरवनाथाचे राउळ, पाठीमागे मनरंजन श्रीवर्धनच्या माथ्यावरुन दिसणारे भैरवनाथाचे राऊळ
श्रीवर्धनचा प्रवेशमार्ग
एकदा असंच माचीवर आलो असता दोघे मित्र निवांत भैरवनाथाच्या रावळात बसले होते तर आम्ही दोघे श्रीवर्धनच्या झेंडाकाठीवर, सर्वोच्च बुरुजावर जाऊन बसलो होतो. वरुन अफाट देखावा दिसतो. समोरील बाजूस लोणावळ्याकडून आली ती संपूर्ण वाट एका टप्प्यातच सामोरी येते. नागफणीचा सुळका, वाघदरी, पाठीमागे उठावलेला कोरीगड अगदी स्पष्ट दिसतात. तर मागील बाजूस मांजरसुंब्याचे आभाळात घुसलेले टोक आणि त्याच्याही पलीकडे ढाकची अभेद्य कातळभिंत अगदी सहजीच नजरेत भरते. तर डावीकडे मनरंजन त्यावरील दारुकोठारासह सुस्पष्ट दिसतो.
मांजरसुंबा आणि ढाक नागफणीचे सुळके
श्रीवर्धनचा चिलखती बुरुज ही आमची अगदी आवडती जागा. दुहेरी तटांचं संरक्षण लाभलेला हा बुरुज अतिशय देखणा आहे. कमानदार भुयारी मार्गाने पायर्या उतरत चिलखतात आपण प्रवेश करतो. तिथल्या तटांवर बसून तिन्ही बाजूंची खोल दरी निरखत बसणे मोठे आनंददायी असे.
चिलखती बुरुज बुरुजातील मार्ग
एकदा माचीवर आलो असता सकाळी सकाळीच भैरवनाथाच्या बाजूनं बिबट्याचं डुरकणं ऐकू आलं होतं. वाघरं तशी ह्या रानाला नवीन नाहीत पण सध्या बिबट्यांनी डोंगरदर्या सोडून उसाचाच आश्रय जास्त प्रमाणावर घेतलाय त्यामुळे सध्या त्यांचे दर्शन इकडे दुर्लभच झालंय. एकदा भैरवनाथाच्या रावळात बसलो असताना समोरच एका माकडाने दोन पायांवर दोन पायांवर उभे राहून मस्तपैकी पोझ दिली होती. मोरांची केकावली इथं नेहमीचीच, भल्या सकाळी इथल्या झाडोर्यांतून मोरांचा मियाउं मियाउं आवाज सतत येत असतो.
एकदा माचीवर कॉलेजच्या दोस्तांसवे आलो होतो. मी सोडून इतर सर्वच जणांचा हा पहिलाच राजमाची दौरा. त्यात कुणाला इतके चालण्याची सवय नाही. सर्वजण थकून गेले, नेहमीप्रमाणेच रामच्या खोपटामध्ये निजलो. सकाळी उठून गावात जाता दोघे जण एका घराच्या समोरील पडवीखालील गवताच्या गंजीखाली मस्तपैकी सारवलेली जमीन पाहून शिरले तर ते नेमके कंबरभर शेणाच्या खड्ड्यात बुडाले. गावकर्यांनी खड्डा करुन त्यात शेणाचा साठा करुन ठेवला होता. त्यांना तिथून बाहेर काढून थेट नळाखाली बसवले. नंतर बराच काळ त्यांच्या अंगाला शेणाचा वास येत असे. एकदा माचीवर आलो असताना गोधनेश्वराला जाताना लागते त्या आमराईत खास आंबे काढायला गेलो होतो. उन्हाळ्याच दिवस होते. गच्च कैर्या लगडल्या होत्या झाडांना, कैर्या तोडतांना काही भान राहिले नाही, भरपूर गोळ्या केल्या, इतकं ओझं घरी नेणं जिकीरीचं होऊन गेलं तेव्हा परत गावातच त्या देऊन टाकल्या. एकदा असंच माचीला गेलो असताना उधेवाडीतून भैरवनाथाच्या चढावर जाताना गवताला लागलेली आग दिसली, भराभर झाडाच्या फांद्या तोडून ती आग फटाफट विझवली होती.
गोधनेश्वराचा तलाव कॉलेजच्याच दोस्तांसवे एकदा आलेलो असताना परतीच्या मार्गावर चालून चालून मित्राच्या मांड्यांमध्ये वळ उठले, बिचार्याला दोन पावले सुद्धा कष्टाने चालता येईना. कशीबशी ती पांगळोलीची घळ चढून आल्यावर अचानक एक बुलडोझर दिसला जो लोणावळ्यालाच निघाला होता. चालकाशी बोलून मित्राला बुलडोझरमध्ये बसवले व आम्ही सर्व चालत लोणावळ्याला पोहोचलो.
मे महिन्याचे अखेरचे दिवस होते, भारत पेट्रोलियमवरुन वळसा मारुन तुंगार्लीला लागलो. झाडंच्या झाडं झगमगू लागली होती. एका विशिष्ट लयीत काजव्यांच्या प्रकाशाची उघडमीट होत होती. ती झगमगती झाडे पार राजमाचीपर्यंत वाटेवर प्रकाश पेरत होती.
२३ जुलै, शनिवार, प्रचंड पावसात एकदा राजमाचीला निघालो होतो. तुंगार्ली पार करुन पांगळोलीची घळ उतरलो. धुव्वाधार पाऊस सुरुच होता. घळीत असंख्य स्वयंप्रकाशी किटक होते. चमचमत्या अळ्या झाडीत, घळीतल्या दगडांवर सरपटताना दिसत होत्या. काजवे नक्कीच नव्हते. तसे दृश्य नंतर कधीच दिसले नाही. घळ उतरल्यावर त्या कठड्यावर जाऊन बसलो. जवळाच एक धबधबा आहे, त्याचा रौद्र कोसळता आवाज कानांवर रोरावत होता. इतक्या पावसात पुढे गडावर जाण्यात काही हशील नाही म्हणून तिथूनच परत निघालो. लोणावळा स्टेशनवर बाकड्यांवर पहुडलो व पहिल्या लोकलने घरी निघालो. पाऊस तेव्हाही कोसळतच होता. हाच पाऊस पुढे तीन दिवस थांबलाच नाही, यातूनच पुढे २६ जुलैचा प्रलय निर्माण झाला. तारीख लक्षात राहण्याचे कारण ते हेच, २६ जुलै २००५.
एकदा असंच पावसाळ्यात त्या धबधब्यावर भिजण्यासाठी घळ उतरुन खाली आलो होतो. तेव्हा इकडे काही गर्दी नसायची, वर्षाविहार उरकून घळ चढायचा कंटाळा आला म्हणून कुणेनामामार्गे जायचे ठरवले तर ते अधिक त्रासदायक ठरले, सुरुवातीच्या दरी डोंगरातील सुखद चालीनंतर ५/६ किमीची डांबरी रस्त्यावरील वैतागवाणी चाल, कुणं सोडल्यावर खंडाळा आणि तिथून परत लोणावळ्यापर्यंत चालत जाणे. राजमाचीवर कित्येकदा गेलोय पण जाणे येणे नेहमीच झाले ते लोणावळ्याकडून, एकदा मात्र कोकण दरवाज्याने उतरायचेच म्हणून खास त्या बाजूने उतरलो. उढेवाढीकडून साधारण अर्ध्या तासाच्या चालीवर कोकणदरवाजाची पायवाट सुरु होते. वाटेत एका हुप्प्याने जोरदार किच्च करुन किंकाळी फोडली. सुरेशकडे जेवून दुपारी दोनच्या आसपास निघालो होतो, केवळ उतरायचे आहे म्हणून पुरेसे पाणी सोबत घेतले नव्हते तर सह्याद्रीने हिसका दाखवला. तो घळघळीत उतार संपता संपेनाच, आम्ही सतत उतरतोय तरी पायथा अजून लांबच दिसतोय. राजमाचीच्या कोकणच्या बाजूने चार पाच थरांचा आहे. उतार, प्रत्येक थरावर काहीशी सपाटी, परत उतार सुरु असे सतत चालू होते. वाटेत कोंडाणे लेणी लागली, लेणीच्या इथून पायथा केवळ अर्ध्या तासावर पण वाट चुकलो. सर्वच जण पाण्याविना डिहायड्रेट झाले होते. ढोरवाटांनी जाता जाता एक इमू फार्म लागला, तिथं थोडंसं पाणी मिळालं. तिथून कोंदिवड्यात गेलो, तिथं मात्र भरपूर पाणी मिळालं. नंतर सहा आसनीने कर्जत आणि तिथून कुठलीतरी एक्स्प्रेस पकडून लोणावळ्यात आलो.
कोंदिवड्यातून दिसणारा मनरंजन २००९ सालच्या सुमारास राजमाचीला उतरणारी नवी वाट घळीच्या बाजूने करण्यात आली. अगदी बैलगाडी जाईल अशी. मात्र गाड्यांसाठी अजूनही ही वाट नाहीच. ह्या वाटेमुळे घळीचा वापर बंद झाला आणि ती वाट पूर्णपणे मोडली. आज ही घळीची वाट झाडोर्याने पूर्णपणे भरुन गेलीय. आता गतवर्षीच ती वाट पाहण्याच्या मिषाने घळीच्या मुखाशी गेलो होतो, पूर्वी अगदी परिचित असणारी वाट आज पूर्णपणे अपरिचित वाटत होती. घळीच्या मुखापाशीच एक रिसोर्ट उभं राह्यलंय. आज इथल्या भागाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून गेलाय. जिथून तुंगार्ली धरणाचा चढ सुरु होतो तिथूनच आता कच्च्या रस्त्याऐवजी पक्का डांबरी रस्ता थेट पांगळोलीपर्यंत आलाय. घळीपासची नवी वाट मात्र अजूनही कच्चीच आहे आणि ती तशीच राहावी.
राजमाचीला आता कुणेनामामार्गे सर्रास गाड्या येतात जातात, गर्दी वाढतेय, झाडी कमी होतेय तरीही राजमाचीचे सौंदर्य अजूनही उणावले नाही. आतापर्यंत असंख्य किल्ले पाहिले पण त्यातले मनात घर करुन राहिले ते दोनच, एक म्हणजे रतनगड ते त्याच्या अनाघ्रात सौंदर्यामुळे, पाताळावेरी खोल दर्यांमुळे,त्याच्यावरील फुलांच्या अंगरख्यामुळे तर दुसरा राजमाची, तो तर अगदी हक्काचा, जीवाभावाचा सखा, त्याच्याविषयी जितकं लिहू तितकं कमीच.
खरं तर गणेश लेखमालेतील श्रीगणेश लेखमाला २०२० - राजमाचीचे दिवस.. ह्या अन्या बुद्धे यांच्या धाग्यावर माझ्या आठवणी प्रतिसाद म्हणून लिहायला घेतल्या होत्या पण लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होऊ नये म्हणून ह्या आठवणी स्वतंत्र लेखाद्वारेच प्रकाशित केल्या.
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडलं आणि लिहू तेवढं थोडंच
अप्रतिम,
राजमाचीला सर्वच ऋतूंत जाणे
In reply to अप्रतिम, by गणेशा
मस्त रे वल्ली
जबरदस्त आठवणी मालक, बाकी
धन्यवाद.
In reply to जबरदस्त आठवणी मालक, बाकी by महासंग्राम
पर्वतराजीची जबरदस्त थरारक
गडाचे संरक्षण करण्यासाठी लेणी
In reply to पर्वतराजीची जबरदस्त थरारक by गवि
लेख आवडला
खुप छान लिहीलंय फोटोही मस्तच!
केवळ अप्रतिम लिहीले आहे.हे
वल्ली सरांचा लेख म्हणजे मेजवानीच
थरारक !
In reply to वल्ली सरांचा लेख म्हणजे मेजवानीच by ज्ञानोबाचे पैजार
भारी अहे तुमचा अनुभव.
In reply to वल्ली सरांचा लेख म्हणजे मेजवानीच by ज्ञानोबाचे पैजार
वाट चुकल्याने थरारकपणा वाढतो.
जबरदस्त !
जबरी , भारी ई....
राजमाची कुठेही अवघड नाहीये
In reply to जबरी , भारी ई.... by चौकटराजा
चौराभाऊ जायची इच्छाच
In reply to जबरी , भारी ई.... by चौकटराजा
भीमाशन्कर ..
In reply to चौराभाऊ जायची इच्छाच by कंजूस
छान
अप्रतिम
याही आठवणी मस्त आहेत .
गोनीदांच्या लेखणीचा प्रभाव
किसना कसे बरे तुला जवळचे
In reply to गोनीदांच्या लेखणीचा प्रभाव by किसन शिंदे
बरं, तुझ्याबरोबर जाऊ. कधी
In reply to किसना कसे बरे तुला जवळचे by गणेशा
झकास लेख!!
मस्त वर्णन आणि फोटो. लेखावर गोनीदांचा प्रभाव आहे असे वाटले मलाही. मी पण नेहमी श्रीवर्धन वरच गेलोय, मनरंजन बघितला तो तिथुनच. एकदा श्रीवर्धन वर त्या गुहेत मुक्काम केला होता. ३ जण होतो. पण कायतरी घोळ झाला आणि जेवणाचे सामान घ्यायला विसरलो. सटर फटर खाउन रात्र काढणार होतो, पण नशिबाने कर्जतची २ जण मुक्कामाला आली आणि त्यांच्यातलीच खिचडी थोडी थोडी खाउन रात्र काढली. सकाळी उधेवाडीत उतरुन भरपेट जेवलो आणि वाटेत कोंडाणे लेणी पाहुन कर्जतला उतरलो.
तुमच्या लेखाने सर्व आठवणी परत जाग्या झाल्या. या पावसाळ्यात जायला पाहीजे.
रच्याकने लोणावळ्याहुन उंबरखिंड पण असाच उतरायचा ट्रेक आहे. कुरवंडे पर्यंत जीप मिळते तिथुन आय एन एस शिवाजीच्या मागुन उतरायला लागायचे. वाटेत नागफणी लागते. ४-५ तासात खोपोलीला उतरतो.
दोन वाटा आहेत
In reply to झकास लेख!! by राजेंद्र मेहेंदळे
नागफणीच्या शेजारुन खाली उतरल्यावर दोन वाटा फुटतात... उजवीकडची वाट उंबरखींड तर डावीकडची वाट फल्याण घाटाने खाली फल्याण गावात उतरते. हे गाव मॄगगडाच्या घेऱ्यात येते..
(मुळची उंबरखींड वाट आता गेल पाईपलाईन मुळे नाहीशी झालीय.. आताची उंबरखींड वाट त्या मुळच्या वाटेला डावीकडुन वळसा मारुन खाली उतरते.
तीच आंबेनळी घाटवाट ना?
In reply to दोन वाटा आहेत by स्वच्छंदी_मनोज
तीच आंबेनळी घाटवाट ना?
नाही
In reply to तीच आंबेनळी घाटवाट ना? by प्रचेतस
आंबेनळी वाट वेगळी आहे.. ती आय एन एस शिवाजी जलाशयाच्या शेजारून खाली उतरते आणी ही नागफणीच्या मागच्या बाजुने पदरातुन खाली उतरते. दोन्ही वाटा पुढे फल्याण गावातच जातात..
धन्स रे. लायन्स पॉईंटच्या…
In reply to नाही by स्वच्छंदी_मनोज
धन्स रे.
लायन्स पॉईंटच्या इथून पण एक घाटवाट आहे. पाच पायऱ्यांची वाट म्हणतात तिला. उतरणीच्या सुरुवातीलाच पाण्याचं एक टाकं असून खोदीव पायऱ्या आहेत. ती मोराडीच्या सुळक्याच्या बाजूने उतरत मृगगडाच्या जवळ उतरते. भज्यांच्या वगैरे गाड्या आहेत सुरुवातीला.
होय
In reply to धन्स रे. लायन्स पॉईंटच्या… by प्रचेतस
होय... पायमोडीची वाट पण म्हणतात त्याला... मृगगड आणी परीसरातले बरेच लोक जे वरती लोणावळ्याला फार्म हाउस, आय एन एस शिवाजी वगैरे ठीकाणी कामाला जातात ते लोक ही वाट अजुनही वापरतात..
मी ही वाट अनेक वर्षांपुर्वी केलेली आहे... ह्या वाटेवर असेलेले एकमेव पाण्याचे टाके सहजासहजी मिळत नाही थोडे शोधावे लागते पण मस्त थंडगार पाण्याचा सोर्स आहे...
कुरवंडे गावात न जाता...
In reply to झकास लेख!! by राजेंद्र मेहेंदळे
खंडाळा स्टेशनहून रेल्वेलाईनमधून आणि नंतर खाजगी बंगल्यांच्या बाजूने एक वाट नागफणीला जाते असं कळल्यावर मी तिथे गेलो होतो पण वाट सापडेना. पण एका माणसाने एका बंगल्याच्या कुंपणातून मला पलीकडे जाण्याची वाट दाखवली आणि मी नागफणीवर पोहोचलो होतो. ( दहा वर्षे झाली असतील. ) आता ती वाटही बंद झाली असेल आणि करोना काळात तर रेल्वेने सगळ्या एक्सप्रेस गाड्यांचा खंडाळा थांबाच बंद करून टाकला. म्हणजे लोणावळ्याला उतरा आणि रिक्षाला दोनशे रुपये देऊन परत खंडाळ्याला (४किमी)या. कर्जत पुणे पॅसेंजर गाडीही बंद केली. पावसाळी पर्यटनाची मजाच काढून घेतली.
एकही नवा प्रतिसाद नसताना....
लेख वर कसा आला?
बुरुजाकडे जाणारी वाट मात्र अजूनही मला माहीत नाही.
मी नेहमी कोंदिवडेकडूनच येतो जातो. पण एकदा एका कुणे गाववाल्याने मला एम८० वर डबलसीट वीस मिनिटांत तुंगार्ली फाट्याला सोडले होते. येताना तो ट्रिपल सीट आला होता. तो, त्याची बायको आणि सासरा. त्याची उधेवाडी ही सासुरवाडी. " कसं आहे माझं ड्राइविंग? " त्याने विचारले तेव्हा धडकी भरली होती.
राजमाची आणि माथेरान माझ्या आवडत्या जागा आहेत. भीमाशंकर मागे पडलं कारण आता कशेळे ते खांडस जाणाऱ्या शेअरिंग रिक्षा (आता ओम्नी) च्या सीटा लवकर भरत नाहीत. पूर्ण गाडीचे तीनशे रुपये मागतात.
चित्रे नवीन डकवली असतील
चित्रे नवीन डकवली असतील म्हणुन लेख वर आला
नाही, चित्रे तीच होती, मात्र…
In reply to चित्रे नवीन डकवली असतील by राजेंद्र मेहेंदळे
नाही, चित्रे तीच होती, मात्र अपग्रेडनंतर परिच्छेद गायब झाले म्हणून ते पाडले फक्त.
होय.
In reply to नाही, चित्रे तीच होती, मात्र… by प्रचेतस
मीसुद्धा भूज लेखात सुधारणा केल्या आणि लेख वर आला.
हायला
In reply to नाही, चित्रे तीच होती, मात्र… by प्रचेतस
हायला परचेतस राव.
मी गडबडीत राजीनाम्याच्या आठवणी वाचले.
काळजात धस्सच झाले. म्हणले दगडाधोंड्यापायी ह्या इसमाने हपिसाच्या तोंडावर राजीनामा फेकला की काय.
पन ओके.
मिपा,पान,बुलेट,पंच,पिंप्री,हिंजवडी आणि तमाम दगडे, मूर्त्यासह तुमची हपिसाची पण कमिटमेंट शाबूत आहे.
छान वाट्ले.