रंगराज्य -२

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
10 Jul 2020 - 11:28 am

डॉक्टरीचं शिक्षण म्हणजे एकदम रटाळ काम असतं. त्यातही जर आयुर्वेद शिकायचा असेल तर ती भुक कॉलेजात कधीच पुर्ण होत नाही. मग पर्याय असतो ते प्रस्थापित वैद्यांच्या OPDs अटेंड करणे, पुण्यातले माझी सात वर्षही अशीच खुर्चीमागे उभी राहुन सरली. अगदी पहिल्या वर्षापासूनच याची सुरुवात झाली होती. राहायचो समितीला म्हणजे एफ सी रोडवर पटवर्धनांच्या पॅलेसमागे अन् कॉलेज सदाशिवात. वाहतुकीचं साधन एकच , सायकल. सकाळी साडे सातला तुळशीबागेत वैद्य अजित जोशींच्या दवाखान्यात तिकडुन दहा पर्यंत परत होस्टेल, कारण मेसला जेवण नाही केलं तरी दंड असायचा. जेवुन लगेच सदाशिवात कॉलेजला . . दुपारी तीन नंतर नारायण पेठेत वैद्य भय्याराव गौतमांकडे. .

भय्याराव म्हणजे शेषशायी भगवानच जणू. वय ८७ अन् वजन १२० किलो. खाण्याचे जाम शौकिन. . कुमठेकर रोड च्या कॉर्नरला त्यांच कोणतं फेवरिट फरसाण मिळायचं. रोज पाव किलोचं पाकीट घेवुनच जायचो मी. . एकेरी द्रव्य वापरायला भय्यारावांनी शिकवलं. सलग २७ दिवसाची लसुणातली पारद शुद्धी ते पारद बद्ध करुन बुभुक्षित करण्याचे विधी प्रत्यक्ष अनुभवलेत. पोटभर आईसक्रिम खायची सवय पण यांनीच लावली. अग्निहोत्र झालं की तिथुन निघुन एरंडवण्यात मिहिर हजरनविसांकडे. . .

दुसर्‍या वर्षात यात बदल झाला तो अचानक अजित जोशींचे वडील म्हणजे ख्यातनाम वैद्य चं ग जोशी वारल्यानं त्यांनी सकाळची तुळशीबागची ओपीडी चुलतभावाकडे सोपवली अन् आमची बोळवण कुमठेकर रोडवरच वैद्य प्रशांत सुरुंकडे केली. त्या अगोदर सुरु सर एकदा आळंदीत भेटले होते. तोच समवाय संबंध धरुन सुरु सरांकडे जाताना एक मोगर्‍याचा गजरा सोबत घेतला होता. .

सर जाम खुश. . . . अजुनही सरांकडे जाण्याचा योग आला तर सोबत गजरा असतोच. पांचभौतिक चिकित्सेतलं हुकुमी नाव असलेले सुरु सर आळंदी संस्थानचे प्रमुख आहेत. . . त्यानंतर मग सर्व नद्या जशा सागराला मिळतात तसे पुण्यातल्या प्रत्येक आयुर्वेद विद्यार्थ्याचा महासागर म्हणजे समीर जमदग्नी , दादा महाराज सांगवडेकर, कोल्हापूर अन् आळंदी कनेक्शनने या मोगर्‍याबाबत प्रचंड हळवेपण आणुन ठेवलय.

मालती, मल्लिका, चमेली, जूही, मोतिया नावे-रूपे किंचित भिन्न, पण सुगंधाची भाषा मात्र तीच! हिरव्या गर्द साडितील शुभ्र कांतिमय कन्या जणु, पण उमलताना येणार आपल्या सख्याचा गोतावळा घेऊनच.

शुभ्र चांदण्यांची गंधित, कोमल रास...मोगर्‍याच्या त्या सुगंधाने आणि नेत्रसुखद दर्शनानेच निम्मा शीण निघून जातो. हात त्या कोमल, मखमली पाकळ्यांच्या अल्लड स्पर्शासाठी आसुसतात. पण त्याच वेळी त्यांचे ते नाजूक पंख आपल्या हस्तस्पर्शाने चुरडले तर जाणार नाहीत हाही विचार अस्फुटसा उमटत असतो. मग त्या मौक्तिक राशीतील काही सुगंधी कण आपल्या ओंजळीत घरंगळतात आणि त्यांच्या धुंदावणार्‍या सुवासात सारे तन-मन चिंब भिजते. वेली मोगरा, डबल मोगरा, मदनबाण, बटणमोगरा.... प्रत्येकाची रूपे, गंधछटा जरी भिन्न तरी मनाला आल्हाद देण्याची सुगंधी वृत्ती तीच! आपल्या केवळ अस्तित्त्वाने शीतलतेचा अनुभव देणारे .

गेल्या वर्षी गच्चीत लावायला ही पन्नास रोपं आणली. माझ्याकडे दहा अन् सागर पाटीलकडे चाळीस रुजलीयेत. जानेवारी महिन्यात कटिंग करुन उरलेल्या काड्या टोचून दिलेल्या. आता तर दोन तीन इंचाच्या काडीलाही फुल धरलंय. याशिवाय एक CSR प्रकल्पांतर्गत १५० शेतकर्‍यांसोबत मोगर्‍याच्या ४५००० रोपांची व्यावसायिक लागवडीत प्रत्यक्ष सहभाग आहे. अगदी सहा महिन्याच्या आत या आदिवासी शेतकर्‍यांना केवळ मोगरा विक्रीतून दरमहा सरासरी सात आठ हजार रुपये मिळू लागलेत.

पुढचे शब्द माझे नाहीत पण भावना तंतोतंत तश्याच आहेत,
" ओंजळभर का होईना मोगऱ्याची फुलं माझ्या आजूबाजूला पसरवून ठेवा. हा प्रवास कसा चाललाय माहीत नाही. कित्ती सरलं आयुष्य कित्ती उरलं याची काहीच कल्पना नाही. आपलं आयुष्य इतराना किती सुगंध देउन गेलं याची गणना करणं सुद्धा जमतं नाही. पण तो प्रवास तरी सुगंधित आणि मनमोकळा व्हावा एवढीच ईच्छा." ©

व्यक्तिचित्रणप्रकटन

प्रतिक्रिया

मोगरा आणि इतर फुलांचे फोटो आणि नावं जमेल का?

अभ्या..'s picture

10 Jul 2020 - 12:46 pm | अभ्या..

सर्वच बाबतीत समृध्द आहात वैद्यबुवा. ती समृध्दी उतरलीय लेखनात आणि विचारात.
लिहित राहा. आनंद देत राहा.

शा वि कु's picture

10 Jul 2020 - 2:00 pm | शा वि कु

छान लिहिलंय!

विजुभाऊ's picture

10 Jul 2020 - 3:24 pm | विजुभाऊ

वैद्यबुवा मस्त आनंदात आहात बरे वाटते वाचून. कोणीतरी छान स्वप्नातलं जगतोय हे पाहून

शाम भागवत's picture

10 Jul 2020 - 5:36 pm | शाम भागवत

आहाहा!
किती सकारात्मक दृष्टिने भरलेले जीवन आहे. सभोवताली कलियुग पसरलेले असूनही त्यात नंदनवन पाहात आहात, म्हणजे अगदीच असामान्य कलाकारी.
_/\_

सिरुसेरि's picture

11 Jul 2020 - 3:32 pm | सिरुसेरि

सुरेख आठवणी . +१ . फरसाणवाला पॅराग्राफ वाचुन गनबोटे फरसाण यांच्या जाहिरातीतला गट्टमा आठवला .

सुखी's picture

14 Jul 2020 - 11:42 pm | सुखी

सुरेख...

मोगऱ्याच्या रोपांचे फोटो नक्की टाका, खूपच सकारात्मक आनंदी लेख.

तुषार काळभोर's picture

18 Jul 2020 - 12:07 pm | तुषार काळभोर

मोगर्‍याचा सुगंध अतिशय मोहक असतो. दीर्घकाळ स्मृतीत रेंगाळणारा...

प्रमोद देर्देकर's picture

23 Jul 2020 - 2:14 pm | प्रमोद देर्देकर

तुमचे दोन्ही लेख आत्ताच वाचले. लेखन मस्त आहे.

वैद्य बुवा तुमच्या मुळे आम्हाला सगळ्यांना त्या त्या झाडांची निदान नावे प्रकार तरी समजले पण नेमके हेच तेच झाड हे कळाण्यासाठी तरी फोटो हवेत.

पु.ले,प्र.