रंगराज्य

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
8 Jul 2020 - 8:11 pm

आडनावाचा प्रभाव असेल कदाचित, पण रंगांच obsession लहानपणापासनंच. वडील चित्रकला शिक्षक असल्यानं घरात कायमचीच रंगपंचमी असायची. पुण्याजवळ थेऊरला राहायचो तेव्हा. . त्याकाळातला मास्तरांचा पगार वैग्रेचं गणित जुळवायला बोर्डस् रंगविणे, घरांचे रंगकाम देखिल करायचे. आईचाही सहभाग असायचा यात. . त्याकाळी लाकडाची चौकट बनवुन त्यावर पत्रा ठोकुन बोर्ड बनवले जायचे. पुण्यात पेठेत कुठे साहीत्य खरेदी करुन पुलगेटपर्यंत पायी यायचं अन् तिथुन थेऊरसाठी गाडी पकडायची. कारण सिटीबसमध्ये साहीत्य घेवुन जावु देत नसतं. कापडी बोर्ड रंगविण्याअगोदर "सरस" नावाचा प्राणिज डिंक उकळुन त्यात कापड भिजवायचे. दोर्‍याला खडू किंवा नीळ लावुन टिचकीने आखलेल्या रेषा अजुनही स्मृतीत आहेत.

१९८२ मध्ये संगमनेरला येवुन स्थायिक झाल्यानंतर सुट्यांच्या काळात मुंबईला जे जे तुन "आर्ट मास्टर्स" पुर्ण केलं वडिलांनी. फोटोग्राफी बहुदा आधीपासुनच करत होते. संगमनेरला १९८७ मध्ये आईसाठी फोटो स्टुडिओ सुरु केला. त्याकाळात व्यावसायिक फोटोग्राफी करणारी परिसरातली पहिलीच महिला असेल आई. . कलर फोटोग्राफी सुरु झाली होती तरी खरी कला होती ती ब्लॅक व्हाईट फोटोग्राफीचंच. . लाल दिव्याच्या अंधार्‍या खोलीत हायपो, डेवलपर वापरुन पहिले निगेटीव्ह धुवायच्या, लाल ट्रान्सपरंट कलर ने निगेटिव्हज वर टच अप करायचे, मग भल्या थोरल्या एन्लार्जरच्या सहाय्यानं पॉजिटिव म्हणजे फोटो डेवलप करायला शिकलो होतो. .

मोठेपणी काय करायचं असं कोणी विचारल्यावर रंगरंगोटीबाबत सबकुछ अंडर वन रुफ मिळणारं दुकान टाकेन असं सांगायचो. अगदी सिबल हेअर ब्रश पासुन ते सरफेस कोटिंग टेक्नोलॉजी मध्ये वापरल्या जाणार्‍या रेझिन डाय पर्यंत. चित्रकलेचा वारसा मात्र बहिणीकडे गेला. तिनं अजुनही हातातली कला जोपासलीय. तसा पदवी पदरी पाडुन घेण्याकारणे पुण्यात गेल्यावर "गुलाबी" रंगाचा अमल चढला होता. तत्कालीन प्रथेप्रमाणे फुलांची देवाणघेवाण अनिवार्य असल्यानं त्यातही कलर ऑप्शन जास्त असलेल्या जरबेरावर जीव जडला. जास्त ऑप्शन्स तेही कमी खर्चात मिळवण्यासाठी सायकलवरच्या मार्केड यार्डच्या वार्‍यांनीच खरं तर हिरवाईचा कोंब रुजवला.

सिंगल कलर प्लेन हाफ स्लिव्ज शर्ट्सचं वॉर्डरोब कलेक्शन दहा कलर अन् बावीस शेडस् पर्यंत पोहोचलं. वारसाहक्कानं आलेल पालित्यानं पंचवीशीतच केसांचा पांढरा कॅनवास मिळाला केसांच्या रंगाचे मोरपंखी प्रयोग करायला. डाय अन् हेअर कलरची एकही शेड उरली नसेल जी शिरी धरली नाही अशी.

मध्यंतरीचे धावपळीचे दहा पंधरा वर्ष सरल्यानंतर पुन्हा एकदा ही रंगांची उधळण खुणवायला लागलीय. निसर्गानं मुक्तहस्ते उधळलेले विविधरंगी वनस्पती तसं पाहीलं तर व्यावसायिक अभ्यासल्याही पण बागकामाच्या छंदातुन जस जस एक एक रंगाशी परिचय घडु लागला तशी ही तृष्णा अजुनच वाढत चाललीय. वेरिगेटेड लिवज् म्हणजे रंगित पानांचे कोलिअस, कॅलेडिअम, ऑक्झेलिस, फिटोनिया, क्रिप्टॅन्थस, पोल्का डॉटस् अन् र्‍होईओ बागडतायेत गच्चीवर. .

व्यावसायिक संघटन, मैतर अन् सग्यांच्या गोतावळ्यासोबतच हौसेनं सुरु असलेलं बागकाम, त्याचाच विस्तारित भाग म्हणुन आयुर्वेदोक्त औषधी वनस्पतींची उपलब्धता व संवर्धन बाबत सुरु असलेला अभ्यास, पंधरा वर्षापासुन आदिवासी क्षेत्रातला वावराने रानभाज्या अन् ethno medicine चे केलेले दस्तऐवजीकरण, कचरा व्यवस्थापन संबंधाने सुरु असलेले जनजागरण उपक्रम, वयसापेक्ष लैंगिकता शिक्षणाच्या माध्यमातनं जोडला गेलेला शैक्षणिक संबंध असे जे विविध रंग उधळतोय हे पाहता कोणा आप्तानं गमतीत चिकटवलेलं संबोधन "रंगराव" बिरुद म्हणुन मिरवताना जाम मजा येतेय.
फीकी चुनरी देह की, फीका हर बंधेज,
जो रंगता है रूह को, वो असली रंगरेज....©

व्यक्तिचित्रणप्रकटन

प्रतिक्रिया

शेखरमोघे's picture

8 Jul 2020 - 8:46 pm | शेखरमोघे

वा, वा, असली रंगरेज, छानच रंगत आणताय!!

विजुभाऊ's picture

9 Jul 2020 - 8:10 am | विजुभाऊ

व्वा. तुमचं लिखान छानच आहे.
अजून लिहा तुमच्या रंगकामाचे किस्से नमुने येवू द्या

प्राची अश्विनी's picture

9 Jul 2020 - 7:24 pm | प्राची अश्विनी

+1

आवडली माहिती. थोडी चित्र इकडे लावा.

पलाश's picture

9 Jul 2020 - 9:56 am | पलाश

लेख आवडला.
शेवटही खास आहे. बांधणी पद्धतीने रंगलेला कपडा म्हणजे नानाविध रंगांची उधळण समोर येते. तो कपडाही फिका आहे ही कल्पना फार छान आहे.

जालिम लोशन's picture

9 Jul 2020 - 1:39 pm | जालिम लोशन

+1

सिरुसेरि's picture

9 Jul 2020 - 5:13 pm | सिरुसेरि

+१. छान . रंगात रंगलेला लेख .

अनिंद्य's picture

9 Jul 2020 - 8:22 pm | अनिंद्य

जो रंगता है रूह को, वो असली रंगरेज.....
वाह !
लेख आवडला.
हे 'क्रमश:' असावे असे मनापासून वाटले.

सौंदाळा's picture

9 Jul 2020 - 8:38 pm | सौंदाळा

हेच म्हणतो,
अजून येऊ दे

सोत्रि's picture

9 Jul 2020 - 8:57 pm | सोत्रि

लेखन आवडले.

- (रंगीत) सोकाजी

चौकस२१२'s picture

10 Jul 2020 - 6:41 am | चौकस२१२

लेख आवडला.. सुरुवातीचा रंगकला/ चित्रकला / छायाचित्र या संधर्भातील कळलं , आणि " निसर्गानं मुक्तहस्ते उधळलेले विविधरंगी.." हे हि भावलं पण नंतर मात्र गाडी थोड्याश्या समाजकामाकडे वाळलेली असावी असे वाटले ( वयसापेक्ष लैंगिकता शिक्षणाच्या ..." ) पण त्याचा मूळ रंगकाम वैगरेंशी जोडलेले संबंध काही कळलं नाही.. हा कदाचित " जीवनातील विविध रंग " या अर्थाने म्हनायचे असेल आपल्याला !

दुर्गविहारी's picture

17 Jul 2020 - 11:08 pm | दुर्गविहारी

मस्तच ! असेच लिहीत रहा डॉक.

तुषार काळभोर's picture

18 Jul 2020 - 10:36 am | तुषार काळभोर

अवांतर - सरस प्राणिज असतो हे माहिती नव्हतं.
कसा बनवतात?
लहानपणी (नव्वदीच्या दशकात) बॅटचा हँडल मोडल्यावर सरस गरम पाण्यात टाकून पातळ करायचो अन त्याने हँडल चिकटवायचो. वरती त्याला पांढरा सुती दोरा (गोधडी शिवायला वापरतात तो) गुंडाळायचा अन बॅट चारपाच दिवस सुकायला ठेवून द्यायची.