अथ श्री पुरुषलीळा।
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रत्येक माणूस वेगळा असतो तसा प्रत्येक पुरुषही वेगळा असतो. पण तरीही सर्व पुरुषांच्यात मिळून काही गोष्टी सारख्या,समान असतात. मग तो नवरा, मुलगा, भाऊ, काका, मामा कुणीही असो. याला काही सन्माननीय अपवाद असतातही. पण अपवादाने नियमच सिद्ध होतो.
ट्रेन किंवा बस सुटायची वेळ झाली तरी वेळेवर न येणे हा कॉमन पॉईंट. ट्रेनची शिटी होते. सिग्नल मिळतो. ती हलते. चालू लागते तरीही खाली उतरलेल्या पुरुषाचा डब्यामधे पत्ता नसतो. बायको कावरीबावरी होते. मुलं रडू लागतात, तेव्हा कुठे हे पुरुषमहाशय कंपार्टमेंटमधे येतात. एवढं उशीरा येऊन मनस्ताप दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं सोडाच, उलट वरुन बोलतात,"एवढं काय घाबरायचं? मी येत होतोच ना?" बसमधेही असंच, बस सुटायची वेळ येते. कंडक्टर 'सगळे आले का'विचारतो. बस सुरु होते. मग आपण बसल्या जागेवरुन तोल सावरत उभं राहायचं आणि ओरडायचं,"अहो थांबा,आमची एक सीट यायचीय". बसमधले सगळे लोक आपल्याकडे रागानं बघतात. कपाळाला आठ्या घालतात.उशीर होतोय असं पुटपुटतात. मोबाईलही उचलत नाही. आपल्याला अगदी गिल्टी वाटतं. मग ती 'सीट' एकदाची अवतरते. 'अग, चहाला उतरलो होतो आणि 'जाऊनही आलो.' हे उशीराचं स्पष्टीकरण. सारखा चहा पिणे आणि जाऊन येणे ह्या आणखी दोन वाईट सवयी. इतर काही पिण्यापेक्षा चहा पिणं ठीक म्हणते मी. पण 'जाऊन येणे'हा काय प्रकार आहे? सारखी कशी शू ला लागते? घरातून निघण्यापूर्वी जायचं ते एकदम घरी परत आल्यावर जायचं(ऑफीस असेल तर गोष्ट वेगळी.) असं बायकांसारखं हे का वागू शकत नाहीत? स्वयंपाकघरात लुडबूड करणे ही आणखी एक वाईट सवय. स्वयंपाकातलं काही कळत नसतानाही. त्यातून त्याला स्वयंपाकातलं काही कळत असेल तर उच्छाद वाढतो.' तेल जरा जास्त टाक. कांदा बारीक चिर. टोमॅटो मी चिरुन देऊ का? कोथिंबीर बारीक चीर, दाताखाली येते जाड चिरली तर! कणीक सैल भिजव. कणकेत थोडा मैदा आणि डाळीचं पीठ टाक' सारख्या सूचना. काव आणतात. यापायी अनेक मदतनीस बायका काम सोडून पळून जातात.
माझ्या मैत्रीणीकडे एकदा अचानक पाहुणे जेवायला आले. तेही माहेरचे. सासरचे असते तर चिडता तरी आलं असतं. नवं लग्न झालेलं. घरात भाजी नव्हती. तिनं दिराला भाजी आणायला पिटाळलं. तर तो बाजारातून उशीरा तर आलाच आणि एक किलो गवार घेऊन आला. आता ही ऐनवेळी गवार कुठे निवडणार? शेवटी शेजारून बटाटे उसने आणले. शेजारणीचे कुजके टोमणे ऐकावे लागले.
"बायकांत बहु बडबडला" ही अवस्था तर खूप जणांची असते. ज्या गोष्टीत बायकांना स्वारस्य नाही अशा विषयांवर सतत बोलत राहतात. माझ्या ऑफीसातला एकजण तर लंचच्यावेळी डबा खाताना स्वतःचं विविध विषयांवरचं ज्ञान पाजळायचा. सिनेमा बघत असताना सतत बडबडणे, घरात बायका सिरीयल्स बघत असताना त्या मालिकांना नावे ठेवणे,त्यातल्या चुका दाखवणे. आपण पाहात असलेले इंग्रजी सिनेमे आणि मालिका कशा दर्जेदार असतात हे सांगणे. नातेवाईक आल्यास वैतागणे,(विशेषतः,नोकरी नसलेले,नापास झालेले भाऊ)मित्र आल्यास आनंदित होणे. (आता कोरोनाच्या काळात कोण कुणाकडं जातंय म्हणा! मी कोरोनापूर्व काळाबद्दल BC बद्दल बोलतेय.)
यादी घरी विसरुन सामान आणायला जाणे. घेतलेले सामान दुकानात विसरणे. दाढी करण्याचा कंटाळा करणे. मधेच दाढी मिशा वाढवणे. मधेच लहर फिरली की चेहऱ्याची बोडन्ती करुन तो तुळतुळीत करणे. केस कधी झिरो मशीन मारून सफाचाट करणे किंवा नाकावर केस आले तरी न कापणे.
बूट,चप्पल काढून कसेही ,कुठेही टाकणे. शू रँकमधे न ठेवणे. सर्वत्र 'चला,आटपा,पुरे'अशी घाई करणे. साध्या साध्या गोष्टींवरून रिक्षावाला, टॅक्सीवाला, भाजीवाला, वेटर (मॅनेजरला बोलवा इ.इ.) यांच्याशी हुज्जत घालणे. खोली अस्ताव्यस्त ठेवणे. आवरली तर चिडणे. वस्तू जागेवर न ठेवणे. न सापडल्यास आकांडतांडव करणे. कपडे वेळेवर धुवायला न टाकणे. ऐनवेळी शर्टाला इस्त्री करुन मागणे. एकच पँट खूप दिवस वापरणे. मोजे धुवायला न टाकणे. हातरुमाल विसरणे. पँटच्या खिशात वस्तू विसरणे. मोबाईल वेळच्यावेळी चार्ज तसेच रिचार्ज न करणे. रविवारी सकाळी दहादहापर्यंत झोपणे. बिलं वेळच्यावेळी न भरणे.
अशी खूप मोठी यादी होईल. बायकामंडळींनो! तुमच्याकडेही अशी यादी तयार असेलच. मग करा सबमिट.
प्रतिक्रिया
एकदम कडक, मस्त, ऍक्युरेट
मज्जा आली वाचताना. :-))
+१
बापरे! केवढी भली मोठी लिस्ट
मस्त लेख !
खुसखुशीत !
मी नाही बरका
जरा जाऊन येतो इश्शू,
भन्नाट! भारी लिहलंय :) कपडे
व्वा, सॉलिड भारी लेख,
स्फोटक लेख!!
एकदम भारी!!! +१००
मजेशीर निरिक्षण .
खुसखुशीत लेख !
फार म्हणजे फारच स्फोटक विषय.
कैच्याकै. हे समस्त
अहाहा ! लंबर एक.....
महिलांच्याही लिळांच्या प्रतिक्षेत.
बहुसंख्य मुद्दे बहुसंख्य पुरुषांना लागू होतील
mrcoolguynice-"एकदम कडक,मस्त
भलताच खुसखुशीत लेख
मस्त
अनुभव नाही.. पण जाम मजा आली