एका खटल्याची गोष्ट - २
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सर्व तयारी झाली.
होता करता प्रत्यक्ष कोर्टात जाउन, जज समोर माझी बाजू मांडण्याचा दिवस आला.
-------------------------------------------------------------------------------------------
कोर्टात हजर राहण्यासाठी जेव्हा कामावरुन सुटी घेण्याची वेळ आली, तेव्हा मनात परत एकदा विचार आला की आपण उगाच याच्या मागे लागलो आहोत का ?
एवढे करुन काही तरी फायदा होणार आहे का? पण बहुदा कुणीतरी आपल्यावर चुकीचा आरोप केला आहे ही कल्पना माणसाला सहन होत नसावी.
मी पुन्हा एकवार नीट आठवून पाहिले की आपण अनवधानाने तर सिग्नल तोडला नसेल ना ? पण माझ्या आठवणीनुसार अन तर्कानुसार सुद्धा मला हेच आठवले की मी सिग्नल वर थांबलो होतो अन मग त्या मुलाने संकेत दिल्यानंतर निघालो. त्यामुळे अनवधानाने पण अशी चूक झालेली नसावी.
अशी मनाची खात्री झाल्यावर मग मी शांत डोक्याने कोर्टाकडे जायला निघालो.
तिथे पोहोचलो तर तिथे एक मोठी जत्रा असल्यासारखी गर्दी होती.
मिळालेली नोटिस घेउन मी तिथल्या प्रवेशद्वारापाशी असणार्या छोट्या रिसेप्शनपाशी गेलो. त्या व्यक्तीने मग मला एका मोठ्या कोर्टरुम मधे जायला सांगीतले.
तिथे बहुदा अशा किरकोळ केसेस असणारीच सर्व मंडळी असावीत. पुढच्या बाजूला ऊंचावर जज आणी ऊजव्या बाजूला त्यांचे कारकून बसण्याची जागा होती.
समोरच्या बाजूला खुप सार्या बाकड्यांवर माझ्यासारखे लोक बसले होते. थोडे मागे वळून पाहिल्यावर मला बरेच पोलिसही तिथे असल्याचे दिसले.
सर्वसाधारणपणे जर तुमच्या केस-वरचा पोलिस तिथे त्याची बाजू मांडायला हजर नसेल तर आपसूक निकाल तुमच्या बाजूने लागतो हे मी वाचले होते.
मी मला तिकिट देणार्या पोलिसाला शोधत होतो पण मला ती काहि सापडली नाहि. माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली !
थोड्या वेळानंतर जज साहेब आले अन एकदम सर्वांना उभे राहण्याची जोरदार घोषणा झाली.
मग हळुहळु एक एक केस वाचली जाउ लागली अन ज्याच्यावर आरोप आहे त्याला जज विचारणा करु लागले की तुम्हाला गुन्हा मान्य आहे का ( Guilty OR no Guilty ). यात अनेक रोचक केसेस होत्या.
एका माणसाला - हा बहुदा बेघर व्यक्ती असावा अन डाउनटाउन मधे फुट्पाथ वर रहात असावा - असा आरोप होता की तो त्याचा सिग्नल नसताना रस्त्यावर पायी चालत होता ( Jaywalking ). त्याने पुष्कळ कट्कट केली की त्यावेळी तिथे कुठलीही रहदारी नव्हती आणी पोलिस उगाच त्याला त्रास द्यायला म्हणून हे करत आहेत. शेवटी जजने त्याला जो काही दंड केला होता, त्यावर त्याने पैसे नाहित असे सांगून हात वर केले. मग जजने त्याला समाज-सेवा (Community Service) करण्याचा हुकूम दिला.
माझ्या मनात आले .. या व्यक्तीसाठी, अशा समाज-सेवेने काहितरी फरक पडेल काय ? किंबहुना अशाच लोकांची काहि-तरी सोय करण्याच्या समाज-सेवेची गरज आहे अन अशा फुटकळ गोष्टींसाठी त्यांनाच जबाबदार धरण्यात अन असली काहितरी सजा देण्यात काहीच अर्थ नाही. उगाच कोर्टाचा अन सर्वांचा वेळ वाया !
अजून एक मजेदार केस होती. एका माणसाला सीट-बेल्ट न लावल्याबद्दल तिकिट मिळाले होते. त्याचे म्हणणे असे होते कि तो फक्त त्याच्या घरासमोर लावलेली गाडी गराज-मधे लावत होता... त्यावर जज ने विचारले की तुझ्या घरासमोरचा रस्ता खाजगी आहे की सिटीचा ( म्हणजे सरकारी ) आणी त्यावर बाकी काही वाहतूक चालते का ? त्याने हो म्हटल्यावर जज ने त्याचा दंड कायम ठेवला. बिचार्याला केवळ दोन मिनीटे सीट बेल्ट न लावल्याबद्दल शे-दोनशे डॉलरचा भुर्दंड पडला !
काहि लोकांनी दंड भरण्यास असमर्थता दाखवल्यावर जजने त्यांना महिन्यावारी हप्त्याने दंड भरण्यासाठी सवलत दिली. काहि लोकांनी त्यालाही नाही म्हंटल्यावर त्यांनाही समाज-सेवेचा दंड केला.
असे होता-करता, माझा नंबर आला. मी गुन्हा मान्य नाहि म्ह्टंल्यावर जज ने मला विचारले की तुला केस ट्रायल करायची आहे का? मी हो म्हटल्यावर त्याने मला तिकिट देणार्या पोलिसाला बोलविण्यास सांगीतले. माझ्या दुर्दैवाने ती पोलिस अधिकारी तोपर्यंत तेथे आली होती. तिला विचारण्यात आले की तुला ही केस ट्रायल मंजूर आहे का ? तिने जर नाही म्हंटले असते, तरी माझ्या बाजूने निकाल लागून तिथेच किस्सा संपला असता. पण तिने हो सांगीतले. त्यावर जजने मला सांगीतले की ट्रायल नंतर जो काहि निकाल लागेल त्यात दंडाची रक्कम / स्वरुप बदलू शकते ! याबद्दल मी आधी वाचले होते की जर या सुनावणी दरम्यान कळलेल्या माहितीवरुन जर जज ला वाटले की आधी सुनावलेला दंड कमी किंवा जास्ती आहे तर तो/ती ते बदलू शकतात. मनात म्हंटले, आता जे होईल ते पाहू !
मग जज ने काहितरी नंबर सांगून आमची रवानगी एका दुसर्या कक्षात केली.
तिथे जाउन परत बराच वेळ वाट बघत बसावे लागले. तो कक्ष म्हणजे एक साधीशीच खोली होती. पुढे एक टेबल अन खुर्ची होती ज्यावर जज बसणार अन बाकी समोर बर्याच खुर्च्या होत्या पण हे सर्व एकाच लेवल वर होते. तेथे गेल्यावर माझे दडपण थोडे कमी झाले. बहुदा एकदम ऊंचावर बसलेल्या जजसमोर बोलण्यापेक्षा माझ्या मनाला असे समोरा-समोर बोलणे थोडे सोपे असे वाटले असावे. मागच्या बाजूला बरेच पोलिस अन बहुदा खाजगी वकिल असावेत. इथे अशी रहदारीच्या गुन्ह्याची केस लढणारे बरेच खाजगी वकील असतात.
थोड्या वेळाने तिथल्या स्री जज साहेबा आल्या. इथे माझाच पहिला नंबर होता.
मग त्यांनी मला आणी पोलिस अधिकार्याला पुढे बोलवले व पोलिस अधिकार्याला नक्की काय झाले होते व कशाबद्दल तिकिट दिले आहे ते सांगायला सांगीतले.
तिने स्पष्टपणे मला स्टॉप साईनचा शाळेजवळील नियम तोडताना बघितल्याचे सांगीतले. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी तिनेहि गूगलचे नकाशे आणून त्यावर माझी , तिची अन रहदारी नियंत्रक मुलांची अशा सर्व जागा हे व्यवस्थीतपणे आखून आणल्या होत्या. जज ने मला विचारले की हा नकाशा आणी या सर्वांच्या जागा योग्य आहेत का ?
मी हो सांगीतल्यावर त्यांनी विचारले की तुला काय म्हणायचे आहे. मी वर लिहिल्याप्रमाणे सर्व सांगीतले व हेही सांगीतले, की यात मुलांच्या गड्बडीमुळे असे झाले असावे. त्यावर जज ने पोलिस अधिकार्याला विचारले की मुलांनी काहि गड्बड केली असे तु काही पाहिले का ? त्यावर तिने नाहि असे सांगीतले व ती मुले योग्य प्रकारे सर्व रहदारी नियंत्रीत करत होती असे प्रशस्तीपत्र देउन टाकले !
मी पुन्हा एकदा तिथे असणारी गर्दी, मुलांची त्या मोठ्या दिशा-दर्शकांना सांभाळाताना होणारी कसरत, त्यांचे शिट्टीचे संकेत अन त्यामुळे बहुदा घोळ झाला असण्याच्या शक्यतेवर जोर दिला. मी वेग-वेगळ्या वेळी काढलेले फोटो दाखवून, त्यावेळी नक्की काय झाले असावे हे फक्त एका बाजूने पाहून समजणे शक्य नाही, हे जज ला सांगायचा प्रयत्न केला. पण जजने माझ्या बोलण्यावर काहिही विश्वास ठेवण्यास नकार दिला. मी आधी वाचलेल्या इतर लोकांच्या अनुभवातही हेच लिहिले होते, हे मला आठवले.
शेवटी मी तांत्रीक बाबींचा आधार घेण्याचे ठरवले आणी जज ला एक नियम-पुस्तीका काढून दाखवली.
त्यात एक नियम असा होता की अशा प्रकारचे मुलांचे पथक हे पाचवी अन सहावी च्या मुलांचे बनवावे.
पण योगायोगाने माझ्या मुलाच्या शाळेत फक्त पाचवी पर्यंतच वर्ग होते ! त्यामुळे अशा पथकामधे सहावीची मुले असण्याचा प्रश्नच नव्हता.
मी हि तफावत जज च्या नजरेस आणून दिली व सांगीतले की हे वाहतूक नियंत्रण नियमानुसार होत नाहि तेव्हा त्यांच्या नियंत्रणाअंतर्गत असलेला कुठला नियम तोडणे, हे शिक्षेसाठी पात्र ठरू नये.
यावर पोलिस अधिकारी मोठ्या आवाजात तावा-तावाने सांगू लागली की मी पाहिले, ती मुले अत्यंत योग्य प्रकारे वाहतूक नियंत्रीत करीत होती.
जजने तिला विचारले की तू त्या शाळेच्या मुलांच्या पथकाशी संलग्न आहेस का किंवा तू त्यांना यापूर्वी प्रशिक्षण दिले आहेस का ?
यावर तिने सांगीतले की नाहि , मी फक्त तिथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी गेले होते.
यावर जज ने परत माझ्या कडून नियमांची प्रत मागवली आणी हि कुठुन मिळवलीस असे विचारले. मी दुसर्या एका कागदावर सर्व नियमपुस्तीका ज्या सरकारी वेबसाईट वरुन घेतल्या होत्या हे लिहून ठेवले होते. मी तो कागद जजला दिला.
बहुदा एवढ्यावर जजचे समाधान झाले असावे. त्यांनी आपला निकाल सांगीतला कि ज्यावेळी तुला हे तिकिट मिळाले त्या वेळी वाहतूक नियंत्रण नियमानुसार होते की नाहि हे नक्की न कळल्यामुळे तुला या दंडातून माफी मिळत आहे !!
अन तिने त्या तिकिटाच्या नोटिसवर एक शिक्का मारून मला कोर्टाच्या ऑफिस मधे देण्यास सांगीतले. माझ्या मनावरील ताण एकदम हलका झाला.
मी बाहेर आल्यावर एका मिनिटात ती पोलिस अधिकारीही बाहेर आली .. मी तिला अभिवादन करून धन्यवाद म्हटल्यावर, तिने अस्सा काहि एक जळजळीत कटाक्ष माझ्याक्डे टाकला अन काहिहि न बोलता तडक दाण-दाण पावले टाकीत निघून गेली.
मी पलिकडे असलेल्या ऑफीस मधे जाउन शिक्का मारलेली नोटिस दिली.
तेव्हा तिथल्या कारकुनाने त्या नोटिस कडे पाहिले अन माझ्या कडे पाहून म्हणाला .. " You are a fighter, Mr. ! "
मनात विचार आला .. केवळ माझ्या मनात मी काहिहि चूक केलेली नाही, हे पक्के असल्याने मला हि छोटिशीच का होईना, पण माझ्या दृष्टीने तात्वीक, अशी लढाई करण्याचे बळ मिळाले. त्या दिवशी मलाच माझ्याबद्दल काहितरी नवीन कळाले !
-पहाटवारा
प्रतिक्रिया
छान :) लढलात हे महत्वाचे!
रोचक किस्सा
+१
+१
तुमचं नशीब जोरावर होतं !
मस्त..
एकदम रोचक किस्सा.
अभिनंदन
आवडला तुमचा किस्सा.
मस्त..
आवडली तुमची केस, अभिनंदन
धन्यवाद मंडळी !
ग्रेट...
गणेशा, इतकं सरळ साधे नाहीये
ओह मला हे माहीत नव्हते..
अगदी अगदी
काळाबाजार कमी अधिक प्रमाणात
मस्तच...
तुम्हाला दंड भरायला नाही लागला कबूल पण
कळते आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे
... तुम्ही खटला जिंकला असं नाही वाटत, but
खरंतर "जिरवली पोलिसाची" असे नाहि वाटले
छे छे, 'जिरवली पोलिसाची'
खाणाखुणा करण्यात काही घोटाळा
साधारण १० मिनिटे मधे गेली असावीत
तुम्हाला दंड भरायला नाही
अनुभव आवडला.
इतकं सुलभ न्यायदान!
वेगळाच अनुभव.
रोचक अनुभव
हा हा