Skip to main content

शब्द झाले मोती.. - २

लेखक गणेशा यांनी शनिवार, 09/05/2020 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द झाले मोती..१ मागील धाग्याबद्दल : या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले. नियम : तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही. उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 179527
प्रतिक्रिया 240

प्रतिक्रिया

असं म्हणतात रात्रीच्या अंधारात चोर, लुटारू घराबाहेर पडतात. पण इथे, दिवसाढवळ्या, जर कोणी अतीव सुंदर डोळ्यांच्या भुलीत पाडून लुटत असेल तर... ...तर आम्ही सर्वस्व लुटायला तयार आहोत! सं - दी - प

इथे आहे भाजी ताजी, लवकर इकडे ये , चला घुसा घाई करा, थोड्या हिरव्या मिरच्या दे तिकडे काय आहे बघू, चला वेळ उरला थोडा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा गावालाही जायचे आहे, चला बस पकडू, धावत धावत जाउ आपण, रांगबिंग मोडू रांगेतबिंगेत उभा राहायला, समजला का मला येडा? सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा रस्त्यात थुंकू नको तर काय तुझ्या खिशात थुंकू? शहाणपणा शिकवू नको, जा रे उगाच नको भुंकू, तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मग तुम्हीच रस्ता झाडा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा पोलिसाला काही समजत नाही, उगाच मारतो दांडू, मी काय करायचे ते सांगणारा, कोण आहे हा पांडू? घरीच बसा, बाहेर फिरु नका, यांचा रोजचाच पाढा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे, फुकट सगळे दिले पाहिजे, टॅक्सही माफ केले पाहिजे, अन अनुदानही दिले पाहिजे, पैसे कमी पडले तर, सामान्य जनतेच्या तिजोर्‍याही फोडा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा आम्ही करोना सोबत राहू पण, पण त्याला ते नको आहे करोना प्राण घातक आहे, हे देखिल सपशेल खोटे आहे, अख्या जगाच्या अनुभवावरुन आम्ही शिकणार नाही धडा सोशल डिस्टंसिंगला लावा घोडा, सगळे नियम तोडा पैजारबुवा,

@ संदीप तुझ्या शब्दात जादू आहे कसली तरी.. वाचतच बसावे वाटते बऱ्याचदा... @ पैजार बुवा तुम्ही प्रेरणा स्थानी.. एकसुरी लिखाणाला तुम्ही ज्या कलेने वेगवेगळे कंगोरे लिहून तसा आमचा विचार बदलावता ते खूपच भारी वाटते.. तुमच्या लिखाणाला हा धागा खुप मिस करतोय... इतर प्रतिसाद देणारे मनात इतके काहुर उठवतात की बस.. काय विचार.. काय शब्द वाचतच बसावे वाटते... आज काहीतरी लिहीन आवरून आल्यावर... बघू... तुम्ही सगळे लिहीत रहा.. वाचत आहे...

In reply to by गणेशा

तुमच्या लिखाणाला हा धागा खुप मिस करतोय... मी पण हा धागा आणि एकंदरीत मिपाच मिस करतोय. सध्या कामाचा बोजा प्रचंड वाढला आहे की मान वर करायला देखिल सवड मिळत नाही. पण तुम्ही सगळे मस्त लिहित आहात तुझा आणि संदिपचा प्रश्र्णच नाही पण या निमित्ताने या धाग्यावर काही नवी नावे दिसली त्यांनी सुध्दा १०० नंबरी अस्सल प्रतिसाद दिले आहेत. मस्त मजा आली आज हा धागा वाचताना. पैजारबुवा,

मला पहिल्यांदा आपली विशी खुप आवडायची.. बेधडक .. बेदरकार.. वाट्टेल तसे जगण्याची मज्जा काही औरच होती.. मग आपण तिशीत प्रवेश केला आणि मग जाणवले.. तिशी खुपच हँडसम असते.. खरा भारी पुरुष हा तिशीतलाच असतो असे आपले मत. जीवनाचा काय बॅलंस साधलेला असतो.. प्रेम, माया, बाप, नवरा, अनुभव, घर, माणुस ,हळवा पण तितकाच कणखर. ह्या तिशी वर पण आपण लय प्रेम केले... बाप असल्यामुळे हि ह्या तिशीत ही आपण पुन्हा बरेच बालपण जगुन घेतले... आता ह्या तिशीचा हि उत्तरार्ध चालू झाला आहे... वाईट वाटते.. हे वयच असे आहे.. आता आपल्यालाच असे वाटते, की बाबा रे आता तुझ्या आयुष्यात खुप थोडे दिवस राहिलेत.. जगून घे.. आता नाही तर कधीच नाही.. संपतोयस तू.. उद्याचा दशकातला सूर्य तुझा नसेल.. बऱ्याच गोष्टी राहिल्यात.. राहू दे, दे सोडून.. पुन्हा नव्याने उठ.. नविन गोष्टी कर.. सर्वावर प्रेम कर.. मनसोक्त जग त्या ढगा सारखं.. मुक्त.. स्वैर.. स्वछंद...

मृग बरसला की तो भेदभाव करत नाही... कसल्याही आठवणींना तो सरळ सरळ झोडपून काढतो.. पापण्यांच्या प्रदेशात मग.. ढगही हुमसू हुमसू रडतो... चंद्रखळ्यांचे तुडुंब भरलेले बंधारे मग फुटून जातात... आठवणींच्या घरट्यात निजलेली स्वप्ने, मग काहुर बनून सैरा वैरा पळू लागतात...

In reply to by गणेशा

पुन्हा आला हा पाऊस पुन्हा हा स्पर्धा करणार यंदाच्या पावसाळ्यात कोण जास्त रडणार सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

ती आता पावसात भिझायला येत नाही... त्याला मग नायलाजानं माझ्या कडं यावं लागतं.. एक एक थेंबागणिक, तिला आठवावं लागतं.. तिच्या पापण्या पल्याड च्या गावा, हि ओल पोहचत असेल काय?

In reply to by गणेशा

तुझ्या आठवणींत भिजायला मला पाऊस लागत नाही... आभाळात ढगांची नुसती दाटी झाली तरी मनात आठवणींच्या सरी पडायला लागतात आणि मी भिजू लागतो... आतल्या आत! सं - दी - प

इकडे लिहितो प्रतिसाद.. एका खाली एक खुप बारीक होतो प्रतिसाद.. वाचायला निट जमत नाही.. ------------- त्या ढगाला पण आता काही सुचत नसेल तुझ्या स्वप्नझुल्यावर उगाच रेंगाळताना पावसाला शब्दात पकडणे जमत नसेल... आणि आता तळहातावर पाऊस पकडतोय, तर तोही हात सोडतोय... तुझ्या सारखाच...

माझं अन पावसाचं नातं तसं फार जुनं आहे .. तू नसताना माझ्या पाशी उगाच त्याचे मागे मागे चुकार घुटमळणे आहे.. आणि आता, गालावरून ओघळताना एक एक थेंब मला तू तिथे दिलेल्या हजारो मुक्यांचे हिशोब मागत बसला आहे...

तुला समुद्र आवडायचा., मला पाऊस! मग पावसात मरीनड्राइव्ह वर आपण असंख्य लाटा अंगावर झेलायचो. नंतर एक लाट अशी आली की मी पुण्यात फेकली गेली, कायमचीच.

शांतपणे किनाऱ्यावर बसून लाटा बघणे हा एक नितांतसुंदर अनुभव असतो. काही लाटा सरावल्याप्रमाणे येत राहतात एकामागून एक आणि मध्येच एखादी असते जिला इतरांपेक्षा स्वतःला वेगळं दाखवायचं असतं. आपल्या क्षणभंगुर आयुष्याला उंच उठून वाकुल्या दाखवत किनाऱ्याच्या आणखी जरा जवळ येऊन ती आपलं वेगळेपण सिद्ध करते आणि पुन्हा विरून जाते. आपल्या आयुष्यात येणारी काही माणसंही अशीच लाटांसारखी असतात. काही सरधोपट तर काही उंच उठून वेगळं आयुष्य जगणारी. सं - दी - प

समुद्र म्हंटला की मला लख्ख चांदण्यात त्याच्या किनाऱ्यावर बसण्यास आवडते. चंदेरी दिसणाऱ्या लाटा सुरेख. पण त्यांचा एका लयीत येणारा आवाज मनात घट्ट बसतो. कोकणात जाते तेंव्हा मी समुद्रावर अशी, रात्री जाते. रात्र मनात साठवणे म्हणजे काय हे तिथे कळते. बाकी तारकांनी भरलेल्या अश्या असंख्य राती, कधी सख्या बनून सोबत राहतात.. कधी विस्मरणात जातात., मला भेटलेल्या माणसांसारख्या.

आज सकाळीच, फेसबुक वरील मित्राने koama lanbada ह्या गाण्या बद्दल लिहिले होते.. koama lanbada हे ते गाणे. ते वाचले आणि त्या गाण्याला असंख्य वेळा पाहिले.. अशी डान्स असलेली गाणी , तसेच उत्कृष्ट संगीत असलेली गाणी मला खुप आवडतात. मला संगीता मधले काही कळत नाही, डान्स चे ही तसेच, पण मनाला भिडले की ते आपले आवडीचे होते. ----- कॉलेजला असताना वेगवेगळ्या भाषांतील गाणी पण यायची मला Ranu Ranantune Sinnado Sinnado हे तेलगु गाणे तर माझे पुर्ण पाट होते.. इलाई राजा हा आपला अजुनही आवडता संगितकार त्यामुळे त्याची असंख्य गाणी मी शब्द न कळताही ऐकलेली आहेत.. वा इलाई राजा म्हणजे संगिताचा बादशहाच. =============== तर झाले असे २०१६, ला कंपणीत पल्लवी माझ्या टीम मध्ये होती, चांगली मैत्रीण झाली नंतर ती, ती मला म्हणाली न येणार्‍या भाषेतील गाणी ऐकण्या पेक्षा तु इंग्लिश, पाश्चिमात्य गाणी का ऐकत नाही ? निदान २० % तरी कळतीलच की, आणी मग तीने काही गाण्यांची ओळख करुन दिली.. तिला ती गाणी यायची.. तीला वेस्टर्न लाईफचे आकर्षण होतेच .. मग माझा प्रवास सुरु झाला इंग्रजी गाण्याकडे.. तीला कोल्डप्ले आवडायचा.. मग त्याची असंख्य गाणी ऐकली, पाहिली.. त्यावेळेस मला ४-५ च गाणी यायची, तसे तेव्हडीच येतात अजुनही :-). इंग्रजी गाणी येणारे आणि कळणारे पाहिले की मला त्यांचा हेवा वाटतो. ती ४-५ गाणीच अजुन ऐकतो मी मोबाईल ला, ती गाणी म्हणजे - ब्लँक स्पेस. टेलर स्विफ्ट तर आपल्याला लय आवडली, मग तीची इतर ही गाणी बघितली, पण ब्लँक स्पेस म्हणजे क्या कहना.. - cheap thrills च्या गाण्या आणि डान्स मुळे तर मी वेडाच झाले.. आराध्या ला पण हे गाणे माझ्या रिंग टोन मुळे पाठ झाले.. भारीच - Counting Stars हे OneRepublic चे गाणे पण मला आवडलेले.. पाठ पण होते. - The Chainsmokers - Closer हे गाणे तर मला त्याच्या बिट्स आणि लोकेशन मुळे खुप आवडले.. जोडी काय दिसली आहे गाण्यात.. - perfect strangers पण खुप आवडले. तर आपला हा येव्हडाच इंग्लिश गाण्यांचा संबंध.. मध्यतंरी डेस्पेसिटो आलेले, ते पण खुप आवडले. स्पॅनिश संगितात नक्कीच काही तरी जादू आहे असे मला नेहमी वाटते.. त्यामुळे आजचे कोअमा लाम्बाडा हे गाणे आणि तो डान्स प्रकार मनात घर करुन केला... नुकताच एका मैत्रीणीने , डर्टी डान्सिंग पिक्चर बघायला सांगितला त्यामुळे पाहिला , वा काय मस्त डान्स स्टाइल्ची माम्बो पद्धत.. वा.. आजचा दिवस असा डान्स आणि संगिताने परिपुर्ण भरलेला आहे हे नक्की.. मध्येच मग मी आपली आवडीची शकीरा पण ऐकली... कधी कधी अशी गाण्यांची, संगिताची वातावरणात एक वेगळीच नशा चढते.. मजा येते. गेल्या आठवड्यात - केंव्हा तरी पहाटे उलटुन रात गेली, गेले द्यायचे राहुनी आणि ती गेली तेंव्हा पाऊस या गाण्यांनी अशीच माझ्याबोवती रुंझी लावली होती.. अवांतर : डान्स आपल्याला येत नाही, पण गेल्या वर्षी kuala lumpur मध्ये रात्री १-२ ला मी रस्त्यावर भटकायचो तेंव्हा लोकल डान्स बँड मध्ये जावून त्यांच्या तालावर थिरकलो होतो .. वा. भारतात ही डेअरींग कधी करता आली नाही. २०१६ -१७ ला जेव्हडे पब बार मध्ये डान्स केले तेव्हडेच नी आतापर्यंत केलेले डान्स, सहज आठवले हे. आता वाटते आपण डान्स शिकायला हवा होता.. असो.

.....एका अमावास्येच्या मध्यरात्री कळसूबाई शिखराच्या तळटेकड्यांमधल्या गावात मुक्कामाला असताना आकाशात चा॑दण्या॓चा खच पडलेला दिसला अन त्याचवेळी जवळच्या टेकडीच्या माथ्याशी पिठुर चांदण्यात न्हालेले ढग भिडताना दिसत होते, त्या म॑त्रमुग्ध वातावरणात एक कविता सुचली होती. (जी नंतर मिपावर दिली होती) मला वाटतं प्रत्येक कवितेला अशी एक जन्मकथा असते!

In reply to by अनन्त्_यात्री

@ अनन्त्_यात्री माणुस म्हणलं की त्याचे विचार आले.. त्याचे भावविश्व आलं.. त्याने पाहिलेले, अनुभवलेले, मी तर म्हणेल त्याने जगलेले क्षण आले. ह्या सगळ्या गोष्टींना शब्द मिळाले की कविता तयार होते.. कधी कधी ती असते त्या विचारांप्रमाणे भरकटलेली.. तिच्या केसांच्या सारखी.. कधी असते ती, तिच्या नटलेल्या रूपा सारखी, लय बद्ध. कधी कधी अवतरते ती , चांदण्यांनी भरलेल्या आकाशासारखी.. मग कवी ओंजळीत भरून घेतो ते शब्दचांदणे.. चंद्रभूल म्हणा हवे तर...

चंद्रभूल, शब्दातच अशी भूल आहे की त्या चांदण्यारातीला सगळे विसरून मन त्याच्याकडे धाव घेते., भूल नाही नशाच ती. मेले ढग तेथे हि मध्ये येतातच. काय करावे या द्वाड ढगांचे?

In reply to by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)

मग हळूच ढगांच्या पडद्याआडून झाकला चंद्र बाहेर येतो, काळ्या मेघांची किनारही रुपेरी होऊन जाते. रोहिणी चमकू लागते, चंद्रालाही तिची भूल पडू लागते.

हे ढग खुप द्वाड असतात, आकाशाच्या शाळेत जाऊनही नेहमी टारगट पोरांसारखे बाहेरच भटकत राहतात... कधी उंच शिखरावर उगाच ध्यानस्त होतात, तर कधी झाडाशी हितगुज करतात..,कधी हलकेच फिरून येतात त्या शेताच्या बांधावरून, त्या निरव शांत तळ्यावरून... कधी ते सूर्याची किरणे लेऊन सोनेरी होतात, तिच्या केसातील बटांसारखे..कधी चंदेरी तिच्या कानातल्या गोल रिंगांसारखे... कधी संध्याकाळी त्यांवर चढते केशरी लाली, तिच्या गालासारखी.. तर कधी ते चंद्रखळे बनतात.. तिच्या कातिल खळ्यांसारखे.... म्हणूनच कदाचीत अजूनही जपून ठेवलंय काही ढगांना मी, माझ्या श्वासात... माझ्या मनात... फक्त तिच्या साठी... --- शब्दमेघ.

रंग त्या इंद्रधनुचे आता फिकट होऊन जणु नाहीसेच झाले एक वर्तुळ पुर्ण झाले.. अतुट धागे मनामनांचे जे एकेकाळी वाटले होते ते काही क्षणात तुटले एक वर्तुळ पुर्ण झाले अथांग समुद्र अन् निळ्याशार आभाळाचे नाते समांतर प्रवास करत राहीले.. एक वर्तुळ पुर्ण झाले.. दिप्ती भगत (२७मे, २०२०)

@ मन्या.. मला की नाही, मी नेहमी जगाच्या परिघावर असणारा एक बिंदू वाटतो.. या परिघावर.. या वर्तुळामध्ये.. अनेक माणसे येतात, जातात.. पण मला कायम वाटत राहतं, किती हि लांब गेलं ना कोणी तरी ते माणुस पुन्हा भेटत राहतं. कोणाच्या वाटा पुन्हा त्रिज्यां सारख्या मला छेदून जातात.. कोणाचे आठवणींचे ठिपके हळूच दुरावून खुणवत राहतात.. कोणाच्या मोठ्या मोठ्या सावल्या त्या व्यासा वर लोंबकळत राहतात.. अस्पष्ट अश्या... कधी माझ्याच भावनांचा एखादा लंबक, हळूच छेदून जातो तुटलेल्या त्या दूरच्या त्रिज्येला.. आणि विचारपूस करून आपसूक बसतो गप गुमान, आपले स्वतःचे कोण मोजत.. कधी कधी तर मी कोणाला पाहत नाही.. एकटाच असतो या परिघावर.. तरी तीचा आवाज येतो कुठून तरी... "तुझ आभाळ माझ्या समुद्रावर का घोंगावत आहे? " मी बापडा गप्प राहतो फिरत, माझ्याच विचारांच्या कक्षेत.. कधी कधी म्हणूनच माझ्या येथे ग्रहण लागते तीचे.. तिच्या विचारांच्या सहित.. पण थोड्यावेळच...

रंग त्या टेबलक्लॉथचे आता फिकट होऊन जणु नाहीसेच झाले दोन पेग पोटात गेले.. अतुट पुडके ते चखण्याचे जे एकेकाळी वाटले होते ते हातात फुटून खोलीभर फरसाण उधळले तीन पेग पोटात गेले पियक्कड मित्र अन पतियाळा पेगचे नाते नाते एकत्र प्रवास करत राहीले.. किती पेग पोटात गेले???.. पैजारबुवा, (इ.पू. ३१ फेब्रुवारी २०३६०)

पृथ्वी सकाळी फिरून पुन्हा त्याच जागेवर आली की सकाळी सकाळी माझे पण वर्तुळ सुरु होते. राधेच्या., माझ्या मुलीच्या गळ्यात टाकलेल्या हातापासून, नक्षत्रांचे हातच ते. मग नंतर, पृथ्वी च्या गतीपेक्षा मी जोरात फिरायला लागते. राधेचा नाष्टा, शिऱ्या चा चहा, त्याची तयारी, कपडे, भांडी भाज्या घेणे हे चक्र असेच चालु राहते. मग राधेला शाळेतून आणताना, मैत्रिणी भेटतात, थोड्याश्या गप्पा, थोडेसे मुलांकडे लक्ष. घसरगुंडी वरून रोज राधेला ओढून आणावे लागते. मग पुन्हा तीचे जेवण, तिला झोपवणे., नंतर उठल्यावर थोडा अभ्यास, थोडे काढलेल्या चित्राला रंग सुचवणे. शिऱ्या आल्यावर पुन्हा त्याचा चहा. मग टीव्ही., मग जेवण. आणि रात्रीला शिऱ्याचे गळ्यातील अवखळ हात, चांदण्यांचा हारच जणू.

In reply to by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)

सकाळी सकाळी माझे पण वर्तुळ सुरु होते. राधेने., माझ्या मुलीने माझ्या गळ्यात टाकलेल्या मिठीपासुन, नक्षत्रांचे हातच ते.

नुकताच अमोल_oo3 यांच्या मातृदशक कवितेला रिप्लाय देताना त्या कविते वरून ह्या ओळी सुचल्या.. आई म्हणजे हळवा कप्पा.. म्हणून येथे पुन्हा देतो.. __ नवमांस गर्भ वाढविला | चिरंजीवी श्वास दिला | तोच स्वर्ग बनविला | माझ्यासाठी|| पुनर्जन्म तेथीची व्हावा | पुन्हा मायेचा ठेवा | तुझ्या काळजाचा तुकडा | माझ्यासाठी ||

रातराणी म्हणजे चांदण्या अंगावर घेऊन केलेली सुगंधाची नखशिखांत बरसात.... पण आपलं मळकट रुटीन संभाळून, कोणत्या सरकारी अधिकाऱ्याने आमच्या लाल डब्याला अगदी नटवून त्याला 'रातराणी' नाव दिले असेल त्याला आपला सलाम. अशी रंगीत, कवी मनाची माणसं परिवहन खात्यात पण असु शकतात हे पाहून चांगले वाटले.. खरी रातराणी म्हणजे सुगंधाची दरवळ... पण ह्या रातराण्यांच्या सुगंधाचे न बोलले बरे.. मागच्या बाकड्यावर डुलणारे प्राणी, आणि त्याच्या पुढच्या बाकावर घोरणारे.. ही रातराणीची खासियत... कधी कधी उगाच कोणी चसमिस्टर, झोप येत नाही म्हणून नोकिया फोन च्या बॅटरीत एखादं कसलसं पुस्तक वाचत असतो.. पण असले नग विरळच.. लांबचा पल्ला, थोडा आरामदायी आणि जलद गाठता यावा म्हणून लाल डब्याला थोडं आतून बुडाला बसायला सुखकारक केलं आहे, इतकच काय ते नविन... रातराणीचे ड्रॉयव्हर म्हणजे एक जात हरामखोर जमात.. सकाळी कोणाला कसलसं सामान गावाला द्यायचं असल तर इकडून पण आणि तिकडून पण पैसे उखळतात... बर, बस स्टॉप वरून निघाल्यावर जरा कसा तरी डोळा लागेस्तोवर हे ह्यांच्या ठरलेल्या हॉटेलात गाड्या घालतात.. खायचं ह्यांना असतं.. जेवणाच्या पैस्यात आम्ही उगाच काळा चहा पितो.. या वेळेस, येव्हड्या अंतरातच तुंबलेले उगाचच धावा धाव करतात.. येताना सिगारिटी ओढत आल्यावर त्यांचा आव जणू चंद्रावर धूर सोडल्या सारखा असतो.. बस कंडक्टर ला तर गाडीचा स्टार्टर मारल्यावरच सगळी लोकं परत आत आल्यात का नाही हे मोजायचा कंड येतो.. कुठचं तरी म्हतारं नेमकं आलेलं नसतं.. मग त्याची म्हतारी त्या संधीचा फायदा घेऊन त्याला दोन शिव्या हासडते, त्याची पोरगी उगाच खिडकीच्या काचंतुन ओss अण्णाss ओss अण्णाss अशी बोन्ब मारते.. म्हातारं मग धोतर सावरत पळत येतं.. दहावीच्या पोराला गणितात पास झाल्यावर काय वाटलं नसल तसलं तोंड करून कंडक्टर, माणुस मोजायचं गणित संपवतो, आणि ड्रायव्हरला जाऊद्याss म्हणून जोरात हाक देतो.. रगेल ड्रायवर त्याच्या बापाचं काय जातंय, असल्या अविर्भावात जी गाडी दामटवतो, तेंव्हा रातराणी की रातवैरणी असं वाटून उगाच छातीत धस्स होतं. गाडी वळवताना तर तो हरामखोर असला टर्न घेतो की बाजूच्यानी खसकन अंगावर आलच पाहिज्ये, नायतर वरण एखादं गठुडं डोक्यात पडलंच पाहिज्ये. -- गणेशा

रातराणीची फुलं मला आवडतात. फुलांना खुडण्यापेक्षा वेचण्यात जो आनंद मिळतो तो वेगळा असतो आणि त्यातही रातराणीच्या फुलांना वेचण्यात किंचीत जास्तच मिळतो. त्यासंदर्भात कॉलेजच्या दिवसांत लिहिलेल्या माझ्याच ओळी मला पुन्हापुन्हा आठवतात. फुले वेचूनि परड्या भरल्या नाजूक तिच्या बोटांनी अगणित ती सुवासिक स्मरणे भरू कुठल्या कुप्यांनी? रातराणीची फुलं निव्वळ सुगंधच देत नाहीत. तर, परिसराला शोभा आणि शब्दांना अलवारपणाही देतात. सं - दी - प

@ संदीप फुले वेचूनि परड्या भरल्या नाजूक तिच्या बोटांनी अगणित ती सुवासिक स्मरणे भरू कुठल्या कुप्यांनी? वाह --------- मला लहान पणा पासून पांढरी, पांढरट रंग असणारी फुले खूप आवडतात.. माहीत नाही का पण आवडतात.. उरुळी ला माझ्या घराच्या अंगणात जाई चा वेल होता.. काळ्या चिमणीने त्यात घरटे पण केले होते.. जुई बाजूला छोट्याश्या बागेत होती.. अंघोळी चे पाणी जायचे तिथे मोगरा उभा असायचा.. एक पाकळीचा मोगरा.. दोन पाकळीचा मोगरा.. किती आठवणी.. मोगरा तेंव्हाचे माझे आवडते फुल.. तायडी गजरा करायची या फुलांचा.. या पांढऱ्या फुलांच्या आवडी पायी, दूर दातार बंगल्यामध्ये उगाच आलेलं धोतऱ्याचे फुल पण मला आवडलं होतं. मी मोठा होत गेलो तसं मला बकुळी आणि पारिजातका च्या फुलांनी मोहिनी घातली.. त्या फुलांत मला माझ्या आत दडलेल्या प्रेमाच्या अनामिक हुरहुरी ची आठवण येते.. तिच्या आठवणींची हलकीशी बरसात होते... सुगंधाचच लेणंच ते.. माझ्या रहाटनीतल्या घराचे नाव 'पारिजात'.. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलुट करायची ती सुगंधाचीच हे मोहत्सव मधलं माझं आवडतं वाक्य.. आता हळू हळू या प्रेमात रातराणी ने प्रवेश केलाय.. रातराणी म्हणजे आकाशातल्या चांदण्याच जणू. .. निरपेक्ष भावनेचे अलवार प्रेम म्हणजे रातराणी....

रातराणी म्हटले की एक वेगळाच किस्सा डोळ्यासमोर येतो. त्या काळी आम्ही एका चाळीत रहायचो. दोनचार घरे पलिकडे राणीताई रहायची. अभ्यासात प्रचंड हुशार होती ती. रात्री दहा साडेदहा झाले की ती अंगणात लाईट लाउन अभ्यासाला बसायची. सकाळी साडेतीन चार पर्यंत तिचा अभ्यास चालायचा. तिच्या या सवयी मुळे चाळीत सगळे तिला रातराणी म्हणायचे. एकदा काय झाले रात्री अडीच तीन च्या सुमारास राणीताई जोरजोरात किंचाळून ओरडायला लागली. सगळी चाळ साखरझोप सोडून तिकडे धावली. २५-३० लोक तरी जमले असतील. शिवाय घरात नुसते उठून बसलेले लोक वेगळेच. कोणाला वाटले चोर आला, कोणाला वाटले आग लागली तर कोणाला अजून काही वाटले. सगळे राणी ताई कडे बघत होते आणि ती चेहरा ओंझळीत लपवून थरथर कापत उभी होती आणि सारखी भिंतीच्या दिशेला बोट दाखवत होती. शेवटी तिच्या आईने जरा जोरातच विचारले की काय झाले ते निट सांगशील का? तेव्हा राणीताई म्हणाली "भिंतीवर एवढी मोठी एक पाल होती" सगळे शेजारी बिचारी रात्री ३ वाजता पाल शोधायला लागले. पण ती थोडीच मिळणार होती. पण या गडबडीत बर्‍याच जणांच्या झोपेचे खोबरे झालेच होते. त्या नंतर बरेच दिवस सगळे जण राणीताईच्या आईला पाली साठी उपाय सुचवत होते आणि ती ही त्यातले जमेल तेवढे उपाय करत होती. पण राणीताईने मात्र तिची अभ्यासाची वेळ आणि जागा बदलली नाही. पैजारबुवा,

आज मन माझे उडत जाते आहे 2005-2006 ला.. ते अनुभवलेले क्षण पुन्हा पुन्हा यावेसे वाटतात... July महिना होता आणि मी 'मॉड्युलर इन्फोटेक' या पर्वती इस्टेट मधल्या कंपनीत कॉलेज मधून सिलेक्ट झालो होतो... तिथला पहिला दिवस 18 जुलै... तसा हा 2005 चा काळ अवघड होता.. पण जगण्याच्या या उतार चढावात येणारे दिवस असे भारी येतील हे कधी वाटले नव्हते... ते मित्र मैत्रिणी.. गप्पा... झाडाखाली सगळ्यांनी घालवलेले रोजचेच ते क्षण.. किती अल्हाददायक... त्या पंचमी हॉटेल मधल्या पार्ट्या.. कधी, आदर्श निगडी ला राहतो म्हणून तिकडे पूना गेट ला जाऊन खाल्लेली सुरमई... सगळे अगदी लक्ख आठवते आहे... सुरवातीला दीपाली आणि रोहिणी ने माझ्या विरुद्ध केलेली भांडणे.. किती किती गोड आठवणी.. ती मैत्री इतकी उत्कट आहे की.. हे लिहायला घेतले आणि मध्येच तोडून शारदया अन दीपाली (लग्न केले त्यांनी पुढे ) ला फोन केला.. किती दिवसांनी बोललो.. खळखळून हसलो... वा.. हा तर लिहितो थोड्या वेळाने.. (क्रमश:)

२००५ साली, मोड्युलर कंपणीत जॉइन झालो आणि आमचा ८ नविन फ्रेशर लोकांचा गृप तयार झाला, तसे आताच्या कंपनी सारखे ट्रेनिंग वगैरे काही नव्हते, आणि सगळेच एका वेळेस जॉइन झालेले आहेत असे ही नव्हते.. पण आम्ही एकमेकांस कसे बांधले गेलो माहीत नाही.. आम्ही तसे वेगवेगळ्या प्रोजेक्ट वर काम करत होतो .. ------------- संध्याकाळी ५.३० - ६ वाजले की आम्ही एक एक जन कंपणीतुन बाहेर पडत असे. इलेक्ट्रॉनिक इस्टेट (पर्वती इस्टेट) च्या बाहेर, गेट वर, रस्त्याला लागुन एक झाड होते, जो पहिला निघेल तो तिथे त्या झाडाखाली जाऊन थांबत असे. ते झाड अश्या अनेक चेष्टा मस्करी, विनाकारण केलेला हाश्य कल्लोळ, गोंधळ , थट्टा यांचे साक्षिदार होते.. पहिल्यांदा, दिपाली आणि रोहिणी ला मी गृप मध्ये आजिबात आवडत नव्हतो, कारण मी कसा पण डायरेक्ट बोलायचो.. पुढचे मागचे न बघता.. मला मुलींना वेगळे वागवण्याची कला नव्हती.. जसे आपले सगळे मित्र तसेच ह्या.. शहरातल्या गोड पणाची सवय नव्हती... मग याच्या वर चर्चा व्हायच्या, दिपाली ला तर मी कसल्या परिस्थित नकोच होतो.. ३६ चा आकडा.. (आता रोहिणी आणी दिपाली सगळ्यात चांगल्या मैत्रीणी आहेत, नव्हे मी त्यांचा सगळ्यात चांगला मित्र आहे :-)) ) एकदा आम्ही सलाम नमस्ते ला गेलो होतो, आणि मला चहा प्यायचाच होता, चहा म्हणजे आपला जीव की प्राण, दिपाली ला तिच्या म्हणण्या प्रमाणेच करायचे असायचे, ती पुणेरी स्टाईल मध्ये म्हणाली.. " शी, चहा नाही आवडत मला, नको जायला.." आपल्याला हजरजबाबी पणा कुठे दाखवावा हे तेंव्हा कळत नव्हते, मी लगेच " बरं ठिक आहे, तु दुध पी" असे म्हणालो. त्यावर ती जी भडकली की बस. . ( आज पहिला रिप्लाय लिहिताना , फोन वर हे बोलल्यावर आम्ही इतके हसलो की बस की बस ) सोमवारी भाग्यश्री, आदर्श आणी आमित माझ्या बाजुने आणी दिपाली आणि रोहिणी मी कसा गावठी ,, कसा बोलतो असल्या पटवण्यात.. आदर्श आपला तेंव्हा पासुन या सगळ्या मित्रात बेस्ट फ्रेंड.. त्याला असल्या परिस्थीती चांगल्या हातळता यायच्या .. येण तेण प्रकारे , मी गृप मध्ये राहिलो... पण एकदा दिपाली माझी अपाचे गाडी बघुन म्हणाली होती, ये मला पण गाडी शिकायची आहे, पण रस्त्यावर नाही हा, मी " हा तु घरात शिक " असे बोलल्यावर पण ती माझ्या वर रुसुन निघुन गेली होती.. तीच्या वरोबर शार्दुल पण .. दिपाली गेल्यावर एका वर एक फ्री सारखे, शारद्या ला तिच्या मागे जावे लागयचे... डी गँग चा तो उजवा हात बनु पहात होता... शार्दुल, आमचा लय भोळा माणुस, बराच शांत, तो दिपाली ला 'डी' म्हणायचा.. ती मात्र डी गँगची म्होरक्याच वाटायची मला.. पण शारदया ? तो आपला दोस्त होता.. आपण उरुळी ला तेंव्हा नावाला राहायचो.. झाडा खाली उशीर झाला की मी शारदया च्या रुम वर थांबायचो.. बर्याचदा..(नंतर रुममेट्स झालोच, ते वेगळे किस्से).. नाही पण शारदया तेंव्हा लगेच माझ्याबरोबर रुम वर येत नव्हता, तो व्हाया धनकवडी लांबुन अरणेश्वर ला यायचा... दिपाली ला घरी जावून स्वयपांक करायचा असायचा, म्हणुन ती बर्याचदा लवकर निघायची.. आणी शारदया पण.. रोहिणी, आमच्या गृप मधली सगळ्यात मॉड मुलगी होती.. सिंबॉयसिस मध्ये शिकुन आलेली होती.. मॉड्युलर हे नाव तिच्यामुळेच सार्थकी लागले असे आपले मत होते.. आम्ही जेंव्हा कोकण ट्रीप ला गेलो, त्यामध्ये आम्ही खुप धमाल केली.. पुण्यातुन दिवेआगार, श्रिवर्धन, आरावी या पुर्ण ट्रीप मध्ये येई पर्यंत नॉनव्हेज जोक्स.. कसले ही पिजे.. गप्पा. खेळ काही सांगयला नको... माझी ही आयुष्यातील पहिलीच ट्रीप. तेंव्हा पासुन रोहिणी चा मी तीच्या दृष्टीने सर्वात चांगला मित्र झालो.. नंतर हे नाते इतके सुंदर होत गेले की बस . ती दुबईला होती तेंव्हा तिला वाटायचे मी विथ फॅमिली तिकडे यावे फिरायला.. पण दुबई आपल्याला कधी आकर्षित करु शकली नाही.. आता मुंबई ला असल्याने १-२ महिन्यात फोन झाल्यावर खुप बोलतो आम्ही.. आता आमच्या गृप मध्ये सगळ्यांशी बांधुन असलेला मी एकटाच असे तीचे मत.. तीचा तर मी एकटाच जीवा भावाचा मित्र.. मज्जा येते तिच्याशी बोलताना, मुलांच्यात इतकी गुरफटलेली असते, आणि तीची स्वप्ने काय तर आपण म्हतारे झालो ना, मग पुन्हा तसेच त्या झाडाखाली उभे राहुन मनमोकळे गप्पा मारायचो ना अगदी तसेच गप्पा मारु.. माझे अजुनही विरुद्धच मत, आलेला प्रत्येक क्षण जगुन घ्यायचा, नंतर असे करु न तसे करु हे सगळे राहुन जाते ग.. पण आम्ही आमच्या मुद्द्यांना सोडेल तर कसे ... ती पुण्यात आली होती तेंव्हा कोंढव्याकडे जाताना, तीला ते झाड दिसले नाही.. तीला वाईट वाटले.. तीने मला हे सांगितले तेंव्हा ही मला वाईट वाटले.. अमित आमच्या गृप मधला हिरो ,बोलबच्चन पण होता तो.. जरी तो सिंहगड रोड वर रहायला असला तरी आधी पेठेत राहिलेला गुण त्याच्यात होता, आमच्या गृप मधला सगळ्यात गोडबोल्या तोच.. पोरींना जाळ्यात कसे ओढायचे हे त्याला जास्त कळते असे त्याला उगाच वाटायचे.. असते , गोड बोलणार्‍या मुलांना हा गैरसमज असतो.. अमित सुंदर गायचा... त्याला खुप मुली आवडायच्या.. कधी कधी शारदया आणि मला तो असे समजावयाचा की आमचे आजोबाच आमच्याशी बोलतात .. पण तसा मनाने चांगला होता, एकदम. रहाणीमान उच्च होते आणि भाषा क्लिन.. गृपमध्ये कोणी क्लिनबोल्ड झाल्या नाही हे त्यांचे नशिब...(भाड्या ने वाचले हे की मला लय शिव्या घालेल, आताही) 'भाड्या' हा आमचा कॉमन शब्द होता.. भाग्यश्री ला नंतर आम्ही 'भा' हे नाव दिले आणि दिपाली चा 'डी' होताच.. इलेक्ट्रॉनिक इस्टेट मध्ये दुपारी चक्कर मारताना अमित मस्त बोलायचा.. सगळ्यांना खुप मस्त हाताळण्याची कला त्याच्या कडे होती असे मला वाटायचे.. आपल्यात अशी ओघवते बोलण्याची कला नव्हतीच कधी.. अमित ने आम्हाला तेंव्हा एक गोष्ट सांगितली, की आपण ऑफिस चॅट बॉक्स मध्ये जे लिहितो ना ते सर्वर वर रेकॉर्ड होते, आणि ते वाचु शकतात.. मग माझ्या मनात आले, भाड्याने हे आधी का नाही सांगितले, आता ह्या येव्हद्या शिव्या, येव्हडे बोलणे कोणी पाहिल्यावर. मग आम्ही शोर्ट फॉर्म मध्ये बोलायला लागलो.. पण त्यात सगळ्यात फेमस झाले ( B.N.K.R.) अमित आहेराव.. बोर नको करु राव .. आता कॅनडा ला गेल्या पासुन आमचे बोलणे खुप कमी झाले आहे.. ( आज करतो कॉल रात्री त्याला ) शितल गृप मध्ये कमी राहिली, ६ महिण्या नंतर तीचे लग्न झाले, आमच्या गृप मधुन कायमची हरवलेली ही एकमात्र मुलगी.. जास्त आठवणी ही नाहितच.. कधी भेटली तर भांडण होणार.. पण कधी भेटणारच नाही असे मला वाटते... क्रमशा: (पुढे आमच्या गृप मधला आमच्या तीन जनांचा थोडा क्लोज्ड गृप

माझ्याच साठी - > वरचे दोन्ही भाग वाचल्यावर , रोहिणी चा फोन आला.. २ मिनिटे तर रडत होती.. आपल्या पाशी रडणारे विरळच.. अश्या निखळा मैत्रीला सलाम... खुप बोललो आज... वरचे लिखान तसे जास्त वेधक नाही झाले, पण हे ज्यांच्या साठी आहे, त्यांना त्या दिवसाचे अलवार पिस अंगावर पडले असे वाटणारच. खुप जुने दिवस आठवले.. खाली आदर्श आणि भाग्यश्री चे भाग देणार होतो पण सुरुवात रोहिणी पासुनच करेल पुन्हा.. - गणेशा

असे मित्र आणि मैत्री मिळायला भाग्य लागतं. भाग्यवान आहेस. हे सगळं वाचत असताना. कॉलेजपासून अगदी आता नवीन सोसायटीपर्यंतचे झालेले ग्रूप आठवले. जितक्या नोकर्‍या बदलल्या, राहती जागा बदलली तितके ग्रूप झाले. वाचतो आहे. येऊदे अजून. सं - दी - प

काळ थोडा पुढे सरकला आणि आम्ही घट्ट मित्र झालो... माझ्या घरी मटण खुप भारी बनते... सगळे उरुळी कांचन ला मटण खायला आले.. आम्ही पत्ते खेळलो होतो, गेम आठवत नाही, पण त्यात राजा राणी वजीर असे जिंकण्याच्या क्रमाणे ठरले जातात. आदर्श राजा झाला होता, रोहिणी राणी आणि मी वजीर.... तेंव्हा पासुन रोहिणी ला आज पर्यंत मी राणीच बोलतो, पण ती मात्र मला अजुनही हसत 'गणोबा' बोलते.. मला गणोबा म्हणणारी ती एकमेव व्यक्ती... भाग्यश्री कंपणीत बसायला माझ्या मागेच होती.. बाकी सगळे आम्ही लांब लांब बसत .. भाग्यश्री आमच्या गृप मधील सर्वात सालस, शांत आणि समजुतदार मुलगी.. अजुनही ती तशीच आहे... आमच्या सर्व गृप मध्ये भाग्यश्री सर्वांना खुप आवडायची.. तीला पॉलिटीक्स म्हणजे काय हे माहितच नव्हते ... मी जरी कंपनीत काम करत असलो तरी माझे कॉलेज (मी दुसर्या वर्षापासुनच कंपणीत जात होतो, शेवटचे वर्ष कंपणीतच) चालु होते आणी ते होते निगडीला. त्यामुळे एम.सी.ए. च्या मित्रांच्या निगडीवरील रुम वर पण मी जायचो .. तेंव्हा भाग्यश्री, मी आणि आदर्श आम्ही तिघे शनिवार-रविवारी पण भेटत असु.. पुणे गेट हेच आमचे ठिकाण.. त्यामुळे हळु हळु आमच्या तिघांच्यातला बाँड पण घट्ट होत गेला. झाडाखाली उभे राहिल्यावर कितीतरी ४२ नंबर बस आम्ही तीला सोडायला भाग पाडत असु.. तीला घरी जास्त उशीर झाल्यावर चालत नसे, पण तीला या बाबतीत तरी आम्ही बिघडवुन टाकले होते.. आमच्या मुळे तीला घरी बोलणे खावी लागत असे.. तीच्या आयुष्यातील सर्वात टुकार पण बिंधास्त असणारे आम्ही दोघेच होतो..तिला अनेक मॉडर्न म्हणी, वाक्यप्रचार आम्ही शिकवले होते. त्या शाळेचा आदर्श हेडमास्तर आणि मी शिक्षक होतो... आदर्श माझा या गृप मध्ये बेस्ट फ्रेंड होता, इतका की मी निगडीला आलोय हे कळाले की, त्याचे वडील त्याला आता तुला रात्री १२-१ वाजतील यायला ना ? असेच विचारत होते.. आमच्या गप्पांना काय लिमिट नव्हते, आदर्श एकदम प्लँड मॅनर मधला, आणि मी एकदम उधळा.. त्याने कितिदा तरी मला समजवले पण त्याचे काही फायदे नाही झाले.. पोरिंच्या गप्पा हा आमचा कायमचा धंदा होता.. रात्रीचे १२-१ हे म्हणजे मिनिमम.. कधी त्याला दूसर्‍या कशामुळे ही घरी जायला उशीर झाला तरी आमच्या नावाचा उद्धार होत होताच.. आपला लौकिकच असा होता.. माझी मुंबईची मज्जानु लाईफ हा आमचा कायम चर्चेचा विषय बर्याचदा असायचाच... तो विषयच न्ह्यारा. नंतर अजुनही आम्ही तितक्याच उत्क्टतेने भेटतो, आताच जानेवारी मध्ये तो लंडन वरुन आल्यावर आम्ही भेटालो होतो,, कुठे ? पुणे गेटच... पंचमी, हे पुणे सातारा रोड वरील हॉटेल, ऑफिस च्या अगदी जवळ होते, आमच्या सगळ्या कंपणी जवळच्या पार्ट्यांचा हा एक मोठा साक्षीदार आहे.. पंचमी आणि आमचे नातेच तसे.. किती प्लॅन आमचे त्या हॉटेलात ठरलेत.. उन्हाळ्यातला मँगो ज्युस तर क्या कहना.. अजुनही मी तिकडे गेलो की त्या हॉटेल मध्ये जातोच जातो... जवळच सिटी प्राइड होते, आम्ही सर्वांनी एकत्र पाहिलेला 'रंग दे बसंती' हा पिक्चर आणि थेटरमध्ये आम्ही केलेला गोंधळ अजुन आठवतो.. आम्ही सगळ्यांनी त्यातील स्वता एक एक पात्र घेतले होते.. त्याच्या एंट्रीला बाकिचे गोंधळ करत होते.. तो पिक्चर अक्षरसा जगलो आम्ही तेथे.... मैत्री .. ही खरेच किती सुंदर गोष्ट आहे ना.. ? लिहिण्याचे खुप आहे पण थांबतो... क्रमशा: ( पुढे शेवटची मैत्रीण अश्विनी जगताप )

उन्हीं पुराने दोस्तो के साथ फुर्सत से गप्पे लडाने है और उनके सुस्त पडे ठहाके जगाने है आसमां को सुनाने के लिए चाय की सुर्कीया उसी दूरके ठेलेपे जाके लेनी है फिर चाहे, झुलसा देनेवाली दोपहरकी धूप हो, या हो, शाम के रंगीन फव्वारे क्रिकेट भी खेलना है जहाँ जगह मिले वहाँ बच्चोंको घुमाना है बहन-भांजे सबसे मिल आना है जिंदगी फिर एक बार और बेहतर तरीके से जिने की कोशीश करनी है बस ये, साफ फर्श पर अचानक हाथो से चाय की प्याली गिरी हो और उसमे रख्खी हुई सारी चाय फैल रही हो तितर बितर होकर जरासी भी ढलान मिले उस ओर उसी तरह से, बढता हुआ ये सुहाने जिंदगीपर भद्दा दाग लग रहा लॉकडाऊन पूरी तरह से साफ हो जाने के बाद! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

मस्त.. खरे तर मला खुप कमी फ़्रेंडस, मोजून 15-20. त्यामुळे माझ्या भावना अश्याच उत्कट... जीवनाच्या भावगर्दीत कित्येक लोक आले.. गेले.. पण आपल्याला मनापासून एव्हडेच भावले.. त्यांमुळे, तो चहा.. त्या बाईक राइड्स .. ते तासन तास बोलणं.. काहीही... अजूनही तसंच... Mumbai मध्ये गाडिच्या मागे घट्ट बसणारी मैत्रिण.. माझ्या दुःखात साथ देणारे जिवाभावाचे मित्र.. सायकल घेतली तर सायकल घेऊन माझ्या सोबत फिरणारे माझे गावाकडचे 2 मित्र संदीप सुप्रिया सारखे ऑर्कुट फ़्रेंड पण family फ्रेंड झालेले.. आपण ठरवलंय.. आपण पुन्हा 15 वर्षे मागे जाऊन जगणार...

बरंच मजेदार आहे गणेशा. --------- इतर मिपाकरांनो तुम्ही पण काही लिहा रे. श्रीखंड घोटल्यागत लिहायचं ( म्हणजे या शैलीला मी म्हणतो ) आपल्याला जमत नाही. ही टीका नाही तर एक प्रतिसाद आहे. शब्द आणि मोती वगैरे लेखाचं नाव वाचून लेख उघडलाच नव्हता पण प्रमोदने लिहिल्यावर लगेच वाचायला आलो. पहिला भागही वाचला. बाकी याच्या छोट्या कथा केल्यास जीए होणार.

In reply to by कंजूस

गोठलेला श्रीखंड शब्दच मला खुप आवडला.. :-)) शब्द -मोती नाव नसेल आवडले.. काहींना अलंकार आवडत नाहीतच.. आवड एकच..साधे सरळ.. दागिना विरहित... जशी केट होती टायटॅनिक मध्ये.. एकदम तसेच... जीए.. कधीच वाचले नाही.. काजळमाया घेतले होते, वाचण्या अगोदरच न्हेले फ़्रेंड ने.. पण आपण साधाच, कुठं जीए.. .:-))

गोठलेलं नाही. श्रीखंडासाठी चक्का आणि साखर ( आणि केशर, वेलचीसुद्धा) बराच वेळ घोटतात..

गे माझ्या बकुळी ! कालच तर तू प्रथम बहरलीस.. चांदण्यांच्या नक्षीने पुरती धुंद झालीस.. वार्याच्या झुळुकीने सांत्र आर्त झालीस.. ... आजकाल वारा नाही फिरकला, म्हणून का तुझा बहर आटला ? उणावली चांदणफुले आणि सुगंध खंतावला ? वारा तर आपल्या मस्तीत, वनोवनी हुंदडतो.. म्हणून का देह तुझा स्पर्शाविना सुकतो ? नको माझ्या सखी गं आटवू झरा प्रीतीचा बहर पुन्हा अशी की झंझावात वर्षेचा येईल तो सखा तुझा मग माघारी परतोनी कुशीत त्याच्या जाशील होऊन नभचांदणी..!

In reply to by सस्नेह

स्नेहांकिता. सुंदर भावना... ~~~~~~~~~~~ गावाला बकुळी चे मोठे झाड होते, हिरवेगार. गावाला गेले की संध्याकाळी बकुळीची फुले वेचण्याची मज्जा काही औरच. आई झाडावर चढू नको बोलायची. तरीही मी काही वेळेस झाडावर चढत असे. बकुळीच्या देठाकडे थोडे हलकेच दाबले कि ते खुडले न जाता वेगळे व्हायचे. त्याचा पुष्परस पिण्यात पण मज्जा होती. फुले गजऱ्यात माळली की दोन दिवस केसांत सुगंध दरवळे.. फुले अगदी विटकरी झाली तरी त्यांचा सुगंध जात नसे. आठवणी हि अश्याच सुगंधी., जुन्या झाल्या तरी सुगंधीच, बकुळीसम. - मोगरा

In reply to by मोगरा (verified= न पडताळणी केलेला)

बकुळी चे झाड पाहून छान वाटले.. रिप्लाय खाली देणार होतो पण येथेच देतो. --------------------- सख्या, मी तुझी बकुळी ! शब्दफुले गुंफली मी तुझी वाट पाहता.. अत्तरे उडतील नभी घे टिपून मज आता... चांदणस्पर्श भिनला मखमली या देहावर ओठांवर साचले गाणे खुले हास्य गालावर तू लवकर ये सजना बोजड आता हे जगणे.. तुझ्याविन रिते मन माझे श्वासांचे नुसते येणे जाणे... - शब्दमेघ (गणेशा)

अश्विनी जगताप... थांबा, आडनाव एक असले तरी आम्ही पुर्ण दोन दिशेची दोन टोके होतो.. कंपणीतील माझी ही शेवटची मैत्रीण.. अश्विनी, मोड्युलर ला नंतर जॉइन झाली.. मी तेंव्हा खालच्या बेसमेंट ला शिफ्ट झालो होतो.. कंपणी आमची छोटीच होती.. आमचा ८ जनांचा गृप वेगळा आणि अश्विनी वेगळी.. ती फक्त माझी मैत्रीण होती, असे म्हणाल्यास वावगे होणार नाही की मी पुर्ण कंपणीतला तीचा एकटाच मित्र होतो.. कायमसाठी... आमची जागा खाली माझ्या टीम लिडर , विक्रम शेजारी करण्यात आली..आदर्श पण तेथेच बसत होता. अश्विनी कंपणीत जॉईन झाल्यावर माझ्या जवळ बसण्यास आली.. अश्विनी, C.O.E.P. मधुन Electronic B.Tech मध्ये college टॉपर होती.. त्या काळात ती अल्गोरीदम, मशिन प्रोग्रॅमिंग असले काय काय करत होती. तीची लेवल आय.आय.टी चीच. , त्याची कुठलीशी परीक्षा ती पास झाली होती.. तिकडे गेली नाही तो भाग वेगळा.. -------------------- हा तर अश्विनी ही एकदम टीपिकल हुशार मुलींसारखी होती.. काम एके काम.. दुसरे काहीच नाही.. ती खाली बघुन यायची, खाली बघुन जायची.. सासवड वरुन पुण्यापर्यंत आणि पुण्यापासुन सासवड पर्यंत ती पुस्तकेच वाचत यायची.. कोणाशी एक ना दोन.. त्या उलट मी.. आपल्याला बडबड लागायची.. चेष्टा करणे तर आपल्याला आवडायचेच..काम कमी आणि दंगा जास्त असले आपले... अश्विनीची मी बरीच फिरकी घ्यायचो.. तीला निट कळत पण नव्हते.. तीचा एकच शब्द असायचा.. स्टुप्पिडच आहेस. कॉलेजमधल्या काही गोष्टी निघाल्या आणि आम्ही बाईंवर कसे लाईन मारायचो, कसे कँटीन ला बसायचो.. की तीला ते खुप वेगळे वाटायचे.. एकदम ती सदाशीव पेठेतल्या सारखे बोलायची, " अरे तुम्ही या साठी कॉलेजला जायचा का ? कॉलेजला अभ्यासाला जायचे असते ." मी आणि आदर्श हं करुन हसायचो.. तीला खुप नवल वाटायचे . अशी पण मुले असतात होय असाच तीचा प्रश्न असायचा... आणि आम्हाला काय ही काकुबाई असे वाटायचे... पुस्तके ही एकच आमची कॉमन आवड.. आमची मैत्री घट्ट होण्याची सुरुवात असणारी गोष्ट.. ती खुप भारी भारी पुस्तके वाचायची.. आम्ही तिथपर्यंत पोहचलो पण नव्हतो.. मग मी तीला दुनियादारी, पार्टनर, ५.समवन असली पुस्तके वाचायला दिली.. तसली पुस्तके वाचुन ती तर उडालीच होती आधी.. हे असले जग तीने कधीच जगले नव्हते.. ना तीच्या मनात त्याचे कुठलेसे चित्र होते.. आणी आम्हाला, या जगात अश्या पण पोरी असतात काय ह्याचे कुतहल.. नंतर आम्ही पुस्तकांची खुप देवानघेवान केली.. १० जून ला ती मला एक पुस्तक गिफ्ट द्यायची आणि २२ जून ला मी तीला एक पुस्तक द्यायचो ... अजुन पर्यंत हे चालु आहे.. तीने मला लिटील वुमन्स गिफ्ट दिले पहिल्यांदा.. मला खुप आवडले ते.. ज्यो आपल्याला खुप आवडली.. नंतर आम्ही पुस्तकांवर खुप बोलायचो.. दुसर्‍या इतर बाबतीत तीच्या नजरेने आम्ही स्टुप्पिड ठरले जायचो...आपल्यात वात्रट पणा होता, खोडकर पणा होता, पण आपण पण कुठल्या तरी कॉलेजचा टॉप्पर होतो, त्यामुळे तीने कितीही स्ट्प्पिड गिरी करायचा म्हणाली तरी मी पण टॉप्पर होतो गं, तु असले निरस जगणे नको सांगु आपल्याला असे बोलायचो.. तीच्या द्रुष्टीने तर बाईंवर लाईन मारणे म्हणजे अपराधच.. मुलींचे फोटो पुस्तकात ठेवणे म्हणजे वाईट धंदेच.. शारदया च्या रुम वर रहायचो तेंव्हा एक टाईम जेवणाच्या पैश्यात मी वडापाव खायचो.. आणि त्याचे पैसे साठवून महिन्याला एक पुस्तक विकत घ्यायचो.. तीच्या मुळे मला मेहता पब्लिकेशन, त्या पुढील अत्रे सभागृह असली पुस्तकांची ठिकाणे माहीती झाली.. माडीवाले कॉलनीतील मेहता पब्लिकेशन च्या दुकानात तर आम्ही मग पडीक असत.. तीथल्या काम करणार्‍या बाईंना पण आम्ही चांगले माहीत होतो, आम्ही गेले की त्या आम्हाला खुप छान छान पुस्तके सजेस्ट करायच्या.. मग आम्ही अशी दर महिन्याला पुस्तके घ्यायचो....मी तिथे गेलो की प्लेजर बॉक्स वाचायचो कायम, मग एका १० जून ला तिने मला दोन प्लेजर बॉक्स गिफ्ट दिले.. आपल्याला ती जाडजुड पुस्तके गिफ्ट देती , कधी २ -२ पुस्तके गिफ्ट देती याचेच अप्रुप जास्त होते... नंतर आम्ही निलायम जवळच्या पाथफाईंडर ला जायचो, तिथे कॉफी मिळायची.. मज्जा.. तेथुन पण आम्ही काही पुस्तके घेतली . 'सेतु' हे आशा बगेंचे पुस्तक मस्तच. पॅपिलॉन पण आपल्याला आवडले खुप.. प्रत्येक माणासाच्यात दोन मने असतात, आपल्यात दोन्ही मने उत्तुंग टोकाची होती... मी आमच्या सर्व गृप बरोबर जेवायला जायचो, आणि नंतर अश्विनी बरोबर पण जेवायला जायचो.. माझे काम ? तीला मी नेहमी म्हणायचो, २ तासाचे काम मी ५ मिनिटात करतो अश्विनी , तुझ्या सारखे नाही एका कामाला दिवस घालवतो... हुशार तो नाही, जो एक काम खुप वेळ एकसारखे करतो, हुशार तोच की जो कमी वेळेत काम करतो :-)) ( ही घाण सवय मला अजुन आहे, ४ दिवसाचे काम असेल तर मी शेवटच्या २ दिवसात जागे होतो आणि मग करतो, ती तेंव्हा ही पहिल्या दिवसा पासुन कामाला लागायची... नंतर, मग मी तीला आमच्या गृपमध्ये यायला सांगितले, जेवनानंतर आमच्या सर्व मित्र आदर्श, भाग्यश्री आणी इतर यांच्या बरोबर फिरायला येत चल सांगितले.. एक दिवस ती आली.. नंतर दुसर्‍या दिवसा पासुन ती काम आहे म्हणाली.. मी तिला विचारले का ग तु येत नाहीस.. तर ती म्हणाली.. अरे तुम्ही किती स्टुप्पिड आहात, काय पण बोलता.. कसे पण.. मी नाही येणार .. एकदा मला जोशी मॅडम ( डायरेक्टर) यांनी बोलावुन घेतले.. मी श्री लिपी चा इन्स्टॉलर बनवत होतो.. त्याचे बोलल्या त्या, आणि हसत म्हणाल्या, गणेश फ्लोअर वर आवाज खुप येतो तुझा .. कमी कर आवाज.. मी परत आल्यावर, अश्विनीने विचारले का रे डायरेक्टर मॅडम ने का बोलावले होते ? तीला खुपच कुतुहल होते.. मी म्हणालो, अग मीना आपल्याला आवडते, तीला पण कळाले ते, त्यामुळे बोलवले होते बोलायला.. तीला नेहमी प्रमाणे डोक्यावरुन गेले, ती म्हणाली मीना कोण? मी म्हणालो अग मीना म्हणजे आपल्या मिसेस जोशी :-)) ती: स्टूप्पिड च्ये.. आमच्या फ्लोअर वर तेंव्हा एका मशिन वर साऊंड होते , आणि आमच्या आवडीची गाणी आम्ही तेथे लावु शकत होतो, तशी परवानगी होती. पण सर्व जन त्यांची फर्माईश सांगायचे त्यामुळे खुप घोळ व्हायचा.. मी खुप मध्ये मध्ये किशोर कुमार चे सॅड गाणी लावयचो.. अश्विनी ने एकदा विचारले का रे असले गाणे लावले ? मी म्हणालो आज मीना आली नाही ना.. आठवण येते.. ती : स्टुप्पिड च्ये.. नंतर एकदा आम्ही पंचमी ला गेलो होतो, लंच झाल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे बिला बरोबर बडीशेप दिली , अश्विनी ला ते इतके अप्रुप वाटले होते, की बडीसोप कशी काय दिली त्यांनी ? असा तीचा प्रश्न. अशी ती एकदम म्हणजे एकदमच 'ही' होती. एकदा २२ जून ला तीला बर्थडे होता म्हणुन लाल गुलाबांचा बुके, आमच्या कंपणीच्या पत्त्यावर आला, .. येताना ती इतकी लाजली होती.. ते गुलाबाचे लाल रंग तीच्या गालावर दिसत होते.. आम्हाला तशी अपेक्षा नव्हती, पण तरी मी विचारले काय गं कोणी दिलाय हा असला बुके ? कोण आहे सांग लवकर ? ती म्हणाली, अरे पल्ली ने दिलाय.. पल्लवी तीची सासवड ची मैत्रीण.. आम्ही चिडवले पण ती ठाम राहिली.. नंतरची गोष्ट.. तीच्या आयुश्यात खुप स्तिथ्यंतरे आली.. लग्न या गोष्टी मुळे..तेंव्हा मी तीचा माहेर बनलो होतो...घरचे कसलेच राजी नव्हते, आणि तीचे वय पण वाढत चालले होते..आम्ही पुन्हा 'पंचमी'त बसलो होतो, तीचे जेवणावर अजिबात लक्ष नव्हते, मी बळेच खाल्ले.. ती रडत होती.. आणि मी तीच्या बाजुने भक्कम उभा राहिलो.. तीच्या पळुन जावून लग्न करण्याला तीच्या बाजुचा मी एकमेव माणुस.. एकमेव साक्षीदार... सोमेश पण मला आवडला, खुप हुशार मुलगा.. मस्त चालु आहे त्यांचे.. आमच्या बायकोची माझ्या सर्व मैत्रीणींमध्ये अश्विनी आवडती मैत्रीण.. साधी आहे ना म्हणुन :-)) (अश्विनी नंतर भाग्यश्री आणि निलम आवडतात तीला.) मी अजुन ही तिचा माहेरचा माणुस म्हणुनच जातो.. सिया, खुशी चा मी 'गणु' मामा आहे :-)). अश्विनी आणि मी अजुनही, पुस्तकांंवर तासन तास बोलतो.. मुलांच्या गडबडीत तीला वेळ कमी असतो. मागे बोलताना ती म्हणत होती.. आपण पुन्हा भेटु ना पुस्तकांच्या येथे.. मी मुलांना सोमेश कडे ठेवून येते, एक दिवस फ्री पुन्हा.. मस्त वाटेल.. मी हो म्हणालो ... या वर्षी बोलताना गुलाबांचा विषय निघाला तेंव्हा ती म्हणाली, तेंव्हा मी तुम्हाला खोटे सांगितले होते की ती फुले पल्ली ने दिलेत म्हणुन... मी फक्त हसलो आणि मनात म्हणालो, अजुनही तु आम्हाला काय स्टुप्पिडच समज्ते आहे काय गं ? मी तीला आठवण करुन दिली, तेंव्हा तु सारखे 'केळकर म्युझीअम ला जावु बोलायचीस.. तुझी ओळख आहे, मी तेंव्हा म्हणायचो असले निर्जीव वस्तुंचे प्रदर्शन मला नाही आवडत.. पुण्यात असुन मी ते पाहिलेले नाही, पण आता माझे मत बदलेले आहे, आपण तिथे जावू, तु मला तुझ्या आवडीच्या गोष्टी दाखव.. मग आपण पुन्हा मेहता पब्लिकेशन हाउस ला जावु.. किंवा अत्रे ला.. बरीच पुस्तके घेवू... समाप्त नंतर किती ही कंपणी आल्या गेल्या.. कित्येक मित्र मैत्रीणी झाल्या पण ह्या मैत्रीला तोड नाहीच.. ही मैत्री अशीच आहे उत्कट.. भारी.. पुन्हा पुन्हा जगावीशी वाटणारी.. आणि मी खरेच भाग्यवान आहे....... LOVE YOU ALL ---- गणेशा. (३१/५/२०२०)

In reply to by गणेशा

वाचता वाचता तुझ्या ग्रूपचाचा भाग असल्यासारखे वाटले. खूप वर्षांनी प्रत्येक लहानसहान गोष्टींची उजळणी करताना ज्याम मजा येते. पाऊस सुरू झालाय त्या पार्श्वभूमीवर हे सगळं वाचताना मन नुसतं हेलकावे खात होतं भूतकाळातील आठवणींवर. तेव्हाची भिजलेली आठवण, आहे अजून ओली जरासे परतून, देऊन जा ऊब तुझ्या सोबतीची सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

तेव्हाची भिजलेली आठवण, आहे अजून ओली जरासे परतून, देऊन जा ऊब तुझ्या सोबतीची ___^___ धन्यवाद.. ओळी एकदम खऱ्या.. माझ्या मनातले भाव.. काल माझे सारे वाचून अश्विनी चा फोन आला.. तिने आपण पुन्हा पुस्तकांच्या दुकानात.जावू.. हॉटेल्स ला जावू.. मी काढील वेळ.. मी नेहमी प्रमाणे : तू काय ते लवकर ठरव.. आपण भेटू.. पण तू आणखिन काही वर्ष लावले तर मी तुझ्या सारख्या म्हाताऱ्या मुलीला घेऊन मुळीच फिरणार नाही.. ती :-)) :-)):-)) अवांतर - आज 10 वाजल्यापासून नविन प्रोजेक्ट वर काम सुरु... आता इकडे येणे कमी.. प्रयत्न करेल.. त्यामुळे लास्ट ला झोपताना 'बकुळी' हा प्रतिसाद दिला .. झोप आला तरी दिला.. कारण आज पासून अवघड होईल आता इकडे येणे.. आता शनिवार - रविवार जिंदाबाद ! पण आज पासून मिपा कमी होणार हे नक्की.. तुम्ही लिहित रहा.. मी वाचेल नंतर

गणेशा, तुमच्या आता पर्यंतच्या सर्व प्रतिसादामध्ये फुलपाखराचे रंग आणि हा अश्विनी चा भाग उत्कट झालाय. वाचतच बसावे असे लिखाण

सर्व मौक्तिकांचा छान आस्वाद घेत आहे. धन्यवाद !

वीजफुल घेऊन बाहेर मेघ कोसळतोय अक्षरशः, गंधाळलेल्या श्वासात मन बेधुंद झालंय माझं पाऊस माळला आहे मी माझ्या ओल्या केसात तू मात्र कोरडाच असशील., नेहमी सारखा पावसात असुनही अळवाच्या पानांसारखा - मोगरा

कोरडाच मी ग सखे, आहे फक्त तुझ्या साठी अंगाची ओल तुझ्या, हळू टिपून घेण्या साठी तुला भिजायची हौस, पण बाधतो पाउस, होता तुला जरा त्रास, मी होतो ग उदास, मन मुरडले सये, माझ्या साठी किती वेळा संधी क्वचित सापडे, अवचित अशी मला तू होता ओली चिंब, माझे भिजे अंग अंग तुझ्या हास्यात दिसती, इंद्रधनु सप्तरंग जशी ओढ सरितेला, अथांगशा सागराची माझ्या कोरड्या मनाला, ओढ तुझ्या ओलाव्याची पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मुंहतोड जवाब !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुंदर :)

शब्द भोई अरूपाचे शब्द दूत अमूर्ताचे शब्द धूसर सावली शब्द झळाळ बिजली शब्द हलाहल निळे शब्द सृजनाचे मळे शब्द व्योमापार शिडी शब्द गहनडोही बुडी शब्द आभासी रिंगण शब्दापार मुक्तांगण

@ मोगरा वीजफुलांचे घुंगरू घातलेला हा मेघ मी.. इंद्रधनु च्या सप्तरंगा आडची काळी रेघ मी.. तु माळले ज्या सरीला, तीचा शब्दमेघ मी.. . का बोलतोय मी माझे.. माझ्याशीच पुन्हा? . बोलायचे आहे तुझ्याशी मलाही खुप काही l पण आठवणींच्या वाफेवर पाऊस बनुन मी उगाच आता बरसत नाही... तुझं आभाळ पाऊस.. माझा डोळा ही पाऊस.. दाटलेला पाऊस मात्र.. तुला दिसत नाही.. सांग तू, गाशील का कधी, माझे शब्द.. माझी गाणी.. बघ मग येईल त्या आभाळाच्या डोळ्याला ही पाणी... पाणीच पाणी... . . ------- शब्दमेघ ( 3 जून 2020, 6:45 pm )

बोलायचे आहे तुझ्याशी मलाही खुप काही
( खाली लिहिलेले कल्पना विलास आहे :) ) @ शब्दमेघ ! ? तुझे ना असेच असते., माझे आभाळ पाऊस? , अन तुझे डोळे पाऊस? अन दाटलेला पाऊस मला दिसत नाही म्हणे.... तुला माहिती आहे., मला कविता कळत नाही. मी साधी सरळ, म्हणुन तर तुला आवडलेली ना? मग आता असले शब्द? वार करतात रे ते आरपार कसे कळेल मला तुझ्यात पाऊस दाटलाय? भावना म्हणजे पाऊस एव्हढंच कळतंय तुझे, अरे पण बरस ना एकदाचा., त्याला काय आमंत्रण देऊ का मी? तुला माहित आहे, मी तुझीच, मग यात पण काय गप्प राहायचे रे ? नाही बोलता आले तर मला जवळ घे., ओलीच हास जरासा., अन ओठांवर पेर माझ्या, रेशमी मखमल. - मोगरा

@ मोगरा (कल्पना विलास आज ढगात आहे ... :-)) ) ------------------------------------------------------------------------- आज आलोय मी ..पुन्हा नव्याने.. फक्त तुझ्यासाठी.. सारं मळभ दूर सोडलय बघ...क्षितिजापार... अन बरसतोय मनमुक्त मी , तुझाच..तुझ्यापाशी... आज पतंग होऊन आलोय मी.. मुक्तछंद, तुझ्याशी.. तुझ्यासारखा... . आज शब्द स्पर्श झालेत.. आणि फुटलेत धुमारे त्यांना.. अगणित... श्वासांच्या वेगाची लय मात्र अचानक बदलतेय.. कधी लय गवसत ही नाही.. या लयींची आवर्तणे कधी उंच जातायेत.. अगदी आकंठ... त्यावेळी तु आपली अंतरे मिटवून टाक..मंतरल्या सारखी... तुझ्या श्वासांचे येणे जाणे असेच राहुदे माझ्याआत.. मोगर्‍याच्या गंधासारखे . मग ओठांकडं वळल्यावर, तुझे नाजूक बोट का ठेवते माझ्या ओठांवर ? बोलतोय गं मी.. पण सांग, फक्त बोलुन थोडेच भागणार आहे ? ----- शब्दमेघ ( ४ जून २०२०, १५:४८ )

In reply to by गणेशा

कल्पना आणि विलास पैकी एकाला ते निसर्ग वादळाचे बटण बंद करायला सांगा. ;) आमच्याकडे चोविस तासाच्या वर लाईट घालवलीये त्याच्यापायी. कल्पना आणि विलासचा ढगात रंगलाय झिम्मा कल्पना गाते, आजा सनम विलास म्हणतो हम्मा हम्मा सं - दी - प

शेवटची गोष्ट.. --- खरे तर जेंव्हा काम असते तेंव्हाच नेमके खुप सारे विषय आठवतात.. काम नको म्हणत असते, पण मन पार कॉलेज कॅंटीन च्या चहा पासून, लहानपणीच्या पावसातल्या कागदी होडी पर्यंत हिंडून येते. मग मध्येच वाटते.. आपण तर कॉलेजला असे पर्यंत लिहित नव्हतो.. लिहित असतो तर तेंव्हा तिच्यावर..माझ्या प्रियेवर किती काव्य केली असती.. अमृता प्रीतम सारखी.. अमृता प्रीतम आठवली की मग इमरोज आठवतो.. आणि तीचा साहिर लुधियानवी आठवतच राहतो.. अमृता ची कहाणी काळजाचा ठाव घेत राहते तोच साहिर लुधियानवी ची गाणी विरहात हि दडलेल्या प्रेमाच्या अनेक कहाण्या बोलू लागतात.. 'मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है...' 'मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे, बज़्म- ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या माने..'' 'कल और आयेंगे नगमो की खिलती कलियाँ चुनने वाले, मुझसे बेहतर कहनेवाले...' 'तुम अगर साथ देने का वादा करो ...' 'मेरे दिल में आज क्या हैं, तू कहे तो मै बता दूं...' 'आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू ...' 'कभी कभी मेरे दिल में खयाल आता है ...' 'मन रे तू काहे ना धीर धरे, संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे...' 'ये दिल तुम बिन कही लगता नही अब क्या करे ...' 'तोरा मन दर्पण कह्लाये ...' 'नीले गगन के तले धरती का प्यार ....' 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया , फिक्र को धुयेंमें उडाता चला गया ...' हळू हळू मन त्यातून बाहेर येते... spark चा कोड पुन्हा आपोआप लिहिला जात असतो.. गपचूप.. लक्ष नसतेच तिकडे... मग पुन्हा वाटते.. आपण पण ना कुठे पण रमतो.. किती गोष्टी.. किती कहाण्या...? मग मी मलाच विचारतो.. पहिली गोष्ट कुठली लिहिली होती आपण? तेंव्हा असे असंख्य गोष्टी लिहू वाटले होते का? असे लिहिता लिहिता आपण किती लिहित जावु माहीत नाही. पण शेवटची गोष्ट नक्की कुठली असेल..? कदाचीत शेवटची गोष्ट कुठली हे मला शेवट पर्यंत कळणार नाही... शेवट कुठे असतो हे मनाला तरी कुठे माहीत असते.. ते पण म्हणूनच आधीच्या गोष्टीत जास्त रमते.. पण आधीच शेवटची गोष्ट कळणार नव्हती हे आपण कधी का लिहिले नाही.. कसले हे आयुष्य ना? शेवटची गोष्ट काय हे माहीत न होताच शेवट.होणारे.. --गणेशा ( 5 जून 2020, 11:59 pm)