अनर्थ

"सद्या ए सद्या! काय करसी?
खोलीत सदैव का रे अससी?
सदैव चिंता चेहऱ्यावरती
झुरतोस असा कशासाठी?
भूकतहान का विसरसी?
झोपेमध्ये सदा बोलसी
दिवसाही ना डोळे मिटसी
भाळी आठ्या कशासाठी?
सिनेमा नाही नाटक नाही
पुस्तकेही ना हाती धरसी
असा यंत्रावत का रे जगसी?"
निराश असा कशासाठी?
"आई, तुजला कसं समजवू?
'प्रतिभा' झाली उनाड कोती
पीडा माझी कशी दाखवू?
झुरतो मी गं 'एका' साठी
सद्या झोपला असे सांगुनी
डोक्यावरती चादर घेऊनी
माता खाली मटकन बसली
घाम पुसे ती पदर ओढुनी
जुळल्या होत्या चार पत्रिका
त्यातील एक आवडली होती
शिक्षण उत्तम पगार भक्कम
नाकीडोळी सुंदर होती
प्रतिभा ही पोर कोण म्हणावी?
सद्यास बहुधा पसंत असावी.
तरी अशी का वाट बदलावी?
मुलींऐवजी मुलं बघावी ?
"देवा, असा कसा रे बदला घेशी?
जिवंत असता का मारसी?
कुठली पापं अशी मोजिसी?
त्यांच्याआडून सद्या बदलसी?"
पिता येता बाजारातुनी
मिळे त्यांना बित्तंबातमी
दोघे रडती धाय मोकलुनी
नाही सुचेना युक्ती नामी
निद्रा त्यागे सद्या दचकुनी
वाटे त्याला गचकले कोणी
बाहेर येऊनी त्यांसी पुससी
"घडले काय, सांगा मजसी"
दोघेजणही झाले स्तंभित
तयां पाहुनी सद्या अचंबित
सुरूच त्यांचे रुदनाचे गीत
"ही कसली रे विचित्र प्रीत?"
पुन्हा प्रतिभेस विनवू आम्ही
घालू मागणी हात जोडुनी
ना मानेल तर शोधू दुसरी
आम्ही शोधू झकास नवरी
पण नकोच मुलगा झुरण्यासाठी
आले आमचे प्राणही कंठी"
सद्या गोंधळे कळेना काही
इकडेतिकडे चमकुनी पाही
"कोण प्रतिभा? मुलगा कुठला
झुरतो कोण हो मुलासाठी ?
संबंध कुठला कुठे लावता?
सावळागोंधळ कशासाठी?
संस्थळ असे 'मिसळपाव' हे
कविता स्पर्धा तेथेची आहे
प्रतिभेविना कविता फसली
प्रयत्ने मग मी अशीच रेटली
गुणांचे दान अधिक एकचे
काव्य शोधण्या प्रथम कवीचे
अजून भोपळा माझ्या नावी
लाज माझ्या मुखी न मावी
म्हणून झुरतो 'एकासाठी'
असे बोललो दुःखापोटी
सूतही नसता स्वर्ग गाठता
आई! काय गे काय समजता?
सुकले अश्रू गालांवरती
मायबाप ते नाजूक हसती
हात जोडुनी वरती बघती
भगवंताची कृपा मानती
सद्या बिचारा उदास होई
बाकी कविता वाचत राही
विसरू जाण्या रचना दुखरी
लिहू लागला कविता दुसरी

मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ हाहा, मस्त
बहोत खूब! मजा आ गया..! +१
+१
झकास.. +१
+१
+१
भारी कविता +1
+१
मस्त
मतदान पद्धत : सदस्यांनी
In reply to मस्त by आगाऊ म्हादया......
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.
+१.
हा..हा..हा
+१
स्पर्धेत टफ फाईट देणारी कविता
वाहवा. लाजवाब! अप्रतिम!!