योगक्षेमं वहाम्यहम्..खरा अर्थ.
योगक्षेमं वहाम्यहम्..खरा अर्थ.
काही दिवसापूर्वी मी भगवदगीतेमधील कर्मण्ये वाधिकारस्ते ..या दुसऱ्या अध्याया मधील श्लोकाबद्दल हा श्लोकाचा कसा विपर्यास होत गेला या बद्दल लिहिले होते. आता नवव्या अध्यायामधील एक श्लोकाचा विचार करू. हा सुद्धा एक विपर्यास झालेला श्लोक आहे.किवा आपण असे म्हणू शकतो कि अनेक लोकांनी आपल्या आळशीपणा किवा नाकर्तेपणा याचे समर्थन करण्यासाठी या श्लोकाचा आधार घेतला आहे.
१.० मूळ श्लोक आणि त्याचा अर्थ.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ९-२२ ॥
भावार्थ.
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. ॥ ९-२२ ॥
२.० वेगवेगळ्या अभ्यासकांचे या श्लोकावरील भाष्य .
२.१. शंकराचार्य .
या श्लोकाबद्दल शंकराचार्य काय भाष्य करतायत ते पाहू या.
जे भक्तगण मीच सर्वत्र या चराचरात आहे आणि मी आणि ते भक्तगण एकच आहेत अश्या भावनेने ..अद्वैतपणे ...माझी उपासना करतात त्यांना त्यांच्याकडे जे नाही ते मी त्यांना उपलब्ध करून देतो आणि जे त्यांच्याकडे आहे त्याचे मी रक्षण करतो .
या श्लोकावर भाष्य करताना शंकराचार्य योगक्षेम या शब्दाचे दोन भाग करतात. योग म्हणजे जे भक्ताकडे नाही ते उपलब्ध करून देणे आणि क्षेम म्हणजे जे भक्ताकडे आहे त्याचे संरक्षण करणे. त्यांच्या नंतरच्या भाष्यकारांनी हाच अर्थ मान्य केलेला आहे.
( संदर्भ . The Bhagwat gita with commentary of Sri Sankaracharya. English Translated by Mr. Alladi Mahadeva Shastri .Published by Samata Books Madras .originally published in 1897. )
२.२ ज्ञानेश्वर .
आता ज्ञानेश्वर माउली या श्लोकाबद्दल काय म्हणतात याचा विचार करू या.
अध्याय ९ .ओवी ३३५ ते ३४३ या मध्ये माऊली या श्लोकाचा विचार करतात. ज्या प्रमाणे गर्भातील गोळा कोणत्याही उद्योगाला जाणत नाही त्या प्रमाणे ज्यांना माझ्याशिवाय आणखी दुसरे काही चांगलेच दिसत नाही त्यांनी आपल्या जगण्याला माझेच नाव ठेविले आहे अश्या रीतीने एकनिष्ठ चित्ताने चिंतन करून जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. … ते पुढे असेही म्हणतात कि जे आपल्या पंचप्राणांची ओवाळणी करून माझी भक्ती करतात त्यांचे सर्वकाही मीच करतो. ...तसेच ...भक्त मनामध्ये जो जो भाव धरतात तो तो पुनः पुन्हा मी देऊ लागतो आणि मी त्यांना जे जे दिले त्याचे रक्षण तेही मीच करतो.
( संदर्भ. पान ४९८ ते ४९९. ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी . प्रकाशक अध्यात्म प्रबोधन संस्था. पुणे .प्रथम आवृत्ती १९८८. )
२.३ ओशो.
आता ओशो या श्लोकाबद्दल काय म्हणतात ते पाहूया ,
“तो कृष्ण कहते हैं, जो अनन्य भाव से मेरे में स्थित हुए भक्तजन मुझ परमेश्वर को निरंतर चिंतन करते हुए निष्काम भाव से उपासते हैं, उन नित्य एकीभाव से मुझ में स्थित पुरुषों का योग- क्षेम मैं स्वयं सम्हाल लेता हूं।”
यात ओशो तीन गोष्टी सांगतात.
१.० निष्काम भावनेने .
२.० माझी उपासना करतात.
३.० त्यांचे योग क्षेम मी सांभाळतो.
१.० निष्काम भावनेने जे माझी उपासना करतात ..अतिशय कठीण आहे. आपली उपासनाच एक वासना आहे . आपण परमेश्वराजवळ जातोच काही तरी मागण्यासाठी . कोणी आजारी आहे ,मला बरे करा ,कोणी मी बेकार आहे मला नोकरी द्या ,कोणी मला मूल नाही मला मूल द्या अश्या अनेक कारणांनी ..अनेक मागण्या घेऊन परमेश्वराकडे जातो. असे लोक उपासना करूच शकणार नाही कारण जिथे वासना आहे तिथे उपासना अशक्यच आहे.
( “निष्काम भाव से जो मुझे उपासते हैं। कठिन है बहुत। यही उपासना और वासना का भेद है। हमारी उपासना भी वासना ही है। हम परमात्मा के पास भी जाते हैं, तो परमात्मा के लिए नहीं, कारण कुछ और ही होता है। कोई बीमार है, इसलिए मंदिर में जाता है। कोई बेकार है, इसलिए मंदिर में जाता है। कोई निर्धन है, इसलिए मंदिर में जाता है। कोई निस्संतान है, इसलिए मंदिर में जाता है। जो किसी भी कारण से मंदिर में जाता है, वह मंदिर में पहुंच ही नहीं पाता है। शरीर भीतर प्रवेश कर जाएगा, मूर्ति सामने आ जाएगी, लेकिन उपासना संभव नहीं है। क्योंकि जहां वासना है, वहां उपासना संभव ही नहीं है।)
२.० उपासना म्हणजे काय ? परमेश्वराजवळ असणे. मी जेव्हा पैसे मागण्यासाठी परमेश्वराजवळ जातो तेव्हा मी पैश्याच्या जास्त जवळ असतो. आपण आपल्या मागणीच्या जास्त जवळ असतो ..ज्याच्या जवळ ती मागणी करतो तो लांब आसतो. परमेश्वर माझी मागणी मान्य करत नसेल तर मी ,कोणीतरी बाबा ..किवा महाराज गाठेन ..कारण मला माझी मागणी महत्वाची आहे . ज्याच्याजवळ ती मागणी मी करतो तो तर फक्त एक साधन आहे.
(“उपासना का अर्थ होता है, परमात्मा के पास होना। और जब मैं धन मांगने के लिए उसके पास जाता हूं तो मैं धन के पास होता हूं; उसके पास कैसे होऊंगा? मेरी मांग ही मेरी निकटता है। जो मैं चाहता हूं वही मेरे निकट है, और जिससे मैं चाहता हूं, वह तो केवल साधन है। अगर परमात्मा पूरा कर दे, तो ठीक है; अगर पूरा न करे, तो फिर मैं वहा नहीं जाऊंगा। कोई और पूरा कर दे, तो उसके पास जाऊंगा। जहां मेरी वासना पूरी होगी, वहां मैं जाऊंगा। परमात्मा कर सकता है, तो वहा भी तलाश कर लेता हूं! लेकिन परमात्मा मेरी इच्छा का हिस्सा नहीं है। मेरी इच्छा कोई और है।”)
३. मी योगक्षेम सांभाळतो म्हणजे काय ?
जे काही होईल ते माझ्यासाठी क्षेम आहे अशी भावना असणाऱ्या भक्तांचे. त्यांना काही संकटच येणार नाही ..दररोज सकाळी परमेश्वर चेक घेऊन त्याच्या दारात उभा असेल असे नक्कीच नाही . जे जे मिळेल ते ते भगवंताचा प्रसाद आहे ,मला तो स्वीकार्य आहे अश्या भावनेने परमेश्वराची उपासना करणाऱ्या भक्ताची मी काळजी घेतो.
आणि जो परमेश्वराची निष्काम उपासना करतो त्याला परमेश्वर प्राप्ती साठी काही ताप नको ,काही साधना नको. परमेश्वर त्याला सहजतेने उपलब्ध होतो.
(“योग- क्षेम मैं ही सम्हाल लेता हूं कृष्ण कहते हैं।
उतने भाव से, फिर जो भी हो, वही क्षेम है, ध्यान रखना आप! इसका यह मतलब नहीं है कि वैसे व्यक्ति को कभी मुसीबत न आएगी। इसका यह मतलब भी नहीं है कि उसे रोज सुबह चेक उसके हाथ में आ जाएगा! ऐसा कोई मतलब नहीं है। अगर इसे ठीक से समझेंगे, तो इसका मतलब यह है कि सुबह जो भी हाथ में आ जाएगा, वही उसका क्षेम है। जो भी उसे आ जाएगा हाथ में-भूख, तकलीफ, सुख, दुख-जो भी, वही परमात्मा के द्वारा दिया गया क्षेम है। वह उसे ही अपना क्षेम मानकर आगे चल पड़ेगा।
और योग और भी कठिन बात है। कृष्ण कहते हैं, वह भी मैं सम्हाल लेता हूं।
उसका मतलब? ऐसे उपासक को न साधना की जरूरत है, न साधन की जरूरत है; न तप की जरूरत है, न यश की जरूरत है, न किसी विधि की जरूरत है, न किसी व्यवस्था की जरूरत है। ऐसे व्यक्ति को परमात्मा से मिलने के लिए कुछ भी करने की जरूरत नहीं है। अगर निष्काम उपासना उसका भाव है, तो मैं उसे मिल ही जाता हूं। वह मिलने का काम मैं सम्हाल लेता हूं।”)
( संदर्भ . गीता दर्शन भाग ४ . अध्याय ९.. )
परमेश्वराची उपासना निष्काम भावनेने करणे हे आजकाल जवळ जवळ अशक्य आहे. .निष्काम भावनेने उपासना हे जे भगवान कृष्ण सांगत आहेत ही पूर्व पीठिका नसेल आणि तुम्ही जर अद्वैत भावनेने परमेश्वरा जवळ जात नसाल ..म्हणजे तुम्ही एकच आहात मग कोण कुणाकडे काय मागणार ? माझ्या मते अद्वैत भावनेत निष्काम भावना गृहीत आहे मग अर्थात अद्वैत आणि निष्काम भावना नसेल तर भगवान कृष्ण तुमचे योगक्षेम पाहणार नाही. ते तुमचे तुम्ही पहा.
ओशो पुढे म्हणतो “कृष्ण यह कहते हैं कि एक बार तू अपनी मांग छोड़, तो मैं सब सम्हालने को तैयार हूं। और जब तक तू मांग किए जाता है, तब तक मैं कुछ भी नहीं सम्हाल सकता हूं। न सम्हालने का कारण है। क्योंकि जब तक तू मांग किए जाता है, तब तक तू अपने को मुझसे ज्यादा समझदार समझे चला जाता है।”
अर्थात तुमच्या मागण्या सोडा ..तुमच्या वासना सोडा ..मी आणि तू हे नाहीच . अद्वैत ..मग मी योग क्षेम पाहायला तयार आहे.
जसे ज्ञानेश्वर म्हणतात कि जसा गर्भातील गोळा आईशी एकरूप असतो तेव्हा त्याला काही मागायचा प्रश्नच येत नाही. आई तिची काळजी घेते म्हणजेच आपल्या गर्भातील गोळ्याची घेते.
२.४ लोकमान्य टिळक.
लोकमान्य टिळक आपल्या गीतारहस्य या ग्रंथात थोडा वेगळा विचार मांडतात.
निष्काम भावनेने आणि अद्वैतपणे परमेश्वराची उपासना करणारा जो भक्त आहे तो अतिशय विरळा आहे . त्याला सिद्ध किवा स्थितप्रज्ञ असे म्हणता येईल . त्याला ब्रम्हज्ञानी किवा बुद्ध यांच्या भाषेत निर्वाण स्थितीत आलेला असेही म्हणता येईल. याचे योगक्षेम भगवान कृष्ण पाहतात असे वचन त्यांनी दिले आहे. परतू “ ज्ञानी पुरुषाने सर्व प्रापंचिक कर्मे निष्काम बुद्धिने करून सामान्य जनास सद्वर्तनाचा प्रत्यक्ष धडा घालून दिला पाहिजे “ असे लोकमान्य टिळकांचे मत आहे. म्हणजे त्याने सुद्धा कर्म टाकून उपयोग नाही .
पण सामान्य माणूस ..त्याने काय करायचे ? तर त्याने कर्मयोग पाळायचा . सिद्ध पुरुषांच्या ज्ञान योगापर्यंत पोचायचे आहे पण तो पर्यंत कर्मयोग आवश्यक आहे. आपल्या वाट्याला जे कर्म आले आहे ते अतिशय कुशलतेने आणि श्रद्धेने करायचे आहे .
या संदर्भात मी ऐकलेली एक गोष्ट मला आठवली. ती खरी आहे कि नाही मला कल्पना नाही पण त्यातील तत्व मात्र नक्कीच खरे आहे.
अर्जुन जेव्हा द्रौपदीच्या पणाप्रमाणे पाण्यात पाहून वर फिरणाऱ्या माश्याचा डोळा फोडायला सज्ज होतो तेव्हा कृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो. कृष्ण त्याला सांगतो ..तुझे पूर्ण लक्ष माश्याच्या डोळ्याकडे असू दे ..त्याचा फिरण्याचा वेग आणि तुझ्या बाणाचा वेग याचे गणित करून बाण सोड . अश्या अनेक सूचना त्याला देतो.
अर्जुन कृष्णाला म्हणतो ,
“ अरे तू माझा सखा ,माझा गुरु ..तू मला जे जे सांगतो आहेस हे सगळेच जर मी करायचे आहे तर तू काय करणार ?”
कृष्ण त्याला म्हणतो,” अरे अर्जुना जे तुला जमणार नाही ते मी करणार ! तू ज्या पाण्यात पाहून बाण सोडणार त्या पाण्यात लहरी उठणार नाहीत याची मी व्यवस्था करणार …”
३.० या श्लोकाचा मग नेमका अर्थ काय ?
माझ्या मते या श्लोकाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी या श्लोकातील “ निष्काम , अद्वैत आणि मी आणि माझी उपासना करतात “ या शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
३.१ मी स्वतः ..माझ्या भक्तांना योगक्षेम प्राप्त करून देतो .
या श्लोकातील “मी” हा फार महत्वाचा आहे. चराचरामध्ये मी भरून राहिलो आहे अश्या अनन्य भावनेने जे माझी उपासना करतात …
हा मी म्हणजे कृष्ण नाव असलेला ..सावळे रूप असलेला ..तो देह धारी कृष्ण ? गीता त्याच्या मुखातून बाहेर पडली पण तो फक्त त्या मागे असलेल्या निर्गुण रूपाचे सगुण रूप आहे.
मुण्डक उपनिषदा मध्ये एक प्रसिद्ध वाक्य आहे.
“ ब्रम्ह वेद ब्रम्ह एव भवती ..” (जो ब्राम्हविद्या जाणतो तो ब्रम्हमय होऊन जातो. )
परमेश्वराची उपासना करणे यात तीन पायऱ्या अपेक्षित आहेत.
जवळ जाणे ,तदाकार होणे आणि तन्मय होणे.
परमेश्वराशी तन्मय होणे म्हणजे तोच होणे, त्याच्यात विलीन होणे.
कृष्ण अर्जुनाला अतिशय गुह्य आणि काही योग्य व्यक्तींना ज्ञात असलेली राजविद्या या नवव्या अध्यायात सांगत आहेत. हीच ब्रम्ह विद्या आहे. कृष्ण योगेश्वर आहेत ,ते हि ब्रम्ह विद्या पूर्ण पणे जाणतात ..म्हणजेच या उपनिषदातील वाक्या प्रमाणे ते स्वतःच ब्रम्ह झाले आहेत. अद्वैत अवस्था त्यांनी साध्य केली आहे. जिथे फक्त एकच ब्रम्ह आहे. तिथे मी म्हणजे अहंकार युक्त मी शिल्लक उरत नाही . अश्या अवस्थेत जेव्हा कृष्ण मी म्हणतात तेव्हा ब्रम्ह त्यांच्या मुखातून बोलत असते.
कबीर यांचे एक प्रसिद्ध वचन आहे.
“ कहै कबीर मैं पूरा पाया सब घटी साहब दीठा”
तुम्ही चैतन्य स्वरूप झालात ..तुम्हाला सर्व मिळाले याची कसोटी काय ? कोणीही परमेश्स्वरूप झाला हे कसे ओळखायचे ? कबीर म्हणतात.
साहब दीठा ..मी नाहीसा झाला .सगळीकडे तोच भरून राहिला आहे असे ज्याची भावना निर्माण होते .
याचाच अगदी सरळ अर्थ असा आहे कि योगेश्वर कृष्ण जेव्हा म्हणतात कि मी त्यांचे योगक्षेम पाहीन तेव्हा इथे मी च्या जागी हे ब्रम्ह तुमचा योगक्षेम बघेल असा अर्थ घेतला पाहिजे.
३.२. माझी उपासना करतात.
गीतेतील हा ९.२२ श्लोक भगवान कृष्णाच्या तोंडी आहे. शंकराचार्यांच्या भाषेत “ जे भक्तगण मीच सर्वत्र या चराचरात आहे आणि मी आणि ते भक्तगण एकच आहेत अश्या भावनेने ..अद्वैतपणे ...माझी उपासना करतात त्यांना त्यांच्याकडे जे नाही ते मी त्यांना उपलब्ध करून देतो आणि जे त्यांच्याकडे आहे त्याचे मी रक्षण करतो .”
पुन्हा इथे या “मी” मुळे घोटाळा झाला आहे. माझे योगक्षेम परमेश्वराने पहावे म्हणून इथे श्रीकृष्ण या व्यक्तीची ..त्यांच्या नाम रुपाची उपासना सुरु झाली आहे. तो ज्या अव्यक्त ब्रम्हाचे व्यक्त स्वरूप आहे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे. आणि इथे तरी ओशो म्हणतो तशी उपासना कुठे आहे ? फक्त वासना आहे. मग ती वासना पुरी होत नाही म्हणून रडगाणे आहे .
३.३ निष्काम कर्म करा म्हणजे कामच करू नका असे नक्कीच नाही.
भगवान कृष्णच जर माझी सर्व काळजी घेणार असतील तर आपण कामच का करा ? असा एक युक्तिवाद आलस्यात रमणारे करत असतात. त्याला भगवान कृष्णाने गीतेत दोन तीन ठिकाणी उत्तर दिले आहे. .
३.३..१ नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः॥३-८॥
भावार्थ . तुझी जी निहित कर्मे आहेत ती तू करत रहा. कर्म करणे हे अकर्म या पेक्षा श्रेष्ठ आहे. तू जर काम केले नाहीस तर तुला तुझ्या शरीराचीसुद्धा काळजी घेता येणार नाही .
३.३.२ यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते॥३-७॥
भावार्थ . इंद्रिये मनाने आवरून अनासक्त बुद्धिने कर्म करणाऱ्याची योग्यता निश्चितच विशेष आहे.
या श्लोकात सुद्धा निष्काम बुद्धिने कर्म करण्याचे महत्व सांगितले आहे.
३.३ ३ . न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि॥३-२२॥
भावार्थ. या तिन्ही लोकात मला करण्यासारखे काहीच कर्तव्य मला उरलेले नाही. तसेच मिळवण्यासारखे मला काहीच राहिले नाही . तरी सुद्धा हे अर्जुना मी काम करतच आहे.
या श्लोकात तर भगवान श्रीकृष्ण स्वतःचेच उदाहरण देवून कर्म करण्याचे महत्व सांगतात.
४.० योगक्षेम वहाम्यहम .. श्लोकाचा नेमका अर्थ आणि निष्कर्ष.
४.१ माझ्या मते या श्लोकाचा नेमका अर्थ समजण्यासाठी चार प्रश्नांची उत्तरे आपण आत्तापर्यंत केलेल्या चर्चेतून यायला हवीत.
योगक्षेमं वहाम्यहम् हे वचन कुणी दिले आहे ? आणि ते कुणाला दिले आहे ? या वचनाचा अर्थ भगवान कृष्ण योगक्षेम पाहणार म्हणजे आम्ही काहीही करायचे नाही असे आहे का ? सध्या तुमचे योगक्षेम कोण पहात आहे ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान विवेचन
आभार.
आभार.
हा एक पूर्वापार चालत आलेला गैरसमज पण दूर करतो
सुंदर लेखन आणि गहन विचार.
आभारी आहे.
धन्यवाद
बेस्ट पॉलिसी
खरे आहे.
योगक्षेम...
वेगवेगळे प्रश्न
जनमानसात असलेले गैरसमज दूर व्हावे
काहीतरीच काय ?
मला काय म्हणायचंय ते तू समजू शकशील !
३) गीतेचा अभ्यास व चिंतन मनन
काय सांगता ?
हे मात्र बरीक खरंय
लेख आवडला. खूप अभ्यासकरून
मूळात गीतेतला कर्मयोग्य तथ्यहीन आहे