लॉकडाऊनः चौतिसावा दिवस
मार्च महिना म्हणजे आमच्या धावाधावीचा महिना. त्यात २२ तारखेपर्यंत बरीच धावाधाव केली आणि मग २३ ला लागला जनता कर्फ्यु. त्यानंतर लगेच लॉकडाऊन प्रकरण सुरु झाले आणि सगळीच कामे थांबली. दोन तीन दिवस जी कामे बाकी होती आणि ऑनलाईन करता येण्याजोगी कामे होती ती पार पाडली. मग काही दिवस वाचनाचा मनसोक्त आनंद घेतला पण मार्च संपतांना जो वैताग आला तो कशाने जाणार हा विचारच पडला होता.
तेव्हा मदतीला एक मित्र धावून आला. त्याला त्याच्या शेतावर अनेक प्रयोग करायचे होते आणि त्यालापण एका सोबतीची गरजच होती. मी त्यासाठी आनंदाने होकार दिला आणि सुरु झाला आमचा शेतीतील प्रयोगांचा प्रवास.
१ एप्रिल पासून आमचा हा उद्योग सुरु झालाय. त्यात सुरुवातीला शेतातील वाल, तूर हे काढायचे होते. वांगी, भोपळा, दुधी यांच्या वेलांना पाणी देणे ह रोजचाच उद्योग होता. त्यात पाणी हे जवळपास उपलब्ध नव्हते त्यामुळे ५ लिटरचे ४ जार २०० मीटर जाऊन खदानीतून पाणी भरून आणणे हा उद्योग जवळपास १० ते १५ दिवस करावा लागला.
पहिले दोन दिवस तर वाल आणि तूर काढण्यातच गेले. तरीही काढणी ही कशी कठीण आहे याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी आला. वाकून काम केल्याने कंबर दुखत होती. तर पाणी वाहून आणल्याने दोन्ही हात भयंकर दुखत होते. त्यामुळे पहिला आठवडा हा जरा अंगदुखीनेच गाजला. घरी बायकोने दोन शब्द सुनावले ते वेगळेच.
एखादी भाजी लावायची असल्यास कुंडीत लावणे किती सोपे असते पण तेच जेव्हा शेतात लावायची असते तेव्हा काय काय पूर्वतयारी करावी लागते हे शेतकर्यालाच माहित. भेंडी लावायला पूर्वतयारी म्हणून प्रथम सुकलेल्या भेंडीमधून बिया जमा केल्या. मग जिथे बिया लावायच्या तिथे जमिन साफसूफ करुन अर्धा मीटर अंतर ठेवून छोटे खड्डे घेतले आणि त्यात भेंडीच्या बिया मातीचे गोळे करून टाकल्या. चाळीस खड्ड्यांचे काम करायलाच जवळपास २ तास गेले. ५ दिवसांमध्ये भेंडीच्या रोपांनी दर्शन दिल्याने मेहनतीचे चीज झाल्याचे वाटले.
मग रोपे बनवल्यावर दोन वेळेस पाणी देणे ही महत्वाची गरज होती आणि त्यासाठी मग ५०० लिटरचा सिन्टेक्सचा टँक पैदा केला. त्यामुळे पाण्यासाठीची पायपीट वाचली.
पुढे मेथी आणि मुळा लावण्यासाठी वाफे तयार केले. ते करताना कुदळ चालवायचा शून्य अनुभव असल्याने पायावर कुदळ मारता मारता वाचलो. भरदुपारी उन्हात मुळ्याच्या बिया गोळा केल्या आणि संध्याकाळी भिजवून वाफ्यात फेकल्या. मेथीचे पण असेच केले. दोन दिवसांमध्ये मेथीची चिमुकली पाने बाहेर डोकावू लागली. काही दिवसांनी उन्हाचा तडाखा वाढला आणि मेथी तसेच मुळा कोमेजल्यासारखा झाला. त्यासाठी पुन्हा जुगाड म्हणून हिरवे कापड सावलीसाठी बांधले आणि नियमित पाणी देणे सुरु केले. त्यामुळे पुन्हा एकदा मेथी आणि मुळा उभा राहिला. आता १५ मे पर्यंत मेथी आणि मुळा खुडायला येण्याची अपेक्षा आहे.
जवळपास भंगाराचे गोडाऊन आहे तिथून एक प्लास्टीक व्हेस्सेल मिळाले आणि त्यात कंपोस्ट साठी शेतातील तसेच घरातील कचरा टाकला. कंपोस्ट झाले तर ठीक नाहीतर त्यातील कचरा शेतात टाकून रोटाव्हेटरने जमिनीत गाडून टाकायचा बेत आहे.
एका लहानशा प्लॉटवर गेल्यावर्षी मित्राने प्रायोगिक तत्वावर हळद लावली होती त्यातील काही हळद काढली. अजूनही हळद काढायची बाकीच आहे. जी हळद काढली ती उकडून किसून सुकवली आणि पावडर करून घरी वापरायलापण सुरूवात केली.
आता शेतावर खोपट बनवायची तयारी करतोय. ते बनले की मग एखादी रात्र तिकडेच काढायचा बेत आहे. बघूया पुढे काय काय होते ते...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाह..
अरे वाह...!
प्राडॉ, अजून खोपट बांधणी सुरु
शेतकरी राजा ला सलाम..
शेती बरेच काही शिकवत आहे.
शेती कुठे आहे?
शेती जवळच आहे. पनवेल मध्ये
आवडले प्रयोग.
वाह भारी !
पिंगू खूप दिवसांनी लिहिता
ती एक लंबी कहानी म्हणता येईल.
ती लंबी कहानी येथे अवश्य येऊ
झक्कास
+1 मस्त वेळ चाललाय तुमचा
सोबत मिळाली तर भारीच. तसेही
वाह रे पिंगू.. भारी प्रयोग
सध्या दुपारी काम बंदच ठेवतो.
अरे वा
खूप छान प्रयोग
घर ते शेत असे अंतर जवळपास
लेखन आवडले!
मस्त
दोन एकर मुख्य शेतीचे क्षेत्र
होय... खरंय