कोरोना आणि काळीज
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
तर त्याचं कसंय खंडेराव,
आमची नोकरी येते अत्यावश्यक सेवेमध्ये..
त्यामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही रोज अर्धा दिवस तरी ऑफिस असतंच..
पण दुःख त्याचं नाहीये,
तीन साडेतीनला घरी आल्यावर आधी आंघोळ करायची. त्यानंतरच भाकर मिळते गिळायला...
दुःख ह्याचंही नाहीये..
कोरोना स्पेशल म्हणून बायकोनी माझे दोन जोडी कपडे वेगळे काढून ठेवलेत. अंघोळ करताना स्वतःच्या हाताने धुवायचे. अन सकाळी इस्तरी करून घालायचे...
सकाळीच इस्तरी केलेलं शर्टपॅन्ट दुपारी धुताना काळजात कसं चर्रर्र चर्रर्र होत असतं ते तुम्हाला नाही कळणार खंडेराव!! तुम्हाला नाही कळणार!
अजून ऐका खंडेराव,
कोरोना गेल्यावर त्याच दोन जोडी कपड्याच्या बदल्यात बोहारणीकडून एक मोठं भगूनं घेण्याचा प्लॅन ठरलाय सासू-सुनेचा..
काळीज तिळ तिळ तुटतंय खंडेराव..
पण सांगायचं कोणाला..!
असो..कोरोना जाणार अन बोहारीण परत दाराशी येणार हा आशावाद काय कमी सुखावणारा आहे का!
चालायचंच!
#लॉकडाऊन
©चिनार जोशी
प्रतिक्रिया
आवडलं
खरंय....
अगदी सेम परिस्थिती.
एकच नंबर
धन्यवाद जेम्स भौ !!