नरभक्षकाच्या मागावर !

रश्मिन's picture
रश्मिन in भटकंती
23 Apr 2020 - 1:11 pm

केनेथ अँडरसन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दक्षिणेचा जिम कॉर्बेट ! लालित्यपूर्ण भाषेत जंगलाचं चित्र उभं करण्यात अतिशय वाकबगार असणाऱ्या केनेथ ची पुस्तके १९५० च्या दशकापासून पुढे खूप गाजली. जीवावर बेतू शकणाऱ्या साहसात आनंदाने उडी घेऊन नरभक्षकाचा खात्मा करणे हे या स्कॉटिश वीराचे आवडते काम ! निसर्गावर आणि प्राणिमात्रांवर अतोनात प्रेम करणाऱ्या केनेथ ने मजा म्हणून शिकार करण्याचे उदाहरण अगदी क्वचितच मिळेल. अशा या केनेथ अँडरसन च्या "जवळागिरीचा नरभक्षक" ह्या कथेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे :

भाग १
-----------------------------------------------------------------------------------
ज्यांनी ज्यांनी म्हणून जंगलांत, तेही विशेषतः विषुववृताजवळील प्रदेशात भटकंती केली आहे , त्यांना कोणालाच चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या टेकड्यांची नि दऱ्याखोऱ्यांची आणि त्यातच उजळपणे दिसणाऱ्या कुरणांची, विस्तीर्ण पसरलेल्या वृक्षांची विलॊभनीयता स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. या झाडांच्या पानांना छेदून चंद्रकिरणे खाली पोहोचू शकत नसल्याने अद्भुतरम्य अशा दाट सावल्यांचं राज्य जंगलभर पसरलेलं असतं आणि यामध्ये दडलेली असतात हिंस्त्र श्वापदं , सजग हरणं आणि अन्नाच्या शोधात असलेले इतर असंख्य प्राणीजन..

जवळागिरीच्या जंगलात वरवर सर्व आलबेल दिसत असलं तरीही मृत्यूशी गाठ पडेल अशा धोकादायक जागा पावलोपावली होत्या. चोरटी शिकार करणाऱ्याचं त्रिकुट हरणाचं मांस मिळवण्याच्या हेतूनं आपल्या २ जुनाट अशा ठासणीच्या बंदुकांसह दबा धरून बसलं होतं. तळ्याच्या दिशेने उतरत जाणाऱ्या काठावर त्यांनी अतिशय हुशारीने एक लपण बनवलं होतं आणि तिथे आपली तहान शमवायला येणाऱ्या हरणाच्या शिकारीसाठी ते सूर्यास्तापासून सावधपणे बसले होते.
काही तास सरले, पौर्णिमेचा चंद्र मध्यावर आला होता आणि त्याचा अगदी लख्ख प्रकाश पडला होता. अचानक त्यांच्या डावीकडे असणाऱ्या हिरव्यागार झुडुपांच्या झाडोऱ्यातून पाचोळा खसफसण्याचा आणि पाठोपाठ डुरकण्याचा आवाज आला. रानडुक्कर .. निश्चितपणे ! स्वादिष्ट जेवण आणि उरलेलं मांस विकून येणारे पैसे क्षणभर त्यांच्या डोळ्यांसमोर चमकले. शिकाऱ्यांनी कानोसा घेतला पण ते जनावर काही उघड्यावर आलं नाही.. वाट पाहून पाहून संयम सुटत चाललेल्या टोळीच्या म्होरक्याने तसाच वेध घेण्याचा धोका पत्करला. आपली बंदूक उंचावून, आजूबाजूला पसरलेल्या काळोखातूनही उठून दिसणाऱ्या त्या सावलीच्या हालचालींचा अंदाज घेऊन त्या दिशेने त्याने बार टाकला. रागाने गुरगुरत , डरकाळी फोडून आसपासच्या झुडपांना संतापाने ओरबाडत घशातून " व्हुफ व्हुफ" असे आवाज काढत जंगलाच्या दिशेने त्याने धाव घेतली आणि शांतता पसरली.

डुक्कर नव्हे तर वाघ !! प्रचंड भेदरलेल्या त्या त्रिकुटाने कसाबसा त्यांचा गाव गाठला आणि उरलीसुरली रात्र त्यांच्या करणीचा काय परिणाम होईल हा विचार करत घालवली. पण सकाळी त्यांना जरा हायसं वाटलं कारण ऐन यौवनात असलेला ढाण्या नर वाघ जंगलात मरून पडला होता. अंधारात चालवलेल्या त्या जुनाट बंदुकीने थेट वाघाच्या हृदयाचा वेध घेतला होता. मग काय, मुनिअप्पा आणि त्याचे मित्र गावाचे नायक ठरले होते आणि त्यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र त्यापुढील रात्री एक वेगळीच कथा आकाराला येत होती. जसाच सूर्य अस्ताला गेला, तास वाघिणीचा तिच्या मृत जोडीदाराचा शोध घेणारा संतापी गुरगुराट चालू झाला . तो वाघांच्या मीलनाचा हंगाम होता आणि केवळ एका रात्रीपूर्वीच ती वाघीण तिचा जोडीदार यशस्वी झाली होती. पण त्या नराच्या अनाकलनीय रित्या गायब होण्याने त्रस्त झालेल्या वाघिणीने ह्या गोष्टीचा संबंध अचूकपणे मनुष्याच्या हालचालींशी लावला होता.
आठवडाभर रात्रीमागून रात्री वाघिणीच्या अस्वस्थ हालचाली सुरु होत्या. दिवस दाट जंगलातून ते रात्री अगदी गावाच्या वेशीपर्यंत तिच्या गुरगुरण्याचे आणि डरकाळ्यांचे आवाज पोहोचत होते.

जॅक लिओनार्ड नावाचा तरुण वाघाची शिकार मिळवायला उत्सुक होता. त्याला गावकऱ्यांनी तातडीने सांगावा धाडला आणि पुढच्या दिवशी सकाळी तो तिथे पोहोचला आणि त्याने परिस्थितीची पाहणी केली. वाघिणीचा मुक्त संचार असल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर आणि वनविभागाच्या विश्रामगृहाच्या एकाकी रस्त्यावर वाघिणीच्या पावलांचे ठसे दिसल्यावर त्याने त्याच संध्याकाळी त्याचे नशीब अजमावण्याचे ठरवले. ५ वाजेच्या सुमाराला एका वारुळाचा आडोसा घेऊन तो त्या वाटेवर उभा राहिला. काही मिनिटे गेली आणि सव्वासहाला सगळीकडे सांजावलं. अचानक पानांच्या सळसळीचा हलकासा आवाज आला आणि एक चुकार खडा घरंगळून त्याच्या उजवीकडे पडला. लिओनार्डने डोळे ताणून वाघीण कुठे दृष्टीस पडते का ते पाहिलं , पण कशाचाही मागमूस नव्हता. आणखी काही मिनिटे गेली आणि मग जलद वेगाने त्याच्याच बाजूने रस्त्याच्या कडेने येणारी वाघीण त्याच्या नजरेस पडली. घाईने रायफल चा दस्ता डाव्या खांद्यावर ठेवून आणि झुडुपातून शक्य तितके बाहेर झुकून वाघीण जास्तीत जास्त नजरेच्या टप्प्यात येईल अशा प्रकाराने लिओनार्डने वाघिणीच्या छातीचा वेध घेतला. जराही उजवीकडे गोळी लागली असती तर तो निश्चितच प्राणघातक असा नेम ठरू शकला असता. हाय ! असे न घडता , लिओनार्डची ची गोळी वाघिणीच्या उजव्या खांद्यामध्ये खोल रुतून बसली आणि प्रचंड डरकाळी फोडून वाघीण जंगलात नाहीशी झाली. अतिशय खट्टू होऊन लिओनार्ड माग काढण्यासाठी सकाळ होण्याची वाट पाहत बसला. माग काढत असता, खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झालेला त्याला दिसला. कठीण खडकाळ प्रदेश , घनदाट झाडीने पसरलेल्या दऱ्या , त्यातच रानबाभळीसारख्या काटेरी झुडपांच्या प्रादुर्भावामुळे त्याला त्याच्या शिकारीचा माग काढण्यात अपयश आले.

काही महिने सरले आणि जवळागिरीपासून ७ मैल अंतरावर असणाऱ्या आणि दाट जंगलात वसलेल्या सुळेकुंटा नावाच्या गावात एक घटना घडली. ह्या गावात असणाऱ्या एका देवस्थानाला जवळच्या गावातील भक्तगण दर्शनाला यायचे. असंच एक पुरुष, त्याची बायको आणि १६ वर्षांचा मुलगा पूजा आटोपून परत आपल्या घरी निघाले होते. मंदिरापासून केवळ पाव मैल अंतरावर असणाऱ्या चिंचेच्या झाडाखालून निघाले असता तो मुलगा अर्धकच्च्या आणि आंबट अशा चिंचा गोळा करायला तिथे जरा रेंगाळला. तेवढ्यात त्याच्या माता-पित्यानी हलकी गुरगुर ऐकली आणि त्यापाठोपाठ मुलाची भेदून जाणारी आर्त किंकाळी ऐकू आली. पाठीमागे वळून पाहताच त्यांना वाघाने जबड्यात धरलेला त्यांचा मुलगा दिसला. तेवढ्यात वाघ त्या एकुटवाण्या रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या झऱ्यात उडी मारून दिसेनासा झाला. त्या वृद्ध जोडप्याने हिंमतीने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, हिंस्त्र प्राण्याला जोरजोरात शिव्याशाप देऊन आरडाओरडा केला, मात्र उत्तरादाखल त्यांना फक्त त्यांच्या एकुलत्या एका लेकाचे शेवटचे कण्हणे दोनदा ऐकू आले आणि पुन्हा एकवार सन्नाटा पसरला.

त्यानंतर भल्या मोठ्या प्रदेशातून एका मागोमाग एक बळींच्या बातम्या येऊ लागल्या. अति उत्तरेकडे असणाऱ्या जवळागिरी पासून ते सुमारे ३० मैल दक्षिणेकडे असलेल्या गुंडलम च्या गोठयांपर्यंत; ते म्हैसूर राज्याच्या सीमेपासून आत २० मैल पश्चिमेकडून ते देकनीकोट्याच्या हमरस्त्यापर्यंत अशा जवळजवळ ४५ मैलांच्या प्रदेशात १५ बळी गेले. ह्या सैतानी जनावराला बळी पडलेल्यात तीन मुलीही होत्या आणि त्यापैकी एकीचे तर नुकतेच लग्न झाले होते. तेव्हा मला माझ्या मित्राने, जो त्यावेळेस होसूर प्रांताचा उपजिल्हाधिकारी होता, त्याने ह्या सैतानाचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीचे बोलावणे पाठवले.
उपजिल्हाधिकाऱ्याने सांगितल्यानुसार जिथे ह्या सर्व त्रासाची सुरुवात झाली त्या जवळगिरीला पोहोचून मी सर्व माहितीची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. त्यातून असे निष्पन्न झाले कि हे नरभक्षक जनावर वाघ नसून वाघीण आहे आणि चोरट्या शिकाऱ्यांनी तिच्या जोडीदाराला मारून तिच्यापासून हिरावले आहे. त्यातच कहर म्हणून लिओनार्डने धैर्याने मारलेल्या परंतु अपयशी ठरलेल्या बंदुकीच्या गोळीमुळे वाघीण जखमी झालेली आहे.

ताजे ठसे दिसण्याच्या आशेने मी जवळागिरीहून दरमजल करत सुळेकुंटाच्या दिशेने निघालो पण माझे दुर्दैव माझ्या आड आले. अशामध्ये नवीन बळींची नोंद त्या ठिकाणी झाली नव्हती आणि तिथे चरणाऱ्या कळपांमुळे तेथील पाऊलखुणाही पुसट झाल्या होत्या. नरभक्षकाच्या छायेतील प्रदेशाच्या दक्षिण बाजूस तेवीस मैलांवर असणाऱ्या गुंडलम येथे मी माझा तळ ठोकण्याचे ठरवले. कारण गायी-गुरांच्या या प्रदेशात सर्वाधिक बळींची नोंद झाली होती आणि गेल्या चार महिन्यात सात गुराख्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.
माझ्या उपजिल्हाधिकारी मित्राने अगदी विचारपूर्वक तीन धष्टपुष्ट रेडकू मला देऊ केले. मी त्यांना शिकार साधण्याच्या दृष्टीने मोक्याच्या असणाऱ्या जागांवर आमिष म्हणून बांधण्यासाठी घेऊन गेलो. पहिल्याला मी गुंडलमला खेटून वाहणाऱ्या मैलभर अंतरावरच्या नदीजवळ बांधले. सिगेहळ्ळी नावाच्या या ठिकाणी नदीला अजून एक उपनदी येऊन मिळत होती आणि हा वाघिणीचा तिचा नेहमीचा फेरीमार्ग (बीट) असल्याची नोंद होती, मात्र वर्षाच्या या हंगामात नदीतून अगदी थोडे पाणी वाहत होते.
दुसऱ्याला मी ४ मैल लांब शेजारच्या गावाकडे , अनशेट्टी कडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधले आणि उरलेल्या तिसऱ्या रेडकूला मी गुरं आणि गुराख्यांचा पाण्याचा दैनंदिन स्रोत असणाऱ्या पाणलोटाशी बांधले. अशाप्रकारे तिन्ही आमिषांची व्यवस्था लावून पुढचे दोन दिवस मी माझ्या .४०५ विंचेस्टर रायफलीला हातात घेऊन जंगलाच्या प्रत्येक दिशेने पायपीट केली. मला आशा होती की मला ताजे ठसे पाहायला मिळतील किंवा प्रत्यक्ष नरभक्षक तरी !

विंचेस्टर

क्रमशः

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2020 - 1:18 pm | चौथा कोनाडा

सुंदर अनुवाद !
कथा वाचताना थरार अनुभवला !
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

रश्मिन's picture

24 Apr 2020 - 1:10 am | रश्मिन

लिहिताना मलाही थरार जाणवत होता :)

Nitin Palkar's picture

23 Apr 2020 - 2:06 pm | Nitin Palkar

सुंदर अनुवाद ! पुढील भाग लवकर येऊ दे.

रश्मिन's picture

24 Apr 2020 - 1:12 am | रश्मिन

पुढचा भाग लवकरच टाकतो

खूप सुंदर अनुवाद! हा अनुवाद आहे असं वाटत नाहीए इतक्या सहज उतरलंय!
पुढचे भाग लवकर लवकर येऊ देत. :)

रश्मिन's picture

24 Apr 2020 - 1:13 am | रश्मिन

हो, लवकरच पुढचा भाग टाकतो.

मोदक's picture

23 Apr 2020 - 5:07 pm | मोदक

सुंदर अनुवाद...

भरपूर फोटो टाकणे.. शेवटचा फोटो दिसत नाहीये.

जवळागिरीचा नरभक्षक - हेच नांव या लेखमालिकेला देता येईल का..? तू इतक्या लिखाणावर नक्कीच थांबणार नाहीस त्यामुळे पुढच्या लेखमालिकांची तयारी आत्तापासूनच करूया.. ;)

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2020 - 5:21 pm | चौथा कोनाडा

+१

अगदी उत्तम सुचवणी मोदक !

रश्मिन's picture

24 Apr 2020 - 1:18 am | रश्मिन

लेखनाचा हुरूप वाढला ! मालिका तयार करता येईल का हे संपादकांना विचारतो.. केनेथच्या शब्दांमधून इतके सुंदर चित्र उभे राहते की तशी चित्रे शोधायला बरीच मेहनत करावी लागणारे ! शेवटचा फोटो डकवायला मदत लागेल असं दिसतंय, विंचेस्टर रायफलीचा फोटो टाकलाय.

हरिहर's picture

23 Apr 2020 - 10:05 pm | हरिहर

छान लिहिले आहे. शैली साधी सोपी असल्याने वाचायला मजा आली.
पुढचा भाग लवकर येवू द्या.

रश्मिन's picture

24 Apr 2020 - 1:21 am | रश्मिन

ओघवती शैली मूळ लेखकाची माझी केवळ शब्दांची मांडणी. त्यामुळे हे श्रेय त्याचे :)

हे खास आवडले. लिहिते रहा दादानु!

कॉपीराइटमुक्त झाले केनेथचे लेखन?
( १९४७ मध्ये तो इथली घरं विकून इंग्लडला गेला.)
केनेथ हा अधिक आवडतो कार्बेटपेक्षा. सगळ्या चुकांसह लिहितो आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्धही चीड व्यक्त केली.

रश्मिन's picture

24 Apr 2020 - 11:59 am | रश्मिन

नाही, हि कथा पहिल्या प्रकाशकाच्या आर्काइव्हस मध्ये होती. भारतातल्या पुस्तक छपाईचे हक्क फार पूर्वीच रूपा पब्लिकेशनने घेतलेत.
केनेथ ची पाळंमुळं ४-५ पिढ्यांपासून घट्ट पणे हिंदुस्तानात रोवल्या गेली होती आणि तो कन्नड, तमिळ आणि उर्दू भाषा अस्खलित बोलू शकायचा. १९७४ साली त्याच्या बंगलोर मुक्कामी कालवश झाला.

रूपा पब्लिकेशन्सकडे राईट्स आहेत तर त्यांची परवानगी लागेल ना?
अन्यथा १९७४ + ६० =२०३४ मध्ये लेखकाचे राईट संपतील.

खात्री करा.

राघव's picture

24 Apr 2020 - 9:56 am | राघव

खूप सुंदर लेखन. चित्रदर्शी! पुभाप्र. :-)

केनेथ अँडरसन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दक्षिणेचा जिम कॉर्बेट !
शिर्षक वाचुन हेच नाव मनात आले ! पुढच्या भागाची वाट पाहतो...

अवांतर :- मध्यंतरी एका बाईकवर वाघाने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता त्याचा व्हिडियो खुप व्हायरल झाला होता, तो इथे देत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kya Yahi Pyar Hai (The Unwind Mix) by Meiyang Chang & Shashaa Tirupati

जेम्स वांड's picture

24 Apr 2020 - 11:37 am | जेम्स वांड

दक्षिण भारतीय जंगलांवर निरतिशय प्रेम केलेला माणूस, कित्येक लोक त्याची आणि जिम कॉर्बेटची तुलना करतात, जिमच्या लेखनात arrogance असल्याचेही सुचवतात, पण फ्रँकली मला असे व्यक्तिशः जाणवलं नाही, पण शेवटी to one his own, मला दोघांच्या कथा बेफाम आवडतात, तुमचं लेखन वाचताना तर एकदम जंगलात असल्याचा फील आला, ती दक्षिण भारतीय सदाहरित जंगले, जंगली वनस्पतीचा आसमंतात भरून असलेला उग्र पण हवाहवासा वास सगळं एकदम जाणवलं.

पुभालटा रश्मीनजी.

रश्मिन's picture

24 Apr 2020 - 12:05 pm | रश्मिन

अगदी माझ्या मनातलं बोललात वांड साहेब ! खरेतर जिम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसन ची तुलना म्हणजे लतादिदी आणि आशाताई ह्यांच्यात तुलना केल्यासारखं आहे. पुलंनी एका ठिकाणी म्हणल्याप्रमाणे "लता आपला हात हातात घेऊन सुरांच्या जादुई स्वप्नातल्या दुनियेत घेऊन जाते तर आशा तेच बोट धरून परत आपल्या बैठकीत आणून सोडते".. दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ होते आणि राहतील.
खूप आभारी आहे प्रतिसादाबद्दल !

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

24 Apr 2020 - 8:21 pm | सौ मृदुला धनंजय...

खूपच छान.

अनिंद्य's picture

25 Apr 2020 - 11:13 am | अनिंद्य

झकास !

रश्मिन's picture

25 Apr 2020 - 7:21 pm | रश्मिन

सर्वांचे खूप खूप आभार !
@मदनबाण , हो तो व्हायरल झाला होता व्हिडिओ, थरथराट एकदम !

स्पार्टाकस यांच्या लेखांची आठवण झाली
खरं तर अश्या लेखांमुळेच मिसळ पाव वाचायला आवडते.
मस्त जमलाय असेच लिहीत जा , पुढील लिखाणासाठी खूप शुभेच्छा.
http://misalpav.com/node/27625
http://misalpav.com/node/27638
http://misalpav.com/node/27633
http://misalpav.com/node/27655