नमस्कार मिपाकरहो,
सर्वप्रथम मला हा मिपावरील पहिलाच लेख लिहिण्याची संधी दिल्याबद्दल प्रशांतजी यांचे आभार. लॉकडाऊनला आता एक महिना उलटला आहे आणि आपण सारे याला बऱ्यापैकी सरावलो आहोत. सुरक्षा व्यवस्थेवरचा ताण वाढला आहे. डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ अहोरात्र झटताहेत. अर्थव्यवस्थेचं आणखी नुकसान टाळण्यासाठी शासनाने २० एप्रिलपासून काही उद्योगांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. मध्येच पालघर सारख्या दुर्घटना माणसाच्या असंवेदनशीलतेची जाणीव करून देत आहेत. कष्टकरी, नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, लहान मुले साऱ्यांचीच कसोटी पाहणारा हा काळ आहे. मध्ये एका live मध्ये मुख्यमंत्री म्हणाले त्याप्रमाणे काही न करता, बाहेरही न पडता घरी बसून राहणे यासारखी दुसरी शिक्षा नाही. पण तरीही आपण सर्वजण हे अरिष्ट एकदाचं कधीतरी टळेल या आशेने हे सारं सहन करतो आहोत.
निसर्ग आणि मानव यांच्यातला समतोल आणि सामंजस्य ढासळल्याचा हा ढळढळीत पुरावा आहे आणि अजूनही माणसाने आपला हव्यास आणि ओरबडण्याची वृत्ती सोडली नाही तर याहून गंभीर परिणाम नजीकच्या भविष्यात होण्याची शक्यता आहे. असो.
आता थोडं नोकरीबद्दल - एक राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला आहे आणि 'अत्यावश्यक सेवा' म्हणून बँकेचे काम सुरू आहे. आधी जरा संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण होते, परंतू आता कर्मचाऱ्यांचे समूह करून प्रत्येक समूह २ दिवसांआड आणि मर्यादित वेळ असे शाखेचे स्वरूप निश्चित केले आहे. शाखेत महिलावर्ग जास्त असून प्रत्येकाच्या घरी ३ वर्षांखालील मूल आणि त्याला सांभाळण्यासाठी ज्येष्ठ अशी स्थिती आहे, त्यामुळे प्रत्येकजण अक्षरशः जीव मुठीत घेऊन कामाला येतो आहे कारण स्वतःपेक्षा आपल्यामुळे घरातल्या कोणाला संसर्ग झाला तर काय याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. त्यात भरीस भर श्री मोदी साहेबांनी कोरोना बद्दल मदत म्हणून जन धन खात्यात रू. पाचशे जमा केले आहेत( सध्या फक्त स्त्रियांच्या खात्यात). तेव्हापासून आमच्याकडे लोक लॉकडाऊन चे कुठलेही नियम न पाळता, दुरदूरहून येऊन शाखेत गर्दी करून त्यांचा आणि आमचाही जीव धोक्यात घालत आहेत. ही मंडळी खरंतर खातं काढल्यापासून निद्रिस्त होती! दरम्यान आमच्या शाखेतील एका महिला अधिकाऱ्याच्या सोसायटी मध्ये जी बँकेपासून काही मीटर अंतरावरच आहे, तेथे एक कोरोनाबधित कुटुंब सापडले अजूनही २ केसेस सापडल्या, तेव्हापासून शाखेचा पूर्ण परिसर सील केला असून बँक मात्र चालू आहे.
आता थोडंसं घराबद्दल- घरी मी, यजमान, २ वर्षांचा मुलगा आणि २ महिन्यांसाठी आलेले परंतू लॉकडाऊनमुळे अडकलेले आईवडील आहेत. सगळ्यांचा मूड छान राहावा म्हणून वेगवेगळे खेळ खेळतो, गप्पांच्या मैफिली रंगतात, पत्त्यांचे डाव पडतात, गाण्यांच्या भेंड्या होतात, होमडिलिव्हरी देतो म्हणून जवळच्या एका दुकानदाराने दिलेला कॅरम दोनच दिवसांत डुगूडुगू हलायला लागला ! एरव्ही दुर्लभ असलेल्या सुट्टीचा आनंद घेतो आहोत. मुलासोबत मूल होऊन खेळणं हा उत्तम स्ट्रेसबस्टर आहे. U- tube वर छान गेम्स आहेत या वयातल्या मुलांसोबत घरी खेळण्यासाठी ते खेळलो. जात्याच स्वयंपाकाची आवड असल्यामुळे सगळ्यांच्या फर्माईश पूर्ण करताना खूप आनंद होतो. एरव्ही कधीही बनवल्या नसत्या अश्या खूप वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करून झाल्या. एक मात्र झालं, की कामवाल्यांशिवाय पण आपण घर आणि ऑफिस सांभाळू शकतो हा कॉन्फिडन्स आला ! अर्थात मिस्टरांची खूप मोलाची मदत मिळते. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन च्या पहिल्या आठवड्यात सगळ्या सोसायटीने मिळून आठ दिवस आपापल्या घरीच फुडपॅकेट्स तयार केले आणि काही पुरुष मंडळींनी त्याचे गरजूंना वाटप केले. तो अनुभव प्रसन्न करणारा होता, देण्यात खूप मजा असते. सकाळी आम्ही सगळे सोबत सूर्यनमस्कार घालतो, मजा येते. मुलाला घेऊन बागकाम, घरची आवराआवर केली त्यालाही आवडलं. लहान मुलांना आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त समज असते, त्याला एकदाच सांगितलं की बाहेर बाऊ आहे त्यामुळे तुला बाहेर खेळायला नेता येणार नाही, तर अजूनही त्याने परत कधी हट्ट केला नाही. बऱ्याच वर्षांनी मनासारखी वाळवणं घातली. मुख्य म्हणजे साठीच्या वडीलांपासून दोन वर्षांच्या मुलापर्यंत स्वतः होऊन कामाची वाटणी झाली, जो तो त्याच्याजोगं काम करतो धम्माल येते. अशाप्रकारे आहे त्या परिस्थितीत आनंद शोधणं एकीकडे सुरू असलं तरी पुढे काय होईल याची धाकधूक होतेच मनात…. खूप वर्षांनी एक कविता स्फुरली आणि लगेच कागदावर उतरवली जे खूप कमी वेळा जमलंय, सुचतं खूप पण लिहिलं जात नाही. त्या कवितेनेच लेखाचा समारोप करते..
इवल्याश्या सुक्ष्माचा अवघ्या विश्वाला विळखा
देव कुलूपात बंद, मनुष्य झाला पोरका ।।
अंधःकार वाटेवरी वाटे जणू दाटला
मी पणाचा गर्वाचा मागमूस न उरला ।।
तमाच्या या वाटेवर आता पडू दे प्रकाश
थिजलेल्या मनांना दे मोकळे आकाश ।।
उघड तुझी कवाडे, साऱ्यांस दे हिम्मत
गृहीत धरलेल्या श्वासांची आता कळली किंमत।।
वाचने
12849
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा... खूप सुंदर लेख!
समर्पक लिहिलंय !
मस्त लेख
इतरांनी धडा घ्यावा असं आहे
वाह !
बेस.
आपल्या प्रतिक्रियांबद्दल
Apratim
छान लिहिलंय.
@mipapremiyogesh https:/
छान आहेत सान्वीजी या तिन्ही
In reply to @mipapremiyogesh https:/ by सान्वी
बघता बघता एक महिना होऊनही
छान लिहिलंय.
In reply to बघता बघता एक महिना होऊनही by गवि
छान लेख आणि कविता
कविता छान आहे.
डिजिटाईझशन (EFTPOS)
हाहा
In reply to डिजिटाईझशन (EFTPOS) by चौकस२१२
हे दोन वेगळे मुद्दे झाले सर.
डेबिट कार्ड
In reply to हे दोन वेगळे मुद्दे झाले सर. by सान्वी
सान्वी जी भारी लिहिले आहे..
धन्यवाद गणेशा जी, खरंतर
अजून लिहा तुम्ही..
In reply to धन्यवाद गणेशा जी, खरंतर by सान्वी
+१
In reply to अजून लिहा तुम्ही.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बँकेतल्या कामकाजावर नंतर कधी
छान लेख!