भाग (खरा) ७ प्रतापगडावरची उलटवलेली बाजी...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
27 Mar 2020 - 1:07 am
गाभा: 

1

1

भाग (खरा) ७ प्रतापगडावरची उलटवलेली बाजी...पळापळ_आणि_भराऱ्या

भाग ७

अनपेक्षित परिणाम आणि पळापळ

महाराजांनी अफजलखानाला कसे मारले?
याची बातमी कळायला वेळ लागला. ठरवल्याप्रमाणे शिंगे फुंकली गेली. पण नंतर तोफांचे बार निघायला लागले तेंव्हा आपल्या १५शे निवडकांनी प्रतापगडावर चाल करून वर जाऊन तोफा वाजवल्या का सिवाने आपल्या सैन्याला इशारा देऊन आपल्या सैन्यावर तुटून पडायला त्यांचे आधीच ठरलेले होते वगैरे प्रश्नांची उत्तरे संभ्रमित होती.
अफ़झलखानाच्या पश्चात वरिष्ठ म्हणून मुसाखानावर जबाबदारी पडली. एकानी बातमी आणली की अफ़झलखानाची हत्या करून त्याचे मुंडके तोडले आहे. ते ऐकून चकित झालेल्या मूसाखानाने परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्याकडील सरदारांना निरोप दिला की शक्यतो जावळीच्या कोटाकडे मागे फिरा. त्याने प्रतापराव मोरेला पकडून समोर उभे केले आणि परिस्थितीची अगतिकता, क्रोध येऊन तो अद्वातद्वा झाला. 'तू याला जबाबदार आहेस' म्हणून लाथाडले.
१५शे हशमांपैकी काही थोडे जखमी होऊन परतले तेंव्हा त्यांनी सांगितले की सिवाच्या लोकांनी आमच्यावर अचानक हल्ला केला. आम्ही चिंचोळ्या रस्त्यात अडकून पडलो. काही झाडावर चढून बसले त्यात मी होतो. …
सिवा गडावर पळून गेला आहे. त्याला गडावर धरून आणता येईल का यावर खल झाला. ते शक्य नाही. आत्ता जीव वाचवणे गरजेचे आहे असे सर्वानुमते ठरले. फाजल खानाला शोधून आणले. तो भयंकर चिडला होता. त्याचे आणखी दोन भाऊ बेपत्ता होते. दोन तासानंतर ४च्या सुमाराला तातडीने जावळीतून परत वाईला जायचा निर्णय झाला. अंधार पडायच्या आत निसणीचा जंगलातील चढ चढायचे ठरले. होता होता त्यांचा जत्था वाढत होता. घोडेसवारी काही अंतर करून कोयनेच्या उगमापाशीच्या पात्रातुन वर चढताना एकेकांना दम लागला. अंधारातून चाचपडत जाणे शक्य होईल असे वाटले होते पण जंगली श्वापदे जखमांच्या रक्ताचा वास लागून धावून येतील म्हणून सर्वानी एकत्र असलेले चांगले असे ठरले. १० नोव्हेंबरची रात्र तिथेच गेली. पहाटे म.श्वरचे पठार चढताना लागले वेण्ण्यानदीचे पात्र ओलांडून जाताना मराठ्यांनी आपल्याला कसे बनवले याची बोच त्यांना होती.

1

मूसाखान आणि बरोबरचे सरदार निसणी घाटातून वाटाड्यांच्या मदतीने वाईला परतले

पहाटे उठून म.श्वरवर पठार पार करून मुसाखान आणि अन्य सरदार आपापली शस्त्रे गोळा करून ताय घाटाच्या उताराला पळत सुटली. तायघाट उतरताना त्यांना दुपारचे १२ वाजून गेले. चिखली गावात त्यांना त्यांच्या तळावरील घोडे मिळाल्यावर वाईच्या तळावर ते आले. तिथे घडलेल्या प्रकाराची भीषण बातमी ऐकून लोकांचा विश्वास बसेना. खानाला कोण कसे मारू शकतो यावर त्यांचे डोके चालेना. आपापल्या सामानानसकट इथून ताबडतोब निघा. आल्या वाटेने जायला लागा. रहिमतपुरानंतर वडूज, मायणी करून जत वरून विजापुरला जाता येते असे त्यातल्या लोकांचा विचार पडला. ते ऐकून लोक हाती येईल ते सामान गुंडाळून निघाले. हत्ती, उंट, मोठ्या जनावरांना दूरवर सोडून द्यायचे ठरले. बैलांवर, घोड्याच्या पाठीवर पडशातून जमेल तसे माल कोंबुन व्यापारी कनाती गुंडाळू लागले. त्यांचे नुकसान अपरिमित झाले होते. खानाबरोबर जाणे म्हणजे फायदाच फायदा असे समीकरण होते. रात्रीपर्यंत बनवलेले खाणे बांधून घेऊन तांडा पुंजक्यानी पाचवडकडे निघाला. मुसाखान आणि त्यांच्याबरोबरचे महत्वाचे सरदार हसन खान, याकूत खान, अंकुश खान, आधीच घोड्यावरून निघून गेले होते. वाटेत सामिल झालेले सैनिक आपापल्या सोईच्या रस्त्यांनी पसार झाले.
वाईचा तळावर अनेक मोठी जनावरे, टाकुन दिलेली बोजड शस्त्रे, कनातीतून रचलेली धान्याची पोती, भटारखान्यातील जळती लाकडे यातून तळ भकास दिसत होता.

पाचवडला पोहोचेपर्यंत रात्र झाली. पहाटे उठून तो जत्था रहिमतपुरकडे निघाला. तिथे १२ ची रात्र काढली. नवे घोडे मिळवले. रोज सकाळी उठून पुढे जात राहिला. औंध घाटाच्या वाटेने पुसेसावळी नंतर विट्याच्या परिसरात १३ तारखेला मुक्काम पडला. १४ ची रात्र जतमधे काढून घोडे बदली झाले. १५ तारखेला रात्री सरदारांचा जत्था पुढेमागे होत तिकोट्याला आला. १६ तारखेला दुपार पर्यंत विजापुरचे उंच घुमट दूर पाहून आपण भयंकर संकटातून वाचलो, आता बडी साहेबा बेगमसमोर काय सांगावे याचा विचार बेचैन करत होता. १६ तारीख जो तो आपापल्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी, १७ नोव्हेंबर तारखेला त्यांची पेशगी दरबारात झाली. काय घडले ते समजून घेतले गेले. अवाक झालेल्या विजापुरात सन्नाटा होता. ३-४ दिवसांच्या खलबतानंतर आता काय करायला हवे यावर चर्चा होऊन सिवाला तातडीने विजापुरला यायला प्रतिबंध करायचा हुकूम दिला गेला. सिवापेक्षा नेतोजी चालून येण्याची शक्यता वर्तवली गेली.

मोहिमेत सामिल नसलेल्या सरदारांना त्याचे सैनिक एकत्र करून भेटायला कळवले गेले. तोवर जत्थ्या-जत्थ्याने सैनिकांची परतीची रीघ लागली. त्यांच्याकडून कळले की तळ खाली होता होता नेतोजी आपल्या घोडळासह आला होता. सरदार आधीच पळून गेले ऐकून त्याने सिवाच्या वाईत येण्याची वाट पाहिली. मग ते दोघे आपल्या सैन्याची वाटणी करून निघाले. आपल्या पैकी नाईक पांढरे, नाईक खराडे, नाईक कल्याणजी जाधव यांनी सिद्दी हिलालला पुढे घालून रदबदली करून अभय मिळवले आणि ते सिवाच्या सेनेला मिळाले. आम्हाला निशस्त्र पाहून सोडून दिले म्हणून आम्ही वाचलो.

खानाच्या हत्येला १ महिना उलटून गेला होता. सैन्याची भरती करून, काहींना विजापुरात बोलावून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात विजापुरकरांनी सिवाच्या विरुद्ध नवी मोहीम सुरु केली. रुस्तुम इ जहानची वरिष्ठता आणि अनुभव लक्षात घेऊन नेता निवडले गेले. अफ़झलखानाचा मुलगा फाजल खान जखमा भरून आल्यावर लढायला उत्सुक होता. त्याने आपल्या बापाच्या हत्येचा बदला घ्यायला मनोमन पण केला होता.

प्रतापगडावर

१० नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी भेटीला गेलेले महाराज तासाभराच्या भेटीनंतर तातडीने प्रतापगडावर सुखरूप आलेले पाहून आत्यंतिक आनंद पसरला.. तोफांच्या डागण्या सुरु झाल्या. त्यानंतर हलकल्लोळाच्या आरोळ्या, हरहर महादेवच्या रणगर्जनांनी जंगलातील आसमंत दणाणून जाताना वर गडावर ऐकायला येत होते. महाराजांना कपाळाला किरकोळ जखम झाली होती. गोपिनाथपंत गडावर पोहोचल्यावर त्यांच्यावर अक्षतांनी ओवाळले गेले. दुपार कलल्यावर अंधार व्हायच्या आत अनेक वीर सरदार आपापल्या कडील बातम्या घेऊन आले. खानाचे १४०० - १५०० लपवलेले निवडक सैन्याला परत जाता आले नाही. पारच्या जंगलातील वाटा रोखण्यात अनेकांना मारले गेले. अंधाराचा फायदा घेऊन काही पळाले. काहींनी झाडावर चढून स्वतःस लपवले. वगैरे युद्धाचे अहवाल येत राहिले. आपल्यातील कामी आलेल्यांची गिनती केली गेली. नक्की आकडेवारी करणे शक्य नव्हते. त्याच रात्री महाराजांनी आपल्या मंत्र्यांना बोलावून पंत गोपिनाथांचा आणि महाराजांबरोबर गेलेल्या वीरांचा उचित सन्मान करायचे नियोजन केले गेले. १ लाख भरतील अशा होनांच्या थैल्या तयार करून ठेवल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी उजाडताच पंतांच्या कार्याला उचित गौरवपूर्ण सन्मान म्हणून मानाचे दागिने, वस्त्रे, १ लाख होनांच्या थैल्या, अर्पण केल्या गेल्या. अनेक वीरांच्या अतुलनीय साहसाचे गौरव त्यांना रोख पैसे, कंठे, कलाकुसर केलेली शस्त्रे देऊन केला गेला तर काहींना मानाचे दागिने, गळ्यात मोत्याच्या माळा व वस्त्रे देऊन त्यांच्या पराक्रमाचा उचित सत्कार केला गेला. चटपटीत नोकर वर्गाला जावळीखोऱ्यातील खानाच्या सैन्याने टाकून दिलेल्या सामानाची विल्हेवाट लावायला नेमले.
महाराजांनी एकत्र बसून सल्ला मसलत केली. त्यात ठरले की अफ़झलखानाच्या हत्येनंतर त्यांच्या कडील मुलुखाची अखत्यारी आपल्याकडे वळवायची अपूर्व संधी आलेली आहे. ज्या सरदारांना, जहागिरदारांना अफ़झलखानाच्या जिंकण्याची खात्री वाटून त्याला आपली सेना, जनावरे अन्य मनुष्यबळ दिले आहे त्यांचे मन वळवून, धाकाने, त्यांच्या भागातील गडावर आपले किल्लेदार नेमून सध्याच्या आपल्या राज्याच्या सीमा विस्तारित करायची ही संधी आहे. सर्व गडांवर फारच कमी मनुष्यबळ हजर असल्याने फारसा प्रतिकार होणारही नाही. मात्र जर कुठे गडाकडून प्रतिकार व्हायला लागला तर त्या ठिकाणी वेळ न घालवता पुढे सरकत राहणे.
पुर्वीच्या बैठकीत ठरवल्याप्रमाणे नेतोजीनी आपले घोडदळ घेऊन प्रतापगडावरील भेटीतुन काय बरे वाईट घडेल याची पर्वा न करता वाईतील खानाच्या तळावर धुमाकूळ घालायचा होता. त्यांनी तिथे पोहोचल्यावर युद्धात कामाला येणारी हवी ती जनावरे, पैसा-अडका, धान्याची रसद, वगैरेवर मुकादम लावून बाकीच्यांना हाकलून द्यायचे होते. आपल्यातील घोडदळाने माझ्याबरोबर येऊन वाईतील परिस्थितीचा आढावा घेऊन विजापुरच्या वाटेने कुठवर जायचे ते ठरवायचे, तोवर आपल्यातील दुसऱ्या तुकड्यांनी वाई ते कोल्हापूर पट्ट्यातील प्रत्येक गडांवर आपल्याकडून प्रतिनिधी पाठवून समेटाने ते गड आपल्या अंमलाखाली आणायला मोहिमा काढायच्या.
आपल्यापैकी दोरोजीनी कोकणातील सरदार चौल, दाभोळ बंदरावर जाऊन तेथील आरमारातील मुगलसत्तेशी ईमानदार सरदारांना धाकाने, मारून टाकून आपले डोलकर, मच्छिमार तांडेल, गुराबांचे मालक, विलायती वखारीतील लोकांना जरब बसवून कल्याण बंदर पासून खालचे सर्व सागरतटाचे अधिकार आपल्याला मिळवायची कामगिरीवर जायचे आदेश दिले.

नव्याने आत्मविश्वास आलेल्या महाराजांच्या समावेत अनेक शिलेदारांना, आपल्या तलवारीच्या पात्यांना, साहसी मोहिमेत जायची संधी मिळणार होती. कालच्या धुमश्चक्रीत सामिल असलेल्या सरदारांनी आपापल्या कडील कामी आलेल्यांच्या, जखमींच्या नातलगांना कळवायची व्यवस्था केली. अंबर खान, रणदुल्लाखान, घाटगे सरदार, खानाचे दोन मुलगे वगैरे कैदींना ओलीस ठेवले गेले.

११ तारखेलाच गौरव समारंभ झाल्यावर महाराजांच्या व निवडक सरदारांसाठी प्रतापगडावरील पागेतील घोडे बाहेर निघाले. खानासाठी नव्याने तयार केलेल्या रडतोंडी घाटातून वाटाड्यांसमावेत म’श्वर पठाराची वाट चढायला सुरवात झाली. पठारावर बाबाजी भोसल्यांनी त्यांना वेण्णा नदी काठच्या जंगलात भेटायची शक्यता होती. त्यांच्याकडील घोडदळ मिळून २ हजारांची भरती होत महाराज ताय घाटातून चिखलीला उतरले. तिथून मेणावलीच्या काठाने वाईच्या कृष्णेचा तीर पकडला.

1

खानाच्या तळापाशी किती सैन्य उरलेले असावे? तिथे लढाई करायला लागेल अशा तयारीने महाराजांनी आपले सैन्याला पुढे पाठवले व ते वाईच्या अलिकडे सुरक्षित ठिकाणी रात्री राहिले. १२ ता.ला दिवसा तळाची धूळधाण झालेली पाहिली. उरलेल्या सामानसुमानाची विल्हेवाट लावायला काहींना कामाला लावले गेले. नेतोजींचा घोडदळाच्या खुरांनी उडवलेली माती-धूळ लांबून दिसली. ते पाहून नेतोजीकडून काय घडले याची वाट पाहिली गेली. खानाचे सरदार ११ ता.ला रातोरात त्यांच्या येण्या आधीच पसार झाले होते. म्हणून त्यांच्या मागावर नेतोजींना जायला सांगितले गेले. पाचवड वरून रहिमतपुर, वडूज, मायणी, विटे, जत वरून ते गेले असावेत असा अंदाज केला गेला. महाराजांनी त्यांच्या मागे जाताना वाटेतील गडावरील किल्लेदार आपल्याकडून करायला आज्ञा केली. वाईतून परतणाऱ्या मराठा सैनिकांच्या जत्थ्यातील कोणी आपल्यात सामिल करता आले तर जरूर करावे. महाराज वंदन-चंदन गड, अजिंक्यातारा सातारा, परळी भागातून वसंत गडावरून, कराड, तांबवे, मसूर, नेर्ले, कामेरी, उरणला येऊन थांबले. नेतोजीनी खटाव, मायणी, कलेढोण अशा आडवाटेतील खानाच्या महत्वाच्या जहागिरींच्या सरदारांना खंडणी घेऊन आपल्यात सामिल केले. कडेपूर, कुंडल, पलूस, कोळे, बहे बोरगांव वरून नेतोजी वाळव्याच्या आसपास १७ ता.ला नोव्हेंबरला आले. शिराळा मुकाश्यात सैन्य घुसवले. महाराज आष्टे, वडगाव करत कोल्हापूरच्या वेशीवर आले. पन्हाळ्याला वेढा घालून २८ नोव्हेंबरला महाराज गडावर राहायला गेले. गडाची रचना पहात तिथले भव्य वाडे, बागा, मोठे तलाव, शेती करण्यालायक भरपूर मोकळी भूमी, यांची शोभा पाहिली. तटा-तटांवरून दूरचा परिसर न्याहाळून भविष्यात या गडाचा अनेक अंगानी वापर करायला कसा जाऊ शकतो असे मनात ठसले.

कोल्हापूर परिसरातील लढाई

कोल्हापूर गाव बाजूला ठेवून, शिरोलीकडून यांनी पन्हाळगडावर जायच्या एकुलत्या मार्गावरील वळचणीची जागा महाराजांनी हेरली होती. दूरदर्शी सेनानायकांचे वैशिष्ट्य असते की ते जेथे जात येत असतात तिथल्या नद्यांच्या पात्रांची ठेवण, त्याच्या आसपासच्या परिसरातील डोंगर-दऱ्या, गावे, गडांची रचना यांचा आवाका त्यांच्या नजरेत ठसतो. तीव्र स्मरणशक्ती त्यांना उपजतच असते. त्यामुळे जे स्थळ, वेळ-काळाचे नियोजन इतरांना सुचत नाही, ते पटकन ठरवून कार्यात रूपांतर करतात.

1

विजापुरातील सैन्य गोळा होऊन कोल्हापुरच्या दिशेने निघाल्याच्या बातम्या लक्षात घेऊन महाराजांनी आपले सैन्य २० डिसेंबर पासून कोल्हापुरच्या मैदानी (* गूगल नकाशाच्या सहाय्याने आकलन करून सध्याच्या शिये गावाच्या टेकडी) भागात आणले. आपल्या सोईने शत्रूला लढायला कसे भाग पाडता येईल यावर विचार करून शत्रू पंचगंगा पार करून आला की एका टप्प्यावर घोळक्यात येणाऱ्या फौजेला अचानक गाठून दोन्ही बाजूंनी मारा करून गारद करायची चाल आखली. एका उंच टेकडीवरून निरीक्षण करून हरावल सेनेच्या रचनेत कोण कुठे असेल याचा त्यांनी दूर दिसणार्‍या हत्ती, उंटांच्या पाठीवरील पताका, झेंडे, झुली यांच्या रंगाचा, आकारांचा विचार करून कोणी कोणावर हल्ला करायचा हे ही ठरले. नेतोजीनी फाजलखानावर, जाधव सरदार याह्या खानावर, सिद्धोजी पवार सादात खानावर, गोदाजी जगताप घाटगे, घोरपडे या आदिलशाही सरदारांवर हल्ला करतील. आपल्या बाजूने लढणारे पुर्वी अफझलखानाकडून लढलेले खराडे, पांढरे, उजव्या दस्त्यावर आणि सिद्धी हिलाल, जाधवराव हरावलच्या डाव्या दस्त्यावर चालून जातील. महाराज मध्यात असलेल्या रुस्तुम ई जमानवर जोखीम हल्ला करायला सज्ज राहतील.

1

एका बाजूला डोंगर, एका बाजूला पंचगंगा नदीचे पात्र, यामध्ये कमीत कमी जागेत कचाट्यात पकडायला सोईच्या डोंगरावर महाराजांचे सैन्य लपून राहिले. मलमूत्र विसर्जन करायची गरज आधीच्या रात्रीच्या आहारावर नियंत्रण करून पाळली गेली. महाराजांच्या जनावरांच्या चारापाण्याची सोय करून त्यांचे सैन्य सकाळी खानाचे सैन्य लोटा घेऊन 'परेड' चालू असताना एकदम लपलेल्या उंच टेकड्यावरून धावून आले. उसळलेल्या धुळीला पाहून खानाच्या सरदारांना आपल्यावर हल्ला येत आहे असे लक्षात आले. त्यांनी शक्य तितक्या सेनेला शस्त्र सज्ज व्हायला पुकारा करून सांगितले. रोट खाणे थांबवून, हत्तीवर स्वार होऊन रुस्तुम इ जमान तयार व्हायला वेळ लागला. तरीही पुर्वापार लढाईचा सराव असल्याने हरावल दस्ते बाणाचे भाते भरून गनीम आपल्या तिरंदाजीच्या आवाक्यात यायची संधी पहात राहिले.

पन्हाळ्याला जायच्या आधीच ही झोंबाझोंबी वाटेत अचानक उपटल्याची बाब खानाच्या सैन्याला हज़म होईना. ते धाडसी होते, शूर वीर होते. घोड्यावर बसून लक्षवेधी बाणांनी शत्रूला लोळवण्यात पटाईत होते. भाले घेऊन समोरच्या घोडेस्वाराला खाली पाडून त्याच्या छातीत शस्त्र निर्दयीपणे खुपसायला लागणारी बेडर वृत्ती होती. तोफखाना चालवायची सज्जता, भरपूर दारुगोळा होता. प्रचंड संख्येने मनुष्यबळ होते. आदिलशाहीतील पैसा पाण्यासारखा वापराची मुभा होती. पठडीतील युद्धतंत्र, बोजड युद्धसाहित्य, कल्पक नाविन्यपूर्ण सैन्य रचना करायची अक्षमता, सरदारांचे आपापसातील मतभेद, हेवेदावे, यातून कोण केंव्हा टोपी फिरवून शत्रूला मिळेल याचा भरवसा नसणे वगैरेंनी जर्जर सेनेचे मनोबल मरायला तयार करण्यात सेनापतीला शक्य होत नसे. त्यामुळे जीव धोक्यात घालून लढत राहायची मानसिकता संपून जायला वेळ लागत नाही. तेच घडले. हत्तीवर तयार होऊन यायला लागलेल्या उशीरामुळे, सरदारांनी आपापल्या शिपायांनी समरांगणात जाऊन कामगिरी करायच्या आधीच काही दस्ते पळून जायची तयारी करायला लागले. अफझलखानाचा मुलगा फाजलखानासाठी हा हल्ला सिवाला मारून बदला घेण्यासाठी मिळालेली संधी होती. मोठ्या आवाजात तो सिवाला ललकारून समोर यायला पुकारत राहिला. 'पळपुट्या, लपून छपून वार करू नकोस, अंगात दम असेल तर समोरून लढ’! पण महाराजांनी त्यांच्या वल्गनेकडे दुर्लक्ष केले. हत्तीवरून येणाऱ्या रुस्तुम इ जमानवर हल्ला करून त्याला हुसकावून लावण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. जेव्हा तो माघार घेऊन निघेल तेंव्हा लढाई निर्णयकपणे आपल्याकडून जिंकून घेतली जाईल. त्यानंतर आदिलशाहीतून पुन्हा मोहीम अंगावर यायला महिने लोटतील.
तासादोनतासात पळापळीला सुरवात झाली. रुस्तुम इ जमानचा हत्ती पाठ फिरवून मागे हटला. फाजलखान आपल्या सैन्यास उत्साहाने लढा म्हणत राहिला. नंतर बाकीचे सरदार मागे हटलेले पाहून त्यालाही रणांगणात पाठ करून परतावे लागले.
या गदारोळात, बऱ्याच शिपायांचे मुडदे पडले. सिद्दी हिलाल, खराडे, नाईक वगैरेंनी पराक्रम केला. रुस्तुम इ जमान विजापुरकडे परत निघाला. पण विचारांती आपल्या मुकाशातील हुक्केरीत विसावला. अनेक सरदारांना आपल्या पाठलागावर येणाऱ्या महाराजांच्या सैन्यापासून वाचवायला मिरजेच्या किल्ल्यावर सुरक्षित वाटले. काहींना निपाणी, चिकोडी रस्त्यावरून जायला सुरक्षित वाटले. नेतोजी पालकरनी पळून लपलेल्यांच्या ३६ गावागावात, किल्लात जाऊन त्यांना ताब्यात घेऊन खंडणी वसूल करायची मोहीम उघडली.
एक दस्ता खेळणा गड सर करायला गेला. तो सर झाला. दाभोळ ते राजापूर, जैतापूरच्या खाड्यातील आदिलशाही गलबते ताब्यात आली. महाराजांनी पन्हाळ्याला जास्त सुरक्षित करण्यासाठी काही सुधारणा केल्या. रस्ते, दरवाजे यावर नव्याने देवड्या तयार करून दक्षता वाढवली. ४ ते ५ हजार शिपायांच्या रोजची भोजन व्यवस्था, जनावरांच्या वैरणीची, पिण्याच्या व वापरायच्या पाण्याचे तलावांची व्यवस्था सुधारली. मेटांवर, चौक्यावर आपले शिपाई लावले. मिरजेच्या कोटाला मिळवायला दिरंगाई होताना पाहून आपल्याकडून सैन्य पाठवून पाहिले.
नाईक, खराडे आपल्या भागात परतले. गडावर आधीपासून असलेल्या सरदारांची नावे, पराक्रम, सशस्त्र तत्पर शिपायांच्या कलापूर्ण कवायती सायंकालीन मनोरंजनाने भरून गेल्या. बाजी प्रभूंच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला.

सांगता

सेना नायक आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा वैयक्तिक पातळीवर अद्वितीय साहस करून दाखवतो तेंव्हा त्याच्या कुठल्याही कार्याला झळाळी प्राप्त होते. युक्तीच्या गोष्टी सांगणे वेगळे आणि त्या प्रत्यक्षात अमलात आणणे हे सर्वस्वी वेगळा प्रकार आहे. महानायक अडचणी, धोके, विपरीत परिस्थितीत धीराने उत्तर शोधतात. अंमलबजावणी करतात… कधी कधी बाजी उलटतेही...

मानव जातीला भेडसावणाऱ्या वैश्विक समस्येवर झुंज चालू असताना महानायकांच्या कसोटीचा हा काळ आहे….

जो जीता वही सिकंदर म्हणतात!

समाप्त

काही अन्य माहिती - नकाशे

कोल्हापुर , मिरज, हुक्केरी, जत, विजापूरच्या प्रदेशाचे आकलन करून देणारा नकाशा आपापल्या भागातील काही गावे शोधता आली तर पहावी म्हणून सादर...

1

1

वंदन गड
1
शिवप्रतापाचे चिंतन
1

प्रतिक्रिया

Vidyadhar1974's picture

27 Mar 2020 - 4:37 pm | Vidyadhar1974

खूप छान लेखन.

विजुभाऊ's picture

27 Mar 2020 - 7:54 pm | विजुभाऊ

खूपच छान लिहीलेय. एकदम डोळ्यासमोर उभे राहिले

योगविवेक's picture

27 Mar 2020 - 11:14 pm | योगविवेक

वाईचा तळावर अनेक मोठी जनावरे, टाकुन दिलेली बोजड शस्त्रे, कनातीतून रचलेली धान्याची पोती, भटारखान्यातील जळती लाकडे यातून तळ भकास दिसत होता.

विजूभाऊ म्हणतात ते खरे...
जळत्या लाकडांतून ती घटना नुकतीच घडली होती. हे ठसले. पळापळ किती घाईघाईत झाली असावी, खायची प्यायची व्यवस्था करणे शक्‍य नाही हे जाणून हत्ती, उंट जनावरे तिथे त्यांच्या दावणी सोडून देऊन मोकळे करून दिले होते वगैरे घटनांतून मिलिटरी इव्हॅक्युएशन कसे करायचे असते यावर प्रकाश टाकला गेला आहे. असे वाटते.

युद्ध कथनांचे आपल्या सिद्धहस्त लेखणीतून या सात लेखानंतर काय लिहायचे ते ठरले आहे का?
उत्सुकता लागून राहिली आहे...
मराठ्यांच्या इतिहासातील मोठे पर्व या प्रताप गडावरील युद्धाच्या ठिणगीतून निर्माण झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये.

शशिकांत ओक's picture

29 Mar 2020 - 11:55 am | शशिकांत ओक

या लेखमालिके नंतर काय याचे उत्तर मलाही माहित नव्हते पण असे काही घडले…

एक पुस्तक काही वर्षांपासून माझ्या कपाटातील एक कप्प्यात पडून होते. वरद प्रकाशनच्या कार्यालयात मी ह अ भावेंना भेटायला जात असे. ते गेल्यावर जाणे कमी झाले... असेच एकदा गेलो असता त्यांचे पुस्तक दालन नव्याने सुशोभित केलेले पाहून हे पुस्तक मी तिथे विकत घेतले. सुरवातीची काही पाने चाळून नंतर कपाटातील थप्पीत मागे पडले ते पडले. आज अचानक ते हातात असे आले की जणू आता माझी पाळी असे त्याने म्हटले...
शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कारकिर्दीतून निर्माण झालेल्या मराठा साम्राज्याचा अंत कसा झाला? यावर आधारित पुस्तकातून काही लढायांचे चित्र सादर करता येईल का?अशा ऱ्हासाला कोण, कसे आणि का कारणीभूत झाले? ते आजच्या संदर्भातील नकाशे अन्य माहिती मधून सादर करायचा प्रयत्न करावा असे मनात येत आहे.
पुस्तकाचे नाव आहे, ‘मराठ्यांच्या लढायांचा इतिहास’ - लेखक कै. शि म परांजपे…

1

1

दुर्गविहारी's picture

29 Mar 2020 - 11:32 pm | दुर्गविहारी

धागा वाचून शक्य तितकी साधने वाचल्याशिवाय प्रतिसाद द्यायची घाई केली नाही.
जे काही मीं वाचले त्याप्रमाणे दुपारी दोन वाजता अफझलखानाचा वध केल्यानंतर रात्री नउ वाजता दोरोजी राजापूरकडे कोकणा, शिवाजी महाराज वाई, सातार,, कराडमार्गे मिरजेच्या भुईकोटावर चाल करून गेले तर नेतोजी पालकर अफझलखानाचा वाईचा तळ लुटून फाझलखानाच्या मागावर कोल्हापूरला गेले. शिवाजी महाराज व नेतोजी दोघांनी मिळून पन्हाळा ताब्यात घेतला. रुस्तमे जमान व फाझलखान याना पन्हाळ्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज व नेतोजी पालकरांच्या सैन्याने हरवून पळवून लावले.

जंगल, चढ उतार, अंतरे, रात्रीचे प्रवास वगैरे लक्षात ठेवून मांडणी केली आहे.
कागदावरील पुरावे दिशा निर्देश करतात. प्रत्यक्षात दौड, पायपीट करताना तहान भूक, लुटारूंचे, जंगली श्वापदांच्या हल्ल्याचे भय अशा अनेक गोष्टी अनुभवाव्या लागत असल्या पाहिजेत.
मोहिमेचा साधारण आवाका आणि मर्यादा समजून घ्यायला मदत होईल असे दाखवून देणे हा पण उद्देश होता.
आपण नेहमीच आवर्जून लेखन केले आहेत. त्या बद्दल धन्यवाद.

गामा पैलवान's picture

8 Apr 2020 - 8:57 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

मलासुद्धा बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या शिवचरित्रात वाचल्याचं आठवतं की शिवाजीमहाराजांनी अफझुल्या फाडल्यावर लगेच रात्री वाईकडे कूच केलं. त्याआधी त्याच रात्री फाजलखान वाईस पोहोचला होता व तिथून जीव मुठीत घेऊन पळाला. फाजलखान पळाल्याच्या पाठोपाठ नेतोजी वाईत दाखल झाला. त्यास जेव्हा कळलं की फाजलखान पळून चाललाय तेव्हा त्याने रात्रीचा पाठलाग सुरू केला. पण शिवाजीची आज्ञा होती की पहाटे वाईत दाखल व्हा म्हणून पाठलाग अर्धवट सोडून नेतोजी परत वाईत आला. तिथे त्याची व महाराजांची भेट झाली.

दौलोजी पाटील आधीच नौसेना घेऊन अफझुल्याची जहाजं लुटायला निघाला होता. स्वत: शिवाजीमहाराज पन्हाळ्याच्या रोखाने निघाले, तर नेतोजी महाराजांच्या सोबत पन्हाळ्यास आले व नंतर परिंड्याच्या वाटेने निघाले. पुढे नेतोजीने प्रदीर्घ मजला मारीत थेट लक्ष्मेश्वरापर्यंत मुलुख फस्त केला. शिवाजीमहाराजांनी मात्र पन्हाळ्यास राहून गडाकडे जातीने लक्ष पुरवायचा निर्णय घेतला. तो सिद्दी जौहरच्या स्वारीत किती उपयोगी ठरला ते सर्वांना माहीत आहेच.

मात्र प्रस्तुत कथामालिकेत फाजलखान वधाच्या रात्री वाईत न पोहोचता दुसऱ्या दिवशी दुपारी १२ च्या सुमारास पोहोचल्याचं म्हंटलंय. तर, खरं काय घडलं?

मी जावळी ते वाई हे अंतर गूगल नकाशावर अंदाजे मोजलं, तर ते ३१.५ किमी भरलं. मार्ग : जावळी --> निसणीचा घाट (नेमका ठाऊक नाही) --> लॉडविक पॉईंट --> मुख्यबाजार / वेण्णा सरोवर --> मळा कॉलनी --> मेटगुताड --> भिलार --> तायघाट --> चिखली --> कुसगाव / विठ्ठलवाडी --> वाई

तर दुपारी चारच्या सुमारास फाजलखान निघाल्यावर रात्रभरात तीसेक किमी कापणं अशक्य नाही, कारण सोबत घोडे होते. पण अवघड खचितंच आहे. तुमचं मत वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

शशिकांत ओक's picture

9 Apr 2020 - 2:30 am | शशिकांत ओक

प्रतिसाद दुर्ग विहारी यांना उद्देशून आहे...
मालिकेतील वर्णनात मुसाखान, इतर काही सरदार आणि फाज़ल खान जावळीहून निघाले. साधारण सायंकाळी सूर्याच्या आधी असे धरले आहे. त्यांना निसणीच्या घाटातून वर घेऊन जाणार्‍या वाटाड्यांना ६ किमी अंतर पार करून कोयनेच्या उगमाजवळ एकत्र यावे लागल्यावर तिथे थोडी वस्ती असल्याने रात्र तिथेच काढायला लागली असे म्हटले आहे कारण दिवसा देखील जायला कठीण असा चढ आहे. शिवाय रात्री टोळीने फिरणारी हिंस्र जनावरे रक्ताला चटावलेली हिंस्र जनावरे मागे लागू नयेत म्हणून सावधानी घेणे आवश्यक होते असे दर्शवले आहे. नुस्ते अंतर किती यावरून ते ठरवणे बरोबर नाही असे मानावे लागेल.

रमेश आठवले's picture

30 Mar 2020 - 6:08 am | रमेश आठवले

माझ्या मते शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील तीन महत्त्वाच्या घटना म्हणजे आग्र्या मधुन सुटका, शाहिस्तेखानावर लालमहालात केलेला हल्ला आणि अफझुलखानाचा वध . या तीन प्रसंगांची , त्यांचे राजकीय महत्व आणि दूरगामी परिणाम, यावर आधारित क्रमवारी आपण कशी लावाल ?

शशिकांत ओक's picture

30 Mar 2020 - 11:43 am | शशिकांत ओक

ठीक आहे.
हे प्रसंग महाराजांच्या वैयक्तिक साहस, कल्पकता, धीरोदात्त स्वभावाचे दर्शन करवते. वडिलोपार्जित
जहागिरदारी प्रथा मोडायचे साहस, बंगलोर, जिंजी भागात डीप सेक्युरीटी झोनची शक्यता निर्माण करणे, समुद्र किनार पट्टीचा ताबा आणि जमिनी प्रमाणे जलमार्गाने राज्याला जकात, व्यापारी व्यवहारातून अर्थार्जन करायला गरज लक्षात घेऊन काम केले गेले.
परिणाम काही प्रमाणात झाला.
नंतरच्या काळात परिस्थितीच्या रेट्यामुळे आणि महाराजांच्या इतका मोठा आवाका नसलेल्या व्यक्तींना राज्य चालवताना काय करू नये याची खबरदारी घेता आली नाही.
जिंजीत भावाशी लढावे लागले. मुलाला मुघलांच्या कडून परत आणावे लागले. मृत्यू पश्चात मुलांच्यातील सत्ता संघर्षाला टाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या आधीच जावे लागले. याचे दूरगामी परिणाम झाले.
पेशवेकालीन सत्तांतर, अप्रभावी, राजघराणे, कर्तबगार शूरवीरांपेक्षा, राजवाड्यात बसून कागदी राजकारण करून राज्य कसे चालवता येईल?

खूप अभ्यास करून पुस्तके, मुलाखती भेटी यांतून नकाशांसह केलेले लेखन फार आवडले.

'शिवाजीची समुद्री किल्ल्यांसाठीची मोहीम ' हा पुढचा विषय घ्या असे सुचवतो.

पूर्ण कोकण पट्टीचा आणि घाटमाथ्याचा असे दोन वेगवेगळ्या उंचीवरील टायर चे हवामान, जीवनपद्धती, काटकपणा, विचारसरणी यातून समन्वय साधून मोहिमेची आखणी करायला लागत होती. कोकणातील मोहिमेत ४महिने पावसाळ्यात वाया जात होते. डोंगर माथ्यावरून खाली उतरून खानदेश, बालाघाट, मावळ भागात शेतीकामात अडकलेल्या सैनिकांची संख्या कमी करून पगारी सैन्य बळ वाढवायला लागणारे अर्थिक बळ मिळवायला ज्या मोहिमा झाल्या त्यामुळे नवे शत्रू तयार झाले. दोन्ही बाजूने शत्रूचे संख्या बळ, साधनसंपत्ती, तोफा, दारू गोळे वगैरे सज्जता यामुळे सेना विभाग मॉडर्न शस्त्रे, पलटणी निर्माण करायची उसंत किंवा वेळ मिळाला नाही असे म्हटले पाहिजे ...
फक्त एकच वेळी सागराच्या पाहणीत ते पर्यटन जास्त होते. कोस्टल गार्ड सेना हवी इतपत काम झाले. ते ही नसे थोडके!

खटपट्या's picture

5 Apr 2020 - 7:56 pm | खटपट्या

खुप माहितिपुर्ण मालिका !
प्रतिसादांमधुनही बरीच माहीती मिळाली.