तिरुपती दर्शन भाग ३

AKSHAY NAIK's picture
AKSHAY NAIK in भटकंती
17 Mar 2020 - 12:50 pm

दिवस ६/०३/२०२०
सकाळी ६ वाजण्याच्या ठोक्याला तिरुपती स्टेशन वर आमच्या गाडीचे आगमन झाले. प्रचंड अशा गर्दीमधून वाट काढत आम्ही स्टेशन च्या बाहेर पडलो. आमच्यातील दोघा तिघांनी तिरुमला येथे पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सगळ्यांनीच पायी जायचे असे निश्चित केले. आमच्या रूमचे कोणतेही बुकिंग नव्हते, रूम खाली तिरुपती येथे करावी की वरती तिरुमला येथे करावी हे काही ठरत नव्हते. आम्हाला दुसऱ्या दिवशी श्रीकालहस्थी, पद्मावती मंदिर,गोविंदस्वामी मंदिर हि ठिकाणे देखील पहावयाची होती त्यामुळे आज रात्री मुक्कमाला खाली म्हणजे तिरुपती येथेच रूम बुक करण्याचे ठरविले.
तिरुपती स्टेशन च्या बाहेरच TTD चे बुकिंग कार्यालय आहे. तिथे जाऊन रूमची चौकशी केली तेव्हा दोन तास waiting आहे असे सांगण्यात आले. आमचा दर्शन पास दुपारी एक वाजताचा होता. पायी जाण्यास कितीवेळ लागेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळे आम्ही एका स्टेशन जवळील खासगी हॉटेल चा आश्रय घेतला. स्नान वगैरे आटोपून सकाळी आठच्या दरम्यान हॉटेलच्या बाहेर पडलो. हॉटेलच्या बाहेरच एका छोट्या दुकानामध्ये जाऊन चहा नाश्ता आटपून पायी चालण्यासाठी सज्ज झालो. आमचे हॉटेल स्टेशन आणि बस stop पासून अगदी हाकेच्या अंतरावर होते. त्यामुळे कोठेही ऑटो करण्याची गरज भासली नाही. तिरुपती ते तिरुमला दरम्यान सतत देवस्थान च्या तसेच APRTC च्या बसेस धावताना दिसत होत्या. मात्र चालत जाण्याचा मार्ग जेथून चालू होतो तिथपर्यंत जाण्यासाठी आम्ही बसची वाट पाहत होतो. बस stop वर चौकशी केल्यानंतर असे कळले की वरती पायी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक श्रीवरी मेटू आणी दुसरा अलीपरी (उच्चाराचा गोंधळ लक्षात घ्यावा). श्रीवरी मेटूचा रस्ता ३.५ किमी मात्र खड्या पायऱ्या तर अलीपरीचा रस्ता १० किमी सर्वसाधारण चढाचा; कोणत्या मार्गे जावे याचा निर्णय करता येत नव्हता. बहुतांश भाविक अलीपरी मार्गे जातात असे कळले. शिवाय अलीपरी मार्गे गेल्यास इतर काही मंदिरे वगैरेंना भेटी देता येतात असे कळले. मात्र आमचा दुपारी १ वाजताचा दर्शन पास असल्यामुळे आम्हाला लवकर वर पोहचणे आवश्यक वाटले. त्यामुळे आम्ही श्रीवरी मेटू मार्गे पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. श्रीवरी मेटू कडे जाणऱ्या बसने आम्हास सकाळी दहाच्या दरम्यान पायथ्याशी आणून सोडले. हातात तीन तास शिल्लक होते. त्यामुळे वेळेपूर्वी आपण पोहचू असा अंदाज आम्ही सगळ्यांनी बांधला होता. पायथ्यापासून २३८८ पायऱ्या चढून वर जायचे होते. सुरवातीच्या ५०० पायऱ्या तर आम्ही अगदी सहज चढलो. अजून अर्ध्या तासात तिरुमला येथे पोहचू असे वाटू लागले. मात्र आमच्या भ्रमाचा भोपळा क्षणार्धात फुटला. पुढील पायऱ्या चढताना ब्रम्हांड दिसू लागले. प्रति मिनिट दोन पायऱ्या या गतीने आमचे मार्गक्रमण चालू होते. १२०० व्या पायरीवर पोहचल्यावर आम्हाला दर्शनाचा अजून एक पास मिळाला. वेळ होती संध्याकाळी ७ वाजता.(आमचे online दर्शन बुक करताना PAN कार्ड चे detail दिले होते. येथे आधार कार्ड शिवाय पास मिळत नाही) आता दोन दर्शने होणार याचा आनंद आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.
PASS
पायऱ्या चढताना ठिकठिकाणी पाणी पिण्याची केलेली सोय, स्वच्छतागृहे, बसण्यासाठी केलेली सोय याबाबत व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे कमी. प्रत्येक ठिकाणी अजून किती पायऱ्या शिल्लक आहेत याचे बोर्ड लावलेले दिसत होते. आमच्या दोन हजार पायऱ्या चढून झाल्या होत्या. ठिकठिकाणी अनेक खाण्याचे पदार्थ दिसत होते. ताक,मसाला काकडी,फ्रुटी,भेळ असे अनेक पदार्थ लक्ष वेधून घेत होते.
BHEL
शक्य तितक्या पदार्थाचा आस्वाद घेत आम्ही पुढे सरकत होतो. शेवटच्या काही पायऱ्या चढताना आमची भलती दमछाक होत होती. शेवटी दुपारी सव्वा एक च्या सुमारास आम्ही वर पोहचलो.
SRIVARI METTU
आमची दर्शनाची वेळ होत आली होती. मात्र आमच्यापैकी काही मित्रांना केसदान करायचे होते म्हणून आम्ही सगळे त्यांच्या मागे कल्याण कट्ट्याकडे वळलो. टोकन घेवून त्यांनी केसदान केले. स्नान आटोपून आम्ही दर्शन पास च्या रांगेत शिरलो. दुपारी थोडे ऊन असल्यामुळे गर्दी ठिकठिक होती. १ तासात आमचे अगदी छान दर्शन झाले. दर्शन घेवून जसे बाहेर पडलो तसे पोटात कावळे ओरडू लागले होते. आता आम्ही आमचा मोर्चा देवस्थानच्या अन्नछत्राकडे वळविला. अस्सल दक्षिणात्य पद्धतीचे जेवण आज आमच्या भाग्यात होते. खूप मोठ्या अशा एका हॉल मध्ये आम्ही प्रवेश केला. केळीच्या पानावर खोबऱ्याची आंबट चटणी, भोपळ्याची भाजी आणि तांदळाची गुळासोबत बनविलेली खीर असे पदार्थ वाढून ठेवले होते. आम्ही पानावर बसल्यानंतर अगदी वाफाळलेला भात आणी त्यावर गरम गरम सांबर असे आम्हास वाढण्यात आले. जेवणात आम्ही इतके दंग झालो की आम्हाला चालत वर आल्यामुळे झालेल्या थकव्याचा देखील विसर पडला. त्यानंत पुन्हा एकदा सेवेकरी भात वाढण्यासाठी घेवून आले. यावेळेस भातासोबत रस्सम नावाचा पदार्ध होता. अगदी मिटक्या मारत आम्ही हा देखील भात संपवला. जेवढा भात आपण एखाद आठवड्यात खात असू तेवढा आम्ही आतापर्यंत संपवला होता. जेवणाची सांगता पुन्हा एकदा ताक भात खावून करण्यात आली. आम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुस्ती दिसत होती. मंदिराबाहेर असलेल्या एका शेड खाली आम्ही थोडा वेळ विश्राम केला. मंदिराबाहेर अनेक खेळण्यांची,पूजा साहित्याची,सजावटीची,कपड्याची दुकाने दिसत होती. दुपारी चार च्या सुमारास आम्ही भटकत भटकत सर्व दुकाने फिरत तिथल्या बाजारपेठेचा अंदाज घेतला. संध्याकाळचे अजून एक दर्शन बाकी असल्यामुळे काहीही खरेदी न करता सहा वाजता दिव्य दर्शनम च्या लाईन मध्ये लागलो. बरेच अंतर चालून आम्ही शेवटी एका हॉल मध्ये पोहचलो. तेथे बसण्याची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली होती. साधारण दोन तास आम्ही सगळे त्या हॉल मध्ये बसून होतो. दरम्यानच्या काळात देवस्थान तर्फे दुध, नाष्ट्यासाठी उपमा याची सोय करण्यात आली होती. दोन तासांनी आमचे दर्शन झाले. भगवान व्यंकटेश्वराच्या एका क्षणाच्या दर्शनाने देखील धन्य धन्य झाल्याची अनुभूती येत होती. येथे दर्शन व्यवस्थेचा पुरता उडालेला बोजवारा दिसून येत होता. प्रचंड मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी आणी धक्काबुक्की चा सामना करीत आम्ही मंदिराबाहेर पडलो. मंदिरात प्रवेश करण्यासाठी आणी बाहेर पडण्यासाठी एकच दरवाजा असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनासाठी कठीण होऊन बसले होते. लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींसोबत येथे दर्शन करणार्यांना अनेक दिव्यातून जावे लागत होते. रात्री चे नऊ वाजत आले होते. सर्वप्रथम बाहेर पडल्यानंतर प्रसादाचे लाडू आणि LOCKER मध्ये ठेवलेले समान आणि पादत्राणे ताब्यात घेवून आम्ही खाली तिरुपती येथे जाण्यासाठी stop वर आलो. STOP वर बस उभीच होती. रात्री ११ च्या दरम्यान आम्ही आमच्या हॉटेल वर पोहचून दुसऱ्यादिवशी च्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करीत झोपी गेलो.
क्रमशः

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

17 Mar 2020 - 1:21 pm | चौथा कोनाडा

छान वृतांत ! ओघवती शैली अणि मोजके तपशिल यामुळे रोचक झाला आहे वृतांत !
आणखी फोटो टाकल्यास जास्त चित्रदर्शी होईल.

AKSHAY NAIK's picture

17 Mar 2020 - 11:17 pm | AKSHAY NAIK

आपण केलेल्या सूचनेचे स्वागतच आहे. मात्र मोबाईल दिवसभर लॉकर मध्ये असल्यामुळे जास्त छायाचित्रे टिपता आली नाहीत. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार

उदयगिरी's picture

17 Mar 2020 - 1:53 pm | उदयगिरी

एका दिवसात दोन दर्शन, भाग्यवान आहात. प्रसादाचा लाडू घेतलत की नाही.

हो, दोन्ही वेळेस दर्शन झाल्यावर छोटा लाडूचा प्रसाद मिळाला. प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार!

मलाही श्रीवरी मेटुने जाण्याची इच्छा आहे पण दर्शन नकोय. पण पायऱ्या म्हटल्यावर नको वाटते साधी वाट असली तर बरे. तिथे वरती फिरायचे आहे. सीलातोरणम,धबधबा वगैरे. वगैरे

वेळ हाताशी असेल तर अलीपरी मार्गे जाण्यास हरकत नाही. त्यात देखील छान कंपनी असल्यास गप्पा टप्पा मारत चालण्याची मजा काही औरच, तसेच ईतर मंदिरे सुद्धा पहात जाता येते. प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद!

उगा काहितरीच's picture

17 Mar 2020 - 11:34 pm | उगा काहितरीच

छान लिहीत आहात. पुभाप्र.

आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे पूढील लेखन करण्यात निश्चितच उर्जा मिळेल. आपले खुप खूप आभार !

पर्णिका's picture

18 Mar 2020 - 12:00 am | पर्णिका

छान झाला आहे हा ही भाग ... प्र चि ही सुरेख !
पु भा प्र :)

AKSHAY NAIK's picture

18 Mar 2020 - 11:09 am | AKSHAY NAIK

खुप खुप आभार !

परिंदा's picture

19 Mar 2020 - 5:48 am | परिंदा

तिरुमला येथे रुम बुकिंग ऑनलाईन करता येते का? वर तिरुमला येथे एक दिवस मुक्काम करुन तिथले स्थलदर्शन करुन मग खाली तिरुपती येथे १ दिवस मुक्काम करुन कालहस्ति, पद्मावती करायचा बेत आहे.
पद्मावतीच्या दर्शनाला पण खुप लाईन असते का? कारण तिरुपतीचे दर्शन पद्मावतीच्या दर्शनाशिवाय पुर्ण होत नाही, म्हणजे बालाजीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक यात्रेकरु पद्मावतीच्या दर्शनालापण जात असेलच.

TTD च्या संकेतस्थळावरून online रूम बुक करता येते. मात्र त्याची उबलब्धता सहजासहजी नसते. तीन महिने आधी प्रयत्न केल्यास कदाचित मिळू शकते. नाहीतर waiting मध्ये थांबून तिथे पोहचल्यानंतर रूम बुक करावी लागते.

रीडर's picture

29 Mar 2020 - 4:08 am | रीडर

छान वृत्तान्त

रीडर's picture

29 Mar 2020 - 4:09 am | रीडर

छान वृत्तान्त