मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी
आतापर्यंत गड-किल्ले, लेणी, मंदिरे पाहण्यासाठी बरीच भटकंती झाली होती. पण खर्या अर्थाने जंगल भ्रमंती अशी झाली नव्हती. नाही म्हणायला एकदा कॅम्प कोयना आणि एकदा आंबा घाटात प्रत्येकी २/३ दिवस मुक्कामी होतो. आंबा ते विशाळगड रस्त्यावर गव्याचे दर्शनही झाले होते. सह्याद्रीतील ह्या जंगलांचा प्रकारच वेगळा. गच्च हिरवी, काट्याकुट्यांची ही जंगले. इकडील जंगलांत वन्य प्राण्यांचा वावर फारसा नाहीच. अशातच मित्राने मेळघाट जंगल बघायला जायचा विचार मांडला. मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात. अभयारण्याचा भाग प्रचंड विस्तृत, सातपुडा रांगेच्या दर्याखोर्यांनी भरलेला. इकडे वाघ असूनही त्यांचे दर्शन अतिशय दुर्लभ कारण विस्तृत परिसर, असमतल जमीन , उंच पर्वत, खोल दर्या, खाच खळगे, विपुल झाडी. वाघांना लपायला अनेक ठिकाणं. असे असले तरी येथे अन्य वन्य पशू भरपूर, ससे, सांबार, चौसिंगा, चितळ, नीलगाय, गवे, रानडुक्कर, अस्वल, कोल्हे, खोकड, कोळसुंद, बिबटे अगदी विपुल संख्येने. मेळघाटला १९६७ साली अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली आणि १९७४ हे जंगल हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलं गेलं. मेळघाट नावातच त्याचे वैशिष्ट्य आहे. घाटांचा मेळ. मेळघाटाचा विस्तृत परिसर चार विभागात विभागला गेला आहे. सेमाडोह, चिखलदरा, हरिसाल आणि शहानूर. शहानूर विभागात सुप्रसिद्ध नरनाळा आणि धारगड हे दोन किल्ले तर चिखलदरा विभागात गाविलगड हा किल्ला आहे. मेळघाट हे शुष्क पानगळीच्या जंगलात मोडतं आणि मुख्यतः येथे सागाची दाट झाडी आहेत. त्यामुळे पावसाळा आणि हिवाळ्यात हे जंगल हिरवंगच्च असतं तर उन्हाळ्यात पानं गळून गेल्यामुळे हे जंगल दाट असूनही मोकळ भासतं आणि ह्याचमुळे विविध प्राण्यांचे दर्शन सहजी होतं.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा नकाशा
आम्हा तिघा मित्रांचं जायचं ठरलं आणि १ रात्र शहानूर आणि २ रात्र कोळकास येथे राहायचे बुकिंग मॅजिकल मेळघाट ह्या संस्थळावरुन केले. मेळघाटला पुण्याहून जायचे २ प्रमुख मार्ग आहेत. पुणे-औरंगाबाद-जालना-शेगाव-अकोट-शहानूर आणि पुणे -संगमनेर- चांदवड-धुळे-अंमळनेर-चोपडा-बर्हाणपूर-धारणी -कोळकास - सेमाडोह. पैकी आमचा मेळघाटातील पहिला मुक्काम शहानूर येथे असल्याने आम्ही जालना-शेगाव मार्गे जायचे ठरवले. सकाळी साडेसहाच्या आसपास निघालो. वाटेत नगरच्या आसपास मिसळ आणि चहासाठी एक थांबा घेऊन साडेदहाच्या सुमारास थेट तारा पान सेंटर, औरंगाबाद. साधे चटणी पान खाऊन आणि बांधून घेऊन दुपारी १२ च्या आसपास जालन्यास पोहोचलो. जालन्यापर्यंत रस्ता एकदम चांगला आहे. मात्र त्यापुढे शेगावपर्यंत रस्त्याची दुरवस्था आहे. पुढे चौपदरी रस्त्याचे काम चालू असल्याने बर्याच ठिकाणी एकच लेन चालू आहे आणि जागोजागी डायव्हर्जन्स. वाटेत चिखलीनजीक एका ढाब्यावर जेवण केले आणि खामगाव मार्गे साडेतीन/चारच्या सुमारास शेगावास पोहोचलो. शेगावात एक रात्र मुक्काम करुन दुसर्या दिवशी पहाटे ४ वाजता निघून शहानूरला पहाटे साडेपाचची सफारी करणे आवश्यक होते त्यानुसार भक्तनिवासात चौकशी करण्यासाठी गेलो पण खोलीसाठी वेटींग असल्याने मंदिरानजीकच्या एका खाजगी लॉजमध्ये बुकिंग केले व ताजेतवाने होऊन मंदिरात जाण्यास निघालो. सुदैवाने मंदिरात अजिबातच गर्दी नव्हती. दर्शन अगदी ५ मिनिटातच झाले. तद्नंतर वरणभात, मटकी उसळ, पोळी, शिरा असा महाप्रसाद घेतला. दर्शन घेऊन परत लॉजवर येताच शहानूर येथील वनखात्याच्या श्री. स्वप्निल ह्यांच्याशी संपर्क केला, त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील रस्ता खराब असल्याने तुम्हाला यायला वेळ लागेल, तसेच त्या रात्री इतर काही बुकिंग नसल्याने तुमच्या मुक्कामाची सोयही होईल, शिवाय वाटेत येथे जेवण्यासाठी हॉटेलं आहात, तुम्ही ९ वाजेपर्यंत आरामात याल असे समजले. त्यामुळे शेगावातील बुक केलेला लॉज लगेच सोडायचे ठरवले. रिफंड काही परत मिळाला नाही मात्र त्यावर पाणी सोडून संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास शेगाव सोडले. शेगाव ते अकोट हे अंतर जेमतेम ६० किलोमीटर आहे पण सर्वच रस्ता प्रचंड खराब असल्याने जवळपास दोन तास लागतात पोचायला. वाटेत एका ठिकाणी चहा घेऊन ८ च्या आसपास अकोट येथे पोहोचलो. अकोटपासून पुढे मेळघाटाच्या पायथ्याला पोपटखेड सुमारे १३ किमी. पोपटखेडवरुन दोन फाटे फुटतात, मुख्य रस्ता आपल्याला चिखलदरा/धारणी/सेमाडोह/अमरावती अशा विविध ठिकाणी घेऊन जातो तर उपरस्ता शहानूर येथे जाऊन संपतो. शहानूर येथे वनखात्याची मुक्कामाची उत्तम सोय आहे. आम्ही तेथे एक कॉटेज बुक केली होती. वनखात्याच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करुन ९ च्या आसपास रूमचा ताबा घेतला. ५ च्या आसपास महाप्रसादाचा आस्वाद घेतला असल्याने भूक अशी नव्हतीच. वनखात्याच्या अधिकार्यांकडे दुसर्या दिवशीच्या सफारींची चौकशी केली. शहानूर गेटमधून सकाळी आणि दुपारी प्रत्येकी ४ तासाची नरनाळा-धारगड , २/३ तासाची फक्त नरनाळा किल्ला सफारी, पूर्ण दिवसाची (८ तासाची) शहानूर नरनाळा धारगड आणि इतर जंगलभाग, आणि रात्र सफारी अशा विभिन्न सफारी आहेत. मेळघाट जंगल सफारीत स्वतःची एसयुव्ही असेल तर ती घेऊन जाता येते मात्र त्यासोबत त्यांचा गाईड बरोबर घ्यावा लागतो. स्वतःची गाडी असेल तर वनखात्याचे सर्व दर धरुन साधारण १३०० रु तर वनखात्याची ओपन जिप्सी हवी असेल तर प्रत्येक गाडीमागे साधारण २५००/३००० रु. लागतात. एका गाडीत ६ लोक (वाहनचालक आणि गाईड धरुन) सफर करु शकतात. आमची गाडी जरी होंडाची मोबिलिओ ही सेमी एसयुव्ही असली तरी तिचा ग्राउंड क्लियरन्स हा कमी असल्याने शहानूर भागातील तीव्र चढउतारांनी भरलेल्या खडबडीत रस्त्यांवर तिचा निभाव लागणार नाही असे तेथीलल वनाधिकार्यांचे म्हणणे पडले जे खरेच होते असे दुसर्या दिवशी सकाळी आम्हास कळून आलेच. तेव्हा पहाटे साडेपाचची जिप्सी ठरवून आम्ही लगेचच निद्राधीन झालो. व पहाटे पाचला उठून तयार होऊन बाहेर गेटवर जिप्सीची वाट बघत बसलो. पावणेसहाला ड्रायव्हर आणि वनखात्याचा गाईड आलेच आणि आमची पहिली सफारी सुरु झाली.
नरनाळा धारगड सफारी
शहानूर गावाच्या पाठीमागेच प्रचंड मोठा असा नरनाळा किल्ला बलदंडपणे उभा आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच साधारण एक दीड किलोमीटर अंतरावरच एक डांबरी रस्ता घाटमार्गाने थेट नरनाळा किल्ल्यावर जातो. तर सरळ जाणारा कच्चा रस्ता जंगलात शिरतो. ह्या कच्च्या रस्त्यावर अतीतीव्र चढउतार आहेत. ह्याच कच्च्या रस्त्याने डोंगर चढून गेल्यावर काहीसा सपाटीचा प्रदेश लागतो. तेथे पहिले दर्शन झाले ते गव्यांचे.
गव्यांचा कळपाचा हा लहानसा व्हिडिओ
इथून पुढे जाताच दाट झाडीआड चितळाचे दर्शन झाले.
नरनाळा धारगड रस्त्यावर कोअर भागात एक तलाव आहे तिथे आदल्या दिवशीच वाघाने शिकार केली होती. दुर्दैवाने आमच्या सफरीत आम्हाला वाघाचे दर्शन झाले नाही.
मध्येच एका नदीकाठच्या बांधावर पक्षी बकध्यान लावून बसले होते.
एका उंच चढावरुन गाडी पुढे जाताच चितळांच्या कळपाचे अनोखे दर्शन झाले.
इकडून पुढे जाताच जंगलातील सर्वात क्रूर प्राणी बघायला मिळाले ते म्हणजे कोळसुंद अर्थात रानकुत्रे (इंडियन ढोल). ही जमात अत्यंत तीक्ष्ण, अतीसावध, भक्ष्याला विविध बाजूंना घेरुन पळवून पळवून दमवतात आणि जीवंतपणीच त्यांचे लचके तोडायला सुरुवात करतात. वाघही शक्यतो ह्यांच्या नादी लागत नाही. जिथे रानकुत्रे दिसतात त्याच्या जवळपास वाघ असण्याची शक्यता नगण्य असते. एका टोळीत ८ ते १० रानकुत्रे असतात. आम्हाच चार रानकुत्रे दिसले, टोळीतले बाकीचे नुकतेच पुढे निघून गेले होते.
रानकुत्रे बघून पुढे निघताच आम्ही कोअर विभागातील वनखात्याच्या गोटुल उपहारगृहात नाष्ट्यासाठी थांबलो. ह्याचे लोकेशन अत्यंत जबरदस्त आहे. चहुबाजूंनी कुंपण आहे, पाठीमागे नदी. अजून इथे मुक्कामाची सोय नाही मात्र चहा, नाष्टा मिळतो.
तिथे जवळपास अर्धा थांबून चहा पोहे खाउन पुढे निघालो. वाटेत असंख्य हुप्पे दिसत होतेच.
साथीला मोरही होते
पुढे एका माळरानावर मेळघाटाची ओळख असलेला एक सर्वांगसुंदर पक्षी दिसला तो म्हणजे नीळकंठ अर्थात इंडियन रोलर बर्ड. ह्याचे उडणे अत्यंत मनोहारी असते. निळया रंगाच्या विभिन्न छटांचे दर्शन ह्याच्या उडण्यात होते.
आता आम्ही धारगड बाजूने परतीच्या प्रवासास निघालो. धारगड किल्ल्यावर जाण्यास परवानगी नाही. पायथ्याला धारेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि डोंगरात असंख्य कपारी आहेत. तिथे वाघ असण्याची शक्यता खूप आहे. वाटेत आम्हाला चौसिंग्यांचा कळप दिसला. हे तुलनेने लहान हरिण आहे, मस्तकावर चार लहानशी शिंगे असतात.
गोटुल-धारगड रस्त्याचा लहानसा व्हिडिओ
हा घाट ओलांडून पुढे जाताच नीलगायींचा कळप दिसला
कुरंग वर्गातील हे सावध प्राणी सतत सभोवतालच्या हालचालींचा अंदाज घेत असतात.
नीलगायींचा हा कळप बघून आम्ही साधारण साडेदहापर्यंत शहानूरच्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. आता दुपारी ३ च्या सुमारास जायचे होते नरनाळा किल्ला बघायला आणि रात्री वेध लागले होते मचाणावरील मुक्कामाचे, त्याविषयी पुढील भागात.
क्रमशः
वाचने
23400
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
फोटू आवडले
In reply to फोटू आवडले by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद माऊली.
लेख चाळला.
In reply to लेख चाळला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गूगल फोटोजला पब्लिक अल्बम
In reply to गूगल फोटोजला पब्लिक अल्बम by प्रचेतस
हं..
In reply to हं.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता बघा बरं सर, फोटो दिसायलाच
In reply to आता बघा बरं सर, फोटो दिसायलाच by प्रचेतस
वाह क्या बात है.
In reply to वाह क्या बात है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साधे फोटो काढलेत हो, शटर
हे अभयारण्य पर्यटन सुरू केलंत
प्राणी फुकट दिसत नाहीत, खटपट
In reply to प्राणी फुकट दिसत नाहीत, खटपट by कंजूस
सध्या अभयारण्यांचे प्रवेश दर
In reply to सध्या अभयारण्यांचे प्रवेश दर by प्रचेतस
ऑ ?
In reply to ऑ ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्याघ्र पर्यटन हल्ली खूपच
आहा. अतिउत्तम. कितीतरी
फोटो दिसले.
मस्त
मस्त लेख
In reply to मस्त लेख by आदेश007
धन्यवाद
नागेश्वर (चिपळूण - चोरवणे -
In reply to नागेश्वर (चिपळूण - चोरवणे - by कंजूस
कोयना चांदोली रिजनमध्ये
वाह, सुंदर भटकंती ! प्राणी
नागझीऱ्या सहलीची वाट पाहतो.
ओडिओ सुद्धा घ्या.
अतिशय सुंदर माहिती आणि तितकीच
वा ! वाह !! वाहवा !
फोटो छान आलेत, सोनेरी
छान...
In reply to छान... by किल्लेदार
धन्यवाद.
वाहवा प्रचेतस भाऊ
In reply to वाहवा प्रचेतस भाऊ by जेम्स वांड
धन्यवाद