पानिपत जिंकतो तर....?

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in काथ्याकूट
17 Feb 2020 - 3:28 am
गाभा: 

पानिपत युद्धाबद्दल अधिक काय लिहावे?? महाराष्ट्राची एक भलभळती जखम.
अनेकांनी विश्वास पाटील ह्यांची पानिपत कादंबरी वाचलीच असावी. मध्यंतरी पानिपत सिनेमाही येऊन गेला. त्यानंतर नेट आणी इतर ठिकाणीवर अनेक लेख लिहिले गेले. Youtube वर अनेकानी विडिओ बनवल्या. अनेक विडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लांबलचक चर्चा झाली. युद्ध का झाले? कसे झाले? ह्यावर बराच काथ्याकूट आहे. पण हे युद्ध भारताचा इतिहास बदलणारे ठरले हे नक्की. पण पानिपत युद्ध मराठे जिंकते तर आजचा भारत कसा असता?? ह्यावर फार कमी लिखाण सापडले.

हिंदी भाषिकांच्या लेखात, चर्चेत आणी व्हिडिओत अनेक ठिकाणी ह्यावर लेखन केलंय. मराठीत ह्यावर खूप कमी लेखन मिळालं. काहीनी लिहिलंय की मुघल साम्राज्य संपल्यानंतर अब्दालीमुळे आज भारतात मुस्लिम टिकून आहेत. अब्दाली काही लोकांच्या दृष्टीने त्यांचा हिरो आहे.
मी इंटरनेटवर जितकी माहिती मिळवली त्यानूसार शावोन चौधरी ह्यांनी एक सुरेख लेख लिहिलाय त्यात त्यांनी सांगितलंय की जर मराठे पानिपतात जिंकले असते तर अब्दाली हरून पळत असता त्याची गाठ पंजाबात शिखांशी पडती आणी अब्दाली लाहोर युद्धात मारला जाता.
पानिपत विजया नंतर मराठयांनी दिल्लीत जल्लोश केला असता. त्यानंतर शहा आलम द्वितीय ह्याला दिल्लीच्या गादीवर बसवून शिंदेंना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी दिली जाती.
नंतर मराठयांनी निजामशाही कायमची संपवली असती. आणी त्यांना निजाम जेवढा गरीब असल्याचं ढोंग करतोय त्यापेक्षा तो गडगंज श्रीमंत असलेला सापडला असता. शिखांचं साम्राज्य लवकर वाढतं आणी कदाचित मराठे आणी शीख दिल्लीसाठी एकमेकांशी भांडले असते. मद्रास आणी दक्षिण संपूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात असती. आणी कदाचीत टिपू सुलतानचा उदयच न होता. मराठे सरदार खुप ताकदवान होऊन एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यन्त संपूर्ण भारतावर मराठी सरदारांच वर्चस्व असतं. काहींनी लिहिलंय की भारत युरोपीय देशांसारखा छोट्या छोट्या तुकड्यात विभागला गेलेला पहायला मिळाला असता. मराठे जिथपर्यंत गेले तिथपर्यंतच आजचा भारत आहे असेही काही ठिकाणी वाचले. बंगालात मराठे जिथपर्यंत गेले तिथपर्यंतच आज बंगालची सीमा आहे.
मायबोलीच्या एका धाग्यात सांगितलंय की मराठ्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश "साफ" न करता पंजाबात जाणे. तसेच अब्दाली ने दिल्लीत शहावलीउल्ला ह्याच्या सांगण्यानुसार दिल्लीत वहाबी विचारधारेचं राज्य स्थापन केले असते तर?? पुन्हा भारताला एका काळ्या युगाला सामोरे जावे लागले असते. पानिपत युद्धाने अनेक भीषण परिणाम घडवले. खरं तर ह्याला युद्ध न म्हणता महायुद्धच म्हणायला हवे.
एकंदरीत जे झाले ते झाले. पण ते जर झाले नसते तर?? मराठ्याएवजी अफगानांचे पानिपत झाले असते तर??
बक्सर च्या युद्धात मराठ्यांनी नक्कीच सर्वांबरोबर मिळुन इंग्रजाना धूळ चारली असती?
आजचा भारत कसा असता??
आज ह्या गोष्टीला महत्व नसलं तरी एकंदरीत स्वप्नरंजन म्हणून का होईना पण मराठा साम्राज्य कुठपर्यंत असतं? आजच्या भारताच्या सीमा कुठवर असत्या? सांस्कृतिक, राजनैतिक, भौगोलिक भारत कसा असता? आणी आजच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम असता??
( इतिहासात जर तर ला महत्व नसतं. अशी पिंक टाकुन धाग्याच पानिपत करायला कृपया येऊ नका.)

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

17 Feb 2020 - 3:35 am | विजुभाऊ

जयंत नारळीकरांनी लिहीलेली गंगाधरपंतांचे पानिपत ही गोष्ट वाचा. यक्षांची देणगी या पुस्तकात आहे.
त्यात विश्वासराव भाऊ हा बेपत्ता न होता तो वाचला. ही गोष्ट मराठ्यांना प्रेरक वाटली. ते लढले आणि जिंकले. ( भारतीय इतिहासातील टर्निंग पॉईंट ) असा कल्पनाविलास केलेला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2020 - 3:39 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद विजुभाऊ. मध्यंतरी जयंत नारळीकरांनी ह्यावर गोष्ट लिहिलीय असा हलकासा उल्लेख कुठंतरी वाचला होता. पण आता पूर्ण माहिती मिळाली. नक्की वाचतो.

मराठीत ह्यावर खूप कमी लेखन मिळालं.

कारण आपल्याला त्यावेळेची वस्तुस्थिती काय होती, आपल्या काय चुका झाल्या हे संदर्भ ग्रंथ पुस्तके यातून माहिती पडलं आहे, हिंदी भाषिकांना त्या वस्तुस्थितीची जाण नसावी त्यामुळे कल्पनाविलास करू धजतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2020 - 2:20 pm | अमरेंद्र बाहुबली

ते ही आहेच. पण इन युद्धात चुका झाल्या. नाहीतर दुपारपर्यंत मराठेच वरचढ होते.

मुळात नादीरशहा, अब्दाली यांचे मराठ्यांशी सरळ हाडवैर असल्याचे माहित नाही. तसे असल्यास कृपया सांगावे.
जर असे असेल तर महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जाऊन युद्ध करायची गरजच मराठ्यांना का पडली?

खरं तर मराठ्यांची ३ पानिपतं झालीत असं म्हणायला हवे.
एक म्हणजे थोरले बाजीराव गेले. ते स्वतःच एक पानिपत. ते नादीरशहाच्या हल्ल्याला तोंड द्यायला निघालेले तेव्हा.
दुसरे जे तुम्ही उल्लेखलेले आहे ते. ते अब्दालीच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी.
आणि तिसरं म्हणजे थोरले माधवराव गेले ते. पानिपताचं ओझं पेलण्यात त्यांचं आयुष्य गेलं.

येवढं करूनही पुन्हा त्या दिल्लीच्या तख्तावर एका शहाला बसवण्यातच मराठ्यांची आयुष्य खर्ची पडली असं म्हणावंसं वाटतं. जे तख्त भाऊ फोडू शकत होतेत, त्यावर ते छत्रपतींना बसवूही शकत होते ना? पण तसे झाले नाही. खरंच, काय कारण असेल इतकं दिल्लीच्या शहाला सांभाळण्याचं?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2020 - 7:07 pm | अमरेंद्र बाहुबली

खरंय. मराठ्यांनी एकही निर्णायक युद्ध केलं नाही. निजामबद्दलही तेच.

माहितगार's picture

17 Feb 2020 - 8:34 pm | माहितगार

माझे निम्न लिखीत हे संदर्भाआधारीत किंवा बारकाव्यांची दखल घेणारे नाही त्यात बर्‍याच त्रुटी असू शकतात.

एरवी मी गांधी आणि केजरीवालांवर टिका करतो ते छ. शिवाजी महाराजांच्या पासंगालाही पोहोचत नाहीत. शिवाजी महाराजांच्या तुलनेत गांधी आणि केजरीवाल दिखाऊ आणि संधीसाधू ठरतात. शिवाजी महाराजांनी खर्‍या न्याय्यतेची आणि खर्‍या रयतेच्या राज्याची मेढ रोवण्याचा प्रयत्न केला. रयतेबद्दल दिखाऊ पुळकेबहाद्दरांना बरेच पिक काढता येते पण ते विरुन जाते. शिवाजीमहाराजांचे सैन्य त्यांच्या परोक्षही स्वराज्यासाठी लढत होते कारण छ. शिवाजी महाराजांचा रयतेचा कळवळा दिखाऊ नव्हता.

पेशव्यांनी औरंगजेबोत्तर काळात मोघलांच्या आपापसातील बेदिलीचा फायदा घेऊन वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी रयतेसाठी गांधी केजरीवाला एवढा दिखाऊपणा सुद्धा केला नाही. रयतेच्या पिकाला धक्काही लावू न देणारे शिवाजी महाराजांचे तत्व पेशव्यांनी गुंडाळून ठेवले. राज्य विस्तार वेगाने झाला तसा औरंगजेबानेही राज्यविस्तार वेगाने केला होता पण जनतेशी खर्‍याखुर्‍या प्रेमाची आस्थेची नाळ जोडली गेली नसेल तर सत्ता विरून जाते. रयतेचे राज्य एवजी जिंकल्या नंतर पेंढार्‍यांचे राज्य इतर राज्यातील जनतेशी मानसिक नाळ बांधू शकले नसेल तरच नवल. त्यामुळे स्वतःच्या सरदारांनी बंडाळी केली तर जनतेच्या भरवशावर सरदारांना सरळ करता आले असते. शिवाय पंजाब उत्तरप्रदेश बंगाल सिंध या भागात स्वतःचे स्थायी शिंदे होळकरांसारखे यशस्वी आणि मराठी सत्तेस लॉयल सरदार घराणी उपलब्ध नव्हती किंवा पेशव्यांना ते केले नाही. एकच सेंट्रलाईज्ड फौज किती ठिकाणी किती काळ पळवणार ? केव्हा तरी थकणार एकुण स्थिती सध्याच्या भाजपासारखी एक राज्य सर केले तर दुसरे हातातून निसटते अशी होती का?

मुळात नादीरशहा, अब्दाली यांचे मराठ्यांशी सरळ हाडवैर असल्याचे माहित नाही. तसे असल्यास कृपया सांगावे.
जर असे असेल तर महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जाऊन युद्ध करायची गरजच मराठ्यांना का पडली?

खाल्ल्या मिठाला जागणे आणि काही शतकांच्या परंपरेतून आलेली मोघल सत्तेबद्दलची उत्तरप्रदेश सिंध इत्यादी प्रदेशातील मुस्लीम सरदारातील आस्था तो पर्यंत बाकी होती त्यामुळे चौथाईचे हक्क मिळवले तरी मोघलांना सत्तेवरुन पेशव्यांनी दूर केले नसावे. इतर प्रदेशात लूट करताना सर्वांना सारखे लूटले कुठेही मुस्लीम म्हणून दुश्वास केला अथवा घरवापसीचे आमीश दाखवले असे पेशव्यांनी केल्याचे दिसत नाही.

पानीपत युद्धात सहभाग हा बहुधा चौथाईचे हक्क टिकवण्याचा भाग असावा.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2020 - 11:01 pm | अमरेंद्र बाहुबली

प्रतिसाद आवडला. बाजीरावांनी अनेक सरदाराना स्थायी प्रांत दिले. बाजीरावांचा मृत्यू 1740 मध्ये झाला. पानिपत 1761 ला ह्या मधल्या वीस वर्षांच्या काळात पेशव्यांनी नंतर कुठेही नवीन सरदार तयार करून त्यांना प्रांत दिले नाही. एक फौज किती ठिकाणी फिरवणार?? हे ही खरेच.

माझ्या पानिपतच्या लढाईवरच्या (आगामी) इंग्रजी पुस्तकात मी या प्रश्नाबद्दल थोडं सविस्तर लिहिले आहे. त्याचा मराठी सारांश इथे देतो.

हा प्रश्न विचारताना अपेक्षा अशी असते की भारताची / मराठ्यांची परिस्थिती होती त्यापॆक्षा चांगली झालेली दिसावी. पण इतिहासाचा प्रवाह एका घटनेने इतका जास्त बदलत नसतो. दुर्दैवाने मराठ्यांनी पानिपतची लढाई जिंकली असती तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की भारताच्या इतिहासात फार काही फरक पडला नसता.

क्षणभर असं मानू की, अब्दाली हा लढाईच्या मैदानावरच मारला गेला. हाफिज रहमत खान, दुंदेखान, नजीबखान वगरे रोहिले मारले गेले. शुजा असा फुकट मरणाऱ्यातील नव्हता, म्हणून तो बहुदा जिवंत पकडला गेला असता. या घटनेचा परिणाम का झाला असता? दिल्लीजवळचा रोहीलखंड मराठ्यांच्या पूर्ण ताब्यात आला असता. शुजाचे अर्धे राज्य मराठयानी त्याला सोडण्याच्या बदल्यात घेतले असते. दिल्लीचा कारभार मराठ्यांच्या हाती आला असता. नानासाहेब पेशवे मात्र क्षयरोगाने आजारी असल्यामुळे काही वाचू शकले नसते. त्यामुळे त्यांच्यानंतर १७६१ साली विश्वासराव जरी पेशवे झाले असते तरी 'power behind the throne' सदाशिवराव भाऊच राहिले असते.

प्लासीची लढाई १७५७ सालीचा होऊन गेली होती, त्यामुळे बंगालमध्ये ब्रिटिश सत्ता कायम झालेली होतीच. असं मानलं की नानासाहेबांच्या दत्ताजी शिंदे याना लिहिलेल्या पत्रातील जुन्या आज्ञेनुसार जर जनकोजी आणि मल्हारराव होळकर यांनी 'पटणे-बंगाल' यांची स्वारी हातात घेतली असती तरी त्यांना ब्रिटिश सत्ता बंगालमधून नाहीशी करता आली असती असं मानणं फार अवघड आहे. त्यासाठी गरज होती ती प्रबळ नौदलाची, बंदूकधारी पायदळाची आणि मजबूत तोफखान्याची. इब्राहिमखानाचे पायदळ आपण खूप चांगले मानतो, पण हे लक्षात घेतले पाहिजे की ऑक्टोबर १७५९ सालच्या आधी हाच इब्राहिमखान निजामाकडे होता, आणि १७५७ साली भाऊ आणि मराठ्यांनी याच इब्राहिमखान आणि निझामाचा पराभव केला होता. जर इब्राहिमखानाचे पायदळ इतके उत्कृष्ट असते तर मराठ्यांना १७५७ मध्ये त्याच्याविरुद्ध जय कसा मिळाला असता? त्यामुळे इब्राहीमखानाचे पायदळ त्या काळी बरे असले तरी ते इंगजी अथवा पाश्चात्य दर्जाचे नव्हते. असे उल्लेखही आपल्याला फ्रेंच लोकांच्या वर्णनातही सापडतात. त्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे ब्रिटिशांनी जनकोजी-मल्हारराव यांचा बहुतेक पराभव केला असता.

काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे बक्सरच्या लढाईत मराठ्यांनी शुजाला मदत केली असती. मला असे वाटत नाही. मराठ्यांचे धोरण असे होते की परस्पर शुजा आणि ब्रिटिश लढून एकमेकांना दुर्बल करत असतील तर त्यात मराठे मध्ये पडले नसते. राजपुतान्यांतील मराठ्यांचे राजकारण जर पहिले तर हीच गोष्ट दिसते. जर मराठ्यांना भक्कम पैसे कुणी दिले असते तर त्यांनी ब्रिटिश बाजूनेदेखील लढाईस कमी केले नसते!

तर सदाशिवराव भाऊला स्वतः बंगालमध्ये शिंद्यांच्या मदतीस जावे लागले असते, तरीपण तिथे फारतर भाऊ एक status -quo कायम ठेवू शकला असता, जिथे कलकत्ता ब्रिटिश ताब्यातच राहिले असते, कारण ब्रिटिश सत्ता फक्त बंगालमध्येच नव्हती, मद्रास आणि मुंबईचे इंग्रज यांनी एकमेकांना मदत नक्कीच केली असती. थोडक्यात महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिले मराठा-इंग्रज युद्ध जसे झाले असते तसेच काही वर्षे अगोदर झाले असते. फरक एवढाच की निजामाकडून उदगीर येथे ताब्यात घेतलेला मराठवाड्याचा बहुतांश भाग मराठी राज्यातच राहिला असता.

ब्रिटिश राज्याचा इतिहास पाहिला तर असं दिसतं की त्यांनी प्रबळ सत्ताधीशांच्या मृत्यूची वाट पाहिली. उदाहरणार्थ पंजाबमध्ये रणजितसिंग, किंवा यशवंतराव होळकर. तसेच त्यांनी सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या मृत्यूनंतर मराठी राज्य घेतलेच असते. कारण वंशपरंपरा-घराणेशाही आणि त्यातून होणारे कलह त्यांच्यामध्ये नव्हते.

यूरोपातील लढाया, तिथले तंत्रज्ञानातील बदल, पाश्चात्यांची ज्ञानलालसा, कुतुहूल हे काही पानिपतच्या लढाईवर अवलंबून नव्हते. एक मातीचे भांडे आणि दुसरे लोखंडाचे, एकाला दुसरे धडकले तर मातीचे भांडे तुटणारच असे जे विश्लेषण 'मराठे व इंग्रज' यामध्ये केले आहे ते समर्पक आहे. आपले भांडे आपण लोखंडाचे बनवू शकलो असतो तर?

त्यामुळे एका पानिपतच्या लढाईमध्ये आपल्या दुरवस्थेची कारणे शोधण्यापेक्षा थोडं विस्तृत systemic analysis होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. दुर्दैवाने आजही आपण भावनिक मुद्दे कवटाळत आपल्या संस्थांचे weak points दुर्लक्षित करतो. अगदी २६/११ चा हल्ला analyze करताना हीच गोष्ट जाणवते.

माझ्या पुस्तकात हा मुद्दा भरपूर विस्ताराने आला आहेच. काही महिन्यात पुस्तक बाजारात येईल अशी अपेक्षा आहे.

आनन्दा's picture

18 Feb 2020 - 12:06 am | आनन्दा

मुद्देसूद प्रतिसाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Feb 2020 - 12:08 am | अमरेंद्र बाहुबली

खूप छान प्रतिसाद मनो. महादजी शिंदे ह्यांनाही फ्रेंच सेनानीने तयार केलेली कवायती फौज बाळगावी लागली होती इंग्रजांविरुद्ध.

खटपट्या's picture

18 Feb 2020 - 2:18 am | खटपट्या

खुप छान. असंही अब्दाली जिंकुनही इथे राहीला नाहीच. जिंकलेला पक्ष तिथेच राहुन तिथला चौथ वसुल करतो किंवा तिथली तजवीज आपल्या सरदाराकरवी करुन कारभार हाती घेउन मग निघतो. पण असे काही झाले नाही. जिंकुनही अब्दाली त्वरित परत गेला. इथे राहुन त्याला किति दिवस काढता आले असते शंकाच आहे.
युध्द हरुनही मराठे वरचढ ठरले असेच मी म्हणेन.

प्रचेतस's picture

18 Feb 2020 - 8:25 am | प्रचेतस

प्रतिसाद आवडला.

- ब्रिटिशांची कुवत जोखण्यात आणि पुढचा धोका ओळखण्यात भारतीय राज्यकर्ते कमी पडलेत हे खरेच.
- तंत्रज्ञानाची कमतरता हा मुद्दा तेव्हा तर होताच, पण आत्ताही अनेक बाबतीत ती कमतरता इथे आहेच.
- एकसंध विचारसरणी राज्यभरात नसणे, राष्ट्रवादाची कमतरता या गोष्टीही तितक्याच मारक ठरल्यात.

एक लक्षात घेतले पाहिजे की ज्यावेळेस ब्रिटीश ब्रिटनच्या बाहेर पडलेत, त्यावेळेस त्यांच्या देशातली परिस्थिती कशी होती? त्या देशातील छोटी राज्ये आणि त्यांची भांडणे यांचे स्वरूप काय होते? तो काळ किती मोठा होता? राज्य स्थिर होऊन पैसा मिळवण्याचे व्यापारी मार्ग तयार होण्यात त्यांना किती वेळ लागला? पैशासाठी लूटीवर अवलंबून राहण्याऐवजी व्यापारावर मुख्यत्त्वे अवलंबून राहणे त्यांना किती काळानंतर शक्य झाले?

मराठ्यांचं सरकार स्थिर होऊन त्याचा समग्र विकास करण्याचे धोरण राबवण्यासाठीचा जो कालखंड होता त्या कालखंडात [साधारणपणे इ.स. १७३० ते १७८०] आपल्याकडे मी वर म्हणतोय तशी ३ पानिपतं झालीत. असं धोरण राबवण्यासाठी लागणारी दूरदृष्टी असणारा राज्यकर्ता एकतर दुर्दैवानं जास्त काळ जिवंत नव्हता आणि असतांना असं धोरण राबवण्याचा विचार करतांना दिसत नाही.

"एक मातीचे भांडे आणि दुसरे लोखंडाचे, एकाला दुसरे धडकले तर मातीचे भांडे तुटणारच "

अगदी समर्पक तुलना केली आहे.
त्यावेळचा इतिहास वाचला तर लक्षात येते की सामान्य रयत राज्यकर्त्यांकडुन नागवलीच जात होती. विशेषतः लुट करणार्‍या सैन्याकडून.
ते शिंदेशाही पेंढारी नी होळकरशाही पेंढारी वगैरे वाचून तर डोकंच फिरतं.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Feb 2020 - 9:12 pm | अमरेंद्र बाहुबली

बबनजी सैन्य पोटावर चालतं, मोहीम काढली तर खर्च चालणार कुठून?? शिंदे होळकर ह्यांनी अनेकांना लुटले पण फौजेचा खर्च त्यातूनच निघाला, इंग्रज ही काही चांगले नव्हते.
निळीसाठी केलेली पिळवणूक, लादलेले अनेक कर, कामगार देशोधडीला लावणे, बंगालात पडलेल्या दुःष्काळात धान्याची मदत केली नाही त्यात लाखो भूकबळी गेले, इंग्रजांनी साधं नाही पीळलय भारतीय जनतेला.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Feb 2020 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली

बबनजी सैन्य पोटावर चालतं, मोहीम काढली तर खर्च चालणार कुठून?? शिंदे होळकर ह्यांनी अनेकांना लुटले पण फौजेचा खर्च त्यातूनच निघाला, इंग्रज ही काही चांगले नव्हते.
निळीसाठी केलेली पिळवणूक, लादलेले अनेक कर, कामगार देशोधडीला लावणे, बंगालात पडलेल्या दुःष्काळात धान्याची मदत केली नाही त्यात लाखो भूकबळी गेले, इंग्रजांनी साधं नाही पीळलय भारतीय जनतेला.

अमरेंद्रजी, मी इंग्रज चांगले होते म्हटलेच नाही. मी राज्यकर्ते म्हटलेय.
ब्रिटीश आणि इतर युरोपियनांनीपण वसाहत स्थापन केल्यानंतर स्थानिक जनतेवर कीती जुलुम आणि अत्त्याचार केलेत ते तर सर्व जगाला माहीत आहे.
मी ते पेंढार्‍यांचं वर्णन वाचलेय आणि एखादे गाव लूटताना ते किती कृर वागत हे वाचून अंगावर शहारे येतात. बरं हे पेंढारी शिंदे होळकरांना खडे सैन्य ठेवणे परवडत नव्ह्ते म्हणून बाळगले होते. त्यांना मोबदला म्हणून ते काही गावे लूटायची परवानगी देत आणि त्यातला काही वाटा ते पण घेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Feb 2020 - 2:27 pm | अमरेंद्र बाहुबली

बबनजी, हे तर प्रत्येक युद्धात करावं लागतं. बाकी पेंढारीनी मराठ्यांना खूप मदत केली.

खरं आहे. राज्यकर्ते स्वार्थासाठी लढाया करतात, त्यात भरडली जाते सामान्य जनता.
हे वर्णन वाचा ..." ज्या गावावर पेंढार्‍यांची धाड पडे त्या गावाची भरलीच म्हणून समजले जायचे. ते लूट करायला जाताना रिकामे जात असत. आहे हे सगळे आपलेच आहे असे ते समजत. मुद्देमाल कुठे ठेवलाय हे वदवून घेण्यासाठी घरातील प्रमुखाच्या तोंडात गरम राख आणि विस्तव कोंबत, नाना प्रकारचा छळ करत. एखादे मुल अंगावर पित असेल तर आईपासून तट्कन ओढून भाल्याच्या टोकावर ठेवत... "

एकच छ्त्रपती होऊन गेले ज्यांनी प्रजेच्या शेतातील भाजीच्या देठाला देखिल हात लावू नये अशी सैन्याला सक्त ताकीद दिली होती. खराखूरा जाणता राजा !

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Feb 2020 - 7:13 am | अनिरुद्ध.वैद्य

अ‍ॅनालिसिस पटणेबल एकदम! इथ थॅनोस रावांच वाक्य आठवल्याशिवाय रहावत नाही, Dread it. Run from it. Destiny still arrives all the same. You could not live with your own failure. And where did that bring you? Back to me.

चित्रगुप्त's picture

30 Sep 2022 - 11:17 pm | चित्रगुप्त

मनो, पुस्तकाची वाट बघतो आहे. अर्थात आता माझ्यात इंग्रजी पुस्तके वाचण्याची चिकाटी राहिलेली नाही. पुस्तक मराठीत असेल, अशी आशा आहे. असल्यास मी नक्की घेईन. त्यात काही चित्रे आहेत का याबद्दल उत्सुकता आहे. चित्रांच्या बाबतीत काही मदत हवी असेल तर कळवावे. सध्या मी (पुढील काही महिने) पॅरिसात आहे. इथल्या Bibliotheque मधे काही चित्रसंदर्भ वगैरे हुडकायचे असतील तर अवश्य सांगावे.

अरेच्चा. २०२० चा लेख आणि प्रतिसाद मी आजच पहिल्यांदा वाचले त्यामुळे घोटाळा झालेला दिसतो. त्यात उल्लेखिलेले पुस्तक म्हणजे आधी प्रसिद्ध झालेले आहे तेच का ? की हे नवीन येऊ घातले आहे ?

वरती म्हणलेले पुस्तक ते जुने, तुमच्याकडे आहे तेच.

नवीन मराठीत करतो आहे, त्यात संपूर्ण महिती आहे, आणि इंग्रजीत नसलेली नवीन चित्रे देतो आहे. इतक्या नवीन गोष्टी सांगायच्या आहेत, लिहायला वेळ कमी पडतो. १४ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करू असं म्हणत होतो पण अवघड दिसतंय.

एक उदाहरण देतो. भाऊंनी दिल्लीच्या किल्ल्यात अब्दालीच्या वकीलांसमोर एक भीष्मप्रतिज्ञा केली. सुदैवानं त्या वेळी बरोबर असलेल्या एका शत्रुपक्षातील पोरसवदा तरुणाने भाऊंच्या तोंडचे शब्द आणि त्या भेटीचे प्रत्यक्षदर्शी वर्णन टिपून ठेवले आहे. ते हस्तलिखित आज लंडनमध्ये आहे. आजवर पूर्णपणे अज्ञात असणारा तो प्रसंग मी मराठीत देतो आहे.

दत्ताजी शिंदे पडले ती जागा, त्या लढाईचे वर्णन शत्रूने केले आहे. साबाजी शिंदे यांचा पराक्रमही आजवर अज्ञात आहे. बुखारा इथे मिळालेल्या एका १२०० पानी हस्तलिखित ग्रंथात अशी उपयोगी २०० पाने आहेत.

माझ्याकडे जवळपास अशी ८ हस्तलिखिते जमली आहेत, जी आजवर कुणी अभ्यासली नव्हती. ते सगळं संगतवार लावून प्रकाशित करतो आहे.

वाहवा. खूपच छान असेल नवीन ग्रन्थ. वाट बघत आहे. बुखारा मधील हस्तलिखित ग्रंथात चित्रे आहेत का ?
हा प्रतिसाद लिहीताना सहज बुखारा - पानिपत असे सर्चिता 'पश्तून टाईम्स' मधील खालील लेख सापडला. मी वाचला नाही पण कदाचित उपयोगी असेलः
https://m.facebook.com/thepashtuntimes/photos/a.535668756629322/11630666...

कर्नलतपस्वी's picture

1 Oct 2022 - 9:55 pm | कर्नलतपस्वी

वाचण्यास उत्सुक आहे. जरूर घेऊन वाचणार. शुभेच्छा.

कर्नलतपस्वी's picture

1 Oct 2022 - 9:56 pm | कर्नलतपस्वी

वाचणार, शुभेच्छा.

धर्मराजमुटके's picture

20 Feb 2020 - 10:27 pm | धर्मराजमुटके

मराठे भलेही पानिपत युद्धात जिंकले असते मात्र तहात हरलेच असते.

चौकस२१२'s picture

21 Feb 2020 - 6:54 am | चौकस२१२

अनेक वर्षे पडलेला प्रश्न
पानिपतच्या आधी मराठे उत्तरेत जेवहा जिकंले तेव्हा तिथे राहिले का नाहीत? अप्लाय पुतण्या भाच्याला का नाही नेमले ? किंवा छत्रपतींच्या नातेवाईकांना ?
का तेव्हा पण "आमची कुठी शाखा नाही" असेच धोरण होते? ( दोन्ही छत्रपतींचे आणि पेशव्याचेही )
आज जरी बुंदेलखंडात किंवा बडोद्याला गायकवाड दिसतात तरी दिली च्या गादीवर मुघलांना काढून छत्रपतींना का नाही बसवू शकले.. कदाचित असे हि असेल कि हि झेप तात्पुरती यशस्वी ठरली तरी असे कायमचे प्रस्थापित होण्याएवढे संख्या बाळ नवहते? किंवा दृष्टी नव्हती ?
त्यामुळे आले लुटले आणि गेले असे म्हणले जाते !
क्षमा.. अर्धवट माहितीवर आधारित हा प्रश्न आहे

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Feb 2020 - 7:14 am | अनिरुद्ध.वैद्य

राज्य करायच असं धोरण होत. शिवाय चौथाई, बिना कष्टाची !

मराठ्यांच्या हातात इतकी लष्करी ताकद नव्हती की बाकी सर्व शत्रू एकत्र झाले तरी त्यांचा पराभव दिल्लीच्या बाहेर करू शकता यावा. त्या काळी दिल्लीच्या पूर्वेस मेरठ इत्यादी भागात पश्तून अफगाण रोहिले यांची वस्ती होती, त्यांच्या खाली शिया शुजा अयोध्या, लखनौ भागात होता. आग्र्याच्या जवळ सुरजमल जाट होता, पश्चिमेस जयपूरला माधोसिंग, कोधपूरला अभयसिंग होता. यातला प्रत्येकजण कधी ना कधी मराठ्यांनी दुखावलेला होता, कारण द्रव्यलोभ. फार काय, निझाम दक्षिणेत होता, तो पण आपल्याला मोगल बादशहाचा सुभेदार आणि रक्षक मानत असे. त्यामुळे एक मराठा जर मोगल सिंहासनावर बसला असता, तर त्याच्याविरुद्ध या सगळ्यांना लढाईस एकत्र येण्यास ते चांगले निमित्त होते.

थोडक्यात आजच्या भाषेत ते आघाडीचे वाजपेयी सरकार होते, संपूर्ण बहुमताने निवडलेले मोदी सरकार नव्हे, त्यामुळे बाकी पक्षांवर त्याला अवलंबून राहावे आवश्यक होते. महादजी शिंद्यांचा काळ म्हणजे संपूर्ण बहुमताचा काळ, १७९० नंतर फक्त इंग्रज हेच एक मराठ्यांसमोर तुल्यबळ सैनिकीदृष्ट्या राहिले होते.

चौकस२१२'s picture

21 Feb 2020 - 11:58 am | चौकस२१२

हा हे कळलं

चौकस२१२'s picture

21 Feb 2020 - 7:33 am | चौकस२१२

मग त्यासाठी आपलं माणूस तिथे नको का ठेवायला ? आणि चौथाई बिना कष्टाची? जिंकणे आणि मग तिथे टिकून राहणे यात कष्ट नाहीत? काय कळलं नाही बुवा

तुमची माहिती चुकीची आहे. कित्येक मराठा घराणी महाराष्ट्र सोडून त्या त्या प्रांतात जाऊन राहिली आणि तुम्ही म्हणता त्या प्रमाणे तिथे त्यांनी सत्ता कायम केली.

नावं सांगायची तर आत्ता मला आठवणारी म्हणजे हरजीराजे महाडिक दक्षिणेत, शहाजी राजांबरोबर कित्येक घराणी तंजावर प्रांतात होती. नारो शंकर दाणी यांनी झांशी शहर १७४२ मध्ये वसवले. रघुनाथ हरी नेवाळकर ज्यांच्या घराण्यात झाशीची राणी झाली, खांडेकर बुंदेलखंड येथे, गोविंद बल्लाळ खेर (बुंदेले) सागर येथे, शिंदे प्रथम उज्जैन नंतर ग्वाल्हेर, होळकर इंदूर अशी फार मोठी यादी आहे.

चौथाई हा प्रकार असा असतो की आधी ती बादशाह कडून मंजूर करून घ्यायची आणि नंतर १००% वसूल करून मग ७५% बादशहाला द्यायची. १७५० चा अहदनामा असाच होता. बादशाह सुखासुखी हा प्रकार करत नाही. त्यावेळी हे प्रांत रोहिले, अफगाण आणि अब्दाली यांनी व्यापले होते तेंव्हा वसुली करणे, स्थायिक होणे या आधी सैनिकी बंदोबस्त होणे आवश्यक होते, आणि नेमकी हीच कामगिरी सदाशिव राव भाऊ याना सांगण्यात आली होती. अब्दाली जर तह करून मराठ्यांचा हक्क मान्य करता तर लढाई झालीच नसती.

आणि रघुनाथरावांनी अटकेपार भरारी मारली म्हणजे लष्करीदृष्ट्या अब्दालीचा पराभव केला नव्हता. अब्दाली परत गेल्यावर त्याच्यामागे राघोबा पंजाबात गेले. अब्दालीचा कायमचा बंदोबस्त राघोबाना जमला नाही, आणि म्हणूनच भाऊला परत पानिपतावर लढावे लागले.

ठळक पणे ग्वाल्हेर वडोदरा आणि तुम्ही लिहिलेली ठिकाणे दिसतात परंतु मुघल बादशाह ला उडवून तिथे छत्रपती ( किंवा छत्रपतींचं नावे आपण ) असे कधी झालं नाही त्याबद्दल म्हणतोय मी

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Feb 2020 - 8:18 pm | अमरेंद्र बाहुबली

चौकस सर, हा प्रश्न मलाही पडला होता. पण दिल्ली ज्याच्या ताब्यात तो भारताचा राज्यकर्ता. दिल्ली ताब्यात घेतली असती तर सर्व बाजुने मराठ्यांवर आक्रमण झाले असते. मराठी सीमांच्या चारही बाजूला शत्रू असते. जशी आज चीनची अवस्था आहे तशीच मराठेशाहीची असती. शिवाय दिल्ली घेतल्यावर सिंहासनावर बसणार कोण? हा ही प्रश्न होताच.
मनो, बरोबर. मी कुठेतरी वाचलं की रघुनाथरावांना लाहोर मध्ये इराण च्या बादशहा कडून पत्र आलं की तिकडून तुम्ही या इकडून आम्ही येतो. अब्दालीचा कायमचा बंदोबस्त करून टाकूयात. तस शक्य झालं असतं तर..बरच.

चौकस२१२'s picture

27 Feb 2020 - 7:23 pm | चौकस२१२

शिवाय दिल्ली घेतल्यावर सिंहासनावर बसणार कोण? हा ही प्रश्न होताच.

त्यावेळचे छत्रपती ! दुसरे कोण?( कारण पेशव्यानीं कधीच छत्रपतींची सत्ता उलथून टाकायचा विचार केलेला दिसत नाही ( नेपाळ मधील इतिहास बघा शेवटचे जे राजे होते ते घराने ९ पिढ्यांपूर्वी पंतप्रधान होते ! ते असो
पण मग एकेकाळी महदंबा शिंदे जर एवढे ताकदवान होते तर त्यावेळी पण त्यांनी छत्रपतींना का नाही बसवले सिहासनावर
परिस्थिति अशि असावि कि खरंच एवढीं ताकद मराठ्यांच्यात नसावी, तसेच इतर हिंदू आणि शिख्न्च पाठिंबा हि नसावा ...
कोण जाणे .. जाऊदे

अर्धवटराव's picture

26 Feb 2020 - 10:46 pm | अर्धवटराव

एक पानिपतचा विजय इतिहासाव्र फार काहि प्रभाव टाकु शकला नसता असा चर्चेचा रोख आहे. आणि तो रास्त आहे. शिवरायांनी स्थापलेल्या मराठी राज्याने एका प्रबळ सत्तापीठाची नोंद भारताच्या राजकारणात झाली. पण इतीहासाला पूर्ण कलाटणी देण्यासाठी पानिपतच्या बरच आगोदरच्या 'जर-तर' ची मांडणी करयला हवी.

शिवरायांनी केवळ राज्य स्थापन केलें नाहि, तर त्याकाळाच्या मानाने अत्यंत क्रांतीकरक असे बदल घडवले. राज्यशासनाच्या दृष्टीने त्यातले सर्वात महत्वाचे बदल म्हणजे सैन्यबलाची संरचना, आणि दुसरे म्हणजे "साहुकार हे राज्याचे भूषण असती" हे व्यापार तत्व. मुख्य म्हणजे, या दोन बदलांचे उत्तम फ्युजन देखील महाराजांनी साधले. शिवरायांनी नौदल उभारले, शिवाय मर्चंट नेव्ही स्थापली. तोफा, दारुगोळा, इतर शस्त्रास्त्रांचे भंडार साठवले, आणि त्याकरता आंतरराष्ट्रीय म्हणता येईल असे करार देखील केले. उत्तम गुप्त्हेरांच्या भरोषावर अत्यंत धाडसी अशा सुरत लुटीसारख्या योजना आखल्या, आणि त्याच बरोबर जकात कराराची पाचर मारुन फिरंगी मालाच्या तुलनेत आपल्या लोकांच्या व्यापारी हितसंबंधांची काळजी घेतली.

शक्ती वाढवणे, ति शक्ती समृद्धीत परावर्तीत करणे, समृद्धीने समाजात स्थैर्य प्रस्थापीत करणे, आणि शक्तीने परत या स्थैर्याचे संरक्षण करणे... जगाच्या इतिहासात जि काहि राज्यं वर्धिष्णु झाली, कालौघात टिकुन राहिली, त्यांनी हिच पॉलिसी वापरली. महाराजांनी नेमकं तेच केलं. जर-तर चा कल्पना विस्तार करायचाच म्हटलं तर, भारताचा इतीहास बदलायच्या दृष्टीने, महाराजांची राज्यपद्धत, किमान तीन पिढ्या, अव्याहत चालायला हवी होती. त्याकरता प्रथमतः स्वतः शिवाजी महाराज आणखी किमान २५ वर्षे जगायला हवे होते. शक्यतो औरंगजेब महाराष्ट्रावर आक्रमण न करता परस्पर दिल्लीत मरायला हवा होता... किमान, औरंग्याच्या आक्रमणाचा सामना स्वतः शिवाजी महाराजांनी करायला हवा होता.

असो.

प्रचेतस's picture

27 Feb 2020 - 9:04 am | प्रचेतस

कुठे गायब होतात भो?
येत र्‍हावा इकडं.

अर्धवटराव's picture

27 Feb 2020 - 8:54 pm | अर्धवटराव

आधि लोकसभा निवडणुका.. त्यात मोदिला गादिवर बसवलं. मग काकांच्या आशिर्वादाने आपल्या उधोजींना मुंबईचं राज्य दिलं. तो तिकडे केजरी कुरकुर करत होता... म्हटलं हो एकदाचा दिल्लीचा शीयेम. ते होत नाहि तर तात्या येणार होते उसगावातुन. मग त्याची तयारी केली. उसंतच नाहि :प

प्रचेतस's picture

28 Feb 2020 - 9:49 am | प्रचेतस

=))

शाम भागवत's picture

27 Feb 2020 - 10:00 am | शाम भागवत

शिवाजी महाराज व पहिले बाजीराव यांना अजून २५ वर्षे आयुष्य पाहिजे होते.
औरंगजेब २५ वर्षे कमी जगता, तर दुधात साखर. :)

शाम भागवत's picture

27 Feb 2020 - 10:11 am | शाम भागवत

कुणाला किती आयुष्य असावं हे आपल्या हातात नाही. पण...

निदान, संताजी धनाजी यांच्यापैकी कोणीतरी औरंगजेबाच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस कापून आणण्यापेक्षा, औरंगजेबाचे मुंडके कापून आणले असते, तरीही खूप काही घडले असते.

प्रत्येक वेळेस, कोणाला तरी जिवंत सोडायचे व त्यानेच नंतर आपली वाट लावायची, असं सतत घडून कसं चालेल?

सिध्दी जोहराला प्रतापराव गुजरांनी सोडून दिल्यावर, त्यांना सरसेनापती पदावरून काढून टाकून, शत्रूशी कसं वागावं, ते खर तर शिवाजी महाराजांनी शिकवलेलं होतं.

आता ते कळस कापण्याचे व त्यावेळेस औरंगजेब नमाज पढत असल्याचे उल्लेख कल्पोकल्पीत असले तर मात्र....
जे घडलं तेच योग्य असं म्हणून गप्प बसायच. :)
असो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Feb 2020 - 1:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

औरंगजेब नव्हताच. काहीतरी गफलत झाली असावी किंवा त्याला सुगावा लागून त्यानं बस्तान हलवलं असावं असा अंदाज आहे.

प्रसाद_१९८२'s picture

28 Feb 2020 - 11:11 am | प्रसाद_१९८२

सिध्दी जोहराला प्रतापराव गुजरांनी सोडून दिल्यावर, त्यांना सरसेनापती पदावरून काढून टाकून, शत्रूशी कसं वागावं, ते खर तर शिवाजी महाराजांनी शिकवलेलं होतं.

--

प्रतापराव गुजरांनी ज्याला सोडले तो बेहलोल खान होता.
सिद्धीजोहर तो पन्हाळगडवाला.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Feb 2020 - 6:24 pm | अमरेंद्र बाहुबली

भागवत साहेब शंभ टक्के सहमत. मराठ्यांनी निर्णायक असे कुठले राज्य खालसा आणी व्यक्ती मारल्याच नाहीत. एकदा निजामाला भर युद्धात पाण्याची चणचण भासली तर मराठ्यांनी स्वतः पाणी पाठवले. भर म्हणजे मराठ्यांचे युद्ध निजमाबरोबरच चालू होते.

कानडाऊ योगेशु's picture

1 Oct 2022 - 7:47 pm | कानडाऊ योगेशु

आता ते कळस कापण्याचे व त्यावेळेस औरंगजेब नमाज पढत असल्याचे उल्लेख कल्पोकल्पीत असले तर मात्र....

शायिस्तेखानाची बोट कापण्याचा दिवस रमजानच्या शेवटच्या रोजाचा होता. महाराजांनी शत्रुला तिथे त्याच्या सणाबद्दल काही सूट दिली नव्हती. त्यामुळे औरंगजेब केवळ नमाज पढत होता म्हणुन संताजी/धनाजी ने त्याला सोडले असावे हे पटत नाही. आणि तसे मानणे हा औरंगजेबासारख्या पाताळयांत्री राजकारण्याचा अपमान आहे.

शाम भागवत's picture

28 Feb 2020 - 1:12 pm | शाम भागवत

हो.हो.
बहलोलखान.
:)
_/\_

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Feb 2020 - 6:26 pm | अमरेंद्र बाहुबली

पानिपत युध्दाआधीची परिस्थिती, युद्ध आणी युद्धानंतर चे परिणाम ह्यावर ह्या चॅनल ने छान विडिओ बनवलाय.एकदा पहाच.
https://youtu.be/qv1AtOsQ4NE

मनों चे पुस्तक आले का ?

कर्नलतपस्वी's picture

1 Oct 2022 - 10:20 pm | कर्नलतपस्वी

अबा लेख व प्रतीसाद वाचनीय आहेतच.
पानपतची लढाई कायमच एक मोठा अभ्यासाचा विषय आहे.
बरीच नवीन माहीती कळाली.

पानिपत विजया नंतर मराठयांनी दिल्लीत जल्लोश केला असता. त्यानंतर शहा आलम द्वितीय ह्याला दिल्लीच्या गादीवर बसवून शिंदेंना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी दिली जाती.

थोरल्या बाजीरावांना शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा बनवण्यास छ शाहूमहाराज यांनी मनाई केली होती. पुढे तो नानासाहेब पेशवे यांनी पुर्ण केला. असे वाचले आहे.

१८५७ स्वातंत्र्य समर वयोवृद्ध दिल्लीच्या बादशहाला पुढे करून लढले गेले.

एक मानसिकता बनली होती कदाचित की दिल्लीपती हाच भूपती.

या पार्श्वभूमीवर लेखकाने अंदाज बांधला असावा.

मराठी साम्राज्य हा एक जिव्हाळ्याचा विषय राहीला आहे.

कर्नलतपस्वी's picture

1 Oct 2022 - 10:20 pm | कर्नलतपस्वी

अबा लेख व प्रतीसाद वाचनीय आहेतच.
पानपतची लढाई कायमच एक मोठा अभ्यासाचा विषय आहे.
बरीच नवीन माहीती कळाली.

पानिपत विजया नंतर मराठयांनी दिल्लीत जल्लोश केला असता. त्यानंतर शहा आलम द्वितीय ह्याला दिल्लीच्या गादीवर बसवून शिंदेंना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी दिली जाती.

थोरल्या बाजीरावांना शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा बनवण्यास छ शाहूमहाराज यांनी मनाई केली होती. पुढे तो नानासाहेब पेशवे यांनी पुर्ण केला. असे वाचले आहे.

१८५७ स्वातंत्र्य समर वयोवृद्ध दिल्लीच्या बादशहाला पुढे करून लढले गेले.

एक मानसिकता बनली होती कदाचित की दिल्लीपती हाच भूपती.

या पार्श्वभूमीवर लेखकाने अंदाज बांधला असावा.

मराठी साम्राज्य हा एक जिव्हाळ्याचा विषय राहीला आहे.