कलावंतीण आणि प्रबळ

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
15 Feb 2020 - 5:05 pm

नमस्कार मंडळी
बरेच दिवस ऑफिस एके ऑफिस चालले असल्याने आणि ऑफिसात मिपा ब्लॉक केल्याने आताशा मिपावरचा वावर कमी झालाय. त्यामुळे खूप दिवसांनी मिपावर लिहीत आहे. त्यातच मागल्या वर्षी महामूर पाऊस झाल्याने फारसे बाहेर जाणे झालेच नाही (अपवाद डिसेम्बरमधील ट्रिपचा पण ते असो)

तर बरोबर एक वर्षापुरवी केलेल्या राजमाची ट्रेक नंतर जणू ट्रेक संन्यास जाहीर केल्यासारखी परिस्थिती झाली होती. कुठून काही बोलावणे येत नव्हते आणि कंबरदुखी वगैरे तक्रारी चालू असल्याने स्वत:च्या बळावर ट्रेक करणे जमेलसे वाटत नव्हते. अशामध्ये जेव्हा माझ्या मित्राने किल्ले भ्रमंती तर्फे मला कलावंतीण आणि प्रबळ एकदिवसीय ट्रेक बद्दल विचारले तेव्हा चातक पक्ष्याला पावसाचा थेंब तोंडात पडल्यावर कसे वाटेल तसाच काहीसा अनुभव आला.
एक तर हा त्याच्या सोसायटीमधील नेहमीचा ट्रेकचा ग्रुप होता. त्यामुळे त्यांचा आराखडा तयार होता, सर्व गडी क्रिकेट वगैरे खेळणारे त्यामुळे तयारीचे होते , म्हणजे एखादा कुणी मागे लटकला आणि पुढचा ट्रेक बोंबलला अशी शक्यता कमी होती. शिवाय मी बरेच दिवसांनी ट्रेक करत असल्याने मी लटकलो तरी खांदा देणारे मिळाले असते .थंडीचे दिवस संपायला अजून अवकाश होता.असे सगळे जमून आल्यावर माझी सीट पक्की करून टाकली.

तयारी करू म्हणता म्हणता शुक्रवार उजाडला आणि ट्रेक उद्यावर येऊन ठेपला. सकाळी ३ वाजता घर सोडून भोसरीला जायचे होते त्यामुळे रात्रीच सॅक वगैरे भरली. ३-४ लिटर पाणी, उन्हाची टोपी, खाण्याचे सामान आणि इतर आवश्यक तयारी करून अंथरुणाला पाठ टेकली. पण ३ वाजता उठायचे ह्या विचाराने शांत झोप काही लागेना.टप्प्या टप्प्याने बारा एक दोन अशी वेळ बघत बघत रात्र सरली आणि मी उठून मुखमार्जन चहा वगैरे उरकून बाहेर पडलो. प्रथम किल्ले भ्रमंती ग्रुपला फोन करून निघाल्याची वर्दी दिली. तोवर कायप्पा वर ट्रेकच्या ग्रुपचे शुभ सकाळचे संदेश चालू झालेच होते. लगे हाथो देशी परदेशी मित्रांना पण संदेश टाकून दिले आणि मी इतक्या रात्री उशीरा (किंवा सकाळी लवकर) जागा कसा याबद्दल यूएस कॅनडा युके आणि ऑस्ट्रेलियाच्या मित्रांना वाटलेले आश्चर्य एन्जॉय केले .

पहाटेच्या शांत वातावरणात आणि तुरळक रहदारीत पुणे मेट्रो वाले मात्र ठिकठिकाणी बेरिकेड्स लावून जोमात काम करत होते. त्यामुळे एक दोन न ठरवलेले वळसे घेऊन अंदाजाने पुन्हा रस्त्याला लागलो आणि एकदाचा भोसरीला येऊन पोचलो. यथावकाश ग्रुपची मित्रमंडळी एक एक करून जमा होऊ लागली आणि ओळखी पाळखी वगैरे कार्यक्रम झाला.तोवर आमचे टेम्पो ट्रॅव्हलर आलीच.
पटापट मंडळी स्थानापन्न झाली आणि गाडि मुंबई पुणे हायवेला धावू लागली.वाटेत लोणावळ्याच्या फूड मॉलमध्ये नाश्ता करून पुढे निघालो आणि अंदाजे ७ च्या सुमारास खालापूर टोलनाक्यापुढे हायवे सोडून गाडि शेडुंग गावात घुसली.डांबरी सडकेने पुढे जात शेवटी एका ठिकाणी गाडि रस्ता सोडून उजवीकडे वळली आणि वारडोली गावाकडे धावू लागली. तेव्हढ्यात गावातून येणारी एस टी भसकन समोर आली. तिला बगल देत नेटाने पुढे जात राहिलो आणि शेवटी एकदाचे ७.३० च्या सुमारास गावात पोचलो.
सूर्य नुकताच डोकावू लागला होता आणि गावातून पदरगड किंवा कलावंतीण सुळक्याचे तसेच बाजूच्या प्रबळगडाचा मनोरम दर्शन होत होते.
a
आजच्या दिवसात दोन्ही किल्ले साधायचे असल्याने फार वेळ ना घालवता झपाझप पावले टाकायला सुरुवात केली.सुरुवातीला थोडीफार चढण पूर्ण केली आणि एक चेकनाका आला. २-३ स्थानिक मुले कुठल्यातरी संस्थेचा टी शर्ट घालून बसली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नोंद वहीत नोंद करत होती, मला तेव्हा फारसे लक्षात आले नाही पण कुठे डोक्याला त्रास करा असे म्हणून माहिती भरली आणि झपाझप पुढे पावले टाकली.
d

a
रस्ता फार कठीण नव्हता पण चढण मात्र सतत होती. तासाभराच्या चढणी नंतर प्रबळमाची गावात आलो आणि एक छोटा धक्का बसला. एका घराशेजारी फ्लेक्स वर सलमान खानचा स्थानिकांच्या गळ्यात गळे घालून फोटो होता.
a
वस्तुतः ती एका हॉटेलची जाहिरात होती आणि चहा नाश्ता जेवण चिकन भाकरी वगैरे मिळेल असे लिहिले होते. म्हणजे इथे विकांताला ट्रेकरेतर लोकांची जत्रा भरत असणार असा विचार करून पुढे निघालो.
a
हळूहळू उंची वाढत होती आणि रहदारीचे आवाज मागे पडून जंगलातील पक्ष्यांचे आवाज येऊ लागले होते. दूरवर हायवेच्या बाजूला उभारलेले उंच टॉवर आणि कारखाने दिसत होते.
a
वाटेत काही ठिकाणी स्थानिक आदिवासी लोकांनी लावलेले सरबत चहा वगैरेंच्या टपऱ्या दिसत होत्या. एक दोन वळणे पार करून पहिल्या टप्प्यावर आलो.दूरवर दिसणारा कलावंतीण सुळका आता नजरेच्या टप्प्यात आला होता.
a
उजव्या बाजूला "ये शाम मस्तानी " गाण्यात दाखविल्याप्रमाणे रेलिंग दिसत होते तर समोर एक कॅम्प साईट तयार केलेली दिसत होती.म्हणजे बरीचशी जागा सपाट करून बाजूने जायला यायला रस्ता ठेवला होता.
a
हा टप्पा पार झाल्यावर पुन्हा पुढे चढणीला लागलो.तासभर होऊन गेला होता आणि कलावंतीण आणि प्रबळ मधील खाच आता स्पष्ट दिसु लागली होती.पण अजूनही त्या खाचेत जायचा मार्ग कुठून असेल हे लक्षात येत नव्हते.मात्र अजून एक वळसा घेतला आणि दगड धोंडे असलेली नळीची वाट समोर आली.

a
या नळीतून धसक फसक करत अर्ध्या तासात त्या खाचेत पोचलो.इथे या खाचेत एका आदिवासी बाईने मोठ्या धीराने आपले दुकान लावले होते आणि कोकम लिंबू सरबत वगैरे विकत होती. इथून डावीकडे पदर किंवा कलावंतीण आणि उजवीकडे प्रबळ गड होता.
a
सकाळी ९.३० चा सुमार होता आणि सूर्य थोडासा तापू लागला होता त्यामुळे घाई करत कलावंतीण च्या दगडी पायऱ्यांना भिडलो.
a

a
तुनळीवर बघताना जेव्हढे कठीण वाटले तेव्हढे काही आत्ता प्रत्यक्ष चढताना वाटत नव्हते.फार वर्षापुर्वी मी कर्जत खांडस मार्गे कलावंतीण केला होता पण त्यावेळी आम्ही एका विहिरीच्या बाजूने वर चढलो होतो आणि चिमणी क्लाइंब वगैरे करून एका ठिकाणी येऊन अडकलो होतो आणि परत फिरलो होतो. तो रस्ताही आता आठवत नव्हता. लवकरच पायऱ्या संपल्या आणि शेवटचे दगडी शिखर समोर आले.
a
इथेही त्या संस्थेची २-३ मुले रोप वगैरे लावून सगळ्यांना वर जायला आणि खाली उतरायला मदत करत होती. आता मला लक्षात आले की मध्ये जी कॅम्प साईट तयार केली होती त्यांचे हे सर्व लोक होते. आणि त्यांच्या कडे आलेल्या पर्यटकांना मदत करायला थांबले होते. पण ते सगळ्यांनाच मदत करत होते आणि त्यांच्या शिवाय हा टप्पा करताच आला नसता.
a
त्यामुळे त्यांचे आभार मानून आणि भरपूर फोटो सेशन वगैरे करून पुन्हा खाली आलो.धुकट असले तरी वरतून चंदेरी पेब माथेरान मलंग वगैरे किल्ले ओळखू येत होते. उना तापू लागले असल्याने पायर्यांचा टप्पा पार करून पुन्हा प्रबळ च्या खाचेत आलो. १०.३० वाजले होते. कोकम सरबताचा आस्वाद घेऊन उजवीकडची प्रबळची वाट पकडली.
a
आम्ही डोंगराच्या पश्चिमभिंतीला लागून चाललो होतो त्यामुळे ऊन जाणवत नव्हते. ठिकठिकाणी वाळलेले गवत आणि वरून पडलेले दगड धोंडे पावले जपून टाकायला सांगत होते.
a
अर्धा तास चालल्यावर डावीकडे वळणारी चढण सुरु झाली आणि अजून एका मावशींनी तिथे टाकलेली टपरी सामोरी आली.तशीच वरची दिशा पकडून चढत राहिलो.आता सगळ्यांचा कस लागत होता. छातीचे भाते धपापत होते आणि पाण्याची वारंवार गरज लागत होती.
a
७० अंशाची खाडी चढण आणि वाटेत पडलेले दगड धोंडे चाल अजूनच खडतर बनवत होते. मात्र सूर्य अजूनही डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असल्याने ऊन लागत नव्हते.अशातच एक पडझड झालेल्या दरवाजाचे अवशेष समोर आले आणि प्रबळगडाची चाहूल लागली.
a
अजून अर्धा तास चाल केल्यावर गडमाथ्यावर प्रवेश झाला आणि पुन्हा एक टपरी समोर आली. इथे चहा पिऊन मंडळी ताजीतवानी झाली आणि गडभ्रमंतीला निघाली.
a
गडाचा घेरा प्रचंड असला तरी वर बघण्यासारखे फारसे अवशेष उरलेले नाहीत.
a
a
ठिकठिकाणी पाट्या लावलेल्या आहेत त्या आधारे काळा बुरुज बघायला पुढे निघालो. वाटेत एक सुकलेले तळे आणि छोटेखानी गणेश मंदिर बघून पावले काळा बुरुजाकडे वळवली.
a
वाट घनदाट जंगलातून जात असताना अचानक ३-४ पडक्या वाड्यांचे अवशेष समोर आले.
a
ठिकठिकाणी वाढलेल्या झाडांमुळे त्यांच्या भिंती ढासळत चालल्या आहेत. पण काही ठिकाणी कोरीव काम टिकून आहे.दाट झाडीमुळे अजून थंडावा होता त्यामुळे पुढे सटकलो.
a
पण लवकरच झाडी संपली आणि उन्हे लागू लागली. डावीकडे माथेरानचा डोंगर दिसू लागला.
a
चालत चालत काळ्या बुरुजावर येऊन पोचलो. हे प्रबळचे एक टोक आहे. भर दुपारच्या टळटळीत उन्हात समोरचा इर्शाळगड आणि मोरबे धरणाचे पाणी खुणावत होते.
a
a
पण आता पोटात कावळे कोकलू लागले होते त्यामुळे जवळच्या टाक्यातल्या थंडगार पाण्याने हात पाय धुवून झाडांच्या सावलीत बरोबर आणलेल्या शिदोऱ्या सोडल्या आणि पोटपूजा केली.
a
रात्री अपूर्ण झालेली झोप, सकाळपासून केलेली पायपीट आणि टळटळीत ऊन यांचा परिणाम म्हणून डोळ्यांवर झापड येऊ लागली. पण एकाच दिवसात ठरल्याप्रमाणे दोन किल्ले यशस्वीपणे सर केल्याचे समाधान काही औरच होते.याचसाठी केला होता अट्टाहास अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती.आता दुपारचे ३ वाजले होते आणि आलो तेव्हढे अंतर पुन्हा खाली उतरून जायचे होते. शिवाय गाडी घेऊन पुणे गाठायचे होते त्यामुळे फार वेळ न दवडता परतीची वाटचाल सुरु केली ते पुढचा ट्रेक कुठला करायचं याची चर्चा करतच.<समाप्त>

प्रतिक्रिया

सतिश पाटील's picture

15 Feb 2020 - 5:42 pm | सतिश पाटील

३ वर्षांपूर्वी मोठ्या जोशात ह्या ट्रेकला गेलो होतो, पण जेव्हा कलावंतीण ची ती उभी चढण लागली आणि तोल जाऊ लागला , असे वाटत होते कि एखाद्या उभ्या शिडीवर चढतोय. तिथूनच माघारी फिरलो ते हि बसून. वाटेत बरेच माझ्यासारखेच पार्शवभाग घासत उतरत होते.

जिथे पहिली टपरी लागते डाव्या बाजूला तिथून खाली पहिले असता डोंगराला अगदी खेटून जो भला मोठा बंगला दिसतो तोच सलमानचा अर्पिता फार्म्स..
आजू बाजूला तुम्हाला सुनील गावस्कर आणि इतरांचे देखील बंगले दिसतील. एक मोठे मैदान देखील दिसेल स्टेडियम सारखे तेही सलमानने स्थानिक पोरांसाठी बांधून दिलाय.
स्थानिक सांगतात कि तो आम्हाला खूप मदत करतो.

AKSHAY NAIK's picture

15 Feb 2020 - 6:27 pm | AKSHAY NAIK

सुंदर फोटो.

झिंगाट's picture

16 Feb 2020 - 12:06 am | झिंगाट

फक्त तुमची काहीतरी गफलत होतेय. तो खांडस जवळचा पदरगड किंवा कलावंतीनचा महाल आणि हा प्रबळगड जवळचा कलावंतीणसुळका वेगळा. पदरगड वर जायला खांडस भीमाशंकर गणेश घाट मार्गावर लागणाऱ्या विहिरिनंतर मार्ग आहे आणि चिमणी climb करावे लागते. त्यापुढे एक कठीण कातळ टप्पा आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Feb 2020 - 6:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

तरीच यावेळी मला ओळखीच्या काहीच खाणाखुणा सापडल्या नाहीत. पण मध्ये अनेक वर्षे गेल्याने खुणा बदलु शकतात किवा मी विसरलो असेन असे वाटले.

फारच अवघड आहेत सुळक्याच्या पायऱ्या. तशाच गोरखगडाच्याही.
पण इकडच्या ठाणे कल्याण पनवेलवाल्यांसाठी छान ट्रेक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2020 - 12:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो आणि वर्णन आवडले.

-दिलीप बिरुटे

दुर्गविहारी's picture

16 Feb 2020 - 1:37 pm | दुर्गविहारी

उत्कृष्ट लिखाण ! या कलावंतीण सुळक्याला पायथ्याशी एक आरपार नेढे आहे, त्यात चढून नेढ्यातून पार होउन पलीकडे उतरतायचे असा एक ट्रेक वाचला होता. त्याची उत्सुकता आहे. शिवाय प्रबळगड ते कलावंतीण सुळका असे लोखंडी दोरावरुन व्हॅली क्रॉसिंगची अ‍ॅक्टिव्हीटी केली जाते.

झिंगाट's picture

17 Feb 2020 - 5:05 pm | झिंगाट
झिंगाट's picture

17 Feb 2020 - 5:05 pm | झिंगाट
झिंगाट's picture

17 Feb 2020 - 5:06 pm | झिंगाट
झिंगाट's picture

17 Feb 2020 - 5:06 pm | झिंगाट

कलावंतीण सुळका च्या अर्ध्या भागात आहे. प्रबळगड आणि कलावंतीण च्या खिंडीतून त्या नेढ्याच्या खाली पोचता येतं. पण शेवटचा ३० फुटी टप्पा रोप असूनही खूप कठीण आहे. अजिबात holds नाहीयेत. त्यामुळे सुळक्याच्या शेवटच्या रोकपॅच च्य खालून तो रस्ता डावीकडे जातो तिथून rappel करता येतं. त्या बाजूला बांधीव पायर्या आणि काही घरांची जोती आहेत. ती जाेती पार करून पुढे गेलं की शेवटचा rappelling point आहे. तिथे bolts मारलेले आहेत. त्या बोल्टवरून ७०-८० फुटांचा overhang rappel केल्यावर आपण नेढ्यासमोर ५-७ फुटांवर लटकत असतो. तिथे rappel किंवा बिले होल्ड करून स्विंग करून नेढ्यात पोचावे लागते. अर्थात पहिला पोचला की तिथे रोप सेटअप करून बाकीच्यांना खालून वर घेता येते बिले. खतरनाक अनुभव आहे तो overhang rappelling cha. तुफान वारं असतं

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Feb 2020 - 6:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

प्रचेतस's picture

17 Feb 2020 - 9:38 am | प्रचेतस

खूपच छान लिहिलंय. तुम्ही प्रबळगडावरुन दिसणारे कलावंतीण सुळक्याचे दृश्य बघितले नाहीत वाटते. वरुन तो सुळका फारच अभेद्य दिसतो.

ब्रिटिशांनी माथेरान हे हिलस्टेशन निर्माण करण्याआधी प्रबळगडाची निवड केली होती. पण गडावर पाणी अत्यंत कमी म्हणून माथेरानची निवड झाली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Feb 2020 - 6:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

अतिरिक्त माहितीबद्दल धन्यवाद.
आम्ही प्रबळ च्या विरुद्ध टोकाला म्हणजे काळाबुरुजावर गेलो होतो त्यामुळे प्रबळवरुन कलावंतीण सुळका बघता आला नाही. हाती जास्त वेळ असता तर कदाचित बघुन झाला असता.

कंजूस's picture

17 Feb 2020 - 6:04 pm | कंजूस

मला तरी माथेरानच्या डोंगरावरची झाडे आणि प्रबळगडावरची झाडे यांत खूपच फरक वाटला. प्रबळवर जे राठ गवत आहे ते भयानक आहे. हरवण्याची शक्यता आहेच. त्यामुळे फार भटकलो नाही. तेव्हा रूट ट्रेसिंग करणारे app नव्हते।

तिकडे ड्रोन फिरवून विडिओ काढा कुणीतरी.

चौथा कोनाडा's picture

24 Feb 2020 - 5:22 pm | चौथा कोनाडा

भारी आहे, व्हिडियो !

प्रबळगडावरून दिसणारा कलावंतीण सुळकाt

कंजूस's picture

20 Feb 2020 - 8:48 pm | कंजूस

हा फोटो भारी.

चौथा कोनाडा's picture

24 Feb 2020 - 5:20 pm | चौथा कोनाडा

भन्नाट भटकंती धागा, फोटो देखील सुंदर ! थरारक मजा आली वाचताना.

असल काय करायचं माझ धाडस नाही हे नक्की.असेल सुळके वगैरे चढताना बघून विशिष्ट अवयवातून अनाकलनीय तरंग जातात.

ज्योति अळवणी's picture

17 Mar 2020 - 8:47 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम वर्णन. आता ट्रेक करायची इच्छा उरली नाही. मात्र तुम्ही टाकलेले फोटो बघून उत्सुकता नक्की निर्माण झाली आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Mar 2020 - 7:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

उत्सुकता निर्माण झाली असेल तर पावती मिळाली

कुमार१'s picture

19 Oct 2021 - 7:52 pm | कुमार१

फोटो आणि वर्णन आवडले.