शेगाव सोडण्यास साधारण दुपारचे १२ वाजत आले होते. शेगाव ते माहूर अंतर साधारण २०० किमी असल्यामुळे चार ते पाच तासात माहूर मध्ये पोहचू असे असे ग्रहीत धरले होते. मात्र शेगाव ते माहूर हा रस्ता माझ्या ड्रायविंग ची परीक्षा पाहणारा होता असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. गुगल वाल्या काकूंनी रेकमेंड केल्यामुळे मी शेगाव-उमरखेड-वाशीम-पुसद-माहूर हा मार्ग निवडला. शेगाव सोडल्यानंतर साधारण पन्नास एक किमी रस्ता चांगला वाटला. मात्र त्यानंतर रस्त्यांची अर्धवट चालू असलेली कामे आणि हातभर खड्डे यांचा सामना करीत मार्ग काढावा लागला.
सकाळी लवकर जेवण झाल्यामुळे थोडासा सुस्तावा जाणवत होता त्यामुळे एके ठिकाणी चहा घेवून पुढील प्रवास चालू ठेवला. आता माहूर येईपर्यंत कोठेही थांबायचे नाही असे निश्चित केले. कुटुंबासमवेत अनेक विषयांवर गप्पा मारत प्रवास चालू होता. संध्याकाळी चार च्या सुमारास रस्त्यावर भल्यामोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचा कळप जाताना दिसला. नजर जाईपर्यंत मेंढ्या आणि शेळ्या दिसत होत्या. त्या मेंढ्यांना काबूत ठेवण्यासाठी पाच पंचवीस कुत्री आणि यासर्वांवर नजर ठेवण्यासाठी काही माणसे असा खूप मोठा लवाजमा अगदी कशाचीही तमा न बाळगता त्यांच्या निर्ढावलेल्या संथ गतीने पुढे जात होता. माझी तीन वर्षांची नुकतीच शाळेत जाणारी मुलगी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेंढ्या पाहून शीप-शीप असे ओरडू लागली. तिला भलती मजा वाटत होती. मात्र झालेल्या traffic मुळे जीव वैतागून गेला होता. त्यातही काही निष्णात मंडळी गाडीचा होर्न वाजवत त्या मेंढ्यांच्या कळपातून वाट काढत पुढे सरकत होती. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरी वर गरम कांदा भजी काढणे चालू होते. मग काय घेतली गाडी बाजूला आणी चहा सोबत गरम कांदा भजी वर मनसोक्त ताव मारला.
अर्धा तास या सगळ्या प्रकारात गेल्यानंतर रस्ता मोकळा झाल्याचे दिसले. त्यामुळे वेळ न दडविता प्रवास चालू ठेवला. माहूर ला पोहचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले. अंधार पडल्यामुळे आज काही रेणुका मातेचे दर्शन होणार नव्हते. त्यामुळे माहूरगडा च्या पायथ्याशी असलेल्या गावात एका हॉटेल मध्ये मुक्कामाची सोय केली. रात्रीचे जेवण घेवून लवकर झोपी गेलो.
दिवस ०४/०२/२०२० माहूर दर्शन आणी लातूर कडे प्रस्थान
आदल्या रात्री ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून दर्शन घेणे आणि शक्य तितक्या लवकर लातूर कडे प्रयाण करणे असा दिनक्रम ठरविला होता. त्याप्रमाणे आम्ही कुटुंबीय सकाळी सातच्या सुमारास तयार होऊन हॉटेलच्या बाहेर पडलो. सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न वाटत होते. गड चढण्यापूर्वी खाली एका चौकात चहा घेतला आणी गड चढण्यास सुरवात केली. वर जाण्यासाठी सिमेंटचा अगदी सुंदर रस्ता बनविण्यात आला आहे. अगदी दहा मिनिटात आमी रेणुका मातेच्या मंदिराजवळ येवून पोहचलो. मंदिराजवळ अनेक वानरे होती. माझी मुलगी त्यांना पाहून घाबरली आणि मला बिलगून बसली. रेणुकामातेचे नाव घेत पायऱ्या चढण्यास सुरवात केली. सोबत आई वडील आणी कडेवरील मुलगी यांना घेवून पायऱ्या चढावयाच्या असल्यामुळे मध्ये थोडे थोडे विश्राम घेत वर पोहचण्यास साधारण पंधरा एक मिनिटे लागली. मंगळवार चा दिवस असून देखील म्हणावी इतकी गर्दी मंदिरात नव्हती. अगदी काही क्षणात आम्ही देवीच्या गर्भगृहात प्रवेश केला. रेणुकामातेचे ते भव्य रूप पाहून अगदी भरून पावलो. बराच वेळ आई वडिलांसोबत रेणुकामातेसमोर बसून मन अगदी प्रसन्न वाटत होते.
मंदिराबाहेर येवून थोडा वेळ काही छायाचित्र काढण्याचा मोह झाला. ती इथे डकवीत आहे. सुंदर निसर्गाचे ते मोहक रूप पाहण्यात एक तास गेला. त्यानंतर पायऱ्या उतरून आम्ही खाली उतरलो. आणी रेणुकामातेच्या मंदिरापासून साधारण ३ किमी वरील दत्त शिखर चे दर्शन घेनेसाठी रवाना झालो. दत्त शिखर नावाप्रमाणे एका उंच शिखरावर आहे. अर्थात गाडी मंदिरापर्यंत जात असल्यामुळे काही अडचण नव्हती. भगवान दत्तात्रेय या ठिकाणी निद्रेसाठी येतात अशी आख्यायिका त्यामुळे ऐकण्यास मिळाली. भगवान दत्तात्रेयांची जागृत धुनी देखील येथे आहे. दत्तशिखर मंदिर तसे मोठे आहे. माहूर ला आल्यावर येथे निश्चित भेट द्यायला हवी. यानंतर आम्ही आमचा मोर्चा दत्तशिखर मंदिरापासून २ किमी वर असलेल्या अनुसया माता मंदिराकडे वळविला. येथे पायऱ्या खड्या असल्यामुळे आणि पायऱ्यांची संख्या बरीच असल्यामुळे मी आणी माझे वडील माझ्या मुलीसोबत खाली थांबलो.
अर्ध्यातासानंतर आई आणि माझी पत्नी दर्शन घेवून खाली आल्या. त्या दोघी येईपर्यंत मी मुलीला घेवून खाली असलेल्या माकडांचे खेळ पाहत वेळ काढला. आता दुपारचे ११ वाजत आले होते. आम्ही हॉटेल मध्ये पोहचलो. सर्व सामानाची आवरा आवर करून माहूर सोडण्यास १२ वाजून गेले. जेवण रस्त्यात कोठेतरी करण्याचे ठरवून माहूर मधून प्रस्थान केले. या दोन तीन दिवसात कुटुंबासमवेत घालविलेला वेळ खूपच अविस्मरणीय ठरला. मागील दोन लेखांत मिपाकर मंडळींनी दिलेली दाद आणी श्री कंजूस साहेब यांनी छायाचित्र टाकण्याबाबत केलेले मार्गदर्शन यामुळे पुढील लेखन करण्यास खूप उर्जा मिळाली. लवकरच कॉलेज मधील मित्र मंडळींसोबत तिरुपती येथे जाण्याचा बेत आखला आहे. तो अनुभव देखील आपणासोबत नक्की share करीन. सर्व मिपाकर मंडळींचे पुन्हा एकदा आभार.
समाप्त
वाचने
12090
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख छान.
प्रतिसादाबद्द्ल खूप आभार.
In reply to लेख छान. by कंजूस
माहूर खूप पूर्वी केलंहोतं.
धन्यवाद !
In reply to माहूर खूप पूर्वी केलंहोतं. by प्रचेतस
छान प्रवास वर्णन
मंदिराच्या वेळा, राहण्याची सोय
In reply to छान प्रवास वर्णन by श्वेता२४
१ ) blogger dot com उघडा.
नक्की प्रयत्न करीन.
खुपच छान लिखाण !
खुप खुप आभार !
In reply to खुपच छान लिखाण ! by दुर्गविहारी
माहूरगड म्हणजे मामाचा गाव,
"डोकेबाज" सर्वधर्म समभाव