✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

असा प्रवास होणे नाही...

ब
बेंगुताई यांनी
Mon, 11/04/2019 - 22:34  ·  लेख
लेख
झाली! दिवाळी झाली.पुन्हा कामधंद्याला लागावं म्हणून पुण्याचा परतीचा प्रवास सुरु झाला.प्रवासाची सुरुवातच सकाळचा गजर बंद करून साखरझोपेत विरून जाण्याने झाली.उठून पाहिलं तर बाहेर धोधो पाऊस?मग आईला हळूच म्हटलं उद्या जाऊ का?तर आई लगेच म्हणाली नाही जा तू, उद्या पण पाऊस असला म्हणजे?मग काय घेतल्या बॅगा आणि सोडलं बाबांनी बुलडाण्याच्या बसस्थानकावर.(आम्हा बुलडाणेकरांना लालपरीशिवाय पर्यायच नाही,कारण उंचावर असल्यामुळे ना रेल्वे ना विमानतळ) जळगांव जामोद-पुणे गाडी निघालीच होती, कंडक्टर काकांना बाबांनी हाताने खूण केली पण काकांनी चक्क पाहिल्याचं न पाहिल्यासारखं केलं हो!मग काय स्वतःतला उसेन बोल्ट जागा करत मागून जोरजोरात गाडीचा पत्रा ठोकत गाडी पकडली. गाडीत चढली पण जागा?अहं , जागाच नाही (आता कळलं कंडक्टर काकांनी का पाहिल्याचं न पाहिलं केलं ) माझ्याकडे आणि त्यापेक्षा माझ्याकडे असलेल्या सामानाकडे बघूनच सगळ्यांनी माना फिरवल्या आणि काही जण तर मस्त बेडकासारखे मांड्या फुगवून बसले.तरी आईला सांगत होती नको तो चिवडा, ते लाडू,अन त्या चकल्या.पण ऐकेल ती आई कुठली!बरं वर सामान ठेवायला पण कुठेच जागा नाही.शेवटी एका जोडप्याने (मुस्लीम) स्वतःजवळ बाळ असूनही जागा दिली (धर्म - माणुसकी) दुसरं काय?जागा मिळताच धाड या गावाजवळ मुसळधार पाऊस सुरू झाला(जणू काही पाऊसही म्हणतोय-महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिल्याशिवाय जाणार नाही...मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन... ) इकडेतिकडे नजर फिरवली तर शेजारची छोटी मुलगी कुतूहलाने माझ्याकडे पाहात होती,मी पाहताच ती आईच्या पदरात लपली.त्या छोटया जीवाला कुठे घेणंदेणं होतं कोणाला जागा मिळो अथवा न मिळो ते स्वतः राजसारखं आईच्या कुशीच्या सिंहासनात विराजमान होतं.थोड्याअंतरावरचं खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे(पाणी साचल्यामुळे)लालपरीने जोरदार झटका मारला आणि तेवढा झटका बाजूच्या बाईच्या पिशवीतून सिताफळं बाहेर येण्यासाठी पुरेसा होता.घ्या,सगळ्या गाडीत सिताफळचं सिताफळं! (अगदी शेवटच्या बाकापर्यंत,जणू काही पकडापकडी खेळावी तशी पळत होती) कोणी परत केली,कोणी खिशात घातली,लहान लेकरं निरागसतेने देताना त्यांच्या मायबापांनी डोळे वटारून हिसकावून घेतली आणि बॅगेत कोंबली.कसंबसं करत औरंगाबाद आलं आणि त्या जोडप्याला शुक्रिया अदा केला आणि ते खाली उतरले.मी सुटकेचा निश्वास टाकला,आता ऐसपैस जागा मिळाली आणि आपण मस्त मोबाईल वर काही तरी बघत बसू या स्वप्नात असतांनाच एक जाडजूड बाई पोरगं घेऊन माझ्याजवळ आली आणि धाडदिशी खाली बसली.थोडा वेळ शांततेत गेला. औरंगाबाद-नगरच्या मध्ये गाडी जेवणासाठी अर्धा तास थांबली.निघताना धनगर जसा जातांना आपल्या मेंढ्या मोजून घेतो तसे कंडक्टर काकांना एकेकाला बोलावून आणता आणता नाकी नऊ आले.वरून बाया-"आव्हो काई जेऊ बिऊ देता का नाय?"असं जोराजोरात ओरडत होत्या.असं करत करत गाडी नगरला आली आणि... पंक्चर झाली. अरे देवा!दुष्काळात तेरावा महिना,सगळ्यांनी नाकं मुरडली.मग सगळ्यांना खाली उतरवून जमेल त्या गाडीत कंडक्टर काकांनी बसवायला सुरुवात केली. आधीच उशीर झाला म्ह्णून मी घाईघाईत शिरपूर -पुणे गाडीत चढली,तर तोबा गर्दी! मला माझी मीच सकाळची आठवली.पुन्हा तेच!!! मग ड्रायव्हर काकांपाशी केबिन जवळ खाली बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही.म्हटलं जेवढे विघ्न यायचे तेवढे येऊन गेले आता निवांत झोपावं.तर ही नवीन गाडी पुन्हा नाश्त्यासाठी थांबली(अर्धा तास) म्हटलं काय कटकट आहे लेकाची! या गाडीतील प्रवाशांना मात्र बोलवायची गरज भासली नाही एव्हाना त्यांनाच घरी जायची गडबड झाली असावी.उलट कंडक्टर काकाच बीडीचे झुरके घेत उशीरा आले.मग हळूहळू गाडी शिरूर कारेगाव रांजणगाव असं करत करत मस्त जात होती,आणि मग आलं... शिक्रापूर.जणू आज देवाला माझी परीक्षा पाहण्याची लहरच आली होती.ट्राफिक.. हुश्श!! अब क्या?बैठो आरामसे। पाऊण तास एकाच जागी. इतकावेळ बसलीही असती एकाजागी..पण मोबाइलला रेंज नव्हती काय करणार? घड्याळात बघितलं 8:15 वाजले आणि होस्टेल चा इन टाइम 9:30.म्हटलं अजून तर ट्राफिक चा बाप वाघोली तर यायचचं आहे. लगेच माझ्या लोणीकंद ला राहणाऱ्या काकांना फोन करून अंदाज विचारावा म्हटलं जाईन की नाही स्टेशन पर्यंत वेळेत ते म्हणाले,बाळा! हे पुण्याचं ट्राफिक आहे काहीच सांगता येत नाही! मग तर विषयचं संपला,मग काय? काका,म्हणाले ये इकडेच. तुळापूर फाट्यावर उतरताच पावसाने माझं जंगी स्वागत केलं,जणू माझी वाटचं पाहत होता...(आम्ही तुमच्या पेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत असं म्हणणाऱ्यांना आम्ही एकचं पाहिलाय पण भारी पाहिलायं असं म्हणावसं वाटलं त्या वेळी) अश्या प्रकारे पिशव्या घेऊन (फराळाच्या) चालू झाला एक नवीन प्रवास...मला तर चांगलाच आलाय अनुभव..तुम्हाला आलाय का कधी??
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
13083 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

भयानक!

जव्हेरगंज
Mon, 11/04/2019 - 23:03 नवीन
भयानक! वाचता वाचता भोवळ आली!! अशा वेळी खाजगी ट्रेव्हल बुकिंग वगैरे नसते काय? सणासुदीला लालपरी म्हणजे डेंजरच!
  • Log in or register to post comments

पुढल्या वेळी नक्की खाजगी

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:35 नवीन
पुढल्या वेळी नक्की खाजगी ट्रॅव्हलचा विचार करेन...प्रतिक्रिये साठी धन्यवाद...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

Reservation करायचे होतेत

रीडर
Tue, 11/05/2019 - 09:37 नवीन
Reservation करायचे होतेत
  • Log in or register to post comments

पुढल्या वेळी नक्की...

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:36 नवीन
पुढल्या वेळी नक्की... प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रीडर

बाबाऊ!

जेम्स वांड
Tue, 11/05/2019 - 10:31 नवीन
प्रवास म्हणायचं का चेष्टा! बाकी थँक्स टू अंबानीजी ह्याच्या तोडीचा दिव्य प्रवास 3 तासात अनुभवायचा असला तर सरळ सातारा रोडला लागावे फक्त पुणे ते सातार पर्यंत
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..!

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:38 नवीन
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

साखर झोपेत असताना आजच्या ऐवजी

लोनली प्लॅनेट
Tue, 11/05/2019 - 11:25 नवीन
साखर झोपेत असताना आजच्या ऐवजी उद्या जाण्याचा निर्णय च बरोबर होता बाकी एसटी चा प्रवास म्हणजे संकटाचा सामना, बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर एसटी ने मला कायम भयानक त्रास च दिला आहे पण 2008 पासून आमच्याकडे रेल्वे सुरू झाल्यापासून तिलाच प्राधान्य दिले सध्या वर्षातून एकदाच एसटी चा प्रवास होतो आणि या एकावेळेस ही तेच भयानक अनुभव येतात, तोच उकाडा तशीच अस्वच्छता तीच गर्दी बायकांचे भांडणे,बाळाचे रडणे खिडकीतून जागा धरणे, तोच गाडीचा खडखडाट, उग्र प्रकारचा दर्प.. एकंदर एसटी कधीही सुधारणार नाही असं वाटतं
  • Log in or register to post comments

सविस्तर प्रतिक्रियेसाठी आभारी

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:39 नवीन
सविस्तर प्रतिक्रियेसाठी आभारी आहे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोनली प्लॅनेट

लाल डब्याने गेल्या कित्येक वर्षात प्रवास केलेला नाही

श्वेता२४
Tue, 11/05/2019 - 11:38 नवीन
.
  • Log in or register to post comments

सुखी आहात... प्रतिक्रियेसाठी

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:41 नवीन
सुखी आहात... प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

_/\_

लई भारी
Tue, 11/05/2019 - 13:06 नवीन
मी पण लालपरी/एशियाड ने भरपूर प्रवास केलाय आणि सणासुदीच्या काळात लईच तरास होतो! पण एवढा लांबचा प्रवास असा म्हणजे तुमचं धाडस भारीच आहे!
  • Log in or register to post comments

धन्यवाद...!

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:41 नवीन
धन्यवाद...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लई भारी

वॉव, काय मस्त खुस-खुषीत

चौथा कोनाडा
Tue, 11/05/2019 - 19:10 नवीन
वॉव, काय मस्त खुस-खुषीत लिहिलंय ! मजा आली वाचायला, मीच एसटीनं प्रवास करतोय असं वाटलं. सुंदर लेखनशैली ! ही असली पोहोचायची त्रांगडी लै डेंजर असतात. कैक वेळा अनुभवलंय ! बेंगुताई _/\_ अजुन लेखन वाचायला आवडेल !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:43 नवीन
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद... नक्की लिहिण्याचा प्रयत्न असेन...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

जबराट

गुल्लू दादा
Fri, 11/08/2019 - 21:55 नवीन
लेखन शैली आवडली. बेडूक सारख्या मांड्या फुगवणं काय, मी पुन्हा येईन काय, सीताफळांची पकडपकडी काय, लहानग्यांची निरागसता आणि मोठ्यांचा हपापलेपणा अगदी कैचीत पकडलाय...खूप आवडला..येऊद्या अजून.
  • Log in or register to post comments

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...!

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:45 नवीन
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

खुमासदार!

जुइ
Sat, 11/09/2019 - 00:15 नवीन
तुमची लेखन शैली खुमासदार आहे! अनेकदा नगर-पुणे ट्रॅफिक ज्यामचे किस्से ऐकले आहेत. गेल्या वर्षी या ट्रॅफिक ज्यामचा अनुभव देखिल घेतला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:46 नवीन
प्रतिक्रियेसाठी आभारी आहे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

खल्लास!

जॉनविक्क
Sat, 11/09/2019 - 05:12 नवीन
अनुभव आहेत सर्वात भयानक मालवण ते पुणे प्रवास झाला शेवटी रेल्वेपकडून आरामात मुंबई गाठली व तिथून पुणे, तोपर्यंत पार ट्रक, जीप वगैरे ठिकाणी बुड टेकवून झाले होते, चुकीचा दिवस, निर्णय व घाई हमखास संकटात न्हेई हेच खरे, पणआपल्या इतके खुमासदार लिहणे जमणार नाही त्यामुळे हात आवरता घेतो... आपल्याबद्दल सहानुभूती आहेच पण दुनिया सुधारणार नाही म्हणून सर्वांना आशा प्रसंगी आशा प्रसंगाना धीराने सामोरे जायचे बळ येओ इतकीच इच्छा व अपेक्षा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:48 नवीन
प्रतिक्रियेसाठी आभारी आहे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

एसटीतून प्रवास होतात, झाले

कंजूस
Sat, 11/09/2019 - 05:53 नवीन
एसटीतून प्रवास होतात, झाले आहेत, होणार आहेत. पण धकाधकीच्या, ऐन गर्दीच्या वेळात लांबचे प्रवास करायची वेळ आली नाही. शिवाय बसप्रवास लाभदायकच झाला आहे. त्रास नाही, वेळेत जागेवर फेकते. लेख बाकी मजेदारच झाला आहे. एकदा एका वर ठेवलेल्या पिशवीतून टमाटे पडले जुन्नर कल्याण प्रवासात. मग काय त्या बाइला इतर बायांचे सल्ले सुरू. " टमाटे काय कल्याणला मिळत नाहीत?" "अमच्या घरचेच आहेत म्हणून आणले पाच किलो." "अमच्याही शेतात आहेत, पण आमी नाही नेत."
  • Log in or register to post comments

आभारी आहे

बेंगुताई
Fri, 11/15/2019 - 09:48 नवीन
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

खूप छान लिहिलंय...

Rockstar
गुरुवार, 01/09/2020 - 17:10 नवीन
खूप छान लिहिलंय...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा