प्रादेशिक पक्षांचे पीक आवरण्यासाठी
देशात गेल्या काही वर्षांत प्रादेशिक पक्षांचे वाढते वर्चस्व राष्ट्रीय पातळीवर फार अडचणीचे ठरत आहे. लोकसभेसारख्या राष्ट्रीय निवडणुकीत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरून हे पक्ष राष्ट्रीय पक्षांवर मात करून लोकसभेत पोहोचत आहेत. बरे लोकसभेत येऊनही ही मंडळी ज्या मुद्यांवर निवडून आली, ते सोडवितात असेही नाही. पण ते मुद्दे उपस्थित करून हंगामा करण्याचे काम मात्र करतात. (याचा अर्थ ते मुद्दे महत्त्वाचे नसतात, असे नाही.)
५४३ सदस्यांच्या आपल्या लोकसभेत बहूमताचा जादुई आकडा गाठण्याच्या नादात या पक्ष्यांना भलतेच महत्त्व येऊन घोडेबाजार तेजीत येतो. मग एक दोन खासदार असलेल्या पक्षांनाही 'भाव' येतो. हा भाव पेटी, खोका आणि त्या पलीकडेही बरेच काही असा असल्याचे कळते. त्यातच एखाद्या महत्त्वाच्या मुद्यावर सभागृहात मतदानाची वेळ येते तेव्हा ही मंडळी जो पक्ष 'काही' देईल, त्याच्याकडे झुकतात. अणू करारासारख्या महत्त्वाच्या मुद्यावर सरकार पणाला लागलेले असताना अनेक पक्ष 'कोण किती देईल', त्याच्यानुसार आपली भूमिका ठरवत होते. (शिबू सोरेन, अजित सिंग इ. इ.)
प्रादेशिक परिप्रेक्ष्यापलीकडे बघण्याची मर्यादा आणि बौद्धिक पातळी (अनेकदा) नसल्याने हे पक्ष महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर कोणतीही भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा राष्ट्रीय पक्षांपुढे या पक्षांच्या नाकदुर्या काढण्याची वेळ येते. यांच्यामुळे सगळे गाडे अडते. कोणतीही गोष्ट धड करता येत नाही. राष्ट्रहित पणाला लागते असे म्हणाना.
याचा अर्थ ज्या प्रादेशिक मुद्यांवर हे पक्ष निवडून आलेले असतात, ते बिनमहत्त्वाचे असतात, असे नाही. हे खासदार दिल्लीत गेल्याशिवाय या प्रश्नांची धग लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीगृहाला कशी लागेल? (उदा. मुंबईतील परप्रांतीयांच्या घुसखोरीचा मुद्दा. बेळगाव प्रश्न आदी.)
थोड़क्यात प्रादेशिक पक्ष हा असून अडचण आणि नसून खोळंबा असा प्रकार ठरले आहेत. या प्रश्नावर मला एक उपाय सुचवावासा वाटतो.
१. लोकसभेच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना लढायला बंदी केली पाहिजे. राज्यांच्या स्थानिक निवडणुकीतच हे पक्ष उतरू शकतात.
२. लोकसभेत या प्रादेशिक पक्षांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रतिनिधित्व दिले पाहिजे. पण ते वेगळ्या पद्धतीने.
३. राज्यनिहाय लोकसंख्येनुसार या पक्षांच्या प्रतिनिधींची संख्या लोकसभेत निश्चित केली पाहिजे. यासाठी लोकसभेची सदस्यसंख्या वाढवावी लागू शकते.
४. विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक पक्षांना किती मते मते मिळाली यावर त्या पक्षाच्या ( पक्षाने सुचविलेल्या) सदस्यांना लोकसभेवर नियुक्त करण्यात यावे. हे नेते अभ्यासू असतील. त्यामुळे राज्याचे स्थानिक पण मह्त्वाचे प्रश्न लोकसभेत अभ्यासू पद्धतीने मांडता येतील.
हे थोडेसे राज्यसभेसारखे असले तरी राज्यसभेपेक्षा लोकसभेच्या खासदारांना तुलनेने (सभागृहाची महत्ता लक्षात घेऊन) जास्त अधिकार असल्याने या सभेतच या सदस्यांची नियुक्ती करणे जास्त योग्य ठरू शकते. बहूमतासारख्या मुद्यावर या मतदारांना मतदानाचा अधिकार नाही दिला तरी चालू शकेल. त्यामुळे घोडेबाजाराला आळा बसू शकेल व निवडणुकीत दोन ते तीनच राष्ट्रीय पक्ष असल्याने बहूमतही स्पष्टपणे मिळू शकेल.
या विषयी तुम्हाला काय वाटते?
वाचने
2582
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
प्रादेशिक पक्षांचे पीक आवरण्यासाठी
काही समस्या
In reply to काही समस्या by अभिरत भिरभि-या
सहमत...
काही मुद्दे
राजकिय पक्ष