मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माननीय मॅडम..

गवि · · लेखमाला

माननीय मॅडम..



माननीय मॅडम,
मला माफ करा. तशा तुम्ही माझ्या पाल्याच्या हाती 'पालकांची सही आणायला' वेळोवेळी दिलेल्या चिठ्ठ्यांवर मी प्रत्येक वेळी माफीनामा लिहून दिलेला आहेच. पण आज परत एकदा मला माफ करा. तर माननीय मॅडम, माझा पाल्य माननीय अथर्व हा आपल्या इयत्ता पाचवी, तुकडी 'के'मध्ये शिकत आहे हे आपणांस चांगलेच माहीत आहे. आज काही गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणे प्राप्त झाले असल्याने हे पत्र लिहिणे भाग पडत आहे. माझे हस्ताक्षर माझा पाल्य मा. अथर्व याच्यावर गेलेले असल्याने मी हे पत्र टंकलिखित स्वरूपात पाठवत आहे. पत्राखालील सही मी स्वहस्ते केली असून ती मा. अथर्वने केलेली नाही, असे मी प्रतिज्ञापूर्वक नमूद करतो. मा. मॅडम, अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. एकमेकांबद्दल योग्य त्या अपेक्षा प्रस्थापित केल्यास आपणा दोघांमधील अनेक संघर्ष समूळ टळतील, अशी मला खातरी आहे. प्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की आमच्या मा. पाल्याचे उत्तम नशीब आणि आमच्या कुलदेवतेची कृपा म्हणून त्याला आपल्या माननीय शाळेत प्रवेश मिळाला. तो आता भविष्यात स्वतःच्या आयुष्यात सर्वोच्चपदी पोहोचेल, याबद्दल आम्हाला तिळमात्र शंका नाही. परंतु आम्ही त्याचे मातापिता हे मात्र तुमच्या मा. शाळेत शिकू न शकल्याने सामान्य मर्त्य नोकरदार पोटार्थीच राहिलो आहोत. गेल्या वर्षभरात मा. अथर्व याच्या माध्यमातून आपण आमच्याकडे पाठवलेल्या प्रदीर्घ प्रकल्पयादीकडे पाहता आपल्या मनात आमची एक अत्यंत चुकीची प्रतिमा अस्तित्वात आहे, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. मा. मॅडम. मी रसायनशास्त्र विषयात पदवीधर असून एका खाजगी व्यवस्थापनात रसायनशास्त्राशी दूरान्वयानेही संबंध नसलेले काम करतो. आपल्याला जे येत नाही ते करण्याचे कौशल्य उपजीविकेपुरते मी कमावले आहे. परंतु मी शिल्पकार, चित्रकार, लोहार, कुंभार, शिंपी, ज्ञानकोशकार, बल्लवाचार्य या सर्वांची कौशल्ये एकाच वेळी या देही बाळगून असावे अशी अपेक्षा मजकडून करणे योग्य नाही, हे मी नम्रपणे नोंदवू इच्छितो. 'सोदाहरण स्पष्ट करा' हा प्रश्न आपल्या रोजच्या व्यवहारात असेलच. त्यानुसार मी काही उदाहरणे घेऊन माझे म्हणणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ : वसईचा किल्ला. मॅडम, मी माझ्या पाल्यावर कितीही प्रेम करत असलो आणि त्याच्यावर येणाऱ्या सर्व संकटांपासून त्याचे रक्षण करण्यास कर्तव्यबद्ध असलो, तरी एका रात्रीत वसईचा किल्ला बनवून माझ्या पाल्याबरोबर शाळेत पाठवणे हे माझ्या शक्तीपलीकडचे आहे. सर्व प्रकल्पांतील सर्व वस्तू बनविण्याकरिता घरात उपलब्ध कच्चा मालच वापरावा, या आपण घातलेल्या लेखी बंधनाने तर आम्हाला निद्रानाश जडला आहे. पुठ्ठ्याच्या नळ्या बनवून त्याचे बुरूज, एका बुरुजाला रंगविण्यास खर्ची पडणारी एक जलरंग बाटली.

20190813-112534

रात्री शालोपयोगी वस्तूंचे उघडे दुकान शोधून आणलेला बाटल्यांचा स्टॉक. किल्ल्याच्या आसपास झाडे आणि गवत असावे ही आपण दिलेली आणि मा. अथर्व यांना रात्री अकरा वाजता अचानक स्मरलेली सूचना. मग प्रथमोपचार पेटीतला कापूस आणि हिरव्या रंगाच्या एका बाटलीला चाटून पुसून, रंग पुरवून पुरवून किल्ल्याच्या आसपासच्या परिसराचे सामाजिक वनीकरण संपन्न करणे. या सर्वांच्या नंतर तो रंग वाळेस्तोवर एकीकडे स्वतःचे विकीपीडन करीत किल्ल्याचा इतिहास सुमारे ४० (अक्षरी चाळीस) ओळींत लिहिणे याकरिता मुळात माझा अपराध काय झाला हे जाणण्याचा रास्त हक्क मला आहे, हे मी शक्य तितक्या नम्रपणे नोंदवत आहे.

आता आपण स्कॉटलंडच्या सांस्कृतिक पोषाखाकडे येऊ. घरातील वस्त्रे वापरून स्कॉटलंडचा 'ट्रॅडिशनल ड्रेस' बनविणे ही गोष्ट कोणत्या बाजूने आपल्याला शक्य कोटीतली वाटते? माझ्या कै. आजीने मला दिलेला, तिची एकमेव आठवण असलेला आणि मुख्यत्वे अंगावरील पाणी नीट टिपू शकणारा एकमेव असलेला माझा चौकटीचा पंचा या कामी खर्ची पडला. या बलिदानाने फक्त अधरीयाचा प्रश्न संपुष्टात आला. उत्तरीयाची चिंता शिल्लक उरल्याने माझ्या मातोश्रींची लाल रंगाची शाल तुकडे कापून कामी आली. पालकांचे कर्तव्य म्हणून भावभावना दूर ठेवण्यास माझी हरकत नाही. परंतु एवढे सर्व परिधान करुनही मा. अथर्व अर्धवस्त्रांकितच दिसत असल्याने लज्जारक्षणार्थ आतून एक पूर्ण बाह्यांचा सदरा रु. ७५० (अक्षरी सातशे पन्नास मात्र) खर्च करून आणावा लागला. घरातील पादत्राणांपासून स्कॉटिश पादत्राणे बनणे हे प्रभुकृपेने आपोआप घडून येणारे नसल्याने नव्याने रु. १००० (अक्षरी एक हजार मात्र) किमतीचे चामडी बूट आणि गुडघ्यापर्यंतचे मोजे (किं. रु. २००, अक्षरी दोनशे मात्र) आणून पुत्राच्या चरणकमली घालावे लागले.

20190813-113002

यानंतर प्रत्यक्ष प्रयोगादिवशी हे सर्व खोगीर चढवून आणि पंचा उर्फ स्कॉटलंडचा पुरुषी स्कर्ट घसरू नये म्हणून १२ (अक्षरी बारा) ठिकाणी सुरक्षापिना लावून त्याला सुखरूप शाळेत पोहोचता करणे इथवर सोसलेले सर्व सुसह्य झालेही असते. तथापि त्या कार्यक्रमात मा. अथर्व हा कोळीनृत्याचा ड्रेस घालून आला आहे असे अवमानकारक उदगार आपण रंगमंचामागे काढल्याचे कळल्याने आता हे सहन करणे अशक्य झाले आहे. आपण तूर्तास खालीलपैकी एक पर्याय स्वीकारावा, अशी नम्र सूचना.

अ. स्कॉटलंड, न्यूझीलंड, इजिप्त या देशांच्या संस्कृती बाजूला ठेवून भारतीय संस्कृतीकडे लक्ष केंद्रित करावे. ब. पालकांना नाटक कंपनीच्या पुरवठादारांकडून भाड्याने कपडे आणण्याची परवानगी द्यावी. मा. अथर्व यास गरीब शेतकरी बनवण्याबाबत हाच प्रकार घडला, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. वेशभूषेबद्दलच्या आपल्या तोंडी व लेखी सूचना पाळणे प्राप्त झाल्याने माझ्या पाल्यास गरीब शेतकरी बनवण्यासाठी मला त्याचा नवाकोरा उत्तम बनियन धुळीत मळवून जागोजागी फाडावा लागला आणि धोतर घरात नसल्याने नव्याने रु. ३०० (अक्षरी तीनशे मात्र) इतक्या किमतीचे खरीदून आणवावे लागले. ते अर्थातच गरिबास शोभून दिसत नसल्याने माझ्या पाल्याच्या आजीस त्यावर तीन तास खपून कृत्रिम ठिगळे शिवून द्यावी लागली. एकंदरीत माझ्या पाल्यास गरीब बनवणे हे मजसाठी बरेच खर्चीक ठरले. या परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्याकरिता मी खालील सूचना करत आहे. अ. गरीब शेतकऱ्याचे कपडे खरेदी केल्याच्या दिवशी बिनठिगळांचे आणि शुभ्र रंगाचे असू शकतात हे लक्षात घेऊन शालेय स्नेहसंमेलनाचा दिवस हाच गरीब शेतकऱ्याचा नूतन वस्त्र खरेदीदिन म्हणून दाखविण्याबाबत बदल स्क्रिप्टमध्ये करणे. ब. नाटकातील शेतकरी बागायतदार, श्रीमंत, मोटार आणि बंगलायुक्त निवडणे. पर्यावरणाच्या प्रश्नाविषयी मला पुरेशी आस्था आहे. माझ्या इच्छेनुसार आणि शक्त्यनुसार मी पर्यावरण रक्षणास आजीवन हातभार लावीन असे मी आपणांस आश्वासन देत आहे. परंतु जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या अशा या कामातील माझ्या वाट्याचे स्वरूप मा. अथर्व याला पृथ्वीदिनाच्या दिवशी आम्रवृक्ष, वांगे अथवा सर्प बनवून शाळेत पोहोचवणे याखेरीज अन्य स्वरूपाचे असल्यास मी उपकृत होईन. ते शक्य नसल्यास माझ्या पाल्यास पर्यावरणाच्या ऱ्हासास कारण असलेला मनुष्यप्राणी बनवून पाठवण्याचा उ:शाप मिळाल्यासही मला काहीसा आनंद होईन. मात्र हा मनुष्यप्राणी शक्यतो आधुनिक काळातला, आधुनिक पेहरावातील असावा आणि अश्मयुगीन, आदिमानव, क्रूमग्न किंवा निंदरथळ मनुष्य नसावा, ही विनंती. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या डब्यात चौरस आहार आणावा ही आपली मागणी वंदनीय एवं सर्वार्थांनी प्रातःस्मरणीय आहे. हिरवी भाजी, पोळी, भात, डाळ आणि कोशिंबीर अशा विविध डब्यांनी भरलेली एक पिशवी, चित्रकला आणि हस्तव्यवसायाचे सामान यासाठी आणखी एक पिशवी, तसेच मुदलातली वह्यापुस्तकांची मुख्य थैली या सर्वांस वाहून नेताना आपसूक विद्यार्थ्याचे बलवर्धनही व्हावे ही आपली इच्छा स्तुत्यच आहे. परंतु त्यांच्या स्वैपाकी पालकांच्या आरोग्याच्या हितासाठी खालील सूचनांपैकी कोणत्याही दोन पाळण्याबद्दल विचार व्हावा. (२ गुण) अ. शाळेची वेळ सकाळी आठऐवजी दुपारी बारा अशी करावी. ब. हिरव्या भाजीऐवजी क्वचित पिवळी भाजी चालवून घ्यावी. क. ठरावीक महिन्यांनंतर डब्यात दिलेल्या विविध आहारातील पोषक घटक, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि त्यांचे प्रमाण व आरोग्यास फायदे यांवर सुमारे पन्नास ओळींत लिहून आणणेतून सवलत द्यावी. माझा पाल्य मा. अथर्व हा काही अनुवांशिक कारणांमुळे वर्गातील अन्य मुलांमध्ये काही गुणांबाबत अधिक उठून दिसत असू शकतो, हे मला मान्य आहे. माझ्या मा. पाल्याचे हे गुण कमी-जास्त प्रमाणात 'उपद्रव' या सदरात मोडणारे असू शकतात, याचीही मला पूर्ण जाणीव आहे. त्याकरिता वेळोवेळी मला किंवा माझ्या पत्नीस अथवा दोघांना एकत्र अशा वेगवेगळ्या प्रकारे आपली भेट घ्यावयास बोलावणे हा आपला पदसिद्ध अधिकार मला मान्य आहे. तथापि वयानुसार मी रक्तदाबाचा एक रुग्ण आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला भेटायला येण्याचे निमंत्रण पाल्यासोबत देताना आपण मानवतेच्या दृष्टीने खालील बदल करावेत, ही विनंती. अ. निव्वळ निमंत्रण न देता किमान संक्षिप्त रूपात का होईना, पण भेटीचे कारण चिठ्ठीत नोंदवल्यास आपला अत्यंत ऋणी राहीन. रहस्यमयता, भय आणि गूढता हे रस कादंबरीतअथवा चित्रपटाच्या कथानकात रोचक असले, तरी पालकावस्थेत ते आरोग्यास बरे नव्हेत. संकटाचे मान आणि तापमान नक्की काय आहे याचा आगाऊ अंदाज मिळाल्यास योग्य ती मोर्चेबांधणी करून प्रसंगास सादर होणे हे रक्तदाबाच्या व्यवस्थापनासाठी सोयीचे पडते. ब. आपल्या भेटीसाठी दुपारी साडेतीन ही कार्यालयीन किटाणूवत नोकरदार वर्गासाठी सर्वाधिक गैरसोयीची ठरणारी घटिका वगळता अन्य वेळ जाहीर करत जावी. ही वेळ बदलून देण्याची नम्र विनंती आम्ही केल्यास आमचा पाल्य ही आमच्यासाठी नोकरीपेक्षा जास्त अर्थात सर्वोच्च प्राथमिकता नसल्याबद्दल शेरा देण्याचे टाळण्याचा प्रयत्न करावा. सर्वांच्या नशिबात शहरातील खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळण्याइतके उच्च ग्रह नसतात, हे समजून घ्यावे. मी फार सूचना करीत आहे याची मला जाणीव आहे. परंतु उपरोक्त त्रिविध तापपीडांनी मला या पत्रलेखनास उद्युक्त केले आहे, हे आपण समजून घ्याल अशी खातरी आहे. शिवाय मी सदरहू पत्राचे टंकन शनिवारी रात्री काहीसा मोकळा वेळ मिळाल्याने आणि आत्मविश्वासास वर्धित करणाऱ्या काही विशिष्ट परिस्थितीस प्राप्त झाल्याने करत आहे. सोमवारी सकाळी मी याच पत्राचे पुनर्वाचन आणि मुद्रितशोधन करून, तसेच माझ्या सद्य आत्मविश्वासाचे पुनरावलोकन करून माझा पाल्य मा. अथर्व याजसोबत आपल्याला पोचते करण्याबाबत तत्कालयोग्य तो निर्णय घेईन. कलोआ. आपला नित्य क्षमाप्रार्थी, मा. अथर्वचा पिता. (संगणकजनित पत्र, स्वाक्षरीची आवश्यकता नाही.)

चित्र श्रेयनिर्देश: चित्रगुप्त

वाचने 72124 वाचनखूण प्रतिक्रिया 52

श्वेता२४ Sun, 09/08/2019 - 09:23
अजुन आम्ही या अवस्थेत प्रवेश केलेला नाही. पण मी माझ्या दादा वहिनीचे हाल पाहिले आहेत. लेखाची मांडणी विनोदी पद्धतीने केली असली तरी लेखातील सर्व सूचना १०० टक्के योग्य.

सुधीर कांदळकर Sun, 09/08/2019 - 09:32
पत्रस्वरूपाच्या वेगळ्या प्रयोगाबद्दल अभिनंदन. प्रयोग मस्त जमला हेवेसांनल. आमच्या चि. ला एकदा सध्या पडतो आहे असा संततधार पाऊस पडत असतांना विद्वान टीचरने मातीच्या विविध नमुन्यांचा प्रकल्प एका रात्रीत बनवायला दिला होता. मुंबईत काळी माती कुठे मिळणार? सुदैवाने शेजारच्या गुजराथी कुटुंबाकडे नवरात्रासाठी आणून ठेवलेली मिळाली. लाल माती कुंडीत होती. तीतच हळद आणि चुना घालून मुरूम बनवला. समुद्र जवळ असून मुंबईच्या चिंब पावसात कोरडी वाळू कुठून मिळणार? मग अक्षरश: रांगोळीतले रंग वापरून शंखशिंपले काही अख्खे तर काही कुटून घालून वाळू बनवली. लबाडी केल्यामुळे प्रकल्पाला १ले बक्षीस मिळाले. खर्‍याची दुनिया नाही हेच खरे. आठवणी जागविल्यात. धन्यवाद.

सर्वसाक्षी Sun, 09/08/2019 - 10:28
प्रकल्प ग्रस्त पालकांचे चपखल वर्णन, मस्त. आमच्या चिरंजीवांच्या शालेय जीवनात आजच्या इतके नाही तरी आचरट प्रकल्प जे मुलांच्या आवाक्याबाहेर असून पालकच करणार हे माहीत असूनही दिले जायचे. एका शिक्षक पालक सभेला गेली असता माझ्या पत्नीने शिक्षिकेला धीर करून विचारले की असे अवजड प्रकल्प का देता? तुम्हाला पक्कं माहीत आहे की असे प्रकल्प पालकांनाच करावे लागतात. त्या शिक्षिकेने खाजगीत माझ्या पत्नीला सांगितले की त्यांच्या मुलाच्या शाळेत असेच प्रकल्प देतात आणि ते त्या स्वत:च करतात

सर्वसाक्षी Sun, 09/08/2019 - 10:29
प्रकल्प ग्रस्त पालकांचे चपखल वर्णन, मस्त. आमच्या चिरंजीवांच्या शालेय जीवनात आजच्या इतके नाही तरी आचरट प्रकल्प जे मुलांच्या आवाक्याबाहेर असून पालकच करणार हे माहीत असूनही दिले जायचे. एका शिक्षक पालक सभेला गेली असता माझ्या पत्नीने शिक्षिकेला धीर करून विचारले की असे अवजड प्रकल्प का देता? तुम्हाला पक्कं माहीत आहे की असे प्रकल्प पालकांनाच करावे लागतात. त्या शिक्षिकेने खाजगीत माझ्या पत्नीला सांगितले की त्यांच्या मुलाच्या शाळेत असेच प्रकल्प देतात आणि ते त्या स्वत:च करतात

सस्नेह Sun, 09/08/2019 - 10:53
एकेकाळी या सर्व स्टेजेसमधून गेले असल्याने लेख काळजाला भिडला ! चित्रगुप्त यांची चित्रे अगदी चपखल !

फुटूवाला Sun, 09/08/2019 - 11:42
सर्वांच्या नशिबात शहरातील खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळण्याइतके उच्च ग्रह नसतात, हे समजून घ्यावे. हाहाहा.... :)

बबन ताम्बे Sun, 09/08/2019 - 12:09
विनोदी अंगाने वस्तुस्थिती चपखल दर्शवली आहे. चिरंजीवांच्या शालेय काळात या सर्व उपद्व्यापातून गेलो आहे. एकदा चिरंजीवांनी रात्री दहा वाजता सांगितले की टिचरने पिंजरा आणि त्यात वाघ असे बनवून मागितले आहे. नशीब जवळचे स्टेशनरी दुकान उघडे होते. धावाधाव करून सगळे मटेरिअल जमवले. टिचरने बऱ्याच विद्यार्थ्यांना पिंजऱ्यात प्राणी बनवून आणायला सांगितला होता. सगळे पिंजरे एकत्र करून त्यांना झु करायचे होते. थोडक्यात सगळ्या पालकांना धक्क्याला लावले होते.

धर्मराजमुटके Sun, 09/08/2019 - 12:45
गवि, प्लीज या लेखाचे इंग्रजी भाषांतर करुन मिळेल काय ? माझ्या पाल्याच्या शाळेत खरोखर पाठवून देतो. (नाव मात्र माझे असेल हो!)

सोत्रि Sun, 09/08/2019 - 13:18
:) :) :) खुसखुशीत आणि मार्मिक ! - ( प्रकल्पग्रस्त पालक ) सोकाजी

सोत्रि Sun, 09/08/2019 - 13:18
:) :) :) खुसखुशीत आणि मार्मिक ! - ( प्रकल्पग्रस्त पालक ) सोकाजी

सुचिता१ Sun, 09/08/2019 - 13:23
हहपुवा झालीच.. त्या बरोबर च प्रत्येक मुद्द्याशी १००℅ सहमत!! एक तर असले अवजड प्रकल्प असतात त्यातून मुलांना टीचर्स च्या सुचना रात्री १० नंतरच आठवतात. माझ्या मैत्रीणीच्या मुलीला best out of waste असा विषय मिळाला... त्यात तिच्या घरातील कितीतरी वस्तू, थोड्या फार आमच्या वस्तू waste झाल्यावर च प्रकल्प पूर्ण झाला.

नंदन Sun, 09/08/2019 - 14:07
कारुण्यातून निर्माण होणारा विनोद सर्वश्रेष्ठ असतो, असं का म्हणतात त्याची प्रचीती आली! चित्रगुप्तकाकांची चित्रेही लेखाच्या दृष्टीने अगदी समर्पक आहेत आहेत. पुलं (पहा: सरोज खरे!)-शि.द.फडणीस ह्या जोडगोळीच्या 'रेखा'टनाची आठवण करून देणारेच हे सारे!

हा हा हा !!! प्रकल्पग्रस्त पालकाची शिक्षकांनी बनवलेली खुसखुशीत भजी मस्तम आहेत ! ;) इतकी दयनिय परिस्थिती आस्तित्वात येण्याअगोदर आमच्या पाल्याने शाळा पार केली होती, हे समजून अत्यंत आनंद जाहला !

नाखु Sun, 09/08/2019 - 16:39
ते पाहिल्याने उत्साह उतरत्या भाजणीने आणि चिडचिड चढत्या भाजणीने इयत्ता तिसरी पासून (अर्थात कन्येच्या) झाले आहे अजूनही दहावीपर्यंत प्रकल्पग्रस्त आहोत. मायबाप सरकारने अश्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारी खर्चाने काही रेडिमेड प्रकल्प थेट शाळेत पाल्याच्या नावे देण्यात यावेत. व अनुकंपा तत्त्वावर आम्हाला महिन्यात किमान दोन दिवसांची सुट्टी दिली जावी ही विनंती. एका पाल्याची सजा भोगून दुसर्याची भोगणारा प्रकल्पग्रस्त मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

तुषार काळभोर Sun, 09/08/2019 - 17:47
गविदादा, कर्मधर्मसंयोगाने जर या पत्राचे होकारार्थी उत्तर आले तर कृपया तुमचा मा. चि. अथर्वच्या शाळेचे नाव व्यनितून कळवाल का? (जाहीर कळवल्यास उगाच स्पर्धा वाढायला नको, प्रवेश झाल्यावर मी स्वतः शाळेचे नाव जाहीर करेल) इथं दिवसरात्र खपून कंपनी प्रोजेक्ट मॅनेज करायला देत नाहीत, अन इथं शाळा आपल्याला रात्रीतून (रात्रीपुरताच) प्रोजेक्ट डायरेक्टर बनवतात. उद्याची डेडलाईन देतात. असो.कळावे लोभ असावा. -( सम-अनुभवी) चि शौर्यचा पालक

भीमराव Sun, 09/08/2019 - 20:37
ZP च्या शाळेत चार वर्षे आम्हाला शिकवलेल्या गुरूजींना लिंक पाठवली आहे याची. आमचा मास्तर आम्हाला शाळेत वस्तू बनवायला शिकवायचा. लहानपणी मला गुरूजी म्हणजे सर्वज्ञानी वाटायचे. कुठलाही प्रश्न चुटकीसरशी सोडवणारे.

In reply to by भीमराव

जॉनविक्क Fri, 09/13/2019 - 20:03
लहानपणी मला गुरूजी म्हणजे सर्वज्ञानी वाटायचे. कुठलाही प्रश्न चुटकीसरशी सोडवणारे
इर्शाद इर्शाद!

मिसळपाव Mon, 09/09/2019 - 07:16
माझा एक अज्ञानातून आलेला भाबडा प्रश्न - गविला आणि प्रतिसादकर्त्याना. काही पालक जरी पूर्णतया मुलाना वाहीलेले असले आणि हे सगळं आनंदाने करत असले तरी बहुतेक पालकाना ही पीडाच असेल. आणि मुख्य म्हणजे मुलांच्या शिक्षणाला याचा कीती हातभार लागतो शंकाच आहे. मग सगळे पालक मिळून शिक्षकाना भेटून हे बदलू शकतील का? शिक्षक तरी का करायला लावतोय हे याचं सुसंगत उत्तर देऊ शकतात का? "वरून सांगितलंय" म्हणाले तर मुख्याध्यापकापर्यंत जाऊन उपयोग होतो का? एका पालकाने जाऊन ("पालक ही भाजी होती हो आमच्या वेळी" - पु.ल. !!) नाही चालायचं, दहा जणानी मिळून जायचं. हे सगळं तुम्ही कदाचित / बहुदा केलं असलं तर काय अनुभव आला? (मला कल्पना आहे की माझा प्रश्न वाचून गवि आणि सगळे खो खो हसतायत अशी शक्यता आहे !!)

शिर्षक वाचल्यावर हा राजकीय लेख असावा असे वाटले पण लेखक गवि आहेत तर वाचून तरी पाहू असे म्हणत लेख उघडला. तर या भलत्याच जवळच्या म्याडम निघाल्या. या म्याडम सुध्दा सर्वांना आपल्या तालावर नाचवत असतात. तावडीत सापडलेले पालक आणि पालिका त्यांना कस्पटासमान समजत त्या एकएक फर्माने सोडत असतात. आणि ती निमूट पणे झेलण्याशिवाय गत्यंतर नसते. एकदा माझ्या मुलीच्या शाळेतल्या काही प्रकल्पग्रस्त महापालिका प्रिंशिपल म्याडमना भेटायला गेल्या होत्या. त्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतून असे निशपंन्न झाले की वर्षाच्या सुरुवातीला ठरवून दिलेल्या लक्षापेक्षा झालेल्या प्रकल्पांची संख्या बरीच कमी आहे. तेव्हा उरलेल्या दोन महिन्यांमधे ते लक्ष साध्य करण्यासाठी म्याडम ना आणि पर्यायाने पालक पालिकांना जोरदार काम करावे लागणार आहे. सगळ्या पालकांची कडूजहार समस्या गविंनी साखरेच्या वेष्टनात गुंडाळून सादर केली म्हणून हा लेख एखाद्या औषधाच्या कॅप्सुल सारखा वाटला. पैजारबुवा,

नि३सोलपुरकर Mon, 09/09/2019 - 10:35
गवि शेट १ नंबर लिवलय . अब्राहम लिंकन ने लिहलेल्या पत्राप्रमाणे ह्या उपरोक्त पत्राचेही प्रत्येक शाळेने दखल घ्यावी. प्रकल्पग्रस्त पालक नि३

प्रशांत Mon, 09/09/2019 - 11:22
आवडला
मी शिल्पकार, चित्रकार, लोहार, कुंभार, शिंपी, ज्ञानकोशकार, बल्लवाचार्य या सर्वांची कौशल्ये एकाच वेळी या देही बाळगून असावे
वेगवेगळॅ पोशाख घातलेले गवि सरांचे चित्र डोळ्यासमोर आले. @चित्रगुप्त काका अशी गविंची चित्र काढुन मिळतील का? - प्रशांत

किसन शिंदे Mon, 09/09/2019 - 14:42
गविंचे लेखन नेहमीच बहारदार असतेय हे या खुसखुशीत लेखानेही दाखवून दिलेय. लेखात नमूद केलेले हे सगळे प्रकार गेल्या पंधरा वर्षांत प्रामुख्याने वाढल्याचं पाहायला मिळतंय.

कंजूस Fri, 09/13/2019 - 20:27
खुमासदार वगैरे सर्व ठीक आहे परंतू श्रीमंत पालक आपल्या पाल्यांना प्रतिष्ठा असलेल्या महागड्या शाळांमध्ये कसे पाठवता येईल हे पाहतात. तिथे म्हणे अधिक इक्सपोजर मिळते. च्यालेंजीज, टास्क दिले जातात. हे सर्व शालेय जीवनातच झाले नाही तर पुढच्या आयुष्यात कसे अचानक कसब निर्माण होणार? आताचा काळ स्पर्धेचा आहे. टिवी चानेल्सचे कार्यक्रम पाहता ना? प्रड्युसर, चानेल मालक मागणी करतात तशी स्किट, गाणी ,नेपथ्य, क्राउड जमवणे हे करावे लागते. शिवाय डेडलाईन. मग हे सर्व पालकांनी मुलांच्या समोर मांडले पाहिजे. जर नको असेल तर शाळा बदलावी. विनोदी लेखन म्हणून ठीक आहे.

In reply to by कंजूस

तिथे म्हणे अधिक इक्सपोजर मिळते. च्यालेंजीज, टास्क दिले जातात. हे सर्व शालेय जीवनातच झाले नाही तर पुढच्या आयुष्यात कसे अचानक कसब निर्माण होणार? कंजूसकाका, हा लेख पाहता हे सगळे काही पालकांना मिळते (म्हणजे तेच हे सर्व करतात) असे दिसते. म्हणजे, पालक पाल्यात नव्हे, तर स्वतःत, ते कसब निर्माण करण्यासाठी पाल्यांना अश्या शाळांत पाठवत असावेत, असे म्हणायला जागा आहे. ;) :)

आदूबाळ Sat, 09/14/2019 - 06:48
जब्बरदस्त लेख, गवि. काल तीन ठिकाणांहून लिंक वत्सापी आली. त्यातला एक मिपाकरच आहे ते सोडा, पण बाकीच्या दोघांचा मिपाशी संबंध नाही. हा लेख किती वर्मी टोला घालणारा आहे याचं हे मोजमाप समजा!

चिगो Sat, 09/14/2019 - 09:11
फर्मास लेख, गविशेठ.. पालकांची समस्या अत्यंत समर्पकपणे विनोदीरित्या मांडलीय तुम्ही. चित्रगुप्त काकांची चित्रेही क्लासच.. अद्याप ही समस्या ‘फुल ब्लोन’प्रकारात आदळली नाहीये आमच्यावर. हौशी बायको आणि हौशी पोरगी मिळून मॅनेज करताहेत हे प्रोजेक्ट्स वगैरे.. भविष्यात कळेलच मलापण.

गामा पैलवान Sat, 09/14/2019 - 13:43
गवि, मी अर्धेंग्रजी व पूर्ण मराठी माध्यमातनं शाळा शिकलो. मराठी पहिली भाषा होती. तिच्या पुस्तकात धड्यांच्या शेवटी प्रश्न असायचे व तदनंतर उपक्रम नावाचा विभाग असे. त्यात अतिशय आचरट व अतर्क्य उपक्रम दिलेले असायचे. उदाहरण म्हणून सांगतो. समजा जर धडा जर बटाट्याच्या चाळीवर असेल तर चाळीचे मॉडेल बनवा असा काहीसा उपक्रम असे. आता दहावीच्या वर्षी अभ्यास करायचा का हे असलं काही करंत बसायचं? त्यामुळे ते तसले उपक्रम वाचून भरपूर करमणूक व्हायची. कुणाला तरी या उपक्रमांना बालकांच्या खांद्यावरून काढून पालकांच्या बोडक्यावर मारायची नितांतसुंदर कल्पना सुचली आहे. हे लक्षात आल्यावर मला पालकांची खरंच दया येऊ लागलीये. या एका तऱ्हेच्या अस्वली गुदगुल्या आहेत. आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त Sat, 09/14/2019 - 20:00
इतर शहरांचे ठाऊक नाही, पण दिल्लीत असे शाळेचे प्रोजेक्ट अल्पावधीत करून (किंबहुना आधीपासूनच तयार करून ठेवलेले) देणारे ठेकेदार भरपूर आहेत. एकेका प्रोजेक्टाचे हजारांमधे पैसे घेतात. या ठेकेदारांचे आणि महागड्या शाळांचे साटेलोटे असणार, याची मला खात्री आहे. .