आवंढा

मिलिंद जोशी's picture
मिलिंद जोशी in जनातलं, मनातलं
2 Sep 2019 - 8:18 pm

माझा एक मित्र आहे. तो चित्रपट, टीव्ही सिरीयल यासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो. मधून अधून काही चित्रपटात, टीव्ही सिरीयल मध्ये छोट्या भूमिका देखील करतो. पण ते फक्त हौस म्हणून. मुख्य काम मात्र डायरेक्टरला असिस्ट करण्याचेच. परवा त्याची आणि माझी बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. खरं तर तो असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे काय हेच मला नीट समजत नव्हते. मग त्याला विचारलेच.

“यार... तू असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे नक्की काय करतोस? कित्येक वेळेस तर तू टीव्हीवर दिसतोस पण तुझे नाव मात्र कोणत्याच यादीत दिसत नाही. असे कसे?” मी भाबडेपणाने प्रश्न विचारला.

“अरे काही नाही रे... ज्या दिवशी आपल्या गावात चित्रपटाचे किंवा एखाद्या सिरीयलचे शुटींग असेल त्यावेळेस ते सगळ्यात आधी आम्हाला समजते. मग आम्ही सेटवर जातो. त्या डायरेक्टरला भेटतो. त्याला काय हवे नको ते उपलब्ध करून देण्याचे काम आमचे. काही वेळेस फक्त १/२ मिनिटांचा रोल असेल तर त्यावेळेस गावातील छोटे मोठे कलाकार पुरवण्याचे काम आम्हाला करावे लागते. कुणी नाही मिळाला तर आम्हीच उभे राहतो मिनिटभर. बस...” त्याने त्याच्या कामाचे स्वरूप सांगितले.

“आयला... तू कधीपासून स्वतःसाठी ‘आम्ही’ हे आदरार्थी बहुवचन वापरायला लागला?” त्याच्या तोंडून ‘आम्ही’, ‘आमचे’ असे शब्द ऐकून मी विचारले.

“अरे ते मी यासाठी वापरले कारण एकाच डायरेक्टरला माझ्यासारखे अनेक जण असिस्ट करीत असतात. कित्येक वेळेस तर एखाद्या डायरेक्टरला दहा वेळेस असिस्ट केल्यानंतर देखील तो आम्हाला ओळखत नसतो.”

“म्हणजे? मी नाही समजलो.” मी गोंधळलो.

“अरे असिस्ट करणे म्हणजे त्या डायरेक्टरला सगळ्या गोष्टी तत्काळ उपलब्ध करून देणे, काही सरकारी परवानगी गरजेची असेल तर त्या मिळवणे, या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. त्यामुळे आम्हाला असिस्टंट डायरेक्टर म्हटले जाते.”

“तुला सांगतो... काही वेळेस डायरेक्टर तुसडा असेल तर विनाकारण चिडत असतो. अशा वेळेस हिरो हिरोईनचा राग आमच्यावरच काढला जातो.” त्याने आपले रडगाणे गायला सुरुवात केली.

“अरे पण मग तू दुसरा काही उद्योग का नाही करत?”

“काही नाही रे... आपल्याला सुद्धा एखादा मोठा ब्रेक मिळेल ही आशा काही सुटत नाही. त्यामुळे नाही सोडत काम. त्यातूनही कधी कधी सेटवर काही किस्से असे घडतात की ते आठवले तरी कित्येक दिवसांचा शीण निघून जातो.”

“आयला... मला ही सांग की एखादा किस्सा..” मी आधी घड्याळाकडे पाहिले आणि मग त्याला म्हटले.

“अरे परवाचीच गोष्ट...” असे म्हणत त्याने सांगायला सुरुवात केली.

“गिरणारे जवळच्या फार्महाउसवर एका सिरीयलचे शुटींग चालू होते. डायरेक्टर एकदम खडूस. थोडं काही झालं की चिडचिड करणारा होता. त्याच्या समोर उभं रहायची इच्छा होत नव्हती. आमच्यात एकजण हिंदी भाषिक होता. त्यातून नवीनच. आम्ही सगळ्यांनी कोणकोणत्या गोष्टी शुटिंगसाठी लागणार आहेत हे परत एकदा स्क्रिप्ट वाचून चेक केले होते, पण जो आमच्यात नवीन होता त्यालाही ती लिस्ट नजरेखालून घालायला सांगितली.”

“अबे यार... एक चीज तो हमने लाई ही नही है !!!” तो काहीसा ओरडलाच. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. मीही काहीसा टेन्शनमध्ये आलोच. कारण परत त्या तुसड्या माणसासमोर जावे लागणार होते.

“काय रे... काय आणायचे राहिले?”

“अबे यहां लिखा है ‘आणि त्याने आवंढा गिळला’. हम बाकी सब तो लेकर आ गये पर ये ‘आवंढा’ लाने का भूल गये ना...” त्याचे ते वाक्य ऐकले आणि मला हसू आवरेना. तेवढ्यात मनात विचार आला. आजचा याचा पहिला दिवस. कॉलेजमध्ये असताना तर आपल्याला कुणाची रॅगिंग घेता आली नाही आज याची रॅगिंग घेवून तीही हौस भागवून घ्यावी. लगेचच मी चेहरा गंभीर केला.

“ओह शीट... असं कसं विसरलो आपण? ही तर खूप महत्वाची गोष्ट आहे. आता असं कर... आताच्या आता जावून आवंढा घेवून ये. नाहीतर तो बाबा आपला जीव घेईल.” मी चेहऱ्यावर चिंतेच्या आठ्या आणत सांगितले.

“अबे लेकीन ये होता क्या है और मिलता कहां है?” तो अजूनच गोंधळाला.

“अरे वो एक आयुर्वेदिक जडीबुटी होती है... दगडू तेली के दुकान मे मिल जायेगी.” माझ्या एका मित्राने हसू आवरत त्याला सांगितले.

“अरे यार... वो दुकान तो यहां से १०/१२ किलोमीटर पर है... कितना टाईम लगेगा...” त्याचा पुढचा प्रश्न.

“देख भाई. आज तेरा काम का पहला दिन है. अब अगर आजसे ही तुझे गालीया खानी है तो हम क्या कर सकते है? वैसे भी आगे चलकर तू बडा डायरेक्टर बनेगा, उस वक्त ऐसी गलती करने वाले को कौनसी गालीया देनी होती है ये भी तो तुझे आज सिखने मिलेगा...” आमचा दुसरा एक मित्र म्हणाला.

“ठीक है यार... अभी जाता हुं और आवंढा लेकर आता हुं.” म्हणत त्याने गाडीला किक मारली. आम्ही सगळे हसत होतो. जवळपास पाऊण तासाने तो परत आला. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते.

“काय रे... आणला का आवंढा?” मी त्याला हसू आवरत विचारले.

“नही यार... बहोत भीड थी वहां. १०/१५ मिनिट वही खडा था. जैसे ही मेरा नंबर आया. मैने उनसे बोला ‘आवंढा चाहिये’. तो कॅशपर बैठा आदमी मुझे ऐसे देख रहा था, जैसे मै किसी अलग दुनियासे आया हुं...”

“मग ?”

“फिर क्या... उसने पूछा... ‘किस लिए चाहिये?’ मैने बोला... ‘निगलने के लिए...’ फिर उसने पूछा... ‘कितना चाहिए?’ मैने भी बोल दिया... दो आपके हिसाब से! निगलने के लिए जितना जरुरी हो... दे दो..!!”

“यार... लेकीन मुझे ये पता नही चला की वहां के सारे लोग मुझे देखकर हंस क्यू रहे थे...”

खरं तर आम्हालाही हसू आवरत नव्हते.

“मग पुढं काय झालं ?”

“अरे यार... उन्होने बोला... थोडी देर पहले ही खतम हो गया है... परसो आना..!!! फिर मै चला आया...”

“अरे यार..!!! आता त्या डायरेक्टरला कसे सांगायचे ‘आवंढा’ मिळाला नाही ते?” मी चेहरा चिंताजनक करत पुटपुटलो. तो अजूनच गोंधळला.

“देख भाई... ब्रेक हो चुका है... अब तुही सर के पास जाकर ये बता देना... मेरी तो हिंमत नही हो रही. आज तेरा काम का पहला दिन है, तो हो सकता है, सर तुझे कुछ भी ना बोले... तुने कम से कम कोशिश तो की...”

तो जरासा घाबरतच डायरेक्टर समोर गेला. तिथे काय झाले ते माहिती नाही पण १० मिनिटात परत आला. आम्ही तो काय सांगतो हे ऐकायला टपूनच होतो.

“काय रे... काय म्हणाले सर?” मी विचारले.

“अरे कूछ नही यार... आप जितना समझते हो उतने सर खडूस नही है... मैने उनसे सारी बाते बोल दी और कहां की सिर्फ निगलने के लिए आवंढा नही मिल पाया... परसो तक आ जाएगा... तो वो मुझे देखकर हसने लगे. फिर बोले... ठीक है..!!! आज तो हम उसके बगैर ही काम चला लेंगे. फिर उन्होने मेरे कंधे पे हाथ रखा और बोले... यार..! आप लोगोंको जो स्क्रिप्ट दी गयी उसमे और एक चीज नही थी...”

“कोणती रे?” आम्ही गोंधळून विचारले.

“अबे उनके पास जो स्क्रिप्ट है उसमे और एक लाईन है... ‘तो मुग गिळून गप्पं बसला...’ अब मै वही मुग लेने जा रहा हुं... लेकीन अब ये समझ नही आ रहा है... कितना लाने का? आधा किलो या ढाईसौ ग्रँम से काम चल जाएगा?” आम्ही त्याचे वाक्य ऐकले मात्र आणि आमचा हसण्याचा बांध फुटला.

मिलिंद जोशी, नाशिक...

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

सुचिता१'s picture

2 Sep 2019 - 11:00 pm | सुचिता१

:))
छान आहे किस्सा! अजुन येऊ द्या.

मिलिंद जोशी's picture

2 Sep 2019 - 11:42 pm | मिलिंद जोशी

खूप खूप धन्यवाद...

मृणालिनी's picture

2 Sep 2019 - 11:17 pm | मृणालिनी

हा हा हा..... विनोदी आहे एकदम!

मिलिंद जोशी's picture

2 Sep 2019 - 11:42 pm | मिलिंद जोशी

खूप खूप धन्यवाद...

जॉनविक्क's picture

2 Sep 2019 - 11:34 pm | जॉनविक्क

मिलिंद जोशी's picture

2 Sep 2019 - 11:43 pm | मिलिंद जोशी

धन्यवाद...

फुटूवाला's picture

3 Sep 2019 - 4:54 am | फुटूवाला

लै हसलो... और आनेदो.

मिलिंद जोशी's picture

3 Sep 2019 - 12:00 pm | मिलिंद जोशी

हेहेहे... खूप खूप धन्यवाद...

जॉनविक्क's picture

3 Sep 2019 - 5:08 am | जॉनविक्क

-(अनेकदा आवंढा व मूग गिळून गप्प बसलेला) जॉन विक्क.

मिलिंद जोशी's picture

3 Sep 2019 - 12:00 pm | मिलिंद जोशी

हेहेहे... खूप खूप धन्यवाद...

टर्मीनेटर's picture

3 Sep 2019 - 12:36 pm | टर्मीनेटर

खुमासदार किस्सा आवडला 😀

मिलिंद जोशी's picture

4 Sep 2019 - 1:27 pm | मिलिंद जोशी

खूप खूप धन्यवाद...

एकदम मस्त , येऊ द्या भाऊ अजून !!!
आता रात्री वाचन केले आणि दिवसभराचा थकवा गेला !!!

मिलिंद जोशी's picture

4 Sep 2019 - 1:28 pm | मिलिंद जोशी

खूप खूप धन्यवाद...