पर्वतांतली मध्यरात्र

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in काथ्याकूट
2 Sep 2019 - 6:13 pm
गाभा: 

चमचमणारं स्फटिकरत्न आकाश माझ्या खिडकीतून आत पसरलंय
माझ्या खोलीतल्या अंधाराचा बाडबिस्तरा बाजूला सारून

सूचिपर्णी वृक्ष उंच गेलेत, अनादी काळापासून तसेच स्तब्ध
बर्फ, वादळं, पाऊस, या सगळ्या महाभूतांशी नजर भिडवून

माझी एकटी कुटी कडेलोटाच्या टोकावर तोल सावरून उभी आहे
जणू गगनचुंबी इमारतीच्या माथ्यावरचं माझं पर्सनल पेंटहाऊस!

अथांग दरीपलिकडे, अंधुक, गूढ क्षितिजावर आहेत अजूनही उत्तुंग शिखरं
युगानुयुगे बर्फाचा तोच आरसा चंद्राला एकटक दाखवताहेत

दूरवरून येतंय आर्त, सामूहिक, अखंड शृगालरुदन
निसर्गाचे एकनिष्ठ गस्तकरीच ते
कसं कोण जाणे, माझ्या मेंदूला दिलासा देतायत
की बाबा, तू एकटा नाहीयेस

..

..

आणि एकाकी, अस्वस्थ हृदयाला दिलासा देते, इवल्याशा फोनमधून

ती..!!

..

..

भर मध्यरात्री मेसेज दिसतो "मिस्ड कॉल..." आणि पुढे दोन खट्याळ स्मायली!
मीही सराईत बोटांनी लिहितो, "मग ये ना इथं माझ्यापाशी.."
(आपला टायपिंगचा स्पीड चांगला वाढलाय)

डोळ्यापुढे येते तिची महानगरातली सहकारी वसाहत- इमारती, मॉल, बाजारांनी वेढलेली
अजूनही गर्दीची, गाड्यांची वर्दळ चालू असेल बाहेर
घरातही एसीचा, पंख्याचा आवाज, घड्याळाची टिकटिक, बाजूला शांत- निद्रिस्त जोडीदार
खिडकीतून ओसंडणारा पथदीपांच्या प्रकाशाचा लोंढा

इथली आदिम, विश्वरूप निःशब्दता हिला डोळ्यासमोर तरी आणता येईल का?
रोजचे रामरगाडे, मुलांच्या शाळा, जेवणखाण, बाजारहाट यातून वेळ कसा काढते ही..?
तिच्या धकाधकीच्या जगापल्याडची कोणती स्वप्नं तिला खुणवत असतील?
कोणती बेलाग गिरिकुहरे तिला साद देत असतील?
..
..
..
इतकी बंडखोर हिम्मत आणून देणारं तिचं प्रेम किती बावनकशी असेल!
..
..
..
"येते की. पण मी दमेन ना डोंगर चढून. मला उचलून नेशील..?"
चंद्र जात राहतो वरवर, आमचा संवाद संपायची आशा सोडून.
अधिकाधिक शृंगारिक रंग घेतात आमचे मेसेज
आणि भोवतालची रौद्रभीषण भूमी सोडून मी तरंगू लागतो गुलाबी आकाशात
..
..
..
इथे पहाट अंमळ उशिराने होते, पहाडांना लवकर उठायची अजिबात सवय नाही
तिकडे तिच्याभोवतीचं शहर मात्र चाळवू लागलं असेल झोपेतून

पांढरं फटफटताच मी खाडकन येतो जमिनीवर
पण तिची स्वप्नं निशेची मोहताज नाहीत..
नऊच्या ठोक्याला फोन थरथरतो पुन्हा
अन नव्यानं अक्षरं उमटतात "हेय, मिस्ड कॉल...!!"

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

2 Sep 2019 - 9:10 pm | जव्हेरगंज

जबरी आहे!
पण
'मिस्ड कॉल' आणी 'मेसेज' वगैरे वाचून थोडा रसभंग झाला.!!

चलत मुसाफिर's picture

2 Sep 2019 - 10:31 pm | चलत मुसाफिर

पूर्वार्ध शुद्ध मराठी असल्यामुळे तसे वाटले असावे. तरी त्या दृष्टीने पेंटहाऊस या शब्दाची योजना केली होती.

पर्यायी अवजड मराठी शब्द वापरले असते तर अधिकच रसभंग झाला असता.

तुमची प्रशंसा मोलाची आहे. धन्यवाद.

प्राची अश्विनी's picture

3 Sep 2019 - 4:40 pm | प्राची अश्विनी

सुरेख!

चलत मुसाफिर's picture

3 Sep 2019 - 4:42 pm | चलत मुसाफिर

धन्यवाद