सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. तसेच समाजात धार्मिक वा जातीय तेढ निर्माण करणारं लिखाण आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग ३ (कल)

Primary tabs

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
28 Feb 2019 - 12:57 pm

भाग - ० भाग - १भाग - २ माझे सर्व लेखन.
अॅनालीसीसच्या बरोबरीने रिसर्च हा व्यवसायात किती महत्त्वाचा आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकदा एका जपानी कंपनीने, जी पॅकेजिंग ह्या व्यवसायात कार्यरत होती, त्यांनी विविध प्रोडक्ट आणि त्याचे पॅकेजिंग ह्याचे गुणोत्तर काय असायला हवे हे ठरवण्याकरीता केळयाचे साल आणि केळं ह्याचे वेगवेगळे वजन करून पाहिले तसेच इतरही काही नैसर्गिक वस्तूंचे त्यांनी मूळ प्रोडक्ट आणि त्याचे टरफल ह्याचे वजन करून पाहिले असता त्यांच्या लक्षात आले कि सामान्यतः ६०:४० किंवा ७०:३० ह्या गुणोत्तराने निसर्ग मूळ प्रोडक्टचे पॅकेजिंग करून पाठवतो. त्यानंतर त्यांनी सविस्तर रिसर्च केला कि नाजूक प्रोडक्ट आणि त्याचे साल किंवा वेष्टन आणि नाजूक वेष्टनातला मूळ प्रोडक्ट ह्याची गुणोत्तरे काय असतील? त्यानुसार त्यांनी मग आपल्या पॅकेजिंगमध्ये बदल किंवा इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक व्यवसायात रिसर्च, अॅनालीसीसचे महत्त्व किती अनन्य साधारण आहे ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. कंपनीची स्वतःची जशी रिसर्च टीम असते तशी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपली स्वतःची ही अगदी वैयक्तिक अशी एकछत्री रिसर्च आणि अॅनालीसीसची टीम असणे आवश्यक आहे. ह्या रिसर्च आपल्याला दरवेळी नवीन काहीतरी शिकवत असतो जेणेकरून एक उत्तम ट्रेडर किंवा गुंतवणुकदार म्हणून स्वतःला घडवण्यास मदत होते.
शिक्षणासाठी लागलेला पैसा हा खर्च नसून गुंतवणूक ह्या प्रकारात मोडतो. इंजिनियरिंग जर दहा लाखात होत असेल तर सिए केवळ दोन लाखात होते असा विचार करून मग सिएचा पगार, त्याची मागणी ह्याचा विचार करून किती दिवसात पैसे परत मिळतील? पगारातून लवकर निघतील कि प्रॅॅकटीसमधून निघतील हा व्यवहारी विचार आणि आपल्या मुलाची बौद्धिक कुवत हा शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकी आधीच व्हायला हवा.
त्यामुळे पालकांनी अत्यंत डोळसपणे आज शिक्षण क्षेत्रात कोणत्या शिक्षणाला मागणी आहे हे पाहण्या ऐवजी भविष्यात कोणत्या व्यवसायाच्या संधी बाजारात उपलब्ध होणार आहेत त्याचाच अभ्यास करून त्या अनुषंगाने आवश्यक ते शिक्षण आपल्या पाल्याला देणे हि काळाची कायमची गरज आहे. ह्याला कल ओळखणे म्हणतात.
“कल” ह्या शब्दाचा अर्थ सांगण्याची फारशी गरज नाही इतका तो आपल्या लहानपणापासून आपल्या कानावर पडत आलेला आहे. एखाद्याचा कल शिकण्याकडे असतो (आणि त्यात गाणित शिकण्याकडेपण असतो. हे कायम मला आधीच मर्कट टाईप वाटत आले आहे. कारण गणितातले माझे अगाध ज्ञान समस्त मास्तर वर्गाला चक्कर आणणारे होते.) तर एखाद्याचा कल स्पोर्ट्सकडे असतो आणि आमच्यासारख्यांचा कल अवांतर स्त्रीलिंगी विषयांकडे (म्हणजे ती झोप, ती कादंबरी, एखादी कला, ती संध्याकाळ, ती गुंतवणूक. वगैरे....उगाच गैरसमज नकोत.) असतो.
शेअर मार्केटमध्ये कल हा चढा आहे कि पडेल आहे कि संथ आहे ह्या अर्थाने येतो. जर आपण घेतलेल्या शेअर्सच्या किमती चढत असतील, तर तेव्हा होणाऱ्या गुदगुल्या, अभिमानाने भरून येणारे उर, सगळे वातावरण कसे प्रसन्न, आनंदी वगैरे असते. मुलांचा दंगा पण कौतुकास्पद वगैरे वाटतो; पण जर आपण घेतलेल्या शेअर्सची पडझड होत असेल, डोळ्यासमोर तोट्याचे आकडे फुगत असतील तर मग मुलांनी साधी टाचणी जरी पाडली तरी आपल्याला त्रास वगैरे होऊन आपण तिसरा डोळा उघडून जाळपोळ सुरु करतो. हे असे का होते ? ह्याचे मुख्य कारण ट्रेंड किंवा कल न ओळखता केलेले खरेदी आणि विक्रीचे व्यवहार ! मग ट्रेंड म्हणजे काय ?

संचय (Accumulation) + सहभाग (Participation) + वितरण किंवा विभागणी (Distribution) = कल (Trend)

संचय (Accumulation) : १९८५ च्या आसपास संगणक हा शब्द ऐकून माहित होता पण प्रत्यक्षात संगणक मी पहिला सुद्धा नव्हता. जेव्हा मी हा शब्द ऐकला त्या आधी बरेच जण त्या विषयी जाणून होते आणि ते त्याबद्दल बोलू ही लागले होते. १९८६ नंतर माझ्या वर्गातले ९०% विद्यार्थी – विद्यार्थिनी संगणक आणि तदनुषंगिक विषयात पदवी घेण्यासाठी आयटी नामक गंगेत आकर्षिले गेले. संगणक विज्ञान शाखेचा उदय झाल्याने बऱ्याच विद्यार्थी – विद्यार्थिनी संगणक विज्ञानाच्या छताखाली जमू (Accumulate) लागल्या. योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रवेश घेतला गेला. आज माझे बरेच मित्र मोठ्या कंपन्यात मोठ्या पदावर पोहचले आहेत. काही अमेरिकेत किंवा इतरत्र स्थाईक झाले आहेत. हि ती पिढी होती जी योग्य वेळी योग्य शिक्षणाकडे आकर्षिली गेली. आणि पुढे जाऊन जी आयटीची भव्य लाट आली त्यावर स्वार होऊन आर्थिक दृष्ट्या सबळ झाली.

सहभाग (Participation) : पण त्यानंतर त्या गंगेत सहभागी (Participate) झालेले बरेच जण पहिल्या पिढीतल्या संगणक तज्ञांइतके कमाऊ शकले नाहीत अशी ओरड आहे. पण ते अयशस्वी आणि अस्थिर तरी नव्हते.

वितरण किंवा विभागणी (Distribution) : आणि आता बरेच जण आयटी सोडून शेती, रेस्तराँ आणि अगदी शेअर मार्केटकडे विभागले जात आहेत. कारण आयटी क्षेत्रात झालेल्या अंतर्गत बदलाने नवीन येणाऱ्या लोंढ्याला सामावून घेण्यासाठी संधीच उरली नाही. ह्याचा अर्थ आयटी क्षेत्र संपले असे होत नाही ते विस्तारते आहे त्यातले अंतर्गत ट्रेंड बदलत आहेत. रोबोटिक्स, आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि बरेच काही नवे येऊ घातले आहे. आता त्या नव्या बदलाचे शिक्षण घेणारी पिढी हि पुन्हा योग्य वेळी योग्य ठिकाणी Accumulate होत आहे. ह्या पद्धतीने हे चक्र अव्याहत सुरूच राहणार आहे. फक्त ते चक्र समजून उमजून त्यात शिरणे किंवा आपल्या पाल्याला अलगद त्या चक्रात बसवणे हे पालकांचे काम आहे.

गुंतवणूक आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याचा दोन बाजू असल्याने, शेअर्सच्या बाबतीतसुद्धा हाच प्रकार घडत असतो. एखाद्या शेअरबद्दल किंवा कंपनी बद्दल ओरड सुरु झाली कि त्यात सहभागी होणारे वाढतात आणि नंतर तो सहभाग शिगेला पोहचला कि बरेच त्यातून बाहेर पडतात.
थोडे मागे जाऊन पाहिले तर १९५० वगैरेचा काळ डॉक्टर्स आणि इंजिनियर्सचा होता. ज्याच्या त्याच्या पालकांना आपला मुलगा डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हावा असे वाटत होते. पण काळानुरूप जे बदल होत गेले त्याने शिक्षणाचे ट्रेंड पण बदलत गेले. काल परवा पर्यंत इंजिनियरिंगचे उत्तम चालणारे क्लासेस हळूहळू बंद होऊ लागल्याचे दिसू लागले आणि अचानक कॉमर्स – एमबीए – सिए हा ट्रेंड सुरु झाला. शेअर मार्केटच्या बाहेरचे हे उदाहरण देण्यामागचे कारण इतकेच कि जसे शेअर्सचे भाव चढू किंवा पडू लागण्यावर पैसे लावले जातात तसेच ते इतर सर्वत्र लावले जातात. जेव्हा आजूबाजूची मुलेमुली एका विशिष्ट अभ्यासक्रमात जाताना दिसतात तेव्हा त्यांचेच आदर्श ठेऊन पालकपण आपल्या मुलांनासुद्धा त्याच प्रवाहात पर्यायाने त्या ट्रेंडवर स्वार करून देतात. बहुतांशी पालक हे काम आंधळेपणाने करतात, त्यामुळे जेव्हा शिक्षण संपून मुले बाहेर पडतात तेव्हा ज्या नोकरीच्या (दुर्दैवाने हेच एक ध्येय मुलांच्या मनावर बिंबवले जाते.) ध्येयाने इतका मरमर अभ्यास आणि पाण्यासारखा पैसा खर्च केलेला असतो त्याची वसुली पालकांच्या हयातीत होत नाही. मुलाला काही वेगळे करायचे असते आणि करावे वेगळे लागते त्यामुळे तो फ्रस्ट्रेट होतो आणि पालकांचे काय चुकले ते न कळून तो हि आपल्या मुलाच्या बाबतीत तेच निर्णय घेतो जे पालकांनी त्याच्या बाबतीत घेतले होते. हे अयोग्य विचारसरणीचे चक्रही अव्याहत सुरुच राहते. ह्यातली पालकांची चूक हि असते कि आपली ऐपत (कर्ज काढून, जमिनी विकून मुलांना शिक्षण देणे.) आणि आपण ज्या शिक्षणात मुलांसाठी मुलांकरवी गुंतवणूक करत आहोत त्याचे पुढे जाऊन काय होईल ह्याचे गणित न केल्याने ती गुंतवणूक वाया जाण्याचे चान्सेस वाढतात. ह्याला कारण ट्रेंड बदल ओळखता न येणे.
शेअर मार्केटच्या टेक्निकल अॅनालिसिसमध्ये हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन इतकेच कि ट्रेंड ओळखण्यासाठी सामन्यतः आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या विषयानुरूप किंवा आपल्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या पुढे गेलेल्या माणसांचा आदर्श ठेऊन त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे अंधानुकरण करणे हे सर्रास होत असते. जी चूक आपण दैनंदिन आयुष्यात करतो तीच अगदी तीच आपण शेअर मार्केटमध्येही करत असतो. ट्रेंड ओळखणे अतिशय सोपे असते पण ट्रेंड रिव्हर्सल (म्हणजे ट्रेंडमध्ये होत असलेला, होऊ घातलेला बदल) ओळखणे कर्म कठीण असते.

पुढील लेखात ट्रेंड रिव्हर्सल बद्दल जाणून घेऊ.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

28 Feb 2019 - 2:35 pm | शाम भागवत

सुंदर.
दैनंदीन जिवनातली उदाहरणे दिल्याने सगळ्यांना समजायला खूप सोप जाणारेय.
_/\_

टीकोजीराव's picture

28 Feb 2019 - 11:07 pm | टीकोजीराव

लेख छान जमलाय. उदाहरणांमुळे समजायला सोप्पा झाला.
पुढच्या लेखा साठी शुभेच्छा

सॅगी's picture

1 Mar 2019 - 7:46 am | सॅगी

ज्ञानव सर, लेख वाचतोय, पुलेशु

अनिंद्य's picture

1 Mar 2019 - 11:14 am | अनिंद्य

वाचतोय.

गुंतवणुकीची गुंतागुंत समजावण्यासाठी वापरलेला शिक्षण आणि करिअरचा मेटाफोर फार आवडला.

ज्ञानव's picture

1 Mar 2019 - 12:18 pm | ज्ञानव

सर्वांचे (श्याम भागवत, टिकोजीराव, सागर गुरव, अनिंद्य, गोंधळी ) मनापासून आभार.

गोंधळी's picture

1 Mar 2019 - 11:51 am | गोंधळी

पु. भा. प्र.

प्रत्यक्ष उदाहरण देता येईल का?
म्हणजे नमुन्यादाखल 3-4 शेअर्स वगैरे घेऊन त्यांच्यासंबंधीत काही analysis कसा करता येईल, किंवा केला जावा असे काही उदाहरण देता येणे शक्य आहे का? म्हणजे असे शक्य आहे का नाही, ह्याची कल्पना नाही, पण शक्य असल्यास असे काही वाचायला आवडेल.

वरील लेख आवडला, पण ही थिअरी आहे, असे म्हणता येईल का?

ज्ञानव's picture

1 Mar 2019 - 2:50 pm | ज्ञानव

देणार आहेच. वरील पार्श्वभूमी (कदाचित खूपच रटाळ वाटू शकते.) हि कुठल्याही नवोदितांसाठी अत्यंत आवश्यक आहे असे मला मनापासून वाटत आले आहे. जर मार्केटकडे बघण्याचा वैयक्तिक असा दृष्टीकोन तयार झाला तर, भविष्यात भीती आणि हाव ह्या दोन भावनांवर कंट्रोल (मात करण्यासाठी नव्हे.) ठेवणे सोपे जाऊ शकते. अजून दोन भाग झाले कि प्रत्यक्ष केस स्टडी घेण्याचा विचार आहे. त्यावर काम सुरु आहे. शशक सुरु होते म्हणून थांबलो होतो.
धन्यवाद.

नाही, रटाळ तर अजिबातच नाही, अतिशय रोचक आहे. उदाहरणांसकट वाचताना अधिक सुसूत्रबद्ध वाटेल, असे मनात आल्याने विनंती केली. केस स्टडी वाचायला उत्सुक आहे. धन्यवाद.

समर्पक आणि अतिशय सुंदर लेख