विळखा -३
विळखा -३
शनिवारी या डॉक्टरांना भेटून घरी आलो. यानंतर मी माझ्या कर्करोग क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांशी बरीच चर्चा केली. तेंव्हा एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे आईची शल्यक्रिया करायची आहे. ते प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. कारण केवळ मानेतच नव्हे तर हा रोग छातीत पण पसरला आहे. एकंदर हा तिसऱ्या स्टेजला आहे हे मला सुरुवातीलाच समजलेले होते. पण हि शल्यक्रिया दोन टप्प्यात करावी लागणार होती पहिल्यांदा मानेच्या त्वचेला छेद दिल्यानंतर त्यातून दुर्बीण टाकून ती छातीपर्यंत नेऊन छातीतील गाठी काढायला लागणार होत्या आणि यानंतर मानेतील गोळा आणि गाठी काढायला लागणार होत्या म्हणजे शल्यचिकित्सकांच्या दोन तुकड्या एका मागोमाग एक अशा काम करणार होत्या.
मग अशी गुंतागुंतीची शल्यक्रिया करणारी रुग्णालये मुंबईत हातच्या बोटावर मोजण्यात आहेत. यापैकी वडिलांनी टाटाची पसंती दिली होती. टाटाचा एक फार मोठा प्रश्न म्हणजे तेथे असलेली प्रचंड गर्दी. असे असूनही मी विचार केला कि टाटाच्या डॉक्टरना दाखवून त्यांचा सल्ला तर घेऊन मग शल्यक्रिया कुठे करायची ते ठरवू.
आमच्या घरी एक गोष्ट आहे वैद्यकीय बाबतीत मी जे म्हणेन तीच पूर्व असे घरचे सगळे मान्य करतात. शिवाय मी दुसऱ्या दिवसापासून हा कर्करोगाचं आहे आणि याला शल्यक्रिया लागणार आहे याची आई, वडील, माझा मोठा भाऊ आणि वहिनी( दोघेही इंजिनियर असल्याने त्यांना यात फारसा कळत नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे) याना स्पष्ट कल्पना दिलेली होती. त्यामुळे तू काय म्हणशील तसं असे सर्वाधिकार आणि पूर्ण विश्वास माझ्यावर टाकलेला होता.
त्यानुसार टाटा रुग्णालयात सोमवारी सकाळी जायचे असे ठरवलेले होते.
अर्थात माझा रविवार काही सुखाचा गेला नाही. ANAPLASTIC CARCINOMA OF THYROID (ATC) हा फार लवकर वाढतो आणि पसरतो याची मला कल्पना होती. शिवाय त्याच्या गुंतागुंती काय असतात तेही मला चांगलाच माहिती होतं. हा जर अन्न नलिकेत शिरला तर रुग्णाला अन्नच काय पण थुंकी पण गिळणे कठीण होऊन बसते. त्यामुळे सुरुवातीला नाकातून नळी घालून अन्न द्यावे लागते. पण सारखे सारखे थुंकी थुकायला लागते कारण नळीतून थुंकी खाली जाऊ शकत नाही.
आणि हा रोग जर श्वासनलिकेत शिरला तर रुग्णाला श्वास घेणे कठीण होते अशा परिस्थितीत श्वसनलिकेला स्वरयंत्राच्या खाली भोक पाडावे लागते
(TRACHEOSTOMY). बरेच वेळेस हि शल्यक्रिया असा श्वास लागण्याच्या अगोदर करावी लागते.
शिवाय केमोथेरपी द्यावी लागते त्याचे रुग्णाला फार त्रास होतो. केस जाणे, हगवण लागणे, तोंड येणे असे असंख्य त्रास होतात.
रेडिएशन द्यावे लागले तर त्याने त्वचा पण थोड्या फार प्रमाणात भाजली जाते. ज्याच्यामुळे रुग्णाला फार आग आणि जळजळ होते.
अशा एक ना दोन अनेक गुंतागुंती डोक्यात येत होत्या आणि त्याचा प्रतिकार कसा करायचा याचा पण विचार चालू होता.
बरेच लोक विचारतात कि एवढा त्रास जर होतो तर हे उपचार का करायचे?
याच गणित साधे सरळ असते. जर या उपचारांशिवाय रुग्ण तीन महिन्यात दगावणार असेल आणि उपचारामुळे एक वर्ष तर या उपचारांच्या त्रासाचे ३ महिने एक वर्षातून वजा केले तर रुग्णाला सहा महिने अधिक आयुष्य ते सुद्धा चांगल्या दर्जाचे मिळू शकते. हि स्थिती अतिशय आक्रमक कर्करोगाबद्दल आहे.
या उलट स्तन किंवा मोठे आतडे इ च्या कर्करोगात हे तीन महिने त्रासाचे वजा केले तर रुग्णाला ६-७ वर्षांपासून पूर्ण बरे होण्यापर्यंत कितीही फायदा होऊ शकतो.
आता काय करायचे आहे याबद्दल चा आराखडा माझ्या मनात तयार झाला होता. सोमवारी सकाळी आईला घेऊन टाटा रुग्णालयात गेलो आणि सकाळी रजिस्ट्रेशनचे सोपस्कार पुरे करून डॉ पै यांच्या बाह्य रुग्ण विभागात असलेल्या भरपूर गर्दीत सामील झालो.
तेंव्हा पॅथॉलॉजिस्ट कडून फोन आला कि सर, तुमच्या आईच्या बायोप्सी मध्ये TTF १ (Thyroid transcription factor-1) आणि CEA (Carcinoembryonic antigen) पॉसिटीव्ह आलं आहे आणि त्यात CALCITONIN रिसेप्टर पण दिसत आहेत. हा प्राथमिक अंदाज आहे आणि मला बाकी चाचण्या पूर्ण करायच्या आहेत.
माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. अर्धी लढाई जिंकली होती. याचा अर्थ हा ANAPLASTIC CARCINOMA OF THYROID (ATC) असण्याची शक्यता बरीच कमी होती आणि MEDULLARY CARCINOMA OF THYROID (MTC) असण्याची शक्यता जास्त होती.
मी त्यांच्याशी चर्चा केली आणि CALCITONIN आणि CEA (Carcinoembryonic antigen) याची रक्ताची चाचणी करायची ठरवली.
ताबडतोब खिशातला भ्रमणध्वनी काढला आणि गुगलून पाहायला सुरुवात केली. माझा अंदाज होता कि MTC मध्ये तुम्हाला ५ वर्षे तरी मिळतात. पण मी जसे वाचत गेलो तसे लक्षात आले कि या रोगात चांगली शल्यक्रिया झाली तर ७५ % रुग्ण १० वर्षे पर्यंत जगतात. आणि या कर्करोगात बहुतांश रुग्णांना केमोथरपी आणि रेडिएशन लागतच नाही.
कुठे ६ महिने ते एक वर्ष आणि कुठे १० वर्षे.
७७ व्या वर्षी १० वर्षे मिळणे हे खूप छान आहे
पण तेच ५७ व्या वर्षी १० वर्षे फार नाहीत
आणि ३७ व्या वर्षी १० वर्षे फारच कमी असतात.
पण १ वर्ष तीसुद्धा फार कष्टाने याउलट १० वर्षे सुखाने ती सुद्धा केमोथरपी आणि रेडिएशन शिवाय
मला काळोखातून तांबडं फुटल्याचा भास झाला.
क्रमशः
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मार्ग निघत आहेत.
:)
डॉक्टर साहेब,
वा डॉ. खूप चांगलं घडतंय.
आईला दुखते ही वेदना .....
आपल्या भावनांचा निचरा व्हायला
वाचतोय. आणखी काय बोलू?
आपल्या मातोश्री नक्की आणि
काय बोलाव
नुकताच pre xdr Tb मधून बरा
सुंदर लिहिता आहात.
डॉ. साहेब तुमचे हे तिन्ही लेख एका पाठोपाठ वाचले.
डॉ क
तिसरा भाग वाचल्यावर हायसं
वाचतोय...
_/\_
डॉक
हायसं वाटलं
पण १ वर्ष तीसुद्धा फार कष्टाने याउलट १० वर्षे सुखाने ती सुद्धा केमोथरपी आणि रेडिएशन शिवाय मला काळोखातून तांबडं फुटल्याचा भास झाला.हे वाचून हायसं वाटलं.अप्रतिम अनुभवकथन!!
आशेचा किरण
टाटाला जाण्याचा निर्णय
तिनहि भाग वाचुन काढले. काय
मातोश्रींना लवकरात लवकर बरे