विळखा
माझा दवाखाना ज्या इमारतीत आहे त्यातच वरच्या मजल्यावर आमचे आई वडील राहतात. आमच्या वसाहतीचा पुनर्विकास झाला त्यात मी दवाखान्याची जागा घेतली आहे आणि वरच्या मजल्यावरचेच घर वडिलांना मिळाले.
आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला होता आणि त्याचा इलाज चालू होता आणि ते सुधारत होते. १९ जून २०१९ रोजी संध्याकाळी ८ वाजता दवाखान्यात कुणी नव्हते म्हणून मी त्यांना पाहायला गेलो. तेंव्हा आईने सांगितले कि अरे आज मी चेहऱ्याला पावडर लावायला गेले तर मला मानेला डावीकडे थोडं सुजल्यासारखं वाटतंय.
आमच्या आईला मानेचा आणि कंबरेच्या स्पॉनडायलॉसिस चा त्रास ८-१० वर्षे तरी आहे. आणि माझ्या अस्थिरोग तज्ज्ञ मित्राकडे ती मधून मधून जात असते. त्याने तिला स्वच्छ शब्दात सांगितले आहे कि तुम्ही आयुष्यभर काढलेल्या कष्टामुळे तुमची हाडे झिजली आहेत, ती काही पुन्हा पूर्ववत होणार नाही. तुम्ही माझ्याकडे आलात तर मी प्रत्येक वेळेस औषध बदलून देइन. तुम्हाला कायमचा उपाय करणे कुणालाही शक्य नाही. मी पाठीला लावायचा पट्टा दिला आहे तो लावून जेवढे चालणे फिरणे व्यायाम करणे शक्य आहे ते तुम्ही करत जा. थ्रो बॉल खेळून कंबर दुखणारच तेंव्हा ते कसं जमवायचं ते तुम्हीच ठरवायचं. (आमची आई अजून ७७ व्या वर्षी मुलुंड जिमखान्याच्या थ्रो बॉल खेळायला जाते.)
महिन्यात दोन वेळेस तरी ती कंबर दुखते पाठ दुखते हि तक्रार माझ्याकडे करत असते आणि मी ती "ऐकून" घेतो.
पण आता तिने मानेला सूज आले सांगितले ते काही तरी वेगळे होते. मी हात लावून पाहिले तर माझ्या लक्षात आलं कि तिच्या थायरॉईड ग्रंथीला डावीकडे फुगवटा आला आहे.
मी तिला म्हणालो कि चल "लगेच" खाली, तुझी आत्ता सोनोग्राफी करायची आहे.
आई म्हणू लागली कि अरे तू "ह्यांना" बघायला आला आहेस तर त्यांची तपासणी अगोदर होऊ दे. मी म्हणालो ते आता सुधारत आहेत त्यांची काळजी नको करुस. तू लगेच खाली चल.
आढेवेढे घेत ती माझ्या बरोबर दवाखान्यात आली. तिची सोनोग्राफी करायला सुरुवात केली तेंव्हा तिच्या थायरॉईड ग्रंथीत एक गाठ होती आणि त्याच्या शेजारी रसग्रंथींच्या बऱ्याच गाठी (LYMPH NODES) दिसत होत्या. तिची सोनोग्राफी करत असताना माझे विचारचक्र चालूच होते.
हि गाठ कर्करोगाची आहे याची मला तांबडतोबच खात्री पटली.
आता काही प्रश्न माझ्या डोक्यात नाचू लागले. हि सूज बाहेरून फारशी दिसत नाहीये. पण आतमध्ये वाढून इतक्या पटकन मोठी झाली याचा अर्थ हा कर्करोग फार आक्रमक आहे (AGGRESSIVE).
मी लष्कराच्या कर्करोग केंद्रात ७ वर्षे काम केलेले असल्यामुळे कर्करोगाची कुंडली लगेच मांडता येऊ शकते.
मला लक्षात आले कि हा कर्करोग दोन प्रकारचा असू शकेल
१) ANAPLASTIC- या तर्हेचा रोग फार लवकर सर्वत्र पसरतो आणि त्यात रुग्ण साधारण १ वर्षात दगावतो
२) DLBCL -- DIFFUSE LARGE B CELL LYMPHOMA यात रुग्णाला ४-५ वर्षे मिळतात.
यापैकी पहिल्या प्रकारचा असण्याचीच शक्यता जास्त वाटत होतीकारण DLBCL मध्ये सहसा थायरॉईड ग्रंथीला सूज येत नाही. मी आठवड्यात तीन चार वेळेस तरी आई कडे जातोच त्यामुळे तिच्या मानेत अशी गाठ आहे हे मला तरी जाणवले नव्हते.
मला "आतल्या आत" धक्का बसला होता पण चेहऱ्यावर ते काहीही न दाखवण्याची पराकाष्ठा मी केली. परंतु जवळजवळ १५ ते २० मिनिटे मी सोनोग्राफी करत होतो त्यावरून हा प्रकार काहीतरी गंभीर आहे असे आईला लक्षात आले.
मी दोनदा तीनदा पाहून खात्री करून घेतली आणि तपासणी संपवली. चेहरा जमेल तितका निर्विकार ठेवला आणि आईला सांगितले कि या गाठी "क्षयरोगाच्या" असू शकतील( तो क्षयरोग नाही याची मला १०० % खात्री होती) आणि यासाठी आपल्याला सिटी स्कॅन करायला लागेल. त्यासाठी उद्या सकाळी तू काहीही खाऊ नकोस.
आई म्हणाली कि नाहीतरी उद्या संकष्टी आहे तेंव्हामाझा उपासच आहे. मी काहीच खात नाही. केंव्हा जायचंय ते मला सांग म्हणजे तशी तयारी करू या.
मी ठाण्याच्या सिटी स्कॅन केंद्राच्या डॉक्टरना (ते पण रेडीऑलॉजिस्ट असल्याने त्यांना मी आग्रह करू शकतो) फोन केला आणि सांगितले कि मला "उद्याच" आईचा सिटी स्कॅन करायचा आहे. दुसऱ्या दिवशी दुपारची १२ ची अपॉइंटमेंट मिळाली. ती परत फोन करून मी आईला सांगितली.त्यासाठी सकाळी तिच्या रक्ताची तपासणी करायची आहे त्याबद्दलच्या सूचना दिल्या. सुदैवाने त्यानंतर रुग्ण आलेला नव्हता.
आई बाथरूम मध्ये गेली तेंव्हा मी दवाखान्यातील माझ्या खोलीत मी २ मिनिटे डोळे मिटून शांत बसलो. आल्याला मातृसुख अजून किती दिवस आहे हे मला नक्की समजत नव्हते. २०२० चा सूर्योदय आई पाहू शकेल का? मुलीचे लग्न ठरलेले आहे पण होणारा जावई एम बी ए करतो आहे ते शिक्षण संपवून नोकरीत स्थिर होईपर्यंत लग्न करता येणार नाही म्हणजे २०२० डिसेंबर तरी. मुलीच्या लग्नात आई असेल का?
सरासरी एक वर्ष म्हणजे सहा महिने पण असु शकतात आणि दीड वर्ष सुद्धा. २०१९ वर्ष सरेल का? डोळ्यात पाणी आणून असे विचार चालू होते.
अशी कोणतीही धक्कादायक बातमी मिळालीकी माणूस चार अवस्थांतून जातो
१) धक्का (SHOCK) - अचानक मिळालेल्या बातमीमुळे मन सुन्न होते
२) संताप ( ANGER )-- हे आपल्याच बाबतीत का घडले सगळे जग सुखात आहे आणि आपणच या दुःखाच्या दरीत पडलो आहोत याचा राग येतो.
३) नैराश्य ( DESPERATION) -- आपलं आता काही खरं नाही हा विचार माणसाला नैराश्याच्या गर्तेत ढकलतो
४) स्वीकृती (ACCEPTANCE)-- आता जे काही आहे ते आहे. पुढे काय करायचे ते करायलाच लागणार आहे हि स्वीकृती.
मी या चारही अवस्थांतून दोन ते तीन मिनीटात गेलो आणि स्वीकृती पर्यंत आलो.
तेंव्हा मला लष्करातील एक गोष्ट आठवली. राष्ट्रीय रक्षा अकादमीच्या (एन डी ए) च्या मुख्य इमारतीत एक विशाल पंख पसरलेला गरुड आहे आणि त्याखाली लिहिलेले आहे
TRAIN YOUR MEN TO WIN
THERE IS NO RUNNERS UP AWARD IN WAR
मी मनात म्हटले.
I SHALL FIGHT TILL LAST BULLET AND LAST DROP OF BLOOD.
क्रमशः
वर्गीकरण
प्रतिक्रिया
TRAIN YOUR MEN TO WIN
ही सत्यकथा आहे?
होय.
सुन्न!
अरे देवा...
रोजच्या व्यवसायात अनेक गंभीर
+११११११ हेच म्हणतो. शुभेच्छा.
आपल्या आई नक्कीच बऱ्या होतील.
अशी कोणतीही धक्कादायक बातमी
आपल्या आई लवकरात बऱ्या होवोत
इमोशनल पॅटर्नसाठी SARAH Model
सुन्न करणारा अनुभव
डॉक्टरसाहेब.
तुम्हाला हे मिपाकरांसोबत शेअर करावेसे वाटले
अगदी अगदी
डॉक
ह्या कठिण परिस्थिती मधे
खरेसाहेब आपल्या आईस
मला वाटतं डॉक्टर साहेब
तुमच्यासारखे निष्णात डॉक्टर
डॉक आपल्या आई लवकर बर्या
सदिच्छा..
आईसाहेब
आपल्या आईंना दीर्घायुष्य व
आपल्या मातोश्री लवकरात लवकर
पुढील उपचारासाठी खूप खूप
शुभेच्छा!
+१
डॉ क
__/\__
आपल्या धैर्याला सलाम
मातोश्री बऱ्या होणारंच
खरे साहेब,
खरे साहेब,
कोणत्याही परिस्थितित हरल्याचा
सदिच्छा !!
आपण योग्य ती काळजी, उपचार