खाजगी मंदिरे की उर्मटपणा चे अड्डे?

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
20 Jul 2019 - 4:47 pm

नमस्कार मित्र मैत्रिणींनो .अतिशय मोठ्या कालखंडानंतर मिपावर लिहीत आहे. सर्व कसे आहात? कंकाका यांचेशी मी अधून मधून संपर्कात असतो. मिपावर फोटो चिकटवणे ही खूप किचकट प्रक्रिया आहे म्हणून थोडा कंटाळा करत होतो.या लेखात फोटो असण्याची गरज नाही हा भाग वेगळा. फोटोसाठी काही युक्त्या कंकाका यांनी सांगितलेल्या आहेत त्या करून पाहतो.असो ....आता लेखाच्या विषयाकडे वळूया.

खाजगी मंदिरे हा एक अतिशय भयानक प्रकार अलीकडेच पुण्यात पाहिला. ही घटना आठवली की पुणेकर म्हणून मान शरमेनं खाली जाते

एका दत्त संप्रदायातील साधू महाराजांच्या समाधी मंदिरात मी सहा महिन्यापूर्वी गेलो होतो.मंदीर बाहेरून अतिशय सुंदर दिसत होते व कळसावर सुंदर कलाकुसर होती. अर्थात या मंदिराची माहिती मिळाल्यामुळे कुतूहल म्हणून गेलो. मंदिराचा दरवाजा बंद असून आतून कडी लावली होती. बराच वेळ टकटक केल्यावर एक पुजारी वजा व्यवस्थापनाचा कर्मचारी बाहेर आला आणि त्याने माझी बरीच चौकशी केली. जणू काही मी व्हिसा मुलाखतीला आलो काय असे मला वाटले . नंतर पाय धुवा म्हणून त्यानें सांगितलें मी तसे केल्यानंतर तो सतत माझ्याबरोबर पाळत ठेवन मंदिरापर्यंत आला व दर्शन झाल्यावर "चला आता" असे उर्मटपणें मोठ्या आवाजात म्हणाला. खरे तर त्या शांत वातावरणात मला थोडे वेळ एकांतात बसायचे होते पण ते काही शक्य झाले नाही. मला असे वाटले की मी पॅरोल वर रजा घेतलेला कैदी असून रजेच्या शेवटच्या दिवशी दर्शनाला आलोय. त्याच्याशी थोडे बोलण्याचे धाडस मी केले व या मंदिरात दरवर्षी कोणते उत्सव असतात याची चौकशी केली. त्याने उपकार केल्यासारखे काही उत्सवांची माहिती दिली मग मी या उत्सवाची माहिती बाहेर कळवली जाते का ते विचारल्यावर त्याने नकारार्थी मान हलवली व हे उत्सव फक्त प्रतिष्ठित निमंत्रित लोकांसाठी असतात असे सांगितले. मला परत मी एक कैदी असल्याचां भास झाला. एकदाचा तो उर्मट पाहुणचार घेऊन मी बाहेर पडू लागलो पण बाहेर पडताना त्याला सांगितले की तुम्ही भक्तांवर इतका अविश्वास दाखवून त्यांचा अपमान करता हे बरे नाही. त्याने ऐकून न ऐकल्या सारखे केले.

काही झाले तरी मला त्या मंदिरातला शांतपणा आवडला होता म्हणून परवा सहज परत त्या मंदिरात गेलो व तोच घटनाक्रम परत सुरू ! त्याच कर्मचाऱ्यांनी पहिल्या वेळीच येताय का असे विचारल्यावर मी न बोलता दोन बोटे दाखवून दुसऱ्यांदा असे सांगितले. त्या माणसाला माझा चेहेरा ओळखीचा वाटला आणि तो तिथेच बसला ...... हुश्श! पण मी गडबडीत असलेने पाय धुवायचे चुकून विसरलो आणि आत जाऊ लागलो तर आतील ३ स्वच्छता कर्मचारी माझ्या पुढून व
मागच्या वेळचे हवालदार (?) आणि इतर कर्मचारी
मागून पिसाळलेल्या कुत्र्यासारखे " ओ कुठ चालला ?" असे ओरडले.जणू मी त्यांचा खजिना लुटायला चाललो होतो. मी त्यांना म्हणले हळू बोला हे मंदीर आहे. त्यांनी माझा आणखी अपमान केला व जोरजोरात पाय धुवून जायचे असते असे सुनावले .
माझे पुढील ऐकून न घेता आणखी दोन व्यवस्थापक आले व हमरी तुमरी करून तुला जोड्यानी मारतो किंवा तुला फेकून देतो अशी भाषा करू लागले. हे खाजगी मंदीर आहे आणि आम्हाला तू कोण सांगणार असे ओरडू लागले. नंत्तर अक्षरशः त्यांनी मला हाकलून दिले.

किती हा उर्मटपणा?
या घटनेने एक पुणेकर म्हणून माझी मान शरमेनं खाली गेली आहे.
मी त्या स्थानाचा उल्लेख मुद्दाम टाळतो आहे कारण मला वैयक्तिक चिखलफेक करायची नाही पण देव त्यांना भक्तांशी नम्रपणे वागायची सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करतो.

असे आहे हे खाजगी मंदीर प्रकरण!

.

वावरअनुभव

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

20 Jul 2019 - 5:33 pm | जेम्स वांड

अन आपले कुलोपाध्ये जिथं भिक्षुक, पुजारी, गुरव असतील अशी मंदिरे सोडून इतर मंदिरात जाणे वयाच्या पंधराव्या वर्षीच सोडले आहे, सर्वात उत्तम मनःशांती मिळवायचा उपाय म्हणजे घरच्या देवापुढे एक दिवा लावावा, वातावरण प्रसन्न करेल अशी एकच उत्तम उदबत्ती लावावी अन ध्यानमग्न होऊन पंधरा मिनिटे वाटेल त्या देवतेचे फक्त मनःपूर्वक नामस्मरण करावे. बाकी सगळं झूट.

सामान्यनागरिक's picture

20 Jul 2019 - 6:04 pm | सामान्यनागरिक

जर आपल्याला आलेला अनुभव खरा असेल तर आपण त्यामंदिराचे नांव पत्ता द्यायला हरकत नाही. जेणेकरुन लोकांना तेथे जाण्ञापूर्वी विचार करता येईल. आपण आपल्याला आलेला अनुभव सांगीतला आहे. त्यात 'चिखल्फेक' कसली ? खरेतर आपण लगेच तिथुन बाहेर पडायला हवे होते. अश्या मनस्थितीत दर्शन घेऊन आपण कुठली मनशांती मिळविली कळत नाही.

हे खासगी मंदिर असल्याने कोणाला येऊ द्यावे, आणि कसे वागवावे हा त्यांचा खासगी मामला आहे. त्यामुळे असे अनुभव प्रसिद्ध करुनच त्यांनी सुधरावे लागेल. जेंव्हा केवळ दहा व्यक्ती दर्शनाला येतील आणि बाहेर हजारो लोक त्यांना वाईट प्रसिद्धी देतील तेंव्हाच त्यांना काहीतरी वाटेल

सुबोध खरे's picture

20 Jul 2019 - 6:25 pm | सुबोध खरे

हे खासगी मंदिर असल्याने कोणाला येऊ द्यावे, आणि कसे वागवावे हा त्यांचा खासगी मामला आहे. त्यामुळे असे अनुभव प्रसिद्ध करुनच त्यांनी सुधरावे लागेल.

सहमत. इतरांना असा अनुभव येऊ नये म्हणून नाव पत्ता जाहीर करावा
मुळात वाईट अनुभव आला तर दुसऱ्यांदा जाणे मी टाळतोच.
कदाचित त्यांना प्रसिद्धी आणि त्याबरोबर येणारी गर्दी नकोच असेल. त्यामुळे अशी (कु)प्रसिद्धी ते मुद्दाम करतही असतील
पुण्यात काहीही शक्य आहे.

कदाचित अधीक अपमान होण्यामुळे त्यांच्या पुणेकरत्वावर शिक्कामोर्तब होत असावे.
आणि विरुद्ध प्रसिद्धी मिळाल्यामुळे गर्दीही वाढेल असे त्यांचे नवे मार्केटिंग गिमीक असेल.
पुण्यात एके काळी एक शेपटीवाले बाबा होते ( वय वर्षे १२/१५ ) ते अधूनमधून भक्ताना प्रसाद म्हणून कानफाटात वगैरे द्यायचे.
मुंबईमधली ते संत राधे मां ही देखील याच पंथातली. पण ती अधीक खूश झाली की प्रसाद म्हनून काही भक्तांच्या मांडीवर पण बसायची.

अवांतर : मंदीर जर खाजगी असेल तर तेथेच जाय्चा अट्टाहास कशाला? तेही एकदा अपमान करून घेतलेला असताना

शान्तिप्रिय's picture

20 Jul 2019 - 6:19 pm | शान्तिप्रिय

मी लगेचच बाहेर निघालो. चार पावले बाहेर पडण्यासाठी चालत असतानाच त्यांनी माझा असा अपमान केला.

दर्शनासाठी भाविकांनी आत यावे अशी इच्छा नसेल त्यांची.
सोडून द्या.

जॉनविक्क's picture

20 Jul 2019 - 7:06 pm | जॉनविक्क

एका दत्त संप्रदायातील साधू महाराजांच्या समाधी मंदिरात

महाराज आणि समाधी हे दोन शब्द प्रमुख हिंट मानू काय ?

नाखु's picture

20 Jul 2019 - 7:26 pm | नाखु

चिंचवडमध्ये तीस वर्षे रहात असूनही एकदाही चतुर्थी ला गर्दीत मोरया गोसावी दर्शनासाठी गेलो नाही.
पण त्याचा अर्थ मी नास्तिक मनुष्य आहे असं नाही.
पण जिथे गर्दी आणि माज, बडेजाव असतो तिथे सात्विकता मला तरी अनुभवायला मिळाली नाही.
रायगडावरील मंदीर, बदामी येथील बनशंकरी, चिंचवड येथील राममंदिर आणि शिवथरघळ ,सज्नजगड येथील समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनासाठी गेलो असता मनाला समाधान लाभते आणि मुख्य म्हणजे माझी दिवंगत पत्नीबरोबर या ठिकाणी गेलो असल्यानेच आजही ती माझ्याबरोबरच आहे असा मला विश्वास वाटतो.

लेकीलाही गर्दी आणि हडेलहप्पी तर दर्शन आवडत नाही म्हणून गणेशोत्सव दरम्यान कुठले गणपती पाहण्यासाठी जात नाही आणि सगळ्या राजांना घरूनच नमस्कार केला तरी पोहोचतो याची खात्री आहे.

सश्रद्ध पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2019 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

जिथे गर्दी आणि माज, बडेजाव असतो तिथे सात्विकता मला तरी अनुभवायला मिळाली नाही.

+१००

उलट अश्या जागी तथाकथित स्वयंसेवक आणि रक्षकांची मुजोरी चालू असते... आणि त्यांची ती सवय (विशेषतः, दर्शनाला आलेल्या लोकांना पुढे ढकलणे) गर्दी नसली तरी, कायम असते. ही सवय सेवेची नसून, गर्दीवर सत्ता गाजवण्याच्या उन्मादाची असते. अशा जागी पावित्र्याची, निर्मळ आनंदाची आणि मनःशांतीची अनुभूती कशी येऊ शकेल ?

नावाजलेल्या देवस्थानांत एकदोनदा त्या प्रकारच्या उन्मादी माणसांचा अनुभव आल्यानंतर, मी नावाजलेल्या आणि/किंवा गर्दी असलेल्या देवस्थानांत जाणे बंद केले आहे.

संगणकनंद's picture

21 Jul 2019 - 9:42 am | संगणकनंद

तुमचा हा प्रतिसाद वाचून मुंबईतील एक प्रसिद्ध हंगामी देवस्थान आठवले लगेच.

तरीही भाबडी श्रद्धा असलेले लोक जातात. आपल्या घरी असलेला देव आणि हा प्रसिद्ध देव वेगळे नाहीत ही समज येण्याइतकी त्यांची अध्यात्मिक प्रगती झालेली नसते. देव आपल्याच आत आहे ही तर त्याच्याही पुढची पायरी असते हे त्यांना कळणेही शक्य नाही.

नेमका याच गोष्टीचा गैरफायदा काही धूर्त लोक घेतात. स्वतःला देवाची माणसं किंवा अध्यात्मिक गुरु म्हणून घोषित करतात आणि साधनेच्या नावावर भोळ्याभाबड्या श्रद्धावान लोकांना भरकटवतात. लोकही यालाच "आपण देवाचं काहीतरी करतोय" असं समजून या कृतकृत्य होतात.

दुर्दैवी आहे हे सारं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2019 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे

त्या देवस्थानातील 'सेवकांच्या' वागणूकीचे प्रकार टिव्हीवर पाहिल्यानंतर तेथे कधी गेलो नाही, किंबहुना, आता जावे असे वाटतही नाही.

परंतु, इतर बहुतेक नावाजलेल्या देवस्थानांमध्येही काही फारसा वेगळा प्रकार होतो असे नाही. एकंदरीत, "भाविकांना देवळात येऊ देवून आपण त्यांच्यावर फार मोठे उपकार करत आहोत आणि त्यांच्याशी असभ्यपणे वागणे, त्यांना धक्काबुक्की करणे, हे आपले जन्मसिद्ध अधिकार आहेत", असे गर्दी होणार्‍या बहुतेक सगळ्या देवस्थानांतील "सेवेकर्‍यांचे (?!)" मत आहे असेच दिसते. अश्या जागी देव सापडेल असे मला वाटत नाही... कारण तेथे तो असता तर त्याने सर्वप्रथम त्या नाठाळ "सेवेकर्‍यांना" वठणीवर आणले असते.

प्रसिद्धी झाली, गर्दी जमली की, देवकारण हे अर्थकारणाचे दास बनते. अर्थकारणाला प्राधान्य देणार्‍यांना देवस्थानाचे पावित्र्य आणि मांगल्य कसे राखता येईल ? मग अश्या लोकांना आस्तिक तरी कसे म्हणता येईल ?

"अर्थकारण सबळ झाले की देवस्थानांवर, सहाजिकपणे मागच्या दाराने, आस्तिकाच्या मुखवट्यातील नास्तिकांचे राज्य येते" असा माझा एक लाडका सिद्धांत आहे. तसे नसते तर, (अ) देवाच्या भक्ताला नाडण्याचे आणि (आ) देवावरील हक्कांकरिता (पक्षी : त्यापासून मिळणार्‍या मलिद्यासाठी) वेळप्रसंगी हिंसा करण्याचे, प्रसंग दिसले नसते, नाही का?

वकील साहेब's picture

20 Jul 2019 - 8:53 pm | वकील साहेब

याच संदर्भात शेगाव संस्थानच्या सेवेकऱ्यांची वर्तणूक फार विनम्र वाटते.
असेच विपश्यना केंद्रातील स्वयंसेवक देखील फार विनम्र असतात.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2019 - 11:58 pm | मुक्त विहारि

विपश्यना करायला जाणार नाही.

Rajesh188's picture

20 Jul 2019 - 9:31 pm | Rajesh188

मला अक्कलकोट खूप आवडलं .
खूप छान सुविधा आहेत .
खासगी काही ही असू ध्या तिराहित तक्रार करण्याचा अधिकार वापरू शकत नाही .
मग खासगी मंदिर असेल .मंदिर हा शब्द काढून कोणताही शब्द वापरू शकता .
लेखक ची घोड चूक आहे त्यांनी कोणाच्या तरी खासगी मालमत्तेत प्रवेश केला

मुक्त विहारि's picture

22 Jul 2019 - 12:10 am | मुक्त विहारि

जास्त लिहीत नाही.

कुठेतरी वाचलेले एक वाक्य अशावेळी आठवतेय -

"प्रत्येक मूर्खाला शहाणे करण्याचा प्रयत्न करणे हा एक मूर्खपणा आहे, आणि आम्ही तो करणार नाही."

माझ्या मते हे वाक्य अशा बाबतीत आचरणात आणण्यास हरकत नसावी. :-)

मुक्त विहारि's picture

22 Jul 2019 - 12:12 am | मुक्त विहारि

लक्षात ठेवायला हवे. ..

त्यामुळे फार मोजके मूर्ख मी टार्गेट करतो. बराच फायदा होतो यातून, वेळही वाचतो आणि शिरोमाणिच टार्गेट केल्याने बाकीचेहि आपसूक शहाणे होतात :)

शान्तिप्रिय's picture

20 Jul 2019 - 11:05 pm | शान्तिप्रिय

इतके पण खाजगी नाही ते देवस्थान .
मोठे आहे.
त्यांचे कोकणात मोठे ट्रस्ट आहे.
वालावलकर ट्रस्ट

रेमिंग्टन's picture

21 Jul 2019 - 1:28 am | रेमिंग्टन

योग्य आहे सायबा.. एकदा असा अनुभव आल्यावर तिकडे परत न फिरणे इष्ट. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत तिथे तुकोबांचा अभंग आठवावा. "तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे :-)

वरती अनेक जाणकार मंडळींनी फार छान सल्ले दिले आहेत. जिथे शांत, प्रसन्न वाटते आणि ईश्वराच्या अंशाशी स्थिर चित्ताने एकरूप होता येते ती खरी आपली ध्यानधारणेची जागा.
कधी कधी अप्रसिद्ध अशी मंदिरं असतात तिकडे फारशी वर्दळ नसते. अशा ठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन सभामंडपातल्या एखाद्या खांबाला टेकावे आणि डोळे मिटून भगवंताशी एकरूप व्हावे. चराचरात ईश्वर व्यापून राहिला आहे हे लक्षात आले की मन शांत होते. बसल्या जागेवरून तुम्ही पंढरपुरात, शिर्डीला जिथे पाहिजे तिथे पोहोचता.

झेन's picture

21 Jul 2019 - 8:47 am | झेन

मंदिर कुठलं महिती नाही पण वेगवेगळ्या पंथाचे do's don't वेगवेगळे असू शकतात. तिथे आपले लॉजिक नाही चालणार. पहिल्या वेळची ट्रीटमेंट विसरून तुम्ही परत गेलात ? मनाची शांती घालणारा अनुभव घेऊन परत मंदिरात शांति शोधत होतात?

किसी रईस की महफिल का जिक्र ही क्या है।
खुदा के घर भी न जाएंगे बिनबुलाए हुए।

आपलं बुवा असं आहे.

गड्डा झब्बू's picture

24 Jul 2019 - 5:38 pm | गड्डा झब्बू

किसी रईस की महफिल का जिक्र ही क्या है।
खुदा के घर भी न जाएंगे बिनबुलाए हुए।

+१०१

कपिलमुनी's picture

21 Jul 2019 - 12:41 pm | कपिलमुनी

खासगी या शब्दात सर्व आले. दुसऱ्यांच्या जागेत त्यांनी कसे वागावे हे आपण कोण ठरवणार ?
पटत नसेल तर जाऊ नये. स्वतःचे मंदिर बांधावे

जॉनविक्क's picture

21 Jul 2019 - 1:23 pm | जॉनविक्क

याला म्हणायचा प्रतिसाद.

मस्त.

अभ्या..'s picture

21 Jul 2019 - 3:24 pm | अभ्या..

स्वतःचे मंदिर म्हणजे बांधून आपण स्वतः आशीर्वाद पोजमध्ये बसायचे गाभाऱ्यात?
भारी आयडियाय मुनिवर. तुझे मंदिर तर कपिल देव चे मंदिर म्हणून फेमस हुईल.

उपेक्षित's picture

21 Jul 2019 - 6:40 pm | उपेक्षित

खर तर मला एक कळत नाही कि पहिल्यांदा वाईट अनुभव आला असूनही तुम्ही परत त्या वाटेला गेलाच कशाला दादा ? अर्थात त्या लोकांचे समर्थन नाहीच करते मी
पण मला हा प्रश्न वारंवार पडतो जेव्हा मी शिर्डीला, तिरुपतीला, दगडूशेठ ला, लालबाग च्या राजाच्या इथे हि भली मोठ्ठी लाईन बघतो/ धक्काबुक्की बघतो लोक कशाला आपला वेळ/पैसा आणि श्रम घालवत असतील?
असो न सुटणार कोड आहे हे.

बाकी माझी बायडी आणि पोरग दरवर्षी गणपतीत ढोल वाजवायला जात असतात त्यांच्या वाड्याच्या गणपती समोर आणि मी मस्त घरी तंगड्या पसरून एकतर भूमी वाचत असतो नाहीतर आपल्या सनी भौंचा घातक बघत असतुया.काय करणार गर्दीमध्ये श्वास गुदमरतो आपला.

शान्तिप्रिय's picture

21 Jul 2019 - 10:02 pm | शान्तिप्रिय

सर्वांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.माझेच चुकले . ते लोक सुधारणार नाहीत कधीच. अशा देवळात जाणे बंद

बिनघोर घुसा. अहो पर्दा नही जब कोई खुदासे बंदोसे पर्दा करना क्या...

अंबरनाथमधले साई सेक्शन हे त्या भागाचे नाव पडण्याचे कारण (१९५४) सूर्योदय सोसायटी स्थापून घरे बांधली गेली त्यात एकाने बंगल्यात साईबाबाचे देऊळ बांधले. बंगल्याला अति उंच भिंत बांधून गढीच केली. दरवाजा बंद. त्याकाळी साईमंदिरे फारशी नसत. प्रवेश सहज नव्हताच तरीही त्या देवळामुळे साईसेक्शन नाव पडले.
२) आणखी दोन शिरडिचे किस्से आहेत पण लिहिणार नाही.
३) अक्कलकोटचाही आहे. पण भक्तगण भडकतील. जाऊद्या.
---------------
काही जाण्यासाठी ठिकाणे.
आपटे फाटा (पनवेल-पेण रस्ता) ते आपटे गाव या अडिच किमिटरात चार खासगी मंदिरे ( शंकर, कृष्ण, साई, मारुती) आहेत. उत्तम आहेत. आपटे स्टेशनापासून एक किमि गुळसुंदे गावातलं शिव मंदिरही छान आहे . भक्तनिवास आहे.
पालीचे गणपती मंदिर रम्य. पावसाळ्यात अतिसुंदर वातावरण. राहाणे,जेवणे व्यवस्था.
वसईजवळ तुंगारेश्वर परिसर.- फक्त दिवसा.
अलिबागजवळ कनकेश्वर. -राहाणे,जेवणे व्यवस्था.

जे उत्तम तिथे पुन्हापुन्हा जा.

वरील म्हणीचा उलट अर्थ लावून वागायचं तुम्ही कोणाच्या खासगी मालमत्ते मध्ये आरामात प्रवेश करू शकता .
मालक तुमचं स्वागत च करेल

नगरीनिरंजन's picture

22 Jul 2019 - 10:29 am | नगरीनिरंजन

स्वतःच्या भक्तांना असं वागवणार्‍या लोकांना जो ना सौजन्याने वागयची बुद्धी देऊ शकतो ना शिक्षा देऊ शकतो अशा दुर्बळ शक्तिहीन देवाच्या मूर्तीच्या दर्शनाने काय मिळतं?

शेवटी देवबाप्पा आज ना उद्या ज्याला त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देतोच, उसके घर देर है अंधार नही.

सैतानाशी करार करून शिक्षावस्थेला प्राप्त होतात असेही घडते.

मुक्त विहारि's picture

22 Jul 2019 - 11:16 pm | मुक्त विहारि

देव ही एक सुंदर संकल्पना आहे.

एकदा का प्रत्येक गोष्ट देवावर सोपवली की झालं.

मनुष्य मेला तरी देवाची मर्जी , असे समजले की, दूःख कमी होते. ही सामान्यतः गोष्ट आहे. सरसकट नाही.

असो..

तुमच्या मताशी मी सहमत आहे....मी पण मंदीरात जास्त जात नसल्याने, बहुतेक अघोर शिक्षेला पात्र होणार.

जॉनविक्क's picture

22 Jul 2019 - 11:23 pm | जॉनविक्क

सैतानाशी करारासंबंधिचा नुकताच एका धाग्यावरील घडलेला इतिहास आपणास ज्ञात नसल्याने अथवा आठवत नसल्याने अथवा माहित नसल्याने आपल्या आतिषय निरागस ठरलेल्या प्रतिक्रियेने मन प्रसन्न झाले. खूप खूप धन्यवाद मुवि.

मुक्त विहारि's picture

23 Jul 2019 - 6:26 am | मुक्त विहारि

देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली जे प्रदूषण होते, ते बघून, खुद्द शैतानाने पण मान खाली घातली असेल....

जॉनविक्क's picture

23 Jul 2019 - 10:55 pm | जॉनविक्क

सैतानाशी करारासंबंधिचा नुकताच एका धाग्यावरील घडलेला इतिहास आपणास ज्ञात नसल्याने अथवा आठवत नसल्याने अथवा माहित नसल्याने आपल्या आतिषय निरागस ठरलेल्या प्रतिक्रियेने मन प्रसन्न झाले. खूप खूप धन्यवाद मुवि. लिहीत रहा.

मुक्त विहारि's picture

24 Jul 2019 - 12:42 am | मुक्त विहारि

लिंक मिळेल का?

असो, आपण माणसे आयुष्यभर विद्यार्थीच असतो, देर आये दुरुस्त आये, ख्रड्वहि तपासा

नाखु's picture

22 Jul 2019 - 9:27 pm | नाखु

मी विचार करीत होतोच,कि हा धागा हळूहळू आस्तिक नास्तिक आणि देवावर खापर फोडण्याकडे कसा वळवला नाही.

बाकी चालू द्या...
धागा नेहमीच्या हुकुमी अंगाने यथायोग्य चिखलफेक करीत जाईल असे दिसतेय

नगरीनिरंजन's picture

25 Jul 2019 - 10:30 am | नगरीनिरंजन

काय करणार गाववाले? दुबळ्यांवर नेहमी खापर फुटत असते.
दुबळ्यांना कोणी वाली नसतो. खुद्द देवही नाही.
म्हटलंच आहे ना, “देवो दुर्बलघातकः|“

खासगी मंदिरे म्हणजे काय हा एक चर्चेचा वेगळा विषय आहे.
ग्रामदैवताचे मंदिर हे गावाच्या मालकीचे आणि त्याची व्यवस्था एक पंचसमिती पाहाते. नियम अटी तेच ठरवतात. इतर सर्व मंदिरे खासगीच असतात पण त्यात कमी अधिक जाचक अटी असतात.

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2019 - 4:24 pm | चौथा कोनाडा

हे वाचून मी एकदा उत्तर कर्नाटकातील एका माता मंदिरात गेलो होतो त्या वेळची घटना आठवली. आधीच तो पंथ कडक, अतिशिस्तीचा.
(पंथ चांगला निरुपद्रवी वाटत असला तरी त्यात उत्स्फूर्तता जाणवली नाही म्हणून त्याबद्दल काही वाटत नाही)

त्या मंदिरात विविध ठिकाणी फिरत असताना एका इतरांना "प्रवेश निषिद्ध" असलेल्या जागेकडे माझी पावलं चुकून वळली.
तर अंधारातून एक साध्वी टाईप पांढऱ्या वेशातील म्हातारी स्वयंसेवक बाई माझया अंगावर वस्स्कन आली, इतका प्रचंड दचकलो की बास !
कुठून या माता मंदिरात आलो असं झालं !

आता त्या माताजींचं नाव काढलं की मला ती पांढऱ्या वेशातील चेटकीण बाई आठवते, जणू एखाद्या हॉरर सिनेमातील कायम लक्षात राहिलेला शॉट !

एकंदरीत देव, देवस्थानं या पासून दूरच राहतो मी !

खाजगी मंदिरात जायची गरजच काय? जाऊच नये. कुठल्याही मंदिरात गेल्यावर एकाग्र होता येते. एकाग्र होण्यासाठी मंदिराची गरज नाही मुळातच.

विजुभाऊ's picture

24 Jul 2019 - 5:08 pm | विजुभाऊ

जगातील सगळे धर्म हे जुनाट आउटडेटेड झालेले आहेत.
मंदीरे ( प्रार्थनास्थळे आणि तत्सम संस्था ) ही त्या जुनाट धर्मांची बांडगुळे आहेत

किंचित असहमत (दुसर्या ओळीसाठी) काही काही जुनी मंदिरे छोटी/ साधीशी असतात पण तिथे गेल्यावर प्रसन्न वाटते, त्यातली काही लिस्ट देतो खाली (पुण्यातली आहे गोड मानून घ्या :)

धारेश्वर मंदिर, धायरी.
रामाचे देऊळ, नऱ्हे
विठ्ठल मंदिर, हिंगणे
रामाचे मंदिर, तुळशीबाग.
गणपती मंदिर, सारसबाग
मृत्युंजय मंदिर, कोथरूड.
गणपती मंदिर, राजाराम पूल.
विठ्ठल मंदिर, नवसह्याद्री

नाखु's picture

24 Jul 2019 - 7:51 pm | नाखु

आणि बेलबाग दोन्ही मस्त आणि निवांत आहेत

जॉनविक्क's picture

24 Jul 2019 - 7:57 pm | जॉनविक्क

पुराण ऐकायला कोणाला आवडते ? तरुणाईत तर कोणीच नाही पण पुण्यातील एका fm वर रोज सकाळी विविध पुराण कथा RJ त्यांच्या आधुनिक RJ स्टाईलमधेच सांगत सांगत गाणी वाजवतो आणि ते आजिबात पकाऊ वाटत नाही, थोडक्यात काळासोबत बदल घडले पाहिजेत हे पटतं.

सुबोध खरे's picture

24 Jul 2019 - 8:59 pm | सुबोध खरे

जगातील सगळे धर्म हे जुनाट आउटडेटेड झालेले आहेत.

हे मान्य करूनही त्याला सबळ असा पर्याय उपलब्ध नसल्याने तेच चालत आहेत हि शोकांतिका.

धर्माच्या नावाखाली चाललेला बाजार अमान्य केला तरीही धर्मात मान्य झालेली अनेक तत्वे हि नैसर्गिक न्यायाला धरून असल्याने सामान्य लोकांना तीच भावतात. उदा. दया, क्षमा, शांती, प्रामाणिकपणा,समाजाची नियमबद्धता

नास्तिकता सामान्य माणसांच्या बुद्धीला पटत नाही.

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2019 - 9:21 pm | धर्मराजमुटके

भक्ताने निर्मानी, निर्मोही, निस्वादी व्हावे अशी भगवंताची अपेक्षा असते. कदाचित पुजार्‍याला पुढे करुन देव तुमची सत्वपरीक्षा पहात असावा :)