Skip to main content

मिपा श्रीगणेश लेखमाला २०१९

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 12/07/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
IMG-20190711-WA0012 नमस्कार मिपाकरहो, सध्या आषाढ सुरू आहे मंडळी. भागवत भक्तीचा महामूर ओघ विठ्ठलाचरणी पर्जन्यराजाच्या साथीने लोटतो आहे. बघता बघता, क्षणात ऊन तर क्षणात पावसाचा खेळ खेळत, फुला-पानांची नक्षी सजवत, आसमंतात रंग भरत श्रावण हजर होईल! गणरायाच्या आगमनाची तयारी समस्त चराचरात सुरू होईल. सगळ्या सृष्टीला त्याच्या आगमनाचे वेध लागतील. मग मिपा मागे कसं राहील? सालाबादप्रमाणे मिपा आणि मिपाकरसुद्धा गजाननाच्या आगमनाची वाट बघणार, त्याच्या स्वागताची तयारी करणार आणि ह्या स्वागतात आणखी रंग भरणार ती मिपावर गणेशोत्सवानिमित्त साजरी होणारी श्रीगणेश लेखमाला. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या अधिपतीचं ह्याहून उत्तम स्वागत तरी कोणतं? तर मंडळी, हे स्वागत दणक्यात करण्यासाठी तुमच्या सहकार्याची, सहभागाची गरज आहे. मागील काही वर्षं आपण श्रीगणेश लेखमालेसाठी काही एक ठरावीक विषय देऊन लेख मागवले होते. ह्या वर्षी आपण कोणत्याही विषयाचं बंधन ठेवलेलं नाही. तुम्हा सर्वांना आवडीच्या विषयावर लेखन करण्याची सस्नेह विनंती आहे. लेख, ललितं, कविता, बाप्पाच्या नैवेद्याच्या आणि सणासुदीला चालणाऱ्या इतर पाककृती, आठवणी, व्यक्तिचित्रणं, भटकंतीची वर्णनं... लिहायला खूप काही आहे, तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरचं कार्य समजून मनावर घ्यायचं आहे! साहित्य पाठवताना एक छोटीशी काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे, श्रीगणेश लेखमालेसाठी पाठवलेलं साहित्य यापूर्वी कोणत्याही छापील अथवा ई-स्वरूपात कोणत्याही संकेतस्थळावर, वैयक्तिक ब्लॉगवर, कोणत्याही समाजमाध्यमात प्रकाशित झालेलं नसावं. मग सरसावताय ना कीबोर्ड? कारण, 'जे जे आपणासी ठावे| ते ते इतरांसी सांगावे| शहाणे करुनी सोडावे| सकळ जन|' तेव्हा होऊ द्यात श्रीगणेशा! बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करायला सुरुवात करू या. गणपतीबाप्पा मोरया!! *** कृपया आपले लेख दि. ०७-०८-२०१९पर्यंत ‘साहित्य संपादक’ या आयडीला व्यनि करून पाठवावेत, किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या पत्त्यावर ईमेलने पाठवावेत. काही प्रश्न, शंका असल्यास प्रतिसादांत जरूर विचारा. टीप : आलेल्या साहित्यापैकी श्रीगणेश लेखमालेसाठी निवडलेले लेख प्रकाशित करून झाल्यानंतर जे अप्रकाशित लेख आणि इतर साहित्य प्रशासनाकडे असेल, ते काही कालावधीनंतर प्रशासनाकडून प्रकाशित केलं जाईल अथवा सदस्य स्वत: प्रकाशित करू शकतील. धन्यवाद, साहित्य संपादक, मिसळपाव प्रशासन.

वाचने 24462
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

आले का गणपती ? लेखमालेला शुभेच्छा आहेतच. चित्र अभ्याचंच असेल. सुरेख. दोन शब्द : अभ्यानं मिपाजाल आयुष्यात काही चांगलं काम केलं असेल तर ही चित्रकला. मिपाला सालं लै भारी लूक दिलं अभ्याच्या चित्रांनी. धन्स रे. बाय द वे, गणेश लेखमालिकेसाठी लिहिताय ना ? मी पण प्रयत्न करतो. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा...! जय हरी. -दिलीप बिरुटे

आला का आवाहनाचा धागा? ह्या वेळी लिहायला बराच वेळ दिला आहे, हे उत्तम. चांगल्या लेखांच्या ( आतापासूनच) प्रतीक्षेत!

आमच्या गुरुदेवांच्या (अव)कृपेने स्वतंत्रपणे एखाद्या विषयावर काही लिहिण्याची बुद्धी झाली तर पाठवू काहीतरी :-)) श्रीगणेश लेखमालेस शुभेच्छा! सर्व मिपाकरांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! जय हरी विठ्ठल! __/\__

कोण कोण लिहितय काही अपडेट्स ? मी शनिवारी बसून पाहतो काही सुचतं का ? रुद्रेश्वर लिहायला घेतलं आठेक ओळी झाल्या आणि पुढे पॉज.... -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा झाला तर लेखमालेचा ! नेहमीच ही लेखमाला आगळेवेगळे असे काही देऊन जाते. यावेळीही अशाच अपेक्षेत, स्नेहा.

In reply to by सुधीर कांदळकर

साहित्य संपादक सांगतीलच. तुमचं लेखन वाचायची उत्सुकता आहे :)

मि.पा. प्रशासनाला विनंती, कृपया मुदत वाढवून मिळावी. पाउस आणि ईतर कारणामुळे लिहीणे शक्य झाले नाही. विनंतीचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा.

In reply to by यशोधरा

सुरुवात केली होती, पण लिहून पूर्ण झाले नाही त्यात काल शेवटचा दिवस असल्याने मग पूर्ण करण्याचा विचार सोडून दिला :) मुदतवाढ मिळाल्याचे वाचून आनंद झाला, आता लेख लिहून पूर्ण करायचे मनावर घेता येईल.